बदलत्या भारताचा जगभर डंका!

14 Sep 2023 19:04:08
  
vivek
जगभरासह भारतातीलही भारतद्वेष्ट्या मंडळींनी हेटाळणी झालेली, नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न झालेली जी-20 परिषद पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भारताने दुपटीने यशस्वी करून दाखवली. आज यामुळे जगभरात वाजत असलेला भारताचा डंका पाहता नजीकच्या भविष्यकाळात बदलत्या जगाचे नेतृत्व कोण करणार, हे जगाच्या आता लक्षात येत आहे.
 स्वतंत्र भारताच्या इतिहासात व जागतिक राजकारणाच्या इतिहासातदेखील 2023 या वर्षाची नोंद ठळकपणे घेतली जाणार आहे. याचे कारण म्हणजे भारताने आपल्या अध्यक्षतेत या वर्षी यशस्वीपणे घडवून आणलेली जी-20 परिषद. जी-20 देश जगातील तब्बल 60 टक्के लोकसंख्या असणारे आणि 75 टक्के व्यापार व 85 टक्के जीडीपी देणारे देश आहेत. अशा या महत्त्वाच्या व्यासपीठावर भारताच्या अध्यक्षतेत पार पडलेली जी-20 परिषद 2023 अनेकार्थांनी अभूतपूर्व होती. बदलत्या भारताला जगासमोर आत्मविश्वासाने सादर करण्याची अनोखी संधी या जी-20 परिषदेच्या निमित्ताने भारतासमोर चालून आली आणि भारताने तिचे सोने केले. जगभरात चर्चेत असलेल्या यूपीआय सिस्टिमची शक्ती आणि उपयुक्तता, भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भारतात प्रचंड वेगाने विस्तारत असलेले पायाभूत सुविधांचे जाळे - त्यातून निर्माण होत असलेल्या गुंतवणुकीच्या असंख्य संधी, अशा अनेक गोष्टी या वर्षभरात भारताने ठळकपणे जगासमोर मांडल्या. तब्बल 123 एकरांवर उभारलेल्या, अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशा ’भारत मंडपम’चे जी-20 सदस्यांच्या राष्ट्रप्रमुखांनी व शिष्टमंडळांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले.
 
 
’जी-20’च्या अध्यक्षतेबरोबरच मिळणार्‍या काही विशेषाधिकारांमध्ये महत्त्वाचा विशेषाधिकार म्हणजे जी-20 सदस्य वगळता आणखी काही देशांना या परिषदेसाठी आमंत्रित करण्याचा अधिकार. भारताने आपल्या परराष्ट्र नीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा यूएई, बांगला देश व सिंगापूर या तीन देशांना या वेळी आमंत्रित करत मुत्सद्देगिरीचे आणखी एक उदाहरण प्रस्तुत केले. रशिया, चीन व युक्रेन या देशांचे राष्ट्रप्रमुख या परिषदेस उपस्थित नसल्यामुळे जगभरातील भारतद्वेष्ट्या मंडळींनी ही परिषद फसणार, असा प्रचार करायला सुरुवात केली होती. परंतु झाले उलटेच. भारताने जगासमोर ’डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर’सारखी महत्त्वाकांक्षी योजना सादर केली. ’वसुधैव कुटुंबकम’ ही प्राचीन हिंदू संकल्पना ठळकपणे सादर करत, ’वन अर्थ, वन फॅमिली वन फ्यूचर’ची साद देत ’वन फ्यूचर अलायन्स’ची संकल्पना मांडली. बदलत्या काळानुसार भविष्यात जगाला नव्याने जोडणार्‍या एका रचनात्मक व भव्य सेतूची मांडणी व पुढाकार भारताद्वारे घेण्यात येत असल्याचा संदेश जगभरात या निमित्ताने पोहोचला.
 
 
या वेळची जी-20 परिषद ऐतिहासिक ठरण्याच्या अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे 55 आफ्रिकी देशांच्या ’आफ्रिकन युनियन’चा या संघटनेत समावेश करत या परिषदेस जी-21 असे स्वरूप देण्यात भारताला मिळालेले यश. आफ्रिका हे गुंतवणुकीसाठी जगातील एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. येथील नैसर्गिक साधनसंपत्ती, खनिजे, वने, युवा लोकसंख्या, अनेक विकसनशील देश अशा अनेक कारणांमुळे आफ्रिका जगासाठी महत्त्वाचे आहे. यातील अनेक देश मागील काही काळात चीनच्या मायावी, आमिषे दाखवणार्‍या मैत्रीला भुलून होरपळले आहेत. भारताच्या पुढाकारातून अशा आफ्रिकन युनियनला अतिशय सन्मानाने जी-20मध्ये समाविष्ट करून घेण्यात आल्याने आफ्रिकन देशांमध्ये भारताप्रती आदर व विश्वास दुणावणार आहे व याचा भविष्यात भारताला मोठा फायदा होणार आहे. ’न्यू दिल्ली लीडर डिक्लेरेशन’ आणि ’इंडिया-मिडल ईस्ट-युरोप कॉरिडॉर’ या व्यापारी मार्गाची संकल्पना हे दोन विषय या जी-20 परिषदेतील भारताचे उत्तुंग षटकार ठरले. यातील भारतापासून पश्चिम आशिया-आखातमार्गे युरोपपर्यंत व्यापारी मार्गाच्या योजनेमुळे चीनच्या ’बेल्ट अँड रोड’ या महत्त्वाकांक्षी योजनेला मोठा शह देण्यात पंतप्रधान मोदींना यश मिळाले आहे.
 
 
न्यू दिल्ली डिक्लेरेशन, वन फ्यूचर अलायन्स, आफ्रिकन युनियनचा समावेश यासह अशा 100हून अधिक विषयांवर जी-20 संघटनेतील सर्व सदस्य राष्ट्रांची सहमती मिळवत भारताचे जगात उंचावलेले स्थान किती प्रभावी आहे आणि भविष्यात भारतच जगासाठी आश्वासक पर्याय आहे, हा संदेश जगभरात पोहोचवण्यात मोदींना ऐतिहासिक यश मिळाले आहे. इतकेच नव्हे, तर अरुणाचल प्रदेशात व जम्मू-काश्मीरमध्ये जी-20 परिषदेतील कार्यक्रम आयोजित करत भारताने मोठी बाजी मारली. जी-20 देशांच्या प्रतिनिधींच्या येथील अधिकृत उपस्थितीमुळे अनुक्रमे चीन व पाकिस्तानच्या या भारतीय प्रदेशांवरील दाव्यांना एक प्रकारे जगानेच अप्रत्यक्ष उत्तर दिले आहे.
 
 
त्यामुळे जगभरासह भारतातीलही भारतद्वेष्ट्या मंडळींनी हेटाळणी झालेली, नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न झालेली जी-20 परिषद पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील भारताने दुपटीने यशस्वी करून दाखवली. आज यामुळे जगभरात वाजत असलेला भारताचा डंका पाहता नजीकच्या भविष्यकाळात बदलत्या जगाचे नेतृत्व कोण करणार, हे जगाच्या आता लक्षात येत आहे. शिवाय, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदलत्या भारताचे नेतृत्व कोण करणार, हेदेखील भारतवासीयांपुढे स्पष्ट झाले आहे.
Powered By Sangraha 9.0