हिंंदुत्वाचा वैश्विक आयाम

विवेक मराठी    07-Oct-2024   
Total Views |
hindu swayamsevak sangh information in marathi
rss
हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्य जगभर पसरले. आज अमेरिकेपासून जपानपर्यंत अनेक देशांमध्ये हिं. स्व. संघाचा प्रसार आहे. मुस्लीम देशांत हिंदू स्वयंसेवक संघ झपाट्याने विस्तारला आहे. मलेशियातील पडांग जावा या प्रांतात जातिभेद दूर करण्यामध्ये हिं. स्व. संघ स्वयंसेवकांनी मोठे योगदान दिले. विराट हिंदू समाजाची अत्यावश्यक अशी गरज भागविण्यासाठी रा. स्व. संघाचे कार्य भारतात चालू आहे. तेच कार्य हिं. स्व. संघ परदेशात करत आहे.
उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्।
वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः॥
 
 
जी समुद्राच्या उत्तर दिशेला आणि हिमालयाच्या दक्षिण दिशेला आहे, ती भूमी ‘भारत’ या नावाने ओळखली जाते आणि तिच्या संततीला ‘भारतीय’ या नावाने ओळखले जाते. विष्णुपुराणातील या श्लोकामधून प्राचीन काळापासून भारतीयांची व्याख्या करण्यात आली आहे. कालौघात याच भारतीय शब्दाचे प्रतिरूप ‘हिंदू’ या शब्दाने करण्यात येऊ लागले. या भारतीय संस्कृतीची जोपासना व प्रसार व या हिंदभूची प्रतिष्ठा वाढवणे हे ध्येय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समोर ठेवले आहे. प्रत्यक्ष या भूमीवर निवास नसलेले, मात्र तिच्यावर निष्ठा आणि तिच्या संस्कृतीबाबत आस्था बाळगणारे लाखो लोक जगभरात पसरलेले आहेत. आपापल्या पातळीवर हिंदू आणि भारतीय जीवनमूल्यांची जोपासना करून तिचा प्रसार करण्याचे काम हे सर्व जण करत आहेत. भारतभूमीत हे कार्य रा. स्व. संघ करत आहे, तर जागतिक पातळीवर तेच काम हिंदू स्वयंसेवक संघ करत आहे.
 
rss 
 
आज जगात आपण हिंदू धर्माचे अनुयायी आहोत, हे अधिकृतपणे सांगणार्‍यांची संख्या एक अब्ज वीस कोटी एवढी आहे. त्यातील बहुतांश अर्थातच भारत आणि नेपाळमध्ये राहतात. भारताबाहेर सुमारे 130 देशांमध्ये सहा कोटी हिंदू आहेत. यातील 2.3 कोटी नेपाळमध्ये, तर 1.3 कोटी हिंदू बांगलादेशात राहतात. याशिवाय अमेरिकेत 35 लाख, इंग्लंडमध्ये बारा लाख, पाकिस्तानात 50 लाख, श्रीलंकेत वीस लाख आणि मलेशियात वीस लाख अशी हिंदूंची संख्या आहे. इंडोनेशियात हिंदूंची संख्या 50 लाख आहे आणि हे तेथील मूळ निवासी आहेत.
 
 
एवढ्या मोठ्या संख्येने राहणार्‍या हिंदूंना आपल्या मायभूमी आणि देवभूमीची ओढ असणे स्वाभाविक आहे. त्यांना आपल्या मुळाशी जोडून घेण्यासाठी एका संघटित शक्तीची गरज आहे. भारतात जे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करते, तेच कार्य त्याच स्वरूपात संघ अर्थातच करू शकत नाही. परदेशात संघाची एकही शाखा नाही; पण म्हणून संघाचा किंवा संघविचारांचा प्रभाव परदेशात पडल्यावाचून राहणार नव्हता. तो हिंदू स्वयंसेवक संघाच्या रूपाने पडत आहे. सनातन संस्कृतीची पताका हिंदू स्वयंसेवक संघाने (एचएसएस) भारतवर्षाच्या बाहेर नुसती फडकवत ठेवलेली नाही तर निरंतर ती पुढे नेत आहे.
 
 
बोटीवर झालेली स्थापना
 
प्रत्यक्षात संघटित स्वरूप येण्यापूर्वीही संघाचा प्रभाव भारताबाहेर होताच. मॉरिशसमधील विष्णू दयाल हे 1936 मध्ये शिक्षणासाठी लाहोर येथे (अविभाजित भारतात) राहिले होते. तिथे ते संघाच्या संपर्कात आले. त्यांना डॉक्टर हेडगेवार यांना भेटण्याची संधीही मिळाली होती. संघशाखेत गिरविलेल्या नेतृत्वगुणांचा उपयोग त्यांनी मॉरिशसला परतल्यानंतर तेथील स्वातंत्र्यलढ्यात केला. त्यांनी प्रशिक्षण दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना ’स्वयंसेवक’ असेच म्हटले जात असे. मात्र त्यानंतर दहा वर्षांनी या संघटनेला औपचारिक स्वरूप आले.
 
rss 
एक लक्षणीय बाब म्हणजे हिंदू स्वयंसेवक संघाची स्थापना कुठल्याही भूमीवर झालेली नाही. अगदी भारतातही नाही. ती झाली अगदी भर समुद्रात, एका बोटीवर. ही गोष्ट आहे 1946 ची. मुंबईहून एक बोट केनियामधील मोम्बासा बंदराच्या दिशेने जात होती. त्या बोटीच्या प्रवाशांमध्ये पंजाबच्या अमृतसर येथील एक तरुण स्वयंसेवक जगदीश शास्त्री हेसुद्धा होते. त्याच बोटीवर त्यांना संघाच्या गणवेशातील खाकी चड्डी घातलेले आणखी एक किशोरवयीन स्वयंसेवक दिसले. ते होते गुजरातमधील माणिकलाल रुघानी. मग काय, दोन्ही स्वयंसेवक एकत्र आले, त्यांची मैत्री झाली आणि ते डेकवरच खेळ खेळू लागले. आणखी काही युवक त्यांना सामील झाले. खेळ संपल्यानंतर त्यांनी संघप्रार्थना गायली. अशा रीतीने परदेशातील संघकार्याचा पाया रचला गेला. एस.एस. वासना या जहाजावर सप्टेंबर 1946 मध्ये भारताबाहेरची पहिली संघशाखा भरली. हिंदू युवकांच्या जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेचा पाया आपण रचत आहोत, हे त्या दोघांच्या (अक्षरशः) गावीही नव्हते!
 
 
केनियाला पोहोचल्यानंतर जगदीश शास्त्री आणि माणिकलाल रुघानी यांनी आपल्या मित्रांना सोबत घेऊन 14 जानेवारी 1947 रोजी मकरसंक्रांतीच्या पवित्र दिवशी नैरोबी येथे औपचारिकरीत्या शाखा भरवली. शास्त्रीजींनी टांझानिया, युगांडा, मॉरिशस आणि झांबिया येथेही संघकार्याचा प्रचार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. नंतर ते इंग्लंडला गेले आणि सरतेशेवटी कॅनडातील टोरंटो येथे स्थायिक झाले; परंतु जिथे जिथे गेले, तिथे तिथे आयुष्याच्या अखेरपर्यंत म्हणजे 85 व्या वर्षापर्यंत त्यांनी संघकार्य चालू ठेवले. डॉ. शंकर तत्त्ववादी आणि अन्य लोकांनी शास्त्रीजींना हिंदू स्वयंसेवक संघाचे ‘पितामह’ म्हटले आहे.
 
 
केनियाची राजधानी नैरोबी येथे 7 ऑगस्ट 1998 रोजी अमेरिकी दूतावासावर दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. त्यात अनेक अमेरिकन आणि आफ्रिकी लोकांचा जीव गेला. त्या वेळी आग विझविण्यासाठी तसेच जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी संघ स्वयंसेवकांनी अग्निशमन आणि रेड क्रॉसच्या अधिकार्‍यांना मदत केली. केनियाला अनेकदा प्रचंड दुष्काळ, महापूर तसेच महामारीचा सामना करावा लागला आहे. अशा वेळेस संघाचे स्वयंसेवक आपला व्यवसाय व व्यापार बाजूला ठेवून आफ्रिकी लोकांच्या सेवेसाठी दुर्गम भागात जातात. या संदर्भात केनियाच्या एका राजकारण्याने केलेली टिप्पणी मोठी मार्मिक आहे. तो म्हणाला होता, आम्हाला औषधे आणि खाद्यपदार्थ पुरविणार्‍या अमेरिका व युरोपीय देशांना आम्ही धन्यवाद देतो; परंतु आम्ही भारतीय लोकांचे अधिक आभारी आहोत, कारण त्यांनी हे साहित्य विमानतळ आणि बंदरातून केनियातील दुर्गम भागांमध्ये नेले जिथे त्यांची सर्वात जास्त गरज होती.
 
 
rss 
 
यानंतर हिंदू स्वयंसेवक संघाचे कार्य जगभर पसरले. आज अमेरिकेपासून जपानपर्यंत अनेक देशांमध्ये हिं. स्व. संघाचा प्रसार आहे. मलेशियासारख्या मुस्लीम देशात हिंदू स्वयंसेवक संघ झपाट्याने विस्तारला आहे. तेथील पडांग जावा या प्रांतात जातिभेद दूर करण्यामध्ये हिं. स्व. संघस्वयंसेवकांनी मोठे योगदान दिले. त्याचप्रमाणे कॅमेरॉन हायलँड या प्रांतात आत्महत्यांचे प्रमाण मोठे होते. तेथे भजन-कीर्तन आणि सत्संगाच्या माध्यमातून समाजसेवकांनी समाजप्रबोधन केले आणि आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले. या घटनेची दखल संयुक्त राष्ट्र संघाने घेतली आणि त्याबद्दल मलेशिया सरकारचे कौतुक केले. त्यावर मलेशिया सरकारने संघाचे प्रचारक रामाजी यांना 50000 मलेशियन डॉलर रक्कम देऊन त्यांचा सत्कार केला.
 
 
मलेशिया सरकार 2007 मध्ये रस्ता रुंदीकरणाच्या नावाने एकामागून एक भव्य आणि जुनी हिंदू मंदिरे पाडत होते. प्रचारक रामाजी आणि अ‍ॅड. वेदमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली, हिंदराफ (हिंदू राइट्स अ‍ॅक्शन फोर्स) नावाच्या संघटनेने हिंदू मंदिरे वाचवण्यासाठी एक सार्वजनिक रॅली काढली. मलेशियाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी निदर्शने होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. सरकारला मंदिरांवर बुलडोझर फिरविणे बंद करावे लागले. पुढे निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे मोठे नुकसान झाले आणि पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला.
 
 
मलेशियातील या संघटनेचा एवढा प्रभाव आहे की, 100 शाखा असण्याचा संकल्प पूर्ण करणारा मलेशिया हा जगातील पहिला देश बनला. विश्व विभागातील पहिल्या प्रचारिका मलरजी या मलेशियातीलच आहेत. त्याचप्रमाणे मलेशियात जन्मलेले आठ जण सध्या प्रचारक म्हणून कार्यरत आहेत.
 
 
सन्मानित स्वयंसेवक, सर्वांगीण प्रभाव
 
संघाशी संबंधित अनेक जणांनी विविध देशांमध्ये अधिकारपदेही भूषविली आहेत. अमेरिकेतील सोनल शाह यांनी 2009 ते 2011 मध्ये तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या मंत्रिमंडळात काम केले. त्यांनी 2001 मध्ये सेवा भारतीच्या पूर्ण वेळ स्वयंसेविका म्हणून भारतात काम केले आहे. त्यांचे वडील रमेश शाह हे एकल विद्यालयाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अमेरिकेत 2005 मध्ये आलेल्या कॅटरिना वादळाच्या वेळेस अनेक हिं.स्व. संघ सेवकांनी रजा घेऊन मदतकार्य केले होते. त्या वेळी तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या पत्नी लॉरा बुश यांनी सन्मानपत्र देऊन स्वयंसेवकांचे कौतुक केले होते. भारतीय वंशाचे अमेरिकी साहित्यिक प्रा. वेदप्रकाश नंदा हे हिं.रा. स्व. संघाचे संघचालक होते. त्यांना 2018 मध्ये पद्मभूषण देण्यात आले आहे. अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कोंडोलिसा राइस या प्रा. नंदा यांच्या विद्यार्थिनी हिं. स्व. संघाशी संबंधित प्रा. भीष्मकुमार अग्निहोत्री यांच्या सन्मानार्थ लुईसियाना या राज्याने 12 मे 1985 हा दिवस ‘अग्निहोत्री दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांना इस्रायलनेही सन्मानित केले होते. बंगळुरू येथील स्वयंसेवक डॉक्टर शिवा सुब्रमण्यम हे अंतराळ शास्त्रज्ञ होते. अमेरिकेत विश्व हिंदू परिषद सुरू करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला होता. अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेचे ते उपाध्यक्षही होते.
 
 
स्वयंसेवकांना या मिळालेल्या सन्मानासोबतच संघाचा प्रभावसुद्धा सर्वांगीण झाला आहे. तो केवळ सांस्कृतिक किंवा सेवाकार्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. एक उदाहरण पुरेसे बोलके आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून पोप यांनी भारताचा दौरा करू नये, यासाठी इटलीतील भारतविरोधी घटक प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी इटालियन वृत्तपत्रांमध्ये भारतविरोधी मोहीम चालवली. ’भारतात मुस्लीम आणि ख्रिश्चनांवर अन्याय होत आहे - चर्चेस जाळली जात आहेत, मुस्लिमांची कत्तल केली जात आहे, स्त्रिया घराबाहेर पडायला घाबरतात,’ वगैरे नेहमीचा दुष्प्रचार त्यात होता. चेन्नईतील स्वयंसेवक नरेंद्रन यांना जेव्हा हे कळाले, तेव्हा त्यांनी इटलीतील वासुदेव शेनॉय यांच्या मदतीने प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेत्री खुशबू खान, सर्वोच्च न्यायालयातील वकील सुबुही खान, प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. माजिद अहमद तालिकोटी आणि गोव्यातील लेखक सॅव्हियो रॉड्रिग्ज यांची एक ऑनलाइन पत्रकार परिषद प्रमुख इटालियन पत्रकारांसोबत आयोजित केली. या पत्रकार परिषदेच्या बातम्या अनेक आघाडीच्या इटालियन वृत्तपत्रांमध्ये आल्या. पोप यांचा भारत दौरा रद्द व्हावा म्हणून राहुल गांधी जेव्हा इटलीत पोहोचले तेव्हा पोपनी त्यांना भेटण्यासच नकार दिला.
 
 
थोडक्यात म्हणजे विराट हिंदू समाजाची अत्यावश्यक अशी गरज भागविण्यासाठी रा. स्व. संघाचे कार्य भारतात चालू आहे. तेच कार्य हिं. स्व. संघ परदेशात करत आहे.
 
 
महाराष्ट्राचे योगदान
 
हिंदू सेविका समितीच्या कुमारी अनिता पटेल या केनियात प्रचारिका आहेत. त्या आफ्रिकी युवक आणि मुलांसाठी शाखा चालवतात. नैरोबी हे प्रचारक लक्ष्मणराव भिडे यांचे अनेक वर्षे मुख्यालय होते. महाराष्ट्राचेच डॉ. शरद हेबाळकर यांनी काही वर्षे केनियामध्ये विस्तारक म्हणून कार्य केले. स्व. माधवराव बनहट्टी यांनी मॉरिशसमध्ये 1977 ते 1989 पर्यंत प्रचारक म्हणून कार्य केले, तर रमेश सुब्रमण्यम यांनी अनेक वर्षे तेथे सेवा केली.

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक