इतिहासाचार्य वासुदेव सीताराम बेंद्रे

विवेक मराठी    15-Jul-2023
Total Views |
@मिलिंद रथकंठीवार
। 9850438575
 
इतिहास साधनांच्या प्रचंड पर्वताच्या उत्खननाच्या उलाढालींतून वा.सी. बेंद्रे यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने, किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अतिशय बहुमोल असा ठेवा आपल्यासमोर ठेवला. अभ्यासकांना, इतिहासकारांना त्यांच्या आधीच्या धारणांचे, मान्यतांचे पुनरावलोकन करण्यास यामुळेे प्रवृत्त केले. 16 जुलै हा स्व. वासुदेव सी. बेंद्रे यांचा स्मृतिदिन! त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना त्यांच्या अलौकिक कर्तृत्वाचा संक्षिप्त आढावा. 
 
vivek
 
इतिहासाचे पान न मिळते
 
कधी पहाया ते
 
आरंभ तुझा दुसर्‍या पानापासुंनी
 
शाप हा या ते..
 
अर्थात इतिहासाची सुरुवातीची पृष्ठे काळाच्या ओघात हरवली जातात, विस्मरणात जातात, लुप्त होतात. त्यामुळे ती पृष्ठे, ती प्रकरणे, तो अध्याय, ती संघर्षगाथा, तो जय, तो पराजय ज्याच्या आधारावर नवीन पिढीने बोध घेणे अभिप्रेत असते, ती प्रक्रिया अपूर्णच राहते. आपल्या दुर्दैवाने आपल्या देशाच्या इतिहासाची अशी प्रचंड अक्षम्य हानी झालेली दिसून येते. शास्त्र आणि शस्त्र यांचे संतुलन न राहिल्याने, इतिहासाविषयी समाजात एक प्रकारचे औदासीन्य आढळून येते आणि ज्या समृद्ध इतिहासाच्या वारशावर नवीन पिढीने वाटचाल करणे आवश्यक आहे, ती पिढी संभ्रमित राहते, हे ओळखून काळाच्या कृष्णविवरात लुप्त होऊ पाहणारे हे इतिहासाचे अंश शोधून एकत्र करणे ही काळाची गरज आहे, होती आणि ती राहणारच.
 
 
इतिहास ही सतत वाहणारी ओघवती प्रक्रिया आहे. सतत उजेडात येणारे नवनवीन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, नवनवीन दृष्टीकोन यामुळे इतिहासाची दिशा बदलण्याची शक्यता असतेच. आजच्या संदर्भ चौकटीतून जुन्या घटनांचे मूल्यमापन करणे हे गैर आहे, त्यामुळे एक त्रयस्थ आणि तटस्थ भूमिकेतून इतिहासाचे पुनर्मूल्यांकन, संशोधन, चिकित्सा आणि पुनर्लेखन करणे गरजेचे आहे.
 
 
वासुदेव सीताराम बेंद्रे हे बालपणापासूनच अभ्यासू विद्यार्थी म्हणून ओळखले जात. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ते महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकले नाहीत. परिस्थितीवश वयाच्या अवघ्या 16व्या वर्षांपासून त्यांनी मिळेल ती नोकरी पत्करून अर्थार्जन सुरू केले. त्यांनी विशेषत्वाने युरोपियन संस्थांमध्ये नोकरी केली, तिथेच त्यांनी टंकलेखन, लघुलेखन (शॉर्टहँड) यावर प्रभुत्व मिळविले. 1913 साली त्यांनी जागतिक स्तरावर लघुलेखन (शॉर्टहँड) परीक्षेत सुवर्णपदक मिळविले. या अर्हतेमुळे आणि त्यांच्या अंगभूत गुणांमुळे मोठे मोठे युरोपीय अधिकारी - कमिशनर, कलेक्टर यांना बेंद्रे हवेहवेसे वाटू लागले.
 
 

संघमंत्र आणि केशवार्पण पुस्तक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दीकडे वाटचाल करीत असून मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना संघविचाराने स्पर्श केला आहे. भारतमातेच्या परमवैभावाच्या कालखंड दृष्टीपथात येत असताना डॉ. हेडगेवारांनी सांगितलेल्या संघमंत्रची आठवण पुन्हा करण्याची आवश्यकता आहे

https://www.vivekprakashan.in/books/sanghmantra/

३५०/- रुपयांचा संच मिळवा केवळ ३१५/- रुपयांत

https://www.vivekprakashan.in/books/sanghmantra/


परंतु बेंद्रे ह्यांनी शिक्षण खात्यामध्येच स्थायिक होण्याचे ठरविले. 1918मध्ये ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करू लागले. महाराष्ट्राच्या 17व्या शतकाचा इतिहास हे संशोधनाचे क्षेत्र बेंद्रे यांनी प्रामुख्याने निवडले.
 
 
पुणे येथील वास्तव्यात पांडुरंग नरसिंह पटवर्धन, तात्यासाहेब केळकर, मेहेंदळे, खरे, भावे इत्यादी इतिहास संशोधकांशी त्यांचा संबंध आला आणि त्यांच्या प्रभावामुळे ते इतिहास या विषयाकडे वळले. एक साधन-संग्राहक, साधनसंपादक, साधनचिकित्सक, संशोधक व इतिहासकार या विविध भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. भारत इतिहास संशोधक मंडळाशी आजीव सभासद म्हणून वयाच्या 24व्या वर्षी त्याचा जो निकटचा संबंध आला, तो पुढे वृद्धिंगत आणि अधिक दृढ होत गेला. या काळात त्यांनी अनेकदा टिपणे लिहिली आणि त्यांची लेखनकलाही इतकी विकसित झाली की त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. सन 1928मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड साधन चिकित्सा हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या प्रेरणेने त्यांनी संशोधनाचे काम सुरू केले व आपल्या गुरूंचीच आदर्श संशोधनाची परंपरा, तत्त्वनिष्ठा, जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा पुढे चालविली. त्यांना अभिप्रेत असलेली महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हे बेंद्रे यांचे ध्येय होते.
 
 
’स्वदेशींच्या व स्वकीयांच्या इतिहासाकडे आपलेपणाने पाहणे, इतिहासकालीन निर्भेळ कडू वा गोड सत्यातून आपला देश कोणती शिकवण घेऊन राष्ट्र जिवंत ठेवू शकेल अशा तर्‍हेचे विवेचन ही राजवाडे किंवा राष्ट्रीय इतिहासाची परंपरा होय.’
 
 
इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे ह्यांचे अगाध कार्य, चिकाटी व इतिहासाविषयीचा त्यांचा अभ्यास पाहून इ.स. 1938मध्ये मुंबईचे माजी गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या इच्छेवरून खेर यांनी खास शिष्यवृत्ती देऊन वा.सी. बेंद्रे यांना सरकारी, हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोपला व इंग्लंडला पाठविले. दोन वर्षांत मराठ्यांच्या - विशेषत: संभाजी महाराजांच्या इतिहासविषयक साधनांचे संशोधन व त्याकरिता इंडिया हाउसमधील व ब्रिटिश म्युझियममधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे 25 खंड होतील एवढी सामग्री परत आणली. इंग्लंडमधील वास्तव्यामुळे बेंद्रे यांचे संशोधन-संकलन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विस्तारले. जेव्हा लंडनमधील मराठ्यांच्या इतिहासाची साधने तपासण्याची आणि ती संकलित करण्याची बेंद्रे ह्यांना संधी मिळाली, तेव्हा अशी साधने तपासताना त्यांना मराठ्यांच्या इतिहासाच्या दृष्टीने, किंबहुना महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अतिशय बहुमोल असा ठेवा प्राप्त झाला.
 
 
तोपर्यंत इब्राहीम खान नावाच्या एका परकीय व्यक्तीचे चित्र शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासविषयक पुस्तकांतून छापलेले होते. हे चित्र मनुची ह्या चित्रकाराच्या संबंधात होते. यावरून त्याच आकृतीचे चेहरे रंगवून मुसलमान पेहराव चढविलेली शिवाजी महाराजांची तथाकथित बरीच चित्रे प्रसारात आली होती. आपल्या औदासीन्यामुळे आणि अभ्यासू वृत्तीच्या अभावामुळे, संदर्भहीन असे महाराजांचे चित्र समाजात पूजिले जात होते. शिवाजी महाराजांची अधिकृत प्रतिमा म्हणून आज सर्वत्र ज्या छायाचित्राला मान्यता मिळाली आहे, ते छायाचित्र इतिहासकार वासुदेवराव बेंद्रे यांनीच आपल्या परदेश दौर्‍यात हस्तगत केले होते.
 
 
पूर्वीच्या ऐतिहासिक नाटकांचा विचार करता ती बहुतांशी उपलब्ध बखर वाङ्मयाच्या आधारे, ऐकीव व परंपरागत, प्रचलित माहितीच्या आधारे सजविलेली होती. शिवरायांच्या, संभाजीराजांच्या या चुकीच्या प्रतिमांचे साहित्यात प्रतिबिंब न उमटले तर नवलच.
 
 
संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठीत पुष्कळ नाटके लिहिली गेली, त्यातील बहुतेक नाटकांत संभाजी व्यसनाधीन, बदफैली, व्यभिचारी, दुर्वर्तनी असाच नाटककाराने उभा केला होता.
 
 
बेंद्रे ह्यांना शिवरायांची अन संभाजी महाराजांची अशी चुकीची प्रतिमा अजिबात भावली नाही. त्या चुकीच्या चौकटीतून शिवरायांची अन संभाजी महाराजांची सोडवणूक करून, सर्व विसंगती दूर करून त्यांची उज्ज्वल, उन्नत प्रतिमा, त्यांचा संघर्ष, त्यांची धर्मनिष्ठा सप्रमाण सिद्ध केली. संभाजी महाराजांची व्यक्तिरेखाच बदलली गेल्यामुळे आधीचे वाङ्मयीन लेखन पूर्णत: त्याज्य ठरले. बेंद्रे यांनी सर्व विवेचन साधार आणि संशोधनाच्या पायावर उभे केले. या चरित्रामुळे स्वाभिमानी, धर्मनिष्ठ, पराक्रमी, संस्कृत जाणकार अशा संभाजीराजांबद्दलचे सर्व गैरसमज दूर झाले.
 
 
अभ्यासकांना, इतिहासकारांना त्यांच्या आधीच्या धारणांचे, मान्यतांचे पुनरावलोकन करण्यास त्याने प्रवृत्त केले. चरित्रातील नव्या अभ्यासावर आधारित ‘इथे ओशाळला मृत्यू’ किंवा ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ अशी मानसशास्त्राचा आधार घेतलेली आणि संभाजी महाराजांची नवीनच व्यक्तिरेखा साकारणारी प्रा. कानेटकरसारख्यांची नाटके रंगमंचावर यशस्वी होऊ लागली. शिवाजी सावंतांच्या ’छावा’ने हेच दर्शविले. या नव्या कलाकृतींबरोबर नव्या इतिहास अभ्यासकांना अधिक वाव मिळाला. ‘शिवपुत्र संभाजी’सारख्या पीएच.डी.च्या ग्रंथासाठीही डॉ. कमल गोखले यांनी संशोधनासाठी बेंद्रे यांच्याच संशोधनाचा आधार घेतला.
 
 
इतिहास साधनांच्या प्रचंड पर्वताच्या उत्खननाच्या उलाढालींत जुना लोकप्रसिद्ध धर्मवीर परंतु दुर्गुणी संभाजी न सापडता एक महान विभूती असलेले संभाजी महाराज गवसले. मराठ्यांविषयी गैरसमज असलेला मुसलमान इतिहासकार काफिखान संभाजीस शिवाजीपेक्षा सवाई का समजतो, याचा उलगडा या चरित्राने होतो. संभाजी महाराजांची समाधी तुळजापूरमध्ये आहे असा प्रारंभी समज होता. कालांतराने, विषय संदर्भ मिळाल्यानंतर ही मूळ समाधी वडू-बुद्रुक येथे असल्याचे बेंद्रे यांच्या ध्यानात आले. अपार कष्ट करून त्यांनी अखेर संभाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला.
 
 
बेंद्रे यांनी संशोधनावर आतापर्यंत निरनिराळी 63 पुस्तके लिहिली आहेत. त्यांची एकूण पृष्ठसंख्या 10000पेक्षा अधिक आहे, तर विविध मासिकांत चिकित्सा पद्धतीने लिहिलेल्या संशोधनात्मक लेखांची पृष्ठसंख्या 8000पेक्षा अधिक आहे. 16 जुलै हा स्व. वासुदेव सी. बेंद्रे यांचा स्मृतिदिन! त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना त्यांच्या अलौकिक कर्तृत्वाची उजळणी करणे उचित वाटले.