श्रीगणेशाचे नैवेद्य
ड्रायफ्रूट्स मूग डाळ पुरणपोळी
साहित्य -
मूग डाळ - 1 वाटी
गूळ - दीड वाटी
मैदा - पाऊण वाटी
गव्हाचे पीठ - पाव वाटी
ड्रायफ्रूटस् - अर्धी वाटी
मीठ, हळद - चिमूटभर
वेलदोडा, जायफळ - स्वादानुसार
तेल
पाणी
कृती -
प्रथम मूग डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी आणि थोडेसे पाणी घालून कुकरला 3 शिट्या करून शिजवून घ्यावी. (मूग डाळ पटकन शिजते.)
शिजलेली मूग डाळ आणि गूळ एकत्र करून गॅसवर शिजवून घ्यावा. मिश्रण घट्ट झाले की त्यात ड्रायफ्रूट्स पावडर, वेलदोडा पावडर आणि जायफळ घालून घ्यावे आणि गॅस बंद करावा. हे मिश्रण पुरण यंत्रातून (गरम असतानाच) वाटून घ्यावे.
आता मैदा, कणीक मिश्रण करावे आणि त्यात किंचित मीठ आणि हळद घालून घ्यावी. ह्या मिश्रणाला थोडे तेल चोळून घ्यावे. थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ थोडे सैलच भिजवावे. आता त्या पिठावर थोडे तेल घालून 10-15 मिनिटे मुरायला ठेवावे. हे पीठ छान मळून मळून हलके करून घ्यावे, जेणेकरून पोळ्या हलक्या आणि मऊ होतील. ह्या पिठाचा छोटा गोळा आणि तेवढाच पुरणाचा गोळा त्या पारीत भरून घ्यावा आणि तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. ही पोळी तव्यावर अलगद ठेवून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावी.
मऊ, लुसलुशीत गरमगरम ड्रायफ्रूटस् मूग डाळ पुरणपोळी साजूक तुपाबरोबर किंवा दुधाबरोबर वाढावी.
(चणा डाळीने पित्त होते, पचायला जड असते. मूग डाळ पचायला हलकी असते आणि पौष्टिक असते. मूग डाळीच्या पाण्याने वजन कमी होण्यास मदत होते. म्हणून आपण चणा डाळीऐवजी मूग डाळीची पुरणपोळी केली आहे.)
स्पृहा आठल्ये
रत्नागिरी
8999147082