रसायनशास्त्राचा अभ्यासक आणि देवस्थानातील पुजारी

विवेक मराठी    14-Oct-2024   
Total Views |
उच्च शिक्षण आणि रसायनशास्त्रातील पीएच.डी. संपादन केल्यानंतर देशविदेशातील मोठ्या पगाराच्या नोकरीच्या अनेक संधी चालून आल्या. तरीही गणपतीपुळे येथील चैतन्य घनवटकर या तरुणाने मंदिरातील पुजारी म्हणूनच यापुढे कार्यरत राहायचे ठरविले आहे. कौटुंबिक परंपरा जपतानाच रसायनशास्त्राच्या क्षेत्रात देशासाठी वेगळे काही करायची संधी मिळाली, तर ती साधण्याचा विचारही चैतन्यच्या मनात आहे.
 
Ganapatipule temple
 
मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील पदवीदान समारंभात चैतन्य वामन घनवटकर या मूळच्या गणपतीपुळे येथील तरुणाला डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. टाळ्यांचा कडकडाट झाला. कुटुंबीय सुखावले. ज्यांच्या हस्ते ही पदवी प्रदान केली आणि ज्यांनी पदवीसाठी मार्गदर्शन केले, त्या सार्‍यांनीच आता देशविदेशात असलेल्या, मोठमोठे पॅकेज देणार्‍या संधींची जंत्रीच चैतन्यसमोर मांडली; पण पदवी स्वीकारत असतानाच चैतन्यच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार होते. परदेशातच काय, पण मुंबईसारख्या मोहमयी दुनियेतही राहायचे नाही, तर रत्नागिरी जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे या स्वयंभू गणपती मंदिरात पुजारी म्हणूनच यापुढे काम करायचे आहे, असे त्याने ठरवून टाकले होते. आपला हा विचार प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली होती. रसायनशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयात पीएच.डी. केल्यामुळे समोर उभ्या असलेल्या संधींकडे हसत हसत दुर्लक्ष करून तो तरुण पीएच.डी.चा आनंद कुटुंबीयांसमवेत व्यक्त करून त्यांच्याबरोबरच गावी परतला आणि त्याने खरोखरीच हाती पळीपंचपात्री घेतली.
 

Ganapatipule temple 
 
चैतन्यचा जन्म गणपतीपुळे गावात सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब अजूनही एकत्र आहे. घरात आईवडील, काका-काकू, तीन चुलत भावंडे असे आठ जण असतात. तिन्ही भावंडे उत्तम शिकलेली आहेत, तर विवाहित चुलत बहीण मंजूषा गणेश घनवटकर बी.आर्क. झाली आहे. काका गणेश केशव घनवटकर निवृत्त शिक्षक असून तेही मंदिरात पुजारी आहेत. वडील वामन घनवटकर एस.टी.मधून नियंत्रक म्हणून निवृत्त झाले आहेत. ते घरापुरता भाजीपाला करतात.
 
 
आई वासंती ब्रँच पोस्टमास्टर म्हणून जबाबदारी सांभाळत असून युनिट ट्रस्टच्या एजंट आहेत. शिवाय त्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करतात. भजन मंडळात त्या सक्रिय आहेत. अशा या घरातील चैतन्यचे प्राथमिक शिक्षण गणपतीपुळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरीच्या फाटक प्रशालेत झाले. नंतर रत्नागिरीच्याच गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात त्याने ऑरगॅनिक केमिस्ट्री या विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले.
 
शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक
लोकमान्य टिळकांनी पाहिलेली स्वप्नं आणि आजचा भारत या विषयी चिकित्सक लेखांचा संग्रह असलेला शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक पुस्तक आहे.
 
 
शाळेत किंवा बी.एस्सी.ला असताना पीएच.डी. करायचे त्याने काही ठरविले नव्हते. त्या वेळी डॉ. पी. पी. कुलकर्णी आणि डॉ. मयूर देसाई असे पीएच.डी. झालेले मोजकेच प्राध्यापक होते. नंतर डॉ. भट्टर प्राध्यापक म्हणून लाभले. तेव्हा रत्नागिरीत राहून याबाबत फार काही कळत नव्हते. एम.एस्सी. करायचे, एवढेच नक्की होते; पण पीएच.डी. करण्यासाठी बाहेरगावी जावे लागणार होते. तशी मानसिक तयारी आणि आर्थिक स्थितीही नव्हती. मात्र नावाच्या पाठीमागे लागणार्‍या ‘डॉ.’ या उपाधीचे आकर्षण मनात होतेच. त्यामुळे एम.एस्सी.नंतर पुढचे शिक्षण घेऊन टॉपची डिग्री संपादन करायची, असे हळूहळू वाटू लागले होते. एम.एस्सी. झाल्यानंतर डाव केमिकल्स कंपनीत वर्षभर क्वॉलिटी कंट्रोल लॅबमध्ये अ‍ॅप्रेंटिस म्हणून काम केले. त्यासाठी प्रथमच 2013 साली रत्नागिरीमधून ठाण्याजवळ ऐरोली येथे कंपनीत रुजू व्हावे लागले. दरम्यानच्या काळात श्रीदेव गणपतीपुळे संस्थानमध्ये नित्य विधी आणि धार्मिक शिक्षणाची पहिली परीक्षा दिली. त्या वेळी केवळ अकरा जण पास झाले, त्यात चैतन्यचे नाव होते. डाव केमिकल्समध्ये काम करताना डॉ. दीपक डिचोलकर यांनी मुंबईच्या आयसीटीमध्ये जाण्यासाठी, रिसर्च प्रोजेक्टमध्ये मुलाखत देण्यासाठी, प्रवेश परीक्षा देण्यासाठी खूपच आग्रह केला. त्यांनी सांगितले की, तू (चैतन्य) ज्या पद्धतीने मला इन्स्ट्रुमेंट, केमिस्ट्री वगैरेसंदर्भात शंका विचारतो आहे, त्यावरून पीएच.डी.ला प्रवेश घेतला पाहिजेस. तेवढी तुझी हुशारी आहे! या काळात पेणचे मेहेंदळे सर यांनी एका जॉबसाठी संधी असल्याचे सांगितले. त्यानुसार इंटरव्ह्यू दिला. सिलेक्शन झाले. मात्र नोकरी करायची नाही, पीएच.डी. करायची, हे ठरले. त्यामुळे नोकरीची ऑफर नाकारली; पण पीएच.डी.साठी मुंबईत राहणे आवश्यक असल्याने तशी व्यवस्था केली. मुंबई-ठाण्यात अनेक नातेवाईक होते; पण त्यांच्याकडे राहून त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात अडथळा बनायचे नाही, असे ठरवून चैतन्यने भाड्याच्या खोलीत राहणे पसंत केले. डाव कंपनीत असताना चहा, नाश्ता, एक वेळचे जेवण कंपनीत होत असे; पण दुसर्‍या जेवणाचा प्रश्न स्वतःच घरी जेवण करून सोडवला. त्यामुळे खर्च वाचला. नंतर गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसटीच्या प्रोजेक्टमध्ये काम करायचे ठरवले. डाव कंपनीत मिळणार्‍या पगारापेक्षा कमी रक्कम आयसीटीमधील पहिल्या प्रोजेक्ट फेलोशिपला होती; पण तेथेच पीएच.डी. करायची असल्याने तेही स्वीकारले. मुंबईचे धकाधकीचे जीवन सुरू झाले; पण रिसर्चमध्ये जायची हौस होती, आवड होती आणि पीएच.डी.चे ध्येय खुणावू लागले होते. त्यासाठी त्रास सहन केला. त्याच काळात काविळीचे निदान झाल्याने डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती सांगितली. त्यामुळे गणपतीपुळ्याला यावे लागले. गणपतीपुळे संस्थानातील धार्मिक व्यवस्थापनामधील वैदिक सूक्ते शिकणे, दुसरी परीक्षा देणे बाकी होते. सक्तीच्या विश्रांतीच्या काळात ती परीक्षा देणे आणि पीएच.डी.चा अभ्यास करणे अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली. त्याला यश आले. गणपतीपुळे संस्थानची परीक्षा आणि पीएच.डी. एन्ट्रन्स दोन्हींमध्ये यश आले. पीएच.डी.साठी पुन्हा मुंबईला जावे लागलेच. आयसीटी एन्ट्रन्स झालेल्या काही मोजक्या विद्यार्थ्यांना तीन प्रोजेक्टच्या इंटरव्ह्यूसाठी बोलावले गेले. तेथेही चैतन्यला फेलोशिप मिळाली. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप मिळाल्याचा निर्णय आला, तो योगायोग म्हणजे, तो ई-मेल श्रींच्या मंदिरात असतानाच आला. निवड झाल्यानंतर मुंबईत प्रस्थान ठेवले.
 
त्या पाच वर्षांत पाच जागा बदलाव्या लागल्या. शिफ्टिंग, सामानाचा त्रास, नवीन ठिकाणी सामान लावणे, जुळवून घेणे हे सर्व करावे लागे. वैयक्तिक पैसे वाचवायला म्हणून दोन दिवसांआड फक्त चहा प्यायचा रिवाज सुरू केला. नाश्तासुद्धा स्वस्त आणि स्वच्छ असेल तेथेच घेतला. थोडक्यात म्हणजे गरजा कमी ठेवून शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.
 

Ganapatipule temple 
 
पीएच.डी.चे वैशिष्ट्य म्हणजे चैतन्य आणि त्याच्या सोबतच्या वीरेंद्र मिश्रा याला रिसर्च प्रोजेक्ट आणि पीएच.डी.च्या कामाव्यतिरिक्त, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, मीटिंग अशी कामे करावी लागत. आयसीटी मधील Dept. of Dyestuff Technology (आता, Dept. of Speciality Chemicals) मध्ये संशोधनाचे काम केले. मार्गदर्शक प्रो. एन. सेकर सर यांनी विषय निवडायला मदत केली. Optical Biological Properties and DFT Studies of Heterocyclic Colorants  असे  thesis title ठरले. त्यात   नव्याने तयार ( synthesize ) केले होते. ते वेगवेगळ्या क्षेत्रांत रिसर्च आणि टेस्ट केले. त्यावर शोधनिबंध प्रसिद्ध केले. Biological activities, dyeing on fabric, antimicrobial activities of dyed fabric (रंगवलेले कापड) अशी वेगवेगळ्या पद्धतीने रिसर्चची कामे केली. असे अनेक टप्पे पार पाडावे लागले. अन्य थिरॉटिकल विषयात असे टप्पे असतीलच, असे नाही.पीएच.डी.चा प्रबंध सादर केल्यानंतरसुद्धा पुन्हा किचकट प्रक्रिया होते. त्यातून पार पडल्यानंतरच पदवी मिळते.
 
विद्यापीठ अनुदान आयोगाशी संलग्न असलेली इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच आयसीटी ही मुंबईतील सर्वोत्तम दर्जाची नामवंत संस्था म्हणून जगभरात ओळखली जाते. तेथून पीएच.डी. संपादन करतानाच चैतन्य वामन वासंती घनवटकर यांचा सहभाग असलेले 17 आंतरराष्ट्रीय शोधनिबंध म्हणजेच रिसर्च पेपर्स मोठ्या रिव्ह्यू प्रक्रियेनंतर प्रकाशित झालेले आहेत. शिक्षण चालू असतानाच भारत सरकारच्या एका औद्योगिक प्रकल्पामध्ये डॉ. चैतन्य यांनी सहकारी वैज्ञानिकांसह एका भारतीय पेटंट प्रक्रियेसाठीसुद्धा काम केले आहे. त्यासाठी त्यांना प्रा. डॉ. एन. सेकर यांचे मार्गदर्शन लाभले. दिल्ली युनिव्हर्सिटीत झालेल्या यंग रिसर्चर्स सिम्पोसिअम (वायआरएस 2019) मध्ये त्यांच्या रिसर्च व्याख्यानाला पारितोषिक मिळाले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.
 
 
अखेर पीएच.डी. पदवी मिळाली. तेव्हा अनेक मित्र वेगवेगळ्या कंपनीमध्ये रूजू झाले. चैतन्यची शिफारस करण्याची तयारीही त्यांनी दर्शविली होती. परेश आठवले अमेरिकेत पोस्ट डॉक्टोरल फेलोशिपसाठी गेला. त्याच्या म्हणण्यानुसार चैतन्यलासुद्धा अशी फेलोशिप सहज मिळाली असती. कोरिया, आयआयटी मुंबई अशा ठिकाणीसुद्धा अशा अनेक संधी होत्या. त्याच्या रिसर्च ग्रुपमधील काही जण तैवानला कंपनीमध्ये रुजू झाले. तेथेही संधी मिळू शकली असती. अरब देशातील गौरव दातार याने काही संधी असल्याचे सांगितले. निवड होण्याची खात्री दिली. तेथेे 25 ते 35 लाखांचे वार्षिक पॅकेज मिळण्याची शक्यता होती; पण पीएच.डी. झाल्यानंतर गणपतीपुळ्यात परत यायचे ठरलेलेच होते. कोविडच्या दुसर्‍या लाटेत अधिकृत पुजारी म्हणून श्रींच्या थेट सेवेत जाता आले. त्याचा नंतरच्या काळात उपयोग झाला. आता अधिकृत पुजारी म्हणून त्यांची निवड झाली आहे. कांचीकामकोटी पीठाचे श्री शंकराचार्य यांच्या अहवालानुसार आणि हायकोर्टाच्या निर्णयानुसार घनवटकर यांना अधिकृत पुजारी म्हणून मान्यता देण्यात आली आहे; परंतु संस्थान श्रीदेव गणपतीपुळे येथे आवश्यक धार्मिक विषय येणे व परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. ती परीक्षा चैतन्यने पार केली आहे.
 
मी शिक्षणासाठी मुंबईत गेलो तरी माझे मन कायम माझ्या घरीच असे. मेट्रोसिटी काही काळापुरती मजा म्हणून ठीक आहे; पण त्याचे रोजच्या जीवनासाठी कायमस्वरूपी आकर्षण मला आजही वाटत नाही. त्याऐवजी गाय, गोठा, शेती, झाडे, निसर्ग, अथांग समुद्र आणि किनारा, नद्या, हिरवेगार डोंगर, दर्‍या मला आवडतात. घनवटकरांची पुजारी म्हणून जवळपास आठवी पिढी गणपतीपुळ्याच्या मंदिरात आहे. पूजाअर्चा म्हणजे काही केवळ धार्मिक बाब नाही. उज्ज्वल परंपरा असलेल्या हिंदू धर्माचे ते एक अंग आहे. जप, ध्यानधारणा अशा अनेक आध्यात्मिक बाबींना आता जगभर महत्त्व आले आहे. त्यावर संशोधन होत आहे. त्याचे निष्कर्ष बाहेर येत आहेत. याचाच अर्थ आपली परंपरा उत्तम आहे. ती पुढे न्यायला हवी आहे. चांगला पैसा मिळतो म्हणून मी बाहेरगावी निघून गेलो, तर आपली परंपरा खंडित होण्याची भीती आहे. ती टाळावी, हा मुख्य उद्देश आहे.  
पीएच.डी. पदवी आणि गलेलठ्ठ पगाराची संधी असूनही गावी येण्याचा निर्णय कसा घेतला, असा प्रश्न चैतन्यला विचारला तेव्हा त्याने सांगितले की, मी शिक्षणासाठी मुंबईत गेलो तरी माझे मन कायम माझ्या घरीच असे. मेट्रोसिटी काही काळापुरती मजा म्हणून ठीक आहे; पण त्याचे रोजच्या जीवनासाठी कायमस्वरूपी आकर्षण मला आजही वाटत नाही. त्याऐवजी गाय, गोठा, शेती, झाडे, निसर्ग, अथांग समुद्र आणि किनारा, नद्या, हिरवेगार डोंगर, दर्‍या मला आवडतात. घनवटकरांची पुजारी म्हणून जवळपास आठवी पिढी गणपतीपुळ्याच्या मंदिरात आहे. पूजाअर्चा म्हणजे काही केवळ धार्मिक बाब नाही. उज्ज्वल परंपरा असलेल्या हिंदू धर्माचे ते एक अंग आहे. जप, ध्यानधारणा अशा अनेक आध्यात्मिक बाबींना आता जगभर महत्त्व आले आहे. त्यावर संशोधन होत आहे. त्याचे निष्कर्ष बाहेर येत आहेत. याचाच अर्थ आपली परंपरा उत्तम आहे. ती पुढे न्यायला हवी आहे. चांगला पैसा मिळतो म्हणून मी बाहेरगावी निघून गेलो, तर आपली परंपरा खंडित होण्याची भीती आहे. ती टाळावी, हा मुख्य उद्देश आहे. तसेही खूप आधीपासूनच श्रींच्या सेवेत घनवटकर कुटुंबीय आहेत. गणपतीपुळेमध्ये चिटपाखरू नसायचे, म्हणजेच उत्पन्न नगण्य होते, तेव्हासुद्धा आमचे पूर्वज श्री मंगलमूर्तींच्या सेवेत होते. आता चांगली परिस्थिती आहे. बर्‍यापैकी सुविधा आहेत. अशा स्थितीत आपल्याला काम करायला काहीच हरकत नाही हे माझ्या मनात व लक्षात होते. मंदिरातील अभिषेक, स्वतः करायच्या पूजा, सहस्र आवर्तने इत्यादी माध्यमे म्हणजे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. आमच्या उत्पन्नामधील काही रक्कम संस्थानकडे जमा केली जाते. उपलब्ध माहितीप्रमाणे नित्य पूजाअर्चा, धार्मिक कामे, उत्सव यांसाठी तीन इनाम जमिनींची मूळ सनद मूळ पुरुष घनवटकर यांना थोरले राजाराम महाराज यांच्याकडून मिळाली आहे. ती पेशवाईपर्यंत होती. इंग्रज सरकारने 1890 साली आपली सनद करून दिली. ब्रिटिशकाळापासून भारत सरकारकडून दरवर्षी 13 रुपयांचे वर्षासन घनवटकर कुटुंबातील एका व्यक्तीला प्रातिनिधिक स्वरूपात आजतागायत दिले जात आहे. ही रक्कम महत्त्वाची नाही, तर त्यामागची परंपरा महत्त्वाची आहे.
 
 
आवड असलेले हस्तरेषाशास्त्र, कुंडली ज्योतिष, कीर्तनकला वगैरे अन्य विषयसुद्धा शिकायचे आहेत. सोबतच पर्यटनाच्या दृष्टीने पूरक उपक्रमांद्वारे उत्पन्न मिळू शकते. त्या दृष्टीनेसुद्धा मी प्रयत्न करण्यास इच्छुक आहे. माहिती - संस्कृती - घडामोडी यांसाठी मोदक यूट्यूब चॅनेल चालू केले आहे. यासाठी आईची मदत लाभते.
 
 
पीएच.डी.चे संशोधन सुरू असतानाच तीन ते चार वर्षे श्रीराम चैत्रोत्सव मंडळाला चैतन्यने सर्वतोपरी मदत केली. अनेक व्याख्यानमाला आयोजित केल्या. सामाजिक उपक्रम राबवले. सुमेधाताई चिथडे यांच्या माध्यमातून भारतीय सैनिकांना ‘सिर्फ’ (SIRF) द्वारे मदत केली. दत्तराज आणि नीलेश घनवटकर असे दोघांनी मिळून वृक्ष लागवड करणे व जगवणे हे कार्यदेखील पर्यावरणासाठी हाती घेतले आहे.
 
 
धार्मिक परंपरांबाबत चैतन्यने काही विचार व्यक्त केले, तेही अभ्यासपूर्वक केले आहेत. तो म्हणतो, पौरोहित्य अनेक जण करतात, अनेक जण माझ्यापेक्षा अनुभवाने, वयाने, ज्ञानाने खूपच मोठे आहेत, नक्की असतीलही; पण सर्वांना सांगू इच्छितो की, आपल्याला पारंपरिक शिक्षण तर आवश्यक आहेच, जोडीला काळानुरूप शालेय शिक्षण, कॉलेजमधील शिक्षण जास्तीत जास्त घेणे आवश्यक आहे. धार्मिक शिक्षणासोबत वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण घेऊन, इंग्लिशसारख्या भाषा शिकून, माहिती घेऊन ज्ञानात आपण भर घातली तर उत्तम. चौकस ज्ञानाने वेगळा आत्मविश्वास येतो व पौरोहित्य करणार्‍या गुरुजींचा वेगळा ठसा उमटतो. बोलण्यात, विचार करण्याच्या पद्धतीत चांगला बदल होतो.
 
 
आता पौरोहित्यसुद्धा स्मार्ट पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळी संसाधने आणि आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून आपला मूळ पाया-संस्कृती न सोडता अनेक गोष्टी काळानुरूप बदलाव्या लागतील, अंगीकाराव्या लागतील. अनेक धार्मिक गोष्टी आधुनिक विज्ञानाद्वारे आपण सिद्ध करू शकलो तर अनेकांचा आपल्या हिंदू संस्कृतीवरचा विश्वास आणि आदर वाढेल.
 
 
चौकस पद्धतीने अधिकाधिक ज्ञान मिळवून चांगल्या पद्धतीने ते लोकांपर्यंत नेले, तर लोकांना आपल्याविषयी आदर वाढेल, असे सांगून चैतन्य म्हणाला, या कामातून आपल्याला आनंद मिळतो. आता अनेक अशा वेदशाळा चालू झाल्या आहेत, की जेथे दुपारच्या वेळेत शालेय माध्यमिक किंवा उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो अभ्यास सांभाळून वैदिक, धार्मिक, याज्ञिक शिक्षण दिले जाते. अशा पद्धतीनेसुद्धा खूप चांगली सुसंस्कारित मुले घडत आहेत. फक्त पौरोहित्यावर भर न देता एखादा व्यवसायसुद्धा जोडीला चालू केला पाहिजे. त्यामुळे काही प्रश्न कमी होतील.
 
 
परंपरा सांभाळताना नोकरी करूच नये का, असे विचारता चैतन्य म्हणाला, जे मुंबईत जन्माला आले आहेत किंवा ज्यांना नोकरीशिवाय पर्यायच नाही, अशा लोकांनी नोकरी केली तर ठीक आहे; पण त्यांनीही नोकरी संशोधनातील संधी सोडू नये; परंतु आता गावेच्या गावे ओस पडू लागली आहेत. सगळेच शहरात जाऊ लागले तर शहरातील व्यवस्थेवरसुद्धा त्याचा ताण येतो. शुद्ध अन्न, पाणी, वीज, राहायची जागा, प्रवास या सगळ्या गोष्टी शहराकडे महाग आणि धकाधकीच्या होऊ लागल्या आहेत. म्हणून ज्यांना शक्य आहे त्यांनी आपापल्या ठिकाणी, विशेषतः गावाकडे आपापले व्यवसाय वृद्धिंगत करावे, सोयी उपलब्ध कराव्यात, संशोधनाची ठिकाणे छोट्या शहरात उभी करावी, शक्य असेल तेथे गावातसुद्धा सुविधा द्याव्यात.
 
 
मंदिरातील काम सांभाळून रसायनशास्त्र विषयाशी संपर्क हवा, या दृष्टीने विद्यार्थ्यांना काही सांगता, शिकवता येईल म्हणून रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून चैतन्य काही लेक्चर्स घेतो. काही प्रोजेक्टसाठीसुद्धा त्याला विचारणा होत आहे. पीएच.डी.मुळे एक झालेला फायदा म्हणजे अ‍ॅनालिसिससाठी एक आत्मविश्वास वाढला आहे. एक प्रकारे रिसर्चची अभ्यासासाठी एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली आहे. त्याचा उपयोग अन्य आवडीचे शिक्षण घेण्यासाठी करता येईल. आताच्या गोष्टी सांभाळून संशोधन करणार्‍यांना आपल्या परीने मदत करण्याचीही चैतन्यची तयारी आहे. त्यादृष्टीने ज्युनियर रिसर्च फेलोजना रिसर्च पेपर लिखाण, रिसर्च स्कीम करणे, काम करताना आलेले शंका-समाधान यामध्ये तो मदत करत आहे.
 
 
भविष्यातील विचार करता एखादी समाजोपयोगी संधी असेल किंवा देशाच्या फायद्याची असेल तर निश्चितच नेहमीची कामे आणि जबाबदारी सांभाळून काही कालावधीसाठी ती करायची तयारी असल्याचे चैतन्यने आवर्जून सांगितले.
 
 

प्रमोद कोनकर

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार आहेत...