लोकमान्य टिळकांचा सिंहागडावरचा बंगला - एक दुर्लक्षित स्वातंत्र्यतीर्थ!

विवेक मराठी    22-Jul-2023
Total Views |
@चंद्रशेखर नेने। 8779639059
 
 
tilak
आजवर कॉँग्रेस सरकारने सदैव ओरडून सांगितले की गांधी-नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळाले. मात्र आझाद हिंद सेनेचा स्वातंत्र्यलढ्यात मोठा वाटा आहे. अशा या आझाद हिंद सेनेची कल्पना जिथे आकारास आली, तो सिंहगड. तेथील लोकमान्य टिळकांचा बंगला हे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे एक अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हा खरा इतिहास लोकमान्य टिळकांच्या जन्मदिवसानिमित्त आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न केला आहे.
23 जुलै 2023 रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांच्या जन्माला 167 वर्षे झाली. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असे बहुमानाचे बिरुद त्यांना व्हॅलेंटीन चिरोल नावाच्या एक प्रसिद्ध ब्रिटिश पत्रकाराने दिले होते. खरोखरच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्यांनी देशभक्तीची मशाल हाती घेऊन ब्रिटिश राज्यकर्त्यांना सळो की पळो करून सोडले होते. त्यांच्या प्रेरणेने भारतीय सामान्य प्रजेनेदेखील ब्रिटिश शासनाविरुद्ध घनघोर संग्राम सुरू केला होता. शांतपणे एकचित्ताने लेखन, मनन व चिंतन करता यावे, म्हणून टिळकांनी 1890 साली पुण्याजवळ सिंहगडावर थोडी जमीन खरेदी करून स्वत:साठी एक बंगला बांधून घेतला होता. ह्याच बंगल्यामध्ये त्यांनी ‘ओरायन’ व ‘आर्क्टिक होम्स इन वेदाज’ ही आपली दोन सुप्रसिद्ध पुस्तके लिहिली होती. ह्याच बंगल्यामध्ये त्यांची व गांधींची पहिली भेट झाली होती. एक अर्थाने हे एक राष्ट्रीय स्मारकच आहे.
 
 
पुढे टिळकांच्या मृत्यूनंतर, विश्वस्त ह्या नात्याने केसरी मराठा संस्था टिळक कुटुंबासाठी ह्या बंगल्याची व्यवस्था पाहत असते. आजसुद्धा येथे आल्यानंतर एक अपूर्व मानसिक शांतीची अनुभूती घेता येते. फार थोड्या लोकांना माहीत आहे की हा बंगला भारतीय नागरिकांसाठी एका अतिशय स्फूर्तिदायक आणि प्रेरक घटनेचा साक्षीदार आहे. त्या घटनेला आता जवळजवळ 83 वर्षे उलटून गेली आहेत, पण अजूनही तिचे स्मरण आपल्या अंगावर स्फूर्तीचे रोमांच उभे करेल, ह्यात काहीही शंका नाही.
 
tilak 
 
त्याचे असे झाले की सुभाषचंद्र बोस 1938 साली कॉँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. 1939 साली त्यांनी परत निवडणूक लढवली आणि ते पुन्हा अध्यक्षपदी निवडून आले. ह्या वेळेस त्यांनी आपले प्रतिस्पर्धी पट्टाभिसीतारामय्या ह्यांना पराभूत केले. ह्या पट्टाभींना स्वत: गांधींचे समर्थन होते, तरीही त्यांचा पराभव झाला होता, कारण सुभाषचंद बोस हे कॉँग्रेसमधील तरुणांचे दैवत होते. पण गांधीजींनी हा प्रभाव फार मनाला लावून घेतला. पट्टाभी ह्यांचा प्रभाव म्हणजे माझा स्वत:चाच पराभव आहे असा त्रागा गांधी करू लागले. ह्या गांधीजींच्या दुराग्रहामुळे कॉँग्रेस वर्किंग कमिटीच्या तेरा सदस्यांनी आपापले राजीनामे दिले. हे सर्व पाहिल्यानंतर आणि गांधीजींनी एक लोकनियुक्त अध्यक्षाचाही मान राखला नाही, असे लक्षात आल्याने सुभाषबाबूंनी कॉँग्रेसच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ह्या राजीनाम्यानंतर बोस अतिशय उद्विग्न मन:स्थितीत होते. ते जून 1940मध्ये मुंबईला येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांना भेटले. भारत देशापुढील समस्या आणि उपाय ह्याबाबत इथे त्या दोघांची प्रदीर्घ चर्चा झाली. सुभाषचंद्र बोस ह्यांना क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्याबद्दल अतीव आदर होता. ह्या भेटीदरम्यान सावरकरांनी बोस ह्यांना काही मोलाचे सल्ले दिले. ते म्हणाले, “कॉँग्रेसमध्ये राहून तुम्हाला गांधींना विरोध करता येणार नाही.
 
 

शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळकांनी पाहिलेली स्वप्नं आणि आजचा भारत या विषयी चिकित्सक लेखांचा संग्रह असलेला शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक पुस्तक आहे. फक्त ३१५ रुपयांत 
https://www.vivekprakashan.in/books/book-on-lokmanya-tilak/

 
गांधींना धार्जिणे असलेले कॉँग्रेसचे सर्व सदस्य तुम्हाला कुठलीही मदत करणार नाहीत, इतका त्यांच्यावर गांधीजींचा प्रभाव आहे. (येथे एक लक्षात घ्यायचे की, त्या वेळेपर्यंत बोस हे कॉँग्रेसमधील गांधींच्या खालोखाल सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली नेते होते. जवाहरलाल नेहरू ह्यांचा नंबर लोकप्रियतेत त्यांच्यापेक्षा खूपच खाली होता!) तरीही तुम्हाला जर काही उत्तम देशकार्य करायची इच्छा असेल, तर तुम्ही आता भारताबाहेर गेले पाहिजे. सध्या इंग्लंड आणि जर्मनी ह्यांचे प्रचंड युद्ध सुरू झालेले आहे, (दुसरे महायुद्ध) ह्या युद्धात इंग्लंड जर्मनीच्या पुढे भरपूर मार खाईल ह्याची खात्री आहे. त्यासाठी त्यांना भारतातील त्यांच्या वसाहतींची प्रचंड मदत लागणार आहे. मुख्य म्हणजे सैन्यदलात त्यांना भारतीयांना प्रवेश द्यावाच लागेल. मी त्यासाठी आपल्या सर्व नागरिकांना सैन्यभरतीचे आवाहन सुरू केले आहे. आपल्या प्रजेला सैनिकी शिक्षण मिळणे अतिशय गरजेचे आहे आणि पूर्वी जरी ब्रिटिश भारतीय नागरिकांना सैनिकी शिक्षण देत नव्हते, तरी ब्रिटिश सरकारचा हात आता युद्धाच्या दगडाखाली अडकला आहे, त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या लोकांना उत्तम आणि आधुनिक सैनिकी प्रशिक्षण घेण्याची ही उत्तम संधी आहे. ह्यासाठी मी भारतभर दौरे काढून सैनिकी भरतीचा प्रचार करत आहे आणि त्यासाठी ब्रिटिशांनी मला पूर्ण परवानगी दिलेली आहे. माझ्या भाषणात मी सर्वांना सांगतो की, बंदुका कशा चालवायच्या हे प्रथम शिकून घ्या, त्या कोणाकडे रोखायच्या हे आपण नंतर ठरवू या! आता युद्धानिमित्त आपले असे नवीन भरती होऊन प्रशिक्षित झालेले सैनिक युद्धभूमीवर भारताबाहेर गेलेले आहेत. जपानला राश बिहारी बोस ह्या सैनिकांच्या मदतीने एक ‘आझाद हिंद’ फौज स्थापन करीत आहेत. तुम्ही युरोपात जाऊन जर्मन नेतृत्वाला भेटा आणि आपल्या भारतीय सैन्याच्या मदतीने व जर्मनी आणि जपान यांच्या साहाय्याने ही आझाद हिंद फौज अधिक शक्तिशाली करा. हीच फौज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल, कारण ह्या महायुद्धात कोणीही जिंकले आणि कोणीही हरले, तरी ब्रिटन देशाची मात्र अपरिमित हानीच होणार आहे. तेव्हा अशा गलितगात्र ब्रिटनकडे भारतावर राज्य करण्याएवढी शक्ती राहणार नाही आणि आपण आपले स्वातंत्र्य त्यांच्याकडून हिसकावून घेऊ शकू. कायम एक लक्षात ठेवा की, ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले?’ स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सैनिकी बळ असायलाच हवे. तरच असे स्वातंत्र्य मिळवता येते व टिकवता येते.”
 
tilak
 
“पण मला देश सोडणे कसे शक्य होईल? कारण माझ्यावर तर ब्रिटिश सरकारची सदोदित नजर असते.” सुभाषबाबूंनी प्रश्न केला. सावरकरांनी उत्तर दिले की, “मला माहीत आहे की माझ्याप्रमाणेच तुमच्या मनातदेखील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे. त्यांच्या चारित्राचा कसून अभ्यास करा. विशेषत: त्यांच्या आग्रा येथील भेटीचा प्रसंग पुन्हा पुन्हा अभ्यासा. तसेच जर शक्य झाले तर काही दिवस शिवाजी महाराजांचे वास्तव्य जिथे झालेले होते, अशा एखाद्या ठिकाणी काही दिवस राहून या. मला खात्री आहे की महाराजांचे स्फूर्तिप्रद अस्तित्व आणि चरित्र तुम्हाला नक्कीच मदत करील आणि आशीर्वाद देईल!”
 
 
ह्या भेटीनंतर सुभाषबाबू पुण्याला आले आणि तिथे लोकमान्य टिळकांचे नातू दादासाहेब केतकर त्यांना केसरीवाड्यात भेटले. त्यांनी असे सुचवले की काही दिवस आपण टिळकांच्या सिंहगडावरच्या बंगल्यात राहण्यास जाऊ! अर्थात सिंहगडावर छत्रपतींचे वास्तव्य झालेले आहेच, त्यामुळे सुभाषबाबू अतिशय प्रसन्न झाले आणि ते दोघे सिंहगडावर राहण्यास गेले. ह्यापुढची हकीकत दादासाहेब केतकर ह्यांनी जशी सांगितली, तशी ती लोकमन्यांचे नातू जयंतराव टिळक ह्यांनी केसरीतील एक लेखात नमूद केलेली आहे. ते लिहितात - ‘एक सकाळी आम्ही दोघे गडावर फिरायला बाहेर पडलो होतो. पुढे कल्याण दरवाजापाशी आल्यावर विश्रांतीसाठी जरा टेकलो होतो. तेव्हा माझ्या लक्षात आले की सुभाषबाबू आपल्या हातात एक कागद बघून काही पुटपुटत आहेत. त्यांना आजूबाजूची जराही जाणीव नव्हती. ते अतिशय तल्लीनपणे तो कागद वाचण्यात गर्क झालेले होते. पुढे त्यांची तंद्री उतरल्यानंतर मी त्यांना त्याबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी काहीही न बोलता तो कागद माझ्यापुढे ठेवला. त्यात गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर ह्यांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांवरची कविता होती!’ (नरेंद्र जाधव ह्यांनी आपल्या पुस्तकात ह्या कवितेचा मराठी अनुवाद छापला आहे.)
 
 
ह्या कवितेचे नाव ‘शिवाजी उत्सव’! त्यात शिवाजी महाराजांचे चरित्र वर्णन करताना कवीने शिवाजीराजांचे स्मरण करताना राष्ट्राच्या स्वातंत्र्याची आस जागविली आहे. अशी ही कविता सुभाषबाबू एक ध्यानमयी अवस्थेत गुणगुणत होते आणि दादासाहेब केतकर ह्या अप्रतिम क्षणाचे साक्षी होते आणि तेसुद्धा शिवरायांनी आपल्या वास्तव्याने पावन केलेल्या सिंहगडावरच्या कल्याण दरवाजापाशी! धन्य तो क्षण आणि धन्य ते दादासाहेब! मी काही महिन्यांपूर्वी वरिष्ठ कॉर्पोरेट अधिकार्‍यांच्या ग्रूपला सिंहगड संपूर्ण फिरून दाखवला होता, तेव्हा लोकमान्य टिळकांच्या बंगल्यातच मी त्यांना ही सर्व कथा सांगितली होती. त्या वेळेस त्यांना ह्या कवितेच्या काही ओळीदेखील म्हणून दाखवल्या होत्या. मोठा अलौकिक क्षण होता तो!
 
 
पुढे सुभाषचंद्र बोस तिथून मुंबईला आले व नंतर कोलकात्याला आपल्या घरी गेले. पुढे फक्त सहाच महिन्यांत सुभाषबाबू आपल्या राहत्या घरीच प्रचंड आजारी पडले - अगदी तसेच, जसे शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या कैदेत असताना आजारी पडले होते! आणि त्यानंतर महाराजांसारखेच सुभाषबाबूदेखील ब्रिटिश पहारेकर्‍यांच्या हातावर तुरी देऊन तेथून जे सटकले, ते एकदम अफगाणिस्तानमार्गे जर्मनीतच प्रकटले! म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सल्ला त्यांनी अगदी मनोभावे स्वीकारला आणि अमलातदेखील आणला. त्यापुढचा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे. पुढे सुभाषचंद्र बोस ह्यांनी आझाद हिंद फौजेचे नेतृत्व हाती घेतले. त्यांना त्याच वेळेस ‘नेताजी’ ही बहुमानाची ओळख प्राप्त झाली. त्यानंतर नेताजी जपानला गेले. तेथील लढाईमध्ये जपान्यांनी युद्धकैदी म्हणून जे हिंदुस्तानी सैनिक पकडले होते, (ह्यातील बहुतेक सर्व सैनिक सावरकरांच्या प्रेरणेनेच सैन्यात भरती झाले होते.) त्यांच्यातूनच नेताजींनी ‘आझाद हिंद फौज’ उभी केली. ह्या फौजेने अंदमान व निकोबार बेटे मुक्त केली. तसेच पूर्वेकडून नागालँड येथील कोहिमापर्यंत भारताच्या सीमेत विजयी प्रवेश केला. दुर्दैवाने त्या वेळेपर्यंत जपानचीच अवस्था अतिशय बिकट झालेली होती, कारण अमेरिका आपल्या संपूर्ण ताकदीनिशी युद्धात उतरली आणि त्यांनी जपानी सैन्याचे मोठे पराभव करण्यास सुरुवात केली. भारताच्या आघाडीवर त्यामुळे जपानी सैन्य खूप मदत करू शकत नव्हते. ह्याच पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी सुभाषबाबू तैवानमार्गे विमानाने निघाले असतानाच दुर्दैवाने त्या विमानाला अपघात झाला व त्यात सुभाषबाबू दुर्दैवाने मरण पावले. (अशी अधिकृत माहिती दिली जाते, पण म्हणून ती सर्वथा खरी असेलच असे काही नाही!)
 
 
ह्या कथेच्या शेवटी एक वेगळा इतिहास सांगायचा आहे. इंग्लंडने भारताला विभाजित करून जे स्वातंत्र्य दिले, तेव्हा त्यांचे पंतप्रधान होते मजूर पक्षाचे क्लेमंट अ‍ॅटली. हे अ‍ॅटली पुढे एकदा 1956 साली भारतात आले होते. तेव्हा कोलकाता येथे ते तेथील हंगामी राज्यपाल, न्यायमूर्ती फणीभूषण चक्रवर्ती ह्यांच्याबरोबर होते. त्या वेळेस चक्रवर्ती ह्यांनी विचारले की “तुम्ही भारताला स्वातंत्र्य का दिले आणि भारत का सोडला?” उत्तरादाखल ते म्हणाले, “युद्धानंतर ब्रिटनची तिजोरी रिकामी झाली होती. आमचे सैन्य जर्जर झाले होते. भारतावर राज्य करण्यासाठी आम्हाला भरपूर सैनिकांची आवश्यकता होती. पण हिंदी सैन्यावर आमचा विश्वास उरला नव्हता, कारण एकच - ‘आझाद हिंद फौज,! आम्हीच प्रशिक्षित केलेले सैन्य आमच्याच विरोधात लढलेले पाहून आम्ही हादरून गेलो होतो. तसेच मुंबईत 1946 साली झालेले नाविकांचे बंड! ह्या सैन्यावर आता आमचा मुळीच विश्वास उरलेला नव्हता. ज्यांच्या जोरावर राज्य करायचे तेच जर विश्वासार्ह नसतील, तर मुकाट्याने जीव वाचवून पळून जाणे हाच मार्ग उरला होता आणि आम्ही तेच केले.” त्यावर चक्रवर्ती ह्यांनी विचारले की, “कॉँग्रेसच्या 1942च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाचा तुमच्यावर कितपत परिणाम झाला होता?” त्यावर अ‍ॅटली उत्तरले, “नगण्य परिणाम! मिनिमल! आम्ही ते आंदोलन थोडक्याच दिवसात सहजी चिरडून टाकले होते” असे उत्तर दिले. ह्या खुलाशावरून आपल्याला समजून येईल की, आपल्याला आजवर कॉँग्रेस सरकारने जे सदैव ओरडून सांगितले होते की त्यांनी गांधी-नेहरूंच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य मिळवून दिले, ते तद्दन खोटे होते. खरे स्वातंत्र्य नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांना प्रेरणा देणारे क्रांतिकारक सावरकर ह्यांच्या प्रयत्नांमुळे मिळाले होते. गांधी-नेहरू ह्यांनी कॉँग्रेसच्या नावावर आपल्याला खोटा इतिहास शिकवला. तर अशा ह्या आझाद हिंद फौजेची कल्पना जिथे आकारास आली, तो सिंहगड येथील लोकमान्य टिळकांचा बंगला हे आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे एक अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. हा खरा इतिहास लोकमान्य टिळकांच्या जन्मदिवसानिमित्त आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न केला आहे.