@निशिकांत देशपांडे । 9850342404
स्व. मदनदासजी म्हणजे संघजीवनाचे मूर्तिमंत प्रतीक. ते संघजीवन अखेरच्या श्वासापर्यंत जगले. मदनदासजी म्हणजे अक्षरश: चालतीबोलती प्रेरणा होते. त्यांच्या व्यवहारातून आदर्श स्वयंसेवकाचे जीवन उभे राहत असे. असंख्य कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडले. त्यांनी घडवलेले अनेक कार्यकर्ते सरकारात मंत्री म्हणून काम करीत आहेत. अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी उच्चस्थानी कार्यरत आहेत. पण मदनजी मात्र केवळ तपस्वी संघसाधक म्हणून जगले अखेरपर्यंत.
संघकिरण घर घर देने को अगणित नंदादीप जले
मौन तपस्वी साधक बनकर हिमगिरीसा चुपचाप गले।
हे गीत संघशाखेत नेहमी गायले जाते. या गीतातील शब्दांना आपल्या कृतीने ज्यांनी जिवंत केले, असे असंख्य स्वयंसेवक संघसरितेत आहेत. स्व. मदनदासजी देवी हे त्यापैकीच एक. वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला आणि देशभरातील लाखो कार्यकर्त्यांवर मातृवत प्रेम करणार्या माउलीची अखेर झाली.
सुवर्णपदकप्राप्त सनदी लेखापाल असलेला आणि संपन्न घरातील एक तरुण आपले जीवन राष्ट्रकार्याच्या यज्ञात अर्पण करतो, स्वत:ला संघटनानुकूल घडवतो आणि संपूर्ण संघटनेसाठी मौन तपस्वी साधक बनून हिमगिरीप्रमाणे झिजत राहतो, ते प्रेरणादायक जीवन म्हणजे स्व. मदनदासजी देवी.
स्व. मदनजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संघटनात्मक रचनेचे शिल्पकार होते. जवळपास 21 वर्षे अभाविपचे अ.भा. संघटन मंत्री म्हणून त्यांनी देशभर प्रवास केला. यानंतर त्यांच्याकडे सन 1991पासून संघाचे मा. सहसरकार्यवाह दायित्व आले. गेल्या काही वर्षांत प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांचा प्रवास कमी झाला. सतत वैद्यकीय उपचार घ्यावे लागत होते. अशा वेळी त्यांना साहाय्य करण्यासाठी अकोलानिवासी व अंजनगाव सुर्जी येथे संघाचा विस्तारक असलेले अमोल चंद्रकांत विठाळे यांची योजना झाली. मदनजींच्या जीवनातील अखेरची सहा वर्षे अमोलजींनी त्यांचे साहाय्यक म्हणून काम केले. स्व. मदनजींना अगदी जवळून अनुभवण्याचे भाग्यच अमोलजी विठाळे यांना लाभले.
या संदर्भात अमोलजी विठाळे यांच्याशी संवाद साधला. स्व. मदनदासजींच्या जीवनातील अनुभव सांगताना अमोलजींचे डोळे पाणावले होते. साक्षात ऋषितुल्य जीवनाच्या सान्निध्यात असल्याची अनुभूती त्यांंना झाली.
संघजीवनाचे मूर्तिमंत प्रतीक
स्व. मदनदासजी म्हणजे संघजीवनाचे मूर्तिमंत प्रतीक. ते संघजीवन अखेरच्या श्वासापर्यंत जगले. प्रवास करणे, लोकांना भेटणे, नवीन ठिकाणी जाणे त्यांना खूप आवडत असे. आजारी असतानादेखील त्यांनी या गोष्टींचा कधीही कंटाळा केला नाही. ‘अपेक्षित तिथे उपस्थित’ या तत्त्वाने त्यांंनी आपल्या जीवनाची रचना केली होती. कार्यकर्त्यांना भेटणे, त्याच्या परिवाराची चिंता करणे हा तर त्यांचा स्वभावच होता. त्यांनी देशभर प्रवास केलेला असल्यामुळे ते जिथे जात तेथील कार्यकर्ते त्यांना भेटायला येत, अनेक जण आपल्या परिवारातील समस्या किंवा इतर अडचणी त्यांना मोकळेपणे सांगत. मदनदासजी अगदी एखाद्या माउलीप्रमाणे प्रत्येकाला मार्गदर्शन करीत. आपल्या अनुभवाने त्यांना दिशा दाखवीत असत. परंतु ते राजकीय विषयापासून मात्र कटाक्षाने दूर राहत.
अनेक वेळा वेगवेगळ्या गावांतील कार्यकर्ते त्यांना कार्यक्रमासाठी बोलावीत. पण ते त्यांना मा. भैय्याजी व मा. दत्तात्रयजी यांची अनुमती घेण्यास सांगत. ‘संघ जो तय करता है वो ही होता है’ असे ते नेहमी म्हणत. त्यांची स्मारणशक्ती खूप दांडगी होती. गावोगावच्या स्वयंसेवकांची, कार्यकर्त्यांची नावे, त्यांचे वाढदिवस त्यांंच्या लक्षात असत व त्या दिवशी ते आवर्जून त्यांना शुभेच्छा देत.
रोज प्रार्थना झालीच पाहिजे हा त्यांचा नेम होता. ते जिथे जात, तिथल्या व्यवस्थेत प्रार्थना करीत. नसेलच कोणी, तर अमोलबरोबर प्रार्थना करीत असत. अगदी अखेरपर्यंत स्वत:चे काम स्वत: करीत. त्यांची रोजची दैनंदिनी अगदी काटेकोर होती. रोज सकाळी योगासने, चहा घेताना बातम्या बघणे, दिवसभरात पुस्तकांचे व वर्तमानपत्राचे वाचन किंवा श्रवण सतत केले. पुस्तक वाचणे हा त्यांचा आवडीचा छंद. आजारपणाच्या काळात ते पुस्तके आणि रोजची वर्तमानपत्रे अमोल विठाळे यांस वाचायला लावत.
मदनदासजी उत्तम गीतगायक होते. संघगीते म्हणताना ते अगदी तल्लीन होत असत. गीत गाताना खूप भावुक झाल्याचे अनेकदा अनुभवले आहे.
चित्रकूट येथे दीनदयाल शोध संस्थानच्या आरोग्य धाममध्ये ते नेहमी जात. पंचकर्म व इतर उपचार करण्याकरिता तिथे जावे लागत असे. तिथे गेले की स्वयंसेवकांसोबत, कार्यकर्त्यांसोबत अगदी व्हीलचेअरवर बसून ते परिक्रमा करीत. वास्तविक परिक्रमा करताना त्यांना त्रास होत असे. पण त्यांच्या चेहर्यावर यत्किंचितही दिसत नसे. आपले आजारपण बाजूला ठेवून त्यांच्यासोबत किमान पन्नास-साठ जण जमलेले असत. सगळ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ते अवश्य परिक्रमा करीत. माणसे जोडण्याची विलक्षण हातोटी त्यांच्यात होती. दीनदयाल शोध संस्थानचे ते पालक होते. त्याच्या बैठकांना दिल्लीला ते आवर्र्जूृन उपस्थित राहत. बैठकीचा समारोप करीत असत. त्यांचे समारोपीय उद्बोधन म्हणजे कार्यकर्त्यांसाठी पाथेय असे.
09 जुलै हा त्यांचा वाढदिवस. योगायोगाने तो अभाविपचा स्थापना दिवस आहे. एकदा प.पू. सरसंघचालकांनी गमतीने त्यांना म्हटले, “तुमच्या वाढदिवसाची खरी तारीख वेगळी असावी. अभाविपचा स्थापना दिन म्हणून हाच आपला वाढदिवस आम्हाला सांगितला असावा.” यावरून संघटनेप्रती त्यांच्यात समर्पणाची जाणीव होते. मागील वर्षी दिल्लीतील कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. पण त्यांनी नकार दिला. कार्यकर्त्यांनी फार आग्रह केल्यावर प्रथम मा. भैय्याजींची अनुमती घ्यावी असे सांगितले. कार्यकर्त्यांनी मा. भैय्याजींशी चर्चा केली आणि मग त्यांनी मदनजींना गो-पूजन कार्यक्रम करायचा आहे असे सांगून तयार केले.
अगदी या वर्षीपर्यंत प्रतिवर्षी अभाविपच्या विद्यानिधी योजनेत व चित्रकूट येथील गौ-शाळेला आपले समर्पण पाठवीत असत.
कौटुंबिक मदनदासजी
आपले शिक्षण पूर्ण होताच प्रचारक निघालेल्या मदनदासजींसाठी देशभरातील कार्यकर्त्यांचे परिवार हाच परिवार होता. स्वयंसेवकांच्या, कार्यकर्त्यांच्या परिवाराची माहिती ठेवत. त्यांच्या सुख:दु:खात ते सहभागी होत.
साधारणपणे आपल्या गावी - म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथे ते वर्षातून एकदा जात असत. घरी आणि गावात सगळ्यांच्या आवर्जून भेटी घेत. संघटनेत अधिकारी आहोत हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. घरी गेले की ज्येष्ठ बंधूसमोर लहान म्हणूनच ते व्यवहार करीत. गावात भेटी घेताना ते गावातले एक म्हणून सर्वांमध्ये समरस होत.
एकदा तर त्यांच्या भाच्याचा विवाह समारंभ ठरला होता. पण त्या वेळेस दवाखान्यात भरती असल्यामुळे त्यांना जाता आले नाही. विवाहानंतर भाचा व भाचेसून त्यांचे आशीर्वाद घ्यायला दवाखान्यात आले. तिथेही त्यांनी नव्या सुनेस भेटवस्तू दिली व दोघांनाही आशीर्वाद दिले. पुतणे-भाचे यांच्याशी आणि कुटुंबातील सर्वांशी ते संपर्क ठेवून होते.
प्रेरक मदनदासजी
मदनदासजी म्हणजे अक्षरश: चालतीबोलती प्रेरणा होते. त्यांच्या व्यवहारातून आदर्श स्वयंसेवकाचे जीवन उभे राहत असे. कार्यकर्त्यांनी कोणता विषय कोणाशी बोलावा, विषय कसा समजून घ्यावा, आपली समज कशी वाढवावी याचे प्रचंड प्रशिक्षण त्यांच्या वागणुकीतून मिळायचे.
एकदा ते केरळी पंचकर्मासाठी केरळला गेले. सोबत अमोलजी होते. अमोलजी केरळला पहिल्यांदाच आले होते, हे लक्षात घेऊन त्यांना तेथील अधिकार्यांना आवर्जून सांगितले, “अरे भाई, अमोलजी पहली बार केरल आये है.. जरा उन्हे केरल का दर्शन कराओ.” तिथे मा. रंगा हरीजी होते. त्यांनी अमोलजींना मा. रंगा हरीजींना भेटून त्यांचे अनुभव व मार्गदर्शन घेण्याससुद्धा सांगितले. प्रचारकाने सर्वांच्या अनुभवातून आपले जीवन घडवले पाहिजे, याची त्यांनी अमोलजींना शिकवण दिली होती. अटलजींशी त्यांचे ऋणानुबंध होते. ते गेले तो प्रसंग तर मदनजींसाठी हृदयद्रावक होता. प्रकृती ठीक नसतानाही त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी व्हीलचेअरवर ते उपस्थित राहिले व साश्रू नयनांनीच परतले होते.
दि. 5 ऑगस्टला अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले. सरकारकडून त्यांना निमंत्रणसुद्धा आले होते. पण प्रकृती साथ देत नव्हती. तिथे जाण्यासाठी सतत धडपड सुरू होती. पण मा. भैय्याजी व मा. दत्ताजी यांनी निवासस्थानीच विश्रांती करण्यास सांगितले. शेवटी काहीशा जड मनाने ते कार्यक्रमाला गेले नाहीत, पण टी.व्ही.वर पूर्ण कार्यक्रम बघितला. चश्म्याच्या आतून ओघळणारे अश्रू ते त्या दिवशी लपवू शकले नाही. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन याची देही याची डोळा बघतानाचा अत्यानंद आणि सार्थकता त्यांच्या मौनातून स्पष्टपणे जाणवत होती.
काश्मीरचे कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव संसदेने पारित केला, त्या वेळेस अगदी असेच चित्र झाले होते. काश्मीर बचाओसाठी अभाविपने केलेला संघर्ष आणि त्यात मदनजींचे योगदान अविस्मरणीय असेच आहे. त्यामुळे हा दिवस त्यांच्यासाठी सुखद धक्का देणारा होता. अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन काय किंवा काश्मीरचे 370 कलम निरस्त करणे काय.. या घटनांमुळे जणू ते आजारपण विसरले आणि स्वप्नपूर्तीच्या आनंदात गढून गेले. सरकार्यवाह म्हणून प्रतिनिधी सभेत मा. दत्तात्रयजींचे निर्वाचन झाले, तो प्रसंग भावपूर्ण होता. मा. दत्ताजींच्या नावाची घोषणा झाली. ते आपल्या स्थानावरून मंचाकडे निघाले. जाताना मध्ये खुर्चीवर बसलेल्या मदनजींना त्यांनी वाकून नमस्कार केला आणि दोघांचेही डोळे पाणावले. अभाविपच्या जडणघडणीमध्ये या दोघांचे परिश्रम अवर्णनीय आहेत. स्व. यशवंतराव केळकरांच्या सान्निध्यात घडलेले हे दोन्ही प्रचारक भावविभोर झाले होते. प्रतिनिधी सभेने हा प्रसंग डोळ्यात साठवला आहे.
‘याचसाठी केला होता अट्टाहास। शेवटचा दिस गोड व्हावा।’ अशीच मदनजींच्या मनाची आणि शरीराची अवस्था झाली होती. आपल्या वेदना, त्रास त्यांनी कधी फार जाणवू दिले नाहीत. असंख्य कार्यकर्त्यांना घडवले. असंख्य कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडले. त्यांनी घडवलेले अनेक कार्यकर्ते सरकारात मंत्री म्हणून काम करीत आहेत. अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी उच्चस्थानी कार्यरत आहेत. पण मदनजी मात्र केवळ संघसाधक म्हणून जगले अखेरपर्यंत.
(स्व. मदनजींचे स्वीय साहाय्यक अमोलजी विठाळे यांचे अनुभव निशिकांत देशपांडे, अकोला यांनी शब्दांकित केले आहेत.)