नसरल्लाहची तिकडे मौत, इकडे मातम!

विवेक मराठी    03-Oct-2024   
Total Views |

Hassan Nasrallah
हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह होता. हिजबुल्ला ही लेबनॉनमधल्या शिया पंथीयांची इराणच्या मदतीवर वाढलेली दहशतवादी संघटना; पण नसरल्लाहला ठार केल्यावर मात्र जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त केले, तर लखनौ आणि काही मोजक्या ठिकाणच्या मुल्लांनी लोकांना नसरल्लाहवरून भडकवण्याचे उद्योग सुरू केले आहेत, हेही विसरून चालणार नाही. तो शिया होता, म्हणून आपण गप्प बसून चालणार नाही, असे सुन्नी मौलवी सांगू लागले आहेत. याच धर्तीवर हसन नसरल्लाह नक्की कोण होता? इस्रायल आणि हिजबुल्ला यांचा वाद नक्की कशावरून आहे याची सविस्तर माहिती देणारा लेख.
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमॉक्रटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांना आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी जाहीर प्रश्न केला, की हिजबुल्लाचा दहशतवादी नेता सैद हसन नसरल्लाह मारला गेला तर तुम्ही त्याला श्रद्धांजली म्हणून काश्मीरमधल्या तुमच्या रविवारच्या सर्व प्रचारसभा रद्द केल्यात; पण तुम्हाला कधी इथे काश्मीरमध्ये मारल्या जाणार्‍या जवानांबद्दल अशी सहानुभूती दाखवता आलेली नाही, असे का? सरमा यांचा हा प्रश्न चुकीचा नाही. मुफ्ती यांनी हसन नसरल्लाहला केवळ श्रद्धांजली वाहिली असे नाही, तर त्यांनी त्याच्याबद्दल प्रेम व्यक्त केले. कोण होता हिजबुल्लाचा नेता हसन नसरल्लाह हे आपणही समजावून घेतले पाहिजे. हिजबुल्ला ही लेबनॉनमधल्या शिया पंथीयांची इराणच्या मदतीवर वाढलेली दहशतवादी संघटना. लेबनॉनचा दक्षिण भाग आणि बैरूतचा परिसर तसेच उत्तर बेकामध्ये मिळून 31.1 टक्के शिया आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये शियांचे प्रमाण अवघे 20 ते 25 टक्क्यांच्या आसपास आहे. अर्थात तिथे असलेले बहुसंख्य सुन्नी हे बेगम मेहबूबांच्या मताशी सहमत आहेत की नाहीत, हे निवडणुकीचे निकालच सांगू शकतील; तथापि उद्या कोणी मुस्लिमांचा नेता उठला आणि नसरल्लाहला ठार केल्याबद्दल मातम करण्यासाठी पुढे आलाच, तर त्याच्यामागे अन्य कोणी जाणारच नाहीत असे नाही. लखनौ आणि काही मोजक्या ठिकाणच्या मुल्लांनी लोकांना नसरल्लाहवरून भडकवण्याचे उद्योग सुरू केले आहेत, हेही विसरून चालणार नाही. तो शिया होता, म्हणून आपण गप्प बसून चालणार नाही, असे सुन्नी मौलवी सांगू लागले आहेत. हे सगळे काय आहे? हे मी मुद्दाम अशासाठी लिहिले की, आताच्या परिस्थितीबद्दल जागरूक असण्याची काय गरज आहे हे समजावे. लेबनॉनला फ्रेंचांकडून स्वातंत्र्य 22 नोव्हेंबर 1943 रोजी आणि 1946 मध्ये फ्रेंचांनी सर्व सैन्य मागे घेतले. म्हणजे लेबनॉन भारताच्या बरोबरीनेच स्वतंत्र देश म्हणून वावरू लागला. अशा या देशाची आजची स्थिती काय आहे ते लक्षात यायला हरकत नाही. लेबनॉनची लोकसंख्या सुमारे 55 लाख, तर इस्रायलची जवळपास 1 कोटी.
 
  
आपण इस्रायलच्या विरोधात एवढ्या दहशतवादी कारवाया केल्या आहेत, तेव्हा इस्रायल आपल्याला जिवंत ठेवणार नाही याची कल्पना आल्यानेच असेल हिजबुल्ला संघटनेचा प्रमुख सैद हसन नसरल्लाह बैरूतमध्ये एका बिळात लपून बसला. खरे तर हे बीळ नव्हते, तर ते प्रचंड असे जमिनीअंतर्गत भुयार होते. जमिनीखाली साठ फूट अशा या भुयारात तो आणि त्याचे साथीदार लपून बसले. तिथे त्यांची चर्चा चालू असतानाच ‘व्हिजिबल इन्फ्रारेड इमेजिंग रेडिओमीटर स्यूट’चा वापर करून इस्रायलने नुसता नसरल्लाहच नव्हे तर अली कराकी, इब्राहिम अकिल, अहमद बाहवी, महमद सुरूर, अबू हसन समीर, इब्राहिम कोबेसी, हाशीम सैफद्दिन अशा सात प्रमुख पदाधिकार्‍यांसोबत एकूण 19 जणांचा बळी घेतला. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, नसरल्लाहला नुसते घरात घुसूनच मारले असे नाही, तर दुसर्‍या प्रदेशात म्हणजे लेबनॉनमधील बैरूतमध्ये त्याच्या भुयारात घुसून त्याला ठार केले. ज्याला घरात घुसून मारले तो आहे, इराणचा लष्करी अधिकारी आणि इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्डचा प्रमुख कासीम सुलेमानी. त्याला इस्रायलने ठार केले नाही, तर अमेरिकेने 3 जानेवारी 2020 रोजी इराकमध्ये बगदादला ड्रोनच्या साह्याने मारले. (हीच अमेरिका भारताला खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नूच्या बाबतीत उपदेशाचे डोस पाजत असते. अमेरिकेने व्हिएतनामपासून इराक, अफगाणिस्तानपर्यंत काय काय केले ते सर्वांना माहिती आहेच.) इस्रायलने आधी पेजरचे स्फोट घडवून अनेकांना ठार तरी केले किंवा जखमी तरी केले. त्यानंतर त्यांनी वॉकीटॉकीचे स्फोट घडविले. हिजबुल्लाकडून पाच हजार पेजरची मागणी नोंदवली गेल्याची माहिती इस्रायली गुप्तचर संस्था मोसादला कळल्यावर त्यांनी पेजर त्यांच्या हाती लागण्याच्या साखळीमध्ये घुसून त्यात ‘पेंटाएरिथ्रिटॉल टेट्रानिट्रेट’ हे ‘नायट्रोसेल्यूलोज’ आणि ‘नायट्रोग्लिसरीन’ यांच्याशी संबंधित भाग त्या पेजरमध्ये घुसवला आणि ती संबंधित पेजर हिजबुल्लांच्या हाती पडली. ही कंपनी तैवानमधली आहे; पण कंपनीच्या मते त्यांनी ती विकलेलीच नाहीत. ती हंगेरीमार्फत हिजबुल्लांपर्यंत पोहोचली. तसे असेल तरीही मोसादची साखळी तोडण्याची क्षमता अपूर्व म्हणावी लागेल. हिजबुल्लांना कोणालाही मध्ये घुसून काही गडबड करता न येण्यासाठी संपर्काचे एक साधन म्हणून हे पेजर हवे होते, तर ते झाले भलतेच. त्यांच्या स्फोटात किमान 15 जण ठार आणि तीन हजार जण जखमी झाले. ते सगळेच लेबनॉनमध्ये राहणारे हिजबुल्लाचे दहशतवादी होते. एका कळीवर इतक्या लोकांना जायबंदी वा ठार करता येते हे मोसादने करून दाखवले. त्यापाठोपाठ त्यांनी ‘वॉकीटॉकी’मध्ये घुसून तसेच स्फोट घडवून आणले. खरे तर हिजबुल्लांना तो इशारा होता. कदाचित त्यामुळेच नसरल्लाह लपायला म्हणून त्या भुयारात गेला आणि इस्रायलच्या अतिसूक्ष्म अशा मार्‍यात बळी पडला.
 
 
 
इस्रायल आणि हिजबुल्ला यांचे हाडवैर जुनेच आहे. हिजबुल्ला संघटना जर लेबनॉनपुरती मर्यादित राहिली असती तर इस्रायल कदाचित त्यांच्या वाट्याला गेला नसता; पण हिजबुल्ला संघटनेचे ब्रीद हे अमेरिकेला संपवायचे, युरोपियनांना धडा शिकवायचे आणि ज्यूंचे शिरकाण करून इस्रायलला नेस्तनाबूत करायचे असल्याने हिजबुल्लावर नजर ठेवायचे काम मोसादने हाती घेतले. हिजबुल्लांना आर्थिक आणि सर्व तर्‍हेच्या शस्त्रास्त्रांची मदत इराणकडून केली जाते हे उघड आहे. इराणने इस्रायलच्या विरोधात पवित्रा घेतलेला आहे. इराणने यापूर्वी इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा करून पाहिला आहे; पण त्यांना मध्येच धडक देऊन इस्रायलने ती हवेतच नष्ट केलेली आहेत. त्यामुळे अधिक जवळचा प्रदेश असणार्‍या लेबनॉनमधून तो मारा करण्याचे तंत्र इराणने हाती घेतले. त्यासाठी त्यांनी हिजबुल्लांना हाताशी धरले. हिजबुल्ला ही संघटनाच शियांसाठी आणि शियांच्या भल्यासाठी निर्माण झाली असल्याने त्यांनी शियांना भुरळ घातली. लेबनॉनमधला शिया समाज हा सर्वात गरीब आणि दुर्लक्षित आहे ही वस्तुस्थिती. लेबनॉनमध्ये सत्तेवर असलेल्या सुन्नी आणि ख्रिश्चन नेत्यांनी कायमच या समाजाकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्याला पिचत ठेवले आहे; पण तो दोष इस्रायलच्या आजवरच्या कोणत्याच नेत्याचा नाही. यात सीरियाने सहभाग घेऊन हिजबुल्लाला मदत करायचे धोरण ठेवले आणि इराणने सर्व तर्‍हेची क्षेपणास्त्रे हिजबुल्लाच्या टोळ्यांच्या हाती सुपूर्द केली. त्याचा परिणाम असा झाला की, हिजबुल्लाने या संघर्षाला अधिक तीव्र करण्याचे धोरण आखले. त्यातच 1982 मध्ये इस्रायलने लेबनॉनवर थेट आक्रमण केले. त्याच वेळी पॅलेस्टाइन लिबरेशन ऑर्गनायझेशनने दक्षिण लेबनॉनच्या हद्दीतून इस्रायलवर हल्ले चालू ठेवले. मग इस्रायलने दक्षिण लेबनॉनच्या 80 टक्के खेड्यांना नेस्तनाबूत करून आपल्या हाती लागलेल्या बशिर जमाएल यांना अध्यक्षपदी बसवले. त्या वेळी अब्बास अल मुस्सावी हा हिजबुल्लाचा नेता बनला. हसन नसरल्लाहने हजारो शियांना आपल्या छत्राखाली आणून 1982 मध्ये हिजबुल्लाची सूत्रे ताब्यात घेतली. तिथूनच नसरल्लाहचा संघर्ष सुरू झाला. नसरल्लाह हा कोणी शांतताप्रिय माणूस होता, असा जर कोणी समज करवून घेत असेल तर ते साफ चूक आहे. त्याने अतिशय हिंस्र असे डावपेच आखायला प्रारंभ केला, त्याचे फळ त्याला आत्ता मिळाले. तो गेली वीस वर्षे अमेरिकेच्या ‘वॉन्टेड’ यादीत होता.
 
 
Hassan Nasrallah
 
हिजबुल्ला ही आत्मघातकी हल्ले घडवणारी पहिली दहशतवादी संघटना आहे, असे म्हटले जाते. या संघटनेने पहिला टायर बाँब बनवून त्याचा स्फोट बैरूतमध्ये केला तो 1983 मध्ये; पण प्रत्यक्ष इतिहास असे सांगतो की, त्याचाही उगम इस्रायलमध्येच आहे. इस्रायलच्या लेही या ज्यूंच्या संघटनेने हैफा (आताचे इस्रायली बंदर) पोलीस स्टेशनबाहेर 12 जानेवारी 1947 रोजी हा बाँबस्फोट घडवून आपल्या हल्ल्याची चुणूक दाखवली होती. इस्रायल अस्तित्वात आला 14 मे 1947 रोजी. आज पाकिस्तानात जैश-ए-महमद किंवा लष्कर-ए-तैयबा ज्या तंत्राचा वापर करून आपल्या जाळ्यात अगदी कोवळ्या मुलांना ओढून त्यांना आत्मघाती बाँब बनवते तसेच काम त्यापूर्वी हिजबुल्लाकडून होत असते. लेबनॉनमधल्या गरिबीचे प्रमाण लक्षात घेऊन हिजबुल्लाहने लहान मुलांना आपल्या कळपात ओढले आणि त्यांना आत्मघाती बाँब बनवून आधी लेबनॉनमध्ये प्रशिक्षण दिले. आज हिजबुल्लाकडे असेच तीस हजार तरी आत्मघाती बाँब बनवून तयार ठेवलेले आहेत. त्यांचे उद्दिष्ट बैरूतमध्ये अमेरिकेच्या आणि युरोपियनांच्या एकत्र सैन्याला ठार मारण्याचे होते. बैरूतच्या बराकींमध्ये हिजबुल्लाने घुसून असंख्य अमेरिकन आणि युरोपियन सैन्याला ठार केले. ठार केलेल्यांची संख्या तीनशेवर असल्याचे तेव्हा सांगितले गेले. हिजबुल्लांनी इस्रायलच्या बाबतीत कोणतीही कारवाई करायचे मागे ठेवले नाही. याबाबतीत हमास आणि हिजबुल्ला यांच्यात डावे-उजवे करता येणे अशक्य आहे. हमास ही दहशतवादीच संघटना आहे; पण ती स्वतंत्र पॅलेस्टाइनसाठी निर्माण झालेली आहे. ती मात्र सुन्नींची संघटना आहे. हमासचा नेता फताह शरीफ आणि त्याचे कुटुंबीय तिआरमध्ये मारले गेले. यासंबंधी उलटसुलट बातम्या आहेत. बैरूतच्या उपनगरांवर झालेल्या एका इस्रायली हल्ल्यात त्यांना ठार करण्यात आले. हमास ही संघटना म्हणजे हरकत अल मुकावामा अल इस्लामिया, तर हिजबुल्ला म्हणजे अल मुकावामा अल इस्लामिया फीलुबनान. हिजबुल्ला ही शियांची संघटना हे वर सांगितलेलेच आहे.
 
 
 
हमासने रेईम म्युझिकल फेस्टिव्हलच्या कार्यक्रमावर हल्ला करून 7 ऑक्टोबर 2023 रोजी गाझा पट्टीमध्ये 364 जणांची हत्या केली. चाळीस जणांना त्यांनी पळवून नेले, काहींना ठार केले, काहींना ओलीस ठेवले. त्यातल्या काहींना सोडले. तरी मूळ प्रश्न कायम राहिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने इस्रायलला आवाहन करून गाझा पट्टी वा अन्यत्र होणार्‍या इस्रायली हल्ल्यांना थांबवायची सूचना केली; पण ती मानेल तर तो इस्रायल कसला? हिजबुल्लाचे हे सर्व दहशतवादी मोटारसायकल, पॅराग्लायडिंगचा वापर करून गाझा पट्टीत उतरले होते. एरवी कोणतीही पूर्वसूचना मिळवण्याची चोख व्यवस्था करणार्‍या इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश होते. त्यानंतरच हमासविरुद्धचा संघर्ष तीव्र झाला. हिजबुल्लांनी मात्र इस्रायलींना घराघरांत घुसून याआधी ठार केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी इस्रायल टपलेला होता. ती संधी त्यांना मिळाली. इस्रायलने त्यानंतर मागे वळून न पाहता जिथे जिथे इराणला ठोकता येईल तिथे तिथे किंवा त्यांच्या पाठबळाने जगणार्‍या हिजबुल्लांना ठोकण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही.
 
 
दरम्यान इराणने बुधवारी इस्रायलवर फताह-2 या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राने हल्ला चढवला. आमच्या एका परिचिताने इस्रायलहून पाठवलेल्या माहितीत कळवले आहे की, इराणच्या हल्ल्याची चिंता करायचे कारण नाही. इराणने जेव्हा 180 क्षेपणास्त्रांचा मारा केला तेव्हा त्यांनी मोसादला लक्ष्य केल्याचा दावा केला असला तरी तो तेवढा अचूक नव्हता. त्यातही ती हवेतल्या हवेत नष्ट करण्याची क्षमता इस्रायलजवळ असल्याने धोक्याची शक्यता नव्हतीच. इराणहून निघालेले क्षेपणास्त्र तेल अव्हिवपर्यंत पोहोचायला 12-13 मिनिटांचा अवधी लागतो. त्या क्षणी इस्रायली जनतेला ‘बाँब शेल्टर’मध्ये जाण्याची सूचना दिली जाते. तशी ती दिली गेली. सतत सायरन वाजत राहिले. इतकेच काय, त्यांची क्षेपणास्त्र डागण्याची तयारी झाली रे झाली की, त्याची माहिती उपग्रहामार्फत इस्रायलला आधीच कळते. तेव्हा ही तयारी होते. त्यांना अनावश्यक बाहेर फिरू नका, असेही सांगितले जाते. हा ‘शेल्टर’ तथा निवारा पूर्ण वातानुकूलित असतो आणि तिथे दिवे, बाथरूम, खुर्च्या आणि थोडा फार नाश्ता आदी सोयी असतात. इराणच्या क्षेपणास्त्र प्रवासात ती इस्रायलपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना नष्ट करणारी जॉर्डनची संरक्षक यंत्रणा तसेच अमेरिकन संरक्षण यंत्रणा आणि इस्रायलची यंत्रणा सज्ज होते आणि ते आपले काम चोखपणे बजावतात आणि ती हवेत नष्ट केली जातात, तशी ती फताह-2 क्षेपणास्त्रेसुद्धा नष्ट करण्यात आली. या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांपासून संरक्षण करणारी ‘आयर्न डोम’ ही यंत्रणा त्यांना तोंड देऊ शकत नाही. तेव्हा क्षेपणास्त्रांना क्षेपणास्त्र हेच उत्तर होते. या क्षेपणास्त्रांपैकी काही अवशेष मक्का, मदिनेनंतर तिसर्‍या स्थानी असलेल्या आणि पवित्र मानल्या गेलेल्या जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीवरही पडले. त्यात त्या मशिदीचे नुकसान झाले. या क्षेपणास्त्रांना नष्ट करण्याच्या प्रयत्नात त्याचा एक तुकडा जेरिको या पॅलेस्टाइनमधल्या भागात पडून एक मुस्लीम व्यक्ती ठार झाली.
  
 
इराणने या हल्ल्याच्या काळात आपल्यावर दाट लोकवस्तीच्या भागावर आपण हल्ला केल्याचा आरोप होऊ नये आणि हे युद्ध अधिक तीव्र होऊ नये यासाठी एकीकडे खूप खबरदारी घेतल्याचेही दिसते आहे. इराणकडे असलेली हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे ही जुन्या ड्रोन यंत्रणेपेक्षा अधिक शक्तिशाली मानली जातात; तथापि इराणने ‘यापुढे तुम्ही वागाल तसे आम्हाला वागावे लागेल आणि जशास तसे उत्तर द्यावे लागेल’, अशी धमकी दिल्याने अधिक दाट वस्तीच्या भागात इस्रायलकडून अधिक काळजी घेतली जात आहे. एप्रिल 2024 मध्ये इराणने इस्रायलच्या लष्करी तळांना लक्ष्य केले होते, तेवढे त्यांनी आता केलेले नाही. त्यांचे जास्त लक्ष मोसादवर आहे; पण तेही त्यांना फारसे जमलेले नाही. इस्रायलने अधिक खणखणीत उत्तर दिले तर काय, हा प्रश्न इराणकडे असल्याने आणि सर्व मुस्लीम राष्ट्रे आपल्या पाठीशी नाहीत ही ‘खंत’ असल्याने नसरल्लाह हा विषय इराण कदाचित संपवून टाकेल, ही शक्यता नाकारता येत नाही.
 
 
 
हिज्बुल्ला, हमास आणि हुती (येमेनी) यांनी केलेल्या हल्ल्यांना तोंड देत इस्रायलने प्रत्युत्तराची एकही संधी सोडलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याही परिस्थितीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दूरध्वनी करून कोणत्याही देशात दहशतवादाला थारा मिळता कामा नये, असे सांगून एक प्रकारे त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीला प्रतिसाद दिला आहे. इस्रायल जे करते आहे ते सगळेच चांगले आहे अशातला भाग नाही; पण हिजबुल्ला असो की हमास किंवा हुती, या दहशतवादी संघटना जे काही करत आहेत ते तरी कुठे चांगले आहे. यावर शांतता मार्गाने उपाय आणि तोही कायमस्वरूपी निघायला हवा; पण हे असेच अखंड चालू राहणार अशी चिन्हे आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी भारतातील मुस्लिमांवर होत असलेल्या तथाकथित अत्याचारांचा अनावश्यक उल्लेख करून भारताला दुखावले आहे. याउलट भूतपूर्व अध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी पाकिस्तानात जाऊन काश्मीरवर भाष्यही केले नाही. (इराणने मानवतेच्या विरोधात केलेल्या दुष्कृत्यांवर लिहायचे तर ग्रंथ होतील.) पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चोंबडेपणा करून हा विषय उकरून काढला. त्यावरही रईसी बोलले नाहीत. ही त्यांची मुत्सद्देगिरी दिसते न दिसते तोच हेलिकॉप्टर कोसळून त्यांचा इराणमध्ये मृत्यू झाला. तो अपघात होता की घातपात होता यावर काही काळ चर्चा चालू होती; पण ती थांबली. त्या अर्थी तो घातपात असू शकतो. दरम्यान इस्रायलने हिजबुल्लांना संपवण्यासाठी लेबनॉनमध्ये जमीनमार्गे आक्रमण केले आहे. ते किती काळ चालेल ते सांगता येणे अवघड आहे. भारताच्या बाजूने लिहायचे झाले तर आपण इराणच्या विरोधात फार जाऊ शकत नाही. आपण इराणमध्ये ज्या चबाहर बंदराचा विकास करतो आहोत, तो आपल्या दृष्टीने सामरिक महत्त्वाचा आहे. इराणचे तेलही तितकेच आपल्या गरजेचे आहे. ते रुपयांमध्ये आपल्याशी व्यवहार करतात; तथापि आपण इराणला डोक्यावरही बसू देता कामा नये. इस्रायलने आपल्याला शस्त्रसामग्री आणि तिच्या अत्याधुनिकीकरणात मोठा वाटा उचलला आहे. म्हणूनच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे. या स्थितीत सध्या तरी इस्रायल माघार घ्यायला तयार नाही आणि दहशतवादी संघटना जागतिक नेत्यांना विचारात घेत नाहीत. इकडे नसरल्लाह मेला म्हणून मातम मात्र चालू आहे.