संघभीत लालभाईंची केरळकहाणी!

विवेक मराठी    13-Oct-2024   
Total Views |
 Pinarayi Vijayan केरळचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एम. आर. अजित कुमार हे मुख्यमंत्री विजयन यांच्या जवळचे समजले जातात. या अजित कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे आणि राम माधव यांची भेट घेतली. त्यावर साहजिकच मोठे राजकीय वादळ उठले. सर्व सेक्युलर आणि लिबरल पक्षांनी ‘सेक्युलॅरिझम खतरे में’च्या आरोळ्या ठोकत रस्त्यावर यायला सुरुवात केली.
 
चार महिन्यांपूर्वी संपलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकहाती बहुमत मिळाले नाही, म्हणून विरोधी पक्षांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. तटस्थ म्हणून मिरवणार्‍या, परंतु वास्तवात सेक्युलरांच्या ताटाखालचे मांजर असलेल्या विश्लेषकांचीही अवस्था वेगळी नव्हती. चारशे खासदारांचे लक्ष्य असलेल्या भाजपला 240 वर थांबावे लागले, ही त्यांच्यासाठी आनंदाची परमावधी होती. दहा वर्षांचा त्यांचा राजकीय दुष्काळ संपला होता. मात्र विरोधकांच्या या जल्लोषात एक गोष्ट नजरेआड करण्यात आली ती म्हणजे दक्षिण भारतात भाजप आणि त्याच्या सहकार्‍यांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद.
 
 
तमिळनाडूत एकही जागा मिळाली नसली तरी भाजपच्या मतांची टक्केवारी वाढली. तमिळनाडूत भाजपला गेल्या वेळेस अण्णा द्रमुकशी युती असताना 3.5 टक्के मते मिळाली होती. यंदा ती कोणत्याही द्रविड पक्षाशी युती नसताना 11 टक्क्यांवर गेली आहेत. राज्यातील 39 पैकी 10 ठिकाणी (आणि पाँडिचेरीतील एकमेव जागेवर) भाजप दुसर्‍या स्थानावर होता. तेलंगणात भाजपच्या खासदारांची संख्या चारवरून दुप्पट म्हणजे आठ झाली. आंध्र प्रदेशात भाजपने तीन जागा जिंकल्या. तिथे भाजपची मतांची टक्केवारी गेल्या वेळेस, 2019 मध्ये 1% होती, ती 11% एवढी वाढली. कर्नाटकात त्याने 28 पैकी 17 जागा जिंकल्या; परंतु भाजपला खरे नेत्रदीपक यश मिळाले ते केरळमध्ये.
 
एखाद्या भक्कम किल्ल्याच्या तटबंदीला वर्षानुवर्षे धडका मारून ती तटबंदी भेदावी, तशी काहीशी कामगिरी भाजपने तिथे केली आहे. केरळ हा लालभाई म्हणजे कम्युनिस्टांचा बालेकिल्ला. त्यांच्या जोडीला काँग्रेस आणि मुस्लीम लीग हेही तिथे ठाण मांडून बसलेले. मार्क्स, मुस्लीम आणि मिशनरी हे तिन्ही ‘एम’ तिथे एकत्र आलेले. अशा परिस्थितीत भाजपने तिथे आपला पहिला खासदार सुरेश गोपी यांच्या रूपाने निवडून आणला. त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थानही दिले. त्यांच्या जोडीने जॉर्ज कुरियन यांनाही केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे केरळमध्ये भाजपचे स्थान आणखी भक्कम होणार, या भीतीने लालभाईंची गाळण उडाली आहे. सध्या त्या राज्यात जे राजकीय नाट्य सुरू आहे, त्याची ही पार्श्वभूमी आहे.
 
 
केरळमधील निलांबूरचे आमदार पी.व्ही. अन्वर हे एके काळी मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचे कट्टर समर्थक होते. (अर्थात अन्वर या नावातच ते आले!) याच अन्वर यांनी जो लाल धुरळा उडवला आहे ती सत्तांतराची वावटळ ठरते की काय, अशी परिस्थिती तिथे उद्भवली आहे.
 
 
या अन्वर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून म्हणजे एनएसयूआयमधून झाली. त्यांनी नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीशी (एलडीएफ) घरोबा केला. मलप्पुरम जिल्ह्यातील निलांबूर येथून 2016 मध्ये डाव्या आघाडीच्या वतीने ते निवडून आले. खरे तर स्थानिक डाव्या नेत्यांचा त्यांना विरोध होता. मात्र विजयन यांचा त्यांना आशीर्वाद होता. पुढे 2021 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. याच विजयन यांच्यावर अन्वर यांनी तोफ डागली आहे. त्याला निमित्त झाले ते भाजप आणि संघाशी संबंधांचे!
 
 Pinarayi Vijayan
 
केरळचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एम. आर. अजित कुमार हे मुख्यमंत्री विजयन यांच्या जवळचे समजले जातात. या अजित कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे आणि राम माधव यांची भेट घेतली. या दोन्ही भेटी मे आणि जून 2023 मध्ये दहा दिवसांच्या अंतराने झाल्या होत्या. होसबाळे यांच्याशी झालेली भेट एक तास चालली, तर राम माधव यांच्याशी झालेली भेट केवळ 10 मिनिटे झाली, असा गौप्यस्फोट केरळमधील माध्यमांनी गेल्या महिन्यात केला होता.
 
 
त्यावर साहजिकच मोठे राजकीय वादळ उठले. सर्व सेक्युलर आणि लिबरल पक्षांनी ‘सेक्युलॅरिझम खतरे में’च्या आरोळ्या ठोकत रस्त्यावर यायला सुरुवात केली. काँग्रेससहित विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री विजयन यांनी संघाशी साटेलोटे केल्याचा आरोप केला. सेक्युलॅरिझम जपण्यासाठी स्वतःच्या मुलीचा विवाह मुस्लीम व्यक्तीशी केलेल्या मुख्यमंत्र्यांनी लगोलग पोलीस महासंचालक शेख दरवेश साहिब यांच्याकरवी चौकशीचे आदेश दिले. महासंचालकांनी चौकशी करून आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादरही केला; परंतु त्यावर पुढे कारवाई झाली नाही. मात्र आपण ही भेट घेतल्याचे अजित कुमार यांनी मान्य केले.
 
 
 Pinarayi Vijayan
 
याच प्रकरणाचा पुढचा अंक अन्वर यांनी सुरू केला. अन्वर यांनी 26 सप्टेंबर रोजी एक पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री विजयन यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राज्यातील पोलिसांवर गंभीर आरोप करून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर विजयन यांचे सर्वांत जवळचे राजकीय सचिव पी. शशी यांच्यावर निशाणा साधला. सरतेशेवटी खुद्द मुख्यमंत्र्यांनाच त्यांनी लक्ष्य केले. विजयन यांच्याकडे असलेले गृहखाते त्यांनी तत्काळ सोडावे, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
केरळमध्ये साधारण दीडेक वर्षापूर्वी सोने तस्करीचे एक प्रकरण मोठे गाजले होते. त्या प्रकरणाचे धागेदोरे अजूनही समोर येतात. या सोने तस्करीच्या प्रकरणात जप्त केलेल्या सोन्याच्या साठ्यापैकी काही भाग वेगळा राखून ठेवण्यासाठी (कशासाठी हे वेगळे सांगायला नको) अजित कुमार यांनी एक स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती आणि याला विजयन व त्यांचे राजकीय सचिव शशी यांचे पाठबळ होते, असा आरोप अन्वर यांनी केला. विजयन यांचे जावई तसेच राज्याचे एक मंत्री असलेले मुहम्मद रियास यांनाही त्यांनी लक्ष्य केले. मुख्यमंत्र्यांनी आपली मुलगी वीणा हिला वाचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे (म्हणजे तडजोडीमुळे) तृशूरमधील पूरम उत्सवात व्यत्यय येण्यास हातभार लागला. या सर्वाची परिणती भाजपला लोकसभेची तृशूरची जागा जिंकण्यात झाली, असेही ते म्हणाले. या वीणा यांची हवाला व्यवहाराच्या आरोपांवरून अनेक केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे, हे येथे उल्लेखनीय.
 
 
तृशूर पूरम उत्सव
 
तृशूर (हा शब्द चुकून त्रिशूर असा लिहिला जातो.) पूरम हा केरळमधील सर्वात महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे. जगभरातील लाखो भक्त आणि पर्यटक खास या उत्सवासाठी तृशूरला येतात. वडक्कुन्नाथन मंदिराच्या शेजारी असलेल्या थेक्किन्काडू मैदानात ते एकत्रित येतात. तेथे रंगीबेरंगी रोषणाई केली जाते. दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत ती चालते. हा उत्सव करण्यात परमेक्कावू आणि तिरुवांबडी या दोन मंदिर प्रशासनांचा मोठा वाटा असतो; परंतु या वर्षी वादकांसह मिरवणूक काढण्यात आल्याने भक्तांसोबत पोलिसांची बाचाबाची झाली. या घडामोडींमुळे पूरमशी संबंधित अनेक कार्यक्रमांना विलंब झाला. पूरम परंपरांचा अनादर केल्याचे आरोप पोलिसांवर झाले.
 
 
हे सगळे घडले एप्रिल महिन्यात, केरळमधील मतदानाच्या अगदी काही दिवस आधी. म्हणून हा व्यत्यय आणण्यात सत्ताधार्‍यांचा हात होता. विजयन यांनी मुलीला वाचविण्यासाठी संघ आणि भाजपशी हातमिळवणी केली आणि हा प्रकार घडवून आणला. हिंदुत्वाच्या अजेंड्याला प्रोत्साहन देणार्‍या भाजपला मदत करण्यासाठी हे करण्यात आले. त्यामुळेच भाजपला ही जागा जिंकता आली, असा आरोप काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी केला होता. विजयन यांनी गंभीर चूक म्हणून 21 एप्रिल रोजी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. तृशूर शहर पोलीस आयुक्त अंकित अशोकन यांना उत्सवादरम्यान झालेल्या चुकांसाठी जबाबदार धरून जून 2024 मध्ये त्यांची बदली करण्यात आली.
 
 
गंमत म्हणजे या प्रकरणाची चौकशी अजित कुमार यांनीच केली होती आणि त्यांनी 1600 पानांचा आपला अहवाल सादर केला होता; परंतु त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळेच अन्वर आणि अन्य विरोधकांच्या हाती कोलीत लागले आहे. रिव्होल्युशनरी मार्क्सिस्ट पार्टी (आरएमपी) या पक्षाच्या वडकर येथील आमदार के. के. रेमा म्हणतात, आम्ही माकप सोडण्यापूर्वी जे मुद्दे मांडले होते तेच अन्वर आता मांडत आहेत. आम्ही पोलिसांच्या भगवीकरणाच्या विरोधात बोललो, पक्षाच्या नेत्यांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विजयन यांच्या बुर्झ्वा मार्गाला विरोध केला. अन्वर आता तेच बोलत आहेत. या रेमा यांचे पती टी. पी. चंद्रशेखरन यांनी माकपमधून बंडखोरी करून रिव्होल्युशनरी मार्क्सिस्ट पार्टी स्थापन केली होती; परंतु नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर लगेचच त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली, हे येथे उल्लेखनीय.
 
 
सरलेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील सत्ताधारी एलडीएफ पक्षाला फारसे यश मिळाले नाही. राज्यातील 20 पैकी 18 जागा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (यूडीएफ) जिंकल्या, तर एक जागा भाजपने जिंकली. म्हणजेच एलडीएफच्या वाट्याला केवळ एक जागा आली. मुस्लिमांचा अनुनय केल्यामुळे आणि सातत्याने हिंदूविरोधी भूमिका घेतल्यामुळे डाव्यांची ही वाताहत झाली, असा दावा भाजपने केला होता. माकपनेसुद्धा हे मनोमन मान्य केले आहे आणि म्हणूनच त्याने हिंदुत्ववादी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे, असा दावा अन्वर तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
आगीतून फुफाट्यात
 
हे राजकीय बालंट घालवावे यासाठी ’हिंदू’ या मुख्यमंत्री मार्क्सवाद्यांच्या जवळजवळ मुखपत्र असलेल्या इंग्रजी वृत्तपत्राला विजयन यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी जी वक्तव्ये केली त्यामुळे अन्वर यांच्या आरोपांना आणखीनच खतपाणी मिळाले. विजयन यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली. मलप्पुरम जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत 123 कोटी रुपयांची हवाला रक्कम जप्त करण्यात आली आहे. हे पैसे राज्यविरोधी आणि देशविरोधी कारवायांसाठी वापरले जात आहेत, असा दावा विजयन यांनी मुलाखतीत केला होता. तसेच पत्रकारांनी पुन्हा विचारल्यावर मी जे बोललो ते वास्तवच आहे, हा पुनरुच्चारही त्यांनी केला होता.
 
 Pinarayi Vijayan  
 
आता मलप्पुरम हा मुस्लीमबहुल जिल्हा असल्याचे सर्वज्ञात आहे. या जिल्ह्यात मुस्लिमांची लोकसंख्या 70.24% असून हिंदूंची लोकसंख्या केवळ 27.60% (जनगणना 2011) एवढी आहे. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य मुस्लीम समुदायाला लक्ष्य करून केल्याचे आपसूकच मानले गेले. या मुलाखतीमुळे पुन्हा मोठा वाद निर्माण झाला. विजयन आणि त्यांचा माकप संघाच्या आणखीन जवळ गेल्याचे बोलले गेले. तेव्हा विजयन आणि त्यांच्या कार्यालयाने हे वक्तव्य नाकारले. दुसरीकडे त्या वादग्रस्त वाक्यांचा समावेश ही मुलाखत घडवून आणणार्‍या जनसंपर्क संस्थेच्या (पीआर एजन्सीच्या) वतीने करण्यात आला होता, अशी सारवासारव ’हिंदू’ने केली.
 
 
केरळमध्ये मुस्लीम आणि ख्रिश्चन ही काँग्रेसची परंपरागत मतपेढी समजण्यात येते, तर हिंदू हे कम्युनिस्ट पक्षांचे सर्वसामान्यपणे मतदार मानले जातात. याच हिंदूंचा ओढा भाजपकडे वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरेश गोपी यांच्याशिवाय भाजपच्या तीन उमेदवारांनी कडवी लढत दिली. माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी तर काँग्रेसचे तीन वेळा खासदार असलेले शशी थरूर यांना शेवटपर्यंत झुंज दिली. अखेर केवळ 16,077 मतांनी त्यांचा पराजय झाला.संपूर्ण केरळमध्ये, भाजपच्या नेतृत्वाखालील मतांची टक्केवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 3.57 टक्क्यांनी वाढून 19.21 टक्क्यांपर्यंत पोहोचली. एकट्या भाजपच्या मतांची टक्केवारी जवळपास 17 टक्के झाली आहे.
 
 
मग डाव्यांच्या पायाखालची वाळू घसरणे स्वाभाविक होते. म्हणूनच याच विजयन यांनी 26 एप्रिल रोजी मतदान केल्यानंतर भाजप नेते प्रकाश जावडेकर यांची भेट घेतल्याबद्दल एलडीएफचे निमंत्रक आणि माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य ईपी जयराजन यांना जाहीरपणे खडसावले होते. दिवाभीत घुबडाला जसा उजेडाचा तिटकारा वाटतो तसा त्यांना भाजपचा तिटकारा वाटतोय. मोगलांच्या घोड्याप्रमाणे जळी-स्थळी-पाषाणी भाजप आणि संघ दिसतोय.
ही आहे संघभीत लालभाईंची केरळमधील कहाणी!

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक