उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश
(20 ऑक्टोबर 1930 - 5 मे 2017)
लीला सेठ यांची 1978 साली दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यापाठोपाठ त्यांच्याकडे चालत आलं हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीशपद. त्यांनी अनेक आयोगांवर आणि मानव अधिकारविषयक संस्थांवर काम केलं. 2012 च्या निर्भया बलात्कारकांडानंतर जी वर्मा समिती नेमण्यात आली, त्यावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पहिल्या महिला सीनियर कौन्सेल अशी त्यांची ख्याती आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयात नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला सीनियर कौन्सेल अशी ज्यांची ख्याती, त्या लीला सेठ यांची जन्मशताब्दी या दशकाअखेर साजरी होईल.
इम्पिरियल रेल्वे सर्व्हिसमध्ये वरिष्ठ पदावर नोकरी करणार्या लीला सेठ या मूळच्या लखनौच्या. लीला या दोन भावांनंतर जन्मल्या. शेंडेफळ असल्याने स्वाभाविकच लाडक्या होत्या. लीला जेमतेम अकरा वर्षांच्या असतानाच त्यांच्या पित्याचं निधन झालं. त्यानंतर त्या कुटुंबाला आर्थिक संकटातून जावं लागलं; परंतु त्यांच्या आईनं हिंमत न हरता दार्जीलिंगच्या लोरेंटो कॉन्व्हेंटमध्ये त्यांचं शिक्षण सुरू ठेवलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोलकात्यात स्टेनोग्राफरची नोकरी त्यांना मिळाली आणि तिथेच त्यांची प्रेम सेठ यांच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर पुढे विवाहात झालं. वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांचा विवाह झाला. सेठ तेव्हा बाटामध्ये नोकरी करत होते. त्यांची बदली लंडनला झाली आणि लीलाही त्यांच्याबरोबर लंडनला गेल्या.
लंडनमध्ये लीला यांना कायद्याचा अभ्यास करण्याची संधी लाभली. कायद्याचं क्षेत्र अभ्यासासाठी का निवडलं, याचं अतिशय सोपं आणि प्रामाणिक उत्तर त्या द्यायच्या. या क्षेत्रात करीअर करावं, मोठं वकील बनावं, न्यायदान प्रक्रियेत जावं असं काहीही त्यांच्या मनात तेव्हा नव्हतं. मूल लहान होतं, त्याच्याकडे लक्ष देणं आणि उरलेल्या वेळेत शिकणं एवढाच पर्याय त्यांच्यासमोर होता. कायद्याच्या वर्गांना उपस्थिती महत्त्वाची नसायची, त्यामुळे कॉलेजमध्ये नियमित जाण्याची सक्ती नव्हती.
1958 साली वयाच्या 27 व्या वर्षी लीला सेठ यांनी लंडन बारची परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत त्या सर्वप्रथम आल्या. हे यश मिळवणार्या त्या पहिल्याच महिला होत्या. 1959 साली त्यांनी प्रत्यक्ष वकिली सुरू केली; पण तरीही शिक्षणाची भूक संपली नव्हती. सनदी सेवांसाठीची परीक्षा त्यांनी दिली. त्या उत्तीर्ण झाल्या आणि आयएएसदेखील बनल्या. लंडन बारची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचं वर्णन लंडनच्या एका वृत्तपत्रानं केलं ते ‘मदर इन लॉ‘ असं. तसं करण्यामागचं कारण होतं त्यांनी नुकताच एका बाळाला दिलेला जन्म; पण बाकीच्या वृत्तपत्रांनी त्यांच्या यशाबद्दल लिहिताना 580 विद्यार्थ्यांत एक विद्यार्थिनी कशी पहिली येते, असा सवालच उपस्थित केला.
लंडन बारच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा एक वळण त्यांच्या आयुष्यात आलं ते भारतात परत येण्याच्या रूपानं. लीला आणि प्रेम भारतात येऊन ते पाटण्यात स्थिरावले. सचिन चौधरी आणि अशोक कुमार सेन नावाच्या वरिष्ठ वकिलांकडे लीला यांनी साहाय्यक म्हणून काम सुरू केलं. तब्बल 10 वर्षं त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात वकिली केली. महिला वकील म्हणून काम करताना आलेल्या त्रासदायक अनुभवांवर त्या अनेक ठिकाणी बोलत. हे क्षेत्र पुरुषांचं आहे, इथे तुला काय जमणार, असं अनेकदा अशिलांनी त्यांना ऐकवलंदेखील.
लीला सेठ अशा शेर्यांनी कधीही नाउमेद झाल्या नाहीत, येतील ती कामं त्यांनी स्वीकारली. मग त्यात टॅक्सविषयक कामं, कंपनी लॉ, संविधान कायदा, सिव्हिल आणि क्रिमिनल लॉविषयक कामं, विवाहविषयक दावे, जनहित याचिका असं किती तरी होतं. पाटण्यात दहा वर्षांहून अधिक काळ वकिली केल्यानंतर लीला सेठ दिल्लीत गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली. तिथेही वैविध्यपूर्ण दावे त्यांना हाताळायला मिळाले. त्याच वर्षी त्यांनीसर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली. सर्वोच्च न्यायालयात पश्चिम बंगाल सरकारच्या वतीनं बाजू मांडणार्या वकिलांच्या पॅनेलमध्ये त्या होत्या. नंतर सर्वोच्च न्यायालयाने सीनियर अॅडव्होकेट म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
तिथून पुढे सुरू झाला तो पुरुषी मक्तेदारी मोडणारा प्रवास. 1978 साली दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि पाठोपाठ त्यांच्याकडे चालत आलं हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीशपद. त्यांनी अनेक आयोगांवर आणि मानव अधिकारविषयक संस्थांवर काम केलं. 15 व्या लॉ कमिशनच्या त्या सदस्य होत्या. कॉमनवेल्थ ह्यूमन राइट्स इनिशिएटिव्हच्या त्या अनेक वर्षे अध्यक्ष होत्या. ‘शक्तिमान’ ही मालिका दूरदर्शनवर आल्यानंतर त्यातील शक्तिमानच्या साहसी धाडसाचे अनुकरण करण्याचा प्रयत्न अनेक अल्पवयीन मुलांनी केला आणि त्यात त्यांना प्राण गमवावे लागले. या संदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी आयोगाच्या त्या सदस्य होत्या. इन्फोसिस पुरस्काराच्या निवड समितीवरही त्यांनी काही काळ काम केलं. 2012 च्या निर्भया बलात्कारकांडानंतर जी वर्मा समिती नेमण्यात आली, त्यावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
लीला आणि प्रेम सेठ यांना विक्रम, शांतुम आणि आराधना अशी तीन अपत्ये झाली. त्यातले विक्रम सेठ हे पुढे नामांकित लेखक बनले, तर शांतुम हे बुद्धिस्ट टीचर बनले आणि आराधना या कलाकार, चित्रपट निर्मात्या आणि ख्यातनाम दिग्दर्शक बनल्या. वयाच्या 86 व्या वर्षी 5 मे 2017 च्या रात्री हृदयविकाराचा त्रास झाला आणि त्यांचं निधन झालं. देहदान केल्यामुळे त्यांचे नेत्र आणि अवयव वैद्यकीय संशोधनासाठी दान करण्यात आले.