विवेक फिल्म्स निर्मित... ‘मु. पो. बोंबिलवाडी’ चित्रपटामध्ये प्रशांत दामले साकारणार हिटलर

विवेक मराठी    17-Oct-2024
Total Views |
movie
1 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार्‍या ‘मु. पो. बोंबिलवाडी’  या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे, तर निर्मिती मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक फिल्म्सचे भरत शितोळे यांची आहे.
‘कोण होणार हिटलर?’ या उभ्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे. ‘मु. पो. बोंबिलवाडी’ या 1 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार्‍या बहुप्रतीक्षित चित्रपटात हिटलर भूमिकेत आहेत ज्येष्ठ व लोकप्रिय रंगकर्मी प्रशांत दामले. तीन लागोपाठच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळविणार्‍या परेश मोकाशी यांचा हा चित्रपट असल्याने रसिकांमध्ये जी उत्कंठा लागून राहिली आहे, ती हिटलरच्या भूमिकेत प्रशांत दामले असल्याचे जाहीर झाल्याने आता दुपटीने वाढली आहे.
 
 
‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’, ‘वाळवी’ या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांच्या हॅट्ट्रिकनंतर मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी घेऊन येत असलेल्या ‘मु. पो. बोंबिलवाडी’मधील हिटलरच्या भूमिकेमध्ये कोण आहे, हा लाखमोलाचा प्रश्न रसिकांना पडला होता. हिटलरचा शोध घेण्यासाठी खरे तर प्रेक्षकांचा कल घेण्यात आला आणि त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर यांचीही नावे या स्पर्धेत पुढे होती. मात्र अंतिमतः शिक्कामोर्तब झाले ते प्रशांत दामले यांच्या नावावर.
 
 
‘कोण होणार हिटलर?’ या प्रश्नावरील पडदा लेखक, दिग्दर्शक परेश मोकाशी, निर्माते मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक फिल्म्स, मयसभा करमणूक मंडळी यांनी बुधवारी हॉटेल ऑर्किड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उघडला आहे. चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे.
 
विवेक फिल्म्स विषयी...
 
* चित्रपट हे सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणार्‍या सर्वांना व्यावसायिक आणि सामाजिकदृष्टया एका व्यासपीठावर आणण्यासाठी सामाजिक आणि कलात्मक दृष्टिकोनातून विवेक फिल्म्स स्थापन करण्यात आली आहे.


vivek
 
* चित्रपट क्षेत्रातील विविध संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्यातून भविष्यात विविध उपक्रम हाती घेण्यात येतील.
 
* आजच्या काळात लोकांच्या मनावर जे विविध प्रकारचे तणाव आहेत, त्यात एखादी त्यांना खळखळून हसवणारी कलाकृती आवश्यक आहे. ‘बोंबिलवाडी’सारखी कलाकृती ही उत्तम अनुभूती देणारी आहे, या भूमिकेतून याच्या निर्मितीसाठी आमचा सहभाग आहे.
 
  
हिटलरच्या भूमिकेबद्दल विचारले असता प्रशांत दामले म्हणाले, मुळात हिटलर म्हटले की, आपल्या डोळ्यासमोर एक आकृती येते, प्रकृती येते. मी माझ्या आयुष्यात असला हिटलर केला नाही आणि करणारही नाही. हे जे पात्र आहे त्याला हिटलर का म्हणावे, हा प्रश्न पडावा असे हे पात्र आहे. ते करायला मिळावे आणि परेश, मधुगंधा बरोबर करायला मिळावे हे महत्त्वाचे. परेशबरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे. दिग्दर्शक कसा असावा तर तो असा असावा. तो एक अप्रतिम दिग्दर्शक आहे.
 
 
आजच्या मराठी चित्रपटांबद्दल विचारल्यावर दामले म्हणाले, मराठी चित्रपटांबद्दल काही मला फार गती नाही, नाटकांबद्दल विचारले तर मी सांगू शकेन. मी फार कमी चित्रपट केले आहेत. दिग्दर्शक सांगेल तसे काम करणे, ही माझी प्रकृती आणि वृत्ती आहे. कोरी पाटी घेऊन बसले की काम करायला सोपे जाते.  नाटकातीलच सर्व मंडळी असल्याने नाटकाचेच चित्रीकरण करतोय की काय, असा भास होतोय मला.
 
 
movie
 
चित्रपटाच्या निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, आम्ही आत्तापर्यंत जेवढे चित्रपट केले त्यानिमित्ताने जेव्हा आम्ही लोकांना प्रीमियर किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटायचो तेव्हा लोक परेशला आवर्जून सांगायचे की, तुम्ही ‘बोंबिलवाडी’ नाटक परत आणा. माझेही हे आवडते नाटक आहे, कारण ती एक लाफ्टर राइड आहे. हळूहळू आम्ही जेव्हा याबाबत विचार करायला लागलो तेव्हा आम्हाला असे वाटायला लागले की, या नाटकावर चित्रपट का आणू नये? मग आम्ही ठरवले की, या संकल्पनेचे चित्रपटीकरण करून त्याचा चित्रपट करायचा. त्यात आनंदाची बाब म्हणजे प्रशांत दामले यांनी हिटलरचे काम करायला हो म्हटल्यामुळे चित्रपटाचे मूल्य वाढले आहे. चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. यात प्रशांत दामले यांच्याबरोबरच वैभव मांगले, प्रणव रावराणे, मनमीत पेम, सुनील अभ्यंकर, गीतांजली कुलकर्णी, रितिका श्रोत्री, अद्वैत दादरकर हे कसलेले कलाकार आहेत, त्यामुळे एक चांगली भट्टी जमून आली आहे. त्यांचा अभिनय उत्तम झाला आहे. ही एक धमाल लाफ्टर राइड झाली आहे.
 
 
हिटलरच्या निवडीबाबत बोलताना लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले, आमचा हिटलर कसा असावा याबाबत चर्चा सुरू होती. हिटलर म्हणजे क्रूर, जगज्जेता, कठोर अशी त्याची प्रतिमा आहे; पण नाटकाचा फार्सिकल बाज पाहता, आमचा हिटलर ‘क्यूट’ असावा अशी एक टूम निघाली. आता क्यूट हिटलर कोण, असा प्रश्न आल्यावर महाराष्ट्रात क्यूट म्हणून ज्याची ओळख आहे, असे एकच नाव पुढे आले आणि ते म्हणजे प्रशांत दामले. नाटकामधून या कथेचे चित्रपटात रूपांतर होताना बदल झाले. मग त्यात वयोगट आला, आज त्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे, याबद्दल चर्चा झाली, त्यातून मग कलाकारांची निवड झाली आणि ती चपखल आहे. त्यातून ही कलाकार मंडळी त्या त्या पात्रांमध्ये अगदी फिट्ट बसली आहेत आणि ते तुम्ही पाहालच.
 
प्रशांत दामले यांनी हिटलर कसा दिला आहे, असे तुम्हाला वाटते, असे विचारले असता, मोकाशी म्हणाले, हा प्रश्न मला खरे तर खर्‍या हिटलरला विचारावासा वाटतो की, ‘काय रे तुझे जमले आहे का? तुला असे वागायला जमेल का आयुष्यात?’
 
 
चित्रपटाचे निर्माते विवेक फिल्म्सचे भरत शितोळे म्हणाले, फिल्म निर्मिती क्षेत्रात आलो आणि ठरवले की, मराठी व हिंदी चित्रपट करायचे; पण नेमका कोणता चित्रपट करायचा वगैरे विचारात असताना परेशजी आणि मधुगंधाजींनी ‘मु. पो. बोंबिलवाडी’चा विषय सांगितला. कथा ऐकताच क्षणी मला वाटले की, विवेक फिल्म्सनी या चित्रपटानेच सुरुवात करायला हवी. त्यानिमित्ताने विवेक फिल्म्स आणि मयसभा एकत्र आलो. आम्हाला परेश मोकाशी व मधुगंधाजी यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. बरेच काही शिकता आले त्यांच्याकडून. परेशजी हिटलरच्या भूमिकेमध्ये प्रशांत दामलेजींसाठी आग्रही होते. प्रशांत दामलेजी जेव्हा त्या गेटअपमध्ये आले तेव्हा वाटले की, परेशजींची व्हिजन बरोबर आहे. इतका परिपूर्ण आणि क्यूट हिटलर दुसरा असूच शकत नाही. आम्ही यापुढेही एकत्र काम करत राहू.
 
 
हा चित्रपट प्रेक्षकांनी का पाहावा, असा प्रश्न विचारला असता मोकाशी यांनी मिश्कील उत्तर दिले आहे. आजकाल व्यायाम नीट होत नाही, त्यामुळे फुप्फुसांनाही व्यायाम होत नाही. ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ एवढा हसवतो की, त्यामुळे फुप्फुसांना खूप व्यायाम होतो. हे चित्रपट पाहण्याचे आरोग्यदायी कारण आहे.