गेल्या काही वर्षांत आर्टिफिशियल इंटलिजन्स, चॅट जीपीटी हे परवलीचे शब्द झाले असले, तरी तत्पूर्वीच मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगसारख्या तंत्रांचा वापर करत स्टेलार कन्सल्टिंगमधील किती तरी प्रोजेक्ट्समधील कामं तिच्या टीमनं स्वयंचलित केली होती. गुणी, कष्टाळू, महत्त्वाकांक्षी परोमा नवीन ऑफिसमध्ये आपली अशी एक ओळख निर्माण करण्यात लवकरच यशस्वी झाली होती खरी; पण त्याबरोबरच तिच्याभोवती काही हितशत्रूही निर्माण होऊ लागले होते. असूया, स्पर्धा हे प्रकार बरोबरीच्या सहकार्यांत अपेक्षित असतात; पण शँक सोमणसारखा सुपरवायजरही आजकाल तिला शक्यतो कुठली संधी न मिळेलसं पाहात होता. कोती मनोवृत्ती आणि आक्रमक स्वभाव यामुळे त्याला तिची चमकदार हुशारी डोईजड होऊ लागली होती बहुतेक!
सव्वाआठ वाजता परोमा नाथ एलव्हेटरची वाट न पाहाता पाचव्या मजल्यावरून जिन्याच्या पायर्या तडातड उतरत पार्किंग लॉटमध्ये पोहोचली. 9 वाजताच्या मीटिंगला पोहोचू का आपण वेळेत? शँक आधीच तिरसटासारखा वागतोय! शँक सोमण तिचा स्टेलार कन्सल्टिंगमधला सुपरवायजर. आजकाल काही तरी बिनसल्यासारखा सततच चिडलेला असायचा. परोमा सीनियर सायन्टिस्ट होती; संशोधन क्षेत्रात जवळजवळ दहा वर्षं अनुभव असलेली. जर्मनीमधून मास्टर्स केल्यानंतर स्टेलार कन्सल्टिंगच्या तिथल्या शाखेत निवड झाली होती. चार वर्षांपूर्वी तिथे भेटलेल्या तरुण शर्माशी विवाहबद्ध झाल्यानंतर दोघांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. परोमा स्टेलारच्याच पुण्यातील ऑफिसमध्ये रुजू झाली होती; तरुणनं मात्र कंपनी बदलली होती.
गेल्या काही वर्षांत आर्टिफिशियल इंटलिजन्स, चॅट जीपीटी हे परवलीचे शब्द झाले असले, तरी तत्पूर्वीच मशीन लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगसारख्या तंत्रांचा वापर करत स्टेलार कन्सल्टिंगमधील किती तरी प्रोजेक्ट्समधील कामं तिच्या टीमनं स्वयंचलित केली होती. गुणी, कष्टाळू, महत्त्वाकांक्षी परोमा नवीन ऑफिसमध्ये आपली अशी एक ओळख निर्माण करण्यात लवकरच यशस्वी झाली होती खरी; पण त्याबरोबरच तिच्याभोवती काही हितशत्रूही निर्माण होऊ लागले होते. असूया, स्पर्धा हे प्रकार बरोबरीच्या सहकार्यांत अपेक्षित असतात; पण शँक सोमणसारखा सुपरवायजरही आजकाल तिला शक्यतो कुठली संधी न मिळेलसं पाहात होता. कोती मनोवृत्ती आणि आणि आक्रमक स्वभाव यामुळे त्याला तिची चमकदार हुशारी डोईजड होऊ लागली होती बहुतेक!
आजची मीटिंगची ई-मेलसुद्धा काल रात्री साडेनऊला आली होती! तुझं नाव चुकून वगळलं गेलं! म्हणून पश्चातबुद्धीनं, नाइलाजानं पाठवलेली वाटली. सकाळी छोट्या ध्रुवला शाळेत सोडायचं कबूल केलेलं असूनही ते काम तिला आता त्याच्या बाबावर, म्हणजे तरुणवर सोपवावं लागलं होतं. स्कूल बसमधून जायला तो हल्ली कुरकुर करत असे. ते का याचाही छडा लावायचा होता; पण वेळच होत नव्हता शाळेत जाऊन काही विचारायला. त्याचा नाराज झालेला चेहरा डोळ्यासमोर येऊन तिला सारखं उदास वाटत होतं; पण उशीर झाला असता तर शँकला पुन्हा काही तरी तिरकस बोलायची संधी मिळाली असती. कारची हॉब की दाबत ती आत शिरणार तोच तरुण तिच्यामागे धावत आला. “लंच! विसरली होतीस! तो सोमण काय उपाशी राहायच्या लायकीचा आहे?” ती मनापासून हसत म्हणाली, “तुझ्या शब्दभंडारातल्या सगळ्या खास शिव्या शँकसाठीच निर्माण झाल्यायत तरुण! एकदम चपखल बसतात त्याला! शँक कसला आलाय तो गावठी? सोमण्या बोलो उसको! नाही तर मी मघा म्हणालो तोच शब्द त्याचं नाव म्हणून वापरलास तरी हरकत नाही! शोभतो त्याला!” त्याचा तो जोरदार शाब्दिक हल्ला आणि आपल्याला असलेला भक्कम आधार पाहून सुखावत, त्याला हलकंसं आलिंगन देऊन ती कारमध्ये बसली. “नंतर फोन करते रे!” ती म्हणाली. ‘बाय‘! करत तरुण घरी निघून गेला. हा सगळं हसत निभावून नेतो, म्हणून सोपं जातं मला... टिपिकल नवरा असता तर काय केलं असतं मी... परोमा वेग पकडत स्वतःशीच विचार करत होती. ध्रुवला संध्याकाळी कुठं तरी घेऊन बाहेर जाता येईल का... की आजही उशीरच होईल आपल्याला...
ऑफिसमध्ये पोहोचताच स्वतःच्या डेस्ककडे न जाता ती मीटिंगसाठी थेट कॉन्फरन्स रूमकडेच गेली. आयकार्ड स्वाइप करून आत शिरल्यावर समोरच शँक बसलेला दिसला. डोक्याच्या मागे हात बांधून, पाय पसरून बसलेला. उर्मटपणा देहबोलीतून उतू जातो याच्या. आजूबाजूला कुणीच नव्हतं. हा मेलमध्ये तर तुला चुकून वगळलं म्हणाला होता. म्हणजे मीटिंगला इतर लोकही असायला हवेत. 9 वाजले होते. कुठे गेले सगळे? ती संभ्रमात असतानाच तिला बसायची खूण करत सोमण म्हणाला, “बस! तुझ्याशीच बोलायचंय! तुला उगाच टेन्शन नको म्हणून मेलमध्ये मी काही उल्लेख नाही केला; पण पीडीपी डिसकस् करायचा होता.” “पीडीपी? म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅन. कुणासाठी?” ती एकदम बोलून गेली, कारण पीडीपी म्हणजे वैयक्तिक विकास आराखडा. ज्यांचा वर्षभरातला परफॉर्मन्स अगदी टुकार त्यांच्यासाठीचा शेवटचा उपाय! खरं तर रीतसर बाहेरचा रस्ता दाखवायच्या आधीचा सोपस्कार... तिच्या टीममधलं अशी वेळ येईल असं कुणीच डोळ्यासमोर येत नव्हतं.
“तुझ्यासाठीच!” सोमण तिच्याकडे रोखून पाहात म्हणाला. “काय? माझ्यासाठी पीडीपी? वर्षभरात किती प्रशंसेच्या मेल्स आल्यायत कस्टमर्सकडून! आम्ही डेव्हलप केलेलं प्रॉडक्ट ‘रॉकिंग’ आहे! या शब्दांत परवाच तर फर्स्ट सर्व्ह बँकेची मेल आली होती!”
“इतकी तापटपणे बोलली नाहीस तर बरं होईल, नाही का? तुझ्याएवढ्या सीनियरकडून थेट रेव्हेन्यू अपेक्षित आहे! सॉफ्टवेअर डेव्हलप लहान मंडळी करतात. नाही का?”
परोमा गोंधळून जात म्हणाली, “पण माझ्या वार्षिक गोल्समध्ये मला आर्थिक लक्ष्य काही दिलेलं नाहीसच तू. आत्तापर्यंत एकदाही हे चर्चेत नाही आलं आणि सॉफ्टवेअर डेव्हलप टीमनं केलं तरी मूळ कल्पना माझीच ना? डिझाईन? गाईडन्स? कोड रिव्ह्यूज्?”
“ओहो परोमा! ज्युनियर लोकांना श्रेय द्यावं ग! आणि तू काय काय करायचंस हे मी अगदी लिहून देणं अपेक्षित आहे? You have to be proactive! शँक नीचपणे हसत म्हणाला. परोमा म्हणाली, “हो, पण स्वतःहून किती तरी जबाबदार्या घेतल्यायत मी! ते 'WriteRight' प्रॉडक्ट? शाळेत लिखाणात मागे पडणार्या मुलांसाठी केलेलं? कॉम्प्युटरवर किंवा मोबाइलवर मुलं टाइप करू लागले की आपोआप मुद्दे सुचवले जातात. स्वतः विचार करायला प्रेरणा मिळेल, अशा सूचना दिल्या जातात... त्यासाठी तर सगळ्या जगभरातल्या ब्रँचेसमधून आपली निवड झाली! स्वतः चेअरमननं उल्लेख केला परवा प्रेस कॉन्फरन्समध्ये!”
“तुला कळत नाहीये परोमा. ते सामाजिक जबाबदारी वगैरे बोलायच्या गोष्टी म्हणून ठीकच आहे! पण पैसा! तो दिसायला हवा. प्रॉडक्ट्स विकली गेली पाहिजेत! तू थेट सहभागी व्हायला हवं सेल्समध्ये, फ्रंटलाइनवर!” शँक न बधता म्हणाला. “पण परवा मी कस्टमर प्रेझेंटेशन तयार केलं होतं, तू तर मला ते स्वतः करायला मनाई केलीस! ते एलीनानं केलं; पण मीच तर विचार करून सगळी मांडणी केली होती!” परोमा बचावात जातेय हे पाहून आणखीनच आगाऊपणे शँक म्हणाला, “एक तर एलीना ईस्ट युरोपीयन मुलींसारखी दिसते, त्यामुळे बाहेरच्या देशातल्या कस्टमर्ससाठी तिचा चेहरा बरोबर आहे. दुसरं म्हणजे ती वेळ देते जास्त. प्रवास करायला नेहमी तयार असते आणि महत्त्वाचं म्हणजे तू अशी तुलना करणं चूक आहे!”
“नसलेले गोल्स अॅप्रेझलच्या फक्त तीन महिने आधी सांगून लगेच पीडीपी देणं हे मला बरोबर वाटत नाही!” परोमा शांतपणे म्हणाली. शँक त्यावर छद्मी हसत म्हणाला, “कंपनीचे गोल्स बदलू शकतात, कामाचं स्वरूप बदलू शकतं, हे दहा वर्षं अनुभव असलेल्या तुला माहीत नसेल तर... आणि तीन महिने म्हणजे अख्खा एक क्वार्टर आहे. आपले रिझल्ट्स दर तीन महिन्यांनी जाहीर केले जातात हे तरी माहीत आहे ना? टार्गेट्स बदलली आहेत असं समज!” वाद चिघळत चालला होता. शँकला त्यात मजा येत होती, हे पाहून परोमा म्हणाली, “ठीक आहे. विचार करते.” तिच्यासमोर मीटिंग रेकॉर्डचा कागद सरकवत तो म्हणाला, “सही कर प्लीज; मीटिंगला उपस्थित असल्याची. नवीन नियम. प्रोटोकॉल! नंतर तक्रारी येतात लोकांच्या. आम्हाला काही वॉर्निंग दिली नाही म्हणून!” सही करून ती खुर्चीतून उठत असताना शँक तर्जनी हलवत म्हणाला, “तीन महिने आहेत! काही बदल झाला नाही तर पीडीपी असणार हे लक्षात ठेव!”
दार ढकलून बाहेर पडताना तिची कानशिलं गरम झाली होती. डोळ्यांत जमू पाहाणारे अश्रू कुणाला दिसू नयेत म्हणून ती तडक वॉशरूममध्ये गेली. तिथं फ्रेनी बलसारा हँड ड्रायरपाशी होती.एचआरमधली एकमेव अक्कल असलेली बाई. बाकीच्या चमच्यांना बुद्धी नावाचा प्रकार वाट्यास आला नव्हता, हे परोमाचं स्पष्ट मत होतं. परोमाला भराभर तोंडावर पाण्याचे हबके मारताना फ्रेनी म्हणाली, “काय झालं? सगळं ठीक?” परोमानं नुसतीच मान हलवली; पण फ्रेनीला निघताना पाहून तिला पुन्हा मागे बोलावत ती म्हणाली, “शँक खूप त्रास देतोय! मला पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅन देणार म्हणे! किती तरी सर्टिफिकेट्स आणि प्रशंसेच्या मेल्स याला गेल्यायत खरं तर! बहुतेक मला नोकरी सोडावीच लागेल. सहन नाहीये होत!” फ्रेनी म्हणाली, “रीतसर माझ्याशी मीटिंग रिक्वेस्ट कर आणि सगळं नीट रेकॉर्डवर जाऊ दे. त्याला जसे अधिकार आहेत तसे तुलाही आहेत परोमा आणि इथे नको बोलूस!” तितक्यात एका बाथरूमचं दार उघडून एलीना बाहेर आली. आपलं बोलणं हिनं ऐकलं की काय, अशी धास्ती वाटून परोमा काही न झाल्यासारखी हसत तिला ‘हाय!’ म्हणत बाहेर पडली. मी मूर्खच आहे! ही थेट शँककडे जाईल आता चुगली करायला! किती वेळ यांच्या गप्पा चालू असतात. लंच एकत्र. प्रवासही... तितक्यात तिला मागून हाकारत एलीना म्हणाली, “परोमा, उद्या भूषण गणेशन् येतोय आपल्या ब्रँचमध्ये? माहीत आहे?” भूषण म्हणजे युनिट हेड. शँकचा बॉस. हिला सगळं माहीत असतं... परोमाला त्याच्या भेटीबद्दल माहीत नसल्याचं लक्षात येऊन एलीना म्हणाली, “ओ! मग लंचला नाहीयेस का तू उद्याच्या? शँकचं इनव्हाइट नाही आलं?” परोमानं नकारार्थी मान हलवली. एलीना म्हणाली, “तुझ्या आणखी काही स्लाइड्स असतील तर दे मला. मी रिपोर्ट प्रेझेंट करणार आहे सकाळी.” म्हणजे काम आम्ही करायचं आणि चेहरा हिचा. गणेशन् तर भारतीयच होता, तरी ईस्ट युरोपियन लुक्सच लागतात का? या विचारानं किंचित कडवट हसत ती म्हणाली, “करते मेल!” आपल्या केबिनमध्ये येऊन जरा शांत बसल्यावर तिला काही उपाय सुचू लागले. लॅपटॉप उघडून तिनं आपल्याला उपलब्ध पर्यायांची यादी करायला घेतली.
तक्रार करणे...
नोकरी सोडून देणे...
समझोता करू पहाणे...
सगळेच पर्याय अवघड होते. तिच्या डेस्कफोनची रिंग वाजली. पलीकडे फ्रेनी होती. “परोमा, शँकनं तुझं नाव पीडीपीच्या लिस्टमध्ये ऑफिशियली दिलंय! आता मी तुला समज देणं हेही ऑफिशियली होऊ शकतं. तू ये माझ्या डेस्कवर. आपण बोलू.” परोमा घाबरून म्हणाली, “अगं! तीन महिने आहेत म्हणाला होता!” “हो आहेतच! पण लिस्ट आमच्याकडे आधी येते. शक्यतो बॉस म्हणतो तेच करतो आम्ही; पण काही अपवादांबाबतीत एचआर हस्तक्षेप करून पीडीपीपूर्वी समुपदेशन करू शकतं. तुझं कंपनीमधलं ट्रॅक रेकॉर्ड उत्तम आहे. त्यामुळे हे मी करू शकते.” परोमा लगेचच उठून फ्रेनीकडे गेली. तिला बसायला सांगून पाण्याचा ग्लास तिला देत फ्रेनीनं म्हटलं, “आता नीट सांग. तुला फायनान्शियलटार्गेट्स कधी दिली?’
“अगं, आज पहिल्यांदा ऐकलं मी त्याबद्दल.” लॅपटॉपवर तिची गोल्सशीट उघडत फ्रेनी म्हणाली, “यात तर दिसतायत! थांब! हा गेल्या आठवड्यातला अपडेट् केलाय त्यानं. त्याआधी तुझ्याशी तो बोलला का?” परोमा म्हणाली, “तेच सांगतीये अगं, आज त्यानं धक्काच दिला!” त्यावर फ्रेनी म्हणाली, “असू दे. तू आपल्याचर्चेचा उल्लेख करून मला तुझ्या कामाच्या प्रशंसेसंबंधीच्या मेल्स, बक्षिसं, अजून काही रेकॉर्ड असेल ते सगळं पाठव. स्वतः शँकनं कधी कौतुक केलं असेल तर तेही पाठव. मग मी रीबटल् म्हणजे प्रत्युत्तराची केस तयार करू शकते!” परोमाकडे असा प्रशंसेचा साठा खूप होता. सगळं एकत्रित करून पाठवणं अवघड नव्हतं; पण हे करायची वेळ आपल्यावर यावी हे तिला अपमानास्पद वाटत होतं. फ्रेनीचे आभार मानत ती उठते तोच तरुणचा फोन आला. त्याला थोडक्यात सगळं सांगत ती स्वतःच्या केबिनकडे चालली होती, तितक्यात रीसोर्स पूल ग्रुपचा हेड हरीश विणकर शँकच्या केबिनमधून जोरात दार ढकलून बाहेर पडला. त्याचा चेहरा संतापानं लाल झाला होता आणि शर्ट घामानं थबथबून अंगाला चिकटला होता. काय झालं याला? किती चिडलाय! हार्ट अटॅक यायचा अशानं! एक अटॅक येऊन गेलाय आधीच... हरीश टक्कल पुसत थांबून पुन्हा शँकच्या केबिनकडे चवताळून जात सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात ओरडला, ‘सगळ्यांना घेऊन बुडेन मी! सांगून ठेवतो! गमजा नकोयत. ओळखतो मी चांगलं सगळ्यांना!’ हे काही तरी विचित्र चाललंय हे आजूबाजूच्या क्यूबिकल्समधील ज्युनियर प्रजेलाही कळत होतं. ते सगळे माना खाली घालून कामात असल्यासारखे दाखवत कान टवकारून ऐकत होते. हा तमाशा चालला असताना इथं थांबायला नकोच, असा विचार करून परोमानं चालण्याचा वेग वाढवला आणि ती जागेवर जाऊन फ्रेनीनं सांगितलेल्या मेलची जुळवाजुळव करू लागली.
ती मेल पाठवून झाल्यावर तिच्या लक्षात आलं, गेल्या आठवड्यात तिनं रीसोर्स पूलकडून काही लोक टीमसाठी मिळावेत म्हणून अर्ज केला होता. आज त्याबद्दल चौकशी करायची राहून गेली होती. आपलीच नोकरी धोक्यात असेल तर कसली टीम आणि कसलं काय... तरीही इथे आहोत तोवर काम तर नेटानं केलंच पाहिजे! रीसोर्स पूलच्या हरीशला फोन करणार तोच तिच्या लक्षात मघाचा प्रसंग आला. हरीश तर सगळ्यांना घेऊन बुडायला गेलाय! त्याला काय विचारणार? इतक्या तणावात असतानाही हरीश विणकरचे आक्रस्ताळे हावभाव आठवून तिला हसू आलं. त्याच्याच विभागातील नेहाला नवीन भरतीबद्दल विचारावं म्हणून तिला फोन केल्यावर नेहा म्हणाली, “अरे! कुछ मत पूछो! एक भी अच्छा बंदा नही मिला! तुला हवेत ते स्किल्स असणारं कुणी नाही मिळालं अजून.” परोमा म्हणाली, “आपण सध्या हायरिंग थांबवलंय का?” त्यावर नेहा म्हणाली, “इधर आ सकती हो? कुछ बताऊँगी!”
तिच्याकडे गेल्यावर परोमाला बरंच काही कळलं. सध्या लोकांना घरून काम करायची सवलत नसेल तर ते दुसरे पर्याय शोधतात. हायब्रिड मॉडेल, म्हणजे आठवड्यातून दोन-तीन दिवस ऑफिसमध्ये येणं ठीक; पण पाचही दिवस यायला नवीन मंडळी तयार नसतात... हे सगळं झाल्यावर म्हणाली, “आमच्या बॉसनं फ्रॉड केलाय काही तरी. शँकबरोबर जोरात भांडण झालं बहुतेक. परोमाला हे गॉसिप ऐकणं योग्य वाटेना; पण उत्सुकता होतीच. ती म्हणाली, “पाहिलं मघा त्याला बाहेर पडताना!” नेहा म्हणाली, “काही तरी हायर टियर असा उल्लेख ऐकला मी... जोरजोरात ओरडत होते...” तिला मध्येच तोडत परोमा म्हणाली, “तेवढं टीम द्यायचं लक्षात ठेव. चार जण सोडून गेले. कामं कशी होणार? इंटरव्ह्यू तरी घडवून आण. अडचणी असतात, हे मान्यच; पण मी रेझ्यूमे शोधून देईन हवं तर!” नेहानं मान डोलावली तरी ती कितपत मदत करेल याची परोमाला खात्री नव्हती. तो सगळा विभागच आराम करणारा कामचुकार वाटायचा तिला.
ऑफिसमधला दिवस एकदाचा संपवून ती घरी आली तेव्हा ध्रुव आणि तरुण एकदम ’तैयार’ होऊन बसले होते. “अरे, कुठं चाललात दोघं? तरुण, आज आधीच आलास माझ्या!” परोमा जरा रिलॅक्स होत म्हणाली. “आम्ही दोघंच नाही, आपण चाललोय. मला आज शोभना म्हणत होती, तिच्या घरापासून जवळ एक ढळशप नावाचं नवीन रेस्तराँ उघडलंय...” त्याला अडवत परोमा म्हणाली, “अरे, आज? कुणाबरोबर डिनर वगैरे मूड नाही रे!” त्यावर तरुण म्हणाला, “हे नुसतं डिनर नाहीये. तू खूप निराश झालेली वाटलीस फोनवर. मग मी शोभनाला तुझ्या शिक्षण आणि अनुभवाबद्दल सगळी माहिती दिली आणि तू कदाचित नोकरी बदलायचा विचार करतीयस, असंही सांगितलं. काही कमिट नाही केलं. फक्त अंदाज घ्यायचा होता. तिला ’जनरेटिव्ह ए आय’ वापरून नवीन प्रॉडक्ट लाँच करण्यासाठी बजेट मिळालंय. सोमण्या फार माजला असेल आणि तू कंपनीलाच कंटाळली असशील तर तुझा CV पाठवू शकतेस तू. आत्ता जरा अनौपचारिक ओळख होईल. तिनंच सुचवलं. मलाही वाटलं तुझ्याकडे उत्तम पर्याय असेल तर तू त्याला त्याची जागा दाखवू शकतेस. मनावर दडपण नको.” हे ऐकताना आनंदून जाऊन त्याला आणि ध्रुवला एकदम जवळ घेत परोमा म्हणाली, “चला मग! मज्जा करू या आपण ध्रुव!“ “मी स्वीट अॅन्ड सॉर चिकन घेणार!” ध्रुव म्हणाला. त्याला तेवढंच आवडायचं कुठेही गेलं तरी! नेहमी तीच ऑर्डर!
कारमध्ये बसल्याबसल्या पावसाची ही मोठी सर आली आणि रस्त्यावरचे दिवे गेले. पुण्यात ट्रॅफिक जॅम व्हायला इतकं निमित्त पुरेसं होतं. इंचइंच लढवत बराच वेळ गेला आणि शेवटी बाणेरच्या त्या रेस्तराँजवळ पोहोचल्याचा संकेत गूगल मॅपनं दिला. छत्री उघडून बाहेर येत परोमा आजूबाजूला पाहू लागली; पण काळोख असल्याने तिला पटकन कुठली निऑन साइन किंवा पाटी दिसेना. तिच्यामागून बाहेर पडलेल्या ध्रुवला थांबवत ती तरुणला म्हणाली, “फोन करायचा का त्या रेस्तराँला? नाही तर शोभनाला विचारतोस?“ ध्रुव तितक्यात म्हणाला, “मम्मा, त्या रेस्ट्राँचं स्पेलिंग?” “थांब रे जरा! भिजशील! T I E N. टीएन.” एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्ससारख्या इमारतीत आत निर्देश करत ध्रुव म्हणाला, “ते बघ! तिथं लिहिलंय! T I E...” परोमानं त्याच्या बोटाच्या दिशेनं पाहिलं तर खरंच एका पांढर्या बोर्डवर निळ्या अक्षरांत तसं काही तरी लिहिलेलं दिसत होतं; पण जवळ जाऊन पाहिल्यावर ते ’Tien’ रेस्तराँ नसून ’Hire Tier’ या रिक्रूटिंग कंपनीचं ऑफिस असल्याचं लक्षात आलं. असं एखाद्या फ्लॅटमधलं तात्पुरतं थाटलेलं ऑफिस म्हणजे जरा यथातथाच असणार कारभार... हे ’हायर टीयर’ नाव कुठं ऐकलंय आपण... तिला काही आठवायच्या आत तरुणचा फोन वाजला. “अगं, कळलं मला कुठंय ते टीएन. डाव्या गल्लीत वळावं लागेल. या तुम्ही पटकन्!” धावत सुटलेल्या ध्रुवला दटावत कारमध्ये बसवेपर्यंत पावसाचा जोर वाढला होता. काही क्षणातच ते ’टीएन’जवळ पोहोचले. शोभना आणि तिचा नवरा आणि मुलगी आधीच तिथे आले होते. “आमचा मॅप जरा गंडला!” तरुण म्हणाला. शोभना त्याची सीनियर होती. प्रसन्न चेहर्याची, सावळी, तरतरीत शोभना तरुणच्या कंपनीतील एक उत्तम लीडर म्हणून ओळखली जायची. तरुणनं परोमाची ओळख करून देताच तिच्याशी शेकहँड करत शोभानं मोकळेपणानं गप्पा सुरू केल्या.
जसजसा वेळ गेला तसतसं हास्यविनोद, गप्पा यामुळे दिवसभराच्या ताणाचं मळभ मनातून हळूहळू दूर होत गेलं. शोभनानं तिला एक-दोन चांगल्या लीडरशिप रोल्सबद्दल माहिती दिली. आपल्याला स्टेलार कन्सल्टिंगशिवाय इतरत्रही संधी उपलब्ध असू शकतील हे साधारण माहीत असलं तरी तिनं तसे प्रयत्न केले नव्हते; पण आता शोभनाशी बोलताना आपण शँक सोमणला भीक घालायची गरज नाही हे नीटच अधोरेखित होत होतं.
घरी परतताना मघाच्या त्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सजवळ कार येताच तिला एकदम आठवलं, ’हायर टीयर’चा उल्लेख आज रीसोर्स पूलच्या नेहानं केला होता. हरीश विणकर शँकशी भांडत असताना त्याबद्दल काही तरी ओरडला होता, हे नेहानं सांगितलेलं गॉसिप तिला लख्ख आठवलं. ही नक्की काय भानगड आहे? या असल्या फुटकळ कंपनीचा आणि स्टेलार कन्सल्टिंगसारख्या मल्टिनॅशनलमधील मॅनेजर्सचा काय संबंध? विणकर नक्की काय म्हणत होता? नेहाचं गॉसिप जरा नीट ऐकायला हवं होतं! असं तिला वाटत राहिलं.
दुसर्या दिवशी शनिवार होता. शँकचा चेहरा बघावा लागणार नाही, या आनंदात तिला पहाटे जाग आली. आज घरी व्यायाम करण्याऐवजी जवळच्या पार्कमध्ये जॉगिंग करायचं ठरवून ती सगळा जामानिमा करून बाहेर पडली. शेवटची राऊंड घेताना समोर तिला प्रतीक शेलार दिसला. तिच्या आधीच्या टीममध्ये एकदम चमकदार कामगिरी करून तो गेल्या वर्षी दुसर्या कंपनीत रुजू झाला होता. तो आपल्या टीममध्ये आता नसणार म्हणून तेव्हा वैताग आला तरी दोघांना एकमेकांबद्दल आदर आणि आपुलकी होतीच. त्यामुळे दोघे संपर्कात होते. त्याला पाहून परोमा एकदम आनंदून गेली. “कसा आहेस प्रतीक?” “बस, मजेत आहे मॅम!” प्रतीक म्हणाला. दोघे जवळच्या बेंचवर काही क्षण विसावले. प्रतीक आता आकांक्षा गुप्ता या त्याच्या बालमैत्रिणीशी लग्न करणार होता. आंतरजातीय विवाह म्हटल्यावर जो विरोध होतो तो तिच्या घरून जास्त प्रखर होता; पण दोघे तसे खंबीर होते. त्यांना शुभेच्छा देऊन आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारून कधी तरी भेटू म्हणत ती घरी परतली.
ब्रेकफास्ट करून तरुण आणि ध्रुव सोफ्यावर टीव्हीसमोर लोळत होते. दुपारी परोमानं तिच्या जर्मनीतल्या मॅनेजरला फोन करून त्याला लिन्कइनवर टेस्टिमोनियल द्यायची विनंती केली. ती आनंदानं मान्य करत त्यानंही शँकची निर्भर्त्सना केली. एकूणच शँकनं केलेला अपमान आता हळूहळू विरत चालला होता. अगदीच वेळ आली तर कंपनी बदलणंही शक्य होतं. वीकएन्ड शांततेत, आळसात जायची चिन्हं दिसत होती. तितक्यात तिला व्हॉॅट्सअॅपवर नीलिमाचा, बिल्डिंगमधल्याच एका शेजारणीचा मेसेज दिसला. तिनं तिच्या भाच्यासाठी स्टेलार कन्सल्टिंगची ऑफर असल्याचा उल्लेख केला होता आणि परोमाला त्याला काही मदत लागली तर तुझा नंबर देऊ का? अशी विचारणा केली. त्यावर एक अंगठा उमटवणार तोच तिचा आणखी एक मेसेज येऊन पडला, तो हायर टीयरमधून गेला इंटरव्ह्यूसाठी. आधी त्यानं तुमच्या एचआरला रेझ्यूमे पाठवला तर काहीच रिस्पॉन्स नाही मिळाला; पण आता झालं त्याचं काम! पुन्हा हायर टीयर! कोणती संस्था ही? आणि स्टेलार कन्सल्टिंग फक्त कॅम्पसवरून निवड झालेल्यांनाच ऑफर द्यायचे पूर्वी! हे काय नवीन? इथे आम्हाला टीम मिळत नाहीये... आणि रिक्रूट तर करतायत... तिनं नीलिमाला त्याचं नाव, फोन विचारत म्हटलं, “त्याचा रेझ्यूमे पाठवायला सांग. मलाही लोक हवे आहेत. आवश्यक स्किल्स असतील तर माझ्याबरोबरच काम करेल.” नीलिमानं तिचे आभार मानले आणि भाच्याला निरोप देईन म्हणून संभाषण संपवलं.
सोमवारी ऑफिसमध्ये जाताच मेलमध्ये परोमाला एचआरकडे पीडीपीसंदर्भात अपील दाखल झाल्याची सूचना दिसली. चला, लढाई पूर्ण झाली नसली तरी रणशिंग फुंकलं गेलं होतं, प्रक्रिया तर सुरू झाली होती! फ्रेनीला धन्यवाद देणारं उत्तर लिहून बाकीच्या मेल्स पाहाताना तिला नीलिमाच्या भाच्याचा रेझ्यूमे मिळाला. बी.एस्सी.चं शिक्षण अगदी साध्या महाविद्यालयातून पूर्ण झालं होतं. मार्क्स ठीक होते. आपण इथले या कॉलेजमधले विद्यार्थी कधीपासून घेऊ लागलो? ती अचंबा करू लागली. रीसोर्स पूलमध्ये कुणाला माहीत असेल? नेहापेक्षा तो सचिन लढ्ढा प्रगल्भ वाटतो. त्याच्याकडे जाऊन त्याला मोबाइलवर मेलमधला तो रेझ्यूमे दाखवून चौकशी केली असता तो म्हणाला, “आपण बीपीओसाठी जरा कमी स्तरातलं शिक्षण असलं तरी घेतो ना! तसं असेल.” “मग ती ’हायर टीयर’ कंपनी आहे, तिथे आऊटसोर्स करता का तुम्ही?” परोमानं विचारलं. सचिन एकदम चपापत म्हणाला, “मला नाही काही माहीत ते. ते हरीश सरांना माहीत असेल!” तिथून निघून जाताना परोमानं मागे वळून पाहिलं, तर सचिन आणि नेहामध्ये काही तरी ’नजरों के इशारे!’ चालले होते. परोमा बाहेर पडल्यावर सचिन नेहाला म्हणाला, “ये मरवाएगी!” नेहा घाबरून म्हणाली, “मी चुकून बोलून गेले!”
“और गॉसिप करो!” सचिन वैतागला होता.
परोमानं केबिनमध्ये गेल्यावर थेट नीलिमाच्या भाच्याला फोन लावला आणि त्याला इंटरव्ह्यू कुणी घेतला याबद्दल विचारलं. “मॅडम, प्रॉब्लेम आहे काही?” तो बिचारा घाबरत म्हणाला. “नाही, तुला काहीच प्रॉब्लेम नाही; पण इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला थोडा वेळ इकडचे तिकडचे प्रश्न विचारतात, स्वतःची ओळख करून देतात काही जण. तसं केलं होतं का?” तिनं विचारलं. “हां! ते लक्षात आहेत, कारण मी ‘हायर टीयर’मध्ये गेलो होतो; पण इंटरव्ह्यू घेणारे सर रीमोटली कनेक्ट झाले होते. त्यांचं ’स्टेलार कन्सल्टिंग’चं आयकार्ड स्क्रीनवर दाखवलं होतं त्यांनी.” “बरं, मग आयकार्डवरचं नाव काय होतं?” परोमानं कुतूहलानं विचारलं. “विनेश कुलकर्णी,” तो पोरगा ठामपणे म्हणाला. “काय? विनेशनं घेतला इंटरव्ह्यू?” “हो मॅम. नक्की. हेच नाव होतं. आमचे सगळ्यांचे इंटरव्ह्यू त्यांनीच घेतले, असं कळलं. दिवसभर चालू होते. माझ्या कॉलेजमधले अजून काही जण होते. आम्ही बोललो नंतर एकमेकांशी...” विनेश कुलकर्णी शँक सोमणला रिपोर्ट करत असला तरी खूप सीनियर होता. वयानंही सगळ्यांहून मोठा. इतक्या साधारण स्तराचे इंटरव्ह्यू त्यानं घेतले? हे कसं शक्य आहे... ती पुरती गोंधळली होती. “केव्हा झाला रे तुझा इंटरव्ह्यू?” तिनं विचारलं. “मॅम, 17 तारखेला!” ‘बरं, थँक्स!’ म्हणत तिनं फोन ठेवला. कॉल संपला तरीही नंतर काही क्षण ती तशीच बसून राहिली. घोळ आहे नक्की... काही तरी हातात आल्यासारखं वाटूनही ते पुन्हा निसटत होतं... ‘जाऊ दे. काम करू या‘ म्हणत ती पुन्हा लॅपटॉपकडे वळली.
दिवसभर शँक कुठे दिसला नाही, त्यामुळे तिचा मूड ठीक राहिला. मध्येच एलिना वॉकर येऊन म्हणाली, “तू स्लाइड्स पाठवल्याच नाहीस परोमा! मीटिंग शनिवारी होती. मी आणि शँक वाट पाहात होतो!” परोमा म्हणाली, “हो विसरले. मी माझा पीडीपी चॅलेंज करण्यासाठी एचआरला भेटायला गेले आणि त्यातच दिवस निघून गेला!” तिनं थेट स्वतःच्या पीडीपीचा अजिबात न शरमता केलेला उल्लेख ऐकून एलीना वरमली. आपल्याला शँक हिच्याबद्दल सगळं सांगणार, आपल्याशी ’चीप गॉसिप’ करणार, हे परोमाच्या बोलण्यात अंतर्भूत असलेलं गृहीतक ऐकताना तिला कुठं तरी आपली लायकी दाखवून दिली जातीय असं वाटलं असावं. परोमाचा उद्देश तोच होता. कुठलीही अपरिहार्य परिस्थिती नसताना वीकएन्डला मीटिंग ठेवणं हेही अयोग्यच होतं; पण भूषण गणेशन् युनिट हेड आणि शँक सोमणचा बॉस असूनही त्याला हे ठीक वाटत असेल, तर काय करणार? तक्रार कुणाकडं करायची? एलिना गुळमुळीतपणे काही तरी पुटपुटत तिथून निघून गेली आणि परोमानं ही ’मज्जा’ सांगायला तरुणला फोन केला.
काम संपवून आवराआवर सुरू करताना एचआरकडून आणखी एक मेल आली. ती उघडताच परोमा पुन्हा खुर्चीवर बसली आणि डोळे फाडून त्या मेलकडे पाहात राहिली. 17 तारखेला स्टेलार कन्सल्टिंग कंपनीचा ’फाऊंडेशन डे’ साजरा झाला होता. दिवसभर सेमिनार्स, विद्यार्थ्यांना आमंत्रित करून चर्चासत्र, डेमोज्, प्रदर्शन, ओपन हाऊस... मेलमधून आलेल्या सगळ्याच फोटोंमध्ये विनेश कुलकर्णी कोंबड्यासारखा तुरा उभारून मिरवत होता. यानं मग त्या ’हायर टीयर’मधले इंटरव्ह्यू कसे काय आणि केव्हा घेतले... कुछ तो गडबड है...
घरी आल्यावर तिनं सगळा किस्सा तरुणला सांगितला; पण त्यानं त्याकडं फारसं लक्ष दिलं नाही. आज रात्री त्याचा कस्टमर कॉल होता. परोमानंही जास्त कटकट न करता ध्रुवचा अभ्यास, जेवण वगैरे आवरून त्याला झोपवलं. जांभई देत सहज मोबाइल पाहिला असता प्रतीक शेलारचा मेसेज दिसला. अरे वा! काय म्हणतोय हा? लग्नाची तारीख ठरली की काय! पण प्रतीकनं आकांक्षाचा रेझ्यूमे पाठवून मदत मागितली होती. आकांक्षा गुप्तानं बी.कॉम. केलं होतं आणि फायनान्समधला कसलासा कोर्स. मिळेल ती नोकरी करायची तयारी होती. लग्नानंतर प्रतीकवर पूर्ण भार नको, इतकी साधी अपेक्षा... प्रतीकशी बुद्धीच्या बाबतीत तिची पातळी जुळत नसल्यासारखी वाटली, तरी संवेदनशील असावी ही मुलगी! चांगलं होईल यांचं... परोमा प्रतीकची शुभचिंतक असल्यानं त्या दोघांना जमेल ती मदत करायची असं ठरवतानाच तिच्या मनात एका कल्पनेनं आकार घेतला. उद्या भेटशील का? असा मेसेज प्रतीकला पाठवून ती झोपी गेली.
दुसर्या दिवशी प्रतीकनं ऑफिसला जायच्या आधीच भेटणं सोपं होईल असं कळवलं. तो हिंजवडीला जायचा. तिथून परत आल्यावर घरातून कुठं बाहेर पडणं त्याच्या जिवावर यायचं. प्रतीक बाणेरला पेइंग गेस्ट होता सध्या. त्याला ढळशप मध्ये भेटावं असा विचार करून तिनं त्याला फोन केला; पण त्याला ब्रेकफास्टला वगैरे वेळ नव्हता. “मॅम, मी तुम्हाला आमच्या बस स्टॉपपाशी भेटतो, बाणेरमधल्या फॅब इंडियासमोर,” असं त्यानं म्हटल्यावर परोमानं कार तिकडे वळवली. आज ऑफिसला उशीर झाला तरी हरकत नाही. शँक पीडीपी देणारच आहे नाही तरी... मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, म्हणतात तसं काहीसं तिचं वागणं झालं होतं त्या मीटिंगनंतर... प्रतीकला भेटून तिनं सगळा प्लॅन त्याला समजावला. तो हसतहसत डोळे विस्फारत म्हणाला, “आयला!” मग जीभ चावत ‘सॉरी!’ म्हणून तो कंपनीच्या बसमध्ये चढला आणि परोमा ऑफिसकडे निघाली.
ऑफिसमध्ये पोहोचताच तिनं शँक सोमणची गाठ घेतली. तिथंच बसलेल्या एलीनाकडे पाहत किंचित हसत ती म्हणाली, “मला जरा माझ्या पीडीपीबद्दल बोलायचं होतं.” एलीना उठून जाऊ लागताच ती म्हणाली, “नाही, मला तुझी मदत हवीय एलीना. प्लीज थांब जरा. शँक, तू फायनान्शियल टारगेट्सबद्दल बोललास. तर तशा दृष्टीनं काम करायचं तर मला काही जणांशी एकत्रितपणे बोलणं आवश्यक आहे. सगळ्यांना सोयीची असेल अशी वेळ ठरवू का मीटिंगसाठी? मी केलेलं काम प्रेझेंट करते आणि तुम्ही दोघं आणि इतर काही जण मिळून मला सूचना द्या काय करावं लागेल याबद्दल. मला सेल्ससाठी नक्कीच मदत लागेल इतरांची...“ तिचा नरमाईचा पवित्रा पाहून विजयी मुद्रेनं शँक म्हणाला, “अरे! मला सवय नाही तू असं काही बोलताना ऐकायची! पण आम्ही नक्कीच मदत करू. तू एलीनाला बरोबर घेऊन ठरव आणि मग मीटिंग घेऊ!” एलीना जरा साशंक होती, तरी शँक म्हणेल ते मान्य करण्याचा शिरस्ता पाळत तिनंही मुंडी हलवली. “माझी जरा तयारी झाल्यावर कळवते, चालेल?” परोमानं नम्रपणे विचारलं. “हो हो. चालेल; पण फार वेळ घेऊ नको. तुझ्याकडे वेळ नाहीये! ठशाशालशी. Remember. There will be a PDP!” पुन्हा गरीबपणे होकारार्थी मान हलवत ती बाहेर पडली.
उरलेला दिवस टीमच्या समस्या सोडवण्यात सरत गेला. रीसोर्स ग्रुपनं एक नवीन मुलगी तिच्याकडे पाठवली होती. प्रभज्योत कौर चंडीगडहून इथवर आली होती. तिला काम सुरू होण्याआधीच चंडीगडहून रिमोटली काम करायची परवानगी हवी होती. म्हणून ती थेट एचआरच्या फ्रेनीकडे गेली होती. त्याबद्दल फ्रेनीशी बोलणं आवश्यक होतं. “या महामारीनंतर नवीन उमेदवारांच्या ऑफिसच्या संकल्पना इतक्या बदलून गेल्या होत्या! रोज ऑफिसला येणं, जिथे गरज असेल त्या ठिकाणी रुजू होणं हे मान्य नसल्यासारखेच वागतात सगळे!” परोमा फ्रेनीला म्हणाली. “ते जाऊ देत. मी थांबवेन तिला. शँक ठीक आहे का?” फ्रेनीनं तिला विचारलं, “मी सुनावलं थोडं त्याला!” परोमानं तिचे मनापासून आभार मानले.
मी ही नोकरी सोडलीच तर फ्रेनीला आपल्या निरोप समारंभानंतर डिनरला घेऊन जाईन! पण मी का सोडू काही चूक नसताना? घरी परतताना ती विचार करत राहिली.
प्रतीकला उद्या सकाळी पुन्हा फॅब इंडियापाशी भेटायचं होतं. खरं तर तिला तरुणला प्रतीकबरोबर रचलेला सापळा सांगायचा होता, त्याच्या काही सूचना असतील तर विचारायच्या होत्या; पण तो नवीन कामामुळे जरा आपल्याच नादात होता. अवांतर गप्पांना वेळच नव्हता त्याला. मग ध्रुवचा होमवर्कही आज तिनंच तपासला.
दुसर्या दिवशी प्रतीकला भेटायला ती त्याच्या बस स्टॉपजवळ पोहोचली, तेव्हा प्रतीक तिची वाट पाहात आधीपासूनच थांबून होता. ती कार पार्क करत असताना त्यानं खिडकीवर टकटक करून स्वतःला आत घेण्याबद्दल सुचवलं. शेजारच्या सीटवर बसून तो म्हणाला, “मॅम, तुमचा विश्वास नाही बसणार; पण काल तुम्ही सुचवलं होतं त्याप्रमाणे आकांक्षा सकाळी 10 ला त्या ’हायर टीयर’मध्ये नोकरी मागायला गेली. तिथे एक उन्नीकृष्णन नावाचा त्यांच्या एचआरचा माणूस आहे. त्यानं तिचा रेझ्यूमे पाहून तिला फॉर्म भरून पंधरा हजार फी भरायला सांगितली. हिच्याकडे पैसे कुठले असणार? तिनं तसं सांगितल्यावर तिला तो म्हणाला, ‘मग पहिल्या पगारातून दहा हजार आणि नंतरच्या सहा महिन्यांच्या आत कुठल्याही महिन्यात अजून दहा हजार द्यायचे म्हणजे एकरकमी पंधरा हजार भरले नाहीत म्हणून वाढीव फी!’ आकांक्षा त्याला बरं म्हणाली. मग लगेच दुपारी तिला इंटरव्ह्यूला यायला सांगितलं. कारण म्हणे स्टेलार कन्सल्टिंगमध्ये तातडीनं जागा भरायचीय! तिनं तयारी करायला वेळ मागितला, तर म्हणे काही गरज नाही. आहे त्या ज्ञानावर आधारितच प्रश्न असतात. तू जे अवगत आहे म्हटलंयस त्यातलंच असेल सगळं. मग तिची एक जुजबी लेखी परीक्षा घेतली. त्याचा रिझल्टही लगेच दुपारीच कळणार होता आणि सगळ्यात ’ब्रेकिंग न्यूज’ सांगू?” परोमा उत्कंठेनं ऐकत होती. प्रतीक म्हणाला, “तिचा इंटरव्ह्यू घेणारी कोण होती सांगा? एलीना वॉकर!” “काय?” परोमा किंचाळलीच. “एलीना तर माझ्यासमोरच येऊनजाऊन होती दुपारभर. शँकनं मार्केटिंग टीमची मीटिंग बोलावली होती. त्यांचं सगळ्यांचं काही तरी मोठं संमेलन का मेळावा आहे! जगभरातले यांच्यासारखेच सगळे फुकटे माजखोर येणार आहेत म्हणे. त्याचं संयोजन ही करणार. टीममधल्या सगळ्यांना झाडत होती. मग इंटरव्ह्यू कधी घेतला हिनं? त्या नीलिमाच्या भाच्याचा इंटरव्ह्यू तर म्हणे विनेश कुलकर्णीनं घेतला. तो तर 17 तारखेच्या सगळ्या फोटोंत आहे ऑफिसमध्येच! आपला स्टेलारचा फाऊन्डेशन होता ना? काय चाललंय हे? नक्की एलीनाच होती का?” ती विचारात पडत म्हणाली. “मॅम, आकांक्षा तर ओळखत नाही ना तिला! शिवाय ते ’हायर टीयर’वाले स्टेलारचं आयकार्ड स्क्रीनवर दाखवतात. इंटरव्ह्यू घेणारा दिसत असतो. त्या स्क्रीनचा फोटोही एच.आर.मधली व्यक्ती रेकॉर्डसाठी घेते. तुम्ही म्हणताय तो मुलगाही विनेश कुलकर्णी सरांना ओळखत नसेलच. नाही का? त्यामुळे नक्की कुणी घेतला इंटरव्ह्यू ही खात्री करायची तर त्यांना बघून नीट ओळखणारं कुणी तरी हवं म्हणजे स्टेलार कन्सल्टिंगमधलंच.” प्रतीक म्हणाला, “आता हे कसं शक्य आहे?” परोमा म्हणाली. त्यावर प्रतीक म्हणाला, “आता मीच जातो तिथे नोकरी मागायला!” “अं हं! तुझ्या रेझ्यूमेमध्ये आधी स्टेलार कन्सल्टिंगमधल्या नोकरीचा उल्लेख पाहिला, तर ते बोलावणारच नाहीत ना! स्टेलार पुन्हा कुणाला हायर करत नाही एकदा सोडून गेल्यावर! त्यापेक्षा काल एलीनाचे कार्ड स्वाइप केल्याचे रेकॉर्ड्स मिळाले तर बघते, मग कळेल. ती दुपारी ऑफिसमध्ये वेगळ्याच मीटिंगमध्ये होती आणि तरी तिनं तथाकथित इंटरव्ह्यूही कुठल्या कॉन्फरन्स रूममधून घेतला, ते सगळं कसं घडवून आणलं ते! मुळात ही सगळी बडी धेंडं इतक्या छोट्या एन्ट्री लेव्हलच्या इंटरव्ह्यूला कशी काय हेच कळत नाहीये...” तितक्यात प्रतीकची बस आली आणि तो निघून गेला.
परोमानं ऑफिसमध्ये येताच अॅडमिनच्या कोमल मेहराला गाठलं आणि एखाद्याचे कार्ड स्वाइपचे रेकॉर्ड्स बघता येतील का, हे मोघमपणे विचारलं. कोमल विश्वासाला पात्र म्हणावीशी नव्हती; पण थोडी रिस्क घेणं भाग होतं. “तुला रिपोर्ट करणारे असतील तर बघू शकतेस! बाकी कुणाचे नाही देता येत.” ती तुटकपणे म्हणाली. आपल्या ’पीडीपी’ची वार्ता पसरली असावी सगळीकडे. सगळ्या सरड्यांचे रंग कसे बदलतायत. नीट बोलायला काय झालं हिला? स्वतःची लायकी काय ... असो! हे खरं असलं तरी असं बोलू नये हे एक आणि या विचारांनी स्वतःलाच त्रास फक्त होणार हे दुसरं... स्वतःची समजूत घालत परोमा केबिनमध्ये गेली आणि कामात बुडाली. तिनं कॉन्फरन्स रूम बुकिंगची रेकॉर्ड्स पहिली, कारण ती सगळ्यांना दिसत असत; पण त्यावरून त्या रूममध्ये कोण होतं हे कळत नाही. बुकिंग कुणी केलंय एवढंच कळतं. एलीनाचं नाव कुठेच नव्हतं. मॅनेजर्स सहसा टीममधल्यांनाच बुकिंग करायला लावतात नाही तरी.
एक वाजता प्रतीकचा फोन आला. तो म्हणाला, “मॅम, यशोधनला उद्या 10 वाजता बोलावलंय इंटरव्ह्यूला.” यशोधन प्रतीकचा रूममेट होता. त्याला प्रतीकनं आपल्या कटात सामील करून घेतलं होतं. त्यानुसार तो ’हायर टीयर’मध्ये जाऊन अर्ज करून आला होता. प्रतीक पुढे म्हणाला, “अजून एक जबरदस्त प्लॅनची खिचडी पकवलीय!” त्यानं बोलायला सुरुवात केली आणि परोमाचे डोळे विस्फारू लागले. “अरे! यात रिस्क मोठी आहे आणि मुळात हे होणारच नाही. कोण परवानगी देईल?” “मॅम, बघतो तर! त्यांना फक्त पैसे काढायचे आहेत गरजू लोकांकडून... तुम्ही तुमच्या बाजूनं तयारी करा. मी कळवतो तुम्हाला.” प्रतीकनं फोन ठेवत म्हटलं. मग ठरल्यानुसार तिनं आधीच्या चर्चेचा संदर्भ देत शँक आणि लीना, विनेश आणि इतरही सगळ्या शँकच्या चेल्यांना उद्देशून एक मेल लिहिली. विषय होता ‘माझ्या पीडीपीसाठी मार्गदर्शनाची विनंती’. अत्यंत नम्रतेने तिनं उद्या सकाळी 10 वाजता मीटिंगची वेळ मागितली होती. आता फक्त आशा करणं आणि वाट पाहाणं हातात होतं.
संध्याकाळी घरी निघाल्यावर अजून ट्रॅफिकमध्ये असतानाच प्रतीकचा फोन आला. “मॅम, मी म्हटलं तसं झालं.” परोमा ऐकतच राहिली. “यशोधननं फोन करून वडील हॉस्पिटलमध्ये आहेत, मी उद्या हॉस्पिटलमधूनच इंटरव्ह्यू देऊ का, असं विचारताच उन्नीकृष्णन्नं अर्थात नकारच दिला. तो म्हणाला, हे पँडमिकच्या वेळी होत असे. आता स्टेलार कन्सल्टिंग तशी परवानगी देत नाही! तुला इथंच यावं लागेल. यशोधननं खूप गयावया केल्या. इज्जतीचा प्रश्न आहे, उद्या माझं लग्न ठरतंय ते मोडेल नोकरी नसेल तर. बायकोच्या माहेरचे नावं ठेवतील. नंतर तुला अजून वीस हजार देईन, लाखभरसुद्धा देईन हुंडा घेऊन; पण माझा इंटरव्ह्यू उद्याच होऊ दे म्हटल्यावर उन्नी तयार झाला. आता बघू. मी उद्या घरूनच करणार. म्हणजे रूमवरच यशोधनबरोबर असेन. तुम्ही आता तुमच्या बाजून जाळं पसरा.” प्रतीक म्हणाला. आपल्याला मदत करायची त्याची धडपड पाहून परोमाला भरून आलं. ती म्हणाली, “तू इतकं काय काय करतोयस; पण सगळं मुसळ केरात जाऊ शकतं. मी मीटिंगसाठी वेळ मागितली तरी शँक आणि त्याची गँग येईलच असं नाही. आम्ही फार बिझी आहोत, वेळ नाही वगैरे म्हणतील...” तरी मुद्दा लावून धरत प्रतीक म्हणाला, “पण आले तर रंगेहाथ पकडले जातील! पहा तरी काय म्हणतायत!” हे मात्र खरं होतं.
ती घरी पोहोचतानाच शँकनं सगळ्यांच्या वतीनं आम्ही मीटिंगला येऊ, असं म्हणत तिची विनंती मान्य केल्याची मेल आली. सगळे मार्गदर्शक पूर्ण सहकार्य देतायत तर! वा! ती खूश होत घरात शिरली. रात्रीपर्यंत सगळी कामं आटोपताना उद्याची क्रिटिकल मीटिंगच मनात घोळत होती. तिनं पुनःपुन्हा सगळ्या नाटकाची मनात तालीम केली. पलंगावर पडून दोन तास उलटले तरी डोळा लागत नव्हता.
दुसर्या दिवशी 9वाजताच ती ऑफिसमध्ये पोहोचली. शँकही आत जाताना दिसला. “छान दिसतीयेस परोमा!” तो तिच्याकडे वळून पाहात म्हणाला. ‘थँक्स’ म्हणत ती आत शिरली. मनातल्या मनात शँकला तरुणच्या खास शिव्या देत तडक कॉन्फरन्स रूमकडे गेली. प्रेझेंटेशनच्या स्लाइड्सवरून पुन्हा एकदा नजर फिरवली. 10 वाजल्यापासून प्रतीकचा मेसेज येईपर्यंत किल्ला लढवायचा होता. 10 वाजेपर्यंत एकेक जण जमले. परोमानं बोलायला सुरुवात केली. प्रत्येक स्लाइडवर तिनं कुणाकुणाकडून काय मदत हवी हे लिहिलंं होतं. आपण अत्यंत अनभिज्ञ असल्याचा देखावा करत तिनं ते मुद्दे मांडले. काही बकवास करावी लागली तरी यांचे इगो फुलवत त्यांना गाफील करणं महत्त्वाचं होतं. सगळे खूश दिसत होते. शँक त्याच्या नेहमीच्या पोझमध्ये म्हणजे हात डोक्यामागे आणि पाय पुढे पसरून बसला होता. मोठा विक्रम केल्यासारखा सगळ्यांकडे पाहात आणि तिला चुचकारल्यासारखा करत तो म्हणाला, “आपली परोमा किती शहाणी मुलगी झालीय नाही आज? असं या अॅटिट्यूडनं काम केलंस तर विचार करीन मी नक्की; पण रिझल्ट्स हवेत. मदत करतील सगळे. मला दर एक दिवसाआड रिपोर्ट करत जा!” परोमानं अपमान गिळत पुन्हा मुंडी डोलावली. एलीनानं काय काय सूचना दिल्या, त्याही आभारपूर्वक स्वीकारल्या. विनेश कुलकर्णी जास्त काही बोलला नाही. त्याला आपलं नाटक कळलं असेल का... परोमा या विचारात असतानाच प्रतीकचा मेसेज आला, काम फत्ते! आता मीटिंग संपवायला हरकत नव्हती. त्यापूर्वी तिनं मीटिंग अटेंडन्स शीटवर हजर असणार्यांच्या सह्या घेतल्या. ‘प्रोटोकॉल ना?’ शँककडे पहात ती म्हणाली. ‘हो! बरोबर!’ म्हणत तो आणि त्याचे चेले उठून बाहेर पडू लागले. परोमानं तिथूनच प्रतीकला फोन लावला.
पहिल्याच रिंगला फोन उचलत प्रतीक म्हणाला, “शक्य असेल तर रजा घेऊन या मॅम, धमाल येणार आहे.” मग त्यानं थोडक्यात स्वतःचा सगळा ’पराक्रम’ सांगितला. यशोधननं गयावया केल्यावर जवळजवळ एक लाख रुपयांची लाच मागत उन्नीकृष्णन्नं त्याचा इंटरव्ह्यू घरून होईल अशी व्यवस्था केली. त्या इंटरव्ह्यूच्या वेळी अर्थात प्रतीक त्याच्याबरोबर होताच. यशोधनच्या लॅपटॉपवर त्यानं पाठोपाठ सगळे स्क्रीनशॉट्स ऑटोमॅटिकली घेण्यासाठी एक स्वतः लिहिलेली स्क्रिप्ट इन्स्टॉल केली. इंटरव्ह्यू सुरू झाला. या वेळी अलका दास स्टेलार कन्सल्टिंगचं आयकार्ड दाखवत स्क्रीनवर आली. हीदेखील शँकला रिपोर्ट करणारीच! सुरुवातीचे सोपस्कार झाल्यावर कॅमेरा बंद करून प्रश्न विचारले गेले. यशोधननं मुद्दाम सावकाश बोलत उत्तरं दिली. सगळं फूटेज लॅपटॉपवर गोळा होत होतं. लाइव्ह रेकॉर्ड केलं असतं तर ’टीम्स’ सॉफ्टवेअर पलीकडच्यांना तशी सूचना देतं. ते करून चाललं नसतं. म्हणून हा स्क्रीनशॉट्स ओळीनं गोळा करून एकत्र शिवण्याचा खेळ रचावा लागला होता. हे सॉफ्टवेअर ’होममेड’ होतं. अगदी किरकोळ स्क्रिप्ट! स्क्रीनवरच्या टाइमस्टॅम्पसहित सगळा क्रमवार तपशील होता. ’इमेज प्रोसेसिंग’ सॉफ्टवेअर वापरून त्यातील स्क्रीन्सचं पृथक्करण केलं असता दोन गोष्टी उघडकीस आल्या होत्या. आयकार्डमध्ये काही बनवाबनवी नव्हती; पण इंटरव्ह्यू घेणारी व्यक्ती दुसरीच होती. अलका दासचा चेहरा तिच्यावर सुपरइंपोज केला होता. म्हणजे प्रश्न विचारणारीच्या धडावर अलकाचं मुंडकं. इंटरव्ह्यू देणार्या यशोधनला अलकाचा आवाज, दिसणं तसं परिचित नसल्यानं त्याला एरवी काही कळणं शक्य नव्हतंच. शिवाय नेटवर्क खराब आहे, ही सबब सांगत सतत कॅमेरा बंद केला जात होता. एकूणच किंचित विचलित अवस्थेत आणि इंटरव्ह्यूच्या तणावात असलेल्या कुणालाही क्लृप्ती कळणं जवळजवळ अशक्य होतं. प्रतीकनं तिला तो इंटरव्ह्यू पाठवला.
परोमानंही सगळ्यांनी सह्या केलेल्या मीटिंग रेकॉर्डचा फोटो काढून प्रतीकला पाठवला. त्यात अलका दासही मीटिंगमध्ये असल्याचा पुरावा होता. तिच्या मुळातल्या प्लॅननुसार ती फक्त मीटिंग आयोजित करून सह्या घेणार होती आणि एचआरकडे ’हायर टीयर’मधल्या इंटरव्ह्यूंबद्दल रीतसर तक्रार करणार होती. तक्रार करणार्याचं नाव गुप्त ठेवलं जात असे. शँकला काही तरी जरब बसावी इतकाच उद्देश होता; पण प्रतीकनं स्टिंग ऑपरेशनच घडवून आणायचा प्लॅन आखला होता. आता एकाच वेळी अलका दास मीटिंगमध्येही आणि इंटरव्ह्यूमध्येही ’असल्याचा’ अजब प्रकार उघडकीस आला होता. ती म्हणाली, “हे घेऊन मी फ्रेनीकडे जाते आता. बघू काय होईल!” प्रतीक म्हणाला, “काही होत नसतं मॅम! तो दिलावर खोले नाही का? सेक्स्युअल हरॅसमेंटची तक्रार केली त्या मुलीनं, ती सिद्ध झाली तरी निर्लज्जपणे वावरतोय! अशा लोकांना गुपचूप राजीनामा द्यायला सांगतात. मग ते काही महिने शांत राहतात. I am going to pursue my passion! वगैरे पोस्टी लिहितात सोशल मीडियावर आणि नंतर त्यांना कुणी तरी नोकरीही देतं! शिक्षा कुठं आहे या सगळ्यात... खरंच होतं त्याचं म्हणणं. कुठल्याही मोठ्या कंपनीला बदनामी परवडत नसल्यानं सगळं शांतपणे करण्याकडेच कल असतो. अगदी नाइलाज झाला तरच जाहीरपणे काही विधानं केली जातात.
आता काय करावं... अशा संभ्रमात असतानाच प्रतीकनं एक बॉम्बस्फोट केल्यासारखा खुलासा केला. “मॅम, यशोधनला GenAIsys मध्ये नोकरी मिळालीय, त्याला स्टेलार कन्सल्टिंगमध्ये जॉइन व्हायचं नव्हतंच. त्याच्या एका पत्रकार मित्राला आम्ही हा ’इंटरव्ह्यू’ दिला आणि तुम्ही पाठवलेलं मीटिंग रेकॉर्ड फक्त दाखवलं, दिलं नाही, कारण ते बाहेरच्या कुणाच्या हाती लागलं असतं तर मग तुम्ही अडचणीत आला असता. तुम्हीच मीटिंग बोलावली होती. आता तो हा गौप्यस्फोट करेल...” परोमा घाबरून म्हणाली, “अरे! हे काय केलंस! स्कँडल आहे हे! किती बदनामी होईल! मला विचारायचंस तरी...” “सॉरी मॅम, पण मीही त्या एलीनामुळे फार वैतागायचो तिथं असताना. सगळं काम परस्पर ढकलायची माझ्यावर. तुम्हाला रिपोर्ट करत असलो तरी तिचं ऐकावं लागायचं कारण शँकबरोबरचं समीकरण... पण मला आता काहीच प्रॉब्लेम नाही हे करण्यात. तुम्ही मान्य केलंच नसतं असं काही सनसनाटी...” हेही खरंच. ती जरा सुन्न होऊन बसली. काय काय होईल आता कोण जाणे.
दीड वाजता लंचसाठी कॅफेटेरियामध्ये गेल्यावर तिला टीव्हीभोवती मोठा घोळका दिसला. फ्रेनीनं तिला घाईघाईनं बोलावून टीव्हीकडे निर्देश केला. ब्रेकिंग न्यूजमध्ये स्टेलार कन्सल्टिंगमधलं रॅकेट उघडकीस आल्याची सतत घोषणा चालू होती. ’हायर टीयर’च्या उन्नीकृष्णनला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर त्यानं भडाभडा सगळी माहिती ओकली होती. शँक सोमण, एलीना वॉकर, विनेश कुलकर्णी, हरीश विणकर, अलका दास असे सगळे यात सामील असल्याचं सिद्ध झालं होतं. गेल्या वर्षभरात शँकच्या टीममधील सीनियर्सनी आयकार्ड गहाळ झाल्याची खोटी तक्रार करून दुसरं आयकार्ड इश्यू करून घेतलं होतं. आधीच्या आयकार्डचा अॅक्सेस बंद होतो. म्हणजे ते स्वाइप करून तुम्ही कंपनीत प्रवेश करू शकत नाही; पण ती गरज नव्हतीच. जुनं गहाळ झालेलं आयकार्ड स्क्रीनवर ते दाखवून रिक्रूटिंगची सगळी प्रक्रिया अस्सल, अगदी genuine असल्याचा आभास निर्माण करणं हा हेतू होता आणि तो साध्य होत होता. या लोकांकडून प्रत्यक्षात तथाकथित इंटरव्ह्यू घेणार्या ’हायर टीयर’मधील तोतया व्यक्तीला टेक्निकल प्रश्नही पुरवले जात होते; पण इंटरव्ह्यू घेणार्यांना ज्ञान नसल्यामुळे ते प्रश्न नुसतेच विचारले जात होते, खोलात शिरून उपप्रश्न विचारणं हे घडत नव्हतं. आकांक्षाच्या ध्यानात हे आलं होतं. सगळ्यांच्या लक्षात ही त्रुटी येत असेलच असं नाही. शँकच्या चेल्यांच्या संमतीनंच त्यांचे चेहरे बोगस इंटरव्ह्यूअर्सच्या चेहर्याच्या जागी सॉफ्टवेअर वापरून बेमालूमपणे सुपरइंपोज करून दाखवले जात होते. इंटरव्ह्यू देणारेही कसंही करून, लाच देऊन निवड करून घेणारे महाभागच होते, त्यामुळे कुणी तक्रार करायचा प्रश्नच नव्हता.
देशभरातल्या अनेक शहरांत कंपनीचे मॅनेजर्स, व्हाइस प्रेसिडेन्ट्स अशा ’सॅटेलाइट’ रिक्रूटिंग कंपनीज् चालवत असल्याचं कळत होतं. विस्फोट झाला होता. आता ’कोलॅटरल डॅमेज’ काय हे पाहाणं हातात होतं.
तितक्यात स्टेलारच्या चेअरमनने यात सामील असणार्यांना नोकरीतून काढून टाकणार असल्याची बातमी- ब्रेकिंग न्यूज झळकू लागली. सगळे टीव्हीकडे पाहात असतानाच हरीश विणकर, एलीना वॉकरबरोबर शँक सोमणचंही नाव त्या अधिकार्यांत होतं!
परोमाच्या खांद्यावर हात ठेवत फ्रेनी मागून म्हणाली, "अरे, शँक गया! तुझा सुपरवायजर... खेल खतम्!" परोमा म्हणाली, " हो ना! आणि बिचार्याला सुधारायची संधीही नाही मिळाली! पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅन तरी द्यायचा! Remember, there was NO PDP!’’