रामगीतांची पालखी

विवेक मराठी    29-Jan-2024   
Total Views |
पाचशे वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भव्य मंदिराच्या लोकार्पणाची आणि रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख घोषित झाली, तेव्हापासूनच देशात 2024मध्ये दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होणार याची सगळ्यांनाच कल्पना आली होती. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हा आनंद साजरा करायचा, असं ठरवलं. यानिमित्त अनेकांनी अनेक संकल्प घेतले. तेव्हापासून माझ्या मनात सतत येत होतं की आपणही रामलल्लासाठी काहीतरी वेगळं करावं. असाच एखादा संकल्प आपण करावा व तो पूर्ण करावा, हीच रामरायाचरणी आपली सेवा असेल. ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने’ असं आम्हा पत्रकारांचं, लेखकांचं जीवन. मग याच माध्यमातून रामरायाची सेवा का करू नये, असं वाटलं आणि त्यातूनच जन्म झाला तो ‘22 दिवस 22 रामगीतं’ या लेखमालिकेचा.


rammandir
 
‘धन्य आनंददिन, पूर्ण मम कामना’ अशी आज आपल्यासारख्या प्रत्येक रामभक्ताची भावना आहे. अखेर पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रामलल्ला 22 तारखेला आपल्या श्रीरामजन्मभूमी येथील भव्य-दिव्य अशा मंदिरात विराजमान झाले आहेत. बालक रामाच्या प्राणप्रतिष्ठेचा हा अपूर्व आणि अनुपमेय सोहळा संपूर्ण जगाने पाहिला. या प्राणप्रतिष्ठेची तारीख घोषित झाली, तेव्हापासूनच देशात 2024मध्ये दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होणार याची सगळ्यांनाच कल्पना आली होती. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हा आनंद साजरा करायचा, असं ठरवलं. कोणी म्हणालं, हत्तीवरून साखर वाटणार, कोणी म्हणालं मी मंदिरात जाऊन थेट प्रसारण पाहणार, कोणी म्हणालं की रामलल्लासाठी खास गुढी उभारणार, तर कोणी म्हणालं, मी खास ठेवणीतले कपडे घालणार, दिवाळीसारखे फटाके वाजवणार. लोकांचे हे निरनिराळे संकल्प ऐकत होते, तेव्हापासून माझ्या मनात सतत येत होतं की आपणही रामलल्लासाठी काहीतरी वेगळं करावं. असाच एखादा संकल्प आपण करावा व तो पूर्ण करावा, हीच रामरायाचरणी आपली सेवा असेल. ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने’ असं आम्हा पत्रकारांचं, लेखकांचं जीवन. मग याच माध्यमातून रामरायाची सेवा का करू नये, असं वाटलं आणि त्यातूनच जन्म झाला तो ‘22 दिवस 22 रामगीतं’ या लेखमालिकेचा.
 
 
 
रामावरची गाणी म्हटली की मराठी माणसाला तत्काळ आठवतं ते ‘गीतरामायण’. गीतरामायण हा खरोखरच मराठी मातीत घडलेला एक अद्वितीय असा चमत्कार आहे. गदिमा आणि बाबूजी यांच्या प्रतिभेतून साकारलेलं ते एक लखलखीत असं शिल्प आहे. गीतरामायणापलीकडेही रामावर आधारलेली अनेक गाणी मराठीत आहेत, पण ती खरोखरच दुर्लक्षित राहिली आहेत किंवा सर्वसामान्यांपर्यंत ती फारशी पोहोचलेली नाहीत, अशा काही गाण्यांची यादीच मी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तयार करायला घेतली. ही गाणी अभंग, भक्तिगीत, चित्रपटगीत आणि नाट्यगीत अशा वेगवेगळ्या प्रकारांतली होती. ‘रामप्रहरी रामगाथा’ या गीताने या लेखमालेला प्रारंभ झाला. दुसरं गाणं होतं ते मोलकरीण चित्रपटातील ‘एक आस मज एक विसावा’. या लेखाला अत्यंत सुंदर प्रतिसाद मिळाला. ’श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली’, ‘काल मी रघुनंदन पाहिले’, ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान’, ‘दैव जाणिले कुणी’, ‘राम राम जप करी सदा’, ‘कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम’, ‘उठी श्रीरामा पहाट झाली’ ही चित्रपटगीतं लोकांना त्यातल्या त्यात माहीत आहेत. पण ‘रघुपती राघव गजरी गजरी’, ‘श्रीरामाचे दर्शन घडले, पाषाणातुनी शब्द उमटले’, ‘घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा’, ‘विजयपताका श्रीरामाची’, ‘लाजली सीता स्वयंवराला’ ही गाणी फारशी प्रचलित नाहीत. ही गाणी लेखमालेत संकलित केल्याबद्दल जुनी गाणी ऐकण्याची आवड असणार्‍यांना खूप कौतुक वाटलं व त्यांनी ते माझ्यापर्यंत पोहोचवलंदेखील.
 
 
rammandir
 
इथे मला काही प्रतिक्रियांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. अनेक तरुण किंवा किशोरवयीन वाचकांनी ही लेखमाला वाचून कळवलं की मराठीत रामावर इतकी वैविध्यपूर्ण आणि सुंदर गाणी आहेत हे आम्हाला माहीतच नव्हतं. त्यांना ती गाणी फार आवडली. यातून जाणवलं की, तरुणांना जुनं-नवं सगळंच ऐकायला आवडतंय. तरुणांना जुनी गाणी आवडत नाहीत असं आपणच लेबलिंग करतो आहोत आणि कलाकृतींपासून त्यांना वंचित ठेवत आहोत. काही वाचकांनी इनबॉक्स करून किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून काही गाणी आवर्जून ऐका असं सुचवलं. त्यातलंच एक गाणं मी ठरवून लेखमालेत समाविष्ट केलं, ते म्हणजे ‘कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला’. धाडिला राम तिने का वनी या संगीत नाटकातील हे पद आहे. भरताच्या मनातील भ्रातृवियोग प्रकट व्यक्त करणारं हे पद मी आजवर कधीही ऐकलेलं नव्हतं. (या सगळ्या गाण्यांच्या ऑडिओ/व्हिडिओ लिंक्स माझ्या फेसबुक वॉलवर ‘22-दिवस 22-गाणी #mrudulawrites हे हॅशटॅग वापरून शोधता येतील.)
 
 
मराठी संगीतसृष्टी ही अनेकानेक प्रतिभावंतांच्या योगदानामुळे किती बहरली आहे, याचं प्रत्यंतर मला ही लेखमाला लिहिताना आली. संत रामदास, केशवदास यांच्या अभंगांपासून आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर, राजा बढे, शांताराम नांदगावकर, जगदीश खेबुडकर, पी. सावळाराम, योगेश्वर अभ्यंकर, रवींद्र भट अशा विविध गीतकारांच्या गीतांचा समावेश झाला. वसंत प्रभू, यशवंत देव, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, अशोक पत्की, राम फाटक, पु.ल. देशपांडे, राहुल देशपांडे अशा विविध संगीतकारांनी या रामगीतांना स्वरसाज चढवला आहे. आशा भोसले, लता मंगेशकर, कृष्णा कल्ले, माणिक वर्मा, सुमती टिकेकर, सुमन कल्याणपूर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. भीमसेन जोशी, अरविंद पिळगावकर, अरुण दाते, सुधीर फडके अशा अनेक गायक-गायिकांनी गायलेली ही गाणी आहेत. शांतरसापासून करुणरसापर्यंत, भक्तिरसापासून शृंगाररसापर्यंत सर्वत्र राम व्यापलेला आहे, याचीच अनुभूती ही लेखमाला लिहिताना मला आली. राम भूपाळी आहे, राम भक्ती आहे, राम कोमल शृंगार आहे, राम विरह आहे, राम नियती आहे, राम अंगाई आहे, आयुष्याच्या शेवटच्या निरवानिरवीतही आहे. राम मानवी जीवनाच्या अंगप्रत्यंगांना व्यापून दशांगुळे वरच उरला आहे. या लेखमालेच्या निमित्ताने असाच राम मला दिसला. वाचकांच्या उत्कंठेतूनही, त्यांच्या प्रतिक्रियांमधून मला हे वरचेवर जाणवत राहिलं.
 
 
हा संकल्प घेताना सलग बावीस दिवस अखंडपणे, नेमाने आपण लिहू शकू का, हे पूर्णत्वास जाईल याबद्दल खरोखरच मनात शंका होती. पण प्रेरणा देणाराही तोच आणि लिहून घेणाराही तोच. या लेखमालेचं श्रेय जसं प्रभू श्रीरामांना जातं, वाचकांना-रसिकांना जातं, तसंच ते माझ्या संगीतशिक्षकांनाही जातं. फार वर्षांपूर्वी गाणं शिकत असताना गाण्याचे अनेक कार्यक्रमही करायला मिळाले. सरावादरम्यान आपलं गाणं गाऊन निघून जायचं नाही, बाकीच्यांची गाणी निवेदनासह ऐकायची ही आम्हा विद्यार्थ्यांना ताकीद होती. त्याचप्रमाणे घरात रेडिओ सतत सुरू असायचा. त्यामुळे अनेक गाणी मनावर कोरली गेली. या लेखमालेतली बरीचशी गाणी त्यातूनच स्फुरलेली, सुचलेली आहेत. ही लेखमाला माझी नाही, तर ती माझ्या हातून रामानेच लिहून घेतली असं मला वाटतं. ही रामभक्तीची पालखी आहे, मी फक्त भोई.

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.