चित्त विचलित करणारी नोटिफिकेशन्स

विवेक मराठी    11-Oct-2024
Total Views |
@गुंजन कुलकर्णी  7775092277
सोशल मीडिया, त्यावर वारंवार येणारी नोटिफिकेशन्स आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झालेली आहेत. नोटिफिकेशन्सची सुरुवात महत्त्वाच्या माहितीकडे आपले लक्ष वेधून घेण्यासाठीच झालेली आहे; परंतु आपल्यासाठी ‘महत्त्वाचं काय’ हे नक्की कोण ठरवतंय? आपल्या एकाग्रतेवर, कार्यक्षमतेवर, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकणार्‍या ह्या नोटिफिकेशन्सना चाळणी आणि कात्री लावण्याचं काम आपणच करायला हवं, नाही का?


vivek
 
’ऐका हो ऐका...’ असे हाकारे देत गावभर फिरून काही तरी ’सूचित’ करणार्‍या राज्यातील, गावांतील दूतांबद्दल आपण गोष्टींमधून वाचलेलं असतं. अर्थात इतरांना ’सूचित’ करण्याच्या, नोटिफिकेशन्स देण्याच्या काही पद्धती त्याआधीही वापरल्या जात असतीलच. तेव्हापासून हे असे सूचना देण्यासाठी लक्ष वेधण्याचे अनेक मार्ग वापरले गेले असतील. त्या वेळच्या ’ऐका हो ऐका...’पासून आता आपण ’टिंग टिंग’च्या जमान्यात पोहोचलो आहोत. प्रत्येकाच्या हातात असणारा इवलासा स्मार्ट डिव्हाइस वेळोवेळी आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला सतत आपल्याला काही तरी सांगायचं असतं. ’बॉसचा मेसेज आलाय’, ’अमुक कंपनीची ई-मेल आहे’, ’मैत्रिणीने फोटो पाठवलाय’, ’तुझ्या स्टोरीला दोन नवीन लाइक्स मिळालेत’, ’इंस्टाग्रामवर सध्या अमुक ट्रेंड व्हायरल होत आहे’, ’तुझ्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडीओ अपलोड झालाय’... असं दर काही सेकंदांनी आपल्याला ’नोटिफाय’ केलं जातं. आपल्या डिव्हाइसच्या या ’ऐका हो ऐका’ला आपणही लग्गेच प्रतिक्रिया देतो. आपण फोन हातात घेऊन एका अ‍ॅपने नोटिफाय केलेला मेसेज पाहतोय न पाहतोय तोवर दुसरं काही तरी नोटिफिकेशन येतं... और ये सिलसिला दिनभर चालू रहता है!! दिवसाच काय, ही नोटिफिकेशन्स काही लोकांची तर रात्रीची झोपही उडवतात.
इव्हन पॅवलाव नावाच्या एका रशियन फिजिओलॉजिस्टने क्लासिकल कंडिशनिंगचा शोध लावला. त्याने काही कुत्र्यांवर हे कंडिशनिंगचे प्रयोग केले. कुत्र्यांच्या पचनक्रियेचा अभ्यास करताना त्याच्या लक्षात आलं की, ह्या कुत्र्यांना अन्न देणार्‍या व्यक्ती दिसल्या की, या कुत्र्यांच्या तोंडात लाळ तयार होते. त्यानंतर त्याने या कुत्र्यांवर काही प्रयोग केले. त्यांना अन्न देण्याच्या आधी प्रत्येक वेळी एक बेलचा आवाज ऐकवला जायचा. काही काळानंतर असं लक्षात आलं की, या कुत्र्यांनी बेलचा आवाज ऐकला, की त्यांच्या लाळग्रंथी उद्दीपित होऊन, तोंडात लाळ जमा व्हायला लागायची. काही काळाने बेलच्या आवाजानंतर लगेच खाणे दिले नाही तरी सलायव्हेशनची प्रक्रिया होऊन कुत्र्यांच्या तोंडात लाळ जमा व्हायचीच. आज एकविसाव्या शतकात सोशल मीडियावरची नोटिफिकेशन्स पॅवलावच्या त्या बेलचं काम तर करत नाहीयेत ना आपल्या आयुष्यात? विचार करायला हवा.

notifications 
 
तुम्हाला माहिती आहे का? या नोटिफिकेशन्सच्या मागे मानवी मेंदूचा खूप शास्त्रशुद्ध विचार केलेला असतो. आपल्या सोशल मीडिया अ‍ॅप्सवर येणारी दृश्यं आणि श्राव्य (व्हिज्युअल आणि ऑडिटरी) नोटिफिकेशन्स खूप विचारपूर्वक डिझाईन केलेली असतात. मनुष्याच्या मनाचा, मानसिकतेचा सखोल विचार करून या नोटिफिकेशन्सचे आवाज, रंग, आकार ठरवलेले असतात. त्याविषयी अनेक मार्केटिंग रिसर्चेस चालू असतात आणि कळत-नकळत आपण यापैकी बर्‍याच प्रयोगांचे सब्जेक्ट्स होत असतो. ही नोटिफिकेशन्स आपल्यासाठी तातडीने मिळणार्‍या बक्षिसांसारखं (इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन) काम करतात. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांची ही गरज आहे. आपलं कौतुक व्हावं, आपल्याला बक्षीस मिळावं असं वाटायला काही वयाची मर्यादा नाही. सोशल मीडियावर एक क्लिक केलं की लाइक्स, कमेंट्सची बक्षिसं मिळत राहतात. तिथे ही अशी बक्षिसं मिळत गेली की, ती अजून हवीहवीशी वाटतात आणि त्याची सवय लागायला, काही लोकांच्या बाबतीत व्यसन लागायलाही वेळ लागत नाही. ही बक्षिसं मिळणार आहेत हे सांगणार्‍या नोटिफिकेशन्सकडे मग खूप लक्ष दिलं जातं. त्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्यक्ष कामावरून, अभ्यासावरून आपलं लक्ष उडतं. ही बक्षिसं देणारी नोटिफिकेशन्स जास्तीत जास्त मिळत राहावीत अशी इच्छा होते. त्यात आपला किती वेळ गेला याचं भानच राहत नाही. कामासाठी वेळ पुरत नाही. प्रॉडक्टिव्हिटी कमी होत जाते. शिवाय ठरवल्याप्रमाणे काम पूर्ण झाल्याचं समाधान मिळत नाही ते वेगळंच! उलट वेळ कमी पडल्याचा ताण मनात साचत जातो. जगभरात झालेल्या अनेक अभ्यासांतून असं लक्षात आलंय की, स्मार्ट फोनवरची नोटिफिकेशन्स आपण लगेच चेक केली नाहीत तरी त्या आपलं लक्ष विचलित करतात. नोटिफिकेशनचा आवाज ऐकला किंवा चिन्ह पाहिलं की, आपल्या मनात त्याविषयी विचार यायला सुरुवात होते. आपलं लक्ष भरकटतं आणि पुन्हा पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायला जवळ जवळ 25 मिनिटं लागू शकतात. साहजिकच नोटिफिकेशन्सच्या या डिस्ट्रॅक्शनमुळे कामात चुकाही होतात आणि पर्यायानं काम वाढतं.
 
 नोटिफिकेशन्स खूप विचारपूर्वक डिझाईन केलेली असतात. मनुष्याच्या मनाचा, मानसिकतेचा सखोल विचार करून या नोटिफिकेशन्सचे आवाज, रंग, आकार ठरवलेले असतात. ही नोटिफिकेशन्स आपल्यासाठी तातडीने मिळणार्‍या बक्षिसांसारखं (इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन) काम करतात. लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांची ही गरज आहे. आपलं कौतुक व्हावं, आपल्याला बक्षीस मिळावं असं वाटायला काही वयाची मर्यादा नाही. सोशल मीडियावर एक क्लिक केलं की लाइक्स, कमेंट्सची बक्षिसं मिळत राहतात. तिथे ही अशी बक्षिसं मिळत गेली की, काही लोकांच्या बाबतीत व्यसन लागायलाही वेळ लागत नाही.

notifications

  
वेळ कमी पडणं, प्रॉडक्टिव्हिटी कमी होणं, याच्याबरोबरच स्मार्ट फोनच्या वापरानं आपला पेशन्सही कमी केलाय. परवा एका शाळेत तीन ते सहा या वयोगटातल्या मुलांच्या पालकांचं सत्र घेतलं. त्यातही ’मुलं आजकाल एका जागी बसतच नाहीत’ अशी तक्रार बर्‍याच पालकांनी केली. अगदी मोबाइलवर व्हिडीओज् पाहताना, टीव्हीवर कार्टून पाहतानासुद्धा एक सोडून दुसरं, दुसरं सोडून तिसरं असं करत राहतात. मुलांचंच काय, आपणही आजकाल किती गोष्टी सलग पूर्ण बघू शकतो? आपला पेशन्स कमी का झाला? तुम्हाला माहीत आहे का? शॉर्ट व्हिडीओज् आणि रील्सचं बिंज वॉचिंग हे या कमी झालेल्या पेशन्सचं महत्त्वाचं कारण आहे. एखादा मोठा व्हिडीओ किंवा चित्रपट बघताना ’सुरुवात-मध्य-शेवट’ असा अनुभव आपल्या मेंदूला मिळतो. त्यातून एखादी गोष्ट सुरू होऊन मग पूर्ण झाल्याचा संकेत मेंदूला मिळतो. ही संवेदना मेंदूला स्थिर राहण्यासाठी आवश्यक आहे. ही स्थिरता शॉर्ट व्हिडीओज् आणि रील्समधून मिळत नाही. एखादी गोष्ट पूर्ण झाल्याचा संकेत न मिळाल्यामुळे एकापुढे एक, एकमेकांशी संबंध नसलेला कंटेन्ट आपण पाहत राहतो. या मेंदूला मिळालेल्या सततच्या स्टिम्युलसमुळे एकाग्रता कमी होते. काही वेळा आपण तासन्तास बिंज वॉचिंग करत असतो; पण त्याला एकाग्रता म्हणता येणार नाही. कारण शरीर, मन आणि बुद्धीने एखादे काम करण्यासाठी एकत्रितपणे साधलेली अवस्था म्हणजे एकाग्रता. शॉर्ट व्हिडीओज् आणि रील्सच्या बिंज वॉचिंगमुळे, सततच्या डिस्ट्रॅक्शनमुळे शरीरावर वाईट परिणाम होणार, मानसिक अस्वास्थ्य येणार आणि प्रॉडक्टिव्हिटीही कमी होणारच ना? आपलं शारीरिक स्वास्थ्य, मनाची शांती आणि काम करण्याची शक्ती घालवणार्‍या या डिस्ट्रॅक्शन्सच करायचं काय? मागे उल्लेख केलेल्या, पॅवलावच्या एक्सपरिमेंटमधल्या सब्जेक्ट असणार्‍या कुत्र्यांसारखी आपली अवस्था करायची नसेल तर या काही गोष्टी कराव्या लागतील:
 
नोटिफिकेशन्स बंद करू या
पहिली गोष्ट म्हणजे आपल्या फोनवरची सतत टिंग टिंग करणारी नोटिफिकेशन्स बंद करून टाकू या. म्हणजे फोन आपण स्वतःहून हातात घेईपर्यंत तो आपल्याला हाका मारत राहणार नाही.
 
 
स्क्रीन टाइमवर मर्यादा घालू या
 
स्क्रीन टाइमवर वेळेची मर्यादा घालू या. स्क्रीन टाइमचं शेड्युल लावता येणं शक्य आहे, हो ना? वॉशरूममध्ये मी फोन नेणार नाही, रात्री झोपायच्या आधी अर्धा तासापासून स्क्रीन बंद ठेवणार, जेवताना स्क्रीनसमोर वेळ घालवणार नाही. अशा काही छोट्या छोट्या नियमांपासून सुरुवात करता येईल.
 
 
अ‍ॅप्स काढून टाकू या
 
जी अ‍ॅप्स आपलं बिंज वॉचिंग वाढवतात त्याची सहज अ‍ॅक्सेसिबिलिटी कमी करू या. एखाद्या अ‍ॅपवर जर आपला रील्स बघण्यात खूप वेळ जात असेल तर ते मोबाइलवरून काढून टाकू या. गरज असेल तर त्याचा अ‍ॅक्सेस लॅपटॉपवर ठेवता येईल. प्रत्येक वेळी लॅपटॉप उघडून हे अ‍ॅप वापरलं जाण्याची शक्यता कमी होईल. त्यातून आपोआपच स्क्रीन टाइम कमी होईल.
 
 
प्रत्यक्ष अनुभव घेणे/छंद जोपासणे
 
एकाग्रचित्ताने करण्याच्या प्रत्यक्ष अ‍ॅक्टिव्हिटीज हातात घेऊ या. पेंटिंग, पॉटरी, कुकिंग, विणकाम, बागकाम, गायन, वादन अशा किती तरी छंदांसाठी स्क्रीनची गरज नाही. कधी तरी मित्रांबरोबर बाहेर जाताना मोबाइल जाणीवपूर्वक घरी ’विसरून’ जाऊ या. त्याने लगेच इकडचं जग तिकडे होणार नाही, नाही का?
 
 
उद्दिष्टाची स्पष्टता ठेवू या
 
सोशल मीडियाचा वापर करताना आपला उद्देश स्पष्ट ठेवू या. त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर त्यातून आपला व्यवसाय वाढवता येतो, आपली कला जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येते, लोकांना प्रेरणा देता येते. अर्थात हे लक्षात ठेवू या की, वाढवायला व्यवसाय, सादर करायला कला आणि इतरांना प्रेरणा देणारे आयुष्य प्रत्यक्ष प्रयत्न करूनच मिळवावे लागते. ते सोशल मीडियावर मिळणार नाही.
 
सोशल मीडिया, त्यावर वारंवार येणारी नोटिफिकेशन्स आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झालेली आहेत. नोटिफिकेशन्सची सुरुवात महत्त्वाच्या माहितीकडे आपले लक्ष वेधून घेण्यासाठीच झालेली आहे; परंतु आपल्यासाठी ’महत्त्वाचं काय’ हे नक्की कोण ठरवतंय? आपल्या एकाग्रतेवर, कार्यक्षमतेवर, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करू शकणार्‍या ह्या नोटिफिकेशन्सना चाळणी आणि कात्री लावण्याचं काम आपणच करायला हवं, नाही का?
 
लेखिका चाइल्ड आणि फॅमिली सायकॉलॉजिस्ट आहेत.
 
gunjan.mhc@gmail.com