देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या संकल्प स्थानाचे केंद्र सरकार जतन करणार - केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू

28 Oct 2024 11:38:57
- डॉ. दिवाकर कुलकर्णी
 
देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मुस्लीम मौलवीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला होता. त्या जागेला केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री किरेन रिजिजू यांनी भेट दिली.
 


Kiren Rijiju 
 
निजामशाही राजवटीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणावर बंदी होती. एवढेच नव्हे तर देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हौदावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या डॉ. बाबासाहेबांना जातीवाचक शिवीगाळ निजामाच्या मौलवीने केली. हा अपमानाचा कलंक मिटवून टाकण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी याच ठिकाणी संकल्प केला. त्या ठिकाणास आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या छत्रपती संभाजीनगरमधील अन्य काही ठिकाणांस केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भेट दिली. या सर्व स्थानांचा स्मारक रूपात विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे पाली व मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल केंद्र शासनाचा अभिनंदन कार्यक्रम संपन्न झाला. त्यास किरेनजी यांनी संबोधित केले. त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत.
 
मराठी आणि पाली भाषेच्या विकास, संवर्धनास अभिजात भाषा मिळाल्याने गती मिळणार, तर भारतरत्न डॉ. आंबेडकरांना निजामाच्या मौलवीने अपमानित केलेल्या हौदाचे संकल्प स्थान म्हणून, तर छावणीतील बंगला क्रमांक 9 आणि 10 च्या ठिकाणी भव्य संशोधन स्मारक उभारण्यास प्राधान्य देणार.
- केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची ग्वाही
‘वेटिंग फॉर द व्हिसा’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देवगिरी किल्ला आणि वेरूळ येथील बौद्ध लेणीला भेट देण्याचा वृत्तांत लिहिला आहे. 24 डिसेंबर 1934 रोजी घडलेली ही घटना आहे. तरुण लेखक, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अभ्यासक डॉ. सुधाकर नवसागर यांनी त्यांच्या पुस्तकात यावर सविस्तर लिहिले आहे. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधक डॉ. राजेश रगडे यांनीही त्यांच्या संशोधनात या घटनेवर सुस्पष्ट प्रकाश टाकला आहे. ती घटना थोडक्यात अशी आहे.
 

Kiren Rijiju 
 
गोलमेज परिषद आणि जॉइंट पार्लमेंटरी कमिटीच्या कामासाठी 1932-33 या वर्षात डॉ. बाबासाहेब लंडनमध्ये बराच काळ होते. दादासाहेब गायकवाड यांच्या विनंतीवरून त्यांनी काही काळ नाशिकमध्ये विश्रांती घेतली. दादासाहेब आदी कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून एका सहीचे नियोजन करण्यात आले होते. या सहलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सोबत राहावे, अशी प्रेमळ अटही घालण्यात आली होती. ती त्यांनी आनंदाने मान्य केली. मात्र या सहलीत छत्रपती संभाजीनगरच्या जवळचा देवगिरी किल्ला आणि वेरूळची बौद्ध लेणी पाहावी, अशी इच्छा डॉ. बाबासाहेब यांनी व्यक्त केली. नाशिकहून खासगी वाहनाने येवलामार्गे छत्रपती संभाजीनगरला सहल पोहोचली. या सहलीत एकूण तीस लोक होते. सर्वश्री दादासाहेब गायकवाड, शिवतरकर, प्रधान, असईकर, दिवाकर पगारे, देवजी डोळस; नासिकहून अमृतराव रणखांबे, भादुजी निकाळजे, तुकाराम काळे हे सोबत होते.
स्वत: डॉ. बाबासाहेब याबाबत लिहितात, आम्ही सहलीकरिता काही बसेस व टुरिंग कार्स भाड्याने घेतल्या. आमच्या सहलीत एकूण 30 सहकारी होते. आम्ही नासिकवरून येवल्यास निघालो, कारण येवला औरंगाबादच्या रस्त्यावर आहे. आम्ही आमच्या सहलीचा कार्यक्रम जाहीर केला नव्हता. त्याचे कारण उघड होते. आम्हाला कोणी न ओळखता आमचा प्रवास व्हावा, अशी आमची इच्छा होती, कारण बाहेर खेडोपाडी अस्पृश्यतेबाबत ज्या अडचणी येतात त्या टाळाव्यात, हा त्यातील हेतू होता. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी थांबू, तेथील आमच्या लोकांना तेवढे आम्ही आधी कळविले होते.
 
 
डॉ. बाबासाहेब छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन वस्त्यांतील बैठकांना उपस्थित राहून नंतर देवगिरी किल्ला आणि वेरूळकडे रवाना झाले. माळीवाडा येथे त्यांचा सत्कार वंचित वस्तीतील लोकांनी केला. मग ते देवगिरी किल्ल्याकडे निघाले. प्रवासातून आल्यामुळे हातपाय, कपडे धुळीने माखलेले होते. डॉ. बाबासाहेब आणि त्यांच्या सहकार्‍यांना हातपाय तोंड धुवावे असे वाटले. किल्ल्याच्या पायथ्याशी (जिथे आता वाहनतळ व्यवस्था आहे.) एक पाण्याचा हौद होता. ते त्या पाण्याच्या हौदाकडे वळले. तिथे घडलेली घटना डॉ. बाबासाहेबांचा प्रचंड अपमान करणारी होती. निजाम राजवट असल्याने निजाम अधिकारी, मौलवी यांचे वर्चस्व त्या काळी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर होतेच. त्या अपमानजनक प्रसंगाचे वर्णन डॉ. बाबासाहेब लिहून ठेवतात. ते त्यांच्याच शब्दांत-
 
 
यानंतर मागून एक वृद्ध मुसलमान धावत आला. त्याची दाढी पांढरी झालेली होती. तो ओरडत होता, ’धेडांनी (अस्पृश्यांनी) हौद बाटविला आहे.’ लगेच भराभर आसपासचे मुसलमान जमा झाले; तरुण व म्हातारेही. त्यांनी आम्हास शिव्या देण्यास सुरुवात केली. शिव्या देत ते म्हणू लागले, ’धेड लोक उर्मट बनले आहेत. धेड लोक आपला धर्म विसरून गेले आहेत. नीच व हलके राहणे हा त्यांचा धर्म आहे. धेड लोकांना धडा शिकवायलाच पाहिजे... बाबासाहेब पुढे म्हणतात, ती शिवीगाळी हलकट स्वरूपाची होती. आमचीही सहनशीलता संपत चालली. तेथे सरळ दंगलच उसळली असती. खूनही पडणे शक्य होते. तरीही आम्ही संयम बाळगणे आवश्यक होते. आम्हाला त्या वेळी फौजदारी प्रकरणात गुंतवून घ्यावयाचे नव्हते, कारण त्यामुळे आमची सहल तात्काळ संपुष्टात आली असती. ते आणि जमलेला अस्पृश्य समुदाय हताश अवस्थेत शांत राहण्याचा निर्णय करतात. डॉ. बाबासाहेब त्यांना खडे बोल सुनावतात. वर्णन त्यांच्याच शब्दांत-
 
तुमचा धर्म हेच तुम्हाला शिकवतो काय? जर एखादा अस्पृश्य मनुष्य मुसलमान बनला तर तो धर्म त्याला असा प्रतिबंध करील काय? हे थेट त्यांच्या हृदयात जाणारे प्रश्न होते. त्या प्रश्नांचा काही परिणाम काही मुसलमानांवर झालेला दिसू लागला. मुसलमानांनी काही उत्तर दिले नाही. ते स्तब्ध उभे राहिले. तेथे किल्ल्याचा पहारेकरी होता. त्याच्याकडे वळून रागाच्या आवाजातच मी विचारले, आम्ही किल्ल्यात जाऊ शकतो की नाही? आम्हाला आत जाता येत नसेल तर तसे सांगा. मग आम्हाला येथे थांबण्याचे कारण नाही. त्या पहारेकर्‍याने माझे नाव विचारले. एका चिठ्ठीवर मी माझे नाव त्यास लिहून दिले. तो आत गेला. सुपरिंटेंडंटला त्याने माझी चिठ्ठी दाखवली व तो परत आला. त्याने सांगितले की, तुम्ही आत जाऊ शकता; परंतु किल्ल्यामध्ये कोठेही पाणी असले तरी त्या पाण्यास तुम्हाला कोणाला हात लावता येणार नाही... आणि आमच्याबरोबर एक सशस्त्र सैनिक देण्यात आला. एवढ्याचसाठी की, पाण्याबाबत मुसलमान सुपरिंटेंडंटने जे फर्मान आमच्यासाठी काढले होते त्याचे उल्लंघन कोठे होता कामा नये.
 
 
हा अतिशय हृदयद्रावक प्रसंग आहे. ‘वेटिंग फॉर व्हिसा’ या पुस्तकात स्वत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यावर विस्ताराने लिहून ठेवले आहे. ‘जय भीम जय मीम’चे नारे लावणार्‍या आणि हाजी मस्तानपासून एमआयएमपर्यंत मुस्लिमांसोबत युती करणार्‍यांनी मुळापासून विचार करावा अशी ही घटना आहे. नीतिमत्ता आणि धर्म यापासून फारकत घेतलेले लोकशाहीविरोधी कम्युनिस्ट आणि असहिष्णू मुस्लीम हे कधीच भारतीयत्व स्वीकारू शकणार नाहीत याचे आकलन जितके भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना झाले होते तितके फारच थोड्या लोकांना त्या काळी झालेले होते.
 

Kiren Rijiju 
 
हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे, केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री आदरणीय किरेन रिजिजू यांची छत्रपती संभाजीनगर भेट. सर्व व्यस्तता बाजूस सारून त्यांनी हा प्रवास केला. अरुणाचल प्रदेशात सलग चार वेळा खासदार असलेले किरेनजी एक विद्वान, संवेदनशील आणि भगवान बुद्धांच्या विचारपरंपरेचे कृतिशील अनुयायी असलेले तत्त्वनिष्ठ राजकारणी आहेत. हे असे व्यक्तित्व विद्यमान राजकीय पटलावर आजच्या स्थितीत असणे हेच खरे सुखावह दृश्य. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर त्यांची अढळ निष्ठा आहे. बौद्ध अनुयायी असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.डॉ. बाबासाहेबांनंतर 71 वर्षांनी त्यांच्या रूपाने बौद्ध कायदामंत्री देशाला मिळाला, हे ते अभिमानाने सांगतात. देशातील बौद्ध जनसंख्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायी यांच्याविषयी किरेनजींच्या मनात प्रचंड आदर आहे.
 
 
देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मुस्लीम मौलवीने डॉ. बाबासाहेबांचा अवमान केला होता. त्याजागेला भेट किरेन रिजिजू यांनी भेट दिली. केवळ हिंदू धर्मातच नव्हे तर मुस्लिमांतही अस्पृश्यता होती, हे अधोरेखित करणारा हा प्रसंग आहे. अस्पृश्य समाजाला या धर्मांध रूढीवादी मुस्लिमांच्या जाचातून सोडविण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी संकल्प घेतला. त्या स्थानास किरेनजी यांनी ‘संकल्प तीर्थस्थान’ असे संबोधन या भेटीदरम्यान दिले. भारतीय पुरातत्त्व विभागाशी बोलून काळाच्या ओघात नष्ट केलेल्या या स्मृतिस्थळाचे संकल्प तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा ठाम निश्चय दिनांक 13 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांनी बोलून दाखविला.
देवगिरी गावातील गिरिधारी गायकवाड हे पर्यटन मार्गदर्शक (TOURIST GUIDE) आहेत. 1935 ला जेव्हा डॉ. बाबासाहेबांना मौलवीने शिवीगाळ केली तेव्हा तिथे तैनात असलेले चौकीदार धोंडीराम किसन कीर्तिकर यांनी त्या उद्दाम मौलवीची मानगूट आणि कॉलर धरून त्याला उचलले होते. डॉ. बाबासाहेबांनी कीर्तिकर यांना मारहाण करण्यापासून रोखले होते, अशी आठवण गिरिधारी गायकवाड यांच्याकडून ऐकायला मिळाली. डॉ. बाबासाहेबांची डोली ज्यांनी उचलली त्यात धोंडीराम किसन कीर्तिकर, लक्ष्मण रखमाजी गायकवाड, नारायण बनसोडे, भोजराज साळवे, धनाजी बनसोडे, लक्ष्मण गंगाराम साळवे, सुखदेव साळवे, पुंजा किसन साळवे यांचा समावेश होता. या सर्वांनी डॉ. बाबासाहेबांना मेंढा तोफेपर्यंत वर नेऊन परत आणले. त्या वेळी डॉ. बाबासाहेब त्यांना म्हणाले, तुम्ही कुठे राहता? या मंडळींनी महारवाड्यात राहतो, असे उत्तर दिले. डॉ. बाबासाहेब या सर्वांना म्हणाले, आता यापुढे महारवाडा, धेडवाडा (देवगिरी किल्ला आणि गावातील मुस्लीम या वस्तीस धेडवाडा असेच संबोधित असत.) म्हणायचे नाही, तर आपल्या वस्तीस आता राजवाडा असे म्हणायचे, असे बजावले. गावकुसाबाहेरील वंचित समाजाच्या वस्तीस अपमानजनक नावाने संबोधणे हे त्या काळी प्रचलित होते. डॉ. बाबासाहेब यांनी या प्रथेपासून आमची व्यथा दूर केली, हे येथील राजवाड्यातील रहिवासी आजही अभिमानाने सांगतात.
 
 
 
किरेनजी यांनी या राजवाडास्थित भीम स्पर्श बौद्ध विहारासही भेट दिली. महामानव डॉ. बाबासाहेबांच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे, या भावनेने किरेनजी भावुक झाले. याच जागेत डॉ. बाबासाहेबांनी भाकरी आणि बोंबिलाच्या चटणीचे जेवण केल्याची आठवण त्यांना स्थानिकांनी सांगितली. स्थानिक माताभगिनीनी किरेनजी आणि सर्वांचे दीप ओवाळून स्वागत केले. किरेनजी या विहारात सर्वांच्या सोबत जमिनीवर बसले, चर्चा केली. विहारापर्यंत येण्यास मोठा रस्ता आणि या जागेवर उचित स्मारक उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. या वेळी स्थानिक प्रा. डॉ. जयश्री गायकवाड, किरण साळवे, दीपक घुसळे, आतिश गायकवाड, धीरेंद्र गायकवाड, सतीश जाधव, नारायण गायकवाड, विष्णू कीर्तिकर, शोभा गायकवाड, रीना कीर्तिकर, जयश्री साळवे, राहुल बनसोडे, सुधाकर साठे, कांताबाई देशमुख, मनीष गायकवाड, रणजीत गायकवाड, किशोर जाधव, किशोर गायकवाड आदींची उपस्थिती होती.
 
 
Kiren Rijiju
 
याच प्रवासात त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील छावणी परिसरातील बंगला क्रमांक 9 आणि 10 ला भेट दिली. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालय आणि हायस्कूल निर्मितीच्या काळात डॉ. बाबासाहेब याच ठिकाणी राहिले. दुसरे महायुद्ध संपले होते. छावणीतील अनेक बराकी आणि बंगले रिकामे होते. लष्करातील अधिकार्‍यांशी चर्चा करून डॉ. बाबासाहेबांनी त्यातील काही जागा वापरण्यासाठी मागून घेतल्या. मिलिंद प्रशाला, मिलिंद महाविद्यालय निर्मितीचे प्रारंभीचे कामकाज इथून चालले. या बंगला क्रमांक 9 आणि 10 ची जागा अधिग्रहित करून स्मारकाच्या स्वरूपात त्याचे जतन व्हावे, अशी छत्रपती संभाजीनगरातील मंडळींची खूप दिवसांपासूनची मागणी होती. किरेनजींनी या स्थळास भेट दिली. तेथील रहिवासी यांच्याशी संवाद साधला. ही जागा ताब्यात घेऊन तिचे ऐतिहासिक महत्त्व जपत या ठिकाणी पाली, बौद्ध तत्त्वज्ञानाचे संशोधन केंद्र, भव्य संदर्भ ग्रंथालय उभारण्याची शक्यता त्यांनी पडताळून पहिली. संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, महाराष्ट्र राज्य शासन यांच्याशी चर्चा करून योग्य पावले उचलू, असे किरेनजी यांनी या वेळी सांगितले. माजी अर्थ राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड यांनीही हे काम व्हावे यासाठी भरीव प्रयत्न केले होते. या वेळी साहित्यिक, समीक्षक डॉ. हृषीकेश कांबळे, अविनाश लोंढे, माजी नगरसेवक डॉ. गौतम खरात, गौतम लांडगे, माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, जालिंदर शेंडगे, लक्ष्मण शिंदे, मकरंद चान्डोडकर, सागर शिंदे आदी उपस्थित होते.
 
 
किरेनजी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातील बौद्ध लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या विपश्यना विशोधन विन्यास ट्रस्टला भेट दिली. या वेळी पू. भदंत नागसेन बोधी यांच्यासह पूजनीय भिक्खू संघ उपस्थित होता. किरेनजी यांनी तेथील भव्य अशा बुद्ध मूर्तींना वंदन केले. आदरणीय भिक्खूंना चिवरदान केले. अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीने लाखो बौद्ध अनुयायांच्या या श्रद्धास्थानाचे विकसन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
 
 
याच दौर्‍यात किरेनजी यांच्या उपस्थितीत वंचित, उपेक्षित समाजातील पहिल्या पिढीतील उद्योजकांशी चर्चा केली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या वेळी उद्योजक दुष्यंत आठवले, डुमणे, डॉ. बाळासाहेब वाल्हेकर, प्रसाद कांबळे, थोरात यांची उपस्थिती होती. या भागातील वंचित, उपेक्षित उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेईल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. वित्त मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयाशी चर्चा करून दिल्लीत एक अधिवेशन आयोजित करण्याचा मनोदय मंत्री महोदयांनी व्यक्त केला. इथल्या उद्योजकांना त्यांच्या व्यवसायास व्यापक प्रमाणात प्रसिद्धी मिळेल, नवीन व्यवसाय संधी उपलब्ध होतील असा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.
 
 
गेली अनेक दशके मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा विषय प्रलंबित होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी अत्यंत धडाडीने निर्णय घेऊन मराठीसह पाली, प्राकृत, असामी, बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला.
 

Kiren Rijiju 
 
छत्रपती संभाजीनगर शहरात मराठी आणि पाली भाषेस अभिजात दर्जा मिळाला म्हणून केंद्र सरकारचे अभिनंदन करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे यासाठी एक संयुक्त कार्यक्रम 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास किरेनजी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री नामदेव कांबळे, पाली भाषेचे अभ्यासक भदंत डॉ. चंद्रबोधी, पाली भाषेचे संशोधक डॉ. अशोक सरोदे यांची उपस्थिती होती. साहित्य भारती, समरसता साहित्य परिषद, विवेक विचार मंच, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थांनी हा कार्यक्रम घडवला.
 
 
या वेळी किरेनजी म्हणाले की, मातृभाषा मनुष्यास सर्वार्थाने समृद्ध बनवते. भारतीय भाषा या प्राचीन संस्कृतीच्या वाहक आहेत.त्यांचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग केला पाहिजे, कारण नसताना आपण विदेशी भाषेत व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो.ते खूपदा विनोदीही वाटते. ते टाळले पाहिजे. मराठीमध्ये तर अध्यात्म, ज्ञान-विज्ञान, इतिहास यासह विपुल साहित्य निर्माण झालेले आहे. पाली भाषा महाकारुणिक तथागत भगवन बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची भाषा होती. तीही ज्ञानभाषाच आहे. या भाषांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. या दोन्ही भाषांचे संवर्धन, संशोधन आता मोठ्या प्रमाणावर होईल, अशी ग्वाही किरेनजी यांनी दिली.
 
 
किरेन रिजिजू हे सलग चार वेळा अरुणाचल प्रदेशातून लोकसभेत खासदार म्हणून निवडून येत आहेत. अतिशय लोकप्रिय असे ते जनप्रतिनिधी आहेत. त्यांच्या निष्ठा राष्ट्रहिताला समर्पित आहेत. त्यांची देशभक्ती प्रखर आहे. अत्यंत सरळ आणि सहज असे त्यांचे व्यक्तित्व आहे. काँग्रेसने या देशाचे पुरते वाटोळे केले, असे त्यांचे सुस्पष्ट प्रतिपादन असते. अल्पसंख्याकमंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. बौद्ध, शीख, पारसी, जैन, ख्रिश्चन आणि मुस्लीम हे समाज भारतात अल्पसंख्याक आहेत. मुस्लिमांना ‘व्होट बँक’ म्हणून वापरून या समाजाचे प्रचंड नुकसान केले आहे, असे ते प्रखरपणाने मांडतात. बौद्ध, शीख, पारसी, जैन यांनी पुढे येऊन अल्पसंख्याक मंत्रालयाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी या प्रवासात अनेक वेळा सांगितले. केंद्रीय मंत्री असलेल्या माननीय नामदार किरेन रिजिजू यांनी एका दिवसात अनेक ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थानी भेटी दिल्या. समरस समाजनिर्मितीच्या दिशेने घडावे, असा त्यांनी निर्धार व्यक्त केला.
 
- डॉ. दिवाकर कुलकर्णी
लेखक  सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ अध्यक्ष आहेत... 
9822435531
MAITRA63REDIFFMAIL.COM

Powered By Sangraha 9.0