लग्नापूर्वी भावनेच्या भरात निर्णय घेतला, म्हणून तो आयुष्यभर मन मारून निभावण्याची तयारी ह्या पिढीकडे नाही. त्याबाबत ते स्पष्ट आहेत. मात्र अशी स्पष्टता नसेल, तर लग्नाआधी ठरवलेल्या काही गोष्टी नंतर अजिबातच पटेनाशा होतात आणि नाते तुटायची वेळ येते. अशाच एका जोडप्याची ही गोष्ट.
समाजाचा चेहरामोहरा आज झपाट्याने बदलतो आहे. कुटुंबसंस्था, लग्नसंस्था, नातेसंबंध यांचे संदर्भ, जातकुळी झपाट्याने बदलत आहे. आज पती आणि पत्नी हे नातेही एका वेगळ्या टप्प्यावर उभे आहे. लग्न होण्याआधी परस्परांमध्ये त्याची जाणीव आणि मनमोकळा संवाद असला, तर ते दोघांसाठी चांगले ठरते. तसे झाले नाही, तर नाती दुभंगतात आणि दोघांना तसेच घराला त्रास होतो, आप्तमित्रांवरही त्याचा परिणाम होतो.
काही जोडप्यांच्या बाबतीत लग्नाआधी ठरवलेल्या काही गोष्टी नंतर अजिबातच पटेनाशा होतात आणि नाते तुटायची वेळ येते. अशाच एका जोडप्याची ही गोष्ट.
श्रीकांत एक मनस्वी चित्रकार आणि एका आय टी कंपनीत कामाला असलेली त्याची पत्नी - संयोगिता. श्रीकांतचा सहभाग असलेल्या एका चित्र प्रदर्शनात त्या दोघांची पहिली भेट झाली. चित्रकलेची चाहती असल्याने संयोगिता प्रदर्शन बघायला गेली आणि श्रीकांतच्या चित्रांनी तिचे भान हरपले. या चित्रकाराला भेटायलाच हवे असे वाटल्याने तिने संयोजकाजवळ तशी इच्छा व्यक्त केली. मात्र श्रीकांत त्या वेळी बाहेर असल्याने जवळपास दोन तास त्याची वाट बघण्यात घालवल्यावर नाराज होऊन ती घरी परतली. त्याच्या चित्रांनी घातलेली मोहिनी आणि श्रीकांतची न झालेली भेट यामुळे रात्रभर तिची तगमग होत राहिली. दुसर्या दिवशी पुन्हा प्रदर्शन पाहायला गेल्यावर देखणा श्रीकांत तिला पाहताक्षणीच आवडला. चित्रांविषयी बोलण्याचा बहाणा करत संयोगिताने ओळख वाढवली. भेटीगाठी वाढायला लागल्या आणि एक दिवस तिने श्रीकांतला लग्नाबाबत विचारले. श्रीकांतने तिला तत्काळ नकार दिला. हे तिला काहीसे अनपेक्षित होते.
तो म्हणाला, “मी एक कलंदर कलाकार आहे. माझी कला मला पैशात मोजता येणार नाही. त्यामुळे माझ्या चित्रांमधून, माझ्या कलेमधून मी कुटुंबासाठी आवश्यक पैसे मिळवू शकेन की नाही हे मला माहीत नाही. किंबहुना मला ते जमणार नाही.”
इतकी स्पष्ट कल्पना देऊनही संयोगिता त्याला म्हणाली, “तू मला नकार देतोयस? मी चांगली शिकलेली, उत्तम कमावणारी आहे. मी तुला आवडले नाही का?”
श्रीकांतने तिला पुन्हा एकदा स्पष्ट करू पाहिले, “मला तू खूप आवडली असलीस तरी लग्नासाठी तेवढेच पुरेसे नाही. लग्न करणे म्हणजे आयुष्यभर एकमेकांना साथ देणे. शिवाय त्यानंतर संसार करायला पैसे लागतात. मला पैसे मिळवण्यासाठी कलेशी तडजोड करणे पटत नाही. या आर्थिक अनिश्चिततेमुळे लग्न करायला माझा नकार आहे.”
त्यावर संयोगिता म्हणाली, “हरकत नाही. पैसे मी मिळवीन. तू तुझी कला जप. मी त्याच्या आड येणार नाही. माझे काहीच म्हणणे नाही. मग तर झाले?”
असे म्हटल्याने ज्यासाठी नकार द्यायचा, ते कारणच उरले नाही आणि दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस आनंदात गेले, पण हळूहळू संयोगिताला चित्रकार म्हणून श्रीकांतचे वागणे खटकू लागले. संयोगिता अतिशय महत्त्वाकांक्षी असल्याने तिला चित्रकार म्हणून श्रीकांतनेही स्वत:ला सतत लोकांसमोर आणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करावी असे वाटू लागले. त्यातून दोघांच्यात धुसफुस सुरू होऊन परस्परांबद्दलचे प्रेम कमी व्हायला सुरुवात झाली. मित्रांपर्यंत त्यांच्यामधली कुरबुर पोहोचली, तेव्हा काही समेट घडवावा या इच्छेने त्यांच्या जवळच्या एका मित्राने त्यांची भेट घेतली. त्याने संयोगिताला विचारले, “तुझे काय म्हणणे आहे?”
ती म्हणाली, “चित्रकार म्हणून तो मागे पडतोय असे मला वाटतेय. त्याने एकट्याची प्रदर्शने सातत्याने केली पाहिजेत. त्याची नीट जाहिरात केली पाहिजे. तर त्याचे नाव आणि त्याची कला लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचा बोलबाला होईल. अनेक चित्रे विकली जातील. त्याला पुरस्कार मिळतील. पण ह्यातले तो काहीच करत नाही. किंबहुना त्याला ते करायचेच नाही. पुढे होऊन स्वत:ची किंमत वाजवून घ्यावी असे त्याला वाटतच नाही. ह्यावरून आमची सतत भांडणे होताहेत. मी सांगते हे त्याला पटत नसेल तर एकत्र राहायची माझी तयारी नाही.”
तिचे एकदम शेवटाकडे येणे प्रशांतला खटकले. तो म्हणाला, “पण ही त्याची भूमिका त्याने लग्नाआधीच तुला सांगितली होती. तुम्ही विभक्त झालात तर त्याच्या कलेवर परिणाम होईल, असे तुला वाटत नाही? की तुला दुसरे कोणी आवडायला लागले आहे?”
“तसे काही घडलेले नाही.” संयोगिताने सांगितले, “आजही मला त्याच्या कलेविषयी नितांत आदर आहे. त्याची कला, त्याची सभ्यता, त्याचा सौम्य स्वभाव, त्याचे मला समजून घेणे हे सगळे मला आवडते. हे सगळे गुण आजही त्याच्यात आहेत. आमच्या अनेक आवडीनिवडीही जुळतात. पण हे सगळे विवाह टिकवण्यासाठी पुरेसे नाही. श्रीकांत मित्र म्हणून उत्तम आहे, पण नवरा म्हणून नाही. तो महत्त्वाकांक्षी, कर्तबगार असायला हवा. त्याचा आधार वाटायला हवा. अशा खूप गोष्टी असायला हव्यात. त्यामुळे त्याच्या कलेवर परिणाम होऊ शकतो हे मान्य, पण त्यासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य पणाला लावू शकत नाही.”
“तिला नवरा म्हणून जसा मी हवा आहे तसे वागणे मला जमणार नाही. माझा तो पिंडच नाही. पण त्यासाठी तिने मन मारून माझ्याबरोबर राहावे असेही मला वाटत नाही. याचा माझ्या कलेवर परिणाम काही काळ होईलही. पण शेवटी अनेक आघात सोसून कलाकाराची कला घडत असते आणि तेच आयुष्य आहे असे वाटते मला.” श्रीकांतच्या या अतिशय संयत आणि ठाम उत्तराने प्रशांतला खूप दु:ख झाले. पण शेवटी त्या दोघांचा निर्णय असे म्हणत त्याने निरोप घेतला.
वरवर पाहणार्याला एक जोडपे म्हणून त्या दोघांमध्ये कोणतीच कमतरता जाणवली नसतीही. पण त्यांच्यामधले मतभेद मूलभूत मुद्द्यांवर होते. लग्नापूर्वी भावनेच्या भरात निर्णय घेतला, म्हणून तो आयुष्यभर मन मारून निभावण्याची तयारी ह्या पिढीकडे नाही. त्याबाबत ते स्पष्ट आहेत. ठामही. किंबहुना त्या वेळी तसे वाटले होते, पण आज वाटत नाही असे म्हणून त्या नात्यातून बाहेर पडण्याची मानसिकताही या पिढीमध्ये आहे. हे कथानक सुप्रसिद्ध नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या एका नाटकाचे आहे. वीस वर्षांपूर्वी आलेल्या या नाटकात चितारलेले प्रसंग आज वास्तवात घडताना दिसताहेत.
काळानुसार होत असलेला हा बदल आपल्या सगळ्यांना स्वीकारावा लागेल. तुम्हाला काय वाटते?