हिंदी चित्रपटांतील अंगाई गीते

13 Oct 2024 15:48:02
movie
साधे सरळ, हृदयाला भिडणारे शब्द. जगातली प्रसिद्ध अंगाई गीते म्हणजे निरागसतेचे प्रतीक आणि त्यामुळे अबोध, स्वच्छ मनाला ती भावतात. हे गीत त्याला अपवाद नाही. अंगाई कोणीही गायली तरी सुरेलच वाटते, कारण त्यात माया असते. या स्वराचा स्पर्श आश्वासक असतो. अविश्वासाने भरलेल्या या जगात एक जागा तरी विसावण्यासारखी आहे, हा विश्वास देतात हे सूर. मराठीत अंगाई गीते प्रसिद्ध आहेत, पण त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील अंगाई गीतांमध्येही शब्द वेगळे, सूर वेगळे, प्रसंग वेगळे, नातीसुद्धा वेगवेगळी; पण त्यांचा स्पर्श मात्र वात्सल्याचा, मायेचा, आधार देणारा आहे. याच अंगाई गीतांविषयी....
  
‘स्वर’ या संकल्पनेशी आपली पहिली ओळख होते ती आईने गायलेल्या गीताने- अंगाई गीताने. तिचा मायेचा स्पर्श आणि प्रेमाने ओथंबलेला स्वर नाळ तुटली गेल्याची जाणीव करून देत नसावा. आता छोट्या बालकाला शब्दाचे भान कुठले असायला; पण त्या स्वरातील ताकदीने आपोआप पापण्या मिटायला लागतात. शब्दाचा अर्थ जरी त्या वयात समजला नाही तरीही त्यातील प्रेम, लळा, वात्सल्य, देऊ केलेले संरक्षण आणि बांधिलकी मात्र त्या लहानग्या जीवाला निश्चितच समजते. एक अतिशय जिव्हाळ्याचा आणि त्याहीपेक्षा विश्वासाचा संवाद साधण्याचे कौशल्य या गीतामध्ये असते. तो आवाज कसाही असो; त्या स्वरात सामर्थ्य असते तुमच्या सुरक्षिततेचे, समाधानाचे आणि आनंदाचे.
 
 
असे म्हणतात की, आपल्या बाळाला कुशीत घेऊन गीत गायल्याने शरीरातून आनंदाचे हार्मोन्स स्रवू लागतात. आईच्या मनावरील ताण तर हलका होतोच; पण बाळालासुद्धा आश्वस्त वाटते.
 
 
पहिली अंगाई किंवा पाळणा कोणत्या आईने गायला असेल? शब्द नसताना आपले प्रेम मुलाला कसे सांगितले असेल? निदान याचा कुठेही रेकॉर्ड नाही; पण जगातल्या पहिल्या बाळाला छातीशी धरून किंवा मांडीवर अलगद जोजवताना शब्दांची गरज भासलीही नसेल. तिचा हळुवार स्वरच त्याला सुंदर स्वप्नाच्या जगात घेऊन जात असेल; सर्व वाईट नजरांपासून दूर. आई आणि मुलाचे नाते घट्ट करायला अंगाई गीतांचा महत्त्वाचा वाटा आहेच.
 
 
माझे बालपण आईवडिलांपासून लांब गेले. आई नोकरी करायची. माझ्या आजीने मला तिच्याकडेच ठेवून घेतले. लाडकी खूप होते; पण तिच्या लाडाच्या कल्पना वेगळ्या होत्या. रात्री 9 वाजता झोप आलीच पाहिजे हा दंडक होता आमच्या घरात.
 
 
‘कांदा घालू का डोळ्यात? कशी झोपत नाहीस ते बघू’ हे ऐकले की डोळे घट्ट मिटून मी निद्रादेवीच्या अधीन व्हायचे आणि वाट पाहायचे ती येणार्‍या शनिवारची. ती रात्र आईच्या कुशीत जायची. आता झोपण्यासाठी सोबत असायची ती तिच्या हळुवार स्वरांची. माझी आई सुंदर गायची. रात्रीची नीरव शांतता जाचू लागली, की मी आईला ‘नीज माझ्या नंदलाला’ हे गाणे म्हणायला सांगायचे. आभाळ, वारा आणि तारे सर्व शांत झालेले असताना तिचा तालावर थोपटणारा हात आणि मनाला शांत करणारा सूर मला वेगळ्याच जगात घेऊन जायचा. याला वयाचे बंधन नव्हते. तिच्या मांडीवर डोके ठेवले, की माझा पाळण्यातला नंदलाला व्हायचा. वात्सल्याने परिपूर्ण असलेला तिचा स्वर पाखरांबरोबर माझ्या मनातील खळबळ शांत करायचा. त्या गाण्याबरोबर मनातील सर्व वाईट विचार जायचे.
 
 
प्रत्येक मुलासाठी त्याच्या आईचाच आवाज मधुर असतो यात काहीच वाद नाही; पण हिंदी सिनेमांत आईच्या आवाजाशी साधर्म्य असलेला आवाज आहे तो लताबाईंचा; सोज्वळ, शांत आणि दैवी. थकलेल्या मनाला ऊर्मी देण्याचे सामर्थ्य या आवाजात आहे.
 
 
 
‘दो बिघा जमीन’ या सलील चौधरी संगीत दिग्दर्शित सिनेमात लताबाईंच्या आवाजात एक अप्रतिम अंगाई गीत आहे. ‘आ जारी आ, निंदिया तू आ’. मीनाकुमारीने यात एका पाहुण्या कलाकाराची छोटीशी भूमिका केली होती. ‘परिणीता’ सिनेमाचे शूटिंग चालू असतानाच तिने ‘दो बिघा जमीन’ या सिनेमाच्या रशेस पाहिल्या. त्या सिनेमाने ती एवढी भारावून गेली की, आपल्याला छोटासा का होईना एक रोल द्या, अशी गळ तिने या सिनेमाचे दिग्दर्शक बिमल रॉय यांना घातली. निरुपा रॉयसारखी अभिनेत्री नायिका असताना या प्रसिद्ध अंगाई गीताचे चित्रण मीनाकुमारीवर झाले. ठाकुरांच्या सुनेची खानदानी वेशभूषा, कपाळावरील घुंघट आणि तिच्या कुशीत विश्वासाने विसावलेले मूल ही प्रतिमा अतिशय देखणी आहे. आपल्या तान्हुल्याच्या चेहर्‍यावर खिळलेली तिची नजर एवढी वात्सल्यपूर्ण आहे की, जगातील सारे ममत्व तिथे वसतीला आले आहे. तिच्या प्रेमाच्या सादेला मिळालेला प्रतिसादसुद्धा तितकाच नैसर्गिक आणि उत्स्फूर्त आहे. बाळाचा तिच्या चेहर्‍यावर विश्वासाने फिरणारा हात पाहिला तर तो चिमुकला अभिनय करतो आहे असे म्हणायचे का? सलील चौधरी यांनी दिलेली चालसुद्धा सरळ, सोपी, गळ्यात बसणारी आणि आजसुद्धा मनाला मोहविणारी. हा सिनेमा शेतकर्‍यांच्या आयुष्यावर आधारित होता. त्यामुळे या सिनेमातील संगीतालासुद्धा येथील मातीचा गंध आहे.
 
 
‘सोयी कली सोया चमन, पीपल तले सोयी हवा
सब रंग गये एक रंग में, तूने ये क्या जादू किया’
 
 
बाळाच्या छोट्याशा जगातील सर्व जण या अंगाई गीतातसुद्धा हजर आहेत. फुले, झाडे, हवा आणि सारा आसमंत हे तर त्याचे सोबती. दिवसातील रंगीबेरंगी झगमगणारे जग आता अंधाराच्या पांघरुणात दडून एकाच रंगाचे भासत आहे. गीतकार शैलेंद्र यांचे हे शब्दसुद्धा स्वरासारखेच सरळ. आपल्या तान्हुल्याबद्दल प्रत्येक आईची स्वप्ने असतातच. तिचा लाडला तिच्यासाठी राजकुमारच असतो. म्हणूनच ती जोजवताना म्हणते,
 
 
‘संसार की रानी है तू, राजा है मेरा लाडला
दुनिया है मेरी गोद में, पूरा हुआ सपना मेरा’
 
 
या सिनेमात निरुपा रॉय यांचे पात्र एका गरीब शेतकर्‍याच्या पत्नीचे आहे, तर मीनाकुमारी यांनी ठाकुरांच्या सुनेची भूमिका केली आहे; पण अंगाई गीताने, त्यातील वात्सल्याने या दोन वर्गांतील स्त्रिया एकमेकांकडे ओढल्या जातात आणि जोडल्या जातात. या गाण्याला आवाज देणारी आणि चेहरा देणारी स्त्री प्रत्यक्ष जीवनात जरी आई बनली नाही तरी परिपूर्ण ममत्वाची ओळख त्यांनी आपल्या आवाजातून आणि अभिनयातून प्रेक्षकांना करून दिली हे निश्चित.
 
 
वात्सल्याला कसलेच बंधन नसते. कोणतीही स्त्री, मग ती मुलगी असो, पत्नी किंवा आई, ती प्रेम करते, प्रेरणा देते, समजून घेते, प्रसंगी तुमची ताकद होते. कळत नकळत ती जीवनाला अर्थ देते.
 
 
 
मीनाकुमारी आणि लता मंगेशकर यांचे अजून एक अप्रतिम अंगाई गीत आहे ते ‘चिराग कहाँ रोशनी कहाँ’ या सिनेमात. ‘टीम टीम करते तारे ये कहते है सारे’. अंगाई गीताचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची भाषा खूप सोपी असते. बर्‍याच वेळा त्यात एक गोष्ट असते. ते बाळ मोठे व्हावे, चांगले निपजावे, अशी इच्छासुद्धा. रात्रीचा अंधार तर कोणालाही अस्वस्थ करतो. ह्यातील छोट्यासुद्धा त्याला अपवाद नाही. तो अंधार दूर करणारे तारे त्याचे सोबती आहेत, असे सांगून आई त्याची अंधाराची भीती दूर करते.
 
 
‘रंगबिरंगी परियां तुम्हे झुले में झुलाऐंगी,
बिल्ली, तोता, मैना की कहानियाँ भी सुनाऐंगी
अच्छे अच्छे तुझे खिलौने देंगी प्यारे प्यारे
सो जा तोहे सपनो में निंदिया पुकारे’
 
 
गाण्याचा मूड आनंदी आहे. त्यात पर्‍या आहेत, चांदोबा आहे, बाळाचे आवडीचे साथीसुद्धा आहेत. त्याच्या स्वप्नाचे सुंदर जग या गाण्यात वसतीला आले आहे. खरे तर सुरात सामर्थ्य असतेच मनाला भुरळ घालण्याचे; पण अंगाई गीत या वैश्विक जगापासून दूर स्वप्ननगरीत घेऊन जाते.
 
 
काही गाणी फक्त सूर आणि शब्द लेवून येत नाहीत, तरस्वतःची स्वतंत्र ओळख घेऊन येतात. ‘अलबेला’ सिनेमातील ‘धीरे से आजा री अखियन में निंदिया आजा री आजा’ हे गीत आज ममतेचे प्रतीक बनले आहे त्यातील जिव्हाळ्याने, वात्सल्याने. अंगाई गीताला वयाचे काय नात्याचेसुद्धा बंधन नसते. पहिला स्वर आईचा जरी असला तर एक स्त्री कोणत्याही नात्यात आईची भूमिका सहज निभावू शकते. हृदयात वात्सल्याचा झरा असलेली कोणतीही स्त्री, मग ती बहीण असो, आजी, मावशी किंवा पत्नी, कोणत्या न कोणत्या प्रसंगी तुम्हाला आईची माया देते. हे गीत गायले आहे ते लहान बहिणीने, आपल्या मोठ्या भावासाठी. हे फक्त अंगाई गीत नाही, तर कुटुंबातील घटकांना जोडणारा प्रेमाचा, विश्वासाचा बंध आहे.
 
 
 
पिलू रागावर आधारित असलेले हे गीत मोठ्यांसाठीसुद्धा झोपेची गोळी आहे.
 
‘तारों से छुपकर तारों से चोरी, देती है रजनी चंदा को लोरी
 
हँसता है चंदा भी निदियन में निंदिया आजा री’
 
साधे सरळ, हृदयाला भिडणारे शब्द. जगातली प्रसिद्ध अंगाई गीते म्हणजे निरागसतेचे प्रतीक आणि त्यामुळे अबोध, स्वच्छ मनाला ती भावतात. हे गीत त्याला अपवाद नाही. अंगाई कोणीही गायली तरी सुरेलच वाटते, कारण त्यात माया असते. या स्वराचा स्पर्श आश्वासक. अविश्वासाने भरलेल्या या जगात एक जागा तरी विसावण्यासारखी आहे, हा विश्वास देतात हे सूर. मग जर एका ताकदीच्या गायिकेने हे सूर गायले तर!
 
 
 
‘सुजाता’ सिनेमात एक अतिशय सुंदर अंगाई गीता दत्त यांच्या आवाजात आहे.
 
‘नन्हीं कली सोने चली हवा धीरे आना’.
 
गीताचा आवाजच मांसल, शांत आणि प्रेमळ.
 
‘सुजाता’ सिनेमातील हे गीत रमासाठी गायले जाते. ही मुलगी आहे ब्राह्मण, सधन कुटुंबातील. शेजारच्या खोलीत सुजाता एका झोळीत एकटीच पहुडली आहे. अनाथ मुलीला आईचे सुख नाहीच; पण गीता दत्तच्या स्वरात एवढी ताकद आहे की, आईची कुशी नशिबात नसूनही दूर खोलीत असणार्‍या सुजातालासुद्धा ते सूर स्वप्नाच्या दुनियेत घेऊन जातात.
 
‘चाँद किरणसी गुड़िया नाजों की है पली,
 
आज अगर चाँदनिया आना मेरे गली
 
गुन गुन गुन कोई हौले हौले गाना’
 
कोणत्याही आईला आपली मुलगी राजकुमारीच वाटते आणि इथे तर ऐश्वर्य हात जोडून उभे आहे. खूप कौतुकाने वाढवलेल्या या मुलीला निजवताना आई चांदणीला सांगते, जर तू येणारच आहेस तर आपल्या मृदू आवाजात तिला अंगाई गा. याच अंगाई गीताचे ऋण सुजाता पुढील आयुष्यात फेडते; आपले रक्त देऊन, या मानलेल्या आईचा प्राण वाचवते.
 
 
लहान होते तेव्हा मला सांभाळायला घरी एक मुलगी यायची. असेल सोळा-सतराची. माझ्यावर खूप जीव.
 
 
एकदा घरात आई इस्त्री करत असताना काही तरी कामासाठी आत गेली आणि इस्त्री गादीवर राहून, त्यावरील चादरीने पेट घेतला. छोटीशी खोली धुराने भरून गेली. मालीने, त्या मुलीने मला उचलले आणि घराबाहेर धूम ठोकली. स्वतःचे कपडे, सामान कशाचा म्हणून तिने विचार केला नाही. खरे तर आमचे नाते ते काय! पण वात्सल्याचे, मायेचे धागे चिवट असतात. अशा जिवावर बेतलेल्या प्रसंगातसुद्धा ते तुटता तुटत नाहीत.
 
 
इतिहासात तर अशी उदाहरणे दिसतात. छत्रपती संभाजी महाराजांना दूध देऊन वाढवणारी धाराऊ, उदय सिंग यांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या मुलाचे बलिदान करणारी पन्ना दाई, हुमायूनच्या पश्चात अकबराला वाढवणारी महाम अंगा या रक्ताच्या नात्याने बांधल्या गेल्या नसतीलही; पण त्यांचे योगदान काही कमी महत्त्वाचे नाही. स्वतःचे सुख बाजूला ठेवून, दुसर्‍या मुलांच्या संगोपनाला वाहून घेण्यासाठी काळजात मायेचे कोठार असावे लागते. ‘लम्हे’ या सिनेमात वहिदा रहमान यांनी अशाच एका दाईचा रोल केला आहे.
 
 
स्त्रीच्या आयुष्याची सार्थकता असते ती तिच्या विवाहात. तिला चांगला संसार मिळावा; चांगला देखणा, कर्तबगार पती मिळून तिचे आयुष्य समाधानात जावे, हे स्वप्न तर प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी पाहते. दाई असली तरीही माया आईचीच ना! यात एक सुंदर अंगाई आहे.
 
‘गुड़िया रानी बिटिया रानी
 
परियो की नगरी से एक दिन राजकुंवरजी आयेंगे,
 
महलो में ले जायेंगे!’
 
मुलाला गरज असते ती कुटुंबाची. कुटुंबात आई आणि वडील यांचा समावेश असतो; पण अनेक स्त्रिया फसल्या जातात, त्या परित्यक्ता असतात, विधवा असतात, घटस्फोटित असतात; पण आईपण निभावणे हे स्त्रीला उपजत जमते. कोणत्याही परिस्थितीत तिची माया पातळ होत नाही.
 
‘त्रिशूल’ या सिनेमात आहे अशीच एक फसवली गेलेली स्त्री. मूल होण्यासाठी पुरुष आणि स्त्रीची जरी गरज असेल तरी या मुलाला समाजात स्थान मिळवण्यासाठी पुरुषाच्या नावाची गरज असते. ते ज्याने द्यायचे त्याने तर पाठ फिरवली आहे; पण ती हताश होत नाही, मुलाचा त्याग करत नाही. तिने गायलेली अंगाई मात्र वरील अंगाई गीतांसारखी स्वप्नाळू नाही.
 
 
 
‘मैं तुझे रहम के साए में न पलने दूँगी
 
जिंदगानी की कड़ी धुप में जलने दूँगी
 
ताकि तप तप के तू फौलाद बने, माँ की औलाद बने
 
तू मेरे साथ रहेगा मुन्ने’
 
तिच्या स्वप्नाची तर राख झाली आहे. उरले आहे ते रखरखीत वास्तव. त्याचीच ती जाणीव मुलाला करून देते. त्याला कणखर बनवते. या खडतर प्रवासात जगाने जरी धिक्कारले असेल तरी आईची साथ तिच्या अंतिम श्वासापर्यंत तिच्या बाळाबरोबर असतेच.
अंगाई गीत फक्त वात्सल्यपूर्ण असते? अहं!
 
 
‘तराना’ सिनेमातील ‘बेईमान तोरे नैनवा, निंदिया न आये’ हीसुद्धा एक वेगळीच अंगाई आहे.
 
 
मधुबाला आणि दिलीपचा हा पहिला सिनेमा आणि एका शोकांतिकेची सुरुवात. अजरामर प्रेमकहाण्या ह्या असफलच असतात. क्षण एक पुरे प्रेमाचा याचा खरा अर्थ हा आहे की, क्षणभरच ती भावना खरी असते; अमूर्त, अस्पर्श. त्यावर व्यावहारिकतेची, अपेक्षांची पुटे चढली की ती डागाळते. ह्या गाण्याचे शूटिंग चालू असताना दोघे प्रेमात पडले असे म्हटले जाते.
 
 
काठावर जेमतेम स्थिरावलेल्या त्यांच्या भावना. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक कटाक्ष येणार्‍या वादळाची सूक्ष्म जाणीव करून देतो. आहे न आहे असे वाटणारी ही जवळीक. त्याच्या कुरळ्या केसातून हलकेच फिरणारा तिचा हात, तिच्या चेहर्‍यावर रेंगाळलेल्या बटांशी जवळीक साधणारी त्याची बोटे. मर्यादेचे भान त्यालाही आहेच, त्याच्या बोटांनासुद्धा. केसातून हात फिरवणे यासारखी जवळ आणणारी दुसरी कोणतीच कृती नाही हे खरे. दोघेही अनोळखी; पण एकांतात एक नवीनच ओळख त्याची धिटाई वाढवत आहे. तिच्या बांगड्यांचा किणकिणाट तिला भानावर आणू पाहत असतानाच, तिचा संभ्रम ओळखल्याने त्याच्या ओठावर खेळणारे मिस्कील हसू तिच्या गालावरचा गुलाबी रंग अजूनच गडद करत आहे.
 
 
‘ले मुंद ले अखियाँ तनिक ज़रा, बैठी हूँ यंही मैं न घबरा
 
रात जाए पलक तोसे झपकी न जाए
 
बेईमान तोरे नैनवा, निंदिया न आये’
 
देवाने एकच वर दिला तर एक आई मुलासाठी कोणती मागणी करेल!
 
 
मला वाटते, ती त्याच्या दीर्घायुष्याची कामना करेल. अनेक माता तेवढ्या भाग्यवान नसतात. आयुष्याची दोरी नियतीच्या हातात असते. प्रार्थना निष्फळ ठरते. ज्याला जन्म दिला, अंगाखांद्यावर खेळवले, वाढवले, मोठे केले, तोच निघून जातो, काळाच्या पलीकडे. तिचा टाहो, तिचा आक्रोश त्याच्या कानावर पडणे आता अशक्य. हा कसला लपंडाव!
 
‘लुका छुपी बहुत हुई सामने आ जा ना
 
कहां-कहां ढूंढा तुझे, थके है अब तेरी मां
 
आजा सांझ हुई
 
मुझे तेरी फिकर धुंधला गयी
 
देख मेरी नज़र आ जा ना’
 
‘रंग दे बसंती’ या सिनेमात एका अभागी मातेची ही अंगाई डोळे ओले करून जाते.
 
हिंदी चित्रपटसृष्टीतील अंगाई गीते. शब्द वेगळे, सूर वेगळे, प्रसंग वेगळे, नातीसुद्धा वेगवेगळी; पण त्यांचा स्पर्श मात्र वात्सल्याचा, मायेचा, आधार देणारा. आपल्या सर्वांनाच परिचित.
 
Powered By Sangraha 9.0