@रमेश (मामा) देवी
संघकार्य म्हणजे आनंद आहे, फक्त जे काम करू, त्यावर विश्वास पाहिजे, हे त्यांचं वाक्य ते कायम जगले. संघ समर्पणभाव म्हणजे काय हे त्यांच्या आचरणातून आम्ही पाहत आलो. संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन करण्याच्या कामाचं दायित्व माझं आहे यासाठीच ते आजन्म कटिबद्ध राहिले.
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरण निश्चित आहे. स्व. मदनदासजीही याला अपवाद नव्हते. त्यांचा मृत्यू आकस्मिक नसला, तरी मनाला चटका लावून जाणारा होता. व्यक्ती जाते. तिचे अस्तित्व, चालणे-बोलणे-दिसणे सर्व लोप पावते. मात्र तिच्या अनंत आठवणी मन:पटलावर कायमच्या कोरल्या जातात. स्व. मदनदासजींसारख्या महान व्यक्तीच्या आठवणी तर अनेक आहेत. त्यातील या एक-दोन..
साधारण 15-20 वर्षांपूर्वीची घटना असेल.. (नेमके साल आठवत नाही.) पुण्यामध्ये गुजराथी समाजातर्फे आर.सी.एम. गुजराथी हायस्कूल येथे विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या त्रिमूर्तींचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये एक होते प्रसिद्ध वास्तुविशारद स्व. बाळकृष्ण दोशी. दोशी मूळचे कर्णावतीचे. दुसरे होते मूळचे सांगलीचे महाराष्ट्र राज्य वीजमंडळाचे मुख्य अभियंता अविनाश शेडजी आणि तिसरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मदनदासजी. सत्कारानंतर जिज्ञासा समाधान कार्यक्रम होता. मदनदासजी तेव्हा संघाचे सहसरकार्यवाह होते. एका गुजराथी बांधवाने मदनदासजींना प्रश्न विचारला, “आपण रा.स्व. संघासारख्या देशातील मोठ्या संघटनेचे पदाधिकारी आहात. पण आपण गुजराथी समाजासाठी आत्तापर्यंत काय केलं किंवा काय करणार आहात?” या प्रश्नाला मा. मदनदासजींनी दिलेलं उत्तर खूपच समर्पक व अविस्मरणीय होतं. अत्यंत शांतपणे व त्यांच्या नेहमीच्या मृदू भाषेत स्मितहास्य करत ते उद्गारले, “मी गुजराथी समाजासाठी किंवा एखाद्या विशिष्ट समाजासाठी काम करत नसून संपूर्ण हिंदू समाजासाठी काम करत आहे. संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन करण्याचं काम मी करत आहे. तेच दायित्व माझ्याकडे आहे आणि त्यासाठीच मी आजन्म कटिबद्ध आहे.” त्यांच्या या अतिशय नेमक्या आणि प्रांजळ उत्तरानंतर सभागृहात एकदम शांतता पसरली. उपस्थितांना कदाचित अशा उत्तराची अपेक्षा नसेल.
दुसरी आठवण आहे 2008मधल्या जुलै महिन्यातली. नगर येथील प्रांतिक बैठकीत मा. मदनदासजी दोन दिवस पूर्ण वेळ उपस्थित होते. दोन दिवसीय बैठकीत 3-4 सत्रांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाचे भाग्य लाभले. तेव्हा मी विद्यापीठ भाग (पुणे महानगर) सहकार्यवाह होतो. 3-4 सत्रांपैकी ‘कार्यकर्ता विकास’ या सत्रात त्यांनी खूपच छान मार्गदर्शन केले. “कार्यकर्ता कसा बनतो.. You come as you are, We make you what we want. कार्यकर्त्याच्या गुणांची चर्चा सर्वत्र करावी, पण अवगुणांची चर्चा मात्र योग्य ठिकाणी करावी.”
समारोपाच्या सत्रात ते म्हणाले, “मी संवेदनशील कार्यकर्त्यांसमोर बोलत आहे. प्रांताचे काम, त्यातल्या त्यातही पुण्याचे काम खूप जुने आहे. संघाची पाळेमुळे महाराष्ट्रात खोलवर रुजलेली आहेत. कोठेही जाऊन काम करण्याची प्रवृत्ती येथील स्वयंसेवकांत आहे. महाराष्ट्र म्हणजे अशी माणसं तयार करण्याचा कारखाना आहे. संघकार्य म्हणजे आनंद आहे, फक्त जे काम करू, त्यावर विश्वास पाहिजे.”
स्व. मदनदासजींना श्रद्धांजली अर्पण करताना गीताच्या या ओळी जास्त समर्पक ठरतील, कारण गीतात जशी अपेक्षा व्यक्त केली आहे तसेच जीवन ते जगले -
मैं जग में संघ बसाऊँ, मैं जीवन को बिसराऊँ।
त्याग तपस्या की ज्वाला से, अंतर्दीप जलाऊँ।
वीणा के बिखरे तारों को, स्नेहों से जुडवाऊँ।
मैं हिंदु राष्ट्र बसाऊँ, मैं जग में संघ बसाऊँ।
रमेश (मामा) देवी, 9420179705