@अप्पासाहेब हत्ताळे
समाजातील विकृत शक्ती राष्ट्रीय एकतेला बाधा पोहोचविण्यासाठी धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय षड्यंत्र निर्माण करीत आहेत. राष्ट्रैक्य टिकून राहण्यासाठी समाजातील राष्ट्रवादी विचाराच्या जागरूक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू वीरशैव लिंगायत मंच’ स्थापन केला. त्या अंतर्गत संघटितपणे जनजागृतीसह समाजाचे प्रश्न सरकारदरबारी मांडण्यास सुरुवात केली आहे.
कर्नाटकातील सत्तांतरानंतर पुन्हा स्वतंत्र लिंगायत धर्माची हाक दिली जात आहे. पाच वर्षांपूर्वी राजकीय फटका बसल्यानंतर गाडले गेलेले ‘भूत’ पुन्हा वीरशैव लिंगायत समाजाच्या मानगुटीवर बसविण्याचे कारस्थान रचले जात आहे. तेव्हा राष्ट्रवादी विचारांनी प्रेरित समाजबांधवांनी केलेल्या विरोधानंतर ‘मौन’ झालेले स्वतंत्र लिंगायत धर्मसमर्थक कर्नाटकातील सत्तांतरानंतर पुन्हा भूछत्राप्रमाणे अवतीर्ण झाले, याचा सरळ अर्थ त्यांना काँग्रेसची राजकीय कुमक आहे, असाच होतो. राष्ट्रीय एकतेलाच बाधा पोहोचविणार्या या धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय षड्यंत्राविरोधात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली वीरशैव लिंगायत समाजातील राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी ‘हिंदू वीरशैव लिंगायत मंच‘ या नावाने संघटितपणे जनजागृती चालविली आहे. लवकरच त्याचे दृश्य परिणाम दिसणार असून त्यातून समाजजागृतीला मोठी चालना मिळणार आहे.
महात्मा बसवण्णांसह शिवशरण हे संस्कृतविरोधी होते, त्यांनी वेद नाकारला, इतकेच नव्हे, तर वीरशैव आणि लिंगायत वेगवेगळे आहेत, लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, या विचाराला प्रा. एम.एम. कलबुर्गी, चंद्रशेखर पाटील आदी काँग्रेसपोषित तथाकथित पुरोगामी विचारवंत आणि स्वार्थी राजकारणी यांनी गेल्या काही वर्षांत जाणीवपूर्वक खतपाणी घातले, आताही घातले जात आहे. त्यासाठी बसवण्णांसह शिवशरणांनी रचलेल्या वचन साहित्याचा आधार देत आहेत. देशात सातव्या शतकापासून विविध प्रांतांत वेगवेगळ्या भक्तिपंथांच्या चळवळी निर्माण झाल्या, तशी बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांच्या नेतृत्वाखाली शरण चळवळ निर्माण झाली. शिवशरणांनी वचन साहित्याची निर्मिती केली. त्यामागे केवळ सामाजिक नवजागृतीच नव्हे, तर भक्ती, आध्यात्मिक प्रेरणाही होती. वचन साहित्याच्या निर्मितीमागचा उद्देश स्वत: चेन्नबसवण्णा यांनी स्पष्ट केला आहे. ‘मानवी मनाची मलीनता दूर करून त्यांच्या हृदयात आत्मज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी वचन नावाच्या ज्योतीची निर्मिती’ केल्याचे म्हटले आहे.
पाताळातील शुद्ध जल काढता येईल का,
दोराविना अथवा सोपानांच्या आधाराविना?
शब्दसोपान बांधुनी चालविले शरणांनी,
मर्त्य मानवाच्या मनाची मलीनता जावी म्हणून,
गीतबोलरूपी ज्योती प्रकाशित करून दिली,
कूडल चेन्नसंगय्याच्या शरणांनी.
तत्कालीन हिंदू समाजाला एकसंध, एकजिनसी बनविण्यासाठी बसवण्णांनी पुरातन वीरशैव मताचे पुनरुज्जीवन, उपनिषदकालीन मूल्यांची पुन:स्थापना केली. मात्र, तथाकथित पुरोगामी विचारवंतांनी काही वेदविषयक वचनांना धरून शिवशरणांना वेदविरोधी ठरविण्याचा खटाटोप चालविला आहे. केवळ साहित्याला धरून भक्ती, अध्यात्म याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. सर्वच शिवशरण ‘भक्तिभंडारी’ असा महात्मा बसवण्णांचा गौरव करतात, तर अध्यात्म म्हणजे ईश्वराचा मार्ग हा एकीकरणासाठी आहे, विभाजनासाठी नव्हे! अध्यात्मात विरोध नाही. बसवण्णांची केवळ पाच वचने वरवरून वेदविरोधी वाटतील अशी, तर एक वचन वेद समर्थनात आहे, तर अल्लमप्रभूंचे एक वचन वेदविषयक आहे. त्या एकाच वचनाच्या आधारे त्यांना वेदविरोधी ठरविण्याचा प्रयत्न सुरू आहे. अक्कमहादेवी आजच्या विचारवंतांनी निर्माण केलेल्या या गोंधळात कुठे दिसत नाहीत, त्यांचे ‘लोक’च वेगळे! महात्मा बसवण्णांच्या वेदविरोधी म्हटल्या जाणार्या वचनांवर स्वतंत्र धर्म आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खूप मंथन झाले आहे. आता आपण अन्य शिवशरणांची काही वचने पाहू या. अल्लमप्रभू म्हणतात,
वेद म्हणजे वाचायची गोष्ट,
शास्त्र म्हणजे बाजारगप्पा,
पुराण म्हणजे पुंडांच्या गोष्टी,
भक्तितर्क म्हणजे एडक्यांची टक्कर,
भक्ती म्हणजे नैवेद्य दाखवून जेवण्याचा लाभ,
गुहेश्वर म्हणजे मात्र अतीत परतत्त्व.
यात कोठेही वेद, शास्त्रे अथवा पुराणे यांचा विरोध दिसत नाही. वेद ही केवळ वाचण्याची गोष्ट नव्हे तर आचरणात आणायची बाब आहे, शास्त्र ही बाजारातील गप्पा ठरू नये, आपल्या वाईट गोष्टींच्या समर्थनासाठी पुराणाचा वापर नको, दुसर्यांना हानी पोहोचविण्यासाठी, एडक्यांप्रमाणे भांडण्यासाठी तर्क असू नये, भक्ती ही दिखाव्याची, लाभाची गोष्ट ठरू नये, असे म्हटले आहे. जर ते वेदविरोधी असते, तर अनेक वचने लिहायला हवी होती. मात्र, तसे दिसत नाही. तसेच स्वत: वचनेच उपनिषदाचा कंठरवाने उद्घोष करताना दिसतात. ईशावास्य उपनिषदातील खालील श्लोक पाहा -
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ।
- सच्चिदानंदघन परब्रह्म हे परिपूर्ण व अनंत आहे. त्यामुळे त्याच्यापासून निर्माण झालेले हे जगही पूर्ण आहे. म्हणजेच सर्व चराचर सृष्टी परमात्मतत्त्व व्याप्त आहे. अर्थातच प्रत्येक व्यक्तीतील आत्मतत्त्व परमात्मा तत्त्वाचाच अंश आहे, असे म्हटले आहे. या मंत्रात ऋषींनी मांडलेला अत्यंत मूलभूत विचारच अक्कमहादेवी यांनी पुढील वचनात मांडला आहे -
बयलु बयलुचि पेरुनि
बयलु बयलु झाले,
बयलु बयलुचि पिकवुनि
बयलु बयलु झाले,
स्वत: चन्नमल्लिकार्जुन बयलु
ईशावास्य उपनिषदातच म्हटले आहे,
ईशा वास्यमिदं सर्वं यत्किष्च जगत्यां जगत् ।
तेन त्यक्तेन भुञ्जीथा: मा गृध: कस्य स्विद्धनम् ॥
या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, या बदलत्या जगाला व्यापून उरणारा परमेश्वर मात्र शाश्वत आहे, तो सर्वत्र आहे, कोणाचीही संपत्ती मिळविण्याची अभिलाषा धरू नये, असा या श्लोकाचा अर्थ आहे. वचनकार जेडर दासिमय्याही आपल्या वचनात हेच सांगतात,
जमीन तुझे, जल तुझे
फिरुनी घोंघावणारा वारा तुझा
तुझे अन्न खाऊन दुसर्यांची
स्तुती करणारे हीन कुळाचे जाणा रामनाथा ॥
संपूर्ण चराचरात एकच ईश्वर आहे, त्याचे अन्न खाऊन दुसर्यांची स्तुती करणारे हीन आहेत, दुसर्यांच्या वस्तूची अभिलाषा बाळगू नये, असे या वचनात म्हटले आहे. भगवंताच्या दारी सत्य एकच आहे. कोठे भिन्नता आहे? अल्लमप्रभू म्हणतात,
सत्यही नाही, असत्यही नाही
सहजही नाही, असहजही नाही
मी नाही, तू नाही
नाही हे स्वत: नाही
स्वत: गुहेश्वर बयलु ।
या जगात कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तो परमेश्वर एकच सत्य आणि अनंत असल्याचे या वचनात म्हटले आहे. नेति नेति म्हणत उपनिषदांनी हेच सांगितले आहे. वचन साहित्याचा अभ्यास केल्यास या भूमीतील धार्मिक, आध्यात्मिक ऐक्य साधण्यासाठी शिवशरणांनी उपनिषदकालीन मूल्येच समाजमनात रुजविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. उपनिषदातील श्लोकाशी साधर्म्य राखणारी अनेक वचने असून शिवशरणांनी लोकभाषेत वेगळ्या प्रकारे तीच मूल्ये मांडली आहेत. तरीही समाजात फूट पाडून आपली राजकीय पोळी भाजणारे स्वार्थांध राजकारणी व त्यांच्याकडून पोषित तथाकथित बुद्धिमंत वीरशैव लिंगायत हा हिंदू धर्माचाच भाग असल्याचे मानण्यास तयार नाहीत.
लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे, त्यास मान्यता मिळावी, तसेच अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी काही हिंदूविरोधी राजकीय नेते, लिंगायत समाजातील स्वयंघोषित नेते आणि त्यांचे समर्थक गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. मात्र, कायदेशीर बाजू तपासता ही मागणी कदापिही मान्य होणारी नाही. देशाचे रजिस्ट्रार जनरल यांनी तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यालयाला दि. 14 नोव्हेंबर 2013 रोजी लिहिलेले एक पत्र महत्त्वाचे आहे. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे का, याबद्दल तेव्हाच्या गृह मंत्रालयाने रजिस्ट्रार जनरलचे मत मागविले होते. रजिस्ट्रार जनरल यांनी लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. याची दोन प्रमुख कारणे दिली होती. एक म्हणजे लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक घटक आहेत, हे स्पष्ट करताना रजिस्ट्रार जनरल यांनी सरकारच्याच जुन्या निर्णयांचा, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मताचा आणि आधीच्या जनगणनेचा हवाला दिला होता. लिंगायतांना आधी वीरशैव म्हटले जायचे, ती धर्मातीलच एक जात आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला, तर या समाजातील अनुसूचित जातीच्या लोकांना सध्या मिळणार्या आरक्षणापासून वंचित राहावे लागेल, तसेच हिंदू कायद्यात हिंदू म्हणजे कोण याची व्याख्या दिली असून त्यात वीरशैव व लिंगायतांना समाविष्ट केले आहे. वीरशैव लिंगायत समाजात पंचाचार्य आणि विरक्त या दोन्ही पीठांना मानणारे आहेत. त्यांच्यात दुही माजवून केवळ राजकीय स्वार्थ साधणे आणि शैक्षणिक संस्थांचे इमले उभे करणे हाच अंतस्थ हेतू आहेेे, यामागे समाजकल्याणाची कोणतीही भावना नाही. तसेच राष्ट्रीय ऐक्यभावनेलाही तडा जावा, हा डाव असल्याचे समाजातील मोठा वर्ग जाणून आहे. त्यामुळे समाजातील राष्ट्रवादी विचाराच्या जागरूक कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू वीरशैव लिंगायत मंच’ या नावाने संघटितपणे जनजागृतीसह समाजाचे प्रश्न सरकारदरबारी मांडण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी ‘महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ’ स्थापन करून त्यासाठी 50 कोटी निधीचीही तरतूद केली. तसेच सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासनाची स्थापना केली. समाजाचे हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागण्यामागे मंचाची भूमिका निर्णायक राहिली आहे.
लिंगायत समाजातील स्वयंघोषित नेते, त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते धर्ममान्यता राहिली बाजूला, धर्मगुरू, जंगम समाज यांच्यावर टीकाटिप्पणी, शिव्याशाप देणे, प्रसंगी मारहाण करणे इतक्या खालच्या स्तराला पोहोचल्याचे दिसत आहे. त्यामुळे मंचाने संपर्क, साहित्याद्वारे समाजात जागृतीला सुरुवात केली. गुरुपौर्णिमा या उत्सवाला लिंगायत समाजातही विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या निमित्ताने जंगम कृतज्ञता सोहळ्याची सुरुवात केली. हल्ल्यांप्रकरणी संबंधित प्रशासनाला निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. महाराष्ट्रासह कर्नाटकातील मान्यवर समाजबांधवांसह मठाधीशांच्या भेटी घेऊन स्वतंत्र धर्म, अल्पसंख्याक दर्जा मागणी आंदोलनाद्वारे समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र, त्यामुळे समाजाचे होणारे नुकसान यासह धर्मांतर, लव्ह जिहाद या धर्मविरोधी आणि राष्ट्रविघातक कृत्यांविषयी अवगत केले. त्यामुळे मठाधीशांसह समाज जागरूक होत आहे. त्याचे दृश्य रूप म्हणजे दिवाळीपूर्वी सोलापुरात लिंगायत समाजात मानाचे स्थान असलेल्या देशभरातील शिवाचार्यांची परिषद होणार आहे. होटगी मठाच्या शाळेच्या प्रांगणात होणार्या या परिषदेत पाचही जगद्गुरू यावेत, असे मंचाने नियोजन केले आहे. यापैकी काशी, उज्जैनी आणि श्रीशैलम जगद्गुरूंनी मान्यता दिली आहे. केदारनाथ आणि रंभापुरी जगद्गुरूंशी या संदर्भात मंचाने संपर्क केला आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणमधील सुमारे 500 शिवाचार्य या परिषदेस येणार आहेत. त्यासाठी शिवाचार्यांशी संपर्क सुरू आहे. राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्व शिवाचार्यांचे एकमत असावे, या दृष्टीने चर्चेचे स्वरूप राहणार आहे. वसुधैव कुटुम्बकम, संत आणि राष्ट्र, सर्वे संतु निरामया आदी विषयांवर संवाद होणार आहे. केवळ हिंदू वीरशैव लिंगायत समाजाचेच नव्हे, तर व्यक्ती, राष्ट्र व समष्टीचे हितचिंतन होणार आहे. ही परिषद वीरशैव लिंगायत समाजाच्या इतिहासातच परिवर्तन घडविणारी ठरणार आहे.