गणेशाच्या प्रसादासाठी मुंबईतील नावाजलेली मिठाई

14 Sep 2023 16:14:01
मुंबईतील गणेशोत्सव हा देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचा विषय असतो. या लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी मुंबईतील नावाजलेली मिठायांची दुकानेही आधीपासूनच सज्ज असतात. मुंबईतील चाकरमानीही आवर्जून गावी जाताना मुंबईची भेट म्हणून या नावाजलेल्या मिठायांच्या दुकानातील मिठाई खरेदी करतो.
mumbai
 
घडाळ्याच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईचा वेग अतिजलद असला, तरी या धावपळीत ती कायम वाट बघत असते ती गणेशोत्सवाची. या दिवसांतील मुंबईतील वातावरण आल्हाददायक चैतन्याने भारलेले असते. म्हणूनच मुंबईतील गणेशोत्सव हा देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचा विषय असतो. मुंबईतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असते, ते येथील भव्य अशा गणेशमूर्तींचे. या लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी मुंबईतील नावाजलेली मिठायांची दुकानेही आधीपासूनच सज्ज असतात.
 

vivek
 
भायखळ्यातील प्रसिद्ध अशा बेळे यांनी आपल्या व्यवसायात कालसुसंगत बदल केले. बेळे यांची चौथी पिढी आता या व्यवसायात कार्यरत आहे. विष्णू बेळे यांनी 1944 साली दुग्धव्यवसायापासून सुरू केलेला हा व्यवसाय त्यांच्या पुढील पिढीने दुग्धजन्य पदार्थ (मिठाई) व नाश्त्याच्या वेगवेगळ्या पदार्थांची जोड देऊन वाढवला आणि नावारूपाला आणला. बेळे हा आता ब्रँड झाला आहे. तो ब्रँड रुजवणारे व विस्तारणारे बेळे मिठाईचे रमण बेळे म्हणाले, “आजोबा आणि वडिलांपासून राखली गेलेली पदार्थांची खास चव राखण्याचा आणि व्यवसायाचे गणितही राखण्याचा आमचा प्रयत्न असतो. बेळे यांची मिठाईची चव घेणारा ग्राहक पुन्हा अन्य कुठेही जात नाही, हा आमचा अनुभव आहे.” गिरणगाव थंडावले असले, तरी तेथील कामगारवर्ग अजूनही बेळे यांची मिठाई खरेदी करण्यासाठी खास भायखळ्यात येतो. पेढे, काजूकतली, मैसूरपाक, मावा बर्फीचे विविध प्रकार, ड्रायफ्रूट बर्फी याबरोबरच सर्वाधिक लोकप्रिय असलेला त्यांच्याकडील पदार्थ म्हणजे बदामी हलवा.
 
 
“ग्राहकांना उत्तम दर्जाचा माल देण्याबाबत आम्ही कायम आग्रही असतो. त्यामध्येे कुठलीही तडजोड केली जात नाही. हा दर्जा टिकवण्यासाठी कच्चा माल असो, पदार्थ बनवण्याची पद्धत, तो बनवताना घ्यायची स्वच्छतेबाबतची काळजी या सर्व गोष्टींकडे आमचे जातीने लक्ष असते. शिवाय वर्षानुवर्षे आमच्याकडे काम करणार्‍या कामगारांमुळेही पदार्थाचा दर्जा व चव टिकून आहे. या सगळ्यामुळे बेळे हा ब्रँड नावारूपाला आला आहे.” दिवसेंदिवस लोकांची खाद्यपदार्थांची बदलत चाललेली आवड लक्षात घेऊन हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेल्या चैतन्य बेळे यांनी मूळ पदार्थांच्या बरोबरीने नवनवीन पदार्थ आणले आहेत. रमण बेळे यांनी वाढवलेल्या व्यवसायात चैतन्य नावीन्य आणि वैविध्य आणत आहेत.
 

mumbai
 
मुंबई उपनगरातील विलेपार्ले येथील ‘फडके उद्योग मंदिर’ हे एक नावाजलेले मिठाईचे दुकान. महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणून फडके उद्योग मंदिराचा नावलौकिक आहे. परिसरातले खवय्ये खास अंजीर आणि गुलकंद बर्फीसाठी आवर्जून इथे येतात. पाश्चात्त्य खाद्यसंस्कृतीकडे वाढत जाणारा कल आणि वेळेचा अभाव यामुळे अनेक पारंपरिक पदार्थ कालौघात घरी करणे कमी होत चालले आहे. त्यातील एक पदार्थ म्हणजे राघवदास (रवा+नारळ) लाडू. गणपतीचे दिवस सोडले, तर फडके यांच्या दुकानात हा लाडू विक्रीसाठी कायम उपलब्ध असतो.
 
 
कोणताही व्यवसाय नावारूपाला येतो, तो त्यासाठी घेतलेल्या वर्षानुवर्षांच्या परिश्रमामुळे. फडके उद्योग मंदिरही त्याला अपवाद नाही. “कष्टाला पर्याय नसतो. कामासाठी मेहनती माणसे मिळणे, लोकांचा आपल्या कामावर विश्वास असणे आणि तो टिकून राहणे ही सगळी देवाची कृपा आहे” असे मिलिंद फडके यांनी सांगितले.
 
 
फडके उद्योग मंदिरातील अनेक प्रकारचे पेढे, काजूकतली, सुतरफेणी, बालूशाही, हलवा (विविध प्रकार) यांना विशेष मागणी असते. खास गौरी-गणपतीसाठी काजू मोदक, आंबा मोदक, केशरी पेढा, जायफळ पेढा, ओल्या नारळाच्या करंज्या, अनारसे आणि या वर्षी खास गणरायासाठी उकडीच्या मोदकांबरोबर तळणीचे मोदकही इथे उपलब्ध असतात.
 

mumbai
 
विषय चालला आहे गणपतीच्या नैवेद्याचा आणि प्रसादाचा आणि इथे बेडेकर काय करतायत? असा प्रश्न वाचकांना पडेल. पण वर्षानुवर्षे लोणच्याइतके मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकरांचे नाव गेली काही वर्षे मिष्टान्न बनवण्याच्या व्यवसायातही स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. जिभेवर ठेवताच विरघळणारे बेसन लाडू, चविष्ट गुलाबजाम याबरोबरच यंदाच्या गणेशचतुर्थीपासून गणेशासाठी खास उकडीचे मोदक घेऊन ते आले आहेत. हे सर्व पदार्थ ‘रेडी टु ईट’ स्वरूपातील आहेत.
 
 
असे उकडीचे मोदक ते पाच वर्षांपासून तयार करीत होते. परंतु त्याच्या मार्केटिंगचे स्वरूप वेगळे होते. याविषयी अजित बेडेकर म्हणाले, “उकडीचे मोदक आम्ही पाच वर्षांपूर्वीच केले होते. मात्र त्याच्या मार्केटिंगचे स्वरूप वेगळे होते. हॉॅटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वितरित केले जात असत. तेव्हा आमचे मोदक त्या वितरकाच्या नावाने विकले जात. त्यामुळे आम्ही तयार करत असूनही आमचे नाव कुठेही येत नव्हते. 2019 साली अमेरिकेत पहिल्यांदा आमचा मोदक गेला. तसेच अन्य महाराष्ट्रीय पदार्थ - उदा., थालीपीठ, बटाटेवडे, साबुदाणा वडे इत्यादी हे फ्रोझन फूड स्वरूपात उपलब्ध आहेत. आता त्यांच्याबरोबर फ्रोजन मोदकही अमेरिकेत पाठवलेत. त्याची संख्या एक लाखाहून अधिक आहे. श्रावणातील संकष्टीला मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात 121 मोदकांचा नैवेद्य अर्पण करून उकडीचे मोदक या उत्पादनाचे लाँच केले. मुंबईत आणि महाराष्ट्रातही या मोदकांचे वितरण जोरात चालू आहे. यंदा 500 दुकानांत उकडीचे मोदक वितरित करण्याचे आमचे ध्येय आहे.”
मोदक तयार करणे ही कला आहे. मोदकासाठी योग्य पद्धतीची पिठी तयार करणे, पिठीची उकड योग्य जमणे, मोदकाच्या पारी, सारण हे सारेच वेळखाऊ. आज नोकरी करणार्‍या महिलांची संख्या वाढली आहे आणि कामाचे तासही. अशा वेळी बेडेकरांनी आणलेले ‘रेडी टु ईट’ हे मोदक म्हणजे महिलांसाठी वरदान ठरेल.
 
 
उकडीचे मोदक तयार करण्यासाठी बेडेकर उद्योग समूहात पूर्णपणे ऑटोमेशन पद्धत वापरली जाते. अगदी खवलेला नारळ ते मोदकाच्या पिठीचे प्रमाण आणि त्यापुढे जाऊन मोदकाची पारी बनवणे हे सगळेच मशीनने केले जाते. त्यानंतर हे तयार झालेले मोदक वाफवून लगेच फ्रीझरमध्ये जातात. मोदक टिकवण्यासाठी गरम मोदक लवकरात लवकर फ्रीज करणे ही टिकवण्याची पहिली पायरी आहे. बेडेकरांचे असे हे लुसलुशीत उकडीचे मोदक यंदाच्या गणेशचतुर्थीला नैवेद्यासाठी सज्ज आहेत.
 
 
vivek
चितळे हा ब्रँड मिठाईच्या दुनियेतील अतिशय नावाजलेला ब्रँड आहे. आता पुण्याबाहेरही त्यांच्या व्यवसाय विस्तारला आहे. याविषयी चितळे बंधूचे व्यवस्थापकीय भागीदार असलेले इंद्रनील चितळे यांच्याशी संवाद साधला.
 
 
ते म्हणाले, “चितळे बंधू या ब्रँडच्या पदार्थांची विक्री पुण्यातील दुकानातून होत होती. मात्र झपाट्याने वाढणार्‍या शहरीकरणामुळे ग्राहक दुकानापर्यंत येण्यावर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन, जिथे ग्राहक आहे तिथे आम्ही या विचाराने आम्ही पुण्याची वेस ओलांडली. तसेच सुपरमार्केटमध्ये खरेदी करण्याचा वाढता कल लक्षात घेऊन तिथेही पोहोचण्याचा आम्ही विचार केला.
 
 
नमकीन पदार्थांबरोबरच आमच्या मिठाईची विक्री अधिक आहे. म्हणून मिठाई टिकण्यासाठी तिचे पॅकेजिंग आकर्षक करण्याबरोबरच पदार्थ टिकण्याच्या दृष्टीने त्या संदर्भात संशोधन केले. त्यात यश मिळाले. पूर्वी महाराष्ट्रात आणि गोव्यात 12 दुकाने होती, आता देशातील 10 राज्यांत व 2 केंद्रशासित प्रदेशात आमची उत्पादने जातात. देशभरात आमची 80 दुकाने आहेत. साठहून अधिक देशांत आमची उत्पादने निर्यात होतात. आमच्या फ्रँचायझी सर्व ठिकाणी आहेत.
 
 
पदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी प्रामुख्याने ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचा वापर केला जातो. मिठाई टिकवायची असेल तर ती कमीत कमी हाताळली गेली पाहिजे, म्हणूनच कच्च्या मालापासून, पदार्थ तयार होऊन त्याचे पॅकेजिंग होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आम्ही ऑटोमेशनचा वापर करतो.”
 

mumbai
 
मिठाईत सर्वाधिक वापरला जाणारा घटक म्हणजे मावा. मावा खराब होण्याचे प्रमाण अधिक असते, अशा वेळी घ्याव्या लागणार्‍या काळजीबाबत इंद्रनील म्हणाले, “तापमानातील बदल हे मावा खराब होण्याचे प्रमुख कारण असते. दूध आणि खवा आमच्याच डेरीमधून येते. तिथे कोल्डस्टोरेज करून थेट जिथे मिठाई बनवली जाते तिथे ते पाठवले जाते. यासाठी आवश्यक असलेली कोल्ड चेन आम्ही तयार केली आहे. त्यामुळे खव्याचा आणि दुधाचा दर्जाही उत्तम राहतो. त्यापासून तयार होणारी मिठाईही उत्तम दर्जाचीच होते. हे सर्व झाल्यानंतर पॅकेजिंगसाठी आम्ही Modified atmosphere Packaging (MAP)  या पद्धतीचा वापर करतो. त्यामध्ये व्हॅक्यूम निर्माण करून प्रॉडक्ट व्हॅक्यूमच्या आत स्टोअर केले जाते. त्यामुळे पदार्थ खराब होत नाही. या पद्धतीमुळे कोणतेही प्रिझर्व्हेेेटिव्ह न वापरताही प्रॉडक्ट दीर्घकाळ टिकवता येते.
 
 
प्रॉडक्ट कोणते आहे यावर त्याची टिकण्याची क्षमता अवलंबून असते. तरीही साधारणत: 45 ते 90 दिवस या कालावधीत रूम टेंपरेचरला मिठाई टिकवता येते. जर फ्रोझन फॉरमॅटमध्ये केली, तर एक वर्षापर्यंतही टिकवता येते.
 
 
तसेच शिरा, उपमा, खिचडी असे महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीतील खास पदार्थ रेडी टु ईट पद्धतीत उपलब्ध आहेत. रेडी टु ईट पदार्थांसाठी आम्ही रिटॉट ही पद्धत वापरतो. चितळे म्हटले की बाकरवडी ही ओळख निर्माण झाली आहे, त्याच तोडीने मिठाईत काजूकतली आणि गुलाबजाम यांना पसंती आहे. तसेच वेगवेगळे हलवा प्रकार - गाजर हलवा, दुधी हालवा, मूग डाळ हलवा - यामध्ये आम्ही फ्रोझन भाज्या वापरून कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता एक वर्षभर टिकवू शकतो. हीट अँड ईट पद्धतीकडे लोकांचा कल वाढल्याने आम्हीही तसे पदार्थ तयार करण्यावर भर दिला आहे.

mumbai 
 
 
ग्राहकांना उच्च दर्जाचे पदार्थ देण्यासाठी जे निकष पाळले जायला हवेत त्याचे काटेकोर पालन करतोच, त्याचबरोबर झपाट्याने वाढणारे जागतिकीकरण आणि मागणी लक्षात घेता आता आम्ही कार्यपद्धतीत बदल केले आहेत. त्या दृष्टीने क्वालिटी अ‍ॅश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल हे दोन विभाग नव्याने निर्माण केले आहेत. फूड टेक्नॉलॉजीमधील बीएससी, एमएससी, बीटेक, एमटेक अगदी पीएचडीपर्यंतचे तज्ज्ञ लोक आमच्याकडे कार्यरत आहेत.
 
 
कच्च्या मालाच्या तपासणीपासून ते सुधारित वातावरणातील पॅकेजिंगपर्यंतच्या सर्व गोष्टी आमच्याकडेच होतात. त्यामुळे दर्जाबाबत निश्चिंतता असते. फूड सेफ्टीसाठी जे जागतिक प्रमाण आहे, ते पाळणारी मिठाई उद्योगातील भारतातील चितळे बंधू ही पहिली कंपनी आहे.
 
 
उत्तम पॅकेजिंगमुळे आम्ही कुठेही देशाच्या कोणत्याही भागात विक्रीसाठी आमचे प्रॉडक्ट पाठवू शकतो. त्याचबरोबरीने ई-कॉमर्स - आमची वेबसाइट, स्विगी, झोमॅटो, अ‍ॅमेेझॉन, फ्लिपकार्ट या माध्यमातूनही लोक खरेदी करतात व इतरांना पाठवतात. सणासुदीच्या दिवशी मागणी आणखीनच वाढते.”
 
 
गणेशोत्सवाच्या काळात मिठायांच्या दुकानांतील लगबग वाढलेली दिसते. मुंबईत घरातील गणपतीच्या प्रसादासाठीच्या खरेदीबरोबर सार्वजनिक मंडळातील गणेशदर्शनाला जाण्यासाठीही प्रसाद खरेदी केला जातो. चेंबूरमधील सरोज, मुलुंडमधील योगेश्वरी, दादरचे पणशीकर, लालबागचे लाडूसम्राट, कुर्ल्यातील दीपक फरसाण मार्ट अशा काही प्रसिद्ध दुकानात लांबच्या लांब रांगा पाहायला मिळतात.
Powered By Sangraha 9.0