I.N.D.I.A. नावाचे भारतद्वेष्टे कडबोळे

08 Sep 2023 19:18:29
मंगलमय व आश्वासक पाश्वर्र्भूमीवर विरोधकांची हिंदुत्वविरोधी विधाने त्यांच्यात ठासून भरलेला भारतद्वेष अधोरेखित करणारी आणि त्यांचे कुटिल हेतू उघड करणारी आहेत. मात्र I.N.D.I.A. नामक भारतद्वेष्ट्या कडबोळ्याला भुलण्याएवढी भारतीय जनता आता दुधखुळी राहिलेली नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
vivek
 
  
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील एक मंत्री असलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी एका परिषदेत जाहीरपणे सनातन हिंदू धर्माची निर्भर्त्सना केली. डेंग्यू, मलेरिया, कोरोना या साथीच्या रोगांशी सनातन धर्माची तुलना करत या रोगांप्रमाणेच सनातन धर्माचाही नायनाट करायला हवा, असे त्यांनी जाहीरपणे म्हटले. एवढेच नव्हे, तर आपण जे बोललो त्याच्याशी आपण ठाम आहोत असेही उद्दामपणे रसांगितले. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खर्गे यांनी समर्थन केले. ही घटना घडली, तेव्हा नुकतीच I.N.D.I.A. या आघाडीच्या मुंबई येथील बैठकीचे सूप वाजले होते. हा योगायोग विचारात पाडणारा आहे.
 
 
उदयनिधी यांच्या बेताल वक्तव्याचा जेव्हा सर्व स्तरांवर खरपूस समाचार घेतला गेला, विशेषत: जेव्हा भाजपाचे तामिळनाडू राज्याचे प्रमुख अण्णामलई यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली, तेव्हा त्यांनी “माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला” अशी गुळमुळीत सारवासारव केली. मुळात हे वक्तव्य अनवधानाने केलेले नव्हते वा संदर्भहीनही नव्हते. ते ज्या परिषदेत बोलले, त्या परिषदेचे शीर्षकच होते, Eradication of Sanatan Dharma. तेव्हा उदयनिधी यांची नंतरची सारवासारव म्हणजे निव्वळ धूळफेक होती. या परिषदेत बोलताना त्यांच्याकडे भाषणाचा लिखित मसुदा होता. जे कागदावर लिहून आणले ते वाचले, याचाच अर्थ ते विधान विचारपूर्वक केलेले होते. उदयनिधी यांच्या वक्तव्यावर इतकी टीका झाल्यानंतरही द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी अकलेचे तारे तोडले. ते म्हणाले, “उदयनिधी यांचे वक्तव्य सौम्य असल्याचे माझे मत आहे. मलेरिया आणि डेंग्यूचा द्वेषाशी संबंध नाही किंवा त्यांना सामाजिक कलंकही मानले जात नाही. त्यामुळे सनातन धर्म हा एचआयव्ही आणि कुष्ठरोगासारखा सामाजिक कलंक असलेला रोग म्हणून पाहिला पाहिजे.” संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्याबद्दल (तसा कोणताही सांविधानिक अधिकार नसतानाही) राणा भीमदेवी थाटात पत्र लिहून पंतप्रधानांना जाब विचारणार्‍या आणि त्याचा गवगवा करणार्‍या सोनिया गांधींनी उदयनिधी आणि ए. राजा यांच्या खोडसाळ वक्तव्यांवर मौन बाळगले होते. अगदी नाइलाज झाला, तेव्हा उदयनिधी आणि ए. राजा यांच्या टिप्पण्यांशी काँग्रेस सहमत नसल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.
 
 
I.N.D.I.A.चा घटक पक्ष असलेला डीएमके, या पक्षाचा एक मंत्री या देशाचा मूलाधार असलेल्या सनातन धर्माचे समूळ उच्चाटन करण्याची भाषा करतोे आणि त्यावर या आघाडीच्या घटक पक्षातले बहुतांश ज्येष्ठ नेते मूग गिळून बसतात, याचा अर्थ ते त्या विधानाची अप्रत्यक्षपणे तळीच उचलत असतात. कारण उदयनिधी स्टॅलिन जे बोलले, तशा अर्थाची विधाने I.N.D.I.A. आघाडीतल्या अन्य घटक पक्षातील नेत्यांनीही याआधी केलेली आहेत.
 
 
काही वर्षांपूर्वी तामिळनाडूच्या पेरंबूरमध्ये मुस्लीम समुदायाची लोकसंख्या 70 टक्के झाली, म्हणून तेथील मंदिरात पूजाअर्चा होऊ शकत नाही असा फतवा डीएमके पक्षाने काढला होता. तो मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. बिहारच्या शिक्षण मंत्र्यांनी हिंदू धर्मग्रंथाविषयी अनुदार उद्गार काढले, तोही I.N.D.I.A.चा घटक पक्षच. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशातल्या स्वामीप्रसाद मौर्य ‘हिंदू धर्म धोखा है’ असे म्हटले. आणि त्याही आधी कर्नाटकाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, जे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत ते, ‘हिंदू शब्द बडा गंदा है‘ म्हणाले. आपचे महासचिव गोपाल इटालिया यांनी ‘मंदिरात जाता कामा नये, देवीदेवतांची पूजा करू नये’ असे वक्तव्य केले. उदयनिधी यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकातील काँग्रेसचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी तर हिंदू धर्माच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जगाच्या इतिहासात अनेक धर्म असून हिंदू धर्माची स्थापना केव्हा आणि कुठे झाली, हिंदू धर्माचा जनक कोण हे प्रश्न आजही वादग्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेव्हा काँग्रेसने उदयनिधींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे जरी म्हटले असले, तरी त्यांचेच नेते उदयनिधींची री ओढत आहेत. ही झाली वानगीदाखल काही उदाहरणे. या सगळ्या घटनांमध्ये पराकोटीचा हिंदुद्वेष-सनातन धर्मद्वेष हे समान सूत्र दिसते.
 
 
जी 20च्या निमंत्रण पत्रिकेत भारत हा शब्द योजल्याबद्दल I.N.D.I.A.आघाडीतील घटक पक्षांनी जो हल्लाबोल केला, त्यामागे त्यांची हीच देशविरोधी, धर्मविरोधी मानसिकता आहे. ज्यांना या देशाचा मूलाधार असलेला सनातन धर्म हद्दपार करायचा आहे, त्यांना प्राचीनतेशी नाळ जोडलेले भारत हे संबोधन कसे चालावे?
 
 
देशाविषयीच्या या अनुदार उद्गारांमुळे या मंडळींचे खायचे दात वेगळे असल्याचे भारतीयांना कळून चुकले आहे. सत्तेला हपापलेल्या या मंडळींच्या मनात केवळ मोदीविरोध वा भाजपाविरोधच नाही, तर देशाविषयी, त्याच्या सनातन परंपरांविषयीचा द्वेष ठासून भरला आहे. ही आघाडी म्हणजे अनेक अभद्र हेतूंची अमंगळ युती असल्याची खात्री असलेल्या पंतप्रधानांनी म्हणूनच तर ‘सनातन धर्माच्या अपमानास योग्य प्रत्युत्तर द्या’ असे आपल्या मंत्र्यांना निर्देश दिले आहेत. विश्व हिंदू परिषदेनेही स्टॅलिनविरोधात आणि या I.N.D.I.A. आघाडीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
 
 
‘वसुधैव कुटुंबकम’ या मध्यवर्ती सूत्राभोवती देशात होत असलेली जी 20 शिखर परिषद, त्यानिमित्त जगभरातून भारतात दाखल झालेले जागतिक स्तराचे नेते ही घटना भारतीयांसाठी अतिशय गौरवाची. भारताविषयीच्या जगाच्या वाढलेल्या अपेक्षा आणि त्याची पूर्ती करण्यासाठी सक्षम झालेला भारत हे आजच्या भारताचे चित्र आहे. भारतीय धर्म-परंपरा-संस्कृतीविषयी जगभरात वाढलेली आस्था व कुतूहल लक्षात घेऊन परिषदेची विचारपूर्वक आखणी करण्यात आली आहे. या मंगलमय व आश्वासक पाश्वर्र्भूमीवर विरोधकांची हिंदुत्वविरोधी विधाने त्यांच्यात ठासून भरलेला भारतद्वेष अधोरेखित करणारी आणि त्यांचे कुटिल हेतू उघड करणारी आहेत. मात्र I.N.D.I.A. नामक भारतद्वेष्ट्या कडबोळ्याला भुलण्याएवढी भारतीय जनता आता दुधखुळी राहिलेली नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
Powered By Sangraha 9.0