कालाय तस्मै नम:।

04 Jan 2024 17:50:35
 
vivek
 
या साप्ताहिकाच्या गेल्या 22 वर्षांतल्या निवडक मुखपृष्ठांची लिंक आंतरजालावर उपलब्ध आहे. त्यासाठी साधारण 14 मुखपृष्ठ कथांची निवड केली आहे. निरपराध कारसेवकांचे बळी घेणार्‍या गोध्रा जळीतकांडानंतर मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी गुजरातेत झालेल्या दंगलीची ज्या पद्धतीने हाताळणी केली, त्याला आक्षेप घेत विविध लेखांमधून  सातत्याने मोदींवर टीकेचे प्रहार केले आहेत. आता मोदीद्वेषाची कावीळ उतरते आहे. अलीकडच्या अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीवर आधारित प्रकाशित झालेला लेख हे त्याचे ताजे उदाहरण.
 
 
काळ सर्वात बलवान असतो. होत्याचे नव्हते करायची ताकद त्यात असते आणि उलटही. तोच काळ एखाद्या जखमेसाठी मलमाचेही काम करतोे. म्हणूनच त्याचे हे सार्वकालिक आणि सार्वत्रिक सामर्थ्य लक्षात ठेवून कोणी फार गमजा करू नयेत, हेच खरे! (स्वयंघोषित) सर्वज्ञानी आणि सर्वोच्च असलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानेही याचे भान बाळगायला हवे. आपल्या जनजागृतीच्या माध्यमातून कोणत्याही विचारधारेच्या राज्यकर्त्याला चार खडे बोल सुनावण्याआधी, आपण पत्रकारितेच्या धर्माला जागत व्यापक जनहितासाठी त्या राज्यकर्त्याचे तटस्थपणे मूल्यमापन करत आहोत की पक्षपाती राहत आंधळेपणाने टीकेसाठी टीका करत आहोत, याचा विचार करावा.
 
 
एका संस्कृत श्लोकामधील या ओळीला सुविचाराचे मोल आहे. आत्ता हे आठवण्याचे कारणही तसेच आहे. ‘इंडिया टुडे’ या बहुप्रतिष्ठित आणि 5 भाषांमधून दर आठवड्याला लाखो वाचकांपर्यंत पोहोचणार्‍या साप्ताहिकाचा नरेंद्र मोदी या व्यक्तीबद्दल - राज्यकर्त्याबद्दल गेल्या 22 वर्षांच्या कालखंडात बदललेला दृष्टीकोन. इंग्लिशमध्ये ज्याला Paradigm Shift म्हटले जाते, असा हा या नियतकालिकाच्या दृष्टीकोनातला आमूलाग्र बदल आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ या साप्ताहिकाच्या गेल्या 22 वर्षांतल्या निवडक मुखपृष्ठांची लिंक आंतरजालावर उपलब्ध आहे. त्यासाठी साधारण 14 मुखपृष्ठ कथांची निवड केली आहे. निरपराध कारसेवकांचे बळी घेणार्‍या गोध्रा जळीतकांडानंतर मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी गुजरातेत झालेल्या दंगलीची ज्या पद्धतीने हाताळणी केली, त्याला आक्षेप घेत विविध लेखांमधून या नियतकालिकाने सातत्याने मोदींवर टीकेचे प्रहार केले आहेत. मार्च 2002च्या एका अंकावर, दंगलीत मारल्या गेलेल्या मुस्लीम व्यक्तीचे छायाचित्र मुखपृष्ठावर घेत या दंगलीसंदर्भात एकांगी, मुस्लिमानुनायी भूमिका घेण्यात आली आहे. एप्रिल 2002च्या एका अंकावर कशीे Hero of Hatred अशी उपाधी देत ‘धर्माच्या आधारे देशाचे ध्रुवीकरण/विभाजन करणारा राजकीय नेता’ असे मोदींना उद्देशून म्हटले आहे.
 
 
आणि अगदी अलीकडे, जानेवारी 2024च्या पहिल्या अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रदीर्घ मुलाखत घेऊन तीच मुखपृष्ठ कथा म्हणून प्रकाशित केली आहे. ‘नवभारताचा शिल्पकार’ असे मोदींविषयी गौरवपर उद्गार काढत मुखपृष्ठावर PM Narendra Modi : Redefining Bharat असे म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर Newsmaker of the Year  असेेही मुखपृष्ठावर नमूद केले आहे. एका प्रतिष्ठित नियतकालिकाच्या मतात झालेले हे स्थित्यंतर लक्षवेधी आहे.
 
 
‘हाथी चले अपनी चाल...’ या म्हणीप्रमाणे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदापासून आजवरचा नरेंद्र मोदींचा सत्तेच्या राजकारणातला प्रवास आहे. आपली हिंदुत्ववादी विचारधारा, संघकार्याची पार्श्वभूमी कधीही न लपवण्याची आणि त्याला कोणतेही शर्करावगुंठन न घालण्याची त्यांची वृत्ती आहे. देशहिताची कोणतीही कृती करताना, वैचारिक सुस्पष्टता असल्याने होणार्‍या परिणामांना निडरपणे सामोरे जाण्याची त्यांची तयारी असते. ‘देश प्रथम’ ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक निर्णयातून प्रतिबिंबित झालेली दिसते. पण मुस्लिमांच्या लांगूलचालनाची झापडे लावलेल्या आणि डाव्या विचारांच्या प्रभावात विचारशक्तीला तिलांजली दिलेल्या प्रसारमाध्यमांनी नरेंद्र मोदींवर अष्टौप्रहर टीका करण्याचे जणू व्रत घेतले आहे. अशी पीत पत्रकारिता करणार्‍यांना नरेंंद्र मोदींनी कधीही किंमत दिली नाही वा त्यांनी केलेल्या टीकेवर स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवला नाही. (अनुल्लेखाने मारण्याच्या त्यांच्या या गुणविशेषानेही अनेकांचा जळफळाट झाला.. आजही होतो.) त्याऐवजी, आधी राज्य आणि मग देश सांभाळण्याला, त्याला सर्वांगीण प्रगतिपथावर नेण्याला त्यांनी प्राधान्य दिले. गेल्या 10 वर्षांत त्यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत जी वाटचाल केली आहे, ती पाहून देशांतर्गत विरोधकांची वाताहत झाली आहे. एक तर त्यांची बोलती बंद झाली आहे वा ते संदर्भहीन होऊ लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची प्रतिमा आपल्या कार्यकर्तृृत्वाने उजळली आहे. त्यातूनच ‘विश्वगुरू’ अशी भारताची आणि ‘विश्वनेता’ अशी नरेंद्र मोदी यांची नवी ओळख तयार होते आहे.
 
 
जहरी आणि विशिष्ट हेतून प्रेरित असलेली टीका दिवसरात्र करूनही नरेंद्र मोदींना त्यांच्या दृढनिश्चयापासून कोणी परावृत्त करू शकले नाही, याला सर्व जण साक्षी आहेत. त्यांनी देशाला जागतिक स्तरावर मिळवून दिलेला मानमरातब पाहिल्यावर काहींची मोदीद्वेषाची कावीळ उतरते आहे. इंडिया टुडे त्यापैकी एक. त्याच्या अलीकडच्या अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीवर आधारित प्रकाशित झालेला लेख हे त्याचे ताजे उदाहरण. ज्याला देशाची विभागणी करणारा असे एकेकाळी म्हटले, त्यालाच नवभारताचा शिल्पकार म्हणत गौरवगान केले आहे. या लेखात नरेंद्र मोदींचे 10 गुणविशेष सोदाहरण पटवून दिले आहेत.
 
 
अयोध्येत भव्य राम मंदिराचे नवनिर्माण होत असताना हे व्हावे, याला नियतीचा काव्यगत न्याय म्हणावा लागेल. हा लेख म्हणजे एका प्रतिष्ठित नियतकालिकाने आपल्या दृष्टीकोनात झालेल्या बदलाची दिलेली जाहीर कबुलीच आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदनही करायला हवे. काही नियतकालिकांनी मात्र गांधारीची पट्टी अट्टाहासाने बांधलेली असल्याने त्यांना वास्तव दिसत नाही. वैचारिक गुलामगिरीच्या खुंटीला बांधून घेतलेले हे लोकशाहीचे (तथाकथित) राखणदार वास्तव समजून घेण्यासाठी आपली आकलनाची कुवत वाढवतील का? तसे झाले, तर राम मंदिराच्या उभारणीला असलेला व्यापक अर्थ, त्यातून होत असलेली भारतीय अस्मितेची जागृती त्यांना दिसेल. ते मंदिर कोणा एका व्यक्तीसाठी नाही, कोणा एका पक्षासाठीही नाही, तर देशाच्या हितासाठी आहे हे त्यांना समजेल.
 
 
काळाचे आणखी किती तडाखे बसल्यावर निव्वळ जन्माने भारतीय असलेल्या अनेकांना जाग येणार आहे?
Powered By Sangraha 9.0