रसायन घालून घाईघाईने पिकवलेल्या फळांप्रमाणे बाहेरच्या प्रदूषित वातावरणात मुलामुलींच्या इच्छा अकाली पिकत आहेत. त्यापासून संरक्षण देणे हातात नसले, तरी त्यांच्या विचारांचा गाभा सुरक्षित ठेवणे आपल्याला करावे लागेल. मुलांच्या मनातली वाढती असुरक्षितता, अस्थिरता, वाढत्या अपेक्षा यातून येणारा ताण या मार्गाने बाहेर पडतोय का? तो कमी करण्याकरता काय करता येईल? याचा विचार करावा लागेल. एकूणच बंधन न पाळायची वृत्ती, सवय लागली की पुढे स्वीकारलेल्या कायम नात्याचेही बंधन नको वाटले, तर काय नवल? त्यामुळे केवळ कायदा व शिक्षेचा विचार करणे पुरेसे नाही.
पोक्सो कायद्याअंतर्गत फेब्रुवारी 2019मध्ये मुंबई उच्च न्यायालयात एक खटला दाखल झाला होता. एका 17 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याच्या आरोपावरून पंचवीस वर्षे वयाच्या एका आरोपीला अटक झाली होती. पोक्सो कायद्यातील तरतुदीनुसार न्यायालयाने त्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तो अपिलात गेला असता उच्च न्यायालयातील सुनावणीत त्याने सिद्ध केले की त्यांचा निकाह झाला होता व मुस्लीम कायद्यानुसार ती अजाण नाही व हा संबंध परस्पर संमतीने घडला आहे. न्यायालयाने निकाहचे पुरावे, मुलीचा व्हॉट्सअॅपवरील संवाद ग्राह्य मानून आरोपीची निर्दोष सुटका केली. हा निकाल देताना जस्टिस भारती डांगरे यांनी जी टिप्पणी केली, त्यामुळे किशोरवयीन मुलामुलींची लैंगिकता व त्यासंबधीचे कायदे या विषयावरील चर्चेला तोंड फुटले आहे. ‘जगातील अन्य देशांप्रमाणे सहमतीने होणार्या लैंगिक संबंधांचे कायदेशीर वय अठरावरून खाली आणण्याची वेळ भारतात आली आहे’ असे मत त्यांनी व्यक्त केले. पोक्सो कायद्यानुसार सतरा वर्षे आणि तीनशे चौसष्ट दिवस वयाच्या मुलीशी सहमतीने संबंध ठेवल्यावरून वीस वर्षे वयाच्या मुलाला कठोर शिक्षा भोगायला लागू शकते. न्यायालयात दाखल होणार्या बहुतांश केसेसमध्ये किशोरवयीन रोमँटिक रिलेशनशिपकडे गुन्हा म्हणून पहिले जाते. अशा केसेसकरता न्यायालय पोलीस बालकल्याण या यंत्रणांचा प्रचंड वेळ व ऊर्जा खर्च होते. बहुतेक वेळा केसच्या शेवटी मुलगी आपली या संबंधाला सहमती असल्याचे सांगते व सार्या खटाटोपातली हवाच निघून जाते. लैंगिक संबंध हे काही केवळ विवाहाद्वारे घडून येत नाहीत, त्यामुळे विवाहवय व संबंधवय याचे नाते तोडण्याची गरज आहे व समाजाने, न्यायव्यवस्थेने व संसदेने या बाबीची दखल घ्यायला हवी. पूर्णपणे संमतीने झालेल्या कृत्याबद्दल केवळ तो पुरुष आहे म्हणून त्याला सर्वस्वी दोषी मानणे हे योग्य ठरत नाही. पोक्सो कायदा समाजातील वास्तव स्वीकारण्यात कमी पडतो आहे.’ काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेदेखील असेच मत मंडले होते, याकडे लक्ष वेधून त्या म्हणतात की, ‘मुले लैंगिक अत्याचाराला बळी पडू नयेत यात शंकाच नाही, पण अशा कायद्यांमुळे मुलांचा इच्छित व सुरक्षित निवडीचा हक्क आपण हिरावून घेत आहोत. लैंगिक स्वातंत्र्याच्या व्याख्येत इच्छेविरुद्ध लादल्या गेलेल्या संबंधांपासून संरक्षण याबरोबरच सहमतीने संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्यही अंतर्भूत आहे. पोक्सो कायदा मुलांचे लैंगिक शोषणापासून रक्षण करत असला, तरी त्यामुळे किशोरवयीन नाजूक संबंधांचे गुन्हेगारीकरण होत आहे’ असे मत त्यांनी नोंदवले. 1940पासून ते 2012पर्यंत भारतात हे वय 16 असे होते. पोक्सो कायद्याने हे वय अठरावर आणले. जगातील अन्य देशांत हे वय चौदा ते सोळा यादरम्यान आहे. जपानमध्ये तर ते तेरा आहे. पाश्चात्त्य व प्रगत देशांत एकूणच या विषयात खुलेपणा व स्वीकार आहे. पण कायदेशीर मर्यादा कमी असली, तरी बहुतेक सर्व देशांनी वेळोवळी अनेक सुधारणा करून शोषण कसे थांबवता येईल, याचा प्रयत्न केलेला आहे. जपानने तेराव्या वर्षाला कायदेशीर मान्यता दिली असली, तरी तेरा ते सतरा वर्षांच्या मुलामुलींशी अश्लील वर्तन करण्याला कठोर शिक्षेची तरतूद करून त्यांना संभाव्य शोषणापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. लैंगिक संबंधांच्या केसेसमध्ये मुलगाही कुमारवयामध्ये असेल तर कारवाई होत नाही व चर्चाही होत नाही. मात्र पुरुष जर वयाने मोठा, प्रौढ असेल, तर मात्र जपानमध्ये त्याच्यावर गुन्हा तर दाखल होतोच, शिवाय त्याची प्रचंड बदनामी व मानहानी होते. अमेरिका, फ्रान्स अशा देशात या विषयातल्या कायद्यांना ‘रोमिओ ज्युलिएट कायदे’ म्हणून संबोधले जाते व अल्पवयीन मुलामुलींच्या संबंधात जोपर्यंत दोघांच्या वयात फारसे अंतर असत नाही, जबरदस्ती व अन्य इजा दिसत नाही, संबंधांना परस्पर सहमती असते व शोषणाचा भाग नसतो, तोपर्यंत त्याला फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. त्या घटनेकडे भयंकर गुन्हा म्हणून न पाहता थोडे सहानुभूतीने, ‘तारुण्यातील अविवेक’ म्हणून पहिले जाते. दोघांचाही वयोगट एक असेल, तर दोघांच्याही वयाचा विचार करून त्यांना कठोर शिक्षा दिली जात नाही. मात्र त्याच वेळी अनेक देशांनी चाइल्ड पोर्नोग्राफी - लैंगिक दृश्यात अल्पवयीन मुलांचा वापर याविषयी
कठोर नियम केलेले आहेत. थकज वयाबाबत निर्देश करत नसले, तरी मुलामुलींच्या लैंगिक व पुनरुत्पादक आरोग्याचे रक्षण करण्याच्या कर्तव्याविषयी आग्रही आहे. लैंगिक शोषण व गैरवर्तन यापासून मुलांचे रक्षण केले पाहिजे असे सांगतानाच मुलामुलींना संपूर्ण लैंगिक शिक्षण देण्याची गरज अधोरेखित करते. मुलामुलींना त्यांच्या शरीरात होणार्या बदलांविषयी नेमकेपणाने जाणून घेण्याचा हक्क आहे व बालपणापासून तारुण्यावस्थेत प्रवेश करतानाच्या सर्व टप्प्यांवर विकसित होणार्या क्षमतांचा आदर केला पाहिजे, असे सुचवते. गर्भधारणेच्या विषयातही मुलीच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची प्रगल्भता व सुरक्षा याला महत्त्व देते. मुलामुलींना त्यांच्या लैंगिक व पुनरुत्पादन क्षमतेचे पूर्ण ज्ञान असणे, त्यात येणार्या अडचणींकरता वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे व त्यांच्या निर्णयात जाणते प्रौढ व आरोग्य यंत्रणा यांनी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करावे, असे म्हणते. असे असले, तरी व कायदा काहीही म्हणत असला, तरी अल्पवयात येणारे शारीरिक संबंध, त्यातून लागणार्या सवयी याचा शरीरावर व मनावर होणारा परिणाम हितकारक नक्कीच नसतो. लैंगिक आजार, अवांछित मातृत्व यापासून ते लैंगिक वा मानसिक विकृती, प्रकृतीला गंभीर धोका उद्भवणे असे परिणाम होऊ शकतात. या संबंधांची परिणती कायम व सुदृढ नात्यात झाली व सुरक्षित सहजीवन आकाराला आले असे सहसा घडत नाही. वाढती मानसिक असुरक्षितता, अनिश्चितता, अस्थैर्य यामुळे किशोरवयीन मुले-मुली या संबंधातून क्षणिक समाधान मिळवू पाहतात. हे ‘प्रेम’ आहे असा गैरसमज झालेला असतो, मात्र प्रेमातून मिळणारी उमेद, सुरक्षितता, स्थैर्य यापैकी काहीच मिळत नाही व त्यातून पुन्हा निराशा, तणाव वाढीस लागू शकतात.शिक्षण, करिअर या सर्व बाबी मागे पडू शकतात. केवळ आकर्षण-मजा-गंमत-उत्सुकता इतकाच हेतू असल्यामुळे यातून नाते निर्माण होणे, ते टिकणे या शक्यता फार कमी असतात. मात्र मुलामुलींना याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. लवकर वयात येणे, शिक्षण-करिअर याला लागणार्या वेळामुळे लग्नाला होणारा उशीर व या काळात असणारे ताणतणाव यामुळे उपलब्ध असेल तो जोडीदार घेऊन तात्पुरत्या संबंधांची सवय लागताना दिसते. एकूणच नवी पिढी याला फार गांभीर्याने घेत नाही.एकनिष्ठा, पावित्र्य, चारित्र्य या संबंधातील मूल्ये वेगाने बदलत आहेत.लग्नापूर्वी अफेअर असणे, एक वा अनेकांशी संबंध आलेले असणे याला सहजपणे मागे टाकून व त्याविषयी खुलेपणाने बोलून नव्या नात्याचा स्वीकार करणारी तरुण पिढी त्यांचे जगण्याचे नियम बनवू पाहत आहे, असे वाटते. कित्येक वेळा घरातील मोठ्या मंडळीना ‘प्रकरण’ कळून त्यांचा हस्तक्षेप होईपर्यंत सारे सुरळीत सुरूही असते. मग जुन्या व नव्या मूल्यांचा संघर्ष उभा राहतो किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न होतो किंवा फसवणूक पदरी पडते, तेव्हाच प्रकरण तक्रारी पर्यंत येते व तेव्हाच कायद्यातील तरतुदींचा प्रश्न उभा राहतो. तरुण पिढी याबाबत एकदम ‘कूल’ असली, तरी समाज म्हणून आपण
आपल्या ‘सोयीस्कर सुधारणावादात’ अजूनही लैंगिक शिक्षणाला स्थान नाही. वयात येतानाची अपार उत्सुकता मुलांना आवरता येत नाही. त्याविषयीचे शास्त्रीय ज्ञान, व्यावहारिक माहिती न शाळेतून मिळते, न घरातून. मोबाइल, सोशल मीडिया, जाहिराती, चित्रपट यातून जे दिसते, त्यातून लैंगिक शिक्षण नाही, तर केवळ उद्दीपन होते. संस्कार या नावाखाली जे सांगितले जाते ते अनेकदा अवास्तव भीती व कडक बंधने घालणारे असते.
गोंधळलेल्या मानसिकतेत आहोत. आपण पाश्चात्त्य जगातल्या सवयी, जीवनशैली स्वीकारली, त्याला प्रतिष्ठा दिली, पण त्यातून निर्माण होणार्या धोक्यांचा व परिणामांचा विचार तेव्हा केला गेला नाही. आपल्या ‘सोयीस्कर सुधारणावादात’ अजूनही लैंगिक शिक्षणाला स्थान नाही. वयात येतानाची अपार उत्सुकता मुलांना आवरता येत नाही. त्याविषयीचे शास्त्रीय ज्ञान, व्यावहारिक माहिती न शाळेतून मिळते, न घरातून. मोबाइल, सोशल मीडिया, जाहिराती, चित्रपट यातून जे दिसते, त्यातून लैंगिक शिक्षण नाही, तर केवळ उद्दीपन होते. संस्कार या नावाखाली जे सांगितले जाते ते अनेकदा अवास्तव भीती व कडक बंधने घालणारे असते, ज्याला धुडकावण्याची मुलांची प्रवृत्ती असते. त्यातूनही हे बहुतांशी केवळ मुलींना सांगितले जाते त्यामुळे मुलांना त्यांचीही काही जबाबदारी आहे याचे भान येतच नाही. कायदा नव्हता, तेव्हा पुरुषांना ‘करून सावरून नामानिराळा’ असे राहण्याची सोय होती.आता पोक्सोसारख्या कायद्यामुळे मुलींना संरक्षण आहे, त्यामुळे आता मुली हात वर करतात व मुलांना मात्र शिक्षा भोगावी लागते आहे. एकच कृत्य, तेही सहमतीने झाले असले, तरी कायदा मुलीकडे ‘पीडिता’ म्हणून पाहतो व मुलाकडे ‘अपराधी’ म्हणून पाहतो, हे या चर्चेमागचे कारण आहे. पण तेव्हा मुलींवर अन्याय होत होते, आता मुलांना सोसू दे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. दुसरीकडे सहमती हा शब्दही फार फसवा आहे. तात्कालिक मोह, अज्ञान यामुळे त्या वेळी परिणामांचा विचार न करता कृती होते व परिणाम समोर आले तर ते थेटपणे मुलीलाच सोसावे लागतात, हे सत्य बदलत नाहीच. आपल्या समाजात अजूनही मुलींना स्वनिर्णयाचा अधिकार सोडाच, त्यांची ती क्षमताही आम्ही विकसित केलेली नाही. ज्यांना तो आहे किंवा ज्या विचाराने परिपक्व आहेत, त्यांच्याबाबतीत फारसा प्रश्न येत नाही. मात्र घरी ‘प्रश्न विचारायचे नाहीत’, ‘आम्ही सांगू ते ऐकायचे’ , ‘तू अजून लहान आहेस’, ‘तुझे भले आम्हाला कळते’ असे ऐकत असलेल्या, आपले निर्णय दुसर्या कुणीतरी घायचे अशी सवय असलेल्या, पुरुषांनी व्यक्त केलेल्या इच्छा पुरवायच्या असतात हे पाहत मोठ्या झालेल्या मुलींची संमती ही विचाराने दिलेली असते का? घरातील व्यक्ती, शिक्षक अथवा अन्य अधिकारी व्यक्ती जेव्हा काही सूचित करते, तेव्हा भीती, दबाव यामुळेही विरोध केला जात नाही. मुळात स्त्रीचा सम्मान, तिच्या होकार-नकाराचे महत्त्व हे मुलग्यांना समजावे असे वातावरण समाजात आहे का, याचा विचार व्हायला हवा. चांगले स्थळ पटकावणे यातच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे, असे मुलींना वाटावे असेच तिला वाढवले जाते. ज्या मुलींच्या किंवा मुलांच्याही डोळ्यासमोर काही ध्येय आहे, निश्चित मार्ग आहे, काही साध्य करायची व त्याच्या प्रयत्नात झोकून देण्याची वृत्ती आहे, त्यांना या पडावावर फारसे रेंगाळत बसावे लागत नाही. ती निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो असू व तरुण पिढी केवळ भोगवादाच्या मागे लागलेली दिसत असेल, तर त्याला जबाबदार आपण आहोत. मुलांना चांगले-निरोगी-निर्भय-आनंदी वातावरण देणे, त्यांना भावनिक-मानसिक स्थैर्य देणे हे आपले कर्तव्य आहे. मुले ऐकत नाहीत, त्यांच्या वागण्यावर कुणाचे नियंत्रण नाही या हतबलतेतून ‘करा काय करायचं ते’ असं म्हणणारे पालक बहुसंख्येने आहेत. हा प्रश्न आजचा आहे असे मात्र नाही. प्रत्येक पिढीची झोप या बदलांनी उडवली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक विदुषी दुर्गाबाई भागवत यांना या विषयात विचारल्यावर त्या म्हणाल्या होत्या, “अशी स्थिती येण्याचे कारण त्यागाची भावना लोप पावत आहे. भोगवादाचा विळखा वाढत चालला आहे. ज्यांना काही मिळालं आहे ते दुसर्यांना चेतवतात व ज्यांना मिळत नाही ते दुसर्यांना चेपतात. आपल्याला धर्मावर आधारित संस्कृती, नीतिनियम नकोत तर निदान समजूतदारपणाची संस्कृती स्वीकारायला हवी. पण आपण स्वैर आचरणाला सोयीच्या बाबी तेवढ्या उचलल्या.” दुर्गाबाई जनजाती भागात भरपूर फिरल्या, त्यांच्यात राहून संशोधन केले. त्या म्हणतात, “ज्यांची स्वत:ची बोली भाषा नाही, ज्यांच्यात वस्त्रे घालायची पद्धतही नाही अशा जमातीतही स्त्री-पुरुष संबंधाबाबत काही नियम होते. त्याचे ते उल्लंघन करत नाहीत. स्वैराचार करत नाहीत. कित्येक जमातीत विवाह पद्धतही नाही, पण संबंधांबाबत नियम आहेत व ते पाळले जातात. समाजाची नियम पाळायची मानसिकता हवी. खुलेपणा हवा, पण स्वैराचार नको यात शंकाच नाही. एका नियमांत सूट दिली, तरी दुसरे काही नीतिनियम करावेच लागतात.”
पाश्चात्त्य जगात असे केले आहे म्हणून आपणही ‘मागे’ राहू नये, हा विचार अपरिपक्वतेचा निदर्शक वाटतो. पावित्र्य वगैरे कल्पना सोडल्या, तरी निष्ठा हा विषय उरतोच. मुळात भारताला स्वत:ची काही मूल्ये आहेत, परंपरा आहेत, त्या हजारो वर्षांच्या अनुभवातून तयार झाल्या आहेत. सारे जग मूल्यांपासून दूर पळत असले, तरी भारताने याबाबत आपला स्वतंत्र विचार करायला हवा. जागतिकीकरणानंतर अचानक भारतीय सौंदर्य विश्वविजेते ठरू लागले होते, हे आपण विसरून चालणार नाही. आज भारत हे किशोरवयीन लोकसंख्येचे सर्वात मोठे मार्केट आहे. त्यामुळे प्रगत, आधुनिक वाटतील अशा नवनवीन संकल्पना विविध मार्गांनी रुजवणे व पाठोपाठ त्यातून निर्माण केलेल्या गरजा पुरवणारे मार्केट उभे राहणे हे घडणारच आहे. तरुणाई जितकी स्वैर होईल, तितके मार्केटला हवेच आहे. ‘योलो’ - you only live onceसारख्या संकल्पना तरुणाईला आकर्षक वाटतात व त्यातूनच ‘आताचा क्षण उपभोगू या’ हा अविचार जन्माला येतो. संयम, नियंत्रण ही भारतीय मूल्ये व ते शिकवणार्या परंपरा आउटडेटेड म्हणून टाकून दिल्या त्या मागच्या पिढ्यांनीच! कोविड काळात उमगलेले नमस्काराचे व हातपाय धुण्याचे महत्त्व असो व पाश्चात्त्य मेंदू संशोधकांनी ‘शोधून’ काढलेली कानपिळीची पद्धत, संयम व मनाची स्थिरता देणारा योग अशा आपल्याकडच्या बुद्धिवाद्यांनी मागास ठरवलेल्या कितीतरी गोष्टी आज बाकीचे जग कौतुकाने, श्रद्धेने करत आहे. दुर्गाबाई म्हणाल्या होत्या, “वैयक्तिक व सामाजिक पातळीवर लैंगिक प्रश्नांची तड जगात कधीही कुठेही लागलेली नाही व ती लागणारही नाही.” TISSने एकदा वेश्याव्यवसाय संदर्भात सर्वेक्षण केले, तेव्हा मी सुचवले होते की तिकडे जाणार्या पुरुषांचेही सर्वेक्षण करा - ते घडले नाही. कोणत्याही प्रश्नामागची खरी कारणे मानसिकतेत दडलेली असतात, तीच आम्ही समजून घेत नाही. कन्सेंट हा शब्द फसवाच नाही, तर धोकादायक आहे.कन्सेंट निर्माण व्हावी, याकरता मुलीचे अज्ञान, विश्वास, प्रलोभन, मिंधेपण कशाचाही वापर होतो. ‘स्त्रीचा नकार म्हणजे होकार’ असली रोमँटिक मिथके असतात. बाईने सोसायचे असते, adjust करायचे असते हे इतके बिंबवलेले असते की तिला नकाराची सवय असतेच कुठे? तिला स्वत:च्या बुद्धीने निर्णय घेणे आधी शिकवायला हवे. वयात येतानाचे बदल, भावभावना, आपली लैंगिकता हाताळायला आधी शिकवायला हवे. तिचा नकाराचा अधिकार तिला माहीत असायला हवा व त्यातही समान निकष हवेत. पुरुषाला त्याची लैंगिकता उघड, आक्रमक पद्धतीने व्यक्त करता येते, वर त्याचे जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय समर्थनही होते. पुरुषाची इच्छा पूर्ण करायची असते हे मुलींना नकळत संस्कार दिलेले असतात. याबाबत काही अनुभव व काही मुद्दाम घेतलेल्या मुलाखती नोंदवणे आवश्यक आहे.
विदर्भातल्या अत्यंत लहान खेड्यातून एका संस्थेमार्फत काही मुली आमच्या संस्थेत नर्सिंग शिकायला आल्या. मुली अतिशय हुशार, धीट, कष्टाळू होत्या. त्यांना पोहोचवताना त्या संस्थेचा कार्यकर्ता म्हणाला, “ताई, या मुलीना हे सांग की उद्या दवाखान्यात कामाला लागाल, तेव्हा तिथल्या डॉक्टरचं ‘सारं काही’ ऐकणं आवश्यक नाही. त्याने नोकरी दिली म्हणजे त्याच्या सर्व इच्छा पुरवण्याची जबाबदारी तुमची नाही. हा कामाचा भाग नसतो.” दवाखान्यातल्या नर्सेस या ‘हक्काच्या’ असतात हा तिथला रूढ प्रकार आहे, हे ऐकून आम्ही थक्क आणि हताश झालो होतो. आज या विषयावर नर्सिंगच्या स्टाफमध्ये चर्चा झाली. सगळे तिशीच्या आत-बाहेर आहेत. त्यांची मते आश्चर्यकारकरित्या या तरतुदीच्या विरोधात आली. विशाल म्हणाला, “मॅडम, अजिबात असा कायदा बदलायला नको. मुलींच्या आरोग्याला धोका आहे. त्यांचं शिक्षण अर्धवट राहणार. मग सोळापूर्वी लग्नच करू म्हणतील काही पालक.” मेघा सिस्टर म्हणाल्या, “अमेरिकन मुलींचं वेगळं. त्यांचे-आपले कपड्यांचे साइज बघा किती फरक असतो. आपल्याकडे पन्नास टक्के मुली अॅनिमिक असतात. त्यांना काहीच झेपणारं नाही.” मारिया म्हणाली, “आपली संस्कृती वेगळी आहे ती आपण का सोडायची?” शीला मात्र म्हणाली की “मॅडम, मी मुलांच्या बाजूची आहे. मला वय अलीकडे आणणं अजिबात पटत नाही, पण मुलं भरडली जात आहेत हे खरं आहे. मला वाटतं की सेम एजमधल्या केसेसमध्ये मुलगा, मुलगी दोघांनाही शिक्षा व्हायला हवी.”
मग याला उपाय काय? सर्वांकडून हा मुद्दा आला की पालकांना सांगायला हवंय. शीला म्हणली, “मी माझ्या आईबाबांना एकमेकांच्या शेजारीही बसलेलं पाहिलेलं नाहीये. आताचे आईबाप मुलांच्या देखत काय काय करतात. लहान मुलं म्हणतात, ‘आपण मम्मी-पप्पा खेळू चल.” साक्षी म्हणाली, “कितीतरी घरात थेट किंवा अप्रत्यक्षपणे असं सांगितलं जातं की लग्नाआधी काय करायचं ते करा, लग्नानंतर मात्र बंधनं निमूट पाळायला लागतील. जिथे असं सांगत नाहीत, तिथेही अनेकदा मुलींना हे समजत असतं की लग्नानंतर आपल्याला आपल्या इच्छेनुसार जगता येणार नाही. शिवाय आधी दुर्लक्ष करतात आणि लग्न ठरताना मात्र मागचं सारं खणून काढणारे लोक आहेत. त्यातही मुलाला न्याय वेगळा व मुलीला वेगळा हे आहेच. लग्नाआधी सर्व प्रकारची मजा करणारे नंतर पझेसिव्ह, संशयी होतात. वयात येणं ते लग्न या काळात जो वेळ जातो, त्या काळात मुलं-मुली काही न करता गप्प राहतील असं समजणं हे मूर्खपणाचं ठरेल. मग समाजानेही हे वास्तव स्वीकारून तो काळ सुरक्षितपणे कसा पार पडेल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. अन्यथा मॉडर्न समाजाचा आदर्श घेता घेता नवी असमानता, अन्याय याला आपण जन्म देऊ. मैत्री, डेटिंग या विषयांचा बाऊ न करता आधी योग्य तितकी मोकळीक दिली, तर या प्रकारांना जरा आळा बसेल.”
काउन्सिलर छायाच्या मते मुलीला पूर्णपणे सक्षम बनवले, तर प्रश्न सोपे होतील. याकरता पालक, शिक्षक, समाज सर्वांनी तिला योग्य ते मार्गदर्शन करायला हवे. तिला तिचे आयुष्य घडवायची संधी मिळायला हवीये. तिला काहीतरी करण्याचे ध्येय समोर असेल, तर ती या फंदात पडत नाही.
काउन्सिलर फरीदा म्हणाली, “शाळाशाळांमध्ये जाऊन याचं गांभीर्य सांगायला हवं आहे. मुलीच फार आगाऊ झाल्यात, पण त्यांना परिणाम मुळीच कळत नाही आहेत.” तिच्यासमोर एक केस सुरूच होती. ती मुलगीही आमची चर्चा ऐकत होती. ती म्हणाली, “ताई, सगळी मुलं वाईट नसतात. अनेक मुलांनाच संयम जास्त असतो. तो तसं असणं हे घरच्या वातावरणावर अवलंबून आहे, ते सुधारायला हवं. कायद्यामुळे मुलाचं नुकसान होतं असं का म्हणायचं? त्यापेक्षा त्यालाही हे आधी पासून शिकवा की बघ बाबा, तू काहीतरी करशील आणि ती केस टाकेल आणि तू बसशील दहा वर्षं जेलात.”
शहर पोलीस स्टेशनमध्ये पाटीलसाहेब भेटले. ते पोक्सोच्या केसेस हाताळतात. त्यांचा अनुभव फरीदासारखाच होता. ते म्हणाले, “ताई, खरंच मुली मर्जीने करतात. कालच इथल्या नामांकित शाळेच्या नववीच्या दोन मुली लॉजवर सापडल्या. मुली थ्रिल म्हणून करतात आणि पालकांना कळलं की ते केस ठोकायला लावतात. परत साक्षीच्या वेळेस मुलगी सरळ सांगते की माझं प्रेम आहे, म्हणून मी केलं. पण म्हणून वय खाली आणायला नको. त्याने आणखी प्रॉब्लेम होतील.” उलट त्यांचंही म्हणणं की “बायकांवर अनेक वर्षे अन्याय झालाय, म्हणून त्यांना खूप वर्षे पाठीशी घातले. पण आता मात्र अशा वेळेस मुलगा मुलगी दोघांनाही दोषी धरायला हवे. सौम्य का असेना, शिक्षा व्हायला पाहिजे. कायद्याचे हत्यार दुधारी असते. गैरवापर होऊ नये याकरता पालक, पोलीस, न्यायालये व एकूणच समाजाने तारतम्याचा वापर करावा. केस समोर आली की आम्ही आधी वय विचारतो. मुलगी अठराच्या आत असली की आमच्या दृष्टीने मुलगा गुन्हेगारच होतो व आम्ही पोक्सो लावतो. पोक्सोमधे काही तरतुदी करता येतील का याचा विचार करावा, पण कायद्याने वय खाली आणले तर अनेक वाईट परिणाम होतील. मुले-मुली जे करायचे ते करणारच आहेत. जेव्हा तक्रार होते, तेव्हाच हे मुद्दे येतात व कायदा अचनक कठोर होतो. पण सोळा वर्षांच्या वयात कन्सेंट आहे असे म्हणण्यात अर्थ नाही.”
मुलामुलींच्या रिलेशनशिपचे अनेक प्रकार आहेत. केवळ लैंगिक आकर्षण न राहता त्याला वैचारिकता, बांधिलकी, आदर याचा पाया मिळत गेला, तर नाते स्थिर व्हायला मदत होते. असे निरोगी वातावरण, संधी जिथे मिळते, तिथे अनेक प्रकारची निरोगी सुरक्षित नाती अनुभवता येतात. मुळातच नाते ही दीर्घकाळाची हळूहळू विकसित होणारी बाब आहे, हे समजावता यायला हवे. मैत्री, प्रेम, आकर्षण, संबंध व स्थिर-सुरक्षित नाते या टप्प्यांविषयी बोलायला हवे.
अवकाळी पावसाप्रमाणे उमलत्या वयात येणारी शरीरसंबंधाची ही ‘बेवख्त बारिश’ नुकसानकारक आहे, यात कुणालाच शंका नाही. अशा सवयी लागणे अनेक दृष्टींनी घातक आहे, हेही सर्वांना पटतेय व कायदा आहे तिथे गैरवापर व पळवाटा असणार, हेही. त्यामुळे असा बदल करताना त्याचे दूरगामी परिणाम काय होतील याचा विचार करायला हवा. रसायन घालून घाईघाईने पिकवलेल्या फळांप्रमाणे बाहेरच्या प्रदूषित वातावरणात मुलामुलींच्या इच्छा अकाली पिकत आहेत. त्यापासून संरक्षण देणे हातात नसले, तरी त्यांच्या विचारांचा गाभा सुरक्षित ठेवणे आपल्याला करावे लागेल. मुलांच्या मनातली वाढती असुरक्षितता, अस्थिरता, वाढत्या अपेक्षा यातून येणारा ताण या मार्गाने बाहेर पडतोय का? तो कमी करण्याकरता काय करता येईल? याचा विचार करावा लागेल. एकूणच बंधन न पाळायची वृत्ती, सवय लागली की पुढे स्वीकारलेल्या कायम नात्याचेही बंधन नको वाटले, तर काय नवल? त्यामुळे केवळ कायदा व शिक्षेचा विचार करणे पुरेसे नाही. या निमित्ताने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याकरता तातडीने उपाय योजले जायला हवेत, नाहीतर हे अतिशय नैसर्गिक, सुंदर, तरल अनुभव निव्वळ शारीर उपचार आणि उथळ मजा असे होऊन जातील. माणसाच्या सुसंस्कृतपणात नियंत्रित व न्यायपूर्ण लैंगिक आनंदाचा वाटा मोठा आहे. मुलांच्या आयुष्यातल्या एका अतिशय सुंदर संबंधातला आनंद संपतो आहे का, याचीही काळजी करायला हवी.