न्यायनिष्ठुर शिवछत्रपती

12 Jul 2023 13:22:05

shivaji maharaj
photo credit to google

स्वराज्य हे प्रजासंरक्षणासाठी, लोककल्याणासाठी जन्माला घातले, तरी लोकांचा सामाजिक विकासही झाला पाहिजे, परस्परांतील सलोखा राखला पाहिजे, सहिष्णुता वाढीस लागली पाहिजे ह्यासाठी छत्रपती शिवराय नेहमीच दक्ष असत. ह्यातूनच न्यायनिष्ठुर शिवरायांचे दर्शन घडते.
निष्पक्ष न्याय हे आदर्श राजव्यवस्थेचे प्रमुख अंग आहे. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर हे शहाजीराजांच्या जहागिरीचे प्रांत. शिवरायांच्या नावाने हा प्रांत मोकासा झाला. बादशाहांच्या आक्रमणाखाली उजाड झालेल्या ह्या प्रांताची व्यवस्था लावताना लहानपणी जिजाऊसाहेबांबरोबर शहाजीराजांचे आणि कारभारी दादोजी कोंडदेव ह्यांचे निवाडे शिवरायांनी पाहिले होते. जमिनीबद्दल, पाटीलकी-कुलकर्णाबद्दल, इनामांबद्दल, वृत्ती व इतर हक्कांबद्दलची परस्परातील भांडणे, कज्जे त्यांनी अगदी बालवयापासून अनुभवले होते. न्याय-अन्याय, खरेखोटेपणा यांचा, तसेच स्थानिक लोकजीवनाचा त्यांचा अभ्यास दांडगा झाला आणि अंगभूत विवेकबुद्धीतून त्यांची न्यायनीतिमत्ता घडत गेली.
 
 
5 जुलै 1679च्या पत्रात मावळातील देशाधिकारी कोनेर रुद्रला लिहिलेल्या पत्रात राजे म्हणतात - ‘कर्यात मावळातील पासिणे गावाची पाटीलकी गोविंदराव शितोळ्यांच्या नावावर असताना रणपिसावाडी करंदी आपल्याकडे महजर (निवाडा पत्र) आहे म्हणून जे भांडण करतो यातील खरे काय ते आम्ही जाणतो.’ देशाधिकार्‍याने ढवळाढवळ करून कुणाच्या सांगण्यावरून वाद उकरण्याचे कारण नाही. स्वत: जिजाऊसाहेबांनी महजर करून द्या असे सांगितले व त्याकरिता गोमाजी पानसंबळ ह्यांनी जी चूक केली, त्या बाबतीतही त्यांना योग्य ती समज दिली. लहानपणापासून ह्या प्रदेशात वावरत असल्यामुळे खरी मिरासदारी कोणाची हे आम्हाला निश्चित माहीत आहे, म्हणून उगाच असल्या खोट्या भांडणांसाठी महजर करताना न्यायनिवाड्यात फुकट वेळ घालवणे आम्हाला मान्य नाही, हे महाराज निक्षून सांगतात. ह्या पत्रात महाराजांचा स्वानुभवावरील आत्मविश्वास दिसतोच, तसेच अशा न्यायप्रसंगी ते प्रत्यक्ष मातोश्रींच्या विचारांपासून स्वत:ला अलिप्त ठेवतात, ही त्यांची न्यायनिष्ठुरता आणि निष्पक्षपातीपणाही दिसून येतो. शिवाय अधिकार्‍यांनी पदाचा गैरवापर करता कामा नये, ही आग्रही भूमिका ते ठासून सांगतात.
 

shivaji maharaj 
 
photo credit to google

लोकांची भांडणे सोडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी गोतसभांमध्ये स्वत: जातीने उपस्थित राहून निवाडा केल्याची अनेक पत्रे म्हणजेच महजर उपलब्ध आहेत. वैशिष्ट्य म्हणजे अशा निवाड्यांमध्ये गोतसभेत उच्चनीचतेच्या, भेदाभेदाच्या पलीकडचा अठरापगड जातींतील अलुते-बलुतेदारांचा पूर्ण सहभाग झालेला आढळतो. वादी-प्रतिवादींचे म्हणणे, साक्षीपुरावे, इतर कागदपत्रे याबरोबरच अनेक प्रकारची दिव्ये व शपथा घेण्याचे तत्कालीन सर्वसंमत प्रकार आढळतात. अशा प्रकारच्या दिव्यांना वा शपथांना सामोरे जाताना लोकांमधील सामाजिक नीतिमत्तेचे भानही कळून येते. दि. 13 सप्टेंबर 1653च्या चाकणमधील पारच्या कारकुनांना लिहिलेल्या पत्रात महाराज कळवतात - ‘बाबदेभट ब्रह्मे व त्रिंबकभट राजगुरू यांच्यात आचार्याचे वृत्तीचे भांडण होते. हरदोजण हुजूर आले. त्रिंबकभटाने दिव्य केले. तो खोटा झाला. त्याचा भाऊ भोजभट राजगुरू इथे होता तो पळून गेला आहे. त्याला कैद करून हुजूर पाठवणे. त्रिंबकभट व भोजभट यांची माणसे कसबे मजकुरी आहेती. त्यास मोकळ देणे. त्यांची सर्व वस्तभाव जप्त करून जाबिता हुजूर पाठवणे.’ दोन ब्राह्मणांतील आचार्यवृत्तीच्या निवाड्याप्रसंगी झालेल्या दिव्यात त्रिंबकभट खोटा ठरला. त्याच्या भावासह त्याला कैद करून, सर्व मालमत्ता जप्त करून यादी बनवावी हा आदेश महाराज देतात. गोब्राह्मणप्रतिपालक असतानाही शिक्षा देताना जातपात न पाहता ब्राह्मणासही कडक शासन करण्यास महाराज मागेपुढे पाहत नाहीत.
 
 

shivaji maharaj
 photo credit to google
 
न्याय मिळवताना लोकांची फरफट व्हावी, त्यांना सर्वत्र पायपीट करूनही न्याय मिळू नये हे शिवाजी महाराजांना अजिबात मान्य नव्हते. स्वराज्यात न्याय योग्य व तत्काळ मिळाला पाहिजे, यासाठी ते कटिबद्ध होते. दि. 28 सप्टेंबर 1657च्या सुप्यातील कोल्हाळे बुद्रुक, पारच्या महजरात त्यांची ही भूमिका प्रकट होते. तिमाजी खंडेराव यांनी सोप्यातील कोल्हाळे गावाचे कुलकर्णीपण आणि ज्योतिषपण दुष्काळकाळी पणदरांकडून विकत घेतले होते. असे असताना पुढे पणदरकरांची मुले त्यावर हक्क सांगू लागली. त्यांनी सुप्याचे हवालदार शिवरायांचे सावत्र मामा संभाजी मोहिते यांना लाच देऊन खंडेरावाचे कुलकर्णीपणाचे महजर बळकावले आणि त्याला कैदेत टाकले. पुढे शहाजीराजांना कर्नाटकात जाऊन तो भेटला. त्यांनी गोतसभेचा निवाडा करावा असे सांगितले. त्यासाठी खंडेराव जेजुरीला परतल्यावर कळले की शिवाजी महाराजांनी संभाजी मोहिते यांना कैद केले आहे. आपल्यावरील अन्याय दूर करण्यासाठी त्याने शिवाजी महाराजांकडे दाद मागितली. महाराजांनी योग्यायोग्यता जाणून गोतसभेचा निवाडा करून खंडेरावाला कुलकर्णी पुन्हा मिळवून दिले. यामध्ये शहाजीराजांचा निष्पक्षतीपणा शिवरायांनी पुढे चालवला हे दिसतेच, त्याचबरोबर लाच खाऊन कुणाची बाजू घेणार्‍या प्रवृत्तीस त्यांनी पायबंद घातला होता, हेही कळते.
 
 
न्यायनिवाड्याच्या कामात उशीर होऊ नये याकडे शिवरायांचा कटाक्ष होता, तसेच अशा प्रकारच्या भांडणात वेळ जाऊन विनाकारण मनस्ताप होतो, नुकसानही होते, त्यामुळे शक्यतो सामंजस्याने असे वाद सोडवावेत, असेही त्यांचे प्रयत्न होते. शिवापूरच्या भिकाजी आणि बाळाजी बापूजी यांच्यामधील कुलकर्णीपणाच्या भांडणाबाबत 10 मे 1668ला चिमणाजी बापूजीला लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज त्यांना उगाच कुणाच्याही हक्कावर गैरप्रकारे अधिकार सांगून भांडण करीत राहण्यापेक्षा समोरासमोर बसून किंवा गोतसभेचा निवाडा करून वाद सोडवावा, असे सुचवतात. 24 मे 1651च्या महजरातही मोसे खोर्‍याच्या देशमुखीबाबत साबाजी बिन बाजी उर्फ कृष्णाजी पासलकर आणि धर्माजी बिन बालाजी पासलकर ह्यांच्या तंट्यात महाराजांनी दोघांना गोतसभेपुढे बसवून स्वत: वाद मिटवला. स्वराज्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी शत्रूला परास्त करून न्यायाचे राज्य निर्माण करण्यासाठी आपली शक्ती खर्चावी, विनाकारण भांडणात ती व्यर्थ जाऊ नये यासाठीही ते काळजी घेत होते.
 
 
shivaji maharaj
 
photo credit to google

न्यायबुद्धीने कारभार करताना कुठे मवाळ व्हायचे, कुठे जहाल राहायचे ह्याचे तारतम्य राज्यकर्त्याने बाळगले पाहिजे. शिवचरित्रात महाराजांच्या नि:स्पृह वर्तनाचे असे कितीतरी दाखले सापडतात. रोहिडखोर्‍यातील एक देशमुख केदारजी नाईक खोपडे ह्याला लिहिलेले 5 सप्टेंबर 1661चे पत्र पाहा - ‘...जे वख्ती अफझल साहेबांचे तरफेस आला होता ते वख्ती तुम्ही गनिमास मिळाले. तयावरी गनिमाचा अंमल बरतरफ जाला. याकरिता तुम्ही शकअंदेशा धरून तात्काल मजकुरास न येऊन गावगनास आजार देत आहा. तरी यामध्ये तुम्ही आपला काय फायदा समजला आहा? हे अकल तुम्हास कोणे दिधली आहे? याउपरी शकअंदेशा न धरून आपल्या वतनास येणे आणि देशमुखीचा हक खाऊन खुशहालीने राहाणे. काही शक न धरणे.’ केदारजी खोपडे हे महाराजांचे निष्ठावान सरदार कान्होजी जेधे ह्यांचे स्नेही होते. अफझलखान स्वारीप्रसंगी कान्होजींनी आपल्या मुलांसमवेत महाराजांच्या पायी लागून वतनावर पाणी सोडले. पण वतनाच्या लोभामुळे खोपडे मात्र अफझलखानाला सामील झाले. ह्या फितुरीची चीड महाराजांच्या मनात होती. तरीही कान्होजीचे संबंध आणि मावळातील सौहार्द बिघडू नये, म्हणून त्यांनी ह्या पत्रातून खोपड्यांची कानउघाडणी करताना अभयदान देऊन त्यांचे वतन त्यांच्यापाशी ठेवले. कान्होजींनी खोपड्यांचे जीवदान मागितले होते, पण फितुराला शासन झालेच पाहिजे हे राजांच्या मनात फार होते. खोपडे पुढे दरबारात येऊ लागला. एके दिवशी महाराजांचा राग अनावर झाला व त्यांनी खोपड्यांचा एक हात, एक पाय तोडला. रयतेला तोशीस लागू नये म्हणून प्रसंगी सामंजस्य दाखवणारे शिवराय जरब शिक्षा करताना किती न्यायनिष्ठुर होते, हे या प्रसंगातून दिसते.
 
 
नवीन न्यायनिवाडे करताना पूर्वी दिलेले निवाडेही महाराजांनी विचारात घेतल्याचे दिसते. 17 डिसेंबर 1668 रोजी तारा, पुण्याच्या सुभेदारांना, कारकुनांना ते पत्राद्वारे कळवतात, ‘पंताजी गोपीनाथ यांही साहेबांपासी येऊन सांगितले की पा सुपे व कर्यात बारामतीचे देशकुलकर्ण पूर्वापार आपले आहे. सध्या विठ्ठल महादेव व जिवक गोखदेऊ बुचके खातात. पूर्वी मलिकंबर रणदुल्लाखान, महाराजसाहेब, शास्ताखान, जसवंतसिंग, मिर्जाराजा यांनी निवाडे केले आहेत. परंतु पैकियाच्या बळे वादी यांनी माझ्या मुतालिकास मिराशीवर बसू दिले नाही. तरी साहेबी पुण्यात अमीन आहेत. त्यांना लिहून बरहक निवाडा करून विल्हे लावावे. तरी तुम्ही तेथे आहा. राजश्री पंत यासी व अमीन जे असतील त्यांसी सांगोन विठ्ठल महादेव व त्रिंबक गोखदेऊ बुचके यांस तलब करून, गोहीसाक्ष विचारून, बरहक निवाडा करणे. गोतमुखे ज्याचे होईल तो खाईल. तुम्ही या कामात मन घालून जितकी मदत तुमच्याने होईल तितकी करून कार्यभाग सिद्धी पावे ते करणे.’ गोपीनाथपंतांनी अफझलखानवधाप्रसंगी मोलाची भूमिका बजावली होती. गोपीनाथपंतांचे थोरपण लक्षात घेऊनही आधीचे निवाडे व गोताचा निवाडा हे महाराजांनी महत्त्वाचे मानले आहेत. पंतांना मदत करायची आहे, पण उगाच वशिल्याने कुणावर तरी अन्याय होता कामा नये, ही न्यायबुद्धी महाराज दाखवतात.
 
 
शिवरायांच्या बालपणी दादोजी कोंडदेवांनी दिलेल्या निवाड्यांचा महाराजांनी सन्मान केला, असे कितीतरी पत्रांतून दिसते. उदाहरणार्थ, ऑगस्ट-सप्टेंबर 1675, ‘प्रति-महादजी सामराज, सुभेदार व कारकून, सुभा माहालानिहाये तार मावले सिदंभट ठकार याला कर्यात मावळात साडेनऊ गावांचे कुलकर्ण आहे. हाली चंद्रभट ठकार आपल्याला वाटा द्यावा म्हणून गळा पडतो, त्याला ताकीद करावी, असे सिदभटाने येऊन सांगितले. तरी कथला करण्याची गरज काय? साहेब कोण्हास नवे करू देत नाहीत. दादाजी कोंडदेवांच्या कारकीर्दीत चालत आले असेल ते खरे. तेव्हा भोगवटा झाला असेल त्याप्रमाणे चालवणे.’ दादोजी कोंडदेवांचा निवाडा योग्य असून नवीन निवाड्याची गरज नाही, असे महाराज इथे निक्षून सांगतात. स्त्रीअब्रूसंरक्षण, स्त्रियांची प्रतिष्ठा हे शिवराय अत्यंत मोलाचे मानीत. परंतु त्यांनी न्यायासनासमोर स्त्री-पुरुष भेद कधीच बाळगला नाही. ‘प्रति शामजी आऊजी, हवालदार, कारकून, तार जालगाऊ 1 जून 1675 (किंवा 20 मे 1676) सूर्याजी दुंदुसकर, जुमला, हसम पावलोक, याच्या चाकराची बाईल किले रायगडास मजुरीस होती. तिणे काही बदअमल मजुरी करीत असता केला होता. नरहरी बाबाजी तर्फदार तर्फ मजकूर यास हे हकीकत कळाली. यावरी ते बायकोपासून सत्तावन घ्यावे ये गोष्टीचे तसवीस लावून सूर्याजी दुसकर याचे घरी मोकळदार बैसविले. म्हणोन हुजूर कळो आले. तरी जे काही हकीकत असेल ते हुजूर लेहून पाठविणे. त्याची विल्हे हुजूर होईल.’ कुठल्या स्त्रीनेही जर कधी बदअंमल केला, तर योग्य चौकशी करून तिलाही शासन केले पाहिजे, हे महाराजांचे म्हणणे न्यायनिष्ठुरतेचे मोठे उदाहरण आहे. स्वत: चारित्र्यसंपन्न असलेले शिवछत्रपती प्रजेचे चारित्र्यही उत्तम असावे ह्या बाबतीत सजग होते.
 
 
राज्यकारभारात आणि न्यायदानात लाच घेणे, पैसे खाणे, वशिला लावणे अशा प्रकारांबद्दल शिवरायांना प्रचंड चीड होती. पार पुण्याच्या नारोबा मुतालिक देशमुखाला 26 डिसेंबर 1678ला लिहिलेल्या पत्रात महाराजांनी कडक शब्दांत झाडले आहे. ‘रायाजी मुगर, पाटील, मौजे हडपसर, पा मजकूर याचा व सोनजी तुपा यांचा व्यवहार तू मनास आणून रायाजी खोटा करून रायाजीस गुन्हेगारी दोनशे होनांची लावविली व गडावर पैकियाबदल घातले आहे हे कळो आले. तरी मध्येच मनसुफी कराया व येकाची पाठ राखाया तुला गरज काय? याउपरी पैसे नसते कथले करीत न जाणे रायाजीकडून पैसे घेतले असतील ते परतोन देणे. स्वामी रायगडास येतील दोषांनाही हुजूर आणून निवाडा करून खरा होईल तो पाटीलकी खाईल. तू काही इस्किल न करणे.’ महाराजांनी नारोबा मुतालिकाला खडे बोल सुनावत, रायाजी पाटलाकडून घेतलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले.
 
स्वराज्य हे प्रजासंरक्षणासाठी, लोककल्याणासाठी जन्माला घातले तरी लोकांचा सामाजिक विकासही झाला पाहिजे, परस्परांतील सलोखा राखला पाहिजे, सहिष्णुता वाढीस लागली पाहिजे ह्यासाठी ते केवढे दक्ष होते, ह्यातूनच शिवरायांचे असामान्यत्व अधोरेखित होते. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत या विशेषणांबरोबर समर्थ रामदासस्वामींनी त्यांना ‘नीतिवंत’, ’जाणता राजा’ हे शब्द समर्पकतेने योजले, ते उगाच नाही.
 
 
लेखक इतिहास अभ्यासक व भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष आहेत.
Powered By Sangraha 9.0