अॅड. अनिल शामराव रुईकर यांचे मे. जा. व्हावे! (मेहेरबानास जाहीर व्हावे) हे पुस्तक म्हणजे वकिलांची पक्षकारांप्रतीची कृतज्ञता स्पष्ट करणारे पुस्तक झाले आहे. कारण त्यांनी त्यांच्या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच पक्षकारांना अर्पण केली आहे. त्यांच्या मते, ‘माझ्यावर विश्वास ठेवून मला वकील म्हणून मान्यता देऊन माझ्यातील वकील घडवला अशा सर्व पक्षकारांना माझे हे पुस्तक मी अर्पण करीत आहे.’ अॅड. अनिल रुईकर हे नामांकित वकील आणि वकिलाने लिहिलेले पुस्तक म्हणजे त्यांच्याच भाषेत अर्थात वकिली भाषेत. याचा अर्थ पुस्तकाची भाषा ही वकिलीची भाषा असणार, म्हणजे कायद्याची. सामान्य माणूस आणि वकिलीची भाषा हा तसे पाहिले तर 36चा आकडा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला, तरी कायदाची भाषा म्हटली की किचकट, क्लिष्ट भाषा, याचा अर्थ सामान्य माणसाला समजणे कठीणच. तसे पाहिले, तर आपल्याकडे एक वाक्प्रचार रूढ झालेला आहे - ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये आणि वकिलाशी मैत्री करू नये.’ परंतु अॅड. अनिल रुईकर यांचे हे पुस्तक अजिबात क्लिष्ट व किचकट नाही, तर हे पुस्तक सोप्या भाषेत आणि संवादी शैलीत लिहिले गेले असल्यामुळे वाचनीय झालेले आहे.
पुस्तकात एकूण तेरा प्रकरणे आहेत. वकिली व्यवसायातील अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी न सांगता लेखकाने निरीक्षणे नोंदवून त्यांचे वर्णन केले आहे. न्यायाधीशांचे व अनुभवी वकिलांचे गुण व दोष नमूद करीत लेखकाने अनेक खुब्यांचे वर्णन केले आहे. वकिलीतील न समजणार्या अनेक गोष्टी सोप्या भाषेत उलगडून दाखविल्या आहेत. वकिलीतील अनेक किस्से सांगताना त्यातील मर्म सामान्य वाचकाला समजावून सांगितले आहे. त्यामुळेच हे पुस्तक न्यायाधीश, पक्षकार यांना उपयुक्त ठरणारे आहे, शिवाय भविष्यात वकील होऊ इच्छिणार्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल.
लेखकाची पुस्तक लिखाणाची प्रेरणा म्हणजे त्यांच्या वाचनात आलेल्या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ यांच्या एका पुस्तकातील ‘यशाचे क्षण जागते ठेवा’ या शीर्षकाचे एक प्रकरण प्रेरणादायक ठरले, याची प्रांजळ कबुली लेखकाने आपल्या मनोगतात दिली आहे.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. त्याचप्रमाणे लेखकाच्या शालेय जीवनापासूनच त्यांचा वकिली व्यवसायाकडे जाण्याचा कल होता. शाळेच्या बाजूला असलेल्या कोर्टात जाऊन कोर्टकाम ऐकण्याची त्यांना सवय होती. तसेच दैनिकांत चालू असलेली कोर्टकचेरीसंबंधातील लेख आणि गुन्ह्याचे तंत्र व पोलीस तपासाचे तंत्र यासंबंधीची अनेक मान्यवरांची पुस्तके, वृत्तपत्रीय लेखमाला ते वाचून काढीत असत. त्यांना वकिली व्यवसायात या गोष्टींचा उपयोग झाला, असेही त्यांनी पुस्तकात सोदाहरण सांगितले आहे.
‘हे पुस्तक म्हणजे माझे आत्मचरित्र नाही, तर माझे आत्मपरीक्षण आहे. यात माझे विचार, व्यवहार, अभ्यास, कार्यक्षमता इ. गोष्टींचा समावेश केलेला आहे. हे पुस्तक स्वानुभवावर लिहिले असले, तरी यात अहंकार भावना नाही’ असे लेखकाने आवर्जून नमूद केले आहे.
लेखकांचा वकिली व्यवसाय आणि हिंदू एकता हे दोन विषय म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणता येतील. हिंदू एकतेच्या निमित्ताने हिंदुत्वाच्या धगधगत्या यज्ञात वकिली व्यवसायामुळे समिधा टाकण्याचे भाग्य लाभले, असेही गौरवाद्गार आणि त्याप्रती कृतज्ञता त्यांच्या एका प्रकरणात पानोपानी वाचायला मिळते. एक प्रकरण लेखकाने त्यांच्या व्यवसायातील कामकाजाच्या क्लृप्त्या आणि अविस्मरणीय खटले यांबाबत लिहिले आहे. वकिलाची भूमिका कायम न्यायदानाची असावी व कोर्टास सत्यशोधनास मदत म्हणून व्हावी, स्वार्थासाठी अथवा जादा फीच्या मोहापायी होऊ नये, न्यायदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे लेखकाच्या पुस्तकातून व्यक्त होताना दिसते. वकिली व्यवसायात काही नीतिमूल्ये आहेत, त्या नीतिमूल्यांचे पालन केल्यास न्यायदान सुलभ जाते, मात्र पालन न झाल्यास वकिलाचे अध:पतन होते हे निश्चित, हा संदेशही त्यांनी आपल्या पुस्तकातून दिला आहे.
‘वकील व पक्षकार’ या प्रकरणात वकील व पक्षकार यांच्यातील नातेसंबंधाचे, त्यांच्यातील असलेल्या सामंजस्याचे, विश्वासाचे आणि व्यवहारांच्या गोष्टींचे विश्लेषण केले आहे. वकिली व्यवसाय करीत असताना त्यांना अनेक दिग्गज वकिलांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांसंबंधी कृतज्ञता त्यांनी एका प्रकरणात व्यक्त केली आहे. वकिली व्यवसायात न्यायदान हेच सर्वश्रेष्ठ समजले जाते. असे न्यायदान करणारे न्यायाधीश, त्यांच्या न्यायदानाची पद्धत आणि त्यातून मिळालेली प्रेरणा हे सारे लेखकाने ‘न्यायाधीश व न्यायदान’ या प्रकरणात विशद केले आहे. महिलांना असलेले कायद्याचे विशेष संरक्षण याबद्दलही त्यांनी आपल्या पुस्तकात काही मते प्रदर्शित केली आहेत. वकिली व्यवसाय करणे म्हणजे प्रचंड लोकसंपर्क. दैनंदिन जीवनात या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोकांशी संपर्क येत असल्यामुळे अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधूनही गहन आशय उलगडला जातो, याबद्दल लेखक अॅड. अनिल रुईकर ऋण व्यक्त करतात.
अॅड. अनिल रुईकर यांचे मे. जा. व्हावे! (मेहेरबानास जाहीर व्हावे) हे पुस्तक वकिली व्यवसाय करणार्या क्षेत्रातील मंडळींना उपयुक्त आहेच, त्याबरोबरच प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला एक व्यक्ती म्हणून कसे वागावे हे समजण्याकरता उपयुक्त ठरेल, ही आशा आहे.