आंबेडकर पर्यटन -संकल्पना आणि संस्कृती

आंबेडकर पर्यटन संकल्पना आणि संस्कृती

विवेक मराठी    04-Aug-2023
Total Views |
@डॉ. नागार्जुन रगडे
 
आंबेडकर पर्यटन म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित ठिकाणांना आणि ऐतिहासिक घटनांचे वर्णन करणार्‍या स्थळांना भेट देणे होय. आंबेडकरांचा वारसा एक अद्वितीय सांस्कृतिक वारसा म्हणून विकसित होत आहे, जो आता भारतातील आणि परदेशातील अमूर्त वारशाचा भाग आहे. हा उपक्रम आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये डॉ. आंबेडकरांचे जीवन, तत्त्वज्ञान आणि योगदान समजावून देेण्यास नक्कीच साहाय्यभूत ठरेल.

Dr. Ambedkar National Memorial
 
जागतिक संस्कृतीत आपल्या भारत देशाच्या संस्कृतीला खूप महत्त्व आहे. प्राचीन काळापासून अखंड भारतात ‘देशाटन’, ‘तीर्थाटन’ आणि ’पर्यटन’ या पारंपरिक पर्यटन पद्धतींचे अनुसरण केले जात आहे. ’वसुधैव कुटुंबकम्’ असा विश्वास असलेले आपले भारतीय तत्त्वज्ञान आणि तैत्तिरीय उपनिषदामध्ये नमूद केलेली ‘अतिथी देवो भव’ ही संकल्पना, यातून भारतीय परंपरेत आदरातिथ्याची संकल्पना किती खोलवर रुजली आहे, हे स्पष्ट होते. या विचारसरणीने भारताला एक सांस्कृतिक पर्यटन स्थळ बनवले. प्राचीन काळापासून आपल्याकडे सांस्कृतिक आणि तीर्थक्षेत्र पर्यटन आहे - उदा., कुंभमेळा आणि बारा ज्योतिर्लिंग मंदिरे, 51 शक्तिपीठे, चार धाम आणि हिंदू धर्मातील इतर धार्मिक स्थळे, त्याचप्रमाणे तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाण सुत्तमध्ये नमूद केल्याप्रमाणे बौद्ध लोक धम्म यत्ता करतात - म्हणजे बुद्धाच्या जीवनाशी संबंधित पवित्र स्थळांची यात्रा, त्याचप्रमाणे जगभरातील इतर धर्मीयदेखील तीर्थयात्रा करतात.
 
 
आधुनिक काळात पर्यटन हे विरंगुळ्याच्या आणि आनंदाच्या उद्देशाने केले जाते. त्यामुळेच अलीकडच्या काळात पर्यटनाचे नवनवीन प्रकार उदयास येत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने ‘एक सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटना’ अशी पर्यटनाची व्याख्या केली आहे. या व्याख्येनुसार, पर्यटन म्हणजे लोक त्यांच्या नेहमीच्या वातावरणाच्या बाहेर - इतर देशात किंवा पर्यटन स्थळी वैयक्तिक किंवा व्यवसायाच्या उद्देशाने जातात. सांस्कृतिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, साहसी पर्यटन, समुद्रकिनारा पर्यटन, शाश्वत पर्यटन, इको-टूरिझम, फार्म टूरिझम, ग्रामीण पर्यटन हे आणि असे पर्यटनाचे बरेच विविध प्रकार आहेत. अलीकडे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्याशी निगडित स्थळांवर आधारित पर्यटनाचा एक नवीन प्रकार उदयास आला आहे. आंबेडकर पर्यटन हा त्यातलाच एक पर्याय.
 
 
पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. राजेश रगडे यांनी आंबेडकर पर्यटन ही अभिनव संकल्पना मांडली. डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित आणि ऐतिहासिक घटनांचे चित्रण करणार्‍या स्थळांना भेट देणे असे त्याच्या स्वरूपाविषयी म्हणता येईल. ही संकल्पना डॉ. रगडे यांच्या 2012मध्ये केलेल्या संशोधन कार्याचा परिणाम होता, ज्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली.
 

Dr. Ambedkar National Memorial 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व
 
 
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. ते विसाव्या शतकातील सर्वात महान विचारवंत, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाला खूप महत्त्व आणि सन्मान आहे. भारतात 14 केंद्रीय आणि राज्य विद्यापीठे, 134 महाविद्यालये, 579 शाळा, 312 नोंदणीकृत ग्रंथालये, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ, 4 रेल्वे/मेट्रो स्टेशन, 2 जिल्हे, शहरे, गावे, एक हजाराहून अधिक शहरांचे चौक, मंडळे आणि रस्ते, 12 भाषांमधील 5 चित्रपट, 4 टीव्ही मालिका, 9 महानाट्य (मेगा स्टेज प्ले/नाटक), 6 सरकारी योजना, 37 चरित्रे, 26 पुरस्कार (13 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आणि 13 राज्यस्तरीय) डॉ. आंबेडकरांच्या नावावर आहेत आणि जवळजवळ सर्व विद्यापीठांमध्ये आंबेडकर स्टडीज चेअर आणि संशोधन केंद्र आहेत.
 
 
डॉ. आंबेडकर जयंतीला भारतात सार्वजनिक सुट्टी असते आणि हा दिवस ज्ञान दिन, समता दिवस, जल दिन आणि कायदा दिवस म्हणून केला जातो. बर्नाबी, कॅनडातील शहरदेखील डॉ. बी.आर. आंबेडकर समानता दिन साजरा करते आणि त्यांच्या आयुष्यातील इतर महत्त्वपूर्ण दिवस संविधान दिन, विद्यार्थी दिन म्हणूनही साजरे होतात.
 
 
 
डॉ. रगडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक महान विद्वान, विचारवंत, राज्यकार, समाज क्रांतिकारक, समाजसुधारक, बुद्धिवादी, विपुल लेखक, उत्कट वाचक, वृत्तपत्रांचे संपादक, संघटक, स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, न्यायाचा कैवारी, पददलित वर्गाचा मुक्तिदाता, शोषित जनतेचा नायक, वंचित लोकांचे तारणहार, सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून अस्पृश्यांची मुक्तता करणारा, शिक्षणतज्ज्ञ, राष्ट्रवादी, तर्कशास्त्रज्ञ, प्रतीकशास्त्रज्ञ, मानवतेचे महान मुक्तिदाता, कल्याण मित्त अर्थात थोर मित्र आणि तत्त्ववेत्ता, जगातील सर्वात प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ, एक विद्वान प्राध्यापक, एक तेजस्वी वकील, इतिहासकार, सामाजिक शास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, आंदोलक, भारताचे सर्वात महान राजकीय नेते, भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार अशा विशेषणांनी वर्णन केले आहे. शिवाय डॉ. आंबेडकर यांना भारतरत्न - भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 1990मध्ये मरणोत्तर प्रदान करण्यात आला. परंतु डॉ. आंबेडकर हे केवळ भारतापुरते मर्यादित राहू नयेत, ते खरे तर विश्वरत्न आहेत अशी डॉ. रगडे यांची भावना आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात म्हटले होते की, “डॉ. आंबेडकर एक उच्च क्षमतेचे, जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व आहे. दुर्दैवाने त्यांना एकाच समाजापुरते बंदिस्त करण्यात आले आहे.” त्याच धर्तीवर डॉ. आंबेडकरांच्या जीवनाची आणि कार्याची जगाला ओळख करून देणे हा डॉ. रगडे यांच्या संशोधनाचा उद्देश होता. त्यातूनच आंबेडकर पर्यटन ही संकल्पना पुढे आली.
 
 
आंबेडकर पर्यटनाची संकल्पना
 
 
व्यक्तिमत्त्वावर आधारित पर्यटन हा पर्यटनाचा एक प्रकार आहे. समाजावर प्रभाव पाडणारे थोर संत, तत्त्वज्ञ, लेखक आणि धर्माचे किंवा धार्मिक तत्त्वज्ञानाचे संस्थापक, उदाहरणार्थ गौतम बुद्ध, महावीर किंवा शीख धर्माचे गुरू इत्यादी व्यक्ती जे त्यांच्या अनुयायांसाठी आदरणीय आहेत, त्यांच्या जीवनाशी निगडित अशी ठिकाणे धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित केली जातात. कालांतराने त्यांची मते, कल्पना, विचार, तत्त्वज्ञान, आविष्कार, लेखन हे अप्रत्यक्षपणे स्थानिक संस्कृतीचा अविभाज्य भाग बनतात आणि त्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित वास्तू पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र ठरतात.
 
 
डॉ. राजेश रगडे यांनी 2014मध्ये आंबेडकर पर्यटन ही संकल्पना म्हणून मांडली. आंबेडकर पर्यटन म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित ठिकाणांना आणि ऐतिहासिक घटनांचे वर्णन करणार्‍या स्थळांना भेट देणे. युनेस्कोच्या मते, अमूर्त सांस्कृतिक वारशात मौखिक परंपरा, लोककला (परफॉर्मिंग आर्ट्स), सामाजिक प्रथा, विधी, उत्सवाचे कार्यक्रम, ज्ञान आणि प्रथा यांचा समावेश होतो. डॉ. बी.आर. आंबेडकरांचा वारसा एक अद्वितीय सांस्कृतिक वारसा म्हणून विकसित झाला आहे, जो आता भारतातील आणि परदेशातील अमूर्त वारशाचा भाग आहे, ज्याचे वर्गीकरण असे आहे -
सण आणि स्मरणीय कार्यक्रम - आंबेडकर जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण (पुण्यतिथी) हे पवित्र दिवस म्हणून पाळले जातात. या प्रसंगी शांती पदयात्रा, रॅली, मिरवणुका, सार्वजनिक व्याख्याने इत्यादींचे आयोजन केले जाते.
 
 
परफॉर्मिंग आर्ट्स - डॉ. आंबेडकरांच्या जीवनातून प्रेरित होऊन आंबेडकरी संगीत, भीमगीत, जलसा आणि पाळणा गाणी यांचा सराव केला जातो. नृत्य, नाटक आणि दलित थिएटर, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि माहितीपट.
 
 
ज्ञान आणि कार्यपद्धती - डॉ. आंबेडकर यांचे लेखन आणि भाषणे त्यांच्या महापरिनिर्वाणनंतर 22 खंडांमध्ये प्रकाशित होत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या विचारांवर आणि जीवनावर हजारो पुस्तके आणि लाखो लेख लिहिले गेले आहेत. अगदी छायाचित्रे, चित्रे, पोस्टर्स, आंबेडकर कॅल्मॅनॅक्स आणि कॅलेंडरदेखील प्रकाशित केली जातात.
 
 
सामाजिक प्रथा - अनुयायी विविध मार्गांनी त्यांना अभिवादन करतात - उदा., त्यांच्या पुतळ्यांची पूजा करणे, विशिष्ट दिवशी त्यांच्या जीवनाशी संबंधित ठिकाणांना भेट देणे. हे समाजाच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचे आणि परंपरांचे गैर-भौतिक प्रकटीकरण आहे.
 
 
आंबेडकर पर्यटनाचा विकास
 
 
11 ऑक्टोबर 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनाशी संबंधित स्थळांना ’पंच तीर्थ’ म्हणून घोषित केले - घराण्याचे गाव आंबवडे, मध्य प्रदेशातील त्यांचे जन्मस्थान महू, जेथे ते अभ्यासासाठी राहिले होते ते लंडनमधील घर (10, किंग हेन्री रोड), मुंबईतील चैत्यभूमीजवळ इंदू मिल, तसेच दिल्लीतील 26 अलीपूर रोड येथील त्यांचे निवासस्थान येथे जागतिक दर्जाची स्मारके विकसित केली जात आहेत. ही स्थळे अधिकृतपणे पर्यटन स्थळे आहेत. 2015मध्ये जपानमधील कोयासन विद्यापीठात डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. आंबेडकर पर्यटन सर्किटवर समानता एक्स्प्रेस नावाची विशेष आंबेडकर पर्यटन ट्रेन सुरू करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पर्यटन प्रशासन विभागातर्फे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. आंबेडकर पर्यटन संघटित स्वरूपात विकसित करण्यासाठी, तसेच आंबेडकर पर्यटनाला चालना देण्यासाठी डॉ. रगडे आणि डॉ. माधुरी सावंत व्याख्याने, ट्रॅव्हल एजंट आणि टूर ऑपरेटर यांना मार्गदर्शन करणे, देशातील पहिल्या आंबेडकर हेरिटेज वॉकचे आयोजन करणे आदी उपक्रमांद्वारे जागृती करत आहेत.
 
 
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (UGC-NET) पर्यटन प्रशासन आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमात 2018पासून आंबेडकर पर्यटनाचा समावेश करण्यात आला आहे. 2021मध्ये डॉ. राजेश रगडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे आंबेडकर पर्यटन या विषयातील देशातील पहिला प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला.
 
 
’आंबेडकर पर्यटन’ या शब्दाला आणि संकल्पनेला जागतिक मान्यता मिळाली आहे आणि एन्सायक्लोपीडिया ऑफ टूरिझम मॅनेजमेंट अँड मार्केटिंगमध्ये ती संकल्पना समाविष्ट करण्यात आली आहे (ऑगस्ट 2022मध्ये एल्गार पब्लिशर्स, लंडनने प्रकाशित केले आहे) जे 1250 नोंदी, 20 लाख शब्द, जगभरातील 4 खंडांमध्ये 80 देशांतील 1500 लेखकांनी योगदान दिलेला पर्यटनाचा पहिला विश्वकोश आहे.
 
 
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी संबंधित पंचतीर्थ आणि इतर स्थळांचा प्रचार आणि विकास करण्यात खूप रस आणि पुढाकार घेतला असून हा उपक्रम आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये डॉ. आंबेडकरांचे जीवन, तत्त्वज्ञान आणि योगदान समजावून देेण्यास नक्कीच साहाय्यभूत ठरेल.
 
लेखक अर्थशास्त्र आणि पर्यटन व्यवस्थापन या विषयातील अभ्यासक आहेत.