आजचा दिवस मराठी भाषेच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे - मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी

विवेक मराठी    15-Oct-2024
Total Views |
केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यानिमित्त मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मुंबईत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या वेळी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा स्वैर अनुवाद...
Abhijat Marathi
 
महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील आणि जगभरातील मराठी भाषक मंडळींचे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. केंद्र सरकारच्या वतीने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. आजचा दिवस मराठी भाषेच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे. या निर्णयाची प्रत्येक महाराष्ट्रीय व्यक्ती, मराठी भाषिक व्यक्ती दशकांपासून प्रतीक्षा करत होती. महाराष्ट्राचे हे स्वप्न पूर्ण करण्यात काही प्रमाणात सहभागी होता आले याचा मला फार फार आनंद होत आहे. आज हा आनंदक्षण साजरा करण्यासाठी मी तुम्हा सर्वांमध्ये आवर्जून उपस्थित राहिलो आहे.
 
मराठीसह बंगाली, पाली, प्राकृत आणि आसामी या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करण्यात आला. या भाषांशी संबंधित व्यक्तींचेही मी अभिनंदन करतो. मराठी भाषेचा इतिहास हा अत्यंत समृद्ध राहिला आहे. या भाषेतून जे ज्ञानप्रवाह प्रवाहित झाले त्यांनी अनेकानेक पिढ्यांना मार्गदर्शन केले. आजही ते प्रवाह आपल्याला मार्ग दाखवीत आहेत. याच भाषेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांना वेदान्तचर्चेशी परिचय करून दिला. ज्ञानेश्वरीने गीतेतील ज्ञानाद्वारे भारताच्या आध्यात्मिक प्रज्ञेस पुनर्जागृत केले. या भाषेत संत नामदेवांनी भक्तिमार्गाच्या चेतनेस बळ दिले. संत तुकारामांनी मराठी भाषेद्वारेच धार्मिक जागृतीची मोहीम चालवली. संत चोखामेळा यांनी सामाजिक परिवर्तनाच्या आंदोलनास सशक्त केले तेही मराठीतच. आज महाराष्ट्र आणि मराठी धर्म वाढवणार्‍या सर्व थोर संतांस माझे साष्टांग दंडवत. मराठी भाषेला दिलेला हा दर्जा म्हणजे संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त केलेला मानाचा मुजराच आहे.
 
लेख वाचा...
अभिजातता अधोरेखित - आता आपली जबाबदारी
 
https://www.evivek.com/Encyc/2024/10/14/Marathi-Abhijat-Bhasha-Darja.html
 
 
 
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास मराठी भाषेच्या योगदानाने समृद्ध झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारकांनी, विचारवंतांनी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आणि समाजाची एकजूट करण्यासाठी मराठी भाषेचे माध्यम स्वीकारले. लोकमान्य टिळक यांनी आपल्या ‘केसरी’ या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून परकीय सत्तांना समूळ हादरवले होते. मराठीतील अनेक भाषणांनी जनसामान्यांमध्ये स्वराज्यप्राप्तीची आस निर्माण केली होती. मराठी भाषेने न्याय आणि समानतेच्या लढाईस महत्त्वपूर्ण असे योगदान दिले. गोपाळ गणेश आगरकरांनी आपल्या ‘सुधारक’ या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक सुधारणांच्या मोहिमांना घराघरांपर्यंत नेऊन पोहोचवले. स्वातंत्र्यसंग्रामास दिशा देण्याकरिता गोपाळ कृष्ण गोखले यांनीही मराठी भाषा हेच माध्यम निवडले.
 
मराठी साहित्य हा भारताचा असा अनमोल वारसा आहे, ज्यात आपला सांस्कृतिक विकास आणि उत्कर्ष यांची गाथा सुरक्षित आहे. महाराष्ट्रात मराठी साहित्याच्या माध्यमातूनच स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीची चेतना यांचा विस्तार झाला. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात सुरू झालेले गणेशोत्सव-शिवजयंती हे कार्यक्रम, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे आंदोलन, महर्षी कर्वे यांचे महिला सशक्तीकरण अभियान, महाराष्ट्राचे औद्योगिकीकरण, कृषी सुधारणांचे प्रयत्न या सार्‍यांची मराठी भाषा प्राणशक्ती आहे.  
 
मराठी साहित्य हा भारताचा असा अनमोल वारसा आहे, ज्यात आपला सांस्कृतिक विकास आणि उत्कर्ष यांची गाथा सुरक्षित आहे. महाराष्ट्रात मराठी साहित्याच्या माध्यमातूनच स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीची चेतना यांचा विस्तार झाला. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात सुरू झालेले गणेशोत्सव-शिवजयंती हे कार्यक्रम, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे आंदोलन, महर्षी कर्वे यांचे महिला सशक्तीकरण अभियान, महाराष्ट्राचे औद्योगिकीकरण, कृषी सुधारणांचे प्रयत्न या सार्‍यांची मराठी भाषा प्राणशक्ती आहे. आपल्या देशातील सांस्कृतिक वैविध्य मराठी भाषेशी जोडले गेल्याने अधिकच समृद्ध होते. मित्रहो, भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही. भाषेचे संस्कृती, इतिहास, परंपरा आणि साहित्य यांच्याशी घनिष्ठ नाते असते- आहे. आपण इथे पोवाड्याचेच उदाहरण पाहू. छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांच्या गाथा पोवाड्यांमुळेच शतकानुशतकांनंतरही आपल्याला ज्ञात झाल्या, ही मराठी भाषेने आजच्या पिढीस दिलेली अद्भुत देणगी होय. आज आपण जेव्हा गणेशपूजन करतो तेव्हा आपल्या मनात स्वाभाविकपणे शब्द उमटतात ‘गणपती बाप्पा मोरया!’ हा केवळ एक शब्दसमूह नव्हे, तर तो भक्तीचा अनंत प्रवाह आहे. हीच भक्ती संपूर्ण देशाला मराठी भाषेशी जोडते. याच तर्‍हेने श्रीविठ्ठलाचे अभंग ऐकणारेही स्वतःच मराठी भाषेशी जोडले जातात. मराठी भाषेला हा गौरव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यकार, लेखक, कवी, अगणित मराठीप्रेमींनी दीर्घकाळ प्रयत्न केले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेची मान्यता मिळाल्याने अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या सेवेचा प्रसाद मिळाला आहे. बाळशास्त्री जांभेकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, केशवसुत, श्रीपाद महादेव माटे, आचार्य अत्रे, शांताबाई शेळके, गजानन दिगंबर माडगूळकर, कुसुमाग्रज अशा अनेक विभूतींचे योगदान अतुलनीय असे आहे. मराठी साहित्याची परंपरा केवळ प्राचीन साहित्याची नाही. ती परंपरा बहुआयामी आहे. विनोबा भावे, श्रीपाद अमृत डांगे, दुर्गाबाई भागवत, बाबा आमटे, दलित साहित्यकार दया पवार, बाबासाहेब पुरंदरे अशा अनेक जणांनी मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिले आहे. मराठीची सेवा करणार्‍या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. सदानंद मोरे, महेश एलकुंचवार, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते नामदेव कांबळे या सर्वांसह अनेक साहित्यकारांच्या नावाचे मला स्मरण होते आहे. आशा बगे, विजया राजाध्यक्ष, डॉ. शरणकुमार लिंबाळे, नाट्य दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी अशा अनेक दिग्गजांनी या दिवसाची वाट पाहिली होती. साहित्यसंस्कृतीप्रमाणेच मराठी सिनेमामुळेही आपली मान अभिमानाने उंचावली आहे. आज भारतातील सिनेमाचे जे स्वरूप आहे त्याचा आधार व्ही. शांताराम, दादासाहेब फाळके यांच्यासारख्या व्यक्तींपासूनच तयार झाला आहे. मराठी रंगभूमीने समाजातील शोषित, वंचित वर्गाचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवला आहे. मराठी रंगमंचावरील दिग्गज कलाकारांनी आपल्या प्रतिभेने प्रत्येक मंचावर स्वतःस सिद्ध केले आहे. मराठी संगीत, लोकसंगीत, लोकनृत्याची परंपरा आपला समृद्ध वारसा घेऊन पुढे मार्गक्रमण करीत आहे. बालगंधर्व, डॉ. वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, सुधीर फडके, मोगुबाई कुर्डीकर, नंतरच्या काळातील लता मंगेशकर, आशा भोसले, शंकर महादेवन, अनुराधा पौडवाल अशा अनेक दिग्गजांनी मराठी संगीतास एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. मराठी भाषेची सेवा करणार्‍या व्यक्तींची संख्या केवढी विशाल आहे. प्रत्येकाबाबत बोलायला लागलो तर मला रात्रभर बोलत राहावे लागेल.
 
 
इथे माझ्याशी बोलायला येणार्‍या काहींना मराठीत बोलावे की हिंदीत असा संकोच वाटत होता. खरे तर मधल्या काळात माझे मराठीशी नाते तुटले होते. अन्यथा पूर्वी दोन-तीन मराठी पुस्तकांचा गुजरातीत अनुवाद करण्याचे सौभाग्य मला लाभले होते. मागील चाळीस वर्षांपासून माझा मराठीशी संपर्क तुटला. तत्पूर्वी मी बर्‍यापैकी मराठी बोलत असे. आताही मराठी बोलताना फारसा अडथळा येत नाही, कारण प्रारंभिक काळात मी अहमदाबादमधील जगन्नाथ मंदिरात राहत असे. तिथे जवळच कॅलिको मिल होती. त्या मिलमधील कामगार होते, त्यात भिडे म्हणून एक मराठी परिवार होता. त्यांना शुक्रवारी सुट्टी असे. तेव्हा मी त्यांना भेटायला जात असे. मला आठवते की, त्यांच्या शेजारी एक छोटीशी मुलगी राहत होती आणि ती माझ्याशी मराठीत बोलत असे. बोलून बोलून तिनेच मला मराठी बोलायला शिकवले.
 
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याने मराठी भाषेच्या अध्ययनास प्रोत्साहन मिळेल. संशोधन आणि साहित्यसंग्रहातही वाढ होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सुविधा यामुळे प्राप्त होऊ शकणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठी भाषेच्या विकासासाठी कार्यरत संघटना, कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांना प्रोत्साहन मिळेल. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधींचेही निर्माण यामुळे होणार आहे. स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा असे सरकार आले आहे जे मातृभाषेतून शिकण्याला प्राधान्य देते. मला आठवते, अनेक वर्षांपूर्वी मी अमेरिकेत गेलो होतो. एका कुटुंबात माझा निवास होता. तो मूळचा तेलुगू परिवार होता. त्यांचे जीवन जरी अमेरिकन असले तरी त्यांच्या घरात एक नियम होता. संध्याकाळच्या जेवणासाठी सर्व कुटुंबीय एका वेळेस एकाच टेबलवर येत. दुसरा नियम होता, जेवताना कोणीही तेलुगूशिवाय अन्य भाषेत बोलणार नाही. त्यामुळे त्यांच्या घरी अमेरिकेत ज्यांचा जन्म झाला तेही तेलुगूतच बोलत असत. अगदी तसेच महाराष्ट्रीय कुटुंबात गेलात तर तुम्हाला सहजपणे मराठीतच संवाद झालेला आढळतो. अन्य भाषकांमध्ये मात्र असा निग्रह आढळत नाही. त्यांना ‘हाय, हॅलो’ म्हणण्यातच आनंद मिळतो.
 
नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत आता वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठी माध्यमातून घेणे शक्य झाले आहे. मी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे विनंती केली होती की, एक गरीब व्यक्ती आपल्या न्यायालयात येते आणि तुम्ही त्याच्यासमोर इंग्लिशमधून सुनावणी करता. तुम्ही काय सांगत आहात हे त्याला कसे समजणार? मला आनंद वाटतो की, आज सुनावणीचा ऑपरेटिव्ह (अमलात आणण्याचा) भाग हा मातृभाषेत दिला जातो. विज्ञान, अर्थशास्त्र, कला, कविता अनेक विषयांशी संबंधित मराठीत उपलब्ध होत आली आहेत, त्यांचे प्रमाणही वाढत आहे. आपल्याला या भाषेस ‘कल्पनांचे वाहन’ या स्वरूपात साकारायचे आहे, जेणेकरून ती जिवंत राहील. मराठी भाषेतील साहित्यकृती अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मराठी भाषा जागतिक श्रोत्यांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी असे मला मनापासून वाटते. भारत सरकारने भाषिणी (BHASHINI) अ‍ॅप तयार केले आहे. आपण निश्चितच या अ‍ॅपचाही वापर करू शकता. या अ‍ॅपच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत तुम्ही आपला मजकूर भारतीय भाषांमध्ये आणू शकता. भाषांतराच्या या सुविधेमुळे भाषाभाषांमधील भिंती कोसळू लागतील. तुम्ही मराठीत बोलत असाल तर ते मी फोनवर तात्काळ अ‍ॅपद्वारे गुजरातीत ऐकू शकतो. तंत्रज्ञानामुळे ही सेवा फारच सोपी झाली आहे.
 
 
आज आपण या ऐतिहासिक क्षणी आनंद साजरा करत आहोतच; पण हा क्षण आपल्यासाठी एक जबाबदारीही घेऊन आला आहे. आपल्या सुंदर भाषेची अधिकाधिक प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करणे, ही प्रत्येक मराठी बोलणार्‍या व्यक्तीची जबाबदारी आहे. मराठी माणसे जेवढी सरळ असतात तेवढीच त्यांची मराठी भाषाही सरळच आहे. या भाषेचा अधिकाधिक लोकांना परिचय व्हावा, मराठीचा विस्तार व्हावा, पुढील पिढीला आपल्या भाषेचा अभिमान वाटावा, यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करावे लागतील. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्रातील आणि जगभरातील सर्व मराठी जनांना खूप खूप शुभेच्छा.
 
शब्दांकन - मृदुला राजवाडे