योगी श्रीअरविंद यांचे भगवद्गीता चिंतन

विवेक मराठी    21-Oct-2024
Total Views |
yogi sri aurobindo
भगवद्गीता सगळ्या सिद्धांतांचा समन्वय करते. गीतेचा हा समन्वय आध्यात्मिक आणि बौद्धिक असा दोन्ही प्रकारचा आहे. गीतेपूर्वी उपनिषदांनी जसा त्या वेळच्या चिंतनांचा समन्वय घडवला तसाच समन्वय गीता घडवते. ती एखाद्या विशिष्ट सिद्धांताची बाजू घेऊन उभी राहत नाही. तसेच सामान्य मानवी पातळीवरील भावभावनांचा खेळ आणि त्यापोटी निर्माण होणारा संघर्ष; यापलीकडील अस्तित्वाच्या आदी संघर्षाचे आणि त्यातील मानवी कर्तव्याचे विवेचन म्हणजे गीता होय. भक्तीयुक्त ज्ञानमय कर्म हे त्याचे सार होय, असे श्रीअरविंद यांचे चिंतन आहे.
आर्य’ मासिकात इ. स. 1916 ते इ. स. 1920 अशी चार वर्षे 'Essays on Gita' या शीर्षकाने श्रीअरविंद यांनी भगवद्गीतेवर त्यांचे विचार व्यक्त केले होते. गीतेवर अनेकांनी भाष्ये लिहिली आहेत आणि मनुष्यस्वभावाला अनुसरून त्या त्या भाष्यकाराने त्याची त्याची भूमिका हाच गीतेचा सिद्धांत असल्याचे प्रतिपादन केले आहे; परंतु गीता असा कोणताही एखादा सिद्धांत प्रतिपादन करीत नाही. अद्वैत, सांख्य, योग, कर्म, ईश्वरवाद, विशिष्टाद्वैत किंवा अन्य एखादा सिद्धांत गीता प्रतिपादन करीत नाही. तसेच न्यायदर्शनाप्रमाणे एखादा सिद्धांत मांडून अन्य सार्‍या सिद्धांतांना चुकीचे ठरवत नाही. याउलट गीता त्या वेळच्या सगळ्या सिद्धांतांचा समन्वय करते. (गीतेचा हा समन्वय आध्यात्मिक आणि बौद्धिक असा दोन्ही प्रकारचा आहे. गीतेपूर्वी उपनिषदांनी जसा त्या वेळच्या चिंतनांचा समन्वय घडवला तसाच समन्वय गीता घडवते. ती एखाद्या विशिष्ट सिद्धांताची बाजू घेऊन उभी राहत नाही, असे योगी श्रीअरविंद यांचे प्रतिपादन आहे.
 
अन्य ग्रंथांप्रमाणे गीतेतही तात्कालिक आणि चिरंतन अशा दोन्ही बाबी आहेत; पण अन्य ग्रंथांच्या तुलनेत तात्कालिक बाबी अतिशय कमी आहेत आणि त्याही अशा तर्‍हेने प्रतिपादित करण्यात आल्या आहेत की, त्यांना नवनव्या काळात युगानुसार परिभाषित करता येईल. यज्ञ अथवा देव या कल्पनांचे उदाहरण श्रीअरविंद त्यासाठी देतात. या कल्पना त्या काळात वेगळ्या होत्या आणि वर्तमानात त्यांचे तेच अर्थ आणि भाव नसले तरीही गीतेच्या प्रतिपादनात त्याने फरक पडत नाही. गीता स्वतःच त्यांचे अर्थवाहित्व टिकवून ठेवण्यास मदत करते, असे ते म्हणतात. आजच्या काळानुसार गीतेतील चातुर्वर्ण्य आदी कल्पनांची चिकित्सा करणे योग्य नाही आणि त्या वेळी त्या वेळच्या लोकांना त्याचे कोणते अर्थ अभिप्रेत होते याच्यावर डोकेफोड करण्यातही अर्थ नाही. वर्तमान आणि भावी मानवासाठी असलेला गीतेचा आशय समजून घेणे हेच आपले कर्तव्य असू शकते, असे त्यांचे मत आहे.
भगवद्गीता हा जगातल्या अन्य कोणत्याही धर्मग्रंथाप्रमाणे स्वतंत्र ग्रंथ नाही. तसेच एखाद्या महापुरुषाचे जीवन किंवा चिंतनशील महापुरुषाचे चिंतन यातून या ग्रंथाची सिद्धता झालेली नाही. सामान्य मानवाच्या सामान्य व्यवहारामधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या आध्यात्मिक ग्रंथाची रचना झालेली आहे हे गीतेचे वैशिष्ट्य आहे. गीता सांगणारे खुद्द भगवान श्रीकृष्ण ईश्वराचे अवतार आहेत. ते ऐतिहासिक व्यक्ती होते यात वादच नाही; परंतु ते ऐतिहासिक व्यक्ती होते की नव्हते याने गीतेत प्रतिपादित विचारांना काहीही धक्का लागत नाही. पाश्चात्त्य जगात ज्याप्रमाणे ईसा मसीह प्रत्यक्षात होऊन गेले की नाही, त्यांचे ‘बायबल’मध्ये वर्णित चरित्र ऐतिहासिक आहे की नाही; याला जसे आणि जेवढे महत्त्व दिले जाते; तेवढे आणि तसे महत्त्व श्रीकृष्ण प्रत्यक्ष होते की नाही याला दिले जात नाही. तसे महत्त्व देण्याचे काही कारणही नाही, कारण त्यांनी मानवजातीला दिलेल्या आध्यात्मिक उपदेशात त्यामुळे किंचितही फरक पडत नाही, असे श्रीअरविंद यांचे स्वच्छ प्रतिपादन आहे.
 
 
या जगात जे काही कर्म आपल्याकडून होते ते अज्ञान आणि अहंकार यापोटीच होते. आपणच सगळ्या कर्मांचे कर्ता आहोत, या समजातूनच जगात माणूस कर्म करीत असतो. अर्जुनदेखील त्याच सामान्य मानवाप्रमाणे कर्तव्यकर्म करीत होता. त्याला केले जाणारे उपदेश, दिले जाणारे सल्ले, केले जाणारे मार्गदर्शन मानवाच्या याच अज्ञान आणि अहंकारातून होत होते. मात्र प्रत्येक मानवाच्या जीवनात असा प्रसंग अथवा क्षण येतो जेव्हा भगवान त्याला त्याच्या अज्ञान आणि अहंकारातून बाहेर काढून कर्माच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान देतात. महाभारत युद्धासाठी प्रत्यक्ष कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उपस्थित झाल्यावर अर्जुनाच्या जीवनात तो क्षण उपस्थित झाला आणि भगवंतांनीदेखील तो क्षण आल्यावरच आपले यथार्थ रूप; ज्या कार्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता ते; तोवर अप्रकट रूप प्रकट केले.
 
 
अर्जुन हा सामाजिक व नैतिक आदर्शांनी व्यवहार करणारा क्षत्रिय आहे. न्याय, अन्याय, सुख इत्यादी गोष्टींचे सामाजिक व नैतिक विश्लेषण त्याला चांगले अवगत आहे. त्याच्या कर्माचे तेच अधिष्ठानदेखील आहे. म्हणूनच आपल्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी उद्युक्त होऊन तो रणांगणात उतरला आहे. एवढेच नाही तर आपल्या शत्रूचा नि:पात करण्यापूर्वी एकदा त्यांचे नीट निरीक्षण करण्यासाठी आपला रथ युद्धभूमीवर मध्यभागी घेऊन चल, अशी दर्पयुक्त आज्ञाही तो श्रीकृष्णाला देतो. तोपर्यंतचे त्याचे वर्तन आदर्श क्षत्रियाचेच आहे; परंतु युद्धभूमीवर मध्यभागी पोहोचताच त्याला जे दर्शन होते त्याने त्याच्या अंतर्मनात तुमुल संघर्ष निर्माण होतो. ज्या सामाजिक व नैतिक आदर्शांनी त्याला युद्धाला प्रेरित केले; त्याच सामाजिक व नैतिक आदर्शांची या युद्धाने राखरांगोळी होईल याची तीव्र जाणीव त्याला होऊ लागते. एकच आदर्श युद्धाच्या कर्मासाठी प्रेरित करतो आणि ते कर्म केल्यास त्याच आदर्शाचा बळी जातो. तेच नाही तर ज्यासाठी हे आदर्श घट्ट धरून ठेवायचे असतात ती व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाची घडीच आपल्या कर्मामुळे विस्कटून जाईल. आदर्श आणि त्यापोटी करावयाच्या कर्माचे फळ यांच्यातील हा आंतरिक स्वसंघर्ष हे अर्जुनाच्या अस्वस्थतेचे आणि युद्धातून विरत होण्याचे कारण होते. या मानसिक संघर्षात नेमके काय करायचे याचे मार्गदर्शन त्याला श्रीकृष्णाकडून हवे होते. तेच तो कृष्णाला सांगतो. कृष्ण मात्र त्याला नेमके या स्थितीत काय करायचे याचे काहीच मार्गदर्शन करीत नाही. उलट त्याने आत्मतत्त्वाचा विचार करावा इत्यादी उपदेश त्याला करतो. अर्जुनाला तो उपदेश नको असतो. त्याला नेमक्या कर्माचे दिग्दर्शन हवे असते. कृष्ण मात्र त्याला या जगाच्या पलीकडील ज्ञान देत राहतो. त्यातून निर्माण झालेला संवाद म्हणजे गीता आहे. श्रीकृष्णाला; संभ्रमित अवस्थेत नेमके काय करायचे आणि या सगळ्या अंतर्विरोधानी भरलेल्या विश्वव्यापाराचे खरे स्वरूप काय आहे, हे दोन्हीही अर्जुनाला सांगायचे आहे.
 
 
गीतेची शिकवण काय आहे यावर अनेक जण आपापले भाष्य करतात. आपल्या विचारांना अनुकूल एखादा सिद्धांत आणि त्याचे प्रतिपादन करणारा एखादा श्लोक हेच गीतेचे सार आहे, असा दावा करतात. गीतेत कर्म, ज्ञान, भक्ती हे सगळंच आहे; पण या बाबी केवळ साधन स्वरूपात आहेत. या साधनांचा उपयोग करून जे साध्य करण्यास गीता सांगते ते साध्य निराळे आहे. आजकाल तर गीतेच्या कर्मसिद्धांताची खूप चर्चा होते आणि आपापले नियत कर्म करण्यावरच गीता जोर देते, असे सांगितले जाते; परंतु हे योग्य नाही. सामाजिक, नैतिक कर्म तसेच जीवनात आपण ज्या भूमिकेत असतो त्या भूमिकेला साजेसे कर्म करत राहणे, हा काही गीतेचा उपदेश नाही. अर्जुनाला आपल्या भूमिकेची आणि आपल्या नैतिक, सामाजिक कर्तव्याची पूर्ण जाणीव आहे. त्याच्यासमोर प्रश्न आहे की, आपल्या या भूमिकेपोटी त्याहून मोठ्या अशा व्यापक समाजजीवनाचे नुकसान करायचे का? एखाद्या न्यायाधीशाला समजा वाटले की, कोणत्याही जीवाला मारून टाकणे हे योग्य नाही आणि त्याच्यासमोर एखाद्याला फाशी देण्याचा खटला चालू असेल; तर त्याने काय करायचे? व्यक्तीच्या छोट्या भूमिकेहून बृहत्तर असे काही तरी जेव्हा त्याला आतून साद घालते त्या वेळी व्यक्तीने काय करायचे? व्यक्तीच्या व्यापक होत जाण्याच्या मार्गात पुढ्यात येणार्‍या या संघर्षाचे उत्तर देण्याचा प्रयत्न गीता करते. तिने भगवान बुद्धाला परत आपल्या बायकोपोरांकडे जाऊन त्यांच्या प्रति कर्तव्य करण्याचा किंवा रामकृष्ण परमहंस यांना एखाद्या पाठशाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्याचा किंवा विवेकानंदांना घरी जाऊन आई व भावंडांचे संगोपन करण्याचा उपदेश केला नसता. व्यावहारिक, सामाजिक, नैतिक कर्मांच्या चौकटीच्या पलीकडे जेव्हा कर्मविषयक प्रश्न निर्माण होतात तेव्हा काय करायचे, हा गीतेचा विषय आहे. गीता हा काही नैतिक आचारांचा किंवा सामाजिक, राजकीय नीतिनियमांचा ग्रंथ नाही. तसा तो मानला तर त्याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. तो एक श्रेष्ठ आध्यात्मिक ग्रंथ आहे आणि मानवाला त्याच्या विकासक्रमात वर उचलून घेणारा ग्रंथ आहे. आहे तिथेच ठेवणारा किंवा खाली खेचणारा ग्रंथ नाही. हेच त्याचे आगळेपण आहे. हीच त्याची महत्ता आहे, असे योगी श्रीअरविंद यांचे प्रतिपादन आहे.
 
 
गीतेच्या पहिल्या अध्यायाचे नाव आहे ’अर्जुनविषाद योग’. हे खूप अन्वर्थक नाव आहे. सांसारिक जीवनाचा आत्मिक जीवनाशी मेळ कसा घालायचा, हा प्रश्न उपस्थित होतो आणि ज्या वेळी उत्तर सापडत नाही, तेव्हा मनुष्याला विषाद होतो. हे संपूर्ण जग कुरुक्षेत्र आहे आणि या कुरुक्षेत्रावर मानवाला वारंवार असा विषाद होतो. हा विषाद होण्याचे कारण असते भ्रमाचा भोपळा फुटणे. न्याय, नीती, सद्भाव आदींचा भ्रम दूर होऊन जेव्हा हे सांसारिक विश्व त्याच्या उघड्यानागड्या रूपात समोर उपस्थित होते त्या वेळी आंतरिक आणि बाह्य विश्वाचा मेळ घालणे दुरापास्त होते. मग विषाद होतो. हा विषाद दूर करण्यासाठी या विश्वाचे स्वरूप जसे आहे तसे स्वीकारण्याची हिंमत धरावी लागते. भारतीय चिंतनाने ती हिंमत केलेली आहे आणि ईश्वर हा सर्जनात्मक आणि संहारात्मक दोन्हीही असल्याचे सत्य प्रतिपादित केले आहे. अन्य कोणीही हे केलेले नाही. भारतीय चिंतन मात्र एकच ईश्वर सर्जन आणि संहार दोन्ही करतो; तो केवळ कल्याणकारी, दयाळू, मायाळू, कनवाळू नाही. त्याचे स्वरूप त्रिविध आहे, असे सांगते. भारतीय चिंतनाचे हे सत्य स्वीकारल्याशिवाय विषाद दूर होऊ शकत नाही. हे विश्व जसे आहे तसे स्वीकार करून, ते जसे असायला हवे तसे कसे होईल याचा विचार करणे हाच विषाद दूर करण्याचा उपाय आहे. गीतेने ते केले असल्याचे श्रीअरविंद यांचे प्रतिपादन आहे.
 
 
संघर्ष हा या सांसारिक जीवनाचा अपरिहार्य भाग आहे. तो कोणालाही टाळता येत नाही. युद्ध हे या अपरिहार्य संघर्षाचे प्रकट रूप आहे, असे प्रतिपादन करून श्रीअरविंद क्षात्र धर्म, युद्धाची भारतीय संकल्पना, भारतीय युद्धनीती आणि समाजव्यवस्थेची वैशिष्ट्ये यांचीही चर्चा करतात. वर्तमान समाजव्यवस्था प्रत्येक व्यक्तीकडून सगळ्याच गोष्टींची अपेक्षा करते आणि समाजउभारणीत व्यक्तीने सगळ्या बाबींचे योगदान द्यावे, अशी अपेक्षा करते. प्रत्येक व्यक्ती तंत्रज्ञ, तत्त्वज्ञ, योद्धा, व्यापारी, कलाकार, पुजारी असं सगळं असायला हवी, ही वर्तमान समाजव्यवस्थेची अपेक्षा असते. यात व्यक्तीच्या स्वधर्माचा विचार होत नाही. त्याला जबरदस्तीने घाण्याला जुंपले जाते. संरक्षणाच्या संदर्भातदेखील अशीच भूमिका असते. प्रत्येक व्यक्तीने समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा केली जाते. यामुळे सगळी सामाजिक व्यवस्था अस्ताव्यस्त होते. मनुष्यजीवनाला आवश्यक अन्य सगळ्या बाबी आणि प्रत्येकाचा स्वधर्म या क्षात्रवृत्तीखाली दबून जातो. भारताने ही अनवस्था टाळून क्षात्रवृत्ती व युद्धकर्म मर्यादित केले होते. त्यामुळे त्याची झळ संपूर्ण समाजाला लागत नव्हती. शिवाय मनुष्यजीवनाला पोषण देणार्‍या अन्य बाबींचाही बळी जात नव्हता. भारतीय युद्धनीतीही अशीच वैशिष्ट्यपूर्ण होती. तिचे हेतू आणि नैतिक नियमांची चौकट यामुळे क्षत्रिय धर्माचे पालन करणारी माणसेही राक्षसी होत नसत. धर्माची रक्षा आणि न्यायाची प्रस्थापना करण्याच्या हेतूला युद्धनियमांची विशिष्ट चौकट राहत असे. त्यामुळे योद्धे आणि युद्ध अनियंत्रित होऊ शकत नसे. युद्ध करणार्‍या माणसांचेही नैतिक उन्नयन या युद्धामुळे होत असे. जगात होणारी युद्धे सत्त्व, रज, तम या गुणांच्या प्रभावाखाली होतात. भारतीय युद्धनीती सात्त्विक गुणांची होती आणि तिने मानवी जीवनातील अपरिहार्य अशा युद्धकर्माच्या माध्यमातूनदेखील मनुष्याच्या आंतरिक विकासाला साहाय्य केले. श्रीकृष्ण गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला अशा युद्धासाठी प्रवृत्त करीत होते, अशी योगी श्रीअरविंद यांची मांडणी आहे.
 
 
युद्धभूमीवर पोहोचल्यावर समोर आप्तजनांना पाहून अर्जुनाला विषाद झाला तेव्हा कृष्णाने त्याला रागावून दूषण दिले आणि युद्ध करण्याचा उपदेश केला हे खरेच आहे; परंतु युद्धाचा उपदेश देताना कृष्णाच्या मनात, नित्शेच्या शूर व्यक्तित्वासारखा भाव नव्हता. शत्रूला नष्ट करून आनंदित व्हावे, शत्रूविषयी मनात द्वेष आणि सूड भावना बाळगून त्याला निर्ममतेने संपवावे, हे कृष्णाला अभिप्रेत नव्हते. नियतीने सोपवलेले धर्मरक्षणाचे कार्य जबाबदारीने करावे आणि ते करताना; जन्ममृत्यूच्या या फेर्‍याचे वास्तव समजून घेऊन; सुखदुःख, हर्ष-खेद, शोक-मोह यापलीकडील अमृतत्त्वाच्या प्राप्तीचा प्रयत्न करावा, हा कृष्णाच्या युद्धास प्रवृत्त होण्याच्या उपदेशाचा आशय आहे.
 
 
जन्ममृत्यूच्या फेर्‍यांचं वास्तव समजून घेऊन युद्ध करण्याचा उपदेश दिल्यानंतरची गीता, हे वास्तव समजावून देण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न सांख्य, योग, वेदांत, भक्ती या सार्‍यांचा समन्वय करणारा आहे. हा समन्वय करताना गीता या मार्गांच्या मूळ शास्त्रांच्या काही गोष्टी धैर्यपूर्वक बाजूला सारते. गीतेचे सांख्य तत्त्वज्ञान सांख्यकारिकेचा जसाच्या तसा स्वीकार करत नाही आणि पतंजलीच्या योगशास्त्राचाही जसाच्या तसा स्वीकार करत नाही. सांख्यशास्त्रानुसार कर्म आणि भक्ती समन्वय शक्य नाही. योगशास्त्रानुसार योग आणि कर्म यांचा समन्वय शक्य नाही. अद्वैत वेदान्तानुसार पूर्ण ज्ञान झाल्यावर किंवा मुक्ती प्राप्त झाल्यावर पुन्हा भक्तीत रमणे शक्य नाही. मात्र गीता या सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करून टाकते. याशिवाय काही तांत्रिक तपशीलदेखील गीता बदलून टाकते. पुरुष आणि प्रकृती यांची त्रिगुणात्मक क्रीडा म्हणजे हा विश्वपसारा हे सांख्य तत्त्वज्ञान गीता स्वीकारते; पण सांख्य तत्त्वज्ञानातील बहुपुरुष कल्पना ती मोडीत काढते. त्याऐवजी ती क्षर आणि अक्षर अशा दोन पुरुषांची कल्पना मांडून; तिसर्‍या परात्पर पुरुषात दोघांचाही विलय घडवते. त्यामुळे अव्यक्त सर्वव्यापी चैतन्य, नानाविध व्यक्त जड रूपात कसे प्रत्ययाला येते, हे कूट सोडवले जाते.
 
 
गीतेच्या पहिल्या सहा अध्यायांत सांख्यांचा ज्ञानयोग आणि योग्यांचा कर्मयोग यांचीच चर्चा आहे. भक्तीचा फक्त किंचित संकेत मात्र आहे, असे श्रीअरविंद यांचे विवेचन आहे. बुद्धियोग कर्माहून अधिक श्रेष्ठ आहे, असे सांगूनही श्रीकृष्ण आपल्याला कर्म करायला का सांगतात, हा अर्जुनाला पडलेला प्रश्न आहे. त्याचे समाधान करताना कृष्ण त्याला सांगतात की, त्याची ही शंका त्याच्या भीतीतून जन्माला आली आहे. कर्म करताना त्याच्या मनात पाप-पुण्य, सुख-दुःख, इहलोक-परलोक इत्यादीविषयी जे भय होते त्यातून अर्जुन शंकित झाला होता. ही भीती कर्माच्या उगमाविषयी असलेल्या अज्ञानातून निर्माण झाली होती. कोणत्या तरी कामनेतून जेव्हा कर्म केले जाते तेव्हा त्यात फळाबद्दल आसक्ती निर्माण होते आणि अपेक्षित फळ मिळाले नाही तर दुःख होते. त्यामुळेसुखदुःखाच्या द्वंद्वातून बाहेर पडायचे म्हणजे कामनांचा त्याग करायला हवा. बुद्धीच्या साहाय्यानेच कामनांचा हा त्याग होऊ शकतो; परंतु त्यासाठी आवश्यक असलेली बुद्धीची स्थिरता आणि व्यापकता सहजसाध्य नाही. त्यासाठी बुद्धीला तिच्याहून वरच्या स्तरावर असलेल्या एखाद्या वस्तूशी जोडून ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रकारे बुद्धीला ईश्वराशी संयुक्त करून ठेवले, की ती अधोगामी होत नाही. परिणामी आत्मविवेक जागा होतो. कर्तेपण आणि भोक्तेपण संपून जाते. मनुष्य कर्मफळाच्या भयातून आणि आसक्तीतून मुक्त होतो अन् तरीही लिप्त न होता कर्मरत राहतो. हे कर्म वेदप्रणीत कर्मकांड किंवा अशांत राजसी मनाचे कर्म राहत नाही. हे कर्म मनुष्याला ब्रह्मनिर्वाणापर्यंत पोहोचवते. हे ब्रह्मनिर्वाण म्हणजे बौद्धांची शून्यावस्था नसून पूर्णावस्था असते, असे श्रीअरविंद म्हणतात.
 
 
मनुष्य एकही क्षण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही, कारण तो प्रकृतीचा गुलाम आहे. कर्म हा प्रकृतीचा स्वभाव आहे. आपली गती पुढे चालावी यासाठी प्रकृती प्रत्येकाकडून कर्म करवून घेते. त्यामुळे कर्मविहीन प्रशांत ब्राह्मी स्थिती ही विकासाची सर्वोच्च अवस्था असली तरीही मनुष्य कर्मविहीन होऊ शकत नाही. हा तिढा कसा सोडवायचा, हा माणसाचा प्रश्न असतो आणि तोच अर्जुनाचाही प्रश्न आहे. गीता या ठिकाणी एक सूक्ष्म बाब लक्षात आणून देते की, बुद्धियोग हा कर्मापेक्षा श्रेष्ठ असला तरीही त्याचा अर्थ अकर्म होणे नाही. तसेच कर्मापेक्षा अकर्म (कर्मशून्यता) श्रेष्ठ नाही. अकर्म शक्य नाही आणि योग्यही नाही, तसेच कर्म ही बुद्धियोगापेक्षा कनिष्ठ अवस्था आहे; मग सर्वश्रेष्ठ ब्राह्मी अवस्था प्राप्त कशी करून घ्यायची? हेच कर्माचे रहस्य आहे आणि इथेच गीतेचे वेगळेपण आहे. गीता कर्मसंन्यास घेऊन अकर्मण्य होण्यास सांगत नाही आणि प्रकृतीच्या हातातील खेळणे होऊन संकुचित अथवा व्यापक अहंकारयुक्त कामनेने कर्म करायलाही सांगत नाही. गीता अहंकार आणि कामना वर्जित करून कर्म करण्याचा उपदेशही देत नाही, कारण ते शक्य नाही. जिथे कर्म असेल तिथे अहंकार आणि कामना असणारच; परंतु त्याने निर्विकल्प ब्राह्मी स्थिती प्राप्त होत नाही. त्यामुळे गीता कर्म सोडून न देता सतत कर्म करण्यास सांगते आणि ते कर्म यज्ञभावाने करायला सांगते. कर्माच्या मुळाशी असलेला अहंकार आणि कामना या यज्ञासाठी म्हणजेच ईश्वरासाठी असाव्यात, असा गीतेचा उपदेश आहे. मात्र ईश्वर म्हणजे विविध देवदेवता नाही, तर या देवदेवतांसकट समस्त विश्व ज्यातून प्रसूत होते ती शक्ती अथवा ते तत्त्व. यज्ञभावाचा हा उपदेश देताना गीतेला वेदोक्त यज्ञसंस्था एवढेच अभिप्रेत नाही, तर जीवनातील प्रत्येक कर्म यज्ञीय भावनेने करावे, असे अभिप्रेत आहे. या ठिकाणी गीता पारंपरिक यज्ञकल्पनेचा विकास करते.
 
 
गीतेची शिकवण पहिल्या सहा अध्यायांत पूर्ण झालेली आहे. नंतरचे 12 अध्याय या शिकवणुकीचा तपशीलवार विस्तार आणि विवेचन करून मूळ शिकवण अधिक स्पष्ट करणारे आहेत. गीतेची ही मूळ शिकवण काय आहे? देशप्रेम, विश्वबंधुत्व, समाजसेवा, समष्टीसेवा, मानवसेवा, मानव जातीचा आदर्श असलेला धर्म; या अंगाने अनेक जण गीतेचा अर्थ लावतात. या सगळ्या चांगल्या बाबी आहेत. मनुष्याला त्याच्या छोट्या अहंकारातून बाहेर काढून व्यापक करणार्‍या आहेत; परंतु छोटा सगळ्यांपासून फटकून राहणारा मी आणि सगळ्यांशी एकरूप होऊन राहणारा व्यापक मी; या दोन अवस्थांच्या पलीकडे आणखी एक तिसरी अवस्था आहे. आत्मचेतनेच्या या तिसर्‍या अवस्थेकडे मनुष्याला घेऊन जाणे हे गीतेचे प्रयोजन आहे. या विश्वप्रकृतीशी बांधून घेतलेल्या, त्रिगुणांनी ओतप्रोत असलेल्या जीवाचा लौकिक संघर्ष आणि त्या संघर्षाच्या परिणामी त्याला जे काही प्राप्त करावयाचे असते ते कर्मवीर व्यक्तींचे प्राप्तव्य किंवा ही विश्वप्रकृती बाजूस सारून एका नित्य प्रशांत स्थितीत कायम वास्तव्य करण्याचा प्रयत्न करणार्‍या संन्यस्त व्यक्तींचे प्राप्तव्य हे दोन्ही गीतेचे आदर्श नाहीत. लौकिक क्षर आणि अलौकिक अक्षर या दोन्हींना आपल्यात सामावून घेणारे भागवत पूर्णत्व हा गीतेचा आदर्श आहे. कर्मप्रधान मनुष्याची कर्मण्यता आणि संन्याशाची विरक्ती या दोन्हीच्या पलीकडील ही भागवत स्थिती आहे. या अवस्थेतील मनुष्य इतरांसारखेच कर्म करेल; पण त्यामागील त्याचा भाव अपूर्व राहील, निराळा राहील. कर्माच्या मुळाशी असलेला लहान वा अति व्यापक काम्य भाव त्याच्या ठायी राहणार नाही. त्याच्या कर्माची प्रेरणा प्रकृतीबद्ध मानवांची प्रेरणा राहणार नाही. त्याची प्रेरणा ही भागवत प्रेरणा राहील. त्याच्या अंतरीचा तो अपूर्व भावच सगळ्यांना त्याच्याकडे खेचून घेईल आणि हळूहळू परंतु निश्चितपणे सगळ्यांना त्या क्षर आणि अक्षर यांच्या पलीकडील भागवत पूर्णतेकडे घेऊन जाईल. या प्रवासात कर्मी आणि संन्यासी या दोहोंच्या चित्तात ज्या शंका, जे संभ्रम निर्माण होतात त्यांचे निरसन गीता करते. त्यातही कर्मी वृत्तीपेक्षा संन्यासी वृत्तीच्या व्यक्तींचे शंकानिरसन करण्यात गीतेने अधिक शक्ती प्रयुक्त केली आहे.
 
 
गीतेने श्रीकृष्णाच्या अवतार घेण्याचे प्रयोजन सांगितलेले आहे. त्याचाही समाचार श्रीअरविंद घेतात. गीतेने म्हटल्याप्रमाणे धर्मसंस्थापना हे अवताराचे प्रयोजन आहे, असे समजले जाते. मात्र श्रीअरविंद यांच्या मते धर्मसंस्थापना ही काही फार मोठी गोष्ट नाही. येशू, बुद्ध वा श्रीकृष्ण यांनी त्यासाठी अवतार घ्यावा एवढे महान ते कार्य नक्कीच नाही. धर्मसंस्थापना ही त्याहून महत् अशा भागवत संकल्पाची एक सहचरी अवस्था आहे. दिव्य जीवनाचे दोन पैलू आहेत. एक आहे ईश्वराचे मनुष्य रूपात अवतरण आणि दुसरे आहे मनुष्याचे ईश्वरी स्वरूपात आरोहण. या दोन्ही बाबी लक्षात न घेतल्यास त्यातून भ्रम आणि एकांगीपणा निर्माण होतो. मानवाला ईश्वरी भावात आरोहण करण्यासाठी साहाय्य करणे हे जर ईश्वरी अवताराचे प्रयोजन नसेल तर त्या अवताराला फारसा अर्थच राहणार नाही, कारण धर्म आणि न्यायाची स्थापना तर ईश्वर आपल्या शक्तीच्या साहाय्याने महापुरुषांच्या, आंदोलनांच्या, ऋषींच्या, राजांच्या, धर्माचार्यांच्या माध्यमातून करू शकतो आणि करत असतो. त्यासाठी त्याला जन्म घेण्याची गरज नाही. मानवाने आपले सिद्धांत, विचार, अनुभव, कर्म ईश्वरी साच्यात घालून रूपांतरित करावे यासाठी उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी भगवान अवतार घेतात. अन्यथा त्यांना येण्याची गरज नाही.
 
 
गीतेतील विभूतीयोगाचा विचार, हीच भूमिका स्पष्ट करणारा आहे. जीवनाच्या विविध कलांमध्ये जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे; त्या माझ्याच विभूती आहेत असे जाण, असे श्रीकृष्ण ज्या वेळी अर्जुनाला सांगतात त्या वेळी ते सामान्य मनुष्याने त्याची सामान्य कक्षा ओलांडून जाण्याचा संकेतच देत असतात. कोणतीही महान व्यक्ती ज्या वेळी सामान्य व्यवहारांच्या वर उठून काही तरी असामान्य कर्म करते तेव्हा ती संपूर्ण मानवी समूहाला वर उचलून घेत असते. मनुष्यातील भागवत शक्तीचा, भागवत प्रकाशाचा तो दाखलाच असतो. मानवी जीवन खालील स्तरावरून वरील स्तरावर जाण्याचे ते उदाहरण असते. ते मानवी जीवनाचे आरोहण असते; परंतु विभूती व अवतार एकच म्हणता येत नाहीत. अवतार हे वरील स्तरावरून खालील मानवी स्तरावर येत असतात. ते ईश्वराचे अवतरण असते. ईश्वरावतार ओळखायचे कसे, हाही एक प्रश्न असतो. लोक एखाद्याच्या चमत्कारांनी त्याला अवतार म्हणू लागतात; परंतु चमत्कार हे काही अवताराचे लक्षण नाही. अवतार हे सामान्य मानवासारखे सुखदुःखे भोगतात. ही सुखदुःखे कशी सहन करायची हे दाखवून देतात. त्याद्वारे मानवी सीमा लांघून पुढे कसे जायचे, हे अवतार शिकवीत असतात. चमत्कार करून असे सीमोल्लंघन शिकवता येत नाही.
 
 
ईश्वरी अवतारांचे कार्य बाह्य घटनांमधून दिसत असले तरी ते बाह्य घटनांपुरते नसते. बाह्य महान घटना प्रकृतीच्या स्थितिगतीने होत राहतात. युरोपातील ीशषेीारींळेप किंवा फ्रेंच राज्यक्रांती यादेखील महान घटना होत्या; परंतु त्या महान आध्यात्मिक घटना नव्हत्या. त्यांच्याद्वारे केवळ बौद्धिक व लौकिक परिवर्तन घडले; परंतु जेव्हा बाह्य संकटांमध्ये काही आध्यात्मिक बीज असते त्या वेळी ईश्वराचे आंशिक अथवा पूर्ण अवतार आविर्भूत होतात. पुराणांतील अवतारांचे कार्य व्यावहारिक, नैतिक, सामाजिक, राजकीय अशाच स्वरूपाचे आहे; परंतु यात अवताराच्या आध्यात्मिक कार्याचा पैलू सुटून जातो. अवतारांचे कार्य दोन प्रकारचे असते. एक मानवाच्या बाह्य जीवनात परिवर्तन आणि दुसरे मानवाच्या आंतरिक जीवनात परिवर्तन. अवतार कधी बाह्य कर्माद्वारे कार्य करतात, तर कधी थेट आध्यात्मिक रूपात. बुद्ध व येशू हे थेट आध्यात्मिक पद्धतीने कार्य करणारे होते, तर श्रीराम आणि श्रीकृष्ण बाह्य कर्माद्वारे कार्य करून गेले; परंतु यापैकी कोणत्याही रीतीने कार्य केले तरीही अवतारांचे कार्य त्यांच्यानंतरही मानवी जीवनाच्या नैतिक, बौद्धिक, वैचारिक, मानसिक आणि आध्यात्मिक जडणघडणीचे कार्य अविरत करत राहते.
 
 
गीता सतत कर्म करण्याचा उपदेश देते. कर्म, विकर्म आणि अकर्म यांचा भेद जाणून घ्यायला सांगते. तसेच मनुष्याचे कर्म हे दिव्य कर्म असायला हवे, असे प्रतिपादन करते. या दिव्य कर्माचे कोणतेही बाह्य लक्षण मात्र गीता सांगत नाही, तर त्याची आंतरिक लक्षणे विशद करते. कर्तृत्वाच्या अभिमानाचा त्याग हे त्या दिव्य कर्माचे पहिले लक्षण होय. निष्कामता हे त्याचे दुसरे लक्षण. आपण नव्हे तर आपल्या माध्यमातून भागवत शक्ती कार्य करते याची जाणीव असणे हे दिव्य कर्माचे तिसरे लक्षण होय. वृत्तीचे समत्व हे दिव्य कर्माचे चौथे लक्षण आहे. जय-पराजय, शुभ-अशुभ, पाप- पुण्य या सार्‍यांबद्दल समत्व भाव. त्रिगुणातीत अवस्था हे दिव्य कर्माचे पाचवे महान लक्षण आहे. गीता अशा दिव्य कर्माचा मानवाला उपदेश देते.
 
 
कर्मयोगाची चर्चा करताना गीतेने समत्व या बाबीला खूप महत्त्व दिले आहे; परंतु पाश्चात्त्य विचारातील समता आणि गीतेने प्रतिपादन केलेली समता यात मोठा आणि मूलभूत फरक आहे. जगातील सगळ्या गोष्टी विषमतेने व्याप्त आहेत. त्यांच्यात फक्त सादृश्य, समीकरण किंवा संतुलन असू शकते; परंतु समत्व नाही. विश्वात व्यापून असलेली विषमता आणि अंतरात्म्याची समत्वाची ओढ यातून बुद्धीच्या साहाय्याने मनाला काबूत ठेवण्याचे, इंद्रिय संयमाचे प्रयत्न केले जातात; परंतु ते अपुरे ठरतात. कारण त्यांचा आधार पुरेसा आणि स्थायी नसतो. याचे विवेचन करताना श्रीअरविंद यांनी सात्त्विक समता, राजसी समता आणि तामसी समता यांची विस्ताराने चर्चा केली आहे. या तिन्ही प्रकारचे प्रयत्न आपापली बुद्धी आणि वृत्ती यानुसार केले जातात आणि ते व्यक्तीला खर्‍या समतेकडे घेऊन जातात; परंतु त्यामुळे व्यक्तीच्या चित्तात खरे समत्व प्रतिष्ठित होत नाही. चित्ताला भगवंताच्या अधीन करून, कामनांच्या बंधनातून मुक्त होऊन, सदैव कर्मरत राहण्यानेच वास्तविक समत्व प्राप्त होऊ शकते, असा गीतेचा अभिप्राय असल्याचे श्रीअरविंद म्हणतात.
 
 
भगवद्गीतेतील विभूती योग, विश्वरूप दर्शन यांचीही विस्तृत चर्चा श्रीअरविंद यांनी केली आहे. आपल्यासमोर उपस्थित झालेल्या कर्माकडे कसे पाहावे, त्याचे वास्तविक स्वरूप काय, आपले कर्तव्य काय इत्यादींचा बोध केल्यानंतर; त्याहून सखोल अशा या सार्‍यांच्या उगमाचा बोधही श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला. ते अर्जुनाला समजलेदेखील; परंतु तरीही त्याचा स्वीकार अर्जुन करीत नव्हता, कारण त्या उपदेशाची अनुभूती नव्हती. त्यामुळे त्याच्या शंका, संशय संपत नव्हते. म्हणून भगवान गुरूंनी त्या सार्‍याचे आणखी विशदीकरण करण्यासाठी विभूतीयोग नामक अध्यायात मार्गदर्शन केलेले आहे. या अध्यायात आपल्या विभूतींबद्दल त्यांनी सांगितले आहेच; पण त्यात आणखीन सखोल अर्थ आहे, असे श्रीअरविंद यांचे प्रतिपादन आहे. संपूर्ण चर-अचर अस्तित्वात ईश्वर सर्वत्र व्याप्त आहे, एवढेच नव्हे तर ईश्वरच या संपूर्ण अस्तित्वाच्या रूपाने अभिव्यक्त होत आहे हे खरे; परंतु त्याच्या अभिव्यक्तीचे हे स्पंदन कमीअधिक असते. ते कुठे अधिक आणि अधिक तीव्र असते, तर कुठे कमी आणि मंद असते. त्यानुसार विभूती या विशिष्ट अधिक तीव्र अभिव्यक्ती होत. ही कमीअधिक अभिव्यक्ती ग्रहण करता आली की, ते ईश्वरी तत्त्व स्वतःला क्रमशः कसे उलगडते याचा बोध होतो. अर्जुनाला हा बोध घडवून त्याचा संशय दूर करण्याचा प्रयत्न भगवंतांनी विभूतीयोगात केलेला आहे.
 
 
हा विभूतीयोग समजून घेतला तरीही अर्जुन शांत झाला नाही. तेव्हा गुरूंनी विश्वरूप दर्शन घडवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विश्वरूप दर्शन घडल्यावर मात्र अर्जुनाचे समाधान झाले. या विश्वमय ईश्वराच्या आतच सगळ्या सर्जन विसर्जनाच्या लाटा निर्माण होतात आणि लय पावतात अन् त्याला अंत नाही. त्यासोबतच ज्या ईश्वरीय शक्तीच्या वर्तुळात हे अखंड सुरू असते त्या वर्तुळाचे आदि, अंत मात्र दिसत नाहीत, समजत नाहीत, त्यांचा थाग लागत नाही. हे पाहून भयचकित आणि विस्मयचकित झालेल्या अर्जुनाने नंतर मात्र गुरूंचे खरे रूप जाणून त्यांच्या उपदेशाचे पालन केले, असे विश्लेषण योगी श्रीअरविंद करतात.
 
 
कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी संपूर्ण मानवजातीला तिच्या कर्ममय जीवनाचे रहस्य समजावून सांगितले. या जीवनाचा अर्थ, त्याचे विहित कर्म, त्या कर्माचे मूळ, त्या कर्माचे परिणाम, हे सगळे करताना त्याकडे पाहण्याची दृष्टी आणिमनःस्थिती, निर्लिप्त होऊन आणि ईश्वरशरण वृत्तीने कर्म कसे आणि का करायचे याचा बोध भगवंतांनी घडवलेला आहे. सामान्य मानवी पातळीवरील भावभावनांचा खेळ आणि त्यापोटी निर्माण होणारा संघर्ष; यापलीकडील अस्तित्वाच्या आदी संघर्षाचे आणि त्यातील मानवी कर्तव्याचे विवेचन म्हणजे गीता होय. भक्तीयुक्त ज्ञानमय कर्म हे त्याचे सार होय, असा श्रीअरविंद यांचा निष्कर्ष आहे.