“हिंदू जे बोलतो, तेच करतो” - स्वामी विज्ञानानंद

11 Sep 2023 15:28:57
 
vivek
 
मुंबई - “हिंदू जे बोलतो, तेच करतो. श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर होणार असे म्हणायचो, हे कोट्यवधी हिंदूंचे स्वप्न आज अयोध्येत निर्माण होत असलेल्या भव्य श्रीराममंदिराने पूर्ण होत आहे. तसेच काशी-मथुरा बाबतीतही केलेले संकल्प पूर्ण होतील” असा विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री स्वामी विज्ञानानंदजी यांनी विश्व हिंदू परिषद षष्ट्यब्दीपूर्ती वर्ष शुभारंभ आणि स्मरणिका प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असताना निर्धार व्यक्त केला.
 
 
विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांतातर्फे दादर येथे विश्व हिंदू परिषदेचे कार्य, उद्दिष्टे, आंदोलने याची माहिती विशद करणार्‍या स्मरणिकेच्या प्रकाशनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त महामंत्री स्वामी विज्ञानानंदजी, प्रांत संघचालक सतीश मोढ, जैन मुनी शुक्रध्यान विजयजी महाराज, इस्कॉनचे प्रभू गौरांग देवजी महाराज, हभप वर्पे महाराज, हभप लब्धे महाराज, विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय पदाधिकारी अशोकराव चौगुले, कोकण प्रांत अध्यक्ष जोगसिंह, कोकण प्रांत कार्यवाह मोहन सालेकर, शाम अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमापूर्वी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित नृत्यनाटिका सादर करण्यात आली.
 
 
विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत कार्यवाह मोहन सालेकर यांनी प्रास्ताविकात “धर्मस्थळांची मुक्तता, अन्य धर्मांत गेलेल्या बांधवांची स्वधर्मात घरवापसी, असे अनेक उपक्रम आतापर्यंत घेण्यात आले आहेत. हिंदू समाजातील तरुणांमध्ये शौर्यभावना वाढीस लागावी, यासाठी बजरंग दल, दुर्गावाहिनी असे आयाम खुले केले” अशी माहिती दिली.
 
 
“हिंदू समाजाचे संघटन या हेतूने केलेली ही हिंदूंची संघटना आज विस्तारली आहे. चिन्मय मिशन कायम विश्व हिंदू परिषदेच्या कार्यासोबत राहील” अशी ग्वाही चिन्मय मिशनचे स्वामी स्वातमानंदजी यांनी दिली.
 
 
विहिंपच्या कार्याची व्याप्ती आणि संघकार्याची वैशिष्ट्ये याविषयी कोकण प्रांत संघचालक सतीश मोढ यांनी मांडणी केली.
राजेंद्र पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि जोगसिंहजी यांनी आभारप्रदर्शन केले.
Powered By Sangraha 9.0