मनुष्यप्राण्यांचे समूहीकरण म्हणजे समाज होय. समाजाची स्वतःची अशी मूल्ये आणि विचार असतात. समाजाच्या या मौलिक गोष्टींचे जर विस्मरण झाले, तर समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः आपलीदेखील अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीला जसे मन असते तसे समाजालादेखील मन असते. त्याला समाजाची सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. ही सदसद्विवेकबुद्धी समाज जेव्हा हरवून बसतो तेव्हा त्याची अवस्था अत्यंत वाईट होते. ही अवस्था म्हणजे आजचा हरवलेला महाराष्ट्र आहे. आजचा महाराष्ट्र हा वारसा हरवलेला महाराष्ट्र आहे, असे खेदाने म्हणावे लागते. कारण आपण कोण आहोत, आपली समूहरूपाने कुळपरंपरा कोणती आहे, ज्यांचा अभिमान बाळगावा असे पूर्वज कोण होते, त्यांचे अलौकिक कार्य कोणते, त्या कार्याचे काय झाले, या सर्व गोष्टींचे विस्मरण झालेला समाज म्हणजे आजचा समाज आहे. म्हणून महाराष्ट्राच्या वैभवशाली वारशाचे स्मरण करून त्याचे कृतीत रूपांतर केले पाहिजे. या वारशाची जपणूक करणे आणि तो रोजच्या जीवनात प्रत्यक्षात उतरवणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या संतमहात्म्यांनी आणि थोर महापुरुषांनी योगदान दिले, त्यांच्या विचारांची बीजे आपल्या जीवनात अंकुरली पाहिजेत. एकटे ज्ञानदेव, एकटे छत्रपती शिवाजी महाराज, एकटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण होऊन चालत नाही. त्यांच्या मार्गाने जाणारे समाजमन त्याच वेळी उत्पन्न व्हावे लागते. या दोघांच्या मीलनानेच मंगलदायी परिवर्तन घडत असते. या दिशेने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे.
विसराळूपणा हा माणसाचा सहज स्वभाव आहे. लौकिक जीवनात त्यामुळे अनेक वेळा गमतीशीर प्रसंग घडतात. लगेच सापडाव्यात म्हणून आपण वस्तू अशा ठिकाणी ठेवतो की त्या सापडतच नाहीत. त्याचे कारण असे की, वस्तू कुठे ठेवली हे आपण विसरून जातो. डोळ्याचा चष्मा कपाळावर घेतला जातो आणि मग चष्मा कुठे गेला म्हणून शोधाशोध सुरू होते. प्राथमिक शाळेत आम्हाला ‘विसराळू विनू’ असा एक धडा होता. हा विनू अनेक गोष्टी विसरून जात असे. मेथीचा वाफा केला, रोज पाणी घातले; पण मेथी उगवलीच नाही, कारण मेथी पेरायला विसरला.
व्यक्तिगत जीवनात या गोष्टी गमतीजमती करीत असल्या तरी आपण समाज म्हणूनही जगत असतो. समाज म्हणून मौलिक गोष्टींचे जर विस्मरण झाले, तर समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः आपलीदेखील अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीला जसे मन असते तसे समाजालादेखील मन असते. त्याला समाजाची सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. ही सदसद्विवेकबुद्धी समाज जेव्हा हरवून बसतो तेव्हा त्याची अवस्था 1818 ते 1880 सालात जशी होती, तशी होते. 1818 साली पेशवाईचा अंत झाला. पेशवाईचा अंत म्हणजे आपले राज्य गेले आणि इंग्रजांचे राज्य सुरू झाले.
आपले राज्य का गेले, याची मीमांसा इतिहासकारांनी फार सखोलपणे केलेली आहे. त्याचा निष्कर्ष एका वाक्यात सांगायचा तर- 1818 साली राज्यकर्ते आणि समाजाची स्थिती पारतंत्र्यात जाण्यासाठी सर्व प्रकारे अनुकूल अशी झाली. राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अधःपतन वेगाने झाले. या सर्वांचा परिणाम म्हणून इंग्रजांचे राज्य आले. इंग्रज हे राज्यतंत्रातील तज्ज्ञ होते. तंत्रज्ञानाचेदेखील तज्ज्ञ होते, भौतिक विकासाच्या विद्यांचे अग्रदूत होते. आपल्याला संपूर्णपणे अपरिचित असलेली राज्यविद्या, तंत्रज्ञान (आगगाडी, तारायंत्र, इ.) त्यांनी भारतात आणले, वेगवेगळ्या भौतिक विद्या आणल्या, इंग्रजी शिक्षण सुरू केले. सर्वार्थाने आत्मविस्मृत झालेला समाज इंग्रजी प्रभावाने दिपून गेला. आपण कोण आहोत, आपला ऐतिहासिक वारसा काय आहे, आपले विचारवैभव कोणते आहे, आपला धार्मिक विचार कोणता आहे, याबाबतीत सर्वसामान्य माणूस तर झोपेच्या गुंगीतच गेला आणि ज्यांच्याकडे जी काही बुद्धी होती, त्या सर्व व्यक्ती भांबावून गेल्या, दिङ्मूढ झाल्या.
या पार्श्वभूमीवर आजच्या महाराष्ट्राची स्थिती जर बघितली, तर ती शंभर टक्के 1818 ते 1880 या कालखंडातील नाही, हे जरी खरे असले तरी आजचा महाराष्ट्र हा वारसा हरवलेला महाराष्ट्र आहे, असे खेदाने म्हणावे लागते. आपण कोण आहोत, आपली समूहरूपाने कुळपरंपरा कोणती आहे, ज्यांचा अभिमान बाळगावा असे पूर्वज कोण होते, त्यांचे अलौकिक कार्य कोणते, त्या कार्याचे काय झाले, या सर्व गोष्टींचे विस्मरण झालेला समाज म्हणजे आजचा समाज आहे.
आजच्या महाराष्ट्राचा एकच विषय सर्वार्थाने चर्चेचा झालेला आहे. तो विषय म्हणजे राजसत्ता कोणत्या पक्षाकडे असली पाहिजे? मुख्यमंत्री कुणी व्हायचे? का व्हायचे? याची चर्चा निरंतर चालू असते. अशी चर्चा करणारे राजनेते अनेक वेळा राजकीय सभ्यतेची मर्यादा ओलांडताना दिसतात. ते जी भाषा वापरतात, ती सर्वसामान्य माणसांना रुचत नाही. राजकीय स्पर्धेच्या खेळात स्पर्धा ही राहणारच. जसे सर्व खेळांचे नियम असतात, तसे राजकीयस्पर्धेच्या खेळातदेखील अलिखित नियम असतात. प्रतिस्पर्धी राजकीय नेत्याची जात काढू नये, त्याच्या खासगी जीवनावर भाष्य करू नये. त्याच्या राजकीय विचारांवर आणि राजकीय कार्यक्रमांवर टीका करावी इ. अलिखित नियम असतात. त्याचे पालन किती जण करतात, हे जनतेसमोर उघड झालेले आहे.
जनता आज अतिशय संभ्रमात आहे. केवळ राजकीय सत्ताकारणाची चर्चा चालू आहे. समाजकारणाचे काय? धर्मकारणाचे काय? शिक्षणाचे काय? पर्यावरणाचे काय? असे सर्व विषय बाजूला पडलेले आहेत. हे सर्व विषय सत्ताकारणाइतकेच महत्त्वाचे आहेत. संभ्रमातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आपल्या हरवलेल्या वारशाचे स्मरण करायला पाहिजे. सुदैवाने आपल्याला अतिशय समृद्ध वारसा लाभलेला आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या शब्दांत सांगायचे तर-
‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दर्याखोर्यातील शिळा॥
हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात।
ज्यांच्या दुर्दम्य धीराने केली मृत्यूवरी मात॥
नाही पसरला कर कधी मागायास दान।
स्वर्णसिंहासनापुढे कधी लवली ना मान॥
हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही।
हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही॥
हिच्या संगे जागतील मायदेशातील शिळा
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दर्याखोर्यातील शिळा
कवी कुसुमाग्रज यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत मराठी मातीचे वैभव आपल्यापुढे मांडले आहे. ‘नाही पसरला कर कधी मागायास दान’ हा महाराष्ट्राचा स्वाभिमान असला तरी सरकारी नोकर्यांचे दान मागणे चालू आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात, कारण कर्जबाजारीपणा आणि प्रचंड नैराश्य. ‘हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही’ असे जरी असले तरी आजचा महाराष्ट्र जातीय राजकारणाचे डबके झाला आहे. जो तो उठतो तो आपली जात काढतो, आपल्या जातीच्या लोकांच्या भावना भडकावतो, जातीच्या संख्याबळावर वेगवेगळ्या मागण्या करतो आणि सत्तेतील वाटा हीच सामाजिक समता आहे, असे प्रवचनही देतो.
वैभवशाली महाराष्ट्राच्या वारशाची सुरुवात कुठून करावी? आपण ती ज्ञानदेवांपासून करू या. ज्ञानदेवांचा कालखंड तेराव्या शतकातील (इ.स. 1275 ते 1296) आहे. हा कालखंड स्वराज्याचा कालखंड आहे. इस्लामी आक्रमणाचा दक्षिणेत शिरकाव झालेला नव्हता. राजा स्वदेशी, प्रजा स्वदेशी, धर्म स्वदेशी, पुरेशी समृद्धी असलेला हा कालखंड आहे; परंतु याच कालखंडात समाजाचा वेगाने र्हास होईल अशा दोषांचे अंकुर फुटू लागले होते. धर्माच्या ठेकेदारांनी आपली मक्तेदारी निर्माण केली. जातिभेदाची बंधने कडक करीत आणली. अस्पृश्यतेचा रोग खोलवर गेला. सामान्य लोकांपासून धर्मग्रंथ दूर ठेवले गेले. (इ.स. 1275 ते 1296) या सर्वांच्या विरोधाचे बंड म्हणजे ज्ञानेश्वर.
निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवांचे गुरू. ते त्यांचे वडिलबंधू होते. निवृत्तीनाथ हे गहनीनाथांचे शिष्य. हा नाथ संप्रदाय अतिशय प्राचीन संप्रदाय आहे. आदिनाथ म्हणजे भगवान शंकरापासून त्याची सुरुवात झाली असे मानण्यात येते. मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहनीनाथ अशी ही परंपरा आहे. नाथ संप्रदाय निर्गुणाची उपासना करतोे. ज्ञानयोग आणि योगसाधना याद्वारे जीवनमुक्ती मिळविता येते, हे नाथ संप्रदायाचे उद्दिष्ट आहे. ‘अलख निरंजन’ हा त्यांचा बीजमंत्र आहे.
ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रात नाथ संप्रदायाचा प्रचार केला नाही. ‘अलख निरंजन’चा घोष दिला नाही. ध्यानधारणा, समाधीमार्गे जीवनमुक्ती मिळवा, असा उपदेश केला नाही. मग त्यांनी काय केले? सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी धर्म अतिशय सोपा करून सांगितला. ‘एकतत्त्व नाम दृढ धरी मना, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद’. नामस्मरणाच्या भक्तिमार्गाची मुहूर्तमेढ रोवली. विठ्ठलाची भक्ती करा, त्याचे नामस्मरण करा, तुम्हाला सुखशांती मिळेल, मुक्तीदेखील मिळेल, हे त्यांनी स्वतः आचरण करून लोकांना शिकविले, तेही अगदी तरुण वयात. सोळाव्या वर्षी गीतेवरील भाष्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली, एकविसाव्या वर्षी समाधी घेतली.
ज्ञानदेवांनी महाराष्ट्रात आणि भारतात अभूतपूर्व धर्मक्रांती केली, अज्ञानी लोकांना सज्ञानी केले. संस्कृतमध्ये लपलेले धर्मतत्त्वज्ञान प्राकृत भाषेत आणले आणि समतेचा धर्म सांगितला. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत’. भगवंतांच्या दारी भेदाभेद अमंगळ आहे, हे त्यांनी शिकविले. वेद म्हणण्याचा अधिकार केवळ सर्व माणसांनाच नसून प्राण्यांनादेखील आहे, हे रेड्याच्या मुखातून वेद वदवून त्यांनी सिद्ध करून दाखविले. कसलीही आदळआपट नाही, कसलाही नकार नाही, विद्रोहाची भाषा नाही, परंपरेने चालत आलेला निर्गुणाचा सनातन विचार त्यांनी सगुणात आणला. निर्गुण आणि सगुण एकरूप आहे, हे त्यांनी अत्यंत गोड भाषेत, सुंदर ओव्यांत सर्वसामान्य माणसाला सहज, सोप्या भाषेत समजेल असे सांगितले.
ज्ञानदेवांनी दिलेला हा धर्मविचार संत नामदेवांनी आणखी सोप्या भाषेत, केवळ महाराष्ट्रभर नेला नाही, तर उत्तरेतही ते हा विचार घेऊन गेले. गुरू नानकदेव यांच्या जन्मापूर्वी 200 वर्षे आधी नामदेव पंजाबात गेले. 20 वर्षे तेथे राहिले. तेथील भाषा आत्मसात केली आणि पंजाबातील समाजाला भक्तीचा वारसा दिला. तोपर्यंत पंजाबात मुस्लीम आक्रमकांनी धुमाकूळ घातला होता.
पंजाब हा सीमेवरचा प्रांत आहे. भूमीमार्गे भारतावर केल्या जाणार्या आक्रमणाचा तो प्रदेश आहे. आपला सनातन धर्म जागृत ठेवण्याचे कार्य लोकशिक्षणाद्वारे नामदेव महाराजांनी पंजाबात केले. आजचे शब्द वापरायचे तर, हे महान राष्ट्रीय कार्य आहे. महाराष्ट्रातील एका मराठी संताला पंजाबात जाऊन कार्य करण्याची गरज काय? हा प्रश्न ज्यांना पडतो त्यांना महाराष्ट्राचा वारसा काय, हे समजून सांगावे लागत नाही. घुमान येथे नामदेवांची समाधी आहे, मंदिर आहे. आपले पंजाबी बांधव नामदेवांना कधी विसरले नाहीत. आपण करंटे मात्र नामदेवांची जात काढत राहतो.
‘तुका झालासे कळस’ असा अभंग आहे. ज्ञानदेवांनी नामस्मरण धर्माचे मंदिर उभारले आणि संत तुकोबाराय त्याचे कळस झाले. साध्या-सोप्या रोकड्या भाषेत संत तुकारामांनी लोकांना धर्मजागृत केले. आपली प्रापंचिक कर्तव्ये कोणती, आपला समाजधर्म कोणता आणि आपला भक्तिमार्गी धर्म कोणता, हे संत तुकारामांनी अभंगाद्वारे रसाळवाणीत सांगितले. तुकोबाची वाणी ज्याच्या मुखात नाही, त्याला मराठी माणूस म्हणता येत नाही एवढा अफाट प्रभाव तुकारामांचा आहे. ज्ञानदेवांप्रमाणे तुकारामांचादेखील समाजाने छळ केला. त्यांच्या गाथा इंद्रायणीत बुडविल्या. ज्ञानदेवांच्या काळी असलेली धर्ममार्तंडांची अघोरी परंपरा तुकारामांच्या काळीदेखील चालू राहिली; परंतु संत तुकारामांची महानता याच्यात आहे की, धर्माच्या नावाने अधर्म करणार्या लोकांना त्यांनी दूर लोटले नाही. त्या सर्वांना जवळ केले आणि आपलेसे केले. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम अशी आपली भागवत धर्माची महान परंपरा आहे आणि तो आपला वारसा आहे.
ज्ञानदेवांचा हा वारसा भागवत धर्मात परावर्तित झाला, वारकरी पंथ निघाला. महाराष्ट्रातील सर्व जातींतील संत उभे राहिले. गोरा कुंभार, चोखामेळा, बहिणाबाई, सावतामाळी, जनाबाई अशी महान संत परंपरा महाराष्ट्राची आहे. त्याचे वर्णन करणारा सुंदर अभंग, ‘विठु माझा लेकुरवाळा’ हा आहे. तो सर्वश्रुत आहे. ज्ञानदेवांनंतर उभ्या राहिलेल्या संत परंपरेने इस्लामी आक्रमणाच्या झंझावातापासून महाराष्ट्र वाचविला, आपली अस्मिता जिवंत ठेवली. राज्य गेले तरी सत्त्व गेले नाही. स्वातंत्र्याची ऊर्मी जनतेच्या मनात जागृत राहिली. आपली माती, आपला देश, आपले कर्म, आपला धर्म यांचे विस्मरण लोकांना झाले नाही. सुलतानी काळरात्र संपेल आणि आपले स्वधर्माचे राज्य सुरू होईल, ही आकांक्षा जिवंत राहिली. पिढीमागून पिढी ती हस्तांतरित होत गेली.
ज्ञानदेवांनी दिलेला नामस्मरणाचा भक्तिमार्ग समर्थ रामदास स्वामी यांनी काळाच्या संदर्भात पुढे नेला. त्यांनी भक्तिमार्गाला क्षात्रधर्माची जोड दिली. धनुर्धारी राम आणि बजरंगबली हनुमान यांची उपासना त्यांनी शिकवली. भक्तीला शक्तीची जोड दिली. त्यांचे फार प्रसिद्ध वचन असे आहे,
‘शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होतेसे। शक्तियुक्ति जिये ठायी, श्रीमंत तेथे धावती। शक्तीने पावती सुखें शक्ती नसता विटंबना।
रामदास स्वामींनी काळाच्या संदर्भात शक्तीची उपासना का आवश्यक आहे, हे अनेक ओव्यांतून फार सुंदर रीतीने सांगितले आहे. धर्मरक्षण हे राज्याचे काम आहे. हे सांगताना ते म्हणतात, “पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण। तिसरे ते सावधपण, सर्वार्ंविषयी। या सर्वांना त्यांनी महाराष्ट्र धर्म म्हटले.
यातून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याच्या ठिणगीची मशाल केली. ईश्वराची इच्छा आहे की, आपले राज्य व्हावे. आपले म्हणजे आपल्या सर्वांचे राज्य व्हावे, अशी आहे. या ईश्वरी कार्यात सर्वांनी सहभाग द्यावा, हे महाराजांचे आवाहन होते. संत परंपरेत ज्याप्रमाणे अठरापगड जातींचे संत निर्माण झाले, तसेच महाराजांच्या स्वधर्म संस्थापन यात्रेत सर्व जातींची मंडळी सहभागी झाली. मराठ्यांचे राज्य म्हणजे महाराष्ट्रात राहणार्या सर्व जातीपंथीयांचे राज्य, असा त्याचा अर्थ झाला, एका जातीचे राज्य नव्हे.
या महाराष्ट्र धर्माची आध्यात्मिक बाजू ज्ञानेश्वरांनी, साधुसंतांनी बलवान केली आणि महाराष्ट्र धर्माची ऐहिक बाजू छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्वजातीय सवंगड्यांनी केली. अध्यात्म आणि ऐहिकता यांचा सुंदर संगम झाला आणि महाराष्ट्राच्या वैभवाच्या कालखंडाची पायाभरणी झाली. ईश्वर चराचर सृष्टी व्यापून आहे, तो मूलतः निर्गुण, निराकार असला तरी भक्तांच्या आर्ततेमुळे तो त्याला ज्या रूपात दर्शन द्यायचे आहे त्या रूपात अवतीर्ण होतो, हा आध्यात्मिक विचार आहे आणि याच ईश्वराची इच्छा अशी आहे की, आपल्या भूमीत आपले राज्य असले पाहिजे. आपले राज्य आपल्या परंपरा, आपली जीवनमूल्ये, आपली संस्कृती, आपली श्रद्धास्थाने यांचे रक्षण करणारे असते.
समाजाला सुरक्षा हवी असते. ही सुरक्षा अनेक शब्दांनी सांगता येते. अन्न सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, आरोग्य सुरक्षा इ. या सर्व सुरक्षांची जननी आध्यात्मिक सुरक्षा आणि राज्य सुरक्षा यात आहे. आपला सनातन धर्मविचार सुरक्षित राहिला तर आपली जीवनपद्धती, आपली जीवनमूल्ये, आपली श्रद्धास्थाने जिवंत राहतात आणि हा धर्मविचार सुरक्षित ठेवण्याचे काम धर्मपुरुषांचे असते. धर्मपुरुष त्यालाच म्हणतात, जो निःसंग आहे, निर्मोही आहे, निःस्पृह आहे, अनासक्त आहे, सर्वभूतहितरत आहे. भगवी वस्त्रे घातल्यामुळे कुणी धर्मात्मा होत नाही. मोठमोठे मठ उभे केल्याने आणि संमोहून टाकणार्या भाषेत प्रवचने दिल्याने कुणी धर्मपथदर्शक होत नाही.
‘स्वराज्य’ ही सुरक्षेची सर्वात मोठी हमी असते. स्वराज्य यात दोन शब्द आहेत, एक ‘स्व’ आणि दुसरे ‘राज्य’. ‘स्व’ म्हणजे कोण आणि या ‘स्व’चे राज्य म्हणजे काय, हे सर्व लोकांना नीट आकलन करून घ्यावे लागते. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य ‘स्व’चे राज्य होते. या ‘स्व’चा बोध शिवरायांना बालपणापासून माता जिजाऊंनी दिला. आपला एक धर्म आहे, तो सनातन धर्म आहे, त्याची म्हणून काही मौलिक विचारपरंपरा आहे. या धर्माने आम्हाला कर्तव्यबोध शिकविला आहे. धर्मविचार हा जगावा लागतो. त्याचे आचरण करावे लागते. धर्मविचार आणि नैतिकता यांची फारकत करता येत नाही. हे सर्व आचरणात आणणारा महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. ही स्वधर्माची राज्यसुरक्षा त्यांनी महाराष्ट्राला दिली आणि देशापुढे एक महान आदर्श ठेवला.
ज्ञानदेवांचे क्रांतिकार्य महाराष्ट्रापुरते सीमित राहिले नाही. सर्व भारतभर त्याचे पडसाद उमटले. दक्षिण भारतात वल्लभाचार्य, माधवाचार्य, विद्यापती, हरीदास, संत कनकदास, पुनथनमः. उत्तरेत तुलसीदास, रविदास, कबीर, मीराबाई अशी संतांची मालिकाच्या मालिका तयार झाली. त्यांच्या सर्व रचना जनभाषेत आहेत म्हणजे प्राकृत भाषेत आहेत. त्यांनी अध्यात्म विचारात नवीन शोध लावले नाहीत. उपनिषदात असलेले तत्त्वज्ञान, जे संस्कृत भाषेत आहेत, ते त्यांनी लोकभाषेत आणले. दोह्यांना गेयता दिली. तत्त्वज्ञानाला लोककलेत आणले. गायकीच्या रूपाने ते लोकप्रिय केले. या सर्व परिवर्तनाची जननी आहेत ज्ञानदेव. हा आपला महान वारसा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वतःचे राज्य निर्माण केले. त्यांचा प्रतिस्पर्धी औरंगजेबापेक्षा ते अत्यंत लहान होते; परंतु स्वराज्याची ऊर्जा शंभर औरंगजेबांना खाऊन टाकील इतकी दाहक होती. ब्रिटिशांच्या काळात स्वातंत्र्याचे आंदोलन सुरू झाले. स्वातंत्र्य या संकल्पनेची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते. एखाददुसरा नेता सोडला तर स्वातंत्र्य आंदोलनातील प्रथम श्रेणीतील सर्व नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या प्रेरणेला मानाचा मुजरा केलेला आहे. ही प्रेरणा किती जबरदस्त होती, याचे हे उदाहरण आहे.
नागपूरला अखिल भारतीय शिक्षक परिषद होती. बंगालमधील शिक्षक परिषदेला आलेले होते. त्यांनी नागपूरचे राजे भोसले यांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. ते नागपूरचे राजे भोसले यांना भेटायला गेले. औपचारिक बोलणे झाल्यांनतर त्यांनी राजे भोसले यांना एक प्रश्न विचारला, “रघुजी भोसले बंगालला आले; पण ते हुबळीपर्यंतच का थांबले? ते ढाक्याला का नाही गेले?” प्रश्न म्हटला तर गोंधळात टाकणारा होता. राजे भोसले यांच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. नंतर ते शिक्षक म्हणाले, “मराठ्यांचे पाय ज्या भूमीला लागले, ती भूमी भारतात राहिली. ढाक्याला त्यांचे पाय लागले असते तर ढाकाही भारतात राहिले असते.” स्वातंत्र्याची ऊर्मी म्हणजे काय, याचे दर्शन या उदाहरणातून होते. महाराष्ट्रातील मराठी म्हणून हा माझा गौरवशाली वारसा आहे. माझा जन्म दान मागण्यासाठी झालेला नाही, दान देण्यासाठी आणि मूल्यांची ऊर्मी निर्माण करण्यासाठी झालेला आहे.
ज्ञानदेव ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेली ऊर्मी या काळात अत्यंत क्षीण झालेली आहे. संत ज्ञानदेवांना ‘माऊली’ म्हटले जाते आणि शिवाजी शहाजी भोसले यांना ‘क्षत्रिय कुलवंतस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हटले जाते. या दोन्ही शब्दांचे अर्थ असे होतात की, आपण या दोन्ही महापुरुषांना प्रचंड महान बनवून देवघरात बसवून ठेवले आहे. थोर पुरुषाची देवघरात रवानगी झाली की, भक्त म्हणून आपले काम भक्तिभावाने पूजा करणे, आरती करणे, त्यांचा उत्सव साजरा करणे, त्यांच्या महानतेवर प्रवचने देणे, एवढेच होऊन जाते. तसे या दोघांच्या बाबतीत महाराष्ट्रात झालेले आहे.
ज्ञानेश्वर महाराज कशासाठी जगले आणि छत्रपती शिवाजी महाराजही कशासाठी जगले? त्यांच्या जीवनाचा ध्येयवाद कोणता होता? आजच्या काळाशी त्याचा काही संबंध आहे का? याचा फारसा विचार करावा, असे कुणाला वाटत नाही. स्वतःला विद्वान म्हणविणारे चर्चा सुरू करतात, ज्ञानेश्वर एक होते की दोन होते? ज्ञानेश्वरांचा नैसर्गिक मृत्यू झाला की अनैसर्गिक? ज्ञानेश्वर आपगावचे की दुसर्या कुण्या गावचे? रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरू होते का? छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्माचे रक्षण केले हे खरे का? असल्या वायफळ विषयांची चर्चा करणारे बोरुबहाद्दूर आणि मुखबहाद्दूर महाराष्ट्रात भरपूर आहेत. मूलभूत विषयाकडे जाण्याऐवजी वायफळ विषयांकडे वळण्याची बुद्धी म्हणजे पुरोगामित्व, असे त्यांनी ठरविलेले आहे.
ज्ञानदेवांचा कालखंड धर्माला सामाजिक आणि जनमान्य रूप देण्याचा कालखंड होता. सनातन आध्यात्मिक विचाराला त्यांनी कालसापेक्ष अर्थ दिला. लोकांनी तो स्वीकारला. ज्ञानदेवांचे कार्य जर खर्या अर्थाने महाराष्ट्राने नेले असते तर महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक समतेसाठी चळवळ करण्याचे काही कारण उरले नसते. आपण ज्ञानदेवांचे चमत्कार स्वीकारले. ज्ञानेश्वरी पारायणासाठी स्वीकारली. शैक्षणिक क्षेत्राने ज्ञानेश्वरी अध्ययन आणि पीएच.डी.साठी स्वीकारली. ज्ञानदेवांचे सामाजिक तत्त्वज्ञान, आध्यात्मिक तत्त्वज्ञान, आर्थिक तत्त्वज्ञान, वैज्ञानिक तत्त्वज्ञान असे सर्व विषय वार्यावर सोडून दिले. पंढपूर-आळंदीची वारी केली, की आपण ज्ञानदेवांच्या ऋणातून मुक्त झालो, अशी भावना झाली.
धार्मिकदृष्ट्या आजच्या महाराष्ट्राची स्थिती दुर्दैवाची आहे. वारकरी संप्रदाय, स्वामी समर्थ संप्रदाय, गजानन महाराज संप्रदाय, पांडुरंगशास्त्री आठवले संप्रदाय, साईबाबा संप्रदाय, दत्त संप्रदायातील वेगवेगळे प्रवाह, नाथ संप्रदाय, निरीश्वरवादी संप्रदाय, लहान-मोठ्या बुवा-महाराजांचे संप्रदाय अशी सर्व रेलचेल आहे. प्रत्येकाचे इष्टदैवत आहे, इष्टगुरू आहे, पोथी आहे, पोथीपारायणाचे माहात्म्य वर्णन केले जाते, त्यातून होणार्या लाभाच्या कथा रंगवून सांगितल्या जातात; परंतु या काळाचा सर्वमान्य धर्म कोणता आणि त्याचे आचरण कसे करायचे, हे सांगणारा एखादा ज्ञानी आज आपल्यात नाही. एक जण म्हणणार, साईबाबा देव नाही, त्यांची पूजा करू नका. दुसरा जण उभा राहणार आणि म्हणणार, देवाला रिटायर करून टाका. तिसरा म्हणणार, देवपूजा वगैरे सर्व अंधश्रद्धा आहे, त्याचे निर्मूलन करा. या सर्व बजबजपुरीतून मार्ग कसा काढायचा? माणसाला भाकरीइतकीच धर्माची गरज असते, असे डॉ. बाबासाहेब म्हणत. धर्महीन मनुष्य आणि पशूत काही फरक नाही, असे संस्कृत सुभाषित आहे. मूळ प्रश्न असा असतो की, या काळचा धर्म कोणता?
ज्ञानेश्वरांचा कालखंड साडेसातशे वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा देश म्हणजे आपला परिसर, अशी कल्पना असावी. आज जगच खेडे झाले आहे. सर्व प्रश्नांना जागतिक संदर्भ आहेत. प्रत्येक देशातील मानवसमूह सृष्टिनियमाने सर्व विश्वाशी जोडला गेलेला आहे. त्याची चांगली-वाईट कृती सगळ्या जगावर परिणाम करणारी ठरते. हिटलरची कृती जर्मनी आणि युरोपपुरती मर्यादित राहत नाही, सार्या जगावर तिचे परिणाम होतात. रशियातील कम्युनिस्ट क्रांती जागतिक परिणाम घडवून आणणारी क्रांती असते. जागतिक परिस्थितीचा विचार करून आजच्या काळातील महाराष्ट्र धर्म कोणता, हे सांगणे म्हणजे ज्ञानदेवांचा वारसा जिवंत ठेवणे आहे. त्या वारशात भर या प्रकारे घातली गेली पाहिजे. वेगवेगळ्या संप्रदायांचे भक्तगण आपल्या संप्रदाय प्रमुखाला जगत्गुरूची उपमा देतात. त्यांच्या भक्तिभावावर आक्षेप घेण्याचे कारण नाही. असे पाच-पंचवीस जगत्गुरू महाराष्ट्रातच सापडतील. आपल्या मराठी समूहमनाच्या सदसद्विवेकबुद्धीने यातून मार्ग काढला पाहिजे आणि कालानुरूप समाजाला दिशादर्शन केले पाहिजे.
कालानुरूप समाजाला दिशादर्शन देण्याची परंपरा महाराष्ट्राची आहे. इंग्रजी कालखंडापासून सुरुवात केली तर या कालखंडात ज्या थोर पुरुषाने समाजाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे मार्गदर्शन केले, त्या थोर पुरुषाचे नाव आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. महादेव हे त्यांचे नाव असले तरीही ‘माधवराव’ नावाने ते संबोधले गेले. त्यांचा कालखंड 1842 ते 1901 असा आहे. त्यांच्या अफाट कर्तृत्वाची ओळख करून द्यायची तर मुंबई हायकोर्टाचे ते पहिले एतद्देशीय न्यायमूर्ती होते. 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेसचे ते अज्ञात संस्थापक होते. सामाजिक परिषद, डेक्कन सोशल रिफॉर्म असोसिएशन, मुलींची शाळा- न्यू इंग्लिश स्कूल, साहित्य परिषद, सार्वजनिक सभा अशा असंख्य संस्थांचे ते जन्मदाते होते. समाजाची सुधारणा केवळ एका अंगानेच होऊन चालत नाही, ती सर्वांगाने व्हावी लागते. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, इ. समाजाच्या सर्व अंगांमध्ये कालानुरूप सुधारणा व्हाव्या लागतात. त्याचे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. जबाबदार प्रातिनिधिक लोकशाहीची (ज्या लोकशाही व्यवस्थेत आज आपण जगतो आहोत) संकल्पना न्या. रानडे यांनी प्रथम मांडली आहे.
न्यायमूर्ती रानडे यांनी समाजाच्या मुख्य व्यवस्थांचे परस्परांवलंबित्व या भाषेत मांडले आहे आणि ते अतिशय महत्त्वाचे आहे. ‘समाज हा एक जणू प्राणी आहे, की ज्याच्या अंगात प्रगती व्हायची ती एकाच वेळी सर्व अवयवांत. राजकीय हक्कांबाबत तुम्ही मागे पडला असला तर तुम्हाला चांगली समाजव्यवस्था उभी करता येणार नाही. समाजव्यवस्था जोपर्यंत विवेक व न्यायावर अधिष्ठित नाही तोपर्यंत तुम्ही राजकीय हक्क वापरण्यास लायक होऊ शकत नाही. जर तुमची समाजव्यवस्था ठीक नसेल, तर तुमची अर्थव्यवस्थेत प्रगती होऊ शकणार नाही व जर तुमची धर्मसंस्था रसातळाला गेली असेल, तर सामाजिक, आर्थिक व राजकीय सुधारणेची आशाच सोडा.’ या भाषेत न्या. रानडे यांनी एकमेकांवर अवलंबून असणारे वर्तुळ आपल्यापुढे ठेवले आहे.
आजचा प्रश्न असा आहे की, समाजाचा या प्रकारे सर्व अंगांनी विचार करणारे पुढारी आपल्याकडे आहेत का? आपल्यासमोर कोणत्या प्रकारचे पुढारी आहेत? ते एका अंगाचे तर सोडा, अंगातील उपांगाचा विचार करतात. कुणी शेतकरी वर्गातील बागायती शेतकर्याचा विचार करतो, त्यांच्याच समस्या मांडतो, त्या सर्व शेतकरी वर्गाच्या समस्या नसतात. एका जातीचा पुढारी आपल्या जातिहिताचाच प्रश्न मांडत असतो. त्याच्या पक्षाच्या नावात अखिल भारतीय शब्द असतात. कुणी आपल्या धर्मसंप्रदायापुरताच विचार करतो; परंतु समाज एक विराट पुरुष आहे आणि वर दिलेली सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशी त्याची अंगे आहेत. या विराट पुरुषाचा विचार व्हायचा असेल तर सर्व अंगांचा साकल्याने विकास व्हावा लागतो. केवळ एकच अंग प्रबळ होऊन चालत नाही. न्या. रानडे यांनी जो परस्पर संलग्नतेचा सिद्धांत मांडला आहे, तो या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. आपण हा वारसा हरवून बसलो आहोत.
न्या. रानडे यांच्या मृत्यूनंतर लोकमान्य टिळकांनी त्यांच्यावर अग्रलेख लिहिला आहे. उत्कृष्ट अग्रलेखांत त्याची गणना करावी लागते. या अग्रलेखातील काही वाक्ये अशी आहेत, ‘माधवरावजींच्या अंगचा पहिला गुण हा होय की, सर्व बाजूंनी राष्ट्राची उन्नती झाली पाहिजे, असे त्यांना वाटत होते. या सर्व विषयांचे व बाजूंचे सांगोपांग परीक्षण करून त्यांच्या योग्यायोग्यतेबद्दल निर्णय करण्याइतकी परमेश्वराने त्यांस प्रगल्भ व व्यापक बुद्धी दिली होती. धर्मव्यवस्था, समाजसुधारणा, उद्योगधंदे, शिक्षण, राजकीय व्यवस्था वगैरे सर्व बाबतींत आम्ही मागे आहोत आणि या सर्व गोष्टींत सुधारणा झाल्याखेरीज इतर सुधारलेल्या राष्ट्रांशी आपणास बरोबरी करता यावयाची नाही.’
लो. टिळकांनी या अग्रलेखामध्ये समाजाचे नेतृत्व करणार्या पुढारी व्यक्तीकडे कोणती अलौकिक गुणसंपदा लागते हे सहजपणे सूचित केलेले आहे. या अग्रलेखातील एक वाक्य असे आहे, ‘अलौकिक बुद्धिमत्ता, दीर्घ व सतत व्यासंग, देशाबद्दलची खरी कळकळ, विद्यार्जनाचे स्वाभाविक जडलेले व्यसन, अचूक कल्पकता, हे माधवरावांचे गुण आहेत.’ या गुणांचा वारसा महाराष्ट्रातील आजचे पुढारी किती जपत आहेत, याचा आपला आपणच शोध घेतला पाहिजे.
या अग्रलेखात लो. टिळकांनी तेव्हाच्या महाराष्ट्राचे वर्णन केलेले आहे, विरुद्ध अर्थाने हे वर्णन आजच्या महाराष्ट्रालादेखील लागू पडण्यासारखे आहे. लो. टिळक लिहितात, ‘लोकांच्या अंगचे तेज अगदीच नाहीसे झालेले होते असे नाही; पण वर लिहिलेल्या कारणांमुळे महाराष्ट्रदेश म्हणजे त्या वेळी एक थंड गोळा होऊन पडला होता. या थंड्या गोळ्यास कोणत्या तर्हेने ऊब दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हात-पाय हलवू लागेल- याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास पुन्हा सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरिता जिवापाड जर कोणी मेहनत केली असेल, तर ती प्रथमतः माधवरावजींनीच केली, असे म्हटले पाहिजे.’ महाराष्ट्र हा थंड गोळा होऊन पडला होता, हे लो. टिळकांचे वाक्य आजच्या महाराष्ट्राच्या परिस्थितीला लागू करून लिहायचे तर, ते असे लिहावे लागेल, ‘महाराष्ट्र म्हणजे एक संभ्रमित आणि भरकटलेला गोळा होऊन पडला आहे.’ असे लिहावे लागेल.
लो. टिळक हे न्या. रानडे यांचे समकालीन आहेत. न्या. रानडे यांच्याप्रमाणेच ते समाजाचा सर्वांगीण विचार करणारे नेते होते. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ अशी उपाधी त्यांना इंग्रजांनी दिली होती. काँग्रेसला लोकचळवळ करण्याचे काम त्यांनीच केले होते. स्वराज्य, सुराज्य आणि स्वदेशी यांच्या मौलिक संकल्पना त्यांनी मांडल्या. ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहून आजचा कालसुसंगत धर्म कोणता हे त्यांनी महाराष्ट्रापुढे ठेवले. अंगी घेतलेले कार्य अनंत अडचणी समोर आल्या तरी त्यांनी सोडले नाही. तुरुंगवास भोगला. मंडालेला सहा वर्षांची शिक्षा भोगून आले. 1895 साली स्वराज्य पक्षाच्या वतीने ब्रिटिश शासनाकडे त्यांनी भारताचे भावी संविधान कसे असले पाहिजे याचा मसुदा पाठवला. तो खूपशा अंगाने आजच्या संविधानासारखाच आहे.
न्या. रानडे काय किंवा लो. टिळक काय, हे गुणसागर, कर्तृत्वाचे महामेरू आणि समाज व देशाच्या उपजत कळकळीमुळे कार्य करणारे थोर पुरुष होते. त्यांचा वारसा कुठे गेला? बहुसंख्य लोकांना लो. टिळकांचे नाव तरी माहीत आहे. न्या. रानडे यांचे नाव सुशिक्षितांपैकीदेखील किती जणांना माहीत असेल हे सांगणे अवघड आहे. दोघा थोर पुरुषांच्या नावे वेगवेगळ्या संस्था आहेत. या संस्था त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचे काम करतात. त्यांच्या वैचारिक व कर्तृत्वाच्या वारशाचे काय?
थॉमस कार्लाइल यांचे "On Heroes, Hero-Worship' या शीर्षकाचे एक पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी इतिहासाचे मौलिक विश्लेषण केलेले आहे. त्यांचा सिद्धांत असा की, विश्वाच्या इतिहासामध्ये मानवाने जी प्रगती केली आहे आणि प्रगतीतून जे प्राप्त केले आहे, ते सर्व महान व्यक्तींच्या कर्तृत्वाचा परिणाम असतो. जगाचा इतिहास म्हणजे महान माणसांचा इतिहास. ही महान माणसे जनांचे नेतृत्व करतात. लोकांच्याकडून ते महाप्रचंड कामे करून घेतात. जगात जे काही आपण पाहतो, मग त्यात व्यवस्था असतील की वास्तू असतील, या सर्व थोर पुरुषांच्या विचारशक्तीतून आणि कल्पनाशक्तीतून निर्माण झालेल्या असतात. म्हणून जगाच्या इतिहासाचा आत्मा जर कोणता असेल तर तो या थोर पुरुषांच्याच रूपाने आपल्याला दिसतो. कार्लाइलने जे काही म्हटले त्याचा हा भावानुवाद आणि सारांश आहे. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणार्या सहा थोर पुरुषांवर कार्लाइलने दिलेली व्याख्याने या पुस्तकात आहेत.
थॉमस कार्लाइल याचा सिद्धांत पाश्चात्त्य देशातील विद्वानांनी जसाच्या तसा स्वीकारलेला नाही. काही जणांचे म्हणणे असे की, थोर पुरुष समाज घडवितात असे नसून सामाजिक परिस्थिती थोर पुरुषांना जन्माला घालते. कोणताही थोर पुरुष हा परिस्थितीचे अपत्य असतो. समाजाची तशी गरज असते म्हणून समाज अशा पुरुषाला जन्म देतो. दोन्ही मते पूर्ण सत्य आहेत असे नाही. आपल्या भारतीय विचारपरंपरेचा आधार घेऊन सांगायचे तर दोन्ही विचारांत सत्यांश आहे. म्हणून दोघांचा समन्वय करून पुढे जायला पाहिजे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार करता समाजात मूलगामी बदल करण्याचे बौद्धिक सामर्थ्य त्यांच्याकडे होते; परंतु त्या वेळची समाजाची गरज म्हणून त्यांना क्रांतिकारकांच्या मार्गाने जावे लागले. त्यांच्या बाबतीत असे आपण म्हणू शकतो की, समाजात बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आणि समाजाच्या गरजेची पूर्तता या दोन्हींचा मिलाप सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. 50 वर्षांची जन्मठेप- काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमान कारागृहातील भयानक जीवन, रत्नागिरीतील स्थानबद्धता, तेथील समाजकार्य, भाषाशुद्धीची चळवळ, हिंदू संघटनेचा विचार, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञाननिष्ठा असे एकापेक्षा एक वरचढ गुण आणि प्रसंग त्यांच्या आयुष्यात आहेत.
महान वारसा आपल्यासाठी ते ठेवून गेले आहेत. देशासाठी कसे जगायचे हे त्यांच्याकडून शिकावे. जन्मत: प्राप्त झालेल्या बुद्धीचा विकास करून मातृभूमीच्या चरणी ती कशी अर्पावी, हा त्यांचा वारसा आहे. स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्य यासंबंधीचे मौलिक चिंतन हादेखील त्यांचाच वारसा आहे. तो जतन करण्याऐवजी दोन-चार तोंडाळ नेते आणि त्यांचे लाळचाटे सावरकरांची बदनामी करण्यात स्वत:ला धन्य समजतात. सावरकरांची बदनामी हे राष्ट्रीय पाप आहे.
आपल्या महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात सर्व अंगांनी परिवर्तनाचा विचार करणारे केवळ चार-दोनच महापुरुष झाले असे नाही. या मालिकेत महात्मा जोतिराव फुले यांचा विचार करावा लागतो. महात्मा जोतिराव फुले हे केवळ एका व्यक्तीचे नाव नाही, तर तो एक विचार आहे. हा विचार बहुजन समाजाला समानता, प्रतिष्ठा आणि सर्व बंधनांतून मुक्तता देणारा विचार आहे. हा विचार महात्मा जोतिराव फुले यांनी मंत्र आणि तंत्र या दोन्ही प्रकारे मांडला. समाजस्थितीचे विश्लेषण करून आणि विचारांची मांडणी करून ते थांबले नाहीत. विचारांना कृतीची जोड असावी लागते. म्हणून महात्मा फुले यांचे वर्णन विचार देणारे कृतिनिष्ठ सत्यशोधक या भाषेत करावे लागते.
महात्मा जोतिराव फुले ही एक चळवळदेखील होती. या चळवळीत राजकीय क्षेत्रातील छत्रपती शाहू महाराज, शैक्षणिक क्षेत्रातील कर्मवीर भाऊराव पाटील आणि धार्मिक क्षेत्रातील संत गाडगेबाबा सामील झाले होते. छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि गाडगे महाराज ही तीनही नावे बहुजन समाजातील आहेत. या तिघांचे आपापल्या क्षेत्रातील कर्तृत्व फार मोठे आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा विसाव्या शतकाच्या काळाच्या संदर्भात आणि राजगादीच्या मर्यादा ओळखून पुढे नेला आहे. सर्वसामान्य माणसांचा सहभाग असल्याशिवाय देश मोठा होत नाही, हे त्यांच्या कार्याचे प्रमुख सूत्र आहे. महात्मा ज्योतिराव फुले या सूत्राचे जनक आहेत.
सर्वसामान्य माणसाला शिक्षित करण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या अंगावर घेतले. त्यांनी स्थापन केलेली ‘रयत शिक्षण संस्था’ आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षणसंस्था आहे. बहुजन समाजातील मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे, यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि सोसलेली झीज यामुळे त्यांना नुसते ‘कर्मवीर’ म्हणून उपयोगाचे नाही, तर ‘शिक्षणकर्मॠषी’ असे म्हटले पाहिजे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य वेचले. भारतरत्न महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी खर्च केले. हिंगणे येथे महर्षी कर्वे स्त्री-शिक्षण संस्था उभी आहे. या संस्थेत तीस हजारांहून अधिक मुली आधुनिक काळाशी सुसंगत शिक्षण घेत आहेत. या तीस हजार मुली सर्व समाजातील सर्व घटकांतील आहेत. कोणत्याही एका विशिष्ट जातीतील नाहीत. कर्मवीर भाऊराव पाटील आणि अण्णासाहेब कर्वे यांनी आपल्याला शिक्षणाचा दिलेला महान वारसा कुठे गेला?
कीर्तनाच्या माध्यमातून बहुजन समाजात अफाट जागृती निर्माण करण्याचे काम गाडगेबाबांनी केले. त्यांचे चरित्र म्हणजे संत परंपरा, सावरकरांचा बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठा यांचा अपूर्व संगम होता. अध्यात्म त्यांनी सोडले नाही; परंतु अध्यात्माच्या नावाने अंधश्रद्धांचा गोंधळ स्वीकारला नाही. बुद्धिवाद आणि विज्ञाननिष्ठा स्वीकारली; परंतु देवाला रिटायर्ड करण्याची भाषा नाही केली. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ ही मधुर वाणी त्यांनी सोडली नाही.
महात्मा फुल्यांच्या वारशाचे आज काय झाले आहे? स्वत:ला फुलेवादी म्हणविणारी मंडळी महात्मा फुले यांचा उपयोग ब्राह्मणांना शिव्या घालण्यासाठी करतात. आज महाराष्ट्रात अनेक शिक्षणमहर्षी उभे राहिलेले आहेत. त्यांनी शिक्षणाचा व्यापार करून अब्जावधी रुपयांची संपत्ती जमवली आहे. उच्च शिक्षण देणार्या त्यांच्या संस्थेत प्रवेश हवा असेल तर लाखांच्या थैल्या त्यांना अर्पण कराव्या लागतात. पाठीवर जोंधळ्याचे पोत घेऊन जाणारे कर्मवीर कुठे आणि पाठीवर नोटांच्या बंडलांच्या गोणी बाळगणारे कुठे? या हरवलेल्या वारशांचे स्मरण आपण कधी करणार की नाही?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कळकळीने आणि आत्मीयतेने महात्मा फुलेंचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. विसाव्या शतकातील ते प्रकांडपंडित होते. असंख्य विषयांचे त्यांना सखोल ज्ञान होते. हे सर्व ज्ञान त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी खर्च केले. सामाजिक ऐक्य निर्माण झाल्याशिवाय राष्ट्रीयता निर्माण होणे कठीण आहे. ज्या घरात फूट आहे, ते घर टिकत नाही, हे त्यांनी वारंवार सांगितले. जाती राष्ट्रविघातक आहेत. एकराष्ट्रीयत्वाच्या आड येणार्या आहेत, हे त्यांनी सांगितले. सार्वत्रिक समता आणि सार्वत्रिक बंधुत्वाचा विचार देणारा भगवान गौतम बुद्धांचा (3 ऑॅक्टोबर 2024) मार्ग त्यांनी स्वीकारला. धर्माला कालोचित रूप दिल्याशिवाय समाजाची आणि राष्ट्राची उन्नती शक्य नाही, हे त्यांनी जाणले. देशाला बांधून ठेवणारी राज्यघटना त्यांनी दिली. ‘कायद्याचे राज्य आणि कायद्यापुढेे सर्व समान’ हा राज्यघटनेचा मूलमंत्र आहे.
डॉ. बाबासाहेबांचा हा वारसा सर्व समाजासाठी आहे. सर्व समाजाने त्याचा स्वीकार केला आहे, असे छातीठोकपणेे म्हणता येत नाही. त्यांच्या जन्मजातीने बाबासाहेबांना देवाचे स्थान दिले. बाबासाहेबांवर आमचाच एकाधिकार आहे, अशी यापैकी अनेकांची धारणा आहे. राजकीय नेते मतपेट्यांच्या राजकारणासाठी बाबासाहेबांच्या नावाचा भरपूर उपयोग करतात. आपणच खरे आंबेडकरभक्त कसे आहोत, हे सांगण्याची चढाओढ सुरू असते. या चढाओढीत डॉ. बाबासाहेबांनी दिलेला वारसा कोणता आहे, तो कसा काळाच्या संदर्भात पुढे नेता येईल, सर्वसमावेशकता, सर्वमान्यता कशी निर्माण करता येईल, यासंबंधीचे चिंतन आणि आचरण फार मोठ्या प्रमाणात होते आहे, असे विधान करता येत नाही.
आजच्या महाराष्ट्राची स्थिती पाहता आपल्याला प्राप्त झालेल्या या वारशाचे जतन करणे फार आवश्यक आहे. माझ्या मते त्याचा पाच अंगांनी विचार करावा लागेल. 1) व्यक्तिगत 2) पारिवारिक 3) सामाजिक 4) राज्यसंस्थेसंबंधी 5) राष्ट्रीय. एक व्यक्ती म्हणून आजचा माझा व्यक्तिधर्म कोणता? परिवाराचा सदस्य म्हणून माझा परिवारधर्म कोणता? राज्याचा एक नागरिक म्हणून माझा राजधर्म कोणता? राष्ट्राचा एक घटक म्हणून माझा राष्ट्रीय धर्म कोणता? हे आजच्या काळात परिभाषित करणे फार गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्ती सुखासाठी धडपड करतो. सुख कशात आहे, हे त्याला सांगायला पाहिजे. आपल्या कुटुंबात आनंद राहावा, सर्व निरोगी असावे, असे प्रत्येकाला वाटते. ते कसे साध्य करता येईल, हे सांगितले पाहिजे. समाजात शांतता असावी, सुव्यवस्था असावी असे प्रत्येकाला वाटते. ते कसे साध्य करता येईल? ज्या भारतीय राज्यात आपण राहातो, ते राज्य सुरक्षित असले पाहिजे, समृद्ध असले पाहिजे. ते कसे करता येईल, हा विचार महत्त्वाचा. आपण एका सनातन राष्ट्राचे अंग आहोत. आमची स्वतंत्र ओळख काय, ती विचार आणि मूल्यांनी कशी व्यक्त होते, हे स्पष्ट केले पाहिजे. या पंचविध धर्माचे मार्गदर्शन ही काळाची गरज आहे.
समाजाचा विचार करताना पुढील तीन शाश्वत सत्यांचा विचार करावा लागतो. त्यातील पहिले सत्य हे की, समाजजीवन हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. नदीचा प्रवाह जसा अखंड वाहत असतो, तसे समाजाचे सातत्य अखंड असते. एक पिढी येते आणि जाते. तिची जागा दुसरी पिढी घेते. दुसरे सत्य असे की, सातत्यता हा समाजाचा गुण आहे तसा प्रत्येक समाज हा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याचे प्रतिनिधित्व करीत असतो. आज आपण जे काही आहोत, ते भूतकाळामुळे असतो. मागील पिढ्या आपल्याला प्रचंड वारसा देऊन जातात, वर्तमानात तो आपण जगतो आणि भविष्यात येणार्या पिढ्यांकडे तो आपण हस्तांतरित करीत असतो. तिसरे सत्य असे की, जसे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व असते तसे समाजाचे व्यक्तिमत्त्व असते. त्याला आपण विराट पुरुष म्हणतो. या विराट पुरुषाचे एक आत्मतत्त्व असते. ते कधी जागृत असते, तर कधी सुप्त असते, तर अतिशय अवनत काळात ते थंड गोळा होऊन पडलेले असते.
याला समाजभान असे म्हणता येईल, समाजाची सदसद्विवेकबुद्धी असे म्हणता येईल. ती परंपरेने चालत आलेल्या मूल्यांवर उभी असते. महाराष्ट्रातील मराठी माणूस म्हणून या मूल्यांचा विचार करावा लागतो. राम गणेश गडकरी ऊर्फ कवी गोविंदाग्रज यांची महाराष्ट्रासंबंधीची फार सुंदर कविता आहे.
मंगल देशा! पवित्र देशा! महाराष्ट्र देशा!
प्रणाम घ्यावा माझा हा, श्रीमहाराष्ट्र देशा ॥धृ.॥
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा॥
अंजनकांचनकरवंदीच्या काटेरी देशा।
बकुलफुलांच्या, प्राजक्तीच्या दळदारी देशा॥
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।
शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दाच्या देशा।
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणवरी नाचते करी॥
जोडी इहपरलोकांसी व्यवहारापरमार्थासी
वैभवासी वैराग्यासी॥
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा॥
मराठी माणूस म्हणून आमची ओळख कोणती? तर आम्ही राकट आहोत, कणखर आहोत, त्याच वेळी नाजूक आहोत, कोमल आहोत. भावभक्ती आणि बुद्धी यांची जपणूक करणारे आहोत. इहलोक आणि परलोकाचा विचार करणारे आहोत. वैभव आणि वैराग्य दोन्ही आम्हाला वंदनीय आहेत. यातून आमचे व्यक्तिमत्त्व घडलेले आहे. अशी सर्व भावमय शिकवण देणारा महाराष्ट्र आहे. या वारशाची जपणूक करणे आणि तो रोजच्या जीवनात प्रत्यक्षात उतरवणे, हे आपले पहिले कर्तव्य आहे. थोर पुरुष समाजाला घडवितात हे जितके खरे आहे तितकेच समाज थोर पुरुष निर्माण करतो हेदेखील तेवढेच खरे आहे. आपण जी मूल्ये आणि विचार जगतो, त्यातून आपले सर्वक्षेत्रीय नेतृत्व उभे राहते. आपले सर्वक्षेत्रीय नेतृत्व प्रामाणिक, पारदर्शी, समाजाची आत्मीय कळकळ असणारे, विचारनिष्ठ, समर्पित आणि त्यागी निर्माण व्हायचे असतील तर ही सर्व बीजे आपल्या जीवनात अंकुरली पाहिजेत. एकटे ज्ञानदेव, एकटे छत्रपती शिवाजी महाराज, एकटे डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण होऊन चालत नाही. त्यांच्या मार्गाने जाणारे समाजमन त्याच वेळी उत्पन्न व्हावे लागते. या दोघांच्या मीलनानेच मंगलदायी परिवर्तन घडत असते. या दिशेने आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे.