मार्तंड जे...

विवेक मराठी    17-Oct-2024   
Total Views |
girish prabhune biography in marathi
  
पद्मश्री गिरीश प्रभुणे हे सामाजिक कार्यकर्ते, सिद्धहस्त लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. सामाजिक समरसता मंच, भटके विमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद, समरसता गुरुकुलम इत्यादी संस्थांच्या जडणघडणीमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेले गिरीश प्रभुणे जवळजवळ पन्नास वर्षे सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. अलीकडेच 19 ऑक्टोबर रोजी ते पंचाहत्तर वर्षांचे झाले. त्यानिमित्ताने त्यांच्यासोबतच्या क्षणांना शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
  
बहुधा शंकराचार्य न्यासाचे सभागृह. भारतीय स्त्री शक्तीचे प्रदेश अधिवेशन. संपूर्ण सभागृहात महिला. अपवाद फक्त दोन. एक मी आणि माझ्या शेजारी बसलेला दाढीवाला माणूस. खादीचा ढगळ झब्बा, खांद्यावर शबनम. शबनम कसली झोळीच ती, गच्च फुगलेली. डोळे बंद करून, मान थोडी तिरकी करून बसलेल्या त्या दाढीवाल्या बाबाची इथे का उपस्थिती? माझ्या मनात प्रश्न होता, कारण माझ्या उपस्थितीला औचित्य होते. भारतीय स्त्री शक्तीने आपल्या अधिवेशनानिमित्त आयोजित केलेल्या काव्यलेखनस्पर्धेचा मी विजेता होतो. त्याचे झाले असे की, ‘नवशक्ति’मध्ये बातमी वाचली आणि रागिणी चंद्रात्रेच्या पत्त्यावर एक दीर्घ कविता पाठवून दिली. मध्ये बराच काळ गेला. एक दिवस सकाळी सकाळी बन्सीजी घरी आले आणि म्हणाले, “तुला नाशिकला जायचे आहे. तुझ्या कवितेला बक्षीस मिळाले आहे.” माझ्याशी संपर्क साधणेे शक्य न झाल्याने रागिणीताईंनी बन्सीजींना फोनवरून बातमी दिली आणि बन्सीजी ही बातमी घेऊन घरी आले. त्या क्षणी वाटले, संपर्काच्या बाबतीत संघाइतके तगडे नेटवर्क दुसरे कोणतेही नसेल. मी आणि उषा पहिल्यांदा नाशिकला गेलो. सोबत एक वर्षाचा ओंकार. 
 
तर मी काव्यलेखन स्पर्धेचा विजेता होतो म्हणून या अधिवेशनात सहभागी झालो; पण माझ्या शेजारी बसलेला हा दाढीवाला बाबा इथे कशासाठी आला असेल? हाच प्रश्न सारखा सारखा मनात उभा राहत होता. सत्र संपले आणि लगेच समारोप व बक्षीस वितरण सोहळा सुरू करत आहोत, अशी वर्षा पवारांनी घोषणा केली आणि समारोप सत्राचे प्रमुख वक्ते गिरीश प्रभुणे यांना व्यासपीठावर निमंत्रित केले. सभागृहात प्रचंड टाळ्या वाजू लागल्या. त्या आवाजात माझ्या शेजारी बसलेला दाढीवाला बाबा संथपणे उठला आणि व्यासपीठाकडे गेला. तो व्यासपीठावर स्थानापन्न होईपर्यंत टाळ्यांचा गजर सुरू होता. गिरीश प्रभुणे. आपण गिरीश प्रभुणे यांच्या शेजारी बसलो होतो. गेली चार-पाच वर्षे या माणसाच्या रसाळ कथा कार्यकर्ता म्हणून ऐकत होतो. तो हाच माणूस? सुनील ढेंगळेनी सांगितलेली ‘मुक्तिनगर मगर सांगवी’ची गोष्ट. यमगरवाडीच्या माळावर उभी राहत असलेली सामाजिक समरसतेची प्रयोगशाळा. अमित घाट्ये यमगरवाडीच्या प्रकल्पात कार्यकर्ता म्हणून जातानाचा निरोप समारंभ. असे अनेक ठळक प्रसंग आणि माहिती झटकन डोळ्यासमोर उभी राहिली. ज्या गोष्टी गिरीश प्रभुणे नावाच्या माणसांशी जोडलेल्या आहेत तोच माणूस आज आपण पहिल्यांदा पाहिला. आज आयुष्यातील पहिला पुरस्कारही त्यांच्या हस्ते मिळणार. आपण भाग्यवान. कार्यक्रम सुरू झाला. प्रमाणपत्र देताना गिरीश प्रभुणे एकच वाक्य बोलले, “भरपूर लिखाण करा.” बक्षीस वितरण झाले. प्रमुख वक्ते म्हणून गिरीश प्रभुणे बोलायला उभे राहिले. त्यांनी आपल्या मांडणीत पारधी महिलांचे दुःख, वेदना मांडल्या. भटक्या विमुक्त जातींची परवड मांडली. या मांडणीत विद्रोह नव्हता, नकार नव्हता; पण आपल्या पूर्वजांनी केलेल्या सामाजिक चुकांवर नेमकेपणाने त्यांनी बोट ठेवले होते. गिरीश प्रभुणे बोलत होते आणि सभागृहात भयाण शांतता असली तरी प्रत्येकाच्या मनात कालवाकालव सुरू झाली होती.
 


vivek 
 
तर अशी ही पहिली भेट. मध्ये दोन वर्षे यमगरवाडीच्या प्रकल्पातील केवळ माहिती मिळत राहिली. कधी समरसता मंचाची बैठक, कधी बन्सीजींबरोबर मारलेल्या गप्पा, यातून गिरीश प्रभुणे अधिक कळत गेले.
 
 
सन 2003 मध्ये ‘सा. विवेक’मध्ये कामाला लागलो आणि एका नव्या जगात प्रवेश झाला. नुकतेच ‘सा. विवेक’ने गिरीश प्रभुणे यांचे ‘पालावरचं जिणं’ प्रकाशित केले होते. यमगरवाडीच्या प्रकल्पात व्रतस्थ राहून गिरीश प्रभुणे यांनी भटक्या विमुक्तांच्या विविध समूहांचा सखोल अभ्यास केला आणि अनुभवजन्य लिखाण ‘विवेक’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाले, त्याचे हे पुस्तक. बन्सीजी यांच्या घरी हे पुस्तक पाहिले होते, वाचले नव्हते. ‘विवेक’मध्ये चार महिन्यांत वितरण विभागातून संपादकीय विभागात आलो आणि पहिल्यांदा हे पुस्तक वाचून काढले. काही कळले नाही, कारण मी ज्या भागातून आलो तेथे फक्त मरीआई आणि नंदीबैलवाले, क्वचित एखाद्या वेळी गोसावी सोडला तर अन्य कोणत्याही भटक्या विमुक्त जातींची भटकंती नव्हती. या पुस्तकात अशा असंख्य जातींचे वर्णन केले होते. जे मी कधीही पाहिले नव्हते, ते नवे जग त्यानिमित्ताने माझ्यासमोर उभे राहिले.
 
 
पालावरचं जिणं या पुस्तकातून
पालावरचं जिणं
ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.

https://www.vivekprakashan.in/books/life-in-bhatke-community/


vivek

 
  
जानेवारी महिना संपत आला आणि एक दिवस रमेश पतंगे यांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. पतंगेंसोबत एक व्यक्ती बसली होती. “हे डॉ. बिपिन शहा. जोगेश्वरीला त्यांची लॅब आहे. यमगरवाडीच्या प्रकल्पाला लागणारे सामान त्यांनी जमा केले आहे. ते सामान घेऊन तू यमगरवाडीला जा. तशी तयारी कर. महाशिवरात्रीला यमगरवाडीत स्नेहमेळा भरतो. तू पहिल्यांदा जातो आहेस. तेव्हा सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घे.” मी हो म्हणालो. माझ्या मनात यमगरवाडीला जायचे होते; पण मला कोण पाठवणार? हा प्रश्न होता; पण तो प्रश्न आता निकाली निघाला होता. जोगेश्वरीहून धान्य, कपडे, शिलाई मशीन, खेळणी, औषधे अशा असंख्य वस्तूंनी भरलेल्या ट्रकमध्ये बसलो आणि यमगरवाडीकडे निघालो.
 
 
पूर्वेकडे लाल गोळा डोकावू लागला आणि मी ट्रक घेऊन यमगरवाडीत पोहोचलो. महाशिवरात्रीची जोरदार तयारी सुरू होती. ट्रकमधून उतरलो तर समोर गिरीश प्रभुणे उभे. ‘कसा झाला प्रवास?‘ त्यांनी खांद्यावर हात ठेवला आणि आम्ही दोघे खोलीकडे निघालो. पत्र्यांची खोली. एका कोपर्‍यात एक टेबल, त्यावर पुस्तक, फाइलची रास. दुसर्‍या कोपर्‍यात लोखंडी कॉट. त्यावर सतरंजी अंथरलेल्या. आतल्या बाजूला न्हाणीघर. या एवढ्या जागेत गिरीश प्रभुणे राहतात आणि भटके विमुक्त जातीजमातींसाठी काम करतात. कमीत कमी गरजा आणि त्या भागवण्यासाठी कमीत कमी खर्च, या तत्त्वावर इथे काम चालते आहे, हे एका क्षणात लक्षात आले. आज दिवसभर प्रकल्पात वेगवेगळे कार्यक्रम होते आणि ते पाहून रात्री परत मुंबईकडे रवाना व्हायचे होते. आंघोळ केली. मी गिरीश प्रभुणे यांच्याजवळ येऊन उभा राहिलो. “मला प्रकल्प समजून घ्यायचा आहे.” गिरीश प्रभुणे काही नोंदी करण्यात गुंतले होते. माझ्याकडे पाहत म्हणाले, “पहा ना. तुमच्या दृष्टीने समजून घ्या. इथे आज जवळपास सर्व प्रमुख कार्यकर्ते आले आहेत. त्यांना भेटा. मग तुम्हाला प्रकल्पामागची संघप्रेरणा कळेल आणि हो, दुपारी संपूर्ण बांबू केंद्राचे सुनील देशपांडे बांबू उद्योगाची माहिती सांगणार आहेत, ती नक्की ऐका. भविष्यातील पर्यावरण, प्रदूषण, महागाई अशा असंख्य समस्यांची उत्तरे सुनील देशपांडे यांच्याकडे आहेत.” गिरीश प्रभुणे यांच्या सूचनेनुसार प्रकल्पात फिरू लागलो. दादा इदाते, मधुसूदन व्हटकर, चंद्रकांत गडेकर, महादेव गायकवाड, डॉ. सुवर्णा रावळ, तुकाराम माने, महादेव सरडे अशा अनेक मान्यवरांच्या ओळखी झाल्या. नरसिंग, उमाकांत, उमेश जोगी, लक्ष्मण सुपनार, ज्ञानेश्वर भोसले, संजय विभुते असे तरुण कार्यकर्ते जिवाभावाचे दोस्त झाले.
 
 
सामाजिक जाणिवेतून भटक्या विमुक्त जातींची उन्नती घडवून आणण्यासाठी जो संघप्रयोग सुरू झाला त्याला आता दहा-बारा वर्षे झाली होती आणि त्याचे परिणाम दिसून येऊ लागले होते. ज्यांना कोणतीही ओळख नाही अशा भटक्या समाजातील मुलंमुली शिक्षण घेत होती, तर त्या त्या समाजातील तरुण कार्यकर्ते म्हणून काम करू लागले होते. गिरीश प्रभुणे यांनी केलेल्या पेरणीची ती फलश्रुती होती. ‘आपण सारे हिंदू, आपल्या सर्वांचे पूर्वज एकच. आपण सारे जण भारतमातेचे पुत्र’ ही भावजागृती झाली होती आणि नकार, विद्रोह यांना थारा न देता ‘बंधुभाव’ हाच धर्म मानणारी जनचळवळ विकसित झाली होती. त्या चळवळीचे नेतृत्व गिरीश प्रभुणे करत होते. ‘परबुने काका’ हीच त्यांची चळवळीतील ओळख. तीच माझ्यासाठीही स्नेहबंधाची गाठ झाली. गिरीश प्रभुणे माझ्यासाठी फक्त काका झाले.
 

vivek 
 
यमगरवाडीकडे वारंवार जाणे होऊ लागले. कधी काका भेटत, कधी कुठे तरी भटकंतीला गेलेले असत; पण जेव्हा जेव्हा ते भेटत तेव्हा रसरशीत अनुभवाच्या प्रचंड प्रवाहाच्या काठावर आपण उभे आहोत आणि त्या प्रवाहातील काही तुषार आपल्याला पुलकित करत असल्याचा भास होई. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतकर्‍यांच्या खळ्यादळ्यात जाऊन कर्मवीर भाऊराव पाटलांनी पोरांना आपल्या अंगाखांद्यावर उचलून शाळेत आणले आणि बहुजन समाजात ज्ञानगंगा प्रवाहित झाली. स्वातंत्र्योत्तर काळात या ज्ञानगंगेने सिंचन केलेले मळे फुलताना दिसले. काकाही तेच काम करत आहेत. केवळ शिक्षण नाही तर सन्मान, सुरक्षा यांच्यापासून कोसो दूर असलेल्या भटक्या विमुक्त जातीजमातींमध्ये जाऊन काम करत आहेत. भटक्या विमुक्तांच्या पोराटोरांचे पालक होऊन त्यांना घडवत आहेत. भटक्या विमुक्तांवर होणार्‍या सामाजिक व राजकीय अन्याय-अत्याचाराविरुद्ध ठामपणे लढत आहेत. हे सारे पाहत होतो, समजून घेत होतो आणि हळूहळू यमगरवाडी माझ्यात भिनू लागली होती.
 
 
“यमगरवाडीच्या प्रकल्पासाठी आपल्याकडे देणग्या येतात. त्याचा हिशेब ठेवणे, देणगीदार व्यक्तीला आभाराचे पत्र, पावती पाठवणे हे काम यापुढे तुला करावे लागेल.” संपादक रमेश पतंगे यांनी आदेश दिला आणि मी यमगरवाडी प्रकल्पाशी घट्ट जोडला गेलो. दर महिन्याला यमगरवाडीला जात होतोच; पण आता प्रत्यक्ष कामात सहभागी व्हायची संधी मिळाली होती. ‘सा. विवेक’ आणि ‘विवेक’चे वाचक प्रकल्पाचे मुख्य आधार, प्रकल्पाच्या गरजा नियमित अंकातून मांडाव्यात आणि त्या पूर्ण करण्यासाठी वाचक-हितचिंतकांनी भरभरून द्यावे, अशी त्या वेळी स्थिती होती. दररोज दोनचार धनादेश नाही, तर मनीऑडर येत. या सर्वांना पावत्या पाठवाव्या लागत. कधीकधी परस्पर यमगरवाडीला धनादेश जात आणि पावतीची मागणी विवेक कार्यालयात होई. अशा वेळी तारेवरची कसरत करावी लागे. धनादेश कुणी घेतला, कुठल्या बँकेत जमा केला, देणगीदाराचा पत्ता काय, अशा सार्‍या गोष्टींचा पाठपुरावा करावा लागे आणि तीच मोठी कसरत असे. काका प्रवासात, प्रकल्पात नक्की माहिती देईल असे कोणी नाही. मग काकांचाच पाठपुरावा करावा लागे आणि तो खूप जिकिरीचा असे. काका कुठे आहेत? कोणत्या परिस्थितीत आहेत? सोबत कोण आहे? याचा विचार न करता मी पावतीचा तगादा लावत असे. कधीकधी या पाठपुराव्याचा वैताग येई. दररोज फोन करून विचारणा केल्यावर काकाही वैतागून जात असत; पण जेव्हा प्रत्यक्ष भेटत तेव्हा म्हणत, “तू योग्य काम करतो आहेस. देणगीदारांना पावती मिळालीच पाहिजे. तो आपल्यावरच्या विश्वासाचा भाग आहे. मीच तुला वेळेत माहिती देऊ शकत नाही, तुला त्रास होतो.” काका बोलले आणि माझ्या मनावरचा ताण कमी झाला.
 
 
एक दिवस काका प्रभादेवी कार्यालयात आले. पुस्तकाचा विषय सुरू होता. ‘विवेक’च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचे पुस्तक करायचे होते. लेखाचे संकलन झाले, लेआऊटही झाले. फक्त मुखपृष्ठ बाकी होते. एकूण विषय पाहता काय करावे सुचत नव्हते. तोच विषय पुस्तकाच्या नावाचा. एकूण आवाका लक्षात घेऊन नाव निश्चित करायचे होते. काकांशी बोलताना मी माझ्या मर्यादा सांगितल्या. “ते तुम्ही ठरवा. मला त्यातील काही कळत नाही.” काकांनी चेंडू माझ्या पारड्यात ढकलला. झालं. मुखपृष्ठ आणि नाव यावर विचार करू लागलो. एक दिवस सुधीर खेडेकरांच्या ऑफिसमध्ये बसलो असताना पितळी वॉलपीसवर नजर गेली आणि सूर सापडला. नाव नक्की झाले. ‘लोक आणि संस्कृती’. तोच पितळी वॉलपीस स्कॅन करून मुखपृष्ठ तयार केले. पुढच्या भेटीत काकांनी त्यावर पसंतीची मोहर उमटवली. “मला हेच अपेक्षित होते.” काका बोलले आणि मी भरून पावलो. दोनचार वर्षांपूर्वी ‘सा. विवेक’ने काकांचे पुस्तक प्रकाशित केले. ‘नागपूर तरुण भारत’मधील लेखाची निवड करण्याचे आणि पुस्तकाचे नाव निश्चित करण्याचे स्वातंत्र्यही मला मिळाले. एकदा लेखानुक्रम तपासून पाहा, असे म्हटल्यावर काकांनी सांगितले, “तू पाहिला आहेस ना, झालं तर मग आणि नावही खूप अर्थपूर्ण निवडले आहेस, परिसांचा संग.” काकांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. इतक्या वर्षांनंतर माझ्या लक्षात आले की, काका फार प्रतिक्रिया देत नाहीत. दिली तर अगदी मोजक्या शब्दांत आणि अर्थपूर्ण.
 
 
vivek
 
याच पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त काकांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. नवी मुंबई, वाशी येथील साहित्य संघाच्या सभागृहात जवळजवळ दोन तास मुलाखत चालली. इतक्या वर्षांच्या परिचयाच्या आधारे मी मोजके चार-पाच प्रश्न काढून काकांना दाखवले होते. “छान प्रश्न आहेत. संघाच्या माध्यमातून सुरू असणार्‍या वाटचालीचा आपल्याला आढावा घेता येईल.” काका बोलले. खरं तर काकांच्या सामाजिक जीवनाला पन्नास वर्षे पूर्ण झाली होती. विविध विचारधारांतील मान्यवर काकांचे मित्र झाले होते. निमगाव म्हाळुंगी, यमगरवाडी, समरसता गुरुकुलम यामधील काकांचे योगदान अधोरेखित करता येतील असे प्रश्न मी तयार केले होते. प्रत्यक्ष मुलाखत सुरू झाली आणि काकांनी ’मी’ बाजूला ठेवून ’आम्ही’, ‘आपण’वर जोर दिला. संघाचे भटक्या विमुक्त जातीमधील काम आणि त्याचे परिणाम मांडता मांडता सामाजिक ताणाबाणा व उद्ध्वस्त झालेला गावगाडाही मांडला. मुलाखत रंगली. ज्या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त मुलाखत होती त्यापासून अलिप्त राहून काका भरभरून बोलले. ही मुलाखत घेताना मनात धाकधूक होती. एक तर मी अशा प्रकारची प्रकट मुलाखत पहिल्यांदा घेत होतो आणि काकांचा व्यासंग, कार्यनिष्ठा, सामाजिक प्रभाव यांच्या तुलनेत मी कुठेही बसत नव्हतो. तरीही माझ्यासारख्या नवागताला काकांनी सांभाळून घेतले. एखादा विषय कसा सुरू करावा आणि अनुभवजन्य संचिताच्या आधारे तो नेमकेपणाने कोठे थांबवावा, हे मला मुलाखतीतून शिकता आले.
 
 
काकांची चार पुस्तके ‘सा. विवेक’ने प्रकाशित केली. त्यांचा स्वतःचा वाचकवर्ग तयार झालेला आहे. संघ स्वयंसेवक, ‘विवेक’चे वाचक हे त्यांचे चाहते; पण या वर्तुळापलीकडे मराठी साहित्यविश्वात काकांनी मोलाची भर घातली आहे. त्यांची ‘पारधी’ कादंबरी राजहंस प्रकाशनने प्रकाशित केली. अल्पावधीतच अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. विद्यापीठातील अभ्यासक्रमात या कादंबरीचा समावेश झाला. महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. मला आठवते, दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात या कादंबरीचा प्रकाशन सोहळा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने आयोजित केला. या वेळी दोन परस्परविरोधी विधाने केली गेली. रवी साठे म्हणाले, ‘’ही कादंबरी खूपच रोमहर्षक असून एकदा हाती घेतली की पूर्ण वाचून होईपर्यंत खाली ठेवण्याची इच्छा होत नाही.” प्रमोद महाजन म्हणाले, ’‘या पुस्तकात जे समाजवास्तव मांडले आहे, ते अंगावर काटा आणणारे आहे. एका वेळी दोन-तीन पानांपेक्षा अधिक वाचता येत नाही इतके प्रत्ययकारी लिखाण झाले आहे. हे पुस्तक सलग वाचता येत नाही.” कार्यक्रम संपल्यावर काकांना विचारले, ’‘वरीलपैकी खरे मत कोणते?” काका म्हणाले, ’‘दोन्हीही मते खरी आहेत. ज्याची जशी दृष्टी तसा त्याचा अनुभव.” खरं तर कादंबरीच्या रूपात लिहिलेले ‘पारधी’ हे चळवळीचे आत्मकथन आहे. संघप्रेरणेतून भटक्या विमुक्त जातींसाठी काम करताना काका त्या समाजातील तळागाळात पोहोचले. त्यांच्या सुखदुःखाशी समरस झाले. त्यातून ‘पारधी’ या कादंबरीचा जन्म झाला. अनुभवसिद्ध लेखन आणि समरसतेचा भाव या दोन्ही गोष्टींचा सुरेख मिलाफ या कादंबरीत अनुभवता येतो. काकांनी आजवर केलेले लिखाण हे स्वान्तः सुखाय नाही. कामाची आवश्यकता लक्षात घेऊन ते लिखाण करतात. म्हणूनच सिद्धहस्त लेखकावर समर्पित कार्यकर्ता नेहमी मात करत राहतो. लेखक म्हणून काकांचे अनेक प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत. उदाहरणार्थ नामांतर चळवळीवर काकांनी कादंबरी लिहायला घेतली; पण अजूनही ती पूर्ण झालेली नाही. जेव्हा केव्हा ही कादंबरी प्रकाशित होईल तेव्हा मराठवाड्यातील सामाजिक वास्तव आणि नामांतराच्या लढ्याचा इतिहास वेगळ्या प्रकारे समोर येईल हे नक्की.
 
 
काकांचे सार्वजनिक जीवन पन्नास वर्षांहून अधिक आहे. चिंचवडमध्ये काकांच्या प्रयत्नातून सुरू झालेली क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती पन्नास वर्षे जुनी आहे. सध्या या संस्थेचे काका अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. संघ प्रचारक, ग्रामायण, यमगरवाडी आणि आता चिंचवडमधील समरसता गुरुकुलम् असा काकांचा संस्थात्मक प्रवास झालेला आहे. साधारणपणे 2006 साली समरसता गुरुकुलम् सुरू झाले आणि याच परिसरात 2007 साली काकांनी कारागीर परिषद आयोजित केली होती. ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या कारागिरांचा, त्यांच्या पारंपरिक ज्ञानाचा विसर आपल्या समाजाला पडला आणि गावगाडा मोडला, हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून ही परिषद झाली. भय्याजी जोशी, डॉ. प्रभाकर मांडे, रवींद्र शर्मा, सुनील देशपांडे असे मान्यवर या कारागीर परिषदेला उपस्थित होते. एकूण चार दिवसांच्या या परिषदेदरम्यान अस्तंगत झालेल्या अनेक पारंपरिक कलांविषयी चर्चा झाली. एका एका सत्रात प्रचंड वैचारिक घुसळण झाली. या कारागीर परिषदेच्या अनुभवातून पुढे काही वर्षे काकांनी चिंचवड येथे कारागीर परिषद आयोजित करून देशभरातील मान्यवर येत्या परिषदेसाठी निमंत्रित केले.
 
 
काका बहुरूपी आहेत. ते उत्तम साहित्यिक आहेत, त्याचप्रमाणे तरल कवीही आहेत. मला आठवते, चिंचवडमध्ये समरसता साहित्य संमेलन होते. भीमराव गस्ती अध्यक्ष. नामदेव ढसाळ उद्घाटक. एकूणच विषयाला धरून नीटपणे चालणार्‍या संमेलनात केवळ टाळ्यांसाठी कवी संमेलनाच्या अध्यक्षांनी भारतमातेविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले. पुढच्या रांगेत बसलेले काका तडक सभागृहाबाहेर गेले आणि मागच्या दाराने व्यासपीठावर विंगेत जाऊन उभे राहिले. कवी संमेलनाचे अध्यक्ष जागेवर बसताच काकांनी ध्वनिवर्धकाचा ताबा घेऊन कविता सादर केली. सभागृहातून बाहेर जाताना ती त्यांना स्फुरली. हाती कागद नाही, वही नाही. वर्षानुवर्षे हृदयात कोरलेली भारतमाता त्यांच्या शब्दातून प्रकट होत गेली. आम्हा आयोजकांना प्रश्न होता की, कवी संमेलनाच्या अध्यक्षांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाला उत्तर काय द्यायचे? पण काकांनी ते काम परस्पर केले. आपल्या इष्टदेवतेचे विडंबन सहन करू नये. मग त्यासाठी वाटेल ते करायची तयारी असायला हवी, हे काकांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या मनावर ठळकपणे नोंदवले.

काकांचा व्यासंग अफाट. वाचन अफाट. त्याचप्रमाणे साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांतील ताज्या घडामोडी काकांना माहीत असतात. गुरुकुलम्, लेखन यातून वरील गोष्टींसाठी काका वेळ कसा काढतात? हा मला प्रश्न पडतो. काका उत्तम चित्र काढतात. उत्तम मूर्ती तयार करतात. गुरुकुलम्मध्ये मुलांना जे शिकवले जाते, ते सर्व विषय काकांनी आत्मसात केले आहेत.
 
 
काही वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रकाश आंबेडकर यांनी जन्मदाखल्यावर जातीचा रकाना रद्द करावा, अशी मागणी केली. सामाजिक क्षेत्रात बरीच चर्चा सुरू झाली. या मागणीचे भविष्यात काय परिणाम होतील आणि आपण काय भूमिका घेतली पाहिजे, हे समजून घेण्यासाठी मी आणि माझे दोन सहकारी चिंचवडला गेलो. काकांनी बोलायला सुरुवात केली, बोधायन - आयुर्वेद - शिल्पकला - अंजिठा वेरूळ - चित्रकला - गोपालन - कृषीप्रधान देश - गावगाडा - औद्योगिक धोरण - गणगोत - जातिसंस्था - बारा बलुतेदार - कारू नारू - भारतीय जीवन पद्धत - पंतोजीची शाळा - महात्मा फुले - आधुनिक शिक्षण अशा असंख्य विषयांवर काका बोलत राहिले. बरे हे बोलणे केवळ विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी नव्हते, तर एक सलग आकृतिबंध यातून स्पष्ट होत होता. जात वास्तव लक्षात घेऊन भविष्यात आपण काय विचार केला पाहिजे याची असंख्य उदाहरणे काकांनी दिली. भटक्या विमुक्त जातींमध्ये काम करताना जातपंचायतीचा विषय नेहमी अडचणीचा ठरतो. गेल्या तीस वर्षांत काका अनेक जातींच्या जातपंचायतींमध्ये सहभागी झाले आहेत. जातीबाहेरच्या व्यक्तीला सहसा प्रवेश नसलेल्या जातपंचायतीत काका सहभागी झाले, हा त्यांनी भटक्या विमुक्त जातीमध्ये मिळवलेला विश्वास आहे. या विश्वासामुळे प्रभुणे पारधी झाले. दिलीप करंबेळकर नेहमी ‘गिरीश पारधी’ असाच उल्लेख करतात तो याच विश्वासामुळे.
 
 
समरसता साहित्य परिषदेच्या वाटचालीत काका सुरुवातीपासून सहप्रवासी आहेतच. नगर येथे झालेल्या एकोणिसाव्या समरसता साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘भटक्या विमुक्तांचे साहित्य आणि समरसता’ हा विषय. कार्यवाह म्हणून या संमेलनाचा भार माझ्या खांद्यावर होता. काकांचे भाषण मिळवणे, ते छापणे, स्मरणिका तयार करणे, विविध सत्रांचे विषय, वक्ते निश्चित करणे या सर्व कामांत अपेक्षित नसताना काकांनी खूप मार्गदर्शन केले. संमेलन अध्यक्ष यापेक्षा समरसता कार्यकर्ता ही भूमिका त्यांनी प्रकट केली. मला सांभाळून घेतले. संमेलनाच्या नियोजनात अनेक त्रुटी होत्या, अव्यवस्था होती; पण त्याबद्दल त्यांनी चकार शब्द काढला नाही. उलट मला प्रोत्साहन देत राहिले.
 
 
काकांची प्रोत्साहन देण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. ते थेट कौतुक करतील असे नाही; पण योग्य वेळी, योग्य ठिकाणी नक्की उल्लेख करतील. माझे ‘आयाबाया’ प्रकाशित झाल्यावर मी एक प्रत काकांना दिली. पुस्तक हाती घेऊन त्यांनी न्याहाळले, एक वेळ माझ्याकडे पाहिले आणि एकही शब्द न बोलता पुस्तक झोळीत ठेवून दिले. आपला अभिप्राय द्या, असे म्हणण्याची माझी हिंमत झाली नाही. पुढे पाच-सहा महिन्यांनी गुरुकुलम्मध्ये गेलो. काकांच्या समोर पाच-सहा लोक बसले होते. मीही त्यात सहभागी झालो. “तुम्हाला आमचं काम समजून घ्यायचे आहे ना? हे रवींद्र गोळे. यांनी ‘आयाबाया’ पुस्तक लिहिले आहे. ते वाचा. आमचे काम तुम्हाला समजेल.” काका बोलले. त्या मंडळींनी माझा परिचय करून घेतला. नंतर भोजनाच्या वेळी मी दबकत दबकतच विचारले, “काका, खरंच ‘आयाबाया’मधून आपल्या कामाचे प्रतिबिंब दिसते?” “मला खोटे बोलता येत नाही. जे खरे आहे तेच मी सांगितले.” काका बोलले. माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोलाची होती. काका असे प्रोत्साहन देत राहिले. सातत्याने नवे प्रयोग करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग दोन वर्षांपूर्वी त्यांनी गुरुकुलम्मध्ये केला. रमेश पतंगे यांच्या लेखनाचा मागोवा घेणारी दोन दिवसांची साहित्य संगिती त्यांनी आयोजित केली. रमेश पतंगे यांनी विविध विषयांवर लेखन केलेले आहे. बहुतांश वैचारिक लेखन असले तरीही त्यात विविधता आहे. या सर्व पुस्तकाचा समावेश होईल आणि सर्वार्थाने रमेश पतंगे यांच्या लेखनाचा आढावा घेता येईल असे वेळापत्रक तयार करण्याचे काम मला काकांनी सांगितले. पतंगे यांची आत्मकथने, चरित्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी लेखन, संविधानविषयक लेखन, तथागत गौतम बुद्ध, कथात्मक लेखन, संघविषयक लेखन अशी विभागणी करून साधारणपणे आठ सत्रांचे नियोजन केले. यातून जे शिल्लक राहील ते पतंगे यांच्या मुलाखतीतून समजून घेऊ, असे मी काकांना सुचवले. मराठी साहित्यविश्वातील हा वेगळा प्रयोग होता. काकांनी मी तयार केलेले वेळापत्रक पाहिले आणि दोन दिवसांच्या साहित्य संगितीचा सूत्रधार म्हणून मला जबाबदारी दिली. त्याचबरोबर रमेश पतंगे यांची मुलाखतही मीच घ्यावी, असेही त्यांनी सुचवले. एका अर्थाने ही माझी परीक्षा होती आणि दुसर्‍या अर्थाने काकांनी मला दिलेले प्रोत्साहन होते. या साहित्य संगितीच्या उद्घाटनाला शरणकुमार लिंबाळे, तर समारोपाला सदानंद मोरे उपस्थित राहिले. दोघांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
 
 
साहित्य संगितीचा उपक्रम यशस्वी झाला. काकांनी जबाबदारी दिली, पाठराखण केली म्हणून मला काम करता आले. काकांचा माझ्यावरच्या विश्वासाचा आणखी एक अनुभव नुकताच मी घेतला आहे. अंमळनेर येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार हे नक्की झाले आणि एक दिवस पाठक सरांचा फोन आला, “अरे रवी, अखिल भारतीय साहित्य संमेलनात पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची मुलाखत घ्यायचे नक्की झाले.”
 
 
“छान झाले. त्यानिमित्ताने काकांचे साहित्यविषयक विचार मोठ्या व्यासपीठावरून ऐकण्याची संधी मिळेल.”
“पण ती मुलाखत घेण्यासाठी प्रभुणे यांनी तुझे नाव सुचवले आहे.”
 
“काय? अखिल भारतीय साहित्य संमेलनात मुलाखत घेण्याइतपत मी मोठा नाही सर.”
 
“असं तुला वाटते. ज्या अर्थी प्रभुणे तुझ्या नावाचा आग्रह धरतात, तेव्हा नक्कीच काही तरी आहे, हे लक्षात घे आणि तयारीला लाग.” पाठक सर बोलले. प्रत्यक्ष संमेलनात सारंग दर्शने आणि मी मिळून मुलाखत घेतली. साहित्यविषयक प्रश्न आणि सामाजिक प्रश्न अशी सरळ विभागणी करत आम्ही दोघांनी काकांशी संवाद साधला. भटक्या विमुक्त जातीच्या जातपंचायतीसंदर्भात काकांनी जी भूमिका मांडली त्यावर काही माध्यमांतून टीका केली गेली. अर्थात काकांनी जी मांडणी केली होती त्याचा विपर्यास करून टीका केली होती.
 
तर असे हे गिरीश प्रभुणे, गिरीशकाका, काका. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या या डोंगराएवढ्या माणसाचा गेली पंचवीस वर्षे सहवास लाभला. कधी घडणीचे ठोके पडले, तर कधी कौतुकाची थाप. एका व्रतस्थ ऋषीच्या सहवासात राहून जी अनुभूती येते ती शब्दात मांडता येत नाही. काकांच्या बाबतीतही असेच म्हणता येते. कळले कळले म्हणताना काका सर्वार्थाने उमगत नाहीत. त्यांच्या व्यासंगाचा आटोप इतका मोठा की त्याचा थांग लागत नाही. आता इतकं लिहूनही काका समजले, असे म्हणण्याचे धाडस होत नाही. काका म्हणजे वादळ, काका म्हणजे आंतरिक जिव्हाळा, काका म्हणजे आधुनिक काळातील गुरुकुलाचे प्रणेता, काका म्हणजे सहृदयी समाजसुधारक.
 
अशा गिरीश प्रभुणेकाकांना पंचाहत्तरीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि निरामय जीवनप्रवासासाठी ईश्वराकडे प्रार्थना.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001