@अजय तेलंग 9822323289
शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन 2020 सालीच व्हायला हवे होते, परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावाने सारे जगच ठप्प झाले. त्यानंतर नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेगळेच नाट्य रंगले. आणि शतकमहोत्सवी वर्ष लांबत लांबत संमेलनाचा मुहूर्त 2023 सालच्या सरत्या महिन्याचा 29 डिसेंबरला मिळाला. नाट्य संमेलन असले तरी संमेलनाचे कसे नाट्य चालू आहे, हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.
खरे तर शतकमहोत्सवी नाट्यसंमेलन 2020 सालीच व्हायचे. जानेवारी 2020मध्ये तशी अधिकृत घोषणाही झाली. 26 मार्चला नाट्यपंढरी सांगलीत शुभारंभ होऊन 14 जूनला मुंबईत समारोप होणार, हेही ठरले. या निमित्ताने राज्यभर छोटे छोटे कार्यक्रम करण्याचेही योजले होते. तेव्हा अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते प्रसाद कांबळी आणि नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध नाट्यकर्मी डॉ. जब्बार पटेल.
नेमक्या याच काळात कोरोनाने धुमाकूळ घातला. वर्षभर शांतच गेले. नाटकेही बंद पडली. नाट्यकर्मींचे फार हाल झाले. अनेकांचा पोटाचा प्रश्नच आ वासून उभा राहिला. 2022 साली मात्र थोडे स्थिरस्थावर झाले. पण याच वर्षी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेगळेच नाट्य रंगले. हा प्रयोग फारच मनोरंजक ठरला. चुरशीची निवडणूक, शह-काटशह, राजकारण्यांची लुडबुड, मा. शरदरावजी पवारांचे नाट्य परिषदेतले घटनासिद्ध अढळ स्थान अशा अनेक गमतींमधून ही निवडणूक पार पडली आणि लोकप्रिय नाट्यकर्मी प्रशांत दामले हे नवे अध्यक्ष बनले.
पुन्हा एकदा नाट्य संमेलनाची तयारी सुरू झाली. 5 नोव्हेंबरचा मराठी रंगभूमी दिनाचा मुहूर्त ठरला. मागील वेळच्या नियोजनाप्रमाणे राज्यभर छोटी संमेलने घ्यायचेही ठरले. मात्र निधीच्या अभावी ज्या त्या समितीने आपापल्या शक्तीनुसार ही संमेलने घ्यायची, असे ठरले. त्यामुळे सक्रिय असणार्या आणि निधी संकलन करण्याची क्षमता असलेल्या (अर्थात राजकीय पाठबळ असणार्या) समित्या पुढे सरसावल्या. नाट्यपंढरीत शुभारंभ करण्याचे ठरले आणि एक नवे विघ्न उपस्थित झाले - मनोज जरांगे नावाचे. त्याच्या आंदोलनामुळे शुभारंभाचा मुहूर्त हुकला. राजकीय पुढार्यांना संमेलनात बोलवायचे नाही, अशी त्याने भूमिका घेतली. अर्थात, ही राजकीय खेळीच होती. कारण सगळे पवार साहेबांच्या सूचनेवरून होत होते. त्यांच्या विरोधात असलेले राजकीय नेते, मंत्री यांच्याबरोबर एका मंचावर येणे त्यांना कमीपणाचे वाटणे स्वाभाविकच होते.
पुन्हा एकदा वेळापत्रक बदलले. अखेर 29 डिसेंबरला नाट्य संमेलनाचा नारळ वाढवला गेला तो सांगलीत! 28 तारखेला ‘संगीत मंदारमाला’ या नाटकाचा सुरेख प्रयोगही झाला. मुंबईच्या ‘संगीतभूषण राम मराठे फाउंडेशन’ आणि ‘कलाभारती’ या संस्थांनी केलेला हा प्रयोग रसिकांनी वाखाणला. 29 डिसेंबरला सकाळी भावे नाट्यमंदिरात उद्योजक गिरीश चितळे यांच्या हस्ते मुहूर्तमेढ पूजन झाले. या वेळी स्वागताध्यक्ष आ. सुधीरदादा गाडगीळ, मावळते संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, खा. संजयकाका पाटील, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले, साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी असे मान्यवर उपस्थित राहिले. सायंकाळी ‘ओअॅसिस’ या स्थानिकांनी बसवलेल्या एकांकिकेचा प्रयोग झाला.
यंदाही अनेक ठिकाणी नाट्यप्रयोग, एकांकिका, स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र त्या त्या स्थानच्या सोयीप्रमाणे प्रत्येक आयोजक समिती त्यांचे नियोजन करणार आहे. यंदा ही स्थाने आहेत पिंपरी-चिंचवड, पुणे, तळेगाव दाभाडे, बीड, अहमदनगर, सोलापूर, नागपूर, रत्नागिरी आणि मुंबई. समारोपाचा कार्यक्रम रत्नागिरी येथे घेण्याचे ठरले आहे. अनेक समित्यांनी निधीअभावी संमेलन भरवण्यास नकार दिला. पण सांगलीत उद्घाटनप्रसंगी राज्य सरकारने निधी जाहीर केला. एवढेच नव्हे, तर नाट्य परिषदेकडे 10 कोटींचा निधी जमाही झाला. आता नकार देणार्या समित्या हळहळताहेत. या निधीचा वापर संमेलनासाठीच करायचा असल्यामुळे सर्व आयोजक समित्यांना प्रत्येकी 25 लाखांचा निधी मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड समितीला तर 1 कोटी मिळणार आहेत, आहात कुठे!
पुणे समितीने दि. 5 जानेवारीला संमेलन भरवायचे ठरवले आहे. यात नाट्यसंकीर्तन, भारूड, परिसंवाद, पारंपरिक लावणी, नाट्यसंगीत असे कार्यक्रम योजले आहेत. पिंपरी-चिंचवड समितीने 5-6 जानेवारीला दशावतार (नाटक), अस्तित्व (व्यावसायिक नाटक), शिवराज्याभिषेकाचा मंचीय सोहळा, संगीत रजनी, जोडी तुझी माझी (नाटक), संगीत सौभद्र, हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम, करून गेला गाव (व्यावसायिक नाटक), मर्डरवाले कुलकर्णी (व्यावसायिक नाटक), दैवी एक रहस्य (प्रायोगिक नाटक), सिनेमा (एकांकिका), चित्रांगदा (एकांकिका), हॅलो इन्स्पेक्टर (एकांकिका), फेलसेफ (एकांकिका), तुझे आहे तुजपाशी (व्यावसायिक नाटक), दादा एक गुड न्यूज आहे (व्यावसायिक नाटक), परिसंवाद, प्रकट मुलाखत, संगीत रजनी, माझी माय (बालनाट्य), ढब्बू ढोल (बालनाट्य), गोष्ट सिंपल पिलाची (बालनाट्य), पपेट शो, बालगीते, अमेरिकन अल्बम (व्यावसायिक नाटक), खरं खरं सांग (व्यावसायिक नाटक), लावणी महोत्सव, शहर कुंभकर्ण (व्यावसायिक नाटक), लोकधारा, काव्य पहाट, तेरवं (प्रायोगिक नाटक), उच्छाद (प्रायोगिक नाटक), नृत्य, गुड बाय किस (प्रायोगिक नाटक), घाशीराम कोतवाल (व्यावसायिक नाटक), सय-सरी (एकांकिका), क्लिक माइम अॅक्ट (एकांकिका), परमेश्वर.कॉम (एकांकिका), अ डील (एकांकिका), मसनातलं सोनं (एकांकिका), कूपन (एकांकिका), तप्तपदी (एकांकिका), गेम ऑफ पॉवर (व्यावसायिक नाटक), चाणक्य (व्यावसायिक नाटक), रा था (प्रायोगिक नाटक), राज ठाकरे यांची मुलाखत आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 20 ते 25 जानेवारी या कालावधीत सोलापूर येथे विभागीय नाट्य संमेलन रंगणार आहे. अमिताभ बच्चन उद्घाटनाला येतील असे पुढार्यांनी आश्वासन दिले आहे!
नाट्य संमेलनाच्या मध्यवर्ती समितीने 15 जानेवरी ते 4 फेब्रुवारी या काळात ‘नाट्यकलेचा जागर’ ही महास्पर्धा आयोजित केली आहे. एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन यांच्या या स्पर्धा राज्यस्तरावर होतील. विजेत्यांना बक्षिसांखेरीज नाट्य संमेलनात सादरीकरणाची संधी मिळणार आहे. हा लेख लिहीपर्यंत मंडळाकडे सुमारे 2 हजार प्रवेशिका आल्या होत्या. 10 हजार प्रवेशिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे ही स्पर्धा कशी होणार, याविषयी अजून संभ्रमच आहे.
एकुणात या नाट्य संमेलनाचे फलित काय, हा प्रश्नच आहे. साहित्य संमेलनाची जी फलश्रुती, तीच याही संमेलनाची. यातून नाट्यकर्मींना काय मिळते? रसिकांना काय मिळते? राजकारण्यांचा काय फायदा होतो? शासनाने कोट्यवधींचा निधी दिल्यामुळे जनतेला काय मिळते? असे अनेक प्रश्न आहेत. यांची उत्तरे मिळतील, तेव्हाच ‘नाट्यमय’ संमेलनाचे सार्थक होईल.