@माधव ज. जोशी 9223409123
ज्येष्ठ उद्योजक व टाटा समूहाचे दीर्घकाळ नेतृत्व केलेले रतन टाटा यांचे नुकतेच निधन झाले. रतन टाटा यांनी आपल्या उद्योगांचा विस्तार करताना उत्पादनाच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. त्याचबरोबर कर्मचार्यांच्या हितालाही प्राधान्य दिले. टाटा उद्योगसमूहात उच्च पदाधिकारी म्हणून काम केलेले माधव जोशी यांना रतन टाटा यांच्या भेटीच्या अनेक संधी मिळाल्या. त्यामुळे रतन टाटांच्या व्यक्तिमत्त्वाचे जवळून दर्शन झाले. त्या आठवणींना उजाळा देणारा लेख... रतन टाटा यांचे दु:खद निधन, हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे. हा माणूस काय आहे हे मला पहिल्यांदा कळले तेव्हाचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो!
साधारण 2006 ची गोष्ट आहे. वारंवार आरोप करण्याची आवड असलेल्या एका राजकारण्याने आमच्या कंपनीवर (टाटा टेलीसर्व्हिसेस) अनेक बिनबुडाचे आरोप केले होते. त्यात राजकीय फायदा उठविणे अधिक होते. या आरोपांमुळे कंपनी कायदा विभागाने आमच्या कंपनीची तपासणी करण्याचे आदेश दिले. अडीच महिने माझे सहकारी तपासणी पथकाला सामोरे जात होते. त्यानंतर आम्हाला 36 वेगवेगळ्या ‘कारणे दाखवा नोटिसा’ बजावण्यात आल्या. त्या सगळ्यांना आम्ही उत्तरे दिली. तपासणी पथकाला आमची उत्तरे समाधानकारक वाटली आणि त्यांनी 36 पैकी 35 नोटिसांच्या फाइल बंद केल्या; पण एवढ्या प्रदीर्घ तपासणीनंतर त्यांना फेस सेव्हिंग म्हणून काही तरी हवं होतं, म्हणून एका नोटीसमध्ये त्यांनी आम्हाला पाच हजार रुपये फी भरून कंपाऊंडिंगचा पर्याय निवडायला सांगितलं. कंपाऊंडिंग म्हणजे, आपल्याला कोणतेही कायद्याचे उल्लंघन मान्य करण्याची आवश्यकता नाही आणि आपण कंपाऊंडिंग शुल्क भरल्यास सरकारसुद्धा या प्रकरणाचा पाठपुरावा करत नाही.
ही कंपाऊंडिंग विनंती संचालक मंडळाने करावी, अशी अट होती म्हणून मी संचालकांच्या सभेमध्ये कंपाऊंडिंगसाठी पाच हजार रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला. मला किंवा आमचे एमडी चार्ल्स अँथनी यांनाही वाटले नाही की, त्या प्रस्तावात काही चुकीचे आहे किंवा ही एक मोठी गोष्ट आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत रतन टाटा यांनी तो विषय वगळून पुढचा विषय चर्चेसाठी घेतला. एवढ्या छोट्या विषयावर चर्चा करणे त्यांना कदाचित गरजेचं वाटलं नसेल, म्हणून त्यांनी ते टाळले असावे, असे मला वाटले. सभेच्या अजेंड्यावरचे इतर सर्व विषय संपल्यानंतर मी हळूच त्यांना आठवण करून दिली की, कंपाऊंडिंगचा विषय बाकी आहे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं, “कंपाऊंडिंगची काय गरज आहे? तुमची किंवा इतर कोणाची चुकी झाली आहे का? तसे असेल तर सांगा, मग बोर्ड परवानगी देईल.” मी घाईघाईने उत्तर दिले, “आमचे काहीच चुकलेले नाही; पण सरकारी खात्याला फेस सेव्हिंग म्हणून काही तरी हवे आहे.” रतन टाटांनी मला विचारले, “तुम्ही त्यांच्या फेस सेव्हिंगची काळजी कशाला करता?” मी उत्तर दिले, “जर आम्ही तसे केले नाही तर सरकार सर्व संचालकांवर फौजदारी खटला दाखल करू शकते आणि सर्वांना मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर राहून जामीन घ्यावा लागेल. वर्तमानपत्रात बातम्या येऊ शकतात.” हे ऐकून काही संचालकांचे चेहरे गंभीर झाले; पण रतन टाटांनी मला सांगितलं की, जेव्हा आम्ही संचालक होतो, तेव्हा आम्ही या सगळ्यासाठी तयार असतो. प्रकरण इथेच संपले असते; पण मी थोडी (जास्त) हुशारी दाखवली. मी म्हणालो, “सर, आपल्या समूहातल्या एका मुख्य कंपनीने दहा वर्षांपूर्वी असं कंपाऊंडिंग केलं होतं.” (अध्याहृत - तुम्हीच त्या कंपनीचे चेअरमन आहात.) राग न येता टाटा मला म्हणाले, “मला माहीत आहे. त्या कंपनीच्या शेअर ट्रान्स्फर एजंटने चूक केली होती, त्यामुळे आम्ही कंपाऊंडिंग केलं होतं.” त्यांच्या आठवणीने मी थक्क झालो. ते पुन्हा म्हणाले, “तुमची काही चूक झाली असेल तर आत्ताच सांगा.” आम्ही चूक केली नाही, हे मी त्यांना पुन्हा सांगितल्यावर त्यांनी विषय संपवला. या बैठकीनंतर इतर संचालक काहीसे चिंतित दिसत होते. जणू मी त्यांची काळजी घेण्यात अपयशी ठरलो होतो, अशा नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. आम्ही कंपाऊंडिंग करणार नाही, असे आम्ही सरकारला कळवले; पण सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दुसरी कोणती कंपनी असती तर कोणतीही चर्चा न करता कंपाऊंडिंग करण्याची परवानगी मिळाली असती! असे होते रतन टाटा!
रतन टाटा प्रसिद्धीपासून लांब राहात. ते लाजाळू होते. पार्ट्यांमध्ये जाणे त्यांना आवडत नसे. प्रसारमाध्यमांना त्यांच्याविषयी कधीही चविष्ट बातम्या मिळत नसत. टाटा सन्स या समूहाच्या मुख्य कंपनीचे अध्यक्ष असल्याने ते टाटा समूहाचे अध्यक्ष आणि समूहातील टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि इतर प्रमुख कंपन्यांचेही अध्यक्ष होते.
टाटा समूहाची 66 टक्के मालकी टाटा ट्रस्टकडे असून हा ट्रस्ट कल्याणकारी (चॅरिटेबल) ट्रस्ट आहे. त्यामुळे टाटा कुटुंबाच्या मालकीची कोणतीही कंपनी नाही. गेल्या 150 वर्षांपासून या समूहाचे धोरण हे आहे की, समाजाकडून जे मिळते त्यापेक्षा जास्त समाजाला परत द्यायचे.
रतन टाटा अध्यक्ष असताना (डिसेंबर 2012 पर्यंत) या कंपन्यांच्या भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) अनेक भागधारक रतन टाटांना पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी येत असत. अनेकांचा हेतू टाटांशी आपली किती ओळख आहे हे दाखवण्याचा असे. अनेक भागधारक त्यांच्यासाठी शेर उद्धृत करीत. ती स्तुती ऐकून टाटा चक्क लाजायचे. सभेच्या शेवटी त्यांना भागधारकांचा गराडा पडे. त्यातले अनेक जण त्यांच्यासोबत फोटो काढून घ्यायचे. त्यांना सभागृहातून बाहेर पडणे अवघड होत असे.
समर्थ रामदास सांगतात की, आपण एक मूठ भात शिजवला, तर त्यामागे अनेकांचे कष्ट असतात. म्हणून समाजाकडून जे आपण घेतो त्याच्या अनेकपटींनी समाजाला परत केले पाहिजे. टाटा समूहाची 66 टक्के मालकी टाटा ट्रस्टकडे असून हा ट्रस्ट कल्याणकारी (चॅरिटेबल) ट्रस्ट आहे. त्यामुळे टाटा कुटुंबाच्या मालकीची कोणतीही कंपनी नाही. गेल्या 150 वर्षांपासून या समूहाचे धोरण हे आहे की, समाजाकडून जे मिळते त्यापेक्षा जास्त समाजाला परत द्यायचे. ‘फोर्ब्स’च्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत टाटा 411 व्या स्थानावर होते. रतन टाटा नेहमी म्हणायचे, माझं चारित्र्य हीच माझी संपत्ती आहे. सत्ता आणि संपत्ती हा माझा प्रांत नाही. निवृत्त होईपर्यंत ते कुलाबा येथील एका फ्लॅटमध्ये राहत होते. कधी कधी संध्याकाळी ताजमहाल हॉटेलला आले तर ते स्वतःच टाटा ंमांझा किंवा नॅनो चालवत यायचे. सुट्टीमध्ये ते अनेकदा खाकी पँट आणि गडद हिरवा किंवा चेकचा तपकिरी किंवा लाल रंगाचा शर्ट घालून मरिन ड्राइव्हवर गाडी चालविताना दिसायचे.
मुंबईत असताना ते शनिवार, रविवारी अलिबाग समुद्रकिनारी स्वतः आराखडा बनविलेल्या बंगल्यात जाऊन राहत. ते आपल्या दोन कुत्र्यांसोबत समुद्रकिनार्यावर फिरताना दिसायचे. रतन टाटांना तांत्रिक उपकरणांची (गॅजेट्स) खूप आवड होती. त्यासाठी त्यांच्या घरात एक खोली होती.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे वर्णन रतन टाटांच्या एकवीस वर्षांच्या अध्यक्षपदातील सर्वात क्लेशदायक घटना असे करता येईल! ताजमहाल हॉटेलवरील हल्ल्याला आणि या घटनेत अनेकांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडसाला आता पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत!
26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री दहशतवाद्यांनी मुंबई शहरात एकूण दहा ठिकाणी एकत्रित हल्ले चढवले. यामध्ये आठ हल्ले दक्षिण मुंबई येथे छत्रपती शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी झाले. या सर्व ठिकाणी दहशतवाद्यांनी लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला व हातबॉम्ब फेकले. याव्यतिरिक्त माझगाव डॉक येथे एक बॉम्बस्फोट व विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्ये स्फोट झाला. दहा अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे, सॅटेलाइट फोन, आरडीएक्ससारखी स्फोटके होती. चार दिवस चाललेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह 166 नागरिक (त्यात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व छडॠ कमांडो होते.) आणि नऊ अतिरेकी मारले गेले. तीनशेहून अधिक जखमी झाले.
26 नोव्हेंबरच्या रात्री हिंदुस्थान युनिलिव्हरचे प्रमुख नितीन परांजपे आणि हरीश मनवानी यांची दोनशे माणसांची पार्टी ताजमध्ये दुसर्या मजल्यावर चालू होती. युनिलिव्हरचे जागतिक प्रमुख संचालक व त्यांची कुटुंबेसुद्धा होती. पार्टी संपत आली असताना हॉटेलबाहेर मोठमोठे आवाज आले. तेव्हा बाहेर कुणाच्या लग्नाच्या वरातीत फटाके उडत आहेत असे सर्वांना वाटले. अचानक ताज कर्मचार्यांवर देखरेख करणार्या मलिका जागड या 24 वर्षांच्या युवतीने त्या सभागृहाचे दरवाजे आतून लावून घेतले, दिवे घालवले व सर्वांना टेबलाखाली लपून बसण्यास सांगितले. तिने कुटुंबाचा धोका कमी करण्यासाठी नवरा व बायको यांना वेगवेगळे लपायला सांगितले. रात्रभर सर्व पाहुणे टेबलाखाली होते. बाहेर गोळीबार आणि स्फोटाचे आवाज येत होते. ताज कर्मचारी त्यांची वारंवार विचारपूस करत होते, त्यांना पाणी देत होते. दुसर्या दिवशी सकाळी बाहेरच्या पॅसेजमध्ये आग लागली म्हणून पाहुणे खिडक्यांवर चढून बसले ते अग्निशमन दलाने पाहिले व युनिलिव्हरच्या पूर्ण ग्रुपची अग्निशमन दलाच्या शिडीवरून सुटका झाली. मलिका जागड ही सर्वात शेवटी खाली उतरली.
रतन टाटा हे स्वत: धोका पत्करून, त्या दुर्दैवी तीन दिवसांत पोलीस आणि कमांडोसोबत तासन्तास रस्त्यावर उभे राहिले.
ताजमधील Wasabi या जपानी रेस्टॉरंटमध्ये 50 पाहुणे होते. थॉमस वर्गीस या वरिष्ठ वेटरने सर्वांना टेबलाखाली लपायला सांगितले आणि कर्मचार्यांनी त्यांच्याभोवती सुरक्षा कडे केले. चार तासांनी मागील वर्तुळाकार जिन्याने थॉमसने सर्वांना बाहेर काढले. सर्वात शेवटी तो उतरत होता; पण तो शेवटच्या पायरीवर असताना गोळीला बळी पडला. करमबिरसिंग कंग हे ताजचे महाव्यवस्थापक (GM) होते. ते, त्यांची पत्नी आणि दोन मुले प्रथेप्रमाणे ताजमध्ये सहाव्या मजल्यावर राहत होते. करमबिरसिंग त्या वेळी दहा मिनिटांवरील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मीटिंगमध्ये होते. त्यांना हल्ल्याचे कळल्यावर ते ताबडतोब आले व पाहुण्यांना बाहेर काढण्यात मदत करू लागले. सहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत स्वतःची पत्नी व दोन मुले बळी पडल्याचे त्यांना काही तासांनी कळले. स्वतःच्या वडिलांना ही बातमी त्यांनी दुसर्या दिवशी दुपारी थोडा मोकळा वेळ मिळाल्यावर दिली.
अतिरेकी हल्ल्यात ताजमहाल हॉटेलमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला होता, त्यात 1500 ते 2000 पाहुण्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना हुतात्मा झालेल्या 11 ताजमहाल हॉटेल कर्मचार्यांचा समावेश होता.
अशा दहशतवादी हल्ल्यासारख्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याचे प्रशिक्षण दिले जात नाही; पण प्रत्येक कर्मचारी नि:स्वार्थी, निडर नेता बनला. टाटा समूहाने केवळ संपत्तीच निर्माण केली नाही, तर अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे निर्माण केली, त्याचे ही घटना एक उदाहरण आहे. रतन टाटा हे स्वत: धोका पत्करून, त्या दुर्दैवी तीन दिवसांत पोलीस आणि कमांडोसोबत तासन्तास रस्त्यावर उभे राहिले.
त्यानंतर टाटा यांनी ताज वेल्फेअर ट्रस्टची स्थापना केली आणि मृत कर्मचार्यांच्या विधवांकडे पुनर्वसनाचे काम सोपवले आणि त्यांना जगण्यासाठी ध्येय दिले. ट्रस्टने केवळ ताज स्टाफलाच नव्हे तर इतर मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांनाही मदत केली. त्यांनी मृत आणि जखमींपैकी अनेकांच्या घरी जाऊन नातेवाईकांची भेट घेतली आणि मदतीचा हात पुढे केला. त्यांनी रुग्णालयात जखमींची भेट घेतली. त्यात काही फेरीवालेही होते, त्यांना भांडवल दिले. या गोष्टींबद्दल कोणताही गवगवा करण्यात आला नाही. 2009 मध्ये ताज हॉटेलमध्ये स्मारक म्हणून 31 मृतांची नावे असलेला 12 फूट उंच स्मृतिस्तंभ उभारण्यात आला.
संरचनात्मक अभियंता (structural engineer) चेतन रायकर आणि इतरांनी अहोरात्र काम करून ताजची नवीन इमारत फक्त तेवीस दिवसांत तयार करून दिली आणि एका महिन्यात हॉटेलचा काही भाग उघडण्यात आला; पण हॉटेल पूर्ववत करण्यासाठी किंवा अधिक वैभवशाली करण्यासाठी 21 महिने आणि 300 कोटी रुपये लागले. चेतन रायकर यांनी आपली फी घेण्यास नकार दिला; पण ताजने त्यांना त्यांची फी घ्यायला लावली. या कालावधीत काम न करणार्या कर्मचार्यांना पूर्ण वेतन देण्यात आले. अशा संकटांना सामोरे जाताना आपण डगमगत नाही, हे टाटा समूहाने आणि भारतीयांनी दाखवून दिले.
लेखक टाटा उद्योगसमूहातील
उच्चपदस्थ अधिकारी होते.