आता बास झालं तुझे हे दुबळेपण. तू दुर्गा, काली यांची वारसदार ना? विसरलीस का तुझे तेज, तुझे सत्त्व? आज वेळ आली आहे, स्वत:ची ताकद जोखण्याची, आत्मविश्वास जागवण्याची. हे तरुणी, निश्चय तुलाच करावा लागेल. जोखमीचा विचार तुलाच करावा लागेल. हे करताना मुलांच्या व पुरुषांच्या प्रबोधनाचे कामही आपल्याला हाती घ्यावे लागेल. या नवरात्रीच्या निमित्ताने अष्टभुजांमध्ये युक्त्या-प्रयुक्त्यांची आयुधे घेऊन, मनात आत्मविश्वास जागवून स्व-संरक्षणासाठी सज्ज हो!!
हे एकविसाव्या शतकातल्या भारतीय नारी,
आजूबाजूचे वातावरण कधी नव्हे इतके विषारी, हिंसक झाले आहे. गेल्या शतकात शिक्षण, कायदे, तंत्रज्ञान या आयुधांनी तुझे कर्तृत्व इतके झळाळून उठले आहे की, हे तेज तुझ्या बरोबरीच्या पुरुषाला झेपेनासे झाले आहे की काय? त्याचा अभिमान वाटायच्या ऐवजी, तो तुला स्पर्धक मानू लागला आहे की काय? अशी रास्त शंका येते.
समाजसुधारकांना असे वाटले होते, की स्त्री-पुरुष समतल होतील. रथाचे रुतलेले चाक जमिनीतून उकरून वर काढले, त्याला गती दिली, की हा रथ नव्या वेगाने धावू लागेल. ते अर्धसत्य झालं गं! तू शिकलीस, कमवू लागलीस आणि रुतलेल्या रथाला जणू आत्मभानाचे पंख फुटले. रथ पळू नव्हे तर उडू लागला! पण रथाचे दुसरे चाक ती गती नाही पकडू शकले. शिक्षण, नोकरी, नेतृत्व सगळ्या सगळ्यात तू आघाडी घेतलीस, हे सहन करणे पुरुषांना थोडेसे कठीण जाऊ लागले. तुझ्या यशाचा वारू रोखायला, तुला पराभूत करायला आता तेच आदिम अस्त्र काढलं गेलंय, तुझा तेजोभंग करणं. तुला एकटे गाठून शारीरिक हल्ला, बलात्कार करायचा. पाशवी शारीरिक बळाच्या जोरावर तुला शीलभ्रष्ट करायचं, अपमानित करायचं! कधी कधी मारूनही टाकायचं. आता बास झालं तुझे हे दुबळेपण. तू दुर्गा, काली यांची वारसदार ना? विसरलीस का तुझे तेज, तुझे सत्त्व? आज वेळ आली आहे, स्वत:ची ताकद जोखण्याची, आत्मविश्वास जागवण्याची. शक्ती, युक्ती व प्रयुक्तीने स्वत:ची काळजी घेण्याची. हे तूच कर बये!!
शक्ती
स्वसंरक्षणाचे तंत्र तू शिकून घेच; पण समोरच्याला तुझ्या शारीरिक व मानसिक सिद्धतेची जाणीवही करून दे, की मी माझ्या रक्षणाची जबाबदारी घ्यायला मी शरीराने सिद्ध आहे व मनाने समर्थही आहे. तू म्हणशील, ‘हे मीच अजून किती वर्षं करायचं? पुरुष स्वत:ला कधी बदलणार? आम्ही पुरुषासारखे कमवायला लागलो, समाजात जाऊन वावरायला लागलो, नागरिक कर्तव्ये पार पाडायला लागलो, हे माझ्या बरोबरीच्या समवयस्क पुरुषालासुद्धा कळू नये?’
तुझा प्रश्न अगदी बरोबर; पण आज तरी त्याला समाधानकारक उत्तर मला दिसत नाही. कारण 70% लैंगिक अत्याचार हे ओळखीच्या, नातेवाईक पुरुषांकडून होतात ज्यांच्याबद्दल कधी संशयही घेतला जात नाही आणि हो, काळ मोठा विचित्र आहे. एका बाजूने मुली सक्षम, निर्भय होऊ पाहत आहेत आणि अनेक पुरुष मात्र तिच्याकडे आदिम शारीर आकर्षण व लैंगिक भावनेच्या पलीकडे पाहू शकत नाही. शिक्षणव्यवस्था, कुटुंबाचे संस्कार तोकडे पडत आहेत. काही पुरुष बदलले असले, काही बदलाच्या मार्गावर असले तरीही असा पुरुष घडवणे हेही आपल्यालाच करावे लागणार आहे.
युक्ती
तू ज्या भागात जाणार आहेस तो भाग, ती वेळ, बरोबरचे सहकारी तुझ्यासाठी सुरक्षित आहेत ना याचा वारंवार विचार कर. अगदी एखादी मैत्रीणसुद्धा धोकादायक सिद्ध होऊ शकते, हे लक्षात घे. मित्र, सहकारी यांच्यावर खूप विश्वास टाकून, आईवडिलांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नकोस. एखादी गोष्ट तू कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यापासून लपवून करत असलीस तर त्यात 100% जोखीम नाही का? अनेकदा सुरुवातीला एखादा मुलगा छान वागतो, विश्वास संपादन करतो आणि मग गैर कृत्य करून पश्चात्तापाची वेळ आणतो याची रोज नवनवी उदाहरणे समोर येतात, त्यापासून प्रत्येकीने धडा घ्यायला हवा. चटकन विश्वास ठेवू नकोस. आपली व्यूहरचना ठरवायला हवी. अनावस्था प्रसंगात लोकेशन शेअर करता येईल, 100 किंवा 1098 या हेल्पलाइनला कॉल करता येईल; आरडाओरडा, प्रतिकार करता येईल, सुटका करून घेण्यासाठी स्प्रे, तिखटाची पुडी, एखादे छोटेसे आयुध जवळ बाळगता येईल.
कोणत्याही नात्यांतल्या पुरुषांकडून नकोसे वाटणारे बोलणे, स्पर्श व कटाक्ष यांचा स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवावा लागेल. त्या व्यक्तीला असे वागताना संकोच नसेल तर सोशल मीडियावर एक्सपोझ करायला संकोच कशाला करायचा? अर्थात त्यासाठी सबळ व पुरेसे पुरावे गोळा करून वकिली सल्ला घेतलाच पाहिजे. पोलीस, महिला आयोग यांच्याकडेही दाद मागता येईल.
प्रयुक्ती
नवरात्रीत तू गरबा खेळायला जाशील. तुला सावज म्हणून हेरण्याचा प्रयत्न होईल. तुला सतर्क राहावं लागेलच; पण टिपर्यांच्या धुंदीतही तुला सुरक्षेचं भान जागं ठेवावं लागेल. जसजसे अन्याय- अत्याचाराचे प्रसंग समाजासमोर येतात, नव्या युक्त्या लढवल्या जातात, त्या धर्तीवर आपल्या संरक्षणासाठी नवनवे प्रयोग करावे लागतील. बरोबरीच्या मुलग्यांबरोबर सातत्याने मर्दानगीची कल्पना, स्त्री देहाचे आकर्षण, मुलींचे मनोविश्व अशा विषयांवर चर्चा करावी लागेल, स्त्री सुरक्षेमध्ये त्यांचा सहभाग वाढवावा लागेल.
अत्याचारात वाढ का?
समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे, स्त्री-पुरुष नात्यात एक मोकळेपणा आला आहे तरीही स्त्रियांवर होणार्या अत्याचारांत सातत्याने वाढ का होत असावी, हा प्रश्न अनेकांप्रमाणे मलाही छळतो. स्त्रीच्या शरीराबद्दलचे कुतूहलही जुनेच आहे. मग नेमके बदलले काय?
वाढती शरीरजाणीव आणि शरीरभान (बॉडी कॉन्शसनेस)
आजचे युग फॅशनचे, दिसण्याचे आहे, जे मुलांचे व मुलींचे शरीरभान जागृत करते व सतत प्रज्वलित ठेवते. शरीराकडे निरखून पाहता येईल असे मोठाले आरसे, मुलग्यांसाठी सिक्स पॅक शरीरयष्टीचे आकर्षण, शरीराच्या प्रमाणबद्धतेसाठी जिम्स, डाएट प्लॅन्स, फूड सप्लीमेंट्स यांच्या जाहिराती यातून ते सतत जागते ठेवले जाते. मुलींच्या शरीराला चिकटलेल्या अनेक मिथ्स किंवा भ्रामक कल्पना आहेतच. पूर्वीची 36-24-36 ही मापे असोत की आजचे झिरो फिगरचे भ्रमजाल! कमनीय बांधा, बाजारव्यवस्थेने प्रस्थापित केलेल्या सौंदर्य स्पर्धा व त्यांचे ते सुंदरतेचे निकष, केवळ शरीराला उठाव देणारे कपडे व प्रसाधन नव्हे, तर शरीर अनावृत करणार्या फॅशन्स, खरे-खोटे दागिने, मेकअप, कॉस्मेटिक सर्जरीज् व सतत आदळणार्या त्यांच्या जाहिराती यांचा प्रभाव मुलींवर खूप आहे. मग हे मुलामुलींचे धगधगते शरीरभान आपल्या आकर्षक शरीराचा इतरांवर प्रयोग करण्यात मागे कसे राहील?
माझे शरीर- माझा अधिकार आणि माझी जबाबदारीही
आज समाजात लैंगिक संबंधांना विवाहाची चौकट नाही असे अनेक ठिकाणी दिसते. नैतिक-अनैतिक या वादात नाही गेलो तरीही, अनेकदा मुक्त शरीरसंबंधांचा वापर, पुनःपुन्हा संबंध ठेवण्याची जबरदस्ती, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, बळजबरी, धमकी देणे, जिवाला निर्माण होणारा धोका, पैसे उकळणे अशा अनेक गैरप्रकारांनी केला जातो हे वास्तव डोळ्याआड करून चालणार नाही. त्या सुखाचा क्षणिक आनंद व मौजमजा ही जन्मभर दु:स्वप्नासारखा पाठलाग करू शकते, मन:शांती व सुरक्षिततेला धोका ठरू शकते. म्हणून शरीरसंबंधांना कुटुंबाची, नैतिकतेची, सुरक्षेची आणि महत्त्वाचे म्हणजे ‘परस्पर जबाबदारीची’ चौकट देण्यासाठी विवाहसंस्था अस्तित्वात आली असेल, असा विचार तुमच्या पिढीने करायला नको का? विवाहसंस्था ही रिस्क कमी करणारी व्यवस्था हवी की अनिर्बंध स्वातंत्र्याच्या आभासात आयुष्य पणाला लावायचे याचा विचार करण्याची जबाबदारी मुलगा व मुलगी दोघांचीही आहे.
अँटिहीरो कल्पना
तरुणाईच्या भावविश्वावर सिनेमा व माध्यमांचा पगडा मोठा असतो. त्यात अनिर्बंध अशा ओटीटी वाहिन्यांची भर पडली आहे. एक काळ होता, जेव्हा सिनेमात सुष्ट प्रवृत्तीचे ते नायक आणि दुष्ट प्रवृत्तीचे ते खलनायक असायचे आणि काव्यात्म न्यायानुसार नायक नेहमी विजयी व्हायचा. खलनायक हा दुष्ट प्रवृत्तीचा असल्याने कितीही ताकदवान असला तरी त्याचा पराभव होणे अटळ असायचे. खलनायकाला ‘अँटिहीरो’ अशी सन्मानजनक पदवी दिली जात नसे. आता या सन्मानामुळे नायक आणि खलनायक यातले अंतर संपूनच गेले आहे, मग तो सिनेमा असो की वास्तवातली कहाणी. त्यामुळे अशा खल प्रवृत्तींवर सुष्ट प्रवृत्तींचा नैतिक दबाव येणे संपूनच गेले आहे. चांगले वागण्याची मूळ प्रेरणा क्षीण झालेली असताना कुटुंबाचा, मूल्यांचा, नैतिकतेचा, समाजाचा तो प्रभावही नष्ट होत चालला आहे. शक्य त्या त्या उपायांनी अँटिहीरो कल्पनेला, त्याच्या उदात्तीकरणाला विरोध करणे हे केवळ स्वत:साठी नव्हे, तर पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षेसाठी गरजेचे आहे.
पोर्न व डार्कवेब
पोर्न कंटेण्टला क्षणभर आपण श्लील-अश्लील या वादापासून दूर ठेवले तरीही पोर्न कंटेण्ट हा फक्त नग्नता वा उघडावाघडा शरीर व्यवहार दाखवत नाही, तर सत्तात्मक संबंध, ताकदवान व्यक्तीने दुसर्या व्यक्तीवर केलेली शारीरिक बळजबरी, लैंगिक हिंसा व लिंगपिपासा दाखवते हे निश्चित. असा अनिर्बंध कंटेण्ट मुबलक उपलब्ध असताना त्या लिंगपिपासेपासून स्वत:ला वाचवायचे असेल तर त्याला स्वत:च्या मनावरचा ताबा, मूल्यांचे योग्य-अयोग्य या विवेकाचे बंधन हेच उपाय असतील. हे सगळे रोखण्यात कायदा, पोलीस, न्यायव्यवस्था यांच्या मर्यादा वेळोवेळी उघड झालेल्या आहेत. वोकिझम कुटुंबव्यवस्थेला, जगाला, चांगुलपणाला, पर्यायाने माणुसकीला आव्हान देत असताना झोपून राहणे परवडणारे नाहीच.
गुन्हे नोंदीचे कमी प्रमाण
आज NCRB ची आकडेवारी वर्षागणिक गुन्ह्यांची संख्या वाढते आहे हे दर्शविते. तरीही आजही सर्व नाहीच, तर बहुसंख्य गुन्हे नोंदवलेच जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. गुन्हा नोंदवणे, त्याचा पाठपुरावा, चौकशी या गोष्टी वेळखाऊ आहेत आणि न्याय मिळेल अशी शक्यता वाटत नाही, त्यामुळे गुन्हा नोंदवला जात नाही. त्यामुळे गुन्हा करण्यास हरकत नाही, असा गैरसमज होतो व गुन्हेगाराचे मनोधैर्य वाढते. ‘लडके तो लडके होते है’ अशा वक्तव्यामुळे गुन्ह्याचे मामुलीकरण (Simplification), सामान्यीकरण (Generalization) आणि किरकोळीकरण (Casualization) होते. या सर्वांच्या संयोगातून गुन्ह्याचे आणि गुन्हेगाराचे उदात्तीकरण होते. ते रोखायचा प्रयत्न गुन्हा नोंदवून करता येईल.
हे झाले काही मुद्दे. माझे मनोगत मी मांडले आहे. हे तरुणी, निश्चय तुलाच करावा लागेल. जोखमीचा विचार तुलाच करावा लागेल. हे करताना मुलांच्या व पुरुषांच्या प्रबोधनाचे कामही आपल्याला हाती घ्यावे लागेल. या नवरात्रीच्या निमित्ताने अष्टभुजांमध्ये युक्त्या-प्रयुक्त्यांची आयुधे घेऊन, मनात आत्मविश्वास जागवून स्व-संरक्षणासाठी सज्ज हो!!
नवरात्रीचा हा जागर
भक्तीचा हा सागर
स्व-शक्तीचा उद्गार
स्व-सामर्थ्याला ललकार ॥
जाग बये, तू जाग!!
लेखिका भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या
राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.