@सुधीर पाठक
ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट समीक्षक आणि लेखिका नीला वसंत
उपाध्ये यांचे सोमवार, दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. नीला उपाध्ये यांचे ‘सा. विवेक’शी
जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या ‘वसंततिलका’ नावाने ‘विवेक’मध्येही ललित सदर लिहीत असत.
त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा श्रद्धांजलीपर लेख.
मराठी वृत्तपत्रसृष्टीतील पहिल्या महिला पत्रकार राजकीय वार्ताहर
म्हणून सन्मान मिळविणार्या नीलाताई उपाध्ये यांचे निधन झाले, हे स्वीकारायला मन तयार होत नाही. त्यांच्या
नावामागे ‘कैलासवासी’ ही बिरुदावली लावायला हात अजूनही कापतात. असे वाटते की, अजूनही कुठून तरी
‘टोण्या’ (त्या मला कुठेही आणि केव्हाही याच नावाने बोलवत) ही हाक कानावर येऊन गुद्दा पाठीत बसेल.
नीलाताईंची विविध रूपे पत्रकारसृष्टीने बघितली आहेत; पण ज्या फार कमी लोकांना त्यांचे
मातृहृदय बघता आले त्यात माझाही समावेश आहे. वसंतराव उपाध्ये यांच्याशी माझा संपर्क 1972 पासून होता. ते ‘तरुण
भारत’चे मुंबई कार्यालय प्रमुख होते, तर मी मुंबईच्या पत्रकारितेत नुकताच प्रवेश केला होता. ‘मुंबई
सकाळ’मध्ये मी वार्ताहर म्हणून रुजू झालो होतो. तेव्हा ‘मुंबई सकाळ’ प्रभादेवीला होते. जवळ
‘विवेक’चे कार्यालय होते. वसंतराव त्या काळात दादरला राहात म्हणून स्कूटरचाही भरपूर वापर करीत असत. पुढे मी
‘तरुण भारत’मध्ये लागलो; पण तत्पूर्वी वसंतराव यांनी नीलाताई यांची ओळख करून दिली. त्या नीला पाटील होत्या.
मुंबई मराठी पत्रकार संघात दोघेही सचिव झालेत. पुढे विवाहबद्ध झाले. नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने दोघेही नागपूरला
येत. नीलाताई वार्ताहर म्हणून खूप प्रभावी होत्या. त्या काळात मराठीत नीलाताई गाजत होत्या, तर इंग्रजीत वोल्गा टेलिस.
दोघीही वृत्तसंकलन करायला कुठेही मागेपुढे बघत नसत. नीलाताई तर ‘म.टा.’ला रात्रपाळीच्या वार्ताहर म्हणून
ड्युटी करायच्या.
मुळात नीलाताई या ‘म.टा.’त रुजू झाल्या तेच आश्चर्य
होते; पण भाषांवर विलक्षण प्रभुत्व, बातमीत अचूक शब्दरचना, योग्य तिथे फुलोरा व सर्व बातम्यांत बातमीची स्वच्छ कॉपी हे
त्यांचे वैशिष्ट्य होते. ‘म.टा.’त त्यांचे पितृत्व तसे बंडोपंत गोखले व मुख्य वार्ताहर चंद्रकांत ताम्हणे
यांच्याकडे होते. सुरुवातीला त्या नीला पाटील होत्या. महाराष्ट्र विधानसभा गाजविणारे दत्ता पाटील हे त्यांचे मामा होते.
त्यांनी वसंतरावांशी आंतरजातीय विवाह केला व त्यातून त्यांची वैचारिक बांधिलकीही बदलली. त्या कट्टर संघवाल्या झाल्या.
त्यामुळे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये त्यांना त्रास देणार्यांची संख्याही वाढली. वसंतरावांच्या
वडिलांचा आपल्या सुनेवर जीव होता व त्यांनीही शेवटपर्यंत त्यांची वडील म्हणून सेवा केली. तसे दोघेही नवराबायको पत्रकार
असल्याने त्यांचा संसार गमतीदार होता. दोघेही कामावर राहात आणि घरात लहानगा माधव आपल्या ताईचा अभ्यास घेत असे. माधवचेही
वय मोठ्या वर्गातील अभ्यास समजण्यासारखे नव्हते; पण तो नेमकेपणाने ताईला सांगायचा- ‘यात पाच मुद्दे दिले आहेत; पण
तू चारच सांगितले’ आणि मधुरा त्याप्रमाणे अभ्यास करून त्याला पाच मुद्दे न पाहता सांगत असे. असा त्यांचा अभ्यास मी
स्वत: मधुरा मॅट्रिकला असताना बघितला आहे.
नीलाताई खर्या गाजल्या त्या ‘चित्रपश्चिमा’ या
सदरामुळे. ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये हे सदर अतिशय गाजले होते. सामान्यत: मराठी वृत्तपत्रात सिनेमाला जागा
मिळत नसे; पण पाश्चिमात्य चित्रपटांबद्दल मराठीत काही येणे ही नवलाई. त्या काळात ‘म.टा.’त
‘चित्रपश्चिमा’ प्रसिद्ध व्हायचे. ‘नीला उपाध्ये’ असा परिचय कुणालाही करून दिला की, समोरचा
त्यांना विचारत असे, ‘चित्रपश्चिमा’वाल्या का? त्यांनी चित्रपट समीक्षेला एक वेगळे दालन मिळवून दिले.
नीलाताईंचे पहिले पुस्तक हे सत्यजित राय यांच्यावरील होते. बंडोपंत गोखले त्यांना सांगत की, पत्रकाराने वर्षाला किमान एक
पुस्तक लिहिले पाहिजे व तोच मंत्र त्या पुढे तरुण वार्ताहर, पत्रकार आणि आपल्या वार्ताहरांना गिरवायला लावीत.
नीलाताई पत्रकारितेप्रमाणे सामाजिक जीवनातही आघाडीवर होत्या.
‘कोमसाप’- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या त्या काम करायच्या, तसेच मुंबई मराठी पत्रकार संघातही
वसंतरावांबरोबर त्या कार्यवाह होत्या. त्यांनी नंतर अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती; पण त्यांचा निसटता पराभव झाला
होता. साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्षपदही त्यांनी दीर्घकाळ सांभाळले होते.
या सर्व आघाड्यांवर लढत असताना ‘म.टा.’तही कामगार
नेत्या म्हणून त्यांचा दबदबा होता. टाइम्स व्यवस्थापनाशी झुंज देत त्या अखेरपावेतो कॉन्ट्रॅक्टवर आल्या नाहीत. टाइम्स
उपाहारगृहातील सर्व कामगार यांच्याशी त्या मातेप्रमाणे स्नेह देत जोडल्या गेल्या होत्या.
बोलण्यातील फटकळपणा, कुणालाही आपल्यावर पुरुषी वर्चस्व गाजविता
येणार नाही याची संपूर्ण सेवाकाळात व नंतरही त्यांनी घेतलेली दक्षता यामुळे मुंबईत मराठी मुलींना पत्रकारितेत आवश्यक ते
संरक्षण मिळाले. त्याबद्दल महिला पत्रकारांनी त्यांचे कायम उतराई राहायला हवे.
पती-पत्नीने कसा परस्परांचा आदर ठेवला पाहिजे व उभयतांना सन्मान
दिला पाहिजे याचे उपाध्ये कुटुंब आदर्श होते. वसंतराव नेहमी सांगत की, नीला विद्वान आहे आणि विद्वान म्हणून ती
पत्रकारितेत वावरते. जनसंपर्कातून वसंतरावांनी स्थान मिळवले आहे, हे नीलाताई आवर्जून सांगत.
त्यांनी ‘नागपूर तरुण भारत’मध्ये साहित्यिक, सांस्कृतिक
सदर चालविले होते. ‘वसंततिलका’ या नावाने त्या सदर चालवायच्या. कामाच्या प्रचंड घाईगर्दीत व धबडग्यातही हे
सदर त्या नियमित चालवीत असत.
‘म.टा.’तून निवृत्त झाल्यावर त्यांनी पत्रकारितेत
शिक्षक होणे पत्करले. त्यातून त्यांनी अनेक विद्यार्थी पत्रकार जगताला दिले. नीलाताईंचा विद्यार्थी म्हटले की, त्याचे
शुद्धलेखन उत्तम असेल, मराठीवर त्याचे प्रभुत्व असेल, हे वेगळे सांगण्याची गरजच उरत नसे. मी ‘मुंबई तरुण
भारत’ला संपादक असताना त्यांनी अनंत विद्यार्थी आमच्याकडे पाठविले होते. मुंबईत आज जवळजवळ 150 वर सक्रिय असलेले
पत्रकार नीलाताईंचे विद्यार्थी आहेत. मधल्या काळात त्या चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्याही होत्या.
एकूण काय, ‘मातृहृदयी-पत्रदुर्गा नीलाताई’ हेच त्यांचे
मोजक्या शब्दांत वर्णन करता येईल. त्यांना भावपूर्ण आदरांजली.