उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जाट, रोहिले, राजपूत, मुघल, अफगाण, पठाण, निजाम, हैदर अशा सार्यांना नमवून कर्नाटक-जिंजीपासून काश्मीरपर्यंत, गुजरातपासून बंगालपर्यंत आणि अटक ते कटक अशी अवघी भरतभूमी मराठ्यांनी आपल्या अमलाखाली आणली. हा गौरवशाली इतिहास मुघलांचे गोडवे गाणार्या ब्रिटिशधार्जिण्या इतिहासकारांनी सांगण्याचे मुद्दाम टाळले. इंग्रजांनी आणि स्वातंत्र्योत्तर सत्ताधीशांनीही हा इतिहास दडवला. निनाद बेडेकरांसारख्या मोजक्या इतिहासकारांनी मात्र ह्या दडपलेल्या इतिहासाचे पुनर्जागरण केले. हे पुण्याहवाचन म्हणजे महाराष्ट्राची खरी विजयादशमी. अवघा भारत आजही हिंदुस्थान म्हणून टिकून राहिला आणि नवरात्रोत्सवाची दुर्गापूजा करतो आहे, दसरा-दिवाळी साजरा करतो आहे याचे कारण शिवछत्रपतींचे वारसदार म्हणून मराठ्यांनी केलेले सीमोल्लंघन. हे मराठी शिलंगणाचे सोने बावनकशी आहे, अस्सल आहे आणि इतिहासाच्या पानावर सदैव झळाळत राहणार आहे.
विजयादशमीचा दिवस. सूर्य अस्ताला जातोय. झेंडूच्या आणि आंब्याच्या तोरणांनी शृंगारलेल्या शनिवारवाडा आणि मर्हाटभूमीच्या सर्व भुईकोट, गडकोटांच्या दरवाजांतून मराठे शस्त्रात्रे परजून बाहेर पडताहेत. नवरात्रीच्या शक्तिपूजनाने, उपासातापासाने, हवनाने, गोंधळांनी ओसंडलेल्या, हळदीकुंकवाच्या सड्याने पावन झालेल्या पथावर स्वस्तिवाचन घुमते आहे. भाळी मंगल तिलक लावत सवाष्णी औक्षण करताहेत. पाणावलेल्या डोळ्यांनी ‘येश पावा धनी!’ म्हणत निरोप देताहेत. ढोलताशांच्या, कर्णे-तुतारींच्या नादात नगरजनांच्या पुष्पवर्षावांनी आनंदलेल्या, आत्मविश्वासाने भारलेल्या मनाने मराठे ‘आता जिंकायचेच... हर हर महादेव!!’ म्हणत जल्लोष करताहेत आणि विजयादशमीची प्रफुल्लित रात्र पुढच्या विजयी पहाटेच्या स्वप्नांचे हुंकार कवटाळत शांत होते आहे.
अडीचशे वर्षांपूर्वी प्रत्येक विजयादशमीला हेच चित्र मराठी मुलखात सर्वत्र दिसत होतं.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयासाठी कोकण आणि घाटमाथ्यापर्यंत पसरलेल्या स्वराज्याच्या मुलखाबाहेर पहिल्यांदा पाऊल टाकलं, त्या वेळी कुणाला कल्पनाही आली नसेल की पुढच्या शतकात मराठ्यांच्या सीमोल्लंघनाने अवघा हिंदुस्थान काबीज केलेला असेल. दक्षिणेतील तंजावर-वेल्लोरपर्यंत पसरलेल्या स्वराज्याचे कौतुक बागलाणातील अहिवंतापासून जिंजी- साजर्या-गोजर्यापर्यंत सर्वच गडकोटांवरील भगवे ध्वज दिमाखात सांगत होते. औरंगजेब 1682 ला दख्खन काबीज करण्यासाठी उतरला आणि स्वराज्यसूर्याला ग्रहण लागले खरे; पण छत्रपती राजारामकाळात औरंगजेब हयात असतानाही नेमाजी शिंदे आणि कृष्णा सावंत अशा मराठी स्वारांची घोडी मात्र नर्मदेपल्याड मुघलांच्या माळव्यात धुमाकूळ घालत होती. अखेरीस दख्खन जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळीला मिळाले. अहमदनगरजवळच्या भिंगारला हा बलवंत मुघल बादशहा मृत्यू पावला आणि मुघल तख्ताचा दिमाखही लयास गेला. खरं तर अडीच दशके तो दख्खनमध्ये अडकला आणि त्यामुळेच हिन्दुस्थानातील मुघली सत्ता खिळखिळी झाली. त्याच्या मृत्यूनंतर आलेले सगळे बादशहा कुचकामी ठरले आणि तेच मराठ्यांच्या पथ्यावर पडले.
मुघलांच्या अंतर्गत भांडणाचा फायदा घेत मराठ्यांनी सय्यदबंधूंना हाताशी धरून औरंगजेबाच्या नातवाचा तोतया उभा केला. बादशहा होण्यासाठी त्याला वाजतगाजत दिल्लीपर्यंत नेला. बादशहा फर्रुखसियरचे दिवस फिरले. त्याला मारून हुसेन अलीने रफिउद्दरजत नावाच्या पोराला तख्तावर बसवून स्वराज्याच्या सनदा आणि मुघलांच्या दख्खनमधील मुलुखाच्या चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मराठ्यांना मिळवून दिले. दिल्लीच्या राजकारणात मराठ्यांची ही पहिली मुसंडी. स्वराज्याच्या या मोठ्या सीमोल्लंघनात मराठ्यांनी महाराणी येसूबाईसह सर्व परिवार सुरक्षित सोडवून आणला आणि लवकरच दख्खनमध्ये मराठ्यांची ताकद शाहू छत्रपतींनी पुनर्प्रतिष्ठापित केली.
गुजरात
खरं तर औरंगजेब हयात असतानाच 1705 मध्ये खंडेराव दाभाडे नि धनाजी जाधव यांनी गुजरातमध्ये स्वार्या केल्या. बाबापार्याला चौथाई वसूल केली. मात्र औरंगजेब मेल्यावर लगेचच मराठ्यांनी महुडा-बेटव्यापर्यंत हल्ला चढवून, अहमदाबादेच्या मुघली सुभेदाराकडून दोन लाख दहा हजार खंडणी मिळवली. शाहू महाराज सुटून आल्यावर खंडेरावाने जकातवसुलीसाठी बुर्हाणपूर ते सुरतेपर्यंत बागलाणभर मराठी चौक्या बसवल्या. जव्हार-रामनगरचे कोळी मराठी स्वराज्याचे पाईक झाले. पूर्वी शिवरायांनी सुरत दोनदा लुटली होती. प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहित्यांनीही गुजरातमध्ये घोडदौड केली होती; पण आता सुरतेच्या मार्गावरून भरगच्च पैसा मराठ्यांकडे जमा होऊ लागला होता.
शिलंगणाचं सोनं लुटायला मराठे सज्ज झाले कारण आता मराठ्यांचा नेता होता महापराक्रमी थोरला बाजीराव पेशवा. ह्या अजिंक्य योद्ध्याच्या खांद्याला खांदा भिडवत मराठे हिंदुस्थान जिंकत चालले. 1722 पासून 1758 पर्यंत आधी दाभाडे आणि नंतर गायकवाडांनी संपूर्ण गुजरात अमलाखाली आणला. सारेच मुघल सुभेदार मराठ्यांपुढे कच खाऊ लागले. नानासाहेब पेशव्यांच्या काळात 27 फेब्रुवारी 1758 ला अहमदाबादचा समझोता झाला आणि जवळजवळ पाचशे वर्षांनी गुजरातेत मुस्लीम अंमल संपून भगवी पताका आसमंतात फडकू लागली होती. गुजरात मराठ्यांकडे आले. पेशव्यांकडे अहमदाबाद आणि गायकवाडांकडे बडोदा राहिले ते अगदी मराठी राज्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत.
माळवा
1723-24 मध्ये बाजीराव माळव्यात घुसलेही. 1726 पर्यंत अंबाजी पंत, केसो महादेव, कृष्णाजी हरी यांच्या उलाढाल्या, कंठाजी कदमची घोडदौड, 1727 ला उदाजी पवारांबरोबरचा तह ही माळवा मराठ्यांच्या ताब्यात जाण्याची नांदी होती; पण माळव्याचे खरा शिल्पकार ठरले ते बाजीरावांचे धाकटे भाऊ चिमाजी अप्पा. 1728 मध्ये उदाजी पवार, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, भिवराव रेठरेकर अशा मातबर सरदारांना घेऊन अप्पांच्या फौजेने अफाट युद्धकौशल्याच्या जोरावर दयाबहाद्दराला आमझेराला पराभूत केले. गिरिधर बहादूर ठार झाला. अप्पांचा हा विजय हिन्दुस्थानभर गाजला. मराठ्यांचा अंमल सुरू झाला. मुघली अंमलदार काढून आणि न जुमानणार्या राजपूत जहागीरदारांच्या जमिनी जप्त करून अप्पांनी तेथील रयतेला संतुष्ट केले. पुढे भवानीरामला उज्जैनच्या वेढ्यात अडकवून मराठ्यांनी सारंगपूर लुटले. सयाजी गुजर यांच्या मराठी फौजांनी मांडूचा किल्ला घेतला. बघता बघता होळकर, शिंदे, कंठाजी कदम, पिलाजी यांनी सिरोंच, अहिरवाडा, कोटा, बुंदी, आमझीरा, धार, महेश्वर, धरमपुरी, डुंगरपूर, झाबुवा, बासवाडा मराठ्यांच्या ताब्यात आणला. बाजीराव पेशव्यांनी 1728-29 मध्ये गढा-मंडला हा गोंडांचा प्रांत ताब्यात घेतला. पुढे 1741-42 मध्ये जेव्हा नानासाहेब पेशवे उत्तर मोहिमेवर निघाले तेव्हा देवरीचा प्रदेश घेऊन त्यांनी मंडल्याचा दुर्गही जिंकला. दमोह, सागर, ललितपूर, खिचीवाडा, अहिरवाडा, भदावर या मुलखात मराठी अंमलदार वावरू लागले. पेशव्यांनी या मुलखावर अंमल बसवला.
बुंदेलखंड
शिवछत्रपतींच्या प्रेरणेने छत्रसाल बुंदेल्याने मुघलांशी लढत देत बुंदेलखंड स्वतंत्र केला; पण आता तो वृद्ध झाला होता. मुले कुचकामी ठरली होती. 1729 मध्ये मुघल सरदार मुहम्मदखान बंगशने छत्रसाल बुंदेल्याच्या बुंदेलखंडावर आक्रमण केले. ‘बाजी जात बुंदेल की बाजी राखो लाज’ म्हणून छत्रसालाची आर्जव बाजीरावांपर्यंत पोहोचली आणि ताबडतोब त्यांनी बुंदेलखंडावर मदतीसाठी धाव घेत बंगशाला धूळ चारली. छत्रसालाने त्यांना बुंदेलखंडाचा एकतृतीयांश भाग दिला. काल्पी, जालोन, झांशी, हृदयनगर, सिरोंज, गुरुसराय, सागर मराठ्यांकडे आले. छत्रसाल बुंदेल्याच्या मृत्यूनंतर अप्पाने तिथे गोविंदपंत खेरांची त्या प्रांतात नेमणूक केली. हेच पुढे प्रसिद्ध झालेले मराठी कमाविसदार गोविंदपंत बुंदेले. बुंदेलखंडाच्या मराठ्यांच्या चौथाईने तिथले छोटे छोटे राजे बिथरले. आजवर मुघलांचे तळवे चाटत सुखोपभोग घेणार्या हिंदुस्थानातील ‘गुलाम’ राजांना मराठ्यांचे स्वातंत्र्य जाचक ठरत होते.
बुंदेलखंड म्हणजे उत्तर हिंदुस्थानाचे नाक. पश्चिमेकडे दिल्ली आणि राजपुताना; उत्तरेला गंगायमुनेचा दुआब म्हणजेअंतर्वेदी, प्रयाग, अयोध्या; पूर्वेला काशी, पटना आणि पलीकडल्या बंगालपर्यंतचा प्रांत यावर नजर ठेवण्यासाठी बुंदेलखंडासारखा उत्तम मुलूख नव्हता. बाजीरावांनी जैतापुरापर्यंत मजल मारली होती. आता नानासाहेबांनी या संपूर्ण मुलखात मजबूत सत्ता करण्याचे ठरवले. त्यासाठी चंदेरी ग्वाल्हेर, झांशी, कालिंजर, ओर्च्छा हा सर्व मुलूख मराठ्यांनी काबीज केला. झांशीच्या मुक्कामात रात्रीच्या वेळी ओर्च्छाच्या वीरसिंहदेवाच्या लोकांनी राणोजी शिंद्यांचा मुलगा आणि हिशेबनवीस मल्हारकृष्ण क्षीरसागर यांच्यासह शे-सव्वाशे मराठ्यांना कापून काढले. नानासाहेबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नारोशंकर राजेबहाद्दरला ताबडतोब ओर्च्छावर हल्ला चढवून गाढवाचा नांगर फिरवला. मराठ्यांशी पंगा घेण्याचे परिणाम काय असतात हे एकंदरीत हिंदुस्थानात सार्यांनाच कळून चुकले होते.
मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील हिंगलाजगड चंदावत राजपुतांकडे होता. 1773 मध्ये अहिल्याबाई होळकरांनी हा गड आणि मंदसौरचा मुलूख ताब्यात घेतला. मराठ्यांच्या स्त्रियाही शिलंगणाचे सोने लुटण्यात पुढे सरसावलेल्या होत्या.
ओरिसा-बंगाल
ओरिसाचा कटक भाग चालुक्य राजा मुकुंददेव हरिचंद्रन या हिंदू राजाच्या ताब्यात होता. बंगालच्या अफगाणी सुलतानांनी त्याला मारून कटक घेतले. 1568 पासून हे अफगाण सुलतान आणि त्यानंतर 1592 पासून मुघल अशा इस्लामी सत्ता राज्य करीत होत्या. 1741 मध्ये मराठ्यांनी कटक घेऊन तेथे दीडशे वर्षांनी हिंदू सत्ता पुन्हा प्रस्थापित केली. 1742 मध्ये नागपूरच्या भोसल्यांनी ओरिसा आणि बंगाल प्रांतात स्वार्या केल्या. रघुजी भोसल्यांच्या भास्करराम कोलटकर ह्या मराठी दिवाणाने या प्रांतात शत्रूला सळो की पळो करून सोडले होते. त्याचा दरारा इतका भयंकर होता की, तिथल्या आया मूल रडू लागले की, त्याला दम द्यायच्या, ‘भास्करराम येईल, रडणे थांबव.’
‘महाराष्ट्रपुराण’ नावाच्या गंगाराम कवीच्या काव्यग्रंथात बंगालात मराठ्यांचा किती दबदबा होता ते दिसते.
छेले घुमालो पद जुडालो बॉरगी आलो देशे ।
बुलबुलीते धन खेयेशे खजना देबो किशे ॥
धान पुडालो पान पुडालो खोजनार उपाय की ।
आर कोटा दिन सबूर कोरो रोसुन बोनियेची ॥
मुलं झोपली, सारं शांत झालं, की मराठा बारगीर येतात. धान्य पक्ष्यांनी खाल्ले, आता कर कसा भरणार? अन्नपाणी सारं संपलंय, काही उपायच शिल्लक नाही. आता लसूण पेरलीय ती उगवेपर्यंत तरी थांबा, अशी विनवणी बारगीरांना केली जातेय. बॉरगी म्हणजे मराठा बारगीर. मुर्शीदाबाद, हुगळी हा बंगाल मुलूख मराठ्यांनी घेतला. 1743 साली खुद्द नानासाहेब पेशव्यांनी बंगालवर स्वारी करून 22 लाखांची खंडणी तिथल्या नवाबाकडून वसूल केली. मराठ्यांपासून संरक्षणासाठी शहराभोवती पाच किलोमीटर लांबीचा खंदक खोदला गेला. पटणा शहराभोवती तटबंदी बांधली गेली. 1744 मध्ये भास्कररामाने पुन्हा स्वारी केली. शेवटी कट रचून, भेटीसाठी बोलावून अलीवर्दीखानाने कपटाने त्याला मारले. पुढे मीर हबीबबरोबर जानोजी भोसल्याच्या तहात ओरिसा आणि बंगालचे मालकी हक्क मराठ्यांच्या ताब्यातच गेले. पेशव्यांबरोबर झालेल्या समझोत्यात नागपूरकर भोसल्यांकडे पूर्वेकडील वर्हाडपासून कटकपर्यंतचा सगळा मुलूख आला.
लाहोर-अटक-पेशावर
पेशावर कधी काळी पुष्कलावती आणि पुरुषपूर नावाने ओळखली जात होती हे आजच्या जगाला माहीतच नसेल. हिंदू आणि बौद्ध धर्मीयांच्या पुण्यनगरीची पाळेमुळेही आजच्या पाकिस्तानने शिल्लक ठेवली नाहीत. कुशाण राजा कनिष्काची ही वैभवसंपन्न नगरी बौद्ध धर्माचे ज्ञानपीठ होते. अफगाणिस्तानापर्यंत पसरलेल्या गांधार प्रदेशाची ख्याती मुसलमान अफगाणी लोकांनी नेस्तनाबूत करून हा मुलूखच इस्लामी केला.
रोहिलखंडातला खेळीया नजीबखान मराठ्यांचा द्वेष करी. त्याला दिल्ली मराठ्यांऐवजी अफगाणांकडे हवी होती. 1756 मध्ये त्याच्या सांगण्यावरून अहमदशाह अब्दाली दिल्लीत आला. दिल्ली लुटली. अंताजी माणकेश्वरांचा प्रतिकार अपुरा पडला. पुढे अब्दालीने मथुरेपर्यंत रस्त्यावर हिंदूंना कापत मुंडक्यांचे मिनार रचले. यमुना रक्ताळली. नादिरशहाच्या कत्तलीला मागे टाकेल एवढी भीषण कत्तल! नानासाहेब पेशव्यांनी रघुनाथराव आणि मल्हारराव होळकरांना प्रचंड फौजफाटा देत अब्दालीवर पाठवले. मराठ्यांच्या भीतीने अब्दाली मागे फिरला. आग्र्यात सूरजमल जाटाने मराठ्यांची खंडणी मान्य केली. अंताजीने सिकंदराबाद घेतले. मराठी फौजा अंतर्वेदीत घुसल्या. सहारनपूर ते इटावा सर्वत्र मराठी सैन्य व्यापलेले होते. नजीबखानाला कचाट्यात पकडून मराठ्यांनी दिल्ली तख्त ताब्यात घेतले. आलमशहाला रघुनाथरावांनी तख्तावर बसवले. कुरुक्षेत्र, पंजाब घेत मराठ्यांनी लाहोर गाठले. 8 मार्च 1758 ला मराठे सरहिंदला पोचले. अब्दालीचा मुलगा लाहोर सोडून पळाला. तिथल्या गुलामांनी स्वातंत्र्याचा श्वास घेण्यासाठी लाहोरच्या वेशीचे दरवाजे मराठ्यांसाठी उघडले. मानाजी पायगुड्यांच्या फौजांनी लाहोर ताब्यात घेतले. खरं तर पंजाब प्रांताचा बंदोबस्त करून फौजा माघारी यायच्या होत्या; पण हिंदूंच्या रक्ताचा सूड घेण्यासाठी अब्दालीला संपवण्याचा निर्धार मराठ्यांनी केला. अहमदशहा अब्दालीचा पाठलाग करीत मराठ्यांनी अटक किल्ला घेतला. अटकेवर भगवे निशाण फडकले. मराठ्यांची घोडी सतलज, रावी, चिनाब, झेलम, सिंधू ओलांडून पेशावरच्या पुढे गेल्या. खैबरखिंडीपर्यंत मराठ्यांचा अंमल सुरू झाला. इराणच्या बादशहाने तर रघुनाथरावांना, अब्दालीला संपवून इराणला येण्याचे आमंत्रण धाडले; पण कंदाहारपर्यंत मराठी अंमल बसवण्याचे मराठ्यांचे स्वप्न मात्र अधुरेच राहिले.
राजपुताना
1736 मध्ये बाजीराव पेशवे उत्तरेला निघाले. धारमधला कुक्षीचा किल्ला घेऊन डोंगरपूर-लोणीवाड्याहून मेवाडला पोहोचले. उदयपुरात जगतसिंहाने पाहुणचार केला. त्याच्या पायाकडील आसनावर बसून बाजीरावांनी महापराक्रमी प्रतापाच्या मेवाड गादीचा सन्मान केला; पण पुढे जयपूरच्या सवाई जयसिंहाला मात्र अपमानित केले. बाजीरावांनी राजपुतान्याच्या चौथाईचा सरंजाम होळकर, शिंदे, पवार यांच्यात वाटून दिला. पुढे ईश्वरसिंह अणि माधोसिंहाच्या भांडणात मल्हाररावाने माधोसिंहाला अंकित बनवून राजपुताना ताब्यात घेतला.
दिल्ली
1737 मध्ये चंदावर लढाईत बाजीरावांनी मुघलांचा पराभव केला. अटेरचा किल्ला जिंकला. चंबळ-यमुना ओलांडून दिल्ली गाठली. 28 मार्च 1737 ला दिल्लीत मुक्काम केला. दिल्लीचे तख्त जिंकले नाही, कारण शाहू छत्रपतींचा शब्द. दिल्ली तख्त सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदुस्थानावर चालून आलेल्या अब्दालीला हुसकावून लावण्यासाठीच 1761च्या संक्रांतीला लाखभर मराठे पानिपतावर धाराशायी झाले. तो फक्त रणभूमीवरचा पराजय होता. अल्पावधीत मराठ्यांनी सर्वत्र पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पुढे 1788 मध्ये जेव्हा गुलाम कादरचा महादजी शिंद्यांनी शिरच्छेद करून शाहआलमला बादशहा म्हणून दिल्लीच्या तख्तावर बसवले, तेव्हा बादशहाने मराठ्यांचा भगवा झेंडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर स्वतःहून फडकवला. औरंगजेब ज्या मराठी राज्याला संपवायला निघाला होता त्याच मराठ्यांचे दिल्ली तख्त राखण्यासाठी संरक्षण घेणे, माथ्यावर भगवा ध्वज मिरवणे हा काव्यगत न्यायच!
1803 पर्यंत पंधरा वर्षे लाल किल्ल्यावर फडकणारा मराठ्यांचा भगवा ध्वज मराठ्यांच्या हिंदुस्थानभर पसरलेल्या साम्राज्याची ग्वाही सांगत होता.
उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जाट, रोहिले, राजपूत, मुघल, अफगाण, पठाण, निजाम, हैदर अशा सार्यांना नमवून कर्नाटक-जिंजीपासून काश्मीरपर्यंत, गुजरातपासून बंगालपर्यंत आणि अटक ते कटक अशी अवघी भरतभूमी मराठ्यांनी आपल्या अमलाखाली आणली. हा गौरवशाली इतिहास मुघलांचे गोडवे गाणार्या ब्रिटिशधार्जिण्या इतिहासकारांनी सांगण्याचे मुद्दाम टाळले. इंग्रजांनी आणि स्वातंत्र्योत्तर सत्ताधीशांनीही हा इतिहास दडवला. निनाद बेडेकरांसारख्या मोजक्या इतिहासकारांनी मात्र ह्या दडपलेल्या इतिहासाचे पुनर्जागरण केले. हे पुण्याहवाचन म्हणजे महाराष्ट्राची खरी विजयादशमी. अवघा भारत आजही हिंदुस्थान म्हणून टिकून राहिला आणि नवरात्रोत्सवाची दुर्गापूजा करतो आहे, दसरा-दिवाळी साजरा करतो आहे याचे कारण शिवछत्रपतींचे वारसदार म्हणून मराठ्यांनी केलेले सीमोल्लंघन. हे मराठी शिलंगणाचे सोने बावनकशी आहे, अस्सल आहे आणि इतिहासाच्या पानावर सदैव झळाळत राहणार आहे.