जने जने रामायणम्

विवेक मराठी    10-Jan-2024
Total Views |
Ayodhya Ram Mandir 2024, Various Ramayanas of India
   
@वसुमती करंदीकर
भारतामध्ये वाल्मिकीकृत रामायण हे श्रीरामांचे अधिकृत चरित्र मानले जाते. त्याशिवाय भारतात आणि भारताबाहेरील 14 देशांमध्ये मिळून 300च्या दरम्यान रामायणे उपलब्ध आहेत. प्रादेशिकता, लोककथा, संस्कृती यांचा या रामायणांवर अधिक प्रभाव आहे. असा रामायणाच्या साहित्याचा विस्तृत पट आहे. यातून प्रभू श्रीरामांचे श्रेष्ठत्व निर्विवादपणे सिद्ध होते. श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर विविध रामायणांविषयी या लेखात जाणून घेऊ या.

Ayodhya Ram Mandir 2024

दि. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिराचे बहुप्रतीक्षित लोकार्पण होणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामांचे चरित्र, रामायणातील दाखले, त्यांचे सोयीनुसार लावलेले अन्वयार्थ यावर चर्चा सुरू आहे. श्रीरामांचे विश्वसनीय चरित्र कोणत्या ग्रंथात सांगितलेले आहे, असे विचारले तर ’वाल्मिकी रामायण’ असे उत्तर सहज मिळते. परंतु प्रभू रामचंद्रांचे चरित्र केवळ वाल्मिकी रामायणात उपलब्ध आहे असे नाही. भारतात आणि भारताबाहेरील 14 देशांमध्ये मिळून 300च्या दरम्यान रामायणे उपलब्ध आहेत. काही रामायणांचे नायक श्रीराम आहेत, तर काहींचे रावण, लक्ष्मण, तर काही रामायणे ही सीतामाईभोवती फिरतात. प्रादेशिकता, लोककथा, संस्कृती यांचा या रामायणांवर अधिक प्रभाव आहे. राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर विविध रामायणांविषयी जाणून घेऊ या.
 
 
भारतामध्ये वाल्मिकीकृत रामायण हे श्रीरामांचे अधिकृत चरित्र मानले जाते. संस्कृत आर्ष काव्यांमध्ये वाल्मिकीकृत रामायणाचा समावेश होतो. भारतीय आणि विशेषत: संस्कृत काव्यरचनेचा पहिला आदर्श नमुना म्हणून रामायणाला मान्यता मिळाली. त्यामुळे वाल्मिकी हे आदिकवी आणि रामायण हे आद्यकाव्य ठरले.
 
 
भारतातील विविध रामायणे
 
वाल्मिकींनी रामायण लिहिलेच, तसेच त्यांनी अद्भुत रामायणही लिहिले. अद्भुत रामायणामध्ये त्यांनी सीतेच्या चरित्रकथनाला प्राधान्य दिले. भारतामध्ये उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये आढळणारी रामायणे भिन्न आहेत. 18व्या शतकात श्रीधरपंतांनी मराठीमध्ये रामायण रचले, तसेच संत एकनाथांनी ’भावार्थ रामायण’ हा काव्यग्रंथ मराठी भाषेत लिहिला. 14-15व्या शतकाच्या सुमारास कुमार वाल्मिकी यांनी कन्नड भाषेत ’तोरवे रामायण’ नावाने वाल्मिकी रामायणाचे रूपांतर केले.
 
 
कन्नडमध्येच कुवेंपू या कवीने ’श्री रामायण दर्शनम’ व रंगनाथ शर्मा यांनी ’कन्नड वाल्मिकी रामायण’ नावाची रामायणे लिहिली.
12व्या शतकातील तामिळ कवी कंब यांनी ’रामावतारम’ अथवा ’कंबरामायण’ ग्रंथ रचला. तुलसीदासांनी 1576मध्ये हिंदीमध्ये ’श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ लिहिला. वाल्मिकी रामायणाची विविध भाषांतरे भारतीय भाषांमध्ये झाली आहेत. यामध्ये गुजराती कवी प्रेमानंद यांनी 17व्या शतकात, बंगाली कवी कृत्तिवास यांनी 14व्या शतकात, उडिया कवी बलरामदास यांनी 16व्या शतकात रामायणाची भाषांतरे लिहिली. केरळमध्ये ’मापिळ्ळे रामायण’ हे लोकागीतांमध्ये गुंफण्यात आलेले आहे. यातील काही रामायणांमध्ये रावण अहिरावण-महिरावण रूपात येतो. रामायणाची इस्लाम धर्मातील प्रतसुद्धा उपलब्ध आहे. या प्रतीमध्ये नायक एक मुस्लीम सुलतान आहे, तर रामाचे नाव यात ’लामन’ असे बदलण्यात आलेले आहे. बाकीची पात्रे रामायणाप्रमाणेच आहेत.
 


Ayodhya Ram Mandir 2024 
 
Ayodhya Ram Mandir 2024
आग्नेय आशियातील रामायणे
 
भारतासह आग्नेय आशियावर रामायणाचा मोठा प्रभाव आहे. काही देशांच्या सांस्कृतिक काव्यांची बीजे रामायणात आढळतात. चीनचे महाकाव्य ’पश्चिमदत्त पयण’ याचे काही भाग रामायणावर आधारित आहेत. या महाकाव्याचे ’सुन् वुकांग’ पात्र हनुमानाच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. इंडोनेशियातील जावा प्रदेशात सुमारे नवव्या शतकात पहिले रूपांतरित रामायण आढळते. हे रामायण ’काकाविन् रामायण’ या नावाने ओळखले जाते. यामध्ये वाल्मिकी रामायणाच्या तुलनेत अनेक भेद आहे. रामाचे लोकनायक स्वरूप या रामायणांमध्ये दिसते. लाओस देशाचे काव्य ’फ्रा लक फ्रा लाम’ हेसुद्धा रामायणाचे प्रसिद्ध रूपांतरण आहे. या नावातील ’लक’ आणि ’लाम’ ही नावे अनुक्रमे लक्ष्मण आणि राम यांच्या नावांची लाओ रूपांतरे आहेत. यामध्ये रामाचे चरित्र हे बुद्धाचा पूर्वावतार म्हणून चित्रित करण्यात आलेले आहे. मलेशियाच्या ’हिकायत सेरि राम’ या रामायणामध्ये अल्लाहचा उल्लेख करण्यात आलेला आहे. थायलंडचे प्रचलित काव्य ’रामकियेन’ हे रामायणावर आधारित आहे. या रामायणाचे वैशिष्ट्य म्हणजे सीता ही रावण आणि मंदोदरी यांची कन्या असल्याचे दर्शविले आहे. त्यात रावणाचा भाऊ बिभीषण ज्योतिषी असून तो सीतेची कुंडली बघून भविष्यातील अपशकुन सांगतो, ते ऐकून रावण तिला पाण्यात फेकून देतो आणि पुढे ती जनकास प्राप्त होते. त्यापुढील रामायणाची कथा वाल्मिकी रामायणाप्रमाणेच आहे. थाय रामायणात मारुती हे महत्त्वाचे पात्र आहे. या काव्याची कथा बँकॉकजवळ असणार्‍या ’वात फ्रा कयेव’ या धार्मिक क्षेत्री घडल्याचे सांगितले आहे.
 
रूपांतरांमध्ये बालीचे ’रामकवच’, फिलिपीन्सचे ’मरडीय लावण’, कंबोडियाचे ’रीम्कर’ आणि म्यानमारचे ’याम जात्दव’ ही अन्य आग्नेय आशियाई प्रमुख रामायणे आहेत.
 
 

Various Ramayanas of India
जैन रामायण
 
जैन परंपरेतील रामायण म्हणजेच पंप रामायण होय. रामचंद्र चरित पुराण अर्थात पंप रामायण हे कन्नड भाषेत असून नागचंद्र याचा कर्ता आहेत. जैन परंपरेनुसार लिहिल्या गेलेल्या या रामायणाला पंप रामायण, अभिनव पंप असेही म्हणतात. या रामायणातील पात्रे जैन परंपरा पाळणारी आहेत. यातील रामाची व्यक्तिरेखा अहिंसेचे प्रतीक म्हणून येते. त्यामुळे रावणाचा वध लक्ष्मणाकडून झाला, असे जैन रामायण सांगते. संस्कृत साहित्यातील चम्पू काव्य या प्रकारामध्ये हे काव्य येते. चम्पू काव्यामध्ये गद्य आणि पद्य दोन्हींचाही समावेश असतो. जैन रामायण हे समाजात फार प्रचलित झाले नाही.
 
 
अध्यात्म रामायण
 
परमेश्वराच्या ठिकाणी भक्तिभाव कसा ठेवावा, याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ म्हणून अध्यात्म रामायण वैशिष्ट्यपूर्ण ठरते. यामध्ये रामायणाच्या कथानकातच प्रसंगानुरूप रामाच्या तत्त्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन केलेले दिसून येते. अध्यात्म रामायण हे ब्रह्मांड रामायणाचा एक भाग आहे. यालाच ’अध्यात्मरामचरित’ किंवा ’आध्यात्मिक रामसंहिता’ असेही म्हणतात. या ग्रंथाची 7 कांडे आणि 15 सर्ग आहेत. यामध्ये ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय दिसून येतो. श्रीराम हे या जगाचे अधिकरण आहे हे सांगितले आहे. अध्यात्म रामायण आणि वाल्मिकी रामायण यांमध्ये काही प्रमाणात भेद आढळतात. वाल्मिकी रामायणाचे गायन रामपुत्र लव आणि कुश करतात, तर अध्यात्म रामायण शंकरांनी पार्वतीला सांगितले आहे.
 
 
Various Ramayanas of IndiaVarious Ramayanas of India
रामायणाच्या आवृत्त्या
 
भारत आणि भारताबाहेर सुमारे 300 रामायणे उपलब्ध आहेत. सर्वात जुनी असणारी आवृत्ती वाल्मिकी रामायणाची असून तिला ’नारदीय आवृत्ती’ असेही म्हटले जाते. एका आख्यायिकेनुसार वाल्मिकींना रामायण लिहिण्याचे ज्ञान नारदमुनींनी दिले होते, म्हणून या आवृत्तीला ’नारदीय आवृत्ती’ असे म्हणतात. संस्कृतमधील महत्त्वाच्या आवृत्त्यांमध्ये ’वसिष्ठ रामायण’ प्रसिद्ध आहे. वसिष्ठ मुनी आणि प्रभू राम यांच्यातील अद्वैत वेदान्ताच्या सिद्धान्तांमधील संवाद म्हणजे ’वसिष्ठ रामायण’ होय. ’आनंद रामायण’ हे 15व्या शतकात हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध झालेले महत्त्वाचे रामायण आहे. तसेच ’एककंठबंध रामायण’ हे एकश्लोकी रामायण संस्कृत भाषेत प्रचलित आहे. अगस्ती मुनींनी लिहिलेले रामायण हे ’अगस्त्य रामायण’ म्हणून ओळखले जाते. प्रादेशिक स्तरांवरही रामायणाच्या विविध आवृत्त्या आढळतात. 12व्या शतकातील तामिळ भाषेतील ’रामावतारम’, कन्नड भाषेतील ’रामचंद्र चरितपुराण’, 13व्या शतकातील तेलुगू भाषेतील ’श्रीरंगनाथ रामायण’, तुलसीदासाचे ’रामचरितमानस’ या रामायणाच्या आवृत्त्या प्रसिद्ध आहेत. बौद्ध रामायण हे ’दशरथ जातक’ नावाने ओळखले जाते. यामध्ये राम आणि सीता ही भावंडे असून त्यांनी लग्न केल्याचे सांगितले आहे. बौद्ध साहित्यात भावंडांचे विवाह ही सामान्य बाब आहे. भारताबाहेरही रामायणाच्या काही आवृत्त्या दिसतात. यामध्ये नेपाळमधील ’सिद्धी रामायण’, श्रीलंकेमधील ’जानकीहरण’, जपानमधील ’रामेंना’, खोतान प्रदेशातील काही तिबेटी आवृत्त्यांमध्ये रामायणाच्या कथा आढळतात. रामायण हे लोकगीतांचा, लोकनृत्यांचा आणि लोकनाट्याचा भाग झाल्याचेही दिसून येते. केरळच्या ’रामनट्टम’, ’कथकली’, केरळ आणि लक्षद्वीपच्या मुस्लिमांच्या ’मपिला’ गाण्यांमध्ये, तसेच भारतीय गानपरंपरेतील यक्षगानामध्ये रामायण कथांचा समावेश दिसून येतो. उत्तर भारतातील ’रामलीला’ हा रामकथेचा नृत्य -नाट्यात्मक आविष्कार आहे. कोकणातील दशवतारामध्ये, अनेक संस्कृत नाटकांमध्ये रामायण कथा दिसून येतात. रामायणाचे पहिले गीतरूपांतर कन्नड भाषेमध्ये झाले. डॉ. के.व्ही. पुत्तपा यांनी ’श्रीरामायण दर्शनम’ या काव्याची रचना केली. तसेच विश्वनाथ सत्यनारायण यांनी ’रामायण कल्पवृक्ष’ हे तेलुगू गीत रामायण रचले. मराठीमध्ये ग.दि. माडगूळकर यांनी गीतरामायणाची रचना केली. भारतात रामायण कथा आर.के. लक्ष्मण यांनी चित्रस्वरूपात आणली. रामायणातील प्रसंग पूर्व-मध्य-आग्नेय आशियाई देशांच्या चित्रकलेचा विषयही ठरलेले दिसून येतात.
 

Various Ramayanas of India Various Ramayanas of India
प्रभू श्रीरामांचे देवत्व मान्य करणार्‍या रामायणांपासून ते रावणाचे श्रेष्ठत्व सांगणार्‍या काही दाक्षिणात्य रामायणांपर्यंत, रामायणातील 24 हजार श्लोकांपासून ते एकश्लोकी रामायणांपर्यंत, भारतासह 14 देशांपर्यंत विस्तार असणारी रामायणे, लोकसाहित्याचा भाग होणारी रामायणे, विविध परंपरांमधील रामायणे असा रामायण साहित्याचा विस्तृत पट आहे. यातून प्रभू श्रीरामांचे श्रेष्ठत्व निर्विवादपणे सिद्ध होते.