वसई : अहिल्याबाईंचं जीवनकार्य समजून घेऊन, त्यांचे विचार कृतीत उतरवणं, ही काळाची गरज आहे, असे मत ‘विवेक’च्या संपादक कविता मयेकर यांनी व्यक्त केले. वसई येथील प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर धुरी यांनी आपल्या वडिलांच्या- वसईभूषण उद्योगश्री शांताराम महादेव धुरी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मदिनाचे औचित्य साधत, वसई येथे ‘अहिल्याबाई होळकर यांचे जीवनकार्य’ या विषयावर कविता मयेकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक निकम होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. महादेव इरकर उपस्थित होते. विनायक निकम आणि डॉ. इरकर या उभयतांनी आपल्या भाषणातून उद्योगश्री शांताराम महादेव धुरी यांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडले, तर प्रास्ताविकात चंद्रशेखर धुरी यांनी कार्यक्रमाचा व व्याख्यानामागचा उद्देश स्पष्ट केला.
आपल्या व्याख्यानातून कविता मयेकर यांनी अहिल्याबाई या आदर्श राज्यकर्ती कशा होत्या, हे विविध उदाहरणे देत उलगडून दाखवले. नेतृत्व, कर्तृत्व, मातृत्व आणि दातृत्व हे अहिल्याबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे चार महत्त्वाचे पैलू होते आणि त्याला कोंदण होते जन्मजात लाभलेल्या वैराग्यवृत्तीचे. राजा हा राज्याचा उपभोगशून्य स्वामी असतो, हा विचार अहिल्याबाई प्रत्यक्ष जगल्या. दीर्घकाळ एकहाती राज्य सांभाळणारी ही राणी प्रजेवर अपत्यवत प्रेम करत होती. ‘प्रजेचे योगक्षेम’ हा त्यांचा अखेरच्या श्वासापर्यंत जपलेला ध्यास होता, अशा शब्दांत अहिल्याबाईंचे मोठेपण त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अडीचशे वर्षांपूर्वीच्या कालखंडात आपल्या सुनेतल्या क्षमता ओळखत तिचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी मेहनत घेणार्या मल्हारराव होळकरांचे द्रष्टेपणही त्यांनी अधोरेखित केले. आजच्या काळातही आदर्शवत वाटावी अशी ही गुरुशिष्याची जोडी असून दोघांच्याही आयुष्यातून घेण्यासारखे खूप काही आहे. मल्हारबा हे घरातल्या महिलांना समानतेची आणि सन्मानाची वागणूक देणारे कसे होते याचीही उदाहरणे दिली.
ही व्यक्तिमत्त्वे केवळ पूजन करण्यासाठी नसून त्यांचे विचार आजही आचरणात आणण्याजोगे आहेत, हे लक्षात घेऊन, ठिकठिकाणी त्यांच्या विचारांचा जागर झाला पाहिजे, अशी अपेक्षा कविता मयेकर यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. लतिका पाटील यांनी केले, तर श्रेयस धुरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. याच कार्यक्रमात चंद्रशेखर धुरीलिखित ‘धडपड’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचे ऑडिओ बुक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाले.