‘आम्ही केलेल्या त्यागाची किंमत पुढच्या पिढीला कळेल काय? आपल्या देशाकरिता ते काही करतील काय?’ हा क्रांतिकारक दामोदर चापेकरांनी मृत्युवेदीवर जाताना विचारलेला प्रश्न... या प्रश्नाने टिटवाळ्यातील विक्रांत बापट या तरुणाला प्रेरित केलं आणि आपणही देशाकरिता काहीतरी केलं पाहिजे या विचाराने तो झपाटला. आपल्यासारख्याच सेवाव्रती मित्रांना सोबत घेऊन, प्रदीर्घ संघर्ष करत मांडा गावात एक भव्य हॉस्पिटल उभं केलं. त्याच्या या धडपडीची आणि टिटवाळावासीयांना अविरत सेवा देणार्या श्री महागणपती हॉस्पिटलची ही कहाणी.
बईपासून अगदी काही किलोमीटरवर वसलेलं लोकलच्या टप्प्यातील एक छोटंसं, पण तमाम गणेशभक्तांसाठी श्रद्धास्थान असणारं टिटवाळा हे गाव. नवसाला पावणारा गणपती अशी येथील श्रीमहागणपतीची ख्याती. पूर्वी येथे कण्वमुनींचा आश्रम होता आणि शकुंतलेने दुष्यंताला प्राप्त करून घेण्यासाठी याच गणेशाची पूजा केली होती, असंही म्हटलं जातं. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी या मंदिराची पुन:स्थापना केली होती. अशा या धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी आरोग्यविषयक सेवासुविधांची वानवा होती. दवाखाने होते, पण अद्ययावत आरोग्यसेवा मात्र मिळत नव्हती. त्यामुळे साधासाच काही आजार झाला, तरी उपचारांसाठी थेट कल्याण गाठावं लागे आणि दुर्धर आजार असेल तर थेट के.ई.एम. किंवा मुंबईतील तत्सम मोठ्या रुग्णालयापर्यंत यावं लागे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी, टिटवाळ्यात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ काही स्थानिक तरुणांच्या मनात जागी झाली. त्यांच्या या तळमळीचं, धडपडीचं प्रतीक असणारं श्री महागणपती हॉस्पिटल उभं राहिलं. हे हॉस्पिटल 2012पासून येथील स्थानिकांना आणि आसपासच्या खेड्यापाड्यावरच्या लोकांना आरोग्यसेवा पुरवत आहे.
‘आम्ही केलेल्या त्यागाची किंमत पुढच्या पिढीला कळेल काय? आपल्या देशाकरिता ते काही करतील काय?’ हा प्रश्न क्रांतिकारक दामोदर चापेकरांनी फाशीवर जाताना विचारला होता. त्यांच्या चरित्रात वाचलेल्या या प्रसंगाने टिटवाळ्यातील विक्रांत बापट या तरुणाला प्रेरित केलं आणि आणि आपणही देशाकरिता काहीतरी केलं पाहिजे, या विचाराने तो झपाटला. आपल्यासारख्याच सेवाव्रती मित्रांना सोबत घेऊन, प्रदीर्घ संघर्ष करत मांडा गावात एक भव्य हॉस्पिटल उभं केलं.
क्रिएटिव्ह पॉलिक्लिनिक ते महागणपती हॉस्पिटल
या रुग्णालयाच्या स्थापनेबाबत बापट यांना विचारलं असता ते म्हणाले की, “टिटवाळा गावात हॉस्पिटल व्हावं ही गरज होतीच. माझ्यासाठी मात्र हे सारं या वैयक्तिक अनुभवातून आलेलं होतं आणि त्यामुळे ही जाणीव अधिक प्रखर होती. माझी आई माझ्या लहानपणीच वारली. तिला टीबीचा त्रास होता. त्याच्या उपचारांसाठी डोंबिवलीपर्यंत यावं लागे. दुसरीकडे माझ्या धाकट्या भावाला लहानपणासून हिमोफिलिया हा दुर्धर आजार आहे व त्याच्या उपचारांसाठी आम्हाला केईएमला यावं लागे. त्याला पंधरा पंधरा दिवस रुग्णालयातच उपचारांसाठी ठेवावं लागे आणि ते उपचार खर्चीकही होते. त्यामुळे आपल्या टिटवाळा आणि परिसरातील गावांमधील येथील जनतेसाठी एखादं हॉस्पिटल किंवा अल्पदरातील रुग्णसेवा केंद्र सुरू करता येईल का, असा विचार बराच काळ माझ्या मनात घोळत होता. हीच भावना माझ्या मित्रांच्याही मनात होती. मी आणि किशोर गवाणकर, डॉ. पद्माकर वाघ, विलास पाटील, अजित म्हसाळकर, अभिजित जोशी, आनंद हरकरे यांनी मिळून याच भावनेतून 26 ऑक्टोबर 2000 रोजी ‘क्रिएटिव्ह ग्रूप’ची स्थापना केली.”
विक्रांत बापट हे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात व्यवस्थापन विभागात कार्यरत होते. यापूर्वीही त्यांनी विविध क्षेत्रात काम केलं होतं. हिंदुजामधील पाच वर्षांच्या कार्यकाळात रुग्णालयात कोणकोणते विभाग असतात, कोणकोणत्या चाचण्या होतात, किती प्रकारच्या लॅब्ज असतात याची माहिती त्यांना मिळाली. केमिस्टकडील नोकरी, अकाउंट्स, संगणकीय डेटा एंट्री इत्यादीचा अनुभव, त्यानंतरचा हिंदुजामधील व्यवस्थापनाचा अनुभव या आपल्या अनुभवाचा क्रिएटिव्ह ग्रूपच्या उपक्रमांना नक्की फायदा होईल, असं त्यांना वाटलं. क्लिनिक काढायचं तर जागेचा अभाव होता. पण एका सद्गृहस्थांनी आपला गाळा दिल्यावर या क्रिएटिव्ह ग्रूपने त्या गाळ्यात 28 ऑक्टोबर 2000 रोजी क्रिएटिव्ह पॉलिक्लिनिक सुरू केलं. त्यामुळे ज्या लहानमोठ्या तपासण्यांसाठी, औषधोपचारांसाठी टिटवाळावासीयांना कल्याण वा डोंबिवलीपर्यंत यावं लागायचं, ते सर्व गावातच होऊ लागलं.
या क्लिनिकच्या माध्यमातून वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर्स या क्लिनिकमध्ये येऊ लागले. त्याचप्रमाणे विविध वैद्यकीय शिबिरंदेखील आयोजित केली जाऊ लागली. ईसीजी, नेब्युलायझर, एक्सरे, पॅथॉलॉजी अशा विविध सेवा देणार्या या पॉलिक्लिनिकला प्रतिसादही छान मिळाला. टिटवाळ्यासारख्या गावात सुरू झालेल्या या आरोग्यविषयक अभिनव उपक्रमाची प्रमुख प्रसारमाध्यमांनीही दखल घेतली व या उपक्रमाला मिळणारा प्रतिसादही वाढू लागला. जवळपास 28 डॉक्टरांनी या पॉलिक्लिनिकमध्ये आपली सेवा दिली. त्यातही डॉ. ऋता मराठे (नेत्ररोगतज्ज्ञ), डॉ. अजय सिर्सिकर (त्वचारोगतज्ज्ञ), डॉ. अमोल इटकर (कान-नाक-घसा तज्ज्ञ) आणि डॉ. किरण परांजपे (अस्थिरोगतज्ज्ञ) यांनी आपल्याला दिलेली साथ अनन्यसाधारण होती, असं बापट आवर्जून नमूद करतात. हे पॉलिक्लिनिक सलग यशस्वीपणे सुरू असताना पडद्यामागे मात्र या समूहाची हॉस्पिटल बांधण्याची मनीषा आणि मेहनत सुरूच होती.
श्री महागणपती हॉस्पिटलच्या निर्मितीत अनेकांनी मोलाची मदत केली. याबाबत ते सांगतात की, “सुरुवातीच्या काळात सुयोग नाट्यसंस्थेचे सुधीर भटकाका यांनी मला खूप मदत केली. दोन चॅरिटी शोच्या माध्यमातून बराच निधी उपलब्ध झाला. मार्क्स अँड असोसिएट्सच्या राजेश गोडसे यांनी क्रिएटिव्ह ग्रूपला सर्व प्रकारच्या सरकारी परवानग्या, 12अ, 80जी अशी सर्टिफिकेट आपल्या फर्मच्या माध्यमातून करून दिलं. हिंदुजा रुग्णालयातील अनेक ज्येष्ठ डॉक्टरांनीही खूप पाठबळ दिलं. त्या काळात हिंदुजा रुग्णालयाने विलेपार्ले येथे एक वैद्यकीय शिबिर आयोजित केलं होतं. तिथे हिंदुजाचे सीईओ प्रमोद लेले आले होते. आपणही अशी शिबिरं संस्थेमार्फत टिटवाळ्याला घेतो, आमच्याकडे अशा सुविधांची गरज आहे असं सांगितल्यावर त्यांनी येऊन भेटण्यास सुचवलं. मी माझ्याकडे तयार असलेली सर्व कात्रणं, कॅम्पची माहिती, वर्तमानपत्रातील लेख, सर्व कागदपत्रं यांची फाइल घेऊन त्यांना भेटलो. त्यांनी ती व्यवस्थित पाहिली आणि हॉस्पिटलसाठी आम्हाला मदत करण्याचं कबूल केलं. लेलेसरांच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रथम मेडिकल स्टोअर सुरू केलं. त्यांच्यासारखेच आम्हाला मदत आणि मार्गदर्शन करणारे डॉ. राजेंद्र पाटणकर होते. डोंबिवलीतील प्रमोद दलाल म्हणजेच दलालकाका यांनी आम्हाला आपली जमीन रुग्णालयासाठी देणगी स्वरूपात दिली आणि जागेचा मोठा प्रश्न सुटला. त्याच काळात टिटवाळ्यातील महागणपती मंदिराने पहिल्या टप्प्यात तब्बल एक कोटी रुपयांची व नंतर 25 लाख रुपयांची देणगी हॉस्पिटलला दिली, एलअँडटी फायनान्सचे चेअरमन यशवंत देवस्थळी यांनी व्यक्तिगत स्वरूपात एक कोटी रुपये या हॉस्पिटलसाठी दिले आणि हॉस्पिटलच्या बांधकामाचा मार्ग प्रशस्त झाला. या श्रमांचं मूर्त रूप दि. 24 ऑक्टोबर 2012 रोजी श्री महागणपती हॉस्पिटलच्या रूपात टिटवाळाकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झालं.
सोयीसुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल, तत्पर सेवा
पन्नास खाटांच्या या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी 25 डॉक्टरांची टीम असून परिचारिका, साहाय्यक असा 50 जणांचा कर्मचारीवर्गही कार्यरत आहे. विविध प्रकारच्या तपासण्या (टूडी एको, सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एक्स रे, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या), आयसीयू, ऑपरेशन थिएटर, डायलिसिस सेंटर, अॅम्ब्युलन्स, 24 तास फार्मसी अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. बालरोग, कान-नाक-घसा, युरॉलॉजी, स्त्रीरोग, मधुमेह, हृद्रोग, अस्थिरोग, नेत्रोपचार, दंतोपचार, फिजिओथेरपी, गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, इमर्जन्सी विभाग असे विविध विभाग या रुग्णालयात कार्यरत आहेत. या सर्व विभागांशी संबंधित विविध सर्जरीजदेखील या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. श्री महागणपती हॉस्पिटलमध्ये लवकरच सीटी स्कॅन मशीन घ्यायचं आहे आणि कॅथलॅब विभागही सुरू करायचा आहे. हॉस्पिटल चालवण्याबरोबरच क्रिएटिव्ह ग्रूपच्या माध्यमातून 45 गावांमध्ये वैद्यकीय शिबिरंदेखील घेतली गेली व जनजाती-दुर्गम क्षेत्रातील नागरिकांना त्याचा लाभ झाला. कारण आजही अशा क्षेत्रातील व्यक्तींना हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं हे आव्हानच असतं.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे श्री महागणपती हॉस्पिटलमधील जवळपास 90 टक्के कर्मचारिवर्ग स्थानिक आहे. या हॉस्पिटलने केवळ रुग्णसेवाच दिली असं नव्हे, तर त्याचबरोबरीने मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. हॉस्पिटलमध्ये अशाही काही स्थानिक व्यक्ती कार्यरत आहेत, ज्या क्रिएटिव्ह पॉलिक्लिनिकपासून संस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत. कल्याण सोडून पुढे गेलो, तर वैद्यकीय सेवा मिळणं मुश्कील अशा क्षेत्रात थेट मुरबाडपर्यंतच्या लोकवस्तीला टिटवाळ्यातील मध्यवर्ती ठिकाणचं हे हॉस्पिटल गेली बारा वर्षं अथक सेवा देतंय आणि लाखो नागरिकांना या सेवेचा लाभ मिळाला आहे.
मांडा-टिटवाळ्यासारख्या खेड्यातील एक तरुण आणि त्याच्यासारखेच झपाटलेले साथीदार एक स्वप्न पाहतात, त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अथक परिश्रम घेतात, मदतीचे अनेक आश्वासक हात पुढे येतात आणि उभा राहतो तो श्री महागणपती हॉस्पिटलसारखा महाप्रकल्प.. विक्रांत बापट यांनी ‘समर्पण’ या आपल्या पुस्तकात या सार्या प्रवासाचं हृद्य रेखाटन केलं आहे. क्रिएटिव्ह ग्रूपपासून हॉस्पिटलच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास मुळातून वाचण्यासारखा आहे. त्यामागची तळमळ, असीम मेहनत आणि त्या हॉस्पिटलने सोडवलेला आरोग्यसेवेचा प्रश्न हे सारंच वाचनीय आहे.
आम्ही केलेल्या त्यागाची किंमत पुढच्या पिढीला कळेल काय? आपल्या देशाकरिता ते काही करतील काय? हा दामोदर चापेकरांनी मृत्युवेदीवर जाण्यापूर्वी विचारलेला प्रश्न देशातील आजच्या प्रत्येक युवकाला पडू लागला, तर त्यातून युवाशक्तीला मिळणारी प्रेरणा आणि विधायक कार्यासाठीची ऊर्जा या समाजासाठी वरदान ठरेल.