पालघरच्या ‘सिल्व्हर पापलेट’ची गोष्ट

14 Sep 2023 12:36:46
@विकास पांढरे / 
@डॉ.विलास जाधव

'Silver pomfret' declares state fish of Maharashtra
‘सिल्व्हर पापलेट‘ कितीही महाग असू द्या, मत्स्याहारी लोक पापलेट खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत. त्याची चवच न्यारी. अशा या लोकप्रिय माशाला आता राज्य मासा म्हणून मान मिळाला आहे. कोकणासाठी - विशेषत: पालघर जिल्ह्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. बर्‍याच वर्षांपासून याची मागणी होती. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका राष्ट्रीय परिषदेत ही घोषणा केली. यामुळे येत्या काळात ‘सिल्व्हर पापलेट‘चा विकास साधण्यास मदत होणार आहे.
 
 महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू‘, तर राज्यपक्षी ‘हरियाल‘, राज्यपुष्प ‘तामण‘, राज्यफळ ‘आंबा‘. ही सर्व आपल्या ‘महाराष्ट्राची मानचिन्हे‘ आहेत. याविषयी सर्वांना माहिती आहेच. आता यामध्ये ‘राज्य मासा‘ म्हणून पालघरच्या ‘सिल्व्हर पापलेट‘ची भर पडली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मासेमारी अर्थव्यवस्थेत ‘सिल्व्हर पापलेट‘ला विशेष स्थान आहे. सिल्व्हर पापलेटला स्थानिक भाषेत ‘सरंगा‘ असे नाव आहे. पालघर जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात सिल्व्हर पापलेट मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे हे क्षेत्र ‘सिल्व्हर पापलेटचा गोल्डन बेल्ट‘ म्हणून ओळखले जाते.
 
 
सिल्व्हर पापलेटला हा दर्जा मिळावा, यासाठी सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मच्छीमारांच्या विविध समस्यांबाबत, तसेच शाश्वत मासेमारी आणि मत्स्यजतन-संवर्धन होण्यासाठी मासेमारी बंदी कालावधी वाढविणे यासाठी सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था व दि सातपाटी फिशरमेन्स सर्वोदय सहकारी संस्था या सातपाटी येथील दोन्ही मच्छीमार सहकारी संस्था सातत्याने पाठपुरावा करत असतात. पापलेटला ‘राज्य मासा’ म्हणून मान्यता मिळावी, म्हणून सातपाटी येथील मच्छीमार सहकारी संस्थांचे महत्त्वाचे योगदान आहे. या संस्थेच्या पाठपुराव्यामुळे सिल्व्हर पापलेटला ‘राज्य मासा‘ अशी मान्यता मिळाली आहे. मानामुळे त्याचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन होण्यास मोठी मदत होणार आहे.
  
“शाश्वत मत्स्यव्यवसायाला प्रोत्साहन देणार‘’
- सुधीर मुनगंटीवार

vivek

“शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बळ देण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंगीकारले आहे. या धोरणाला अनुसरून आमचे सरकारही शाश्वत मासेमारीला प्रोत्साहन देत आहे. ’आययूसीएन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे जगातील प्रजातींच्या उपलब्ध संख्येच्या आधारे वर्गवारी करून याबाबतची माहिती प्रसिद्ध केली जाते. या माहितीप्रमाणे ‘पापलेट‘ हा मासा नामशेष न झालेला निदर्शनास आले आहे. महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील ‘सिल्व्हर पापलेट‘ या विशेष मत्स्यप्रजातीचे जतन व संवधर्न करण्यासाठी राज्यात ‘सिल्व्हर पापलेट‘ हा मासा ‘राज्य मासा‘ म्हणून घोषित करण्यात आला आहे.“
- मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र राज्य

पापलेटची कूळकथा
 
पापलेट खरे तर अटलांटिक, भारतीय आणि पॅसिफिक महासागरांच्या वेगवेगळ्या प्रदेशांत आढळते. यावरून त्यांना ‘अटलांटिक पॉम्फ्रेट‘, ‘पॅसिफिक पॉम्फ्रेट‘ आणि ‘भारतीय पॉम्फ्रेट‘ अशा नावांनी ओळखले जाते. ‘भारतीय पॉम्फ्रेट‘ भारतातील सर्व किनार्‍यांवर आढळतात. त्यातही गुजरात, मुंबई, ओदिशा आणि पश्चिम बंगालचा पूर्व किनारा या ठिकाणी भारतीय पॉम्फ्रेट मोठ्या प्रमाणात आढळतात.
 
 
पॉम्फ्रेटचे मुख्यत: तीन प्रकार आहेत - ‘ब्लॅक पॉम्फ्रेट‘, ‘ग्रे पॉम्फ्रेट‘ आणि ‘सिल्व्हर पॉम्फ्रेट‘. ’पँम्पस आर्जेन्ट्स‘ हे सिल्व्हर पॉम्फ्रेटचे शास्त्रीय नाव. मराठीत पॉम्फ्रेटला ‘पापलेट‘ म्हणतात. आकाराने गोलाकार असलेला हा मासा छोट्या खवल्यांनी आच्छादलेला असतो. वजन साधारण एक ते दीड किलो, शरीर चपटे, दोन्ही बाजूंनी दबलेले असते. सिल्व्हर पापलेट किनार्‍यापासून थोडे दूर आणि 35 ते 70 मीटर खोलीपर्यंत थव्याने राहतात. प्लवंग तसेच समुद्रातील छोटे मासे खाऊन सिल्व्हर पापलेट जगतात. मादी एका हंगामात 65 हजार ते दीड लाख अंडी घालते. मुंबई सागरी परिक्षेत्रात ऑक्टोबर ते डिसेंबर हा विणीचा हंगाम असतो. पिल्ले जानेवारी ते मार्च या कालावधीत किनार्‍यावरील भागात आढळतात, तर पूर्ण वाढ झालेले एप्रिल ते जून महिन्यात मिळतात. सिल्व्हर पापलेटचे मांस अतिशय लुसलुशीत व स्वादिष्ट असल्याने पापलेट मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. या पापलेटचे पोषणमूल्यही उत्तम आहे. सिल्व्हर पापलेटमध्ये 17.1 टक्के प्रथिने, कॅलरी, फॅट 1.2 टक्के, तर ओमेगा 6, ओमेगा 3 अनुक्रमे 15 मिलिग्रॅम आणि 24 मिलिग्रॅम आढळतात.
 
“पापलेटसह अन्य प्रजातींचे संरक्षण करणे आवश्यक”
- राजेंद्र मेहेर
  
'Silver pomfret' declares state fish of Maharashtra

शाश्वत मासेमारी, तसेच माशांच्या अधिवास क्षेत्राचे संगोपन आणि संरक्षण होण्यासाठी राज्याच्या आणि केंद्राच्या जलादी क्षेत्रात अनेक वर्षे उचित नियमन, नियंत्रण आणि प्रभावी अंमलबजावणी यंत्रणा नसल्याने अनेक मत्स्यप्रजाती दुर्मीळ झाल्या आहेत. पापलेट हा राज्य मासा म्हणून घोषित झाला असला, तरी पापलेटबरोबर नष्ट होत जाणार्‍या महत्त्वाच्या अनेक मत्स्यप्रजातींचे जतन-संवर्धन होण्यासाठी जिल्हानिहाय मासेमारी पद्धतीचे अवलोकन करून मच्छीमारांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र/राज्य जलादी क्षेत्रातील मासेमारीचे उचित नियमन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मासेमारीवर नियंत्रण आणि देखरेखीसाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे.
 
- चेअरमन, सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्था, सातपाटी, ता.जि. पालघर.
संपर्क - 9226207700.
 
सातपाटी - सिल्व्हर पापलेटचे गाव
 
 
पालघर जिल्हा सह्याद्रीच्या डोंगराळ प्रदेशाने व जंगलांनी व्यापलेला आहे. भात हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला असून या भागात मासेमारी चालते, हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. पालघर तालुक्यातील दातिवरे, एडवन, वडराई, सातपाटी, मुरबे, दांडी, तर वसई तालुक्यातील वसई, नायगाव, अर्नाळा आणि डहाणू तालुक्यातील डहाणू व झाई ही महत्त्वाची मासेमारी बंदरे आहेत.
 

vivek 
 
सातपाटी बंदराविषयी माहिती सांगताना सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे चेअरमन राजेंद्र मेहेर म्हणाले, “पालघर तालुक्यातील सातपाटी हे मुख्य मासेमारी बंदर असून ‘पापलेटचे गाव‘ म्हणून प्रसिद्ध आहे. याखेरीज ‘दाढा‘, ‘घोळ‘ व ‘बोंबील‘ या माशांसाठीही हे गाव प्रसिद्ध होत आहे. येथील गावच्या मासेमारी व्यवसायाला मोठा इतिहास आहे. पश्चिम किनारपट्टीवरील पहिली यांत्रिकी नौका (सन 1960) या ठिकाणीच तयार करण्यात आली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही या गावाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देशातील पहिली मच्छीमारी सहकारी संस्था सातपाटीत स्थापन झाली. या ठिकाणी जवळपास तीनशेहून अधिक लहान-मोठ्या मासेमारी नौका कार्यान्वित आहेत. या माध्यमातून वर्षभरातून 600 टनाहून अधिक मासेमारी केली जाते. संपूर्ण गावाचे अर्थकारण मासेमारीवर अवलंबून आहे. मासेमारीसह पूरक व्यवसाय म्हणून पापलेट मासे पकडण्यासाठीची जाळी या ठिकाणी तयार केली जाते. त्यामुळे स्थानिक व परिसरातील लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे.“
 

'Silver pomfret' declares state fish of Maharashtra 
 
राज्याच्या मासेमारी उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान देत सिल्व्हर पापलेट हा त्याच्या स्वादिष्ट चवीसाठी आणि पौष्टिक मूल्यासाठी प्रसिद्धी पावत आहे. त्यामुळे देशातील व परदेशातील ग्राहकांमध्ये पसंतीचे सागरी अन्न बनले आहे. सातपाडी मासेमारी बंदराच्या पायाभूत विकासासाठी केंद्र सरकारच्या मत्स्य विभागाकडून 243 कोटी रुपयांच्या कामांना तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. या माध्यमातून आदर्श मच्छीमार बाजारपेठ विकसित केली जाणार आहे.
 
सिल्व्हर पापलेटचे उत्पादन
 
व्यावसायिकदृष्ट्या पापलेट माशाला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याची निर्यात होऊन परकीय चलन देणारा मासा म्हणूनही तो ओळखला जातो. अमेरिका, जपान, दुबई आदी देशांना पापलेटची निर्यात केली जाते. कोकणातील हर्णे ते पालघर यादरम्यानच्या किनारपट्टीत पापलेट मोठ्या प्रमाणात मिळते. सातपाटी बंदरातून सिल्व्हर पापलेटची निर्यात होते. अलीकडे या पापलेटचे उत्पादन घटल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. पापलेटचे सरासरी वार्षिक उत्पादन 1962 ते 1976दरम्यान 8312 टन, 1991 ते 2000 या कालावधीत 6592 टन, तर 2010 ते 2018 या काळात 4154 टन नोंदविण्यात आले आहे. 2010पासून माशाच्या उत्पादनात प्रचंड घट होताना दिसत आहे. सद्य:स्थितीत पापलेटचे असेच चित्र राहिले, तर भविष्यात हा मासा नामशेष होईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
 
 
घट होण्याची कारणे
 
पापलेटचे उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये सागरी प्रदूषण, वातावरण बदल या प्रमुख कारणांबरोबर मासेमारी पद्धतीत झालेला बदलही अंतर्भूत आहे. काही मच्छीमार अधिक उत्पन्नाच्या हव्यासापोटी पापलेटांची पिल्ले - ज्यांना आपण कावलट म्हणतो, त्यांना बेछूटपणे जाळ्यात पकडतात. त्यामुळे पापलेट माशांची संख्या कमी होते. सागरी किनारपट्टीवर होणार्‍या अनियंत्रित मासेमारीमुळे पापलेटची संख्या कमी होत आहे. याविषयी अधिक माहिती सांगताना राजेंद्र मेहेर म्हणाले, “पापलेट कमी होण्याची नैसर्गिक व मानवी कारणे आहेत. ‘दालदा‘, ‘डोल‘ आणि ‘ट्रॉलिंग‘ या पापलेटच्या मासेमारीच्या तीन मुख्य पद्धती आहेत. काही मच्छीमारांनी ‘कर्ली डोल‘ ही जाळी तयार केली आहे. ही जाळी भरती व ओहोटी दोन्ही वेळेला वापरली जातात. अंडी घालण्याच्या वयात न आलेली छोटी पापलेट अलगद या जाळ्यात अडकतात. त्यामुळे पापलेटची संख्या दिवसेंदिवस घटताना दिसत आहे.”
 
 
 
एकूणच या मत्स्यसंपदेवर अवलंबून असणारे असंख्य मच्छीमार बांधव नुकसान सोसत आहेत. सागरी मत्स्यसंपदेवर मच्छीमार बांधवांची उपजीविका अवलंबून आहे. इतर बरेच मासे असले, तरी व्यापारी मूल्य मात्र सिल्व्हर पापलेटला अधिक आहे. त्यासाठी सिल्व्हर पापलेटचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी लागेल. यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवावा लागेल. पापलेट विणीच्या हंगामात कर्ली डोल पद्धतीने होणारी मासेमारी बंद करणे, जाळींची व बोटीची संख्या मर्यादित करणे आदी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सिल्व्हर पापलेटला आताच मिळालेल्या ‘राज्य मासा’ मानामुळे त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन होण्यास मोठी मदत होईल, तसेच त्याला विशेष संरक्षण मिळेल असे वाटते. गरज आहे ती फक्त आपल्या सर्वांच्या सहकार्याची, शासकीय यंत्रणांच्या समन्वयाची आणि इच्छाशक्तीची.
Powered By Sangraha 9.0