योद्धा राणी दुर्गावती

विवेक मराठी    13-Oct-2024
Total Views |
@शोभा जोशी
महान योद्धा राणी दुर्गावतींचा 5 ऑक्टोबर हा जन्मदिवस. 5 ऑक्टोबर 2024 या दिवशी त्यांच्या जन्माला 500 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त हा लेख.
ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी भारतावर कोणाचाच एकछत्री अंमल नव्हता. देशामध्ये छोटीमोठी स्वतंत्र राज्ये होती, छोटीमोठी संस्थाने होती. प्रत्येक राज्याचा, संस्थानाचा राजा आणि त्याचे सरदार, मंत्री आपल्या राज्याचा कारभार करत.
आपल्या राज्याचे, संस्थानाचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी अनेक वीरपुरुषांनी लढता लढता मरण पत्करले. त्यामध्ये स्त्रियाही मागे नव्हत्या. अशाच शूर स्त्रियांपैकी एक म्हणजे राणी दुर्गावती. आत्ताचा मध्य प्रदेश त्या वेळी गोंडवाना म्हणून प्रसिद्ध होता. या गोंडवानातील माहोबाचे राजा कीर्तिसिंह हे चंदेल या रजपूत घराण्यातील होते. त्यांची दुर्गावती ही मुलगी. तिचा जन्म 5 ऑक्टोबर 1524 मध्ये कालिंजर किल्ल्यात दुर्गाष्टमीला झाला म्हणून तिचे नाव दुर्गा ठेवले. ती नावाप्रमाणेच प्रसंगी दुर्गावतार धारण करायची. ती खूप सुंदर आणि हुशार तर होतीच; पण खूप शूर आणि धाडसी होती. लहानपणापासूनच तिला धनुष्यबाण चालविणे, तलवारबाजी करणे, शिकार करणे या सर्वांची आवड होती.
 

rani 
माहोबाच्या राज्याच्या शेजारीच गढमंगला राज्य होते. या राज्याचा राजा संग्रामशहा गोंड जमातीचा होता. त्याचा मुलगा दलपत यांच्याशी दुर्गावतीचे लग्न झाले. त्यांना पुढे मुलगा झाला. त्याचे नाव वीरनारायण. तो चार वर्षांचा असतानाच दलपत यांचा मृत्यू झाला. राणीने छोट्या वीरनारायणचा राज्याभिषेक केला आणि त्याच्या नावाने ती स्वतः राज्यकारभार करू लागली.
चितोड, मेवाड, गोंडवाना अशी काही राज्ये सोडली तर आजूबाजूला सगळी मुस्लीम राज्ये होती. दिल्लीत अकबराचे राज्य होते. राणीला कल्पना होती की, ही मुस्लीम राज्ये आपल्यावर नक्कीच हल्ले करणार. म्हणून तिने आपले सैन्य तयार केले. त्या सैनिकांना युद्धाचे चांगले शिक्षण दिले. तसेच प्रजेसाठी तिने खूप मोठमोठे तलाव बांधले, विहिरी खोदल्या. मंदिर, मठ बांधले. धर्मशाळा बांधल्या. चांगले रस्ते तयार केले. तिने आपले राज्य समृद्ध बनवले. त्यामुळे राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे. ती एक कुशल प्रशासक होती. त्यामुळे प्रजा तिला देवी मानत असे. मुस्लीम आक्रमणाचा धोका ओळखून तिने वेळीच शत्रूवर हल्ला करून त्यांचा पराभव करून आपल्या राज्याचा विस्तार केला. तिने बाजबहाद्दूरलासुद्धा हरवले.
 
तिच्या पराक्रमाची कीर्ती अकबराच्या कानावर गेली. त्याने तिच्यावर आक्रमण करण्यासाठी दोनदा सैन्य पाठवले; पण राणीने दोन्ही वेळा त्यांचा पराभव करून धूळ चारली.
 
अकबराने दोन वर्षांनी प्रचंड सैन्यासह पुन्हा तिच्यावर हल्ला केला. राणीने आपल्या तुटपुंज्या सैन्यानिशी अकबराशी निकराचा लढा दिला. राणीच्या दोन्ही डोळ्यांना बाण लागले. तिला दिसेनासे झाले. तरीपण दोन्ही हातांत तलवारी घेऊन ती लढतच राहिली. तिच्या मानेत, गळ्यात बाण घुसले आणि ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आली तेव्हा तिला कळून चुकलं होतं की, आपण युद्ध हरलो आहोत. अकबराचा खुनशी स्वभाव जाणून जिवंतपणे शत्रूच्या हातात सापडण्यापेक्षा राणीने स्वहस्ते छातीत कट्यार खुपसून वीरमरण पत्करले. 16 वर्षे कुशल राज्यकारभार केलेली ही पराक्रमी, शूरवीर, धैर्यवान राणी शत्रूपुढे शरण न जाता इतिहासात अजरामर झाली आणि प्रेरणास्वरूप बनली.