कथा - इंग्रजी नववर्षाची..

05 Jan 2024 12:57:11
@वसुमती करंदीकर
 
आपण सर्व जण इंग्रजी नववर्ष उत्साहाने साजरे करतो. परंतु त्यापूर्वी आपली दिनदर्शिका कशी निर्माण झाली, तिचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. 1 जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस ठरला? इंग्रजी महिन्यांची नावे कशी ठरली? याबाबत रंजक माहिती देणारा लेख.

Months Names?

 
नुकतीच सर्वांनी इंग्रजी नवीन वर्षाची उत्साहाने सुरुवात केली आहे. नवीन संकल्प, नवीन धोरणे, नवीन आशा या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून पुन्हा पल्लवित होतात. सध्या तर नवीन वर्ष साजरे करण्याची, 31 डिसेंबरला रात्री जल्लोश करण्याची प्रथाच पडली आहे. पण, पूर्वी नवीन वर्षाची सुरुवात 25 मार्च रोजी होत असे. तसेच आज असणारी बारा महिन्यांची दिनदर्शिका पूर्वी दहा महिन्यांची होती. तसेच दिनदर्शिकेचे चार प्रकारही होते. मार्च ते डिसेंबर अशी असणारी दिनदर्शिका जानेवारी ते डिसेंबर कशी झाली, इंग्रजी महिन्यांची नावे कशी ठरवण्यात आली, हे जाणून घेणे रंजक ठरेल.
 
 पूर्वी होती दहा महिन्यांची दिनदर्शिका
 
आज व्यवहारामध्ये बारा महिन्यांची दिनदर्शिका वापरली जाते. परंतु प्राचीन काळी इ.स.पूर्व 150पर्यंत ही बारा महिन्यांची दिनदर्शिका नव्हती. येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर व्यावहारिक तरतुदींकरिता बारा महिन्यांची दिनदर्शिका निर्माण झाली.
प्राचीन रोमन लोक खूपच व्यवहारीक होते. अनावश्यक गोष्टींसाठीची तरतूद त्यांना मान्य नव्हती. त्यांनी वसंत ऋतूत वर्षाची सुरुवात मानली. त्यामुळे त्यांची दिनदर्शिका मार्च महिन्यापासून सुरू होत असे आणि डिसेंबर महिन्यात संपत असे. डिसेंबर हे नाव लॅटिन शब्द ‘डिसेन’ यावरून आले आहे. ‘डिसेन’ म्हणजे ‘दहा.’ मार्चपासून वर्ष सुरू होई. त्यामुळे दहावा महिना म्हणजे ‘डिसेन’ - डिसेंबर असे. तेव्हा 304 दिवसांचे वर्ष होते. रोमन वर्षात 10 महिने आणि 8-9 दिवसांचे अंदाजे 38 आठवडे होते. परंतु डिसेंबर ते मार्चमधील काळ अनामिक राहत असे. तसेच हे 304 दिवस सौर वर्षाशी जुळत नसत. हा काळ अधिक हिवाळ्याचा असे. रोमन लोकांसाठी उदासीन म्हणजे काही कार्य न करता येण्यासारखा होता. परंतु नुमा नावाच्या रोमन राजाने ऋतूंच्या मानाने दिनदर्शिकेची रचना चुकीची आहे, असे मत मांडले. त्याने या काळाला नाव देण्याचे ठरवले. जॅनस देवावरून जानेवारी हे नाव, तर ‘टू प्युरीफि’ या शुद्धीकरणाच्या उत्सवावरून फेब्रुवारी हे नाव मिळाले.
 
 
1 जानेवारी कसा ठरला नवीन वर्षाचा पहिला दिवस ?
 
आपण 1 जानेवारी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा करतो. परंतु 10 महिन्यांच्या दिनदर्शिकेत 25 मार्च हा नवीन वर्षाचा पहिला दिवस असे. रोमन राजा नुमा पॉम्पिलियसने इ.स.पूर्व 46मध्ये 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस मानण्यास सुरुवात केली.
 

Months Names? 
 
इ.स.पूर्व पहिल्या शतकात ज्युलियस सीझर यानेही दिनदर्शिकेत बदल केले आणि नवीन वर्षाची सुरुवात 1 जानेवारी केली. 1 जानेवारीपासून सुरुवात करणे लीप वर्षासाठीही व्यावहारिक होते. त्यामुळे पाश्चात्त्य राष्ट्रांनी ही दिनदर्शिका स्वीकारली.
 
इंग्रजी महिन्यांची नावे कशी ठरली?
  
’जॅनरियुस’ या लॅटीन भाषेतील शब्दापासून जानेवारी हा शब्द तयार झाला. ’जॅनरियुस’ हे नाव ’जेन’ या रोमन देवतेच्या आधारे ठेवण्यात आले होते. या देवतेला पुढे आणि पाठीमागे अशी दोन तोंडे होती, अशी आख्यायिका आहे. एकाच वेळी हा देव मागे आणि पुढे पाहू शकत होता. जानेवारी महिन्याचेही असेच आहे, डिसेंबर महिन्याला निरोप देत हा महिना नव्या वर्षाचे स्वागत करतो. फेब्रुवारी महिन्याचे नाव लॅटीन ’फॅबीएरियुस’चा अपभ्रंश आहे. ‘टू प्युरीफि’ हा शुद्धीकरणाचा उत्सव या दरम्यान रोमन साम्राज्यात साजरा होत असे. या उत्सवाला असणारे महत्त्व जाणून या काळाला फेब्रुवारी नाव देण्यात आले. रोमन देवता ’मार्स’ या नावावरून मार्च महिन्याचे नाव ठेवण्यात आले. रोमन वर्षाची सुरुवात मार्च महिन्याने होते. मार्स ही युद्ध आणि समृद्धीची देवता मानली जाते. एप्रिल महिन्याचे नाव लॅटिन शब्द ’ऐपेरायर’पासून निर्माण झाले आहे. युरोपात या महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होते. यामुळे या महिन्याचे नाव एप्रिलियस असे ठेवण्यात आले. पुढे याचा अपभ्रंश होऊन ’एप्रिल’ असे सर्वमान्य झाले. रोमन देवता ’मरकरी’च्या नावावरून मे महिन्याचे नाव ठेवण्यात आले आहे. तसेच वसंत देवता ’मेयस’ हिच्या नावावरून मे असे नाव मिळाल्याची आख्यायिका आहे.
 

Months Names? 
 
 
Months Names?
 
 
रोमची सर्वात मोठी देवता जीयसच्या पत्नीचे नाव जूनो होते. ’जुबेनियस’ या शब्दापासून ’जूनो’ शब्द तयार झाला. याचा अर्थ ’विवाहयोग्य कन्या’ असा होतो. या देवतेवरून जून हे नाव पडले. जुलै महिन्याचे नाव रोमन सम्राट ज्यूलियस सीझर याच्या नावावरून देण्यात आले आहे. याच महिन्यात ज्यूलियस सीझरचा जन्म आणि मृत्यू झाला होता.
 

Months Names? 
 
ऑगस्ट या महिन्याचे नाव ज्यूलियस सीझरचा पुतण्या ऑगस्टस सीझरच्या नावावरून ठेवण्यात आले. ऑगस्ट महिन्याचे आधीचे नाव ’सॅबिस्टलिस’ असे होते.
 
 
लॅटिन शब्द ’सेप्टेम’वरून सप्टेंबर महिन्याचे नाव ठेवण्यात आले आहे. रोममध्ये सप्टाम या शब्दाचा अर्थ सात असा होतो, प्राचीन रोमन कॅलेंडरमध्ये सप्टेंबर महिन्याचे सातवे स्थान होते. ’आक्टो’ या लॅटिन शब्दापासून ऑक्टोबर महिन्याचे नाव देण्यात आले. नवम या लॅटिन शब्दापासून नोव्हेंबर महिन्याचे नाव पडले. नवम याचा अर्थ नऊ असा होतो. वर्षातील शेवटचा महिना डिसेंबरचे नाव लॅटिन शब्द ’डेसम’ म्हणजे दहा शब्दापासून घेण्यात आले आहे. प्राचीन रोमन दिनदर्शिकेत डिसेंबर दहावा महिना होता.
इंग्रजी दिनदर्शिकेचे रोमन, ग्रेगोरियन, ज्युलियन असे प्रकार पडलेले दिसतात. रोमन दिनदर्शिका ही सर्वात प्राचीन आहे. यामध्ये 10 महिने होते. सध्या ग्रेगोरियन दिनदर्शिका सर्वत्र वापरली जाते. यामध्ये लीप वर्ष, 12 महिने यांचा समावेश आहे. भारतात आणि चीनमध्ये चांद्रगणनेनुसारही दिनदर्शिका आहेत. तसेच धार्मिक स्तरावरही दिनदर्शिकांचे प्रकार भारतात आढळतात.
 
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0