सेक्युलॅरिझम अर्थ आणि अनर्थ

विवेक मराठी    28-Oct-2024
Total Views |
 @आदित्य जोशी

secularism
  
Render unto Caesar that which belongs to Caesar and unto God that which belongs to God.- Mark 12:17 - ‘सेक्युलर’ या शब्दामुळे वेळोवेळी उडणारा चर्चेचा धुरळा आपल्या परिचयाचा आहे. भारतीय राज्यघटनेतही या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे; पण या शब्दाचा मूळ अर्थ काय? व्युत्पत्ती काय? त्याची काही विशिष्ट व्याख्या आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याचा विरुद्धार्थ कोणता? सांप्रदायिक (communal), धार्मिक ( religious) की आणखी काही? आज भारतातील समकालीन राजकीय चर्चा आणि समाजमन व्यापणारा दुसरा शब्द नसावा. म्हणूनच हा शब्द सरसकट सर्वत्र वापरण्याआधी त्या शब्दाचा अर्थ, व्याप्ती, इतिहास इत्यादी समजून घेणे महत्त्वाचे आहे. या लेखात त्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करू.
 
Saecularis ह्या संकल्पनेच्या आधुनिक काळापर्यंत झालेल्या विकासाचा मागोवा घेण्यासाठी आपल्याला भारतातून पश्चिमेकडे काही हजार मैल आणि ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीपर्यंतच नाही, तर प्राचीन रोमन साम्राज्यापर्यंत मागे जावे लागेल. मग आपल्या असे लक्षात येईल की, Separation of Church and State ची आधुनिक संकल्पना आणि 'secular' या शब्दाचा रोजच्या वापरातील अर्थ ह्या प्रत्यक्षात फार भिन्न संकल्पना होत्या. आजच्या 'secular' या इंग्लिश शब्दाची व्युत्पत्ती लॅटिन 'Saecularis' या विशेषणात आहे, जे मुळात लॅटिन 'Saeculum (साएकुलूम्)’ या नामापासून तयार झाले. Saeculum चे विविध अर्थ आहेत-युग, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा किंवा पिढीचा कालावधी किंवा एका शतकाचा कालखंड आणि म्हणून saecularis म्हणजे ’एका विशिष्ट वयाचा किंवा युगाचा’. (लॅटिन saeculum' पासूनच शतक या अर्थाचा आधुनिक इटालियन 'secolo' हा शब्द आला आहे.) म्हणून, मूळ लॅटिन अर्थानुसार विचार केल्यास 'secular' म्हणजे एका विशिष्ट युगाशी किंवा विशिष्ट कालावधीशी संबंधित अशी गोष्ट. इंग्लिशमध्ये याचं temporal असं भाषांतर करता येईल- अशी गोष्ट जी कालप्रवाहात बदलते, अशाश्वत असते. (गणितातही secularचा हाच मूळ अर्थ घेतला जातो. उदा. Secular function.) हे लक्षात घेतल्यास 'aeternusचा विरुद्धार्थी शब्द लॅटिन eternal(आएतेर्नुस्)’ (चिरंतन किंवा शाश्वत, शींशीपरश्र) हा ठरतो.
 
 
या शब्दाला आजचा अर्थ प्राप्त होण्याची कारणे मात्र ख्रिश्चन धर्माच्या इतिहासाशी कायमची जोडली गेली आहेत. त्यामुळे त्याचे आजचे राजकीय परिणाम समजून घेण्यासाठी आपल्याला ख्रिश्चन धर्माच्या सुरुवातीच्या काळातील वापर आणि घडामोडी पाहणे क्रमप्राप्त आहे. Tertullian आणि गेहप John Chrysostom यांसारख्या ख्रिश्चन धर्माच्या पहिल्या काही धुरीणांच्या लेखनात कायदा आणि प्रशासन व श्रद्धा-नैतिकता यांच्या आणि पर्यायाने राज्ययंत्रणा (स्टेट) आणि धर्म (चर्च) यांच्या विभागणीचे उल्लेख येतात. वर उद्धृत केलेले बायबलमधील वचनही या विभाजनाचे मूळ मानले जाते; परंतु या विभाजनाला प्रथम औपचारिक स्वरूप मिळाले ते सेंट ऑगस्टिन (Augustine of Hippo) याच्या लेखनात. ‘द सिटी ऑफ गॉड’ (इसवी सन 426) या ग्रंथात (विशेषतः भाग 17 आणि 19), ऑगस्टिन पृथ्वी आणि स्वर्ग (earthly city and heavenly city) यांच्यातील द्वैताची चर्चा करतो; तथापि आपल्या लिखाणात तो ‘सेक्युलर’ या शब्दाला आणखी एक नवीन आयाम देतो. ऑगस्टिनच्या दृष्टीने केवळ जे दैवी तेच शाश्वत आणि अपरिवर्तनीय असल्यामुळे भौतिक जगाच्या मर्यादेतील सर्व ते अशाश्वत आणि कालपरत्वे बदलणार्‍या गोष्टी म्हणजेच भौतिक जग. त्यामुळे ऑगस्टिनच्या लिखाणात ‘सेक्युलर’ या एकाच शब्दाखाली ‘अशाश्वत (temporal)’ या अर्थाबरोबरच ‘सांसारिक (of the material world/worldly)’ हे दोन्ही अर्थ निव्वळ जोडले जात नाहीत, तर परस्परपूरक ठरतात. ऑगस्टिनचे सेक्युलर म्हणजे भौतिक जग (समाज) आणि त्याचा गाडा हाकणारे राज्य या सांसारिक पार्श्वभूमीवर स्वर्ग उभा राहतो.
 

secularism 
 
पण ऑगस्टिनच्या मतानुसार स्वर्ग आणि पृथ्वी ही पूर्णतः एकमेकांच्या विरोधात नाहीत. एका बाजूला स्वर्गाचे अस्तित्व हे या इहलोकाच्या अस्तित्वावर अवलंबून असते. स्वर्ग अवतरण्यासाठी भूतलावर शांतता व सुव्यवस्था नांदणे आवश्यक असते आणि अनेक समुदायांनी बनलेल्या समाजातील लोक आपापसात सुसंवादाने राहतील हे पाहण्याची जबाबदारी इथल्या, म्हणजेच वरील अर्थानुसार 'secular’ राज्ययंत्रणेची असते, तर दुसर्‍या बाजूला, हे साध्य करण्यासाठी इहलोकात वापरला जाणारा न्याय हा ’खर्‍या किंवा दैवी न्याया’च्या (true justice) प्रतिमेत तयार होतो. अर्थात पृथ्वी आणि स्वर्ग हे दोन्हीही एकमेकांवर अवलंबून असतात.
 
 
ऑगस्टिन हे लिहीत असताना रोमन नागरिक होता आणि त्यामुळे त्याची earthly city ची कल्पना अर्थातच तत्कालीन साम्राज्यातील रोम, कार्थेज इत्यादी शहरांवर आधारित होती. Christianity हा रोमन साम्राज्याचा राजधर्म यापूर्वीच झाला असला (Edict of Thessalonika, 380 D) तरी अजूनही लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा (विविध अंदाजांनुसार किमान 40%) ख्रिश्चन नव्हता. त्यामुळे, ऑगस्टिनसाठी रोमन राज्य हे एक 'secular' किंवा ‘भौतिक’ सत्ता होती. त्याच्या दृष्टीने शांतीच्या प्राप्तीसाठी पुढील काळात साम्राज्य 'de-secularisation'च्या प्रक्रियेतून जाणे (म्हणजेच पूर्णपणे ख्रिश्चन होणे) आवश्यक, किंबहुना अपरिहार्य होते.
 
 
ऑगस्टिनने मांडलेले राज्य आणि धर्म यांमधील हे द्वंद्व मध्ययुगातील संकल्पनांतही जिवंत राहिलेले आपल्याला दिसते. पश्चिमेतील रोमन साम्राज्य र्‍हास पावल्यानंतरही पूर्वेकडील रोमन साम्राज्य अनेक शतके टिकून होते. त्यामुळे पुढील काही शतके पूर्व आणि पश्चिमेची वाटचाल वेगवेगळ्या मार्गांनी झालेली दिसते. पूर्वेकडील (अजूनही रोमन असलेल्या) साम्राज्यात, सम्राटाला 'kosmokrator' (भौतिक जगाचा शासक) आणि 'kronokrator' (काळाचा शासक) म्हणत, तर ख्रिस्ताला 'pantokrator' (म्हणजे सर्व सृष्टीचा नियंता) मानले जात असे. रोमन सम्राट हा ख्रिस्ताचा, म्हणजेच देवाचा 'emissary' किंवा प्रतिनिधी मानला जाई. त्यामुळेच सम्राटांना ऑर्थोडॉक्स धर्माचा प्रमुख या नात्यानेसर्वोच्च बिशप- कॉन्स्टॅन्टिनोपलच्या patriarchची नियुक्ती करण्याचा अधिकारही होता; पण असे असले तरीही, राज्याचे 'secular', रोमन स्वरूप कधीच पूर्ण लुुप्त झाले नाही. राज्याचा दैनंदिन व्यवहार हा धर्मगुरू नाही, तर व्यवहारकुशल प्रशासकांनी अनेक शतकांवर घडवलेल्या Roman Law नुसार चालत असे आणि तोही रोमन साम्राज्यात शतकानुशतके चालत आलेल्या कायदे व स्थानिक परंपरांनुसार, धार्मिक नियमांच्या आधारावर नव्हे.
 
 
या दरम्यान पश्चिमेचा इतिहास मात्र राज्ययंत्रणा आणि चर्च यांच्यातील आलटून पालटून सहकार्य आणि संघर्षाचा होता. परंपरेनुसार चालत आलेल्या दैवी अधिकाराच्या (Divine Righ) संकल्पनेचा दाखला देऊन प्रशासकीय आणि धार्मिक अशा दोन्ही बाबींवर आपला अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तेथील अनेक सम्राटांनी सातत्याने केला, तर रोमन साम्राज्याचा पश्चिमेकडील भाग दुर्बल होत लयाला जात असताना साम्राज्याचा कारभार चालवण्यासाठी तयार केलेली Bishopric, Diocese, Archdiocese इत्यादी पदांची hierarchy ही अनेक ठिकाणी एक तर राज्याच्या नियंत्रणाअभावी चर्चच्या ताब्यात गेली होती किंवा चर्चनेही स्वतःचा पदभार त्याच उतरंडीनुसार विभागला होता. इसवी सन 1054 च्या 'Great Schism'नंतर कॅथलिक चर्च जसे पूर्वेकडील (ऑर्थोडॉक्स) चर्चपासून विलग झाले तसे पोप हा  Vicar of Christ, Bishop of Rome आणि कॅथलिक चर्चचा प्रमुख या नात्याने निसर्गतः ख्रिश्चनांचा नेता आणि राजापेक्षाही वरिष्ठ मानला जावा, ही चर्चची अपेक्षा होती. अर्थातच नवीन पोपची निवड करण्याचा अधिकार आणि दैनंदिन आयुष्यातील धर्माच्या महत्त्वामुळे चर्चचा स्वाभाविक प्रभाव यामुळे वेळोवेळी राजकीय आणि धार्मिक सत्तेतील संघर्ष हा अपरिहार्य होता. त्यातच मध्ययुगात चर्च हा सर्वात मोठ्या जमीनमालकांपैकी एक होता (अनेक ठिकाणी राज्यकर्त्यांपेक्षाही अधिक जमीन चर्चच्या मालकीची होती). या जमिनीवरील नियंत्रण आणि त्यातून मिळणारा महसूल हेही अशा संघर्षांचे एक प्रमुख कारण बनले.
 

secularism 
 
अशा संघर्षाचे एक मनोरंजक उदाहरण आपल्याला इंग्लंडमध्ये दिसते. इंग्लंडचा राजा आठवा हेन्री याला अ‍ॅन बोल्यिन (Ann Boleyn) हिच्याशी लग्न करायची इच्छा होती. मात्र त्यासाठी त्याला त्याचे कॅथरीन ऑफ अ‍ॅरागॉनशी झालेले आधीचे लग्न पोपकडून रद्दबातल करून हवे होते. पोप सातवा क्लेमेंट याने हे करण्यास नकार दिला. Holy Roman Emperor सारखी राज्यसत्ता आणि धर्मसत्ता आपल्या हातात एकवटण्याची इच्छा, अनेक अ‍ॅबीच्या (abbey) रूपात चर्चकडे असलेली जमीन इत्यादी कारणांना ह्या तात्कालिक कारणाच्या निमित्ताने जोड मिळून आठव्या हेन्रीने ब्रिटिश पार्लमेंटवर दबाव टाकून कॅथलिक चर्चपासून Church of England वेगळे करवले. हेच ते English Reformation.
 
 
दीर्घकाळ चाललेल्या या अशा संघर्षांमुळे मुदलात अशाश्वत (Secular) आणि शाश्वत (Eternal) यांच्यातील द्वैताची जागा हळूहळू राज्ययंत्रणा आणि चर्च यांच्यातील द्वंद्वाने घेतली. प्रॉटेस्टंट क्रांतीने या बदलात महत्त्वाचा वाटा उचलला. मार्टिन ल्युथर याची ’ऐहिक’ आणि ’पारलौकिक’ अशा दोन राज्यांची संकल्पना (Doctrine of Two Kingdoms) ही जरी ऑगस्टिनने प्रभावित असली तरी त्याच्या मते ही दोन्ही राज्ये एकमेकांवर अवलंबून नव्हती, तर पूर्णतः वेगवेगळी होती. दिवसेंदिवस ऐहिक जगात अडकलेल्या चर्चला मुक्त करण्याचा मार्ग ल्युथरसाठी त्यास राज्यापासून पूर्णतः विलग करणे हा होता. प्रॉटेस्टंट क्रांती ही 'secularism' या शब्दाला त्याचा आधुनिक अर्थ प्राप्त करून देण्यात महत्त्वाचा टप्पा ठरली. संपूर्ण विभाजनाची ही कल्पना विकसित करण्यात पुढेही अनेकांचा हातभार लागला; पण यात जॉन लॉक (John Locke) या ब्रिटिश तत्त्वज्ञाचा प्रभाव हा अतुलनीय म्हणावा लागेल. त्याबरोबरच या विचाराला आणि 'Separation of Church and State' या वाक्प्रचाराला आधुनिक काळात लोकप्रिय केले ते अमेरिकेचा एक जनक-संस्थापक (Founding Father) जेम्स मॅडिसनने. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थापन झाल्यानंतर अमेरिकन संविधानाद्वारे हा विचार आधुनिक काळात जगात पहिल्यांदा अधिकृत राजकीय धोरण म्हणून लागू झाला. येथे हे लक्षात ठेवायला हवे की, अमेरिकेच्या स्थापनेच्या वेळी तेथील विचारधारेवर प्रॉटेस्टंट धर्माचा मोठा प्रभाव होता.
 
 
प्रॉटेस्टंट क्रांती आणि तर्क-विवेकवादाचा (Rationalism) उदय यातून पुढे युरोपात तथाकथित प्रबोधनाचे युग (age of enlightenment) अवतरले. लॉक (Locke), देकार्त (Descartes), पिएरबेल (Pierre Bayle) आणि इतर फिडेइस्ट विचारवंतांच्या लेखनातून चर्च आणि राज्य यंत्रणा यांच्यातील द्वंद्वाशी श्रद्धा व तर्क यांच्यातील द्वंद्वाचा संबंध जोडला गेला. इतिहासात सेंट ऑगस्टिनपासून थॉमस अ‍ॅक्विनासपर्यंत अनेकांनी तर्क आणि श्रद्धा यांना एकत्र आणण्याचा कायम प्रयत्न केला; परंतु तर्कवाद्यांनी मात्र असे गृहीत धरले की, तर्क आणि श्रद्धा हे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत व ते एकमेकांपासून केवळ वेगळेच नव्हे, तर पूर्णतः परस्परविरोधी आहेत. खरं तर या गृहीतकाला कोणताही सबळ पाया नाही. (अर्थात प्रत्येक काळाची विचारसरणी आणि त्याला तत्कालीन कारणेही असतातच.)
 

secularism 
 
पवित्र आणि अपवित्र (sacred and profane) यांचे द्वैत हे ख्रिश्चानिटीत मुळातच गृहीत आहे. याचीच परिणती म्हणून पाश्चात्त्य विचाराने अनेक द्वंद्वांना याच द्वैताची प्रतिकृती म्हणून जन्म दिला आहे. तत्कालीन युरोपातील राजकीय वातावरण, ख्रिश्चन धर्माचा तेथील प्रभाव, प्रॉटेस्टंट क्रांती आणि तर्कवादाची चळवळ या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असा झाला की, श्रद्धा आणि तर्क यांच्यातील द्वंद्वाकडेही हळूहळू अशाच ’पवित्र आणि अपवित्रते’च्या चष्म्यातून पाहिले गेले. श्रद्धेसकट ज्या ज्या गोष्टी तर्काच्या परिघाबाहेर येतात त्या सर्वांना वाईट किंवा हीन दर्जाच्या म्हणून गणले गेले. दुर्दैवाने या विचारसरणीचा प्रभाव आजही कायम आहे.
 
 
त्यामुळे आज अशी परिस्थिती ओढवली आहे की, जो कोणी 'secular' या शब्दावर नव्हे, तर त्याच्या अर्थावर वैचारिक दृष्टिकोनातून प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, त्यालाही ’अंधश्रद्ध’ ते ’धार्मिक कट्टरतावादी’ इथपर्यंत अनेक शेलकी विशेषणे बहाल केली जातात; पण आपण नुकतंच पाहिलं की, जे 'secular' नाही ते हिणकस असा समज होण्यामागे कोणतेही ‘वैश्विक मूल्य’ नाही, तर ख्रिश्चानिटी आणि त्यातही प्रॉटेस्टंटॅनिझम यांचा पाश्चिमात्य विचारांवर आणि पर्यायाने सर्व जगावर असलेला प्रभाव यामुळे ही स्थिती उद्भवली आहे; किंबहुना इटलीतील एका न्यायाधीशांनी Lautsi v Italy केसच्या निकालाच्या संदर्भात म्हटल्याप्रमाणे पाश्चिमात्य 'Secularism' हा स्वाभाविकपणेच ’'Christian Secularism' आहे.
 
 
'Secularism'च्या बदलत्या अर्थाच्या या सार्‍या इतिहासाकडे दुर्लक्ष करून जर आपण असा प्रश्न विचारला की, 'Secularism' ’ नावाचे काही एक वैश्विक तत्त्व व्यवहारात अस्तित्वात आहे का? तर आपल्याला त्याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. या शब्दाच्या व्यावहारिक अर्थाबद्दलही देशोदेशी (अगदी पाश्चिमात्य जगातही) प्रचंड गोंधळ दिसून येतो. जगभरातील अनेक देश हे उघड उघड धर्मसत्तावादी आहेत, तर काही राष्ट्रांमध्ये अधिकृतपणे एका धर्माला 'state religion' म्हणून मान्यता आहे. ज्यांची अशी अधिकृत भूमिका नाही त्यातली अनेक राष्ट्रे ही उदारमतवादी नाहीत किंवा तिथे लोकशाही अस्तित्वात नाही. जी राष्ट्रे स्वतःला उघडपणे 'secular' म्हणवतात त्यांच्यातही त्याच्या अर्थाबद्दल एकवाक्यता नाही. एवढेच नव्हे तर त्यासाठी वापरल्या जाणार्‍या संज्ञाही देशोदेशी बदलतात. फ्रान्समध्ये 'laicite' हा शब्द वापरला जातो, ज्यात सार्वजनिक जीवनात धर्माला एवढेच नव्हे तर धार्मिक चिन्हांना कोणतेही स्थान देण्यास अतिरेकी विरोध केला जातो. मात्र इंग्लिश खाडी ओलांडून ब्रिटनमध्ये गेलात तर तिथे मात्र धर्मस्वातंत्र्य असूनही राजा हाच अधिकृतपणे राज्ययंत्रणा आणि इंग्लिश चर्च, दोन्हीचा प्रमुख मानला जातो. भारताची तर्‍हा तर अजूनच निराळी आहे. भारत जरीस्वतःला अधिकृतपणे 'secular' म्हणवून घेत असला तरी उत्सव साजरे करण्याच्या पद्धतींपासून ते मंदिरांच्या कारभारावर सरकारी नियंत्रण ठेवण्यापर्यंत अनेक बाबतीत येथील सरकारी यंत्रणा सतत हस्तक्षेप करत असते. (फ्रेंचप्रमाणे इटालियनमध्येही 'laicita' हा शब्द वापरात आहे, 'secolarismo' नाही. इटालियन 'secolare'चा मूळ अर्थ तत्कालीन/temporal असाच आहे; पण हे फ्रेंच व इटालियन शब्द अपवित्र किंवा अनधिकृत या अर्थाच्या 'laikos (लाईकोस)’ या ग्रीक शब्दापासून आले आहेत.)
 
वरील सर्व बाबी लक्षात जरी घेतल्या तरी 'secularismच्या या सर्व प्रारूपांमध्ये मुख्यतः चार गोष्टींवर मतैक्य आढळते.
1. 'Secularism'ची एक मूल्य म्हणून वैश्विकता
2. राज्ययंत्रणा आणि धर्माचे विभाजन
3. स्वातंत्र्य.
4. समानता
यापैकी एकेका मुद्द्याचा आपण आता विचार करू.
 
1. वैश्विकता: आज असं गृहीत धरलं जातं की, आपण सर्व एका धर्मनिरपेक्ष आधुनिक काळात जगत आहोत  (secular modernity.) यापुढे असेही गृहीत धरले जाते की 'secularism' हे या काळाचे असे स्वयंसिद्ध (self-evident) मूल्य आहे ज्याकडे ध्येय म्हणून सर्व समाजांनी वाटचाल केली पाहिजे; पण या ध्येयाचे निश्चित स्वरूप कोणते याबाबत कोणतीही स्पष्टता जगभर आढळत नाही. हे ध्येय साध्य करण्यासाठी लोकांनी धर्मापासूनच लांब जाणे अपेक्षित आहे की धर्माला सार्वजनिक परिप्रेक्ष्यातून बाहेर ठेवणे अपेक्षित आहे? आधुनिक काळातील पहिले अधिकृत 'secular' राष्ट्र असलेल्या अमेरिकेतही नुकत्याच झडलेल्या गर्भपातावरीलचर्चेतून यावर एकमत किंवा स्पष्टता नाही हे स्पष्टपणे दिसून आले. अनेक वेळा असाही एक मतप्रवाह दिसून येतो की, एखाद्या पडद्याप्रमाणे व्यक्ती आणि समाजावरील धर्माचा प्रभाव तेवढा बाजूला केला, की जे उरतं ते म्हणजे 'secular' पण मुदलात ’धर्म म्हणजे काय?’ याबाबत जगभरात कोणतीही स्पष्टता अथवा एकवाक्यता दिसून येत नाही. 'Secularism' या शब्दाची उत्क्रांती जिथे झाली तो पाश्चिमात्य समाज मुळातच धार्मिकदृष्ट्या एकसंध होता. संस्कृती, श्रद्धा, धर्म इत्यादींबाबत या समाजात बर्‍यापैकी एकमत होते; पण ख्रिश्चानिटीच्या उदयाच्या हजारो वर्षे पूर्वीपासून भारत, चीन, कोलंबसपूर्व अमेरिका इत्यादी प्रदेशांतील धर्मसंकल्पनाही किती तरी विकसित होत्या. श्रद्धा, देव, अध्यात्म याबाबत तेथील दृष्टिकोन हा त्या-त्या ठिकाणच्या समाजरचनेचा पाया होता. पूर्वी आणि आजही धर्माला तेथील समाजाच्या दैनंदिन आयुष्यातून वेगळे करणे अशक्य होते आणि आहे, कारण हे द्वैतच मुळात गृहीत नाही. केवळ पंधराशे वर्षांच्या इतिहासात युरोपातील ख्रिश्चानिटीच्या मुशीतून तयार झालेली 'secularism' ची कल्पना ही या समाजांना समजून घेण्यास अत्यंत तोकडी, किंबहुना अनेकदा संदर्भहीन ठरते.
 
 
secularism
 
आजची परिस्थितीही अधिकच जटिल आहे. माहितीयुगात जगभरातील समाज घुसळून निघत आहेत, संस्कृती आणि परंपरांची देवाणघेवाण होत आहे. अशा वेळी या 'Christian Secularism'चा एक ’वैश्विक मूल्य’ म्हणून तोकडेपणा अधिकाधिक उघड होत आहे. नीट विचार केला तर असं लक्षात येतं की, या सर्व समस्येच्या मुळाशी पश्चिमेची धर्माबद्दल मध्ययुगात तयार झालेली चुकीची धारणा आहे. धर्म हा जणू मूळ मानवी स्वभावावर संस्कृतीने चढवलेला एक थर आहे आणि संत्र्याच्या सालीसारखा तो काढून टाकता येतो, अशी पाश्चात्त्य तत्त्वज्ञांची समजूत आहे. ते असेही गृहीत धरतात, की जसा (त्यांच्या मते) पाश्चात्त्य सभ्यतेने त्यांच्या समाजावरचा ख्रिश्चानिटीचा थर काढून टाकला आहे (!) तसे पौर्वात्य समाजाने आपापल्या धर्माच्या बाबतीत केले, की सर्व मानव जातीचा एकच गाभा शिल्लक उरेल. उदा. 'Hinduism' या ब्रिटिशांनी ठरवलेल्या चौकटीत प्रथम हिंदू धर्म बसवून मग फक्त त्याचा पडदा बाजूला सारला, की हिंदू समाज आपोआप सेक्युलर होईल. दुर्दैवाने पाश्चात्त्य मानसिकतेचा प्रभाव सर्वत्र असल्याने देशोदेशींच्या बुद्धिजीवी लोकांचीही हीच समजूत आहे. मात्र ही विचारपद्धती आणि ख्रिश्चानिटी याच मुळी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. इतर संस्कृती फक्त धर्मच नव्हे तर अनेक अन्य संकल्पनांवरही पूर्णतः वेगळ्या आणि तितक्याच जटिल दृष्टिकोनातून विचार करत आल्या आहेत आणि त्यातून त्यांची स्वतःप्रति ओळख तयार झाली आहे. एवढेच नव्हे तर पाश्चात्त्यांच्या या दृष्टिकोनातून असाही अर्थ निघतो की, संग्रहालयात पाहण्यासारख्या वस्तू, योग, कुंग-फूसारखे व्यायाम आणि काही एक्झॉटिक खाद्य प्रकार अशा निवडक गोष्टी वगळता पाश्चात्त्य समाजाला या संस्कृतींकडून घेण्यासारखे वेगळे काहीही नाही. बेल्जियममधील Ghent Universityतील प्रा. बालगंगाधर तर असे म्हणतात की, ख्रिश्चन धर्मप्रसार दोन मार्गांनी होतो- धर्मपरिवर्तन आणि धर्मनिरपेक्षीकरण (secularisation).Secularism चा या पद्धतीने विचार केल्यास त्यातून विविधता टिकून राहण्याऐवजी युरोपीय मानसिकता आणि ख्रिश्चानिटीवर आधारित monoculture तयार होण्याचा धोका आहे. मात्र इतिहासतज्ज्ञ आरनाल्दो मोमील्यानो एका लेखात दाखवतात त्याप्रमाणे अशीmonocultures ही समाजाच्या स्थिरतेसाठी धोकादायक असतात.
 
 
2. राज्ययंत्रणा आणि धर्माचे विभाजन: स्पष्टच सांगायचे तर हे एक मृगजळ आहे. येथेही मुदलात धर्म म्हणजे काय याबद्दलची अस्पष्टता महत्त्वाची ठरते. सांस्कृतिक वारशाचा भाग असलेल्या कोणत्या समजुतींना धार्मिक मानायचे, कोणत्या नाही हे ठरवणे कठीण आहे. वर म्हटल्याप्रमाणे पौर्वात्य समाजात धर्माला समाजरचनेपासून वेगळे करणे अशक्य आहे. आपण केरळातील शबरीमला प्रकरणात काय झाले हे एक उदाहरण म्हणून पाहू. या मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदी आहे आणि त्या बंदीमागील कारणे ही मुख्यतः सांस्कृतिक आहेत. स्त्री-पुरुष भेदभाव करण्याचा कोणताही हेतू त्यांच्यामागे नाही. जशी या मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदी आहे तशी पुरुषांना प्रवेशबंदी असलेलीही अनेक देवळे भारतात आहेत; पण 'Secularismच्या प्रभावाखाली या प्रकरणाला ’हिंदू धर्म स्त्री-पुरुषांत करत असलेला भेदभाव’ असे स्वरूप दिले गेले आणि स्थानिक जनतेच्या भावना न्यायालयानेही पायदळी तुडवल्या.
 
 
3. स्वातंत्र्य आणि समानता: युरोपीय देशांत हिजाबवरून झालेल्या चर्चा आणि गदारोळाचे उदाहरण घेऊ. इस्लामच्या सुरुवातीच्या काळात इस्लाम आणि ख्रिश्चानिटी एकाच प्रदेशात (लेवांट, अरेबिया इ.) संपर्कात आले. मध्ययुगात पूर्ण युरोपात आणि आजही पूर्व युरोपातील ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समाजात स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी किंवा चर्चमध्ये डोके झाकण्याची पद्धत आहे. मध्ययुगातील चित्रांमध्ये व्हर्जिन मेरीच्याही डोक्यावर असाच headscarf दिसतो. मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजात आलेली ही पद्धती मुळात स्थानिक सांस्कृतिक प्रथा होती. मात्र आज अनेक समाज एकत्र येतात तेव्हा हीच पद्धती काही धर्मांची स्वतःची ओळख सार्वजनिक ठिकाणी अधोरेखित करण्याचा प्रयत्न म्हणून वापरली जाते आणि इतरांकडून तशी पाहिली जाते. मात्र फ्रान्समध्ये हिजाबवरील बंदीच्या प्रकरणात दिसल्याप्रमाणे यात व्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहे, तसाच समानतेचाही आहे. कोणत्या धर्माच्या लोकांनी headscarf वापरलेला चालेल? किंवा ग्रेस केलीने 60च्या दशकात रूढ केले तसे एखाद्या प्रसिद्ध मॉडेलने headscarfes फॅशन म्हणून रूढ केले तर? कोणत्या प्रकारे डोके झाकणे धर्मापासून स्वतंत्र धरले जाईल?
 
 
इथे हेही लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या समाजातील कृती, आपापसातला व्यवहार यांच्या परिप्रेक्ष्यातच (जिथे एकाहून अधिक व्यक्तींचा आपापसात संबंध येतो) त्या स्तरावरच राज्य, धर्म, त्यांचे विभाजन, स्वातंत्र्य, समता इत्यादी संकल्पनांना अर्थ लाभतो.एका व्यक्तीच्या स्तरावर नाही. जेव्हा समाजाच्या नैसर्गिक रचनेशी असलेला या संज्ञांचा संबंध तुटतो तेव्हा अनर्थ ओढवतो. इटालियन लेखक रोबेर्तो कालास्सो यांनी वैयक्तिक स्तरावर या संकल्पनेच्या अतिरेकाने होणार्‍या परिणामांसाठी 'Homo Saecularis' असा शब्द वापरला आहे. म्हणजे अशी व्यक्ती जी निधर्मी होण्याच्या नादात स्वतःच्या सांस्कृतिक मुळांपासूनच तुटली आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे सतत बदलणार्‍या आजच्या जगात अशी व्यक्ती आपले स्वत्वच गमावून बसते. अशी व्यक्ती एक कायद्याच्या मर्यादा सोडल्या तर आपण कुणाचेच कसलेच देणे लागत नाही असे गृहीत धरते आणि परिणामी हजारो वर्षे संस्कृतीच्या पायावर तयार झालेली सामाजिक बांधिलकी विसरते, बेबंद वागायला मोकळी असते. परिणामी स्वातंत्र्य असूनही ती आतून सतत असमाधानी असते.
 
 
'Secularism'ला सरसकट वाईट असं म्हणण्याचा या लेखामागचा हेतू नाही; पण शब्द हे जपून वापरायचे असतात. विशेषतः आपण जेव्हा यासारखा महत्त्वाचा शब्द वापरतो तेव्हा नक्की काय अर्थाने तो वापरत असतो? त्या शब्दाची व्युत्पत्ती काय? त्यामागचा इतिहास काय? त्या संकल्पनेला असलेले अनेक पैलू कोणते? याची थोडक्यात ओळख करून देणे व याचे भान बाळगणे किती आवश्यक आहे आणि याचे किती दूरगामी परिणाम असतात, हे दाखवणे हा या लेखाचा हेतू आहे. देवधर्माविषयी विविध मतं असणारच. किंबहुना ती नसण्यातच धोका आहे; पण या मुद्द्यांचा विसर पडला तर मतमतांतराच्या गलबल्यात आपल्या सर्वांना सामाजिक ओळख देणार्‍या, निराधार होऊ न देणार्‍या संस्कृतीला धक्के पोहोचू शकतात.
 
 
सध्या दिवाळीचे दिवस आहेत आणि आपल्या मतांपलीकडे संस्कृतीशी असलेली आपल्या बांधिलकीची आठवण करून द्यायला सणांसारखी दुसरी वेळ नसावी. त्यामुळे इतिहासाची अधिक चांगली ओळख करून घेऊ या, शब्द जपून वापरू या आणि या अस्सल भारतीय सणाच्या निमित्ताने आपली संस्कृती आणि ओळख आणखी हजारो वर्षे जपू या. शुभेच्छा!