मातृ मंदिर का समर्पित दीप मैं

विवेक मराठी    01-Sep-2023
Total Views |
@मिलिंद मराठेश्रद्धेय मदनदासजी देवींच्या जाण्याने अभाविपच्या देशभरातील हजारो कार्यकर्त्यांवर पुत्रवत प्रेम करणारा पिता गेला. त्यांच्या मनाची सतत मशागत करणारा पोशिंदा आणि दागिन्याप्रमाणे त्यांना घडवणारा सुवर्णकार गेला.

vivek
 
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या गावी 9 जुलै 1942 रोजी मदनदासजींचा जन्म झाला. विद्यार्थी परिषदेचा स्थापना दिवससुद्धा 9 जुलै. हा खरे तर एक ईश्वरी संकेतच होता. शालेय शिक्षणानंतर 1959मध्ये त्यांनी पुण्याच्या प्रसिद्ध बी.एम.सी.सी. कॉलेजमध्ये बी.कॉम.साठी प्रवेश घेतला. त्यानंतर आय.एल.एस.लॉ कॉलेजमधून सुवर्णपदकासह ते एलएल.बी. झाले. पुण्यामध्येच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक झाले आणि सी.ए.च्या अभ्यासाकरिता मुंबईत आले. 1966मध्ये त्यांनी मुंबई अभाविप मंत्री अशी जबाबदारी घेतली. सी.ए. परीक्षेतही अतिशय कौतुकास्पद यश मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेतून प्रचारक म्हणून ते बाहेर पडले आणि विद्यार्थी परिषदेमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी 1967मध्ये काम सुरू केले. 1970च्या अभाविपच्या तिरुअनंतपुरम अधिवेशनात मदनजी विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय संघटन मंत्री झाले आणि 1992 सालापर्यंत सलग 22 वर्षे त्यांनी भारतभ्रमण करत अभाविपचे काम रुजवले, वाढवले. मूळ स्वयंसेवक आणि प्रचारक असलेल्या मदनजींनी 1991मध्ये अखिल भारतीय सहप्रचार प्रमुख आणि नंतर 1994पासून संघाचे सहसरकार्यवाह ही जबाबदारी पार पाडली असली, तरी ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या लक्षात आहेत ते अभाविपचे अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून.
 
या कामासाठी त्यांनी देशभर अखंड प्रवास केला. तालुका, महाविद्यालय, शहर स्तरावर अनेक कार्यकर्त्यांना शोधले, कामासाठी तयार केले, शिकवले. अभाविपच्या कार्यकर्त्यांची पहिली फळी, पहिली पिढी घडवली. परिषदेचा पाया मजबूत केला.
 
02 September, 2023 | 11:23
 
 
विद्यार्थी परिषदेच्या आरंभीच्या काळात स्व. यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे आणि मदनजी यांनी अभाविपचा विचार, तत्त्वज्ञान, सैद्धान्तिक भूमिका काय असावी, याची सघन चर्चा केली. राष्ट्रीय पुनर्निर्माण आणि त्याचा व्यापक संदर्भ, शैक्षणिक परिवार संकल्पना, रचनात्मक दृष्टीकोन, पक्षीय राजकारणापासून वर उठून काम करणे, विद्यार्थी उद्याचा नाही आजचा नागरिक आहे हा विचार रुजवणे, व्यक्तिपरिवर्तनातून समाजपरिवर्तन अशा अनेक वैचारिक संकल्पना या त्रयीने स्थिरपद केल्या आणि संघटनेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. ही सैद्धान्तिक भूमिका प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत संपूर्ण तपशिलासह पोहोचवली.
विद्यार्थी परिषद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध क्षेत्रांतील संघटनां मधील पहिली संघटना आहे. त्या वेळी संघालाही विद्यार्थी संघटना चालवण्याचा अनुभव नव्हता. अशा परिस्थितीत मा. मदनजी यांनी एक अनुपम विद्यार्थी संघटना निर्माण केली.
 
 
कोणत्याही सामाजिक कामातली वैचारिक सुस्पष्टता ही दीपस्तंभासारखी असते. दीपस्तंभ दिशा दाखवतो, पण त्या दिशेने चालण्याचा प्रयत्न करणारा यात्री जर धडपडला, पडला, ठेच लागून रक्ताळला, काटा रूतला तरी दीपस्तंभ त्याला सांभाळत नाही. तो फक्त दिशा दाखवण्याचे काम करतो. पण माननीय मदनजी अशा धडपडलेल्या कार्यकर्त्यांच्या जवळ गेले, त्यांची विचारपूस केली, लागले - खुपले विचारले आणि जखमेवर मायेची फुंकर घातली, पुन्हा उठून चालण्याची हिंमत दिली. आणि त्याच वेळी, का लागले याचीही अत्यंत तटस्थपणाने त्याच्याबरोबर चर्चा केली. ‘नान्य: पन्था विद्यतेऽयनाय।’ अशी प्रतिबद्धता कार्यकर्त्यांमध्ये उत्पन्न करत अक्षरश: अशा हजारो कार्यकर्त्यांचे जाळे देशभर निर्माण केले.
 

vivek 
 
मानवी संबंध आणि संवाद हा त्यांच्या व्यक्तित्वाचा गाभा होता. ‘उपयोग आहे तोपर्यंत कार्यकर्त्याला वापरा आणि मग त्याचा तो’ अशी त्यांची निष्ठूर भावना नव्हती. घरातील सर्वांची विचारपूस, सर्वांशी अंतरंग संबंध, जीवनभर संपर्क आणि संवाद त्यांनी कसोशीने जपले. कार्यकर्त्यांच्या केवळ कामातील काळाचा नाही तर संपूर्ण जीवनाचा विचार केला, म्हणून मा. मदनजी हजारो घरांतील एक सदस्य झाले.
 
 
त्यांच्या कितीतरी आठवणी मनात गर्दी करतात. एका अभ्यासवर्गात सकाळी दात घासताना लक्षात आले की एक बेसिन तुंबले आहे. ते बघताच, मी व्यवस्था करणार्‍या कार्यकर्त्यांना आरडाओरड करत सांगू लागलो की, “अरे, हे नीट करा जरा..” बाजूच्या बेसिनवर मदनजी दात घासायला आले. त्यांनी बघितले. एका मिनिटात इकडून तिकडून शोधून त्यांनी खराट्याची काडी आणली आणि त्या तुंबलेल्या बेसिनमध्ये ती काडी टोचत, कचरा दूर करत, त्यांनी बेसीन नीट केले आणि मला म्हणाले, “समस्येच्या मुळाशी जाऊन ती सोडवण्याचा प्रयत्न करणं हे महत्त्वाचं नाही का?”
 
 
vivek
 
अशा कितीतरी गोष्टी त्यांनी व्यवहारातून शिकवल्या. कार्यकर्ता छोटा किंवा मोठा नसतो, जबाबदारी लहान किंवा मोठी असू शकते, म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये कधीच फरक केला नाही. शुद्ध, सात्त्विक, मनमोकळा संवाद हाच कोणत्याही अडचणींना दूर करण्याचा एकमेव मार्ग असतो. जोपर्यंत सहमती होत नाही, तोपर्यंत पुढे जाऊ नये. ‘सब चलेंगे, साथ चलेंगे’ हे सूत्र ते कामातून जगले. कार्याचे दृढीकरण म्हणजे टीम बनणे. मित्रत्वाचा आधार आणि अधिकार असणार्‍या, समजदार, संघटनशरण आणि कोणताही स्वार्थ नसलेल्या कार्यकर्त्यांचा समूह म्हणजे टीम. ती उभी करणे अत्यंत आवश्यक. आपला खास असा कोणीही असू नये. स्वत:चे चेले तयार झाले की कामाची हानी होते, असे ते सांगत असत. सर्व जण आपलेच असतात, पण कोणाचीही चूक वेळीच, स्पष्टपणे आणि योग्य रितीने सांगितलीच पाहिजे, असे त्याचे आग्रहाचे सांगणे असे. हे करतानाही मैत्रीचे, ममतेच्या नात्यातही अंतराय येता कामा नये याची खबरदारी घ्यायला ते सांगत.
 
 
संघकार्याची पवित्रता आणि त्यावरील अविचल निष्ठा त्यांच्या जीवनात पदोपदी जाणवायची. एका धनवान व्यक्तीकडे 40 मिनिटे अभाविपचे कार्य मांडल्यावर आर्थिक मदत मागितली. त्याने एकही रुपया दिला नाही. बरोबर गेलेले कार्यकर्ते नाराज झाले, पण बाहेर पडताच मदनजी म्हणाले, “कश ळी र श्रेेीशी” आपल्या संपत्तीचा विनियोग पवित्र अशा या सामाजिक कामासाठी करण्याची संधी त्याने गमावली.
 
आज अशा कितीतरी गोष्टी आठवतात.
 
मदनजी आणि अभाविप एकरूप, झाले होते. पण तरीसुद्धा अभाविप व्यापून दशांगुळे उरलेला असा त्यांच्या व्यक्तित्वाचा एक पैलू मला जाणवतो, तो म्हणजे त्यांची आध्यात्मिकता. ते म्हणत असत की, ‘आपण या एका जन्माव्यतिरिक्त आपल्या प्रिय भारतमातेला दुसरं आणखी देऊच काय शकतो? हा जन्म देशासाठी, पुढला जन्म व्यक्तिगत सुखांसाठी. म्हणून या जन्मात स्वत:च्या कोणत्याच गोष्टीवर आपला स्वत:चा अधिकार नाही.’ हे केवळ सांगितलेच नाही, तर तसे जगूनही दाखवले. आमच्यासाठी वस्तुपाठ घालून दिला.
 
 
शेवटची काही वर्षे आजारपणामुळे त्यांना नित्याच्या कार्यापासून दूर राहावे लागले. अशा वेळी कोणाचीही चिडचिड, रागराग, त्रागा होतो. पण या सर्व काळात त्यांना मी आनंदी, समाधानी, सर्वांच्या आनंदात समरसून सहभागी होताना पाहिले. भारतमातेच्या देव्हार्‍यातील दिव्याच्या शांत, स्निग्ध, पवित्र ज्योतीसारखे जळताना पाहिले.
 
 
हजारो कार्यकर्त्यांच्या मनात जीवनभरासाठी कार्यरत राहण्याची प्रेरणाज्योत पेटवून मा. मदनजींची जीवनज्योत अंतर्धान पावली.
त्यांच्या पवित्र, प्रेरक स्मृतींना शत शत नमन!