संघशाखेचा सर्वस्पर्शी उपक्रम

04 Aug 2023 11:57:22
संघ म्हणजे शाखा आणि शाखा म्हणजे उपक्रम, ही कार्यपद्धती गेल्या 98 वर्षांपासून व्यवहारात आहे. एक संघशाखा आपल्या परिसरात सातत्याने वेगवेगळे उपक्रम करून समाजप्रबोधन आणि समाजसेवा करत असते. नाशिक येथील गोदावरी शाखेने नुकताच एक उपक्रम केला, त्याचा हा वृतान्त.
 

nashik
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल आता शताब्दीच्या दिशेने सुरू असून सर्व समाजगटांमध्ये संघाचा विचार पोहोचवण्यासाठी संघ योजना करत आहे. आगामी दोन वर्षांत संघकाम आणि संघविचार सर्वदूर पोहोचलेला असेल. या कामाचा आत्मा आहे संवाद आणि संपर्क. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या अवाढव्य संघटनेने निश्चित केलेली योजना यशस्वी कशी होते? असा प्रश्न अनेक व्यक्तींना पडत असतो. संघाची कोणतीही योजना यशस्वी होते संघशाखेमुळे आणि शाखेतील स्वयंसेवकांमुळे. संघाबद्दल नेहमी म्हटले जाते - ‘संघ काही करणार नाही, स्वयंसेवक कोणताही विषय सोडणार नाहीत’ - म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम करेल आणि संघस्वयंसेवक स्वयंप्रेरणेने समाजाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी काम करेल, मग ती आवश्यकता प्रबोधनात्मक उपक्रमाची असो अगर रचनात्मक कामाची.
 
 
सध्या समान नागरी कायदा या विषयावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. समान नागरी कायदा ही काळाची गरज आहे असे म्हणणारा गट आपल्या समाजात आहे आणि समान नागरी कायदा लागू झाला तर आमचे मूलभूत हक्क आणि अधिकार यांवर बंधने येतील, आम्हाला मिळत असलेले विशेष अधिकार समाप्त होतील असे म्हणणाराही एक गट समाजात आहे.
 
 
समाजमाध्यमांवर थोडा फेरफटका मारला, तर आगामी काळात लागू होणार्‍या समान नागरी कायद्याविषयी कसा गदारोळ सुरू आहे, हे लक्षात येते.
 
 
nashik
 
या पार्श्वभूमीवर नाशिक येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गोदावरी शाखेने एक उपक्रम केला. येऊ घातलेला समान नागरी कायदा आणि त्याची पार्श्वभूमी समजावून सांगणारा, समान नागरी कायद्याचा परिणाम कोणत्या घटकांवर होणार आहे हे अधोरेखित करणारा प्रबोधनात्मक उपक्रम करण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी 29 जुलै, शनिवार हा दिवस नक्की केला.
 
 
संघशाखेचा कार्यक्रम म्हणजे त्या शाखेचे स्वयंसेवक, त्याचे परिवारजन आणि परिसरातील समाजहितैषी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये होणारा कार्यक्रम होय. मात्र नाशिकच्या गोदावरी शाखेच्या स्वयंसेवक बंधूंनी या रूढ पद्धतीला छेद दिला आणि संघस्थानाबाहेर कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी विश्वास लॉन हे स्थान निश्चित केले. विश्वास लॉनचे मालक विश्वास ठाकूर राजकीय क्षेत्रात कार्यरत असून शरद पवारांचा विचार मानणारे आहेत. संघस्वयंसेवक त्यांना भेटले, विषय सांगून कार्यक्रमामागील भूमिका समजावून सांगितली. या कार्यक्रमासाठी त्यांनी अन्य कार्यक्रम रद्द करून लॉन संघस्वयंसेवकांना उपलब्ध करून दिले. पण केवळ स्थान निश्चित झाले म्हणजे कार्यक्रम पार पडतो असे नाही. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जाणकार श्रोते आवश्यक असतात. त्यासाठीही गोदावरी शाखेच्या स्वयंसेवक बंधूंनी योग्य रचना केली होती.
 
 
nashik
 
संघाच्या कार्यक्रमाला संघस्वयंसेवक उपस्थित राहणार हे स्वाभाविकच असते. पण त्यापलीकडे जाऊन समाजातील विविध क्षेत्रांतील कार्यरत व्यक्ती या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित राहाव्या, यासाठी प्रयत्न सुरू झाले. वकील, कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थी, कायदा महाविद्यालयातील प्राध्यापक अशा मंडळींची सूची तयार करून संघशाखेची संपर्क यंत्रणा कार्यरत झाली. कायद्याच्या क्षेत्रात काम करणार्‍या मंडळींनासुद्धा आगामी समान नागरी कायदा कळावा आणि त्यांच्या माध्यमातून या विषयातील गैरसमज दूर व्हावेत, अशी गोदावरी शाखेच्या स्वयंसेवक बंधूंची कल्पना होती.
 
 
 
विश्वास लॉनमध्ये झालेल्या या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पद्मश्री रमेश पतंगे होते, तर त्यांच्यासह व्यासपीठावर सहसंचालक डॉ. विजय मालपाठक आणि अ‍ॅड. नचिकेत जोशी उपस्थित होते. सुमारे पावणेतीनशे श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये रमेश पतंगे यांनी समान नागरी कायद्याची पार्श्वभूमी समजावून सांगितली. ते म्हणाले, “समान नागरी कायदा हा विवाह, विवाहविच्छेद, पोटगी इत्यादी गोष्टी, महिलांना समान वारसा हक्क, दत्तक घेण्याचा अधिकार यांना सामावून घेतो. आतापर्यंत पाचशेहून अधिक खटल्यांमध्ये केवळ समान नागरी कायदा नाही म्हणून न्यायालयाला योग्य न्याय करता आला नाही. हा कायदा लवकरात लवकर करावा अशी मागणी सर्वोच्च न्यायालय सातत्याने करत आहे. या विधेयकाला धार्मिक रंग न देता विशेषत: महिलांचे सक्षमीकरण या दृष्टीने समान नागरी कायद्याकडे पाहिले पाहिजे.
 
 
आपल्या देशात समान नागरी कायदा लागू करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असे राज्यघटनेच्या कलम 44मध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. केवळ रूढी-परंपरा यांच्या आधारे राज्य चालू शकत नाही. एक देश एक कायदा असला पाहिजे आणि देशात राज्यघटनेचा कायदा हाच सर्वोच्च असला पाहिजे” असे प्रतिपादन करून मागील 67 वर्षांतील तीन महत्त्वाचे खटले व त्याविषयी सन्माननीय न्यायालयाची मते रमेश पतंगे यांनी मांडली. काळानुसार त्यात योग्य ते बदल करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य आहे. आज या प्रस्तावित कायद्याचा आधार घेऊन समाजात तेढ निर्माण होत आहे. त्यासाठी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. त्याला काहीच आधार नसून समान नागरी कायदा ही काळाची गरज आहे, म्हणून आपण अफवांचे बळी होता कामा नये.
 
 
गोदावरी शाखेने आयोजित केलेला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी युवराज वाईकर, सिद्धार्थ रहाणे, कैलास देसले, मृण्मय जोशी या संघबंधूंनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0