@मंगला (पौर्णिमा) परीख
आमचे पिलाभई उच्चशिक्षित असूनही भरपूर पैसे कमावण्यापेक्षा राष्ट्रसेवा करणे हे त्यांनी त्यांचे कर्तव्य मानले आणि आपले जीवन राष्ट्राला समर्पित केले. संघटना विस्तारासाठी त्यांना भारतभ्रमण करावे लागले, परंतु त्यांनी कधी परिवाराशी असलेल्या संबंधांना दुरावा दिला नाही. राखीपौर्णिमेच्या आधी राखी पाठवण्यासाठी ते नेहमी जिथे असतील त्या ठिकाणाचा पत्ता कळवायचे.
24 जुलै 2023 रोजी पहाटे माझे पिलाभई म्हणजेच मदनदासजी देवी यांचे वैकुंठगमन झाल्याचा फोन आला आणि मला अतीव दु:ख झाले. त्यांच्या लहानपणापासूनच्या अनेक आठवणी दाटून आल्या. ते भावांमध्ये लहान असल्याने आम्ही त्यांना पिलाभई म्हणत असू. मी त्यांना एक दिवस बंगळुरूला हॉस्पिटलमध्ये भेटून आले. त्यांच्याजवळ बसून त्यांचा हात हातात घेऊन आम्ही खूप गप्पा मारल्या. मी जाऊ नये असे त्यांना वाटत होते. काही भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत, हेच खरे! नऊ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी माझे व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले आणि 24 जुलैला ही निधनवार्ता आली. त्यांच्याविषयी अनेक मोठ्या नेत्यांनी तसेच वेगवेगळ्या संघटन कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामाशी संबंधित खूप आठवणी सांगितल्या आहेत. पण त्यांची लहान बहीण म्हणून मी त्यांच्या काही कौटुंबिक आठवणी सांगणार आहे.
02 September, 2023 | 11:23
करमाळा येथील एका संपन्न गुजराथी कुटुंबात मदनदासजी म्हणजेच आमचे पिलाभई यांचा जन्म झाला. पिलाभई आणि मी सर्वात लहान असल्याने आम्ही आईचे खूप लाडके होतो. ते लहानपणापासूनच खूप हुशार होते. करमाळा येथे त्यांचे शालेय शिक्षण व पुणे येथे पुढील शिक्षण झाले. त्यांनी पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजमधून बी.कॉम. आणि एम.कॉम.चे शिक्षण घेतले. नंतर ते एलएल.बी. झाले. त्यात त्यांना सुवर्णपदक मिळाले. तसेच त्यांनी सी.ए.ही पूर्ण केले. इतके उच्चशिक्षित असूनही भरपूर पैसे कमावण्यापेक्षा राष्ट्रसेवा करणे हे पिलाभईंनी त्यांचे कर्तव्य मानले आणि आपले जीवन राष्ट्राला समर्पित केले. त्यांना घरच्या संपत्तीत तसेच धंद्यात कधीही रस नव्हता. लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. घरातूनच त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू मिळाले. आमचे मोठे बंधू खुशालभाईबरोबर ते लहानपणापासून शाखेत जायचे. पुण्यात गेल्यावर त्यांनी शिक्षणाबरोबर संघाच्या विचारांना वाहून घेतले. एक दिवस आईबरोबर गप्पा मारताना त्यांनी आईला सांगितले की “मला तुझ्याकडून एक वचन हवे आहे.” आईने विचारले की, “काय पाहिजे?” ती खूप भोळी होती. तिला वाटले, काही भौतिक गोष्ट मागेल. परंतु त्यांनी त्यांचे आयुष्य राष्ट्राला अर्पण करण्याची आणि त्यासाठी आयुष्यभर लग्न न करता राहण्याची परवानगी मागितली. आमचे सर्वात मोठे बंधू जमनादास यांच्याकडे मुंबईला नेहमी जाणे असायचे. आईनंतर मोठ्या वहिनींनी त्यांची आईप्रमाणेच काळजी घेतली.

सुरुवातीच्या काळात त्यांचा आमच्याशी संपर्क कमी असायचा. कारण संघटनेच्या कामामुळे त्यांना भारतभर फिरावे लागे. पण दर महिन्याला ते खुशाली विचारायला पोस्टकार्ड पाठवायचे. राखीपौर्णिमेच्या आधी राखी पाठवण्यासाठी ते नेहमी जिथे असतील तिथला पत्ता कळवायचे.
आत्ताच्या काही वर्षांत राखीपौर्णिमेच्या वेळी मात्र घरी यायचे. त्यांना माझ्या घरी राहायला आवडायचे. आई जे पदार्थ करायची, ते मी नेहमी करायचे. त्यांना डालबाटी, कढीखिचडी विशेष आवडायचे. त्यामुळे माझ्या घरी आल्यावर या पदार्थांची खास फर्माइश असायची. त्यांना वाचनाची विशेष आवड होती. टीव्हीवर ते बातम्या आणि ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ विशेष आवडीने बघायचे.
त्यांना प्रवासाची आवड होती. नवनवीन लोकांना भेटणे त्यांना विशेष आवडायचे. ते म्हणायचे, की यातूनच खूप शिकायला मिळते.ते खूप प्रेमळ आणि सुस्वभावी होते. नेहमी शांतपणे बोलत असत.
पिलाभईंनी 71 वर्षे संघाचे काम बघितले. ते एक समर्पित कार्यकर्ता होते. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता, संघटनकौशल्य, समर्पित भावनेने काम करणे, प्रखर राष्ट्रभक्ती आणि स्वदेशीचे पुरस्कर्ते हे त्यांचे गुण होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पहिले संघटन मंत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय निरीक्षक अशा अनेक जबाबदार्या त्यांनी पार पाडल्या. परंतु या ठिकाणी पोहोचायला ते एक अतिशय संघर्षमय जीवन जगले.
ते कधीही परिवारवादी नव्हते. त्यांच्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम असे. परिवारातील लोकांना ते नेहमी सांगत की स्वकर्तृत्वावर पुढे जा. आपले राजकीय वजन वापरून नातेवाइकांचा आर्थिक फायदा होईल असे त्यांचे कधीही वर्तन नव्हते. परिवारवादाविषयी त्यांना राग असे. राष्ट्रवाद त्यांच्या नसानसात भिनला होता. परंतु गरजू लोकांना ते नेहमीच मदत करायचे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमुळे अनेक नेत्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात पिलाभईंच्या पुढाकाराने झाली. परंतु स्वत:विषयी त्यांनी कधीही मोठेपणा दाखवला नाही. ते गेल्यावर अनेक कार्यकर्ते, संबंधित लोक मला भेटून त्यांनी केलेल्या मदतीबद्दल सांगतात. परंतु त्या समाजकार्याचा, स्वत:च्या मोठेपणाचा उल्लेखही पिलाभई कधी करत नसत. पिलाभई आम्हा कुटुंबीयांना वेळ देत नाहीत म्हणून आमची तक्रार असायची, पण आता ते गेल्यावर कळले की संपूर्ण संघटनाच त्यांचे कुटुंब होते.
सर्व राजकीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी, तसेच सर्व नागरिकांनी केलेल्या सांत्वनाबद्दल मी कुटुंबीयांतर्फे त्यांचे आभार मानते.
9890034714