शिवरायांची सलगी देणे। कैसी असे॥

31 Jul 2023 13:04:28
स्वराज्यकार्यात कामचुकार झाल्याबद्दल कठोरपणे वागणारे शिवाजी महाराज सेवकांच्या निष्ठा तपासून त्यांच्या चुका माफ करीत, त्यांना पुढील कामासाठी प्रोत्साहित करीत. प्रत्येक माणूस जोडताना त्याच्या गुणदोषासकट त्याला स्वीकारून त्याच्यातील निष्ठेला घडवून, त्याच्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून महाराजांनी स्वराज्याचा कार्यभाग साधला.
 
हिंदवी स्वराज्यस्थापना हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य ध्येय होते. मावळ मुलखातील सर्व लोकांना या ध्येयासाठी प्रेरित करणे हा त्यांचा उद्देश होता. तो साध्य करण्यासाठी त्यांनी एकेक माणूस जोडला. मुघल आणि आदिलशहा हे त्यांचे प्रमुख शत्रू होते. परंतु त्यांच्याच पदरी चाकरी करत पिढ्यान्पिढ्या वतनदारी भोगणारे कित्येक मराठी सरदार, वतनदार त्यांच्या मार्गात आडवे येत होते. त्यांना बाजूला सारणे किंवा आपल्या बाजूला वळवणे हे कठीण कर्म! परस्परांतील भाऊबंदकी, वतनाची भांडणे बाजूला ठेवून स्वराज्यासाठी त्यांची एकजूट साधणे हे शिवरायांसमोर खरे आव्हान होते. विविध स्वभावांच्या, कुवतींच्या, आर्थिक आणि सामाजिक स्तरांच्या माणसांच्या निष्ठा समान पातळीवर आणणे हे खूप अवघड काम, पण महाराजांनी ते लीलया साध्य केले. शिवाजी महाराजांच्या कित्येक पत्रांतून माणसांना जोडण्याची त्यांची हातोटी दिसते.
 
 
वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसोबत रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्याची शपथ घेतली. त्यात त्यांच्याबरोबर रोहिडखोर्‍याचे आणि वेलवंडखोर्‍याचे देशपांडे व कुळकर्णी दादाजी नरसप्रभू देशपांडेही होते. ही बातमी विजापूरला कळताच तिथल्या वजिराने दादाजी नरसप्रभूंचे वतन जप्त करण्याच्या आणि गर्दन मारण्याच्या धमकीचे पत्र पाठवले. याबाबत महाराजांनी दि. 17 एप्रिल 1645ला दादाजी नरसप्रभूंना आश्वासनाचे पत्र पाठवले - ‘तुझास मेहरबान वजिराचा विजापुराहून हुकूम आला तो ठाणे सिरवलाहून अमिनानीं तुह्माकडे पाठविला. त्याजवरून तुमचे बाप नरसिबावा हवालदिल जाले. शाहासी बेमानगिरी तुम्ही व आम्ही करीत नाही. श्रीरोहिरेश्वर तुमचे खोरियातील आदि कुलदेव तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्याणी आम्हास यश दिल्हे व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. त्यास बावास हवाल होऊ नये खामाखा सांगावा. तुमचे व आमचे श्रीपासी इनाम जाले ते कायम वज्रप्राय आहे त्यांत अंतर आम्ही व आमचे वंशज लेकराचे लेकरी वतन वगैरे चालविण्याविसी कमतर करणार नाही. हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे याप्रमाणे बावाचे मनाची खातरी करून तुम्ही येणे.’ हिंदवी स्वराज्यनिर्मितीचे काम हे ईश्वरी इच्छेने होणार आहे, त्यामुळे परमेश्वर आपले रक्षण करेल, आपल्याला बळ देईल हा आत्मविश्वास दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना देताना महाराजांनी त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधांचे व त्यांच्या वतनाच्या रक्षणाचे वचन त्यांना दिले आहे.
 
 
vivek
 
कारीच्या कान्होजी जेधे देशमुखांबाबत अशीच एक घटना झाली. कान्होजी जेधे आदिलशहाचे नामवंत वतनदार होते, तसेच शहाजीराजांशी त्यांचे दृढ संबंध होते. शहाजीराजांबरोबर विजापूरला त्यांना कैदही भोगावी लागली होती. त्यातून सुटल्यावर शहाजीराजांच्या सल्ल्याने कान्होजी शिवरायांच्या स्वराज्यकार्यात जोडले गेले. पुढे अफझलखानाने महाराजांकडे असलेल्या जावळीवर चालून जाण्यासाठी कान्होजींना फर्मान पाठवले. तेव्हा शिवरायांनी त्यांना पत्रातून योग्य ती काळजी घेऊन जावे वा जाणे टाळावे असा सल्ला दिला - ‘अभिप्राय कलो आला की खान अलीशान खान अजम येही लिहिले आहे कीं जावलीवरी सुरु केले आहे तरी तुम्ही आपले जमेतीसी सीताब येणे म्हणौन लिहिले आहे. तरी तुमचा व त्यांचा पहिले-पासून घरोबा आहे गेले तरी पाहिजे. आमा खासा अगर पुत्र पाठवावयाचे जाले तरी त्याचा बोलभाक बरवे रिती घेउनु मग जाणे. दगा होये ऐसे न करणे. एक भला माणूस दरम्यान देउनु मग जाणे. तुमचे नजरेसी पडत असिले की खासाच जावे. जरी तुमचे मन बार देत नसिले तरी कौल बोल घेउनु पुत्राबराबरी लोक देउनु पाठविजे हरयेक बाहाणा करुनु तुम्ही राहाणे दोन्ही गोष्टी तुम्हास लिहिल्या आहे ती यात तुम्ही स्याहाणे असा.’ कान्होजी हे खरे तर शिवरायांना वडील. त्यांना जपण्यासाठी महाराजांनी ‘दगा होये ऐसे न करणे’ हा काळजीयुक्त सल्ला दिला. स्वराज्याशी एकनिष्ठ असलेल्या कान्होजी जेध्यांनी पुढे आपल्या मुलाबाळांना घेऊन महाराजांच्या पायावर पाणी सोडत आपल्या वतनाचा स्वराज्यासाठी त्यागही केला.
 
 
कान्होजींसारखी कितीतरी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ माणसे शहाजीराजांनी महाराजांपाशी पाठवली. या प्रत्येक माणसाला महाराजांनी कसे जपले, त्यांच्या योग्यतेचा स्वराज्य कामी उपयोग कसा करून घेतला हे अभ्यासण्यासारखे आहे.
 

vivek 
 
चंद्रराव मोर्‍याकडून महाराजांनी जावळी जिंकून घेतली. मुजोर चंद्ररावांनी ज्या पाटील आणि वतनदारांना छळले, त्यापैकी बिरवाडीच्या माल पाटील आणि बाजी पाटील ह्या वतनदारांनी शिवरायांकडे चंद्ररावाविरोधात तक्रार केली. तेव्हा दहा लोकांसह स्वराज्याची चाकरी करावी ह्या अटींवर त्यांच्या वतनाधिकाराचा कौल दिला - ‘कौलनामा ऐसा जे, बीरवाडी खालील देह चंद्रराऊ खात होते. तेथील अदिकारपण आपलें आहे... साहेबी आपणास हाती धरुनु आपला अदिकारपण आपणास देउनु मिरासीवरी बैसविले पाहिजे. म्हणोउनु मालूम केले. बराये मालुमाती खातिरेस आणौन साहेब तुम्हांवरी मेहेरबान होउनु सदरहू गांवाचें अदिकारपण तुमची मिरास तुम्हास दिधली असे. तुम्ही अदिकारपण खाउनु अदिकारपणाची चाकरी करणे. हकलाजिमा व गांवखंडी व किरकोली हक नि बलुते व बाजे हक खाउनु लेकराचे लेकरी खाणें व जे वस्तीं मसलतीचे काम असेल तोंवरी दाहां लोकांनसी चाकरी करुन दरोज रोजमुरा दरनफरें रुके 46 प्रमाणे साहेबांपासुन घेत जाणे मसलती जालियावरी साहेबाची रजा घेउनु गांवांस जात जाणे. ये बाबे कौल असे.’ माल पाटलांना केवळ त्यांचा अधिकार देऊन महाराज थांबले नाहीत, तर त्यांना योग्य पगारावर चाकरीत ठेवून स्वराज्याच्या कामी आणले.
 
 
फत्तेखानाच्या स्वारीप्रसंगी पुरंदरचे किल्लेदार महादजी सरनाईक यांनी शिवरायांना मोलाची मदत केली. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र नीळकंठराव यांना पाठवलेल्या दि. 9 ऑगस्ट 1654च्या पत्रात महाराज लिहितात, ‘बाबाजी नाईकाबराबरी पत्र पाठविले ते पावोन लिहिलेप्रमाणे सविस्तर वर्तमान कळो आले.... जैसे काही राऊ गोसावी साहेबासी वर्तत होते तैसेच हेहि साहेबासी वर्ततील व साहेब जैसे राऊ गोसावी यांचे चालवीत होते तैसेच याचेहि चालवावे, ऐसा निश्चय करून आपण आलो आसो म्हणऊन बोलिले. तरी जो काही राजेश्री बाबाजी नाइकी तुम्हांसी निश्चय केला तोच आमचा निश्चय असे. जैसे काही राजेश्री राऊ गोसावी याचे चालवीत होतो तैसेच तुमचेहि चालवून एविशई आम्हास श्रीची व राजश्री माहाराज साहेबाच्या पायाची व सौभाग्यवती मातुश्री साहेबांच्या पायांची आण असे व येविषई श्रीचा दवणा पाठविला असे तो घेणे व जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमाने वर्ताल तोपर्यंत आम्हीहि तुम्हासी इमाने वर्तो. तुम्हांपासून इमानांत अंतर पडिलिया आमचा ही इमान नाही.’ वडिलांप्रमाणे इमानाने वागल्यास आमचेही इमान राहील व त्यासाठी जिजाऊसाहेबांची शपथ घेऊन महाराज इथे वचन देतात. थोडक्यात, निष्ठावंताच्या पुढच्या पिढीलाही स्वराज्यकार्यी सामावून घेण्याचा महाराजांचा यत्न आहे.
 
 
जिजाऊसाहेब महाराजांच्या मनात साक्षात ईश्वरस्वरूप होत्या. अनेक पत्रांतून अभय व आश्वासने देताना महाराज जिजाऊसाहेबांची शपथ घेताना दिसतात. 1655-56च्या सुमारास गुंजण मावळचे हैबतराव देशमुख यांना लिहिलेल्या पत्रातही शिवरायांनी असाच उच्चार केला आहे - ‘तुमचे बाबे हुजूर खबर मालूम जालीजे. कित्येक बढीया लोकांनी तुमचे पाठी शक घातला आहे की, तुमची देसमुखी आम्ही घेऊं. तुम्हास वाईट करू. ऐसा शक घातला आहे. व दळवी यांचे कर्ज आहे, त्यास तुम्ही जमान आहां, जमानती झाडे लाउन (तुम्हास) कष्टी करूं ऐसा शक तुमचे पोटी बैसविला आहे. व कितेक तुमचिया घरोबियामधे एक प्रकार वर्तणूक जाली आहे असे कितेक लोक बोलताती. तरी येही गोष्टीच्या निमित्या येऊन कष्टी करितील ऐसा शक बसविला आहे. या तिही गोष्टीकरिता व कितेक गोष्टीकरिता तुम्ही शकजादे आहां. डावाडोल होता. तरी तुम्हास घरिच्या लेकरासारिखे जाणिती आणि तुमचे फार हेही गोष्टीचे वाईंट करावे ऐसे मनावर कधी धरणार नाहीत, हे तुम्हास बित्तिम कळले असावे. कोणेही गोष्टीचा न धरणे. तुमचे हजार गुन्हे माफ आहे ती. तुम्हासी आम्ही काहीही वाईट वर्तणूक करू तरी आम्हास महादेवाची आण असे व आईसाहेबाची आण असे. कोणेही गोष्टीची चिंता न करणे. अवांतरही लोक भेडसावले असतील ते भेटविणे. आमच्या इमानावरी आपली मान ठेउन आम्हापासी येणे. कोणे गोष्टी चिंता न करणे.’ स्वराज्याच्या कार्यात सामील झालेल्या हैबतराव सिलिमकराला महाराज त्यांचे वतन बुडवतील, दगाफटका करतील, अशा गोष्टी सांगून मावळातील काही लोकांनी त्याला फोडण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत महाराजांनी या पत्राद्वारे खुलासा करीत अभय कौलनामा देत त्याची समजूत काढली आहे. हा विश्वास देताना ‘तुम्हास साहेब घरिच्या लेकरासारखे जाणिती’ या वाक्यातील, स्वराज्यकामात तत्पर असलेल्या आपल्या लोकांवरील शिवरायांचे प्रेम दिसून येते.
 
 
शिवरायांपूर्वी सुमारे तीन शतके संपूर्ण हिंदुस्थानभर केवळ इस्लामी सत्ताधीशच राज्य करत होते. इथल्या हिंदू प्रजेला त्यांनी गुलाम केले होते. त्या अंधारयुगातही सोळाव्या शतकात तुंगभद्रेच्या तिरावर विजयनगरचे हिंदू साम्राज्य उदयास आले. देदीप्यमान पराक्रमाने ह्या साम्राज्याने आपले अद्वितीयपण सिद्ध केले होते. परंतु आजूबाजूच्या सर्व इस्लामी सत्ताधीशांनी एकत्र येत विजयनगरचे साम्राज्य चिरडून टाकले. तरीही शिवाजी महाराजांच्या मनात या राज्याविषयी प्रचंड आदर होता. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा वंशज तिरुमलराय याच्या हलाखीच्या कालखंडात शिवरायांनी त्याला मदत केली. अनागोंदीच्या रौप्यपटात महाराज लिहितात, ‘तुमचे वडील राजेश्री श्रीरंग राज्याणी राज्य अन्याक्रांत होऊन परस्थली देवाधीन जाहल्याकडून पुढे तुमचे संवरक्षण व्हावे याबद्दल मातोश्री तिमाजेमा याणी तुम्हास व रामराये उभयेतास व्यंकट कृष्णापा वकील यास समागमे देऊन अम्हापासी पाठविले. त्याजवरून सर्व मार अवगत होऊन तदनुसार तुमचे संवरक्षण- बदल तालुक मार करून दिल्हे. संवस्थान विद्यानगर आतोगुंदी, गंगावती, कपली होसूर, वड, कामनापुर, दरोजी, तमलकोट, बाणरावी अंतणेर लोक समत येणेप्रमाणे स्थल तुम्हास सुकूर्द करून देविले असे. तरी तुम्ही आचंद्रार्क वंशपरंपरेअनभव करून श्री स्वामीचे क्षत्री तुंगभद्रास्थान देवता सेवा धर्म इत्यादि करून घेऊन सुखरूप राहतेस करावे. या धर्मास कोणी अंतर केलिया अपले कुलस्वामी गुरूचे शफत आहे जाणिजे.’ हिंदू धर्माचे संरक्षण आणि संवर्धन हाही स्वराज्यसंस्थापनेचा उद्देश होता. हिंदू धर्माच्या वाढीसाठी विजयनगरच्या सम्राटांनी ज्या ज्या गोष्टी केल्या, त्याचे ऋण शिवाजी महाराज मनात बाळगत होते, असेच यातून प्रतीत होते. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर महाराष्ट्राबाहेरील सर्व हिंदूंना एकत्र केले पाहिजे यासाठी महाराज प्रयत्नशील होते.
 

vivek 
 
बाजीप्रभू देशपांडे हे कृष्णाजी बांदल देशमुखांचे दिवाण. बांदलांच्या विरोधात महाराजांनी केलेल्या मोहिमेत विजय प्राप्त झाल्यावर महाराजांनी बाजीप्रभूंनाही आपल्या बाजूस वळवले. बांदल फौजेला स्वराज्याच्या कामी लावले. बाजीप्रभूंवर महाराजांचा किती विश्वास होता, ते दि. 13 मे 1659च्या पत्रातून दिसते - ‘जासलोडगड हिरडस मावलमधे आहे. तो गड उस पडला होता. याचे नाव मोहनगड ठेउनु किला वसवावा यैसा तह करुनु किल्यास मसुरल अनाम पिलाजी भोसले यासि किले मजकूरचा हवाला देउनु पाठविले असेत. तरी तुम्ही त्यांना व पंचविस लोकास बराबर घेउन मोहनगड गडावरी जाउनु हवालदारास व पंचविसा लोकास किल्यावरी ठेवणे आणि किलाच्या हवालदारास घर व लोकास अलंगा मजबूद करुन देणे. पाउसाने अजार न पावे यैसा करुन देणे. यैसे हवालदारास घर व लोकास अलंगा व येऊ भाखळ मुस्तेद करुन देणेचे तुम्ही सदरहुप्रमाणे काम विलेवार लाउनु द्याल म्हणउनु साहेबास भरवसा आहे. बाबद्दल तुम्हास लिहिले असे तरी सदरहू लिहिलेप्रमाणे किला मजबूद करुन देणे मग तुम्ही किल्याखाले उतरणे.’ मोहनगड वसवून तेथील हवालदार व इतर लोकांना मजबूत घरे बांधण्याची जबाबदारी शिवरायांनी बाजीप्रभूंवर टाकली आणि ही जबाबदारी ते पूर्ण करतील हा विश्वासही या पत्राद्वारे महाराज व्यक्त करतात. बांदल मोहिमेत शिवरायांसमोर उभे ठाकणारे बाजीप्रभू त्यांच्यासाठी मोहनगड वसवतात आणि शेवटी पावनखिंडीत प्राण्यांची आहुती देतात, हा निष्ठेचा प्रवास महाराजांची सलगी कशी होती याचा परिचय करून देतो.
 
 
 
दि. 2 सप्टेंबर 1660च्या कान्होजी जेध्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांच्या आजाराबाबत शिवराय किती आपुलकीने लिहितात, पाहा - ‘तुम्ही कागद पाठविला. तेथे समाचार तपसीलवार लिहिला, लिहिले प्रमाणेकलो आले. दिसाच 15/20 वेग होताती व रात्रीचेही तैसेच. व्यथा बहुत म्हणून लिहिले. तरी आसध (औषध) घेऊन शरीरासी आरोग्य होई ते करणे. उपचाराचे विशी आलस न करणे. ईश्वराचे कृपेकरून बरेच होईल. व तुम्ही लिहिले की आपले मूल साहा जन व देशमुखी साहेबाच्या पायापासी आहे. याचा सांभाल केला पाहिजे म्हणौन लिहिले. तरी आता नवे लिहिणे काय लागले. पहिलेच पासून तुम्हा आम्हात घरोबा आहे. जैसा सांभाल करून ये तैसा साभाल करू. मूल व स्वार साहेबाच्या पायापासी वेथेकरता पाठविता न येती म्हणौन लिहिले तरी वेथा बरी जलियावरी पाठविणे. व्यथा बरी होय तोवर आपल्याजवळ असो देणे. वेथा बरी होये ते करणे.’ अमांशाने आजारी असलेल्या कान्होजींनी जिवाची आशाच सोडली होती. आपल्यानंतर आपल्या मुलांचे काय होईल, या काळजीपोटी त्यांनी महाराजांना पत्र पाठवले. आपल्या लोकांबाबत महाराजांच्या काळजात किती ओलावा होता, हेच इथे शब्दाशब्दातून व्यक्त होते.
 
 
 
विश्वासाने मिळवलेल्या लोकांवर महाराज पूर्ण जबाबदारी टाकत आणि ती जबाबदारी त्यांच्याकडून पूर्ण होईल याची त्यांना खात्रीही होती. मोरगाव देवस्थानच्या महादोबा देसाई यांनी मोरोपंत पिंगळ्यांच्या वतनविषयक निवड्याबाबत महाराजांकडे तक्रार केली. मे 1662च्या मोरेश्वर गोसाव्यांना लिहिलेल्या पत्रात महाराज स्पष्ट कळवतात की, ‘... राजश्री मोरोपंत प्रधान यासी पत्र लिहिले असे. ते मनास आणून जे चालले असेल ते चालवितील अंतर पडणार नाहीं जाणिजे.’ मोरोपंतांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करता तेच योग्य तो निर्णय घेतील, असे महाराजांनी मोरेश्वर गोसाव्याला निक्षून सांगितले.
 
 
स्वराज्यासाठी निष्ठेने काम करणार्‍या माणसांचा योग्य तो मानसन्मान व्हावा, यासाठी शिवाजी महाराज प्रसंगी आक्रमक होत. गोपीनाथपंत बोकील अर्थात पंताजी पंडित यांच्या सरळ वागणुकीबद्दल महाराजांच्या मनात नितांत आदर होता. रायाजी देशमुख याने त्यांचा अपमान केला, तेव्हा महाराजांनी रायाजी देशमुख ह्याला कडक शब्दात तंबी दिली - ‘...राजश्री पंताजी पंडित मौजे अंबोडा आहेत तेथे रायाजी देशमुख बाजाराचे रोजी गेला होता त्यामध्ये व पंडीत माइळेमध्यें कळावती जाली ते वख्ती त्या पोराने कम अकली करून माइळेवर चालोन घेऊन बेअदबी केली. त्याबराबरी तुम्हीहि ती तालीक लिखणउनू साहेबास तहकीक खबर मालूम जाली. तरी हे तुम्हास कैसे सहले समजे आहे. पंडित माइळे बहूत थोर मनुष्य आहेत. साहेबाचे मेहेरबानीत ते बहूत काही आहे. असे असता तुम्ही लहान लोको त्यासी बेअदबी केली तरी साहेबाची रखेशी तरी तुम्हास ठावकीच आहे. याउपरी कुल लोक तुम्ही पंडीत माइळेपासि जाऊनू बजीद होउन् आपला गुन्हा त्यापासून माफ करुनू घेणे. जरी सदरहू लिहिलेप्रमाणे अमल न करा आणि ती तालीक रुजू राहे त्याचा बयेदा वारिला नाही म्हणजे साहेब तमाम रजपुतांचे पायी बेडिया चालुन गळांतोग घालुन किले राजगडावरी ठेउनू धोंडे वाहवितील पैसे बरे रीती समजोनू पंडीत माहिळे साहेबांचे जागी समजोन् आदव बरखूद राखत जाणे.’ नादानपणाने केलेल्या कृत्यासाठी पंताजींची ताबडतोब क्षमा मागा, अन्यथा राजगडावर ठेवून धोंडे वाहायला लावू, अशा शब्दांत महाराज ताकीद देतात.
 
 
स्वराज्याच्या कामी येणार्‍या आपल्या लोकांवर महाराज प्रेम करीत, परंतु इंग्रजांसारख्या परकीय लोकांशी मात्र मैत्रिपूर्ण संबंध ठेवताना कायम सजग आणि स्पष्ट भूमिका मांडत. दि. 25 जानेवारी 1668ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी द्यावी असे पत्र शिवाजी महाराजांना इंग्लंडच्या राजाने पाठवले. त्याला उत्तरादाखल लिहिलेल्या दि. 2 ऑगस्ट 1668च्या पत्रात शिवराय इंग्रजांबरोबर व्यापारासाठी मैत्रीतील आपली भूमिका स्पष्ट करतात. ‘...या सरकारची आणि आमेहरबानाची दोस्ती व्हावी म्हणोन लिहिले ते कलले. तुमचे वकिलानी व्यापाराविसी बोलण्याची चार कलमाची याद दिल्ही. ती पाहून व्यापाराचा हुकूम तुमचे लिहिण्याप्रमाणे दिल्हा आहे आणि चार कलमापैकी दोन कलमे करार केली आहेत. आणि हे पत्र लिहिले आहे तरी दोस्तानी आपल्या कंपनीस ताकीद करावी की व्यापारासिवाय दुसरे कामात सिरू नये. व्यापाराची किराणा बंदरावर या राज्यांतील सावकारास देणे. तो या सरकारचे कारकून व किलेदार याचे विषयी द्यावा आणि जाहाजाचे जंगी सामान व सिपाई लोक या सरकारचे राज्यांत खुषकीवर उतरू नये. मालाच्या व्यापारास येकदाने येणे ते या सरकारचे सरदारचे हुकुमानी यावे नाहीपेक्षा पोतुगी(ज) गोर(काय) याजप्रमाणे दगेबाजी केलियास हा व्यापाराचा हुकूम दिल्हा तो या सरकारातून रद्द करून दोस्ती राहणार नाहीं.’ कंपनीने व्यापाराशिवाय अन्य कोणत्याही कामात लक्ष घालू नये, त्यांचा माल प्रामुख्याने इथल्या व्यापार्‍यांनाच विकावा, खुष्कीच्या मार्गाने स्वराज्याच्या प्रांतात उतरू नये, ब्रिटिशांचे चलन मात्र इथे चालणार नाही या अटींवरच महाराजांनी इंग्लंडच्या राजाला मैत्रीची मान्यता दिली आहे.
 
 
दि. 23 जुलै 1669च्या दत्ताजी केशवजी पिसाळ ह्या वाईच्या देशमुखाला लिहिलेल्या कौलनाम्यात महाराजांनी आदिलशाहीच्या प्रदेशावर स्वार्‍या करून आपापले प्रांत राखा, स्वत:चे हक्क अबाधित ठेवण्यासाठी धडपड केल्यास आम्ही पाठराखण करू, असे अभिवचन दिले आहे. ‘विलायतीस आजार देवइल तैसा देऊन आपले पारपत्य होऊन ये ते करणे’ असे समजावले आहे. दत्ताजीशी मैत्री करून त्याला आदिलशहाविरुद्ध मोहिमेत सामील करावे हाच ह्यामागे मानस आहे.
 
 
आग्र्याच्या सुटकेनंतर प्रवासात विघ्न येऊ नये, म्हणून शिवरायांनी संभाजीराजांना कृष्णाजी विश्वासराव यांच्याकडे मथुरेला ठेवले होते. त्यांनी ही जबाबदारी अत्यंत विश्वासाने पार पाडून शंभूराजांना राजगडावर सुखरूप पोहोचवले. त्या बदल्यात महाराजांनी कृतज्ञतेने कृष्णाजींना बक्षीस दिले. ‘साहेब अगराहून निघालेया उपरि चिरंजीव राजश्री संभाजी राजे यांस राजश्री कृष्णाजी विश्वासराऊ यांचे सांभाळी केलें. मानइले चिरंजीवास सुखरूप किल्ले राजगडास घेऊन आले. मानइलेची मातुश्री आईजी बंधु कासी त्रिमल हेही बरावरी आलिया-बद्दल बकसीस द्यावयाचा तह केला रुपये 50000 रास, 25000 कासी त्रिमल, 25000 मातुश्री आईजी येणेप्रमाणे पाववीत पाववावे.’
 
 
महाराज विश्वास संपादन करणार्‍या प्रत्येकाचा सन्मान करीत. राज्याभिषेकप्रसंगी शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी चिटणीस यांना अष्टप्रधानापैकी कोणतेतरी एक पद घ्यावे असे सांगितले. बाळाजींनी पंतप्रधानपदापेक्षा आपल्याला स्वराजाची चिटणिशी वंशपरंपरेने मिळावी, अशी नम्रपणे विनंती केली. त्या वेळी महाराजांनी बाळाजींना चिटणीशीची सनद दिली. राज्याभिषेकानंतर तिसर्‍या दिवशी - म्हणजे 9 जून 1674लाच ही सनद दिली. ‘तुम्ही स्वामिसेवा निष्ठेने करून श्रमसाहास पुरे केले. राज्यवृद्धीचे काम आला यावरून तुम्हावर कृपाळू होऊन अष्टप्रधानांतील पद द्यावें मनीं धरलें असतां तुम्ही विनंति केली की आपणाकडे चिटणीसीचा दरक चालत आहे. हा अक्षय वतनी वंशपरंपरेनें संनिध व सर्व राज्यांतील चालवावा. कारखानिसि व जमनिसी दोन धंदे राज्यांतील आपल्याकडे दिले ते अक्षय्य असावे. यावरून तसे तुम्हांकडे दिले असे. स्वामीचे वंशींचा कोणीहि अन्यथा करणार नाही. लिहिलेप्रमाणे सदरहू प्रयोजनाचे व्यापाराची सेवा करून पुत्रपौत्रीं अनुभविणे.’
 
 
दख्खन प्रांतात स्वराज्याचा विस्तार करताना शिवाजी महाराजांनी कर्नाटकातील लोकांना आपलेसे केले. बेळगावच्या मुरगुड येथील रुद्रप्पा देसाई ह्याला महाराजांनी भुजवलगड जिंकण्याची मोहीम सांगितली. पण त्याची माणसे तेथे पोहोचण्यापूर्वीच मारली गेली. अपयश आले. पण त्याबाबत बोल न लावता महाराजांनी दि. 11 डिसेंबर 1676ला पुढील कामासाठी प्रोत्साहन देणारे पत्र लिहिले - ‘जे तुमचा मुतालिक चेनपा हुजूर आहे त्याने सांगितलें कीं, रुद्रप्पा स्वामीचे कामावरी येक्षियार होऊन भुजबलगडीचे कामाबदल वडउपर व मोप बराबरी नागणगौडा पाठविले होते. त्यांस वाटेस तोरगलकरांनी जिवें मारिलें. त्याकरितां दिलगिरी वरिली कीं, साहेबकामास अंतर पडिलें म्हणून तरी तुम्ही फिकीर न करणें स्वामीचे सेवेस येक्षियार जाले आहां, साहेबकाम उदंड कराल ऐसे स्वामी समजलें असेती. बहूत कांहीं काम तुमच्याहातें घेऊन तुम्हांस सर्फराज करून पैसा दिलासा असो देणे. साल मजकूर सनसवा सबैना कारणे स्वामी तुमचे परगणियाचा कांहीं खंडणी अगर पैका घेत नाहीं तुम्हांस माफ केलें असे. तुम्ही साहेबांचे तर्फेनें कुली रुजवातीने वर्तणूक करून गनिमाचें लोकांस गोशमाल देणे. कामकडकोली गनिमाचें ठाणे आहे तेंही उठवून तेथे आपले ठाणे वैसे तें करणें व वरकडही जागाजागांचीं ठाणीं गनिमांची उडवून देणे. स्वामीही तुमची हरबाब मदत करिवितील. तुम्ही साहेबकाम चालवीत जाणे. भुजबलगडीची बहुत कांही मदत हरएक बाबेने करून आपले चाकरीचा व रुजुवातीचा व येक्षियारीचा मजुरा करून दाखविणें कीं - स्वामी तुम्हांवरी पुढेही मेहेरबानी करीत तें करणें.’ स्वराज्यकार्यात कामचुकार झाल्याबद्दल कठोरपणे वागणारे शिवाजी महाराज सेवकांच्या निष्ठा तपासून त्यांच्या चुका माफ करीत, त्यांना पुढील कामासाठी प्रोत्साहित करीत, ह्याचेच हे उदाहरण आहे. प्रत्येक माणूस जोडताना त्याच्या गुणदोषासकट त्याला स्वीकारून त्याच्यातील निष्ठेला घडवून, त्याच्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून महाराजांनी स्वराज्याचा कार्यभाग साधला. माणसांना आपलेसे करण्याची त्यांची वृत्ती, निष्ठावंत लोकांवर त्यांनी केलेले प्रेम हे खर्‍या अर्थाने राजकारणात आणि समाजकारणात वावरणार्‍या सर्व लोकांसाठी मापदंड ठरतात, मार्गदर्शन करतात. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती शंभूराजांना लिहिलेल्या पत्रात समर्थ रामदासस्वामी लिहितात -
 
राज्यामध्ये सकळ लोक। सलगी देऊन करावे सेवक।
 
लोकांचे मनामध्यें धाक। उपजोंचि नये॥
 
शिवरायाचे कैसे बोलण। शिवरायाचे कैसे चालणे।
 
शिवरायांची सलगी देणे। कैसी असे॥
 
लेखक इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.
Powered By Sangraha 9.0