अधिक मास केव्हा घ्यायचा, ह्यासाठी शास्त्र आहे. जर एका चांद्र महिन्यात सूर्याचे राशीसंक्रमण झाले नाही, तर त्या महिन्यात अधिक मास घेतला जातो. आणि जर एका चांद्र महिन्यात सूर्याचे दोनदा राशीसंक्रमण झाले, तर? तर तो मास क्षय होतो, बाद होतो! सर्वसाधारणपणे अधिक मास हा चैत्र ते आश्विन ह्या 7 महिन्यांत येतो. ह्या वर्षी श्रावण अधिक आला आहे.
निसर्गाच्या चालण्याला एक लय आहे. अति-विलंबित लय. तत्काळ कळत नाही ती. कान देऊन ऐकावी लागते. मन लावून पाहावी लागते. नाकाने सुंघावी लागते. स्पर्शाने जाणावी लागते. जिह्वेने त्याची चव घ्यावी लागते. एक दिवस सकाळी उठून तासभर निरीक्षण करून काही लक्षात येत नाही. अनेक वर्षे, रोजच्या रोज, पहाटे, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, पूर्वरात्री, उत्तररात्री हे निरीक्षण करत राहावे लागते. मग त्याची लय किती विलंबित आहे ते कळते. ती मोजायला 360 मात्रा लागतात, हे स्पष्ट होते. त्याच्या तालाचे 12 विभाग कळायला लागतात. त्याच्या पुढच्या पावलाची चाहूल ऐकू येऊ लागते. निसर्ग कधी त्याचा ठेका चुकवत नाही. बरोबर समेला तो पाऊस घेऊन येतो. एका समेपासून पुढच्या समेपर्यंतचे त्याचे एक आवर्तन होते.
त्याची एक मात्रा म्हणजे एक दिवस. 360 मात्रांचे एक आवर्तन म्हणजे एक वर्ष. त्याचे 12 विभाग म्हणजे 12 महिने. आणि दोन दोन विभागांचे एक एक असे 6 ऋतू होतात. त्याची सम म्हणजे वर्षा ऋतू असल्याने, एका आवर्तनाला वर्ष म्हटले. आणि मग ‘मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे अधिक पाहिले आहेत!’ म्हणजेच चार वर्षे अधिक पाहिली आहेत. किंवा वाढदिवसाला ‘जीवेत शरद: शतम्’ म्हणजेच तू शंभर शरद ऋतू पाहा अथवा शंभर वर्षे जग असा आशीर्वाद! वर्ष आणि ऋतुचक्र दोन्ही एकच आहेत.
मग हे वर्ष मोजायचे कसे? त्यासाठी आकाशाच्या घड्याळात एक अतिशय सोयीचा काटा आहे - चंद्र. रोज त्याचा आकार बदलतो. पहिले पंधरा दिवस वाढत जाणार्या आणि पुढचे पंधरा दिवस लहान होत जाणार्या चंद्राचे विविध आकार म्हणजे एक एक कला. आपोआप प्रत्येक दिवसाला कलेनुसार नाव दिले गेले. पहिल्या पंधरा दिवसात, शुक्ल पक्षात, मोठा होत असताना - प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी.. .. पौर्णिमा. पुढच्या पंधरा दिवसात - कृष्ण पक्षात, लहान होत असताना - प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी.. ..अमावस्या.
हा काटा दोन कामे करतो - फक्त दिवस सांगतो असे नाही, तर महिनासुद्धा सांगतो. पौर्णिमेचा चंद्र ज्या नक्षत्रात उगवेल ते नाव महिन्याला. चित्रा नक्षत्रातील पौर्णिमा - चैत्र महिना, विशाखा नक्षत्रातील पौर्णिमा - वैशाख महिना.. इत्यादी. एका वर्षात बारा पौर्णिमा येतात, म्हणून एक वर्ष बारा महिन्यांचे झाले. चंद्रानुसार मोजले म्हणून हे चांद्र वर्ष. या चांद्र वर्षाचा कालावधी आहे 354.36 दिवसांचा. आणि इथेच सगळा घोळ आहे!
तो घोळ काय, ते पाहू. आकाशाच्या घड्याळात आणखी एक काटा आहे - सूर्याचा. सूर्य प्रत्येक राशीत एक महिना राहतो. सूर्याने एका राशीतून दुसर्या राशीत संक्रमण केले, म्हणजेच त्या त्या राशीची संक्रांत झाली की सौर मास सुरू होतो. एका वर्षात बारा राशींच्या बारा संक्रांती होतात. सूर्याची ही बारा राशींमधून फेरी म्हणजे एक सौर वर्ष. हा कालावधी आहे 365.24 दिवसांचा.
म्हणजे काय झाले? सौर वर्ष हे चांद्र वर्षापेक्षा 10 ते 11 दिवसांनी मोठे झाले. ऋतुचक्र तर सूर्याशी किंवा सौर वर्षाशी बांधलेले आहे. सौर वर्ष आणि ऋतुचक्र छान हातात हात घालून चालतात.
आता चंद्राच्या काट्याच्या गतीनुसार कालगणना केली, तर ती दर वर्षी 10-11 दिवसांनी ऋतुचक्राच्या मागे पडणार. मकरसंक्रांत सोडली, तर सगळे सण चांद्र वर्षानुसार साजरे केले जातात. ही गणना केली तर दर तीन वर्षांनी सगळे सण एक एक ऋतू मागे पडतात. मग ऐन उन्हाळ्यात गणपती, थंडीत रामनवमी आणि भर पावसाळ्यात दिवाळी येऊ शकते. आपल्याला तर सण ठरलेल्या ऋतूमध्येच यायला हवेत. रामनवमीचे कैरीचे पन्हे उन्हाळ्यातच, दिवाळीचे तळलेले पदार्थ थंडीतच आणि चतुर्मास्याचे उपास पावसाळ्यातच यायला हवेत.
मग आता वर्ष कसे मोजायचे? सूर्याच्या काट्याने की चंद्राच्या काट्याने? सूर्याप्रमाणे मोजले, तर ऋतूबरोबर चालता येते. पण मग तो चंद्राचा लहान - मोठा होणारा घड्याळातला काटा वापरता येत नाही. चंद्राप्रमाणे मोजले, तर ऋतूंबरोबर धावता येत नाही. ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतंय’ अशी स्थिती! त्यावर उपाय काय? रोमन व इजिप्शियन लोकांनी चंद्राचा नाद सोडून दिला आणि सरळ फक्त सौर वर्ष मोजले. ह्या कालगणनेतील दिवस आणि चंद्राची कला ह्यांचा काही संबंधच राहत नाही, मग 1 जानेवारीला पौर्णिमा असू देत, नाहीतर अमावस्या. त्या तारखेला चंद्राच्या कोरीशी काहीच देणेघेणे नसते. अरबी लोकांनी सूर्याची साथ सोडून दिली आणि चांद्र वर्ष मोजले. ह्या कालगणनेतील वर्षाने ऋतुचक्राशी फारकत घेतली. मग ईद कधी थंडीत येते, कधी उन्हाळ्यात तर कधी पावसाळ्यात येते!
पण काही प्राचीन संस्कृतींनी - उदा., ग्रीक, चिनी आणि भारतीय ह्यांनी चंद्राची दिवस मोजण्याची सोय आणि सूर्याची ऋतुचक्र मोजायची सोय दोन्ही जोडून घेतली. त्यासाठी त्यांनी काय केले? वर्ष, महिने, दिवस चंद्राच्या काट्याने मोजले. पण मग चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यांत 30 दिवसांचा फरक पडला की चांद्र कॅलेंडरमध्ये एक अधिक मास घातला. साधारण दर अडीच वर्षांनी दोन्हीमध्ये 30 दिवसांचा फरक पडतो. मग अधिक मास घातला की चांद्र वर्ष पुन्हा ऋतुचक्राबरोबर धावू लागते. अधिक मास घेऊन चांद्र आणि सौर वर्षांची सांगड घालायची पद्धत आपल्याकडे वैदिक काळापासून आहे.
हा अधिक मास केव्हा घ्यायचा, ह्यासाठी शास्त्र आहे. जर एका चांद्र महिन्यात सूर्याचे राशीसंक्रमण झाले नाही, तर त्या महिन्यात अधिक मास घेतला जातो. आणि जर एका चांद्र महिन्यात सूर्याचे दोनदा राशीसंक्रमण झाले, तर? तर तो मास क्षय होतो, बाद होतो! सर्वसाधारणपणे अधिक मास हा चैत्र ते आश्विन ह्या 7 महिन्यांत येतो. ह्या वर्षी श्रावण अधिक आला आहे.
हे सगळे शास्त्रीय कारण कितीही गुंतागुंतीचे असले, तरी ते सामान्य लोकांना, लहान मुलांना कळावे, म्हणून कित्येक कहाण्या लिहिल्या गेल्या. वार समजावेत, रुजावेत म्हणून वाराच्या कहाण्या झाल्या. सणांच्या कहाण्या झाल्या. तशी अधिक मासाचीसुद्धा कहाणी आहे, ती अशी -
एकदा काय झाले? अधिक मासात सूर्याचे राशीसंक्रमण होत नाही, त्या महिन्यात संक्रांत येत नाही, म्हणून त्याला मलीन मास किंव मल मास म्हटले गेले. मग त्याला खूप वाईट वाटले. तो आपले गार्हाणे घेऊन विष्णूकडे गेला. विष्णूला त्याची दया आली. तो म्हणाला, “ह्यापुढे तू काही मलीन राहणार नाहीस! आता तू माझा झालास, म्हणून तुला पुरुषोत्तम मास म्हटले जाईल! ह्या महिन्यात जे लोक तीर्थयात्रा, उपवास, व्रतनियम, दानधर्म वगैरे धर्माचरणाची पुण्यकर्मे करतील, त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल. त्यांचे मनोरथ पूर्ण होतील. त्यांच्यावर पुरुषोत्तमाची कृपा होऊन त्यांना मुक्ती मिळेल!”
ह्या महिन्यात काय करावे? प्रत्येकाने काहीतरी विशेष यागाचे, आरोग्याचे, मन:शांतीचे पुण्यकर्म करावे. जे असे व्रत घेतील, त्यांना पुरुषोत्तमाचा अधिक मास लाभेल! ही अधिक मासाची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!