विज्ञानभारतीच्या विज्ञानप्रसाराच्या व विज्ञानजागृतीच्या मौलिक कार्यात जयंतरावांचे योगदान अमूल्य असे आहे. विज्ञानभारतीच्या कामाला त्यांनी विविध आयाम जोडले, तसेच भारतीय कला आणि विज्ञान अशा अनेकविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन जयंतरावांच्या मार्गदर्शनाने सुरू झाले.
@डॉ. क.कृ. क्षीरसागर
आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची गंगोत्री भारतीय भूमीत उगम पावते. पुरातत्त्वशास्त्र, प्राचीन वाङ्मय आणि ते निर्माण करणारे ॠषितुल्य तत्त्वचिंतक यांचा आधार घेऊन या उगमापासून सुरू झालेल्या प्रवाहाचा मागोवा घेता येतो. विज्ञान विकासाचे मूळ अंतिम सत्याचा वेध घेणार्या चिंतनाच्या बैठकीवर आधारित असल्याचा प्रत्यय अभ्यासकांना येतो. शून्यासारखा गणितीय संकल्पना, आरोग्याचा मूलभूत विचार करणारे आयुर्वेदासारखे ग्रंथ, उत्खननातून हाती आलेले पुरावशेष, अवकाशातील ग्रह, नक्षत्र यांची स्थिती असे अनेक आधार विज्ञान-तंत्रज्ञानाचा उगम आणि पुढच्या विकास-प्रवाहाचा मार्ग निश्चित करण्यासाठी उपयोगी पडतात. याविषयी सखोल व शास्त्राधारित संशोधन करून मिळणारी माहिती भारतीय समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विज्ञान भारतीची स्थापना झाली. 1991मध्ये स्थापन झालेल्या विज्ञान भारतीचे कार्य राष्ट्रीय पातळीवर विस्तारत गेले. या कार्याला वाहून घेतलेल्या अनेक वैज्ञानिकांची, विज्ञानसंस्थांची, प्राध्यापकांची व तंत्रज्ञांची संख्या वाढत गेली. या प्रसारकार्यात सहयोगी होणार्या कार्यकर्त्यांमध्ये शीर्षस्थान भूषविले ते जयंत श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी. दुर्दैवाने 2 जून 2023 रोजी त्यांच्या दु:खद निधनाने विज्ञान भारतीच्या विज्ञानप्रसाराच्या व विज्ञानजागृतीच्या मौलिक कार्यात खंड पडला आहे. जयंतरावांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अत्यंत अवघड आहे. जयंतराव 2 सप्टेंबर 2022 रोजी विज्ञान भारतीच्या एका नियोजन बैठकीसाठी डेहराडूनला गेले होते. बैठक संपल्यावर दिल्लीला परत येण्यासाठी ते रात्री प्रवासाला निघाले आणि पहाटे दिल्लीजवळच्या नॉयडात त्यांच्या वाहनाला गंभीर अपघात झाला. जयंतरावांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू झाले, परंतु जयंतराव दीर्घकाळ बेशुद्धावस्थेतच राहिले. विविध प्रकारच्या उपचारांना यश मिळाले नाही आणि शेवटी नऊ महिन्यांनी - 2 जून 2023 रोजी पहाटे पुण्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. रात्री प्रवास आणि दिवसभर काम या संघप्रचारकांच्या ध्येयवादी जीवनक्रमानुसार जयंतरावही कार्यरत राहिले, परंतु शेवटी नियतीने घाला घातलाच.
बालपणापासून राष्ट्रसेवेच्या झालेल्या संघसंस्कारांमुळे त्यांनी 1989मध्ये नोकरीचा त्याग केला आणि ते पूर्णवेळ प्रचारक झाले. नंतरच्या काळात त्यांनी गोवा विभाग प्रचारक म्हणून दायित्व स्वीकारले. 2001 ते 2009 या काळात त्यांच्याकडे कोकण प्रांत प्रचारकाचे दायित्व आले.
जयंतरावांचा जन्म 17 एप्रिल 1966 रोजी मुंबईतील गिरगाव येथे झाला. त्यांचे वडील श्रीकांत सहस्रबुद्धे हे संघकार्यकर्ते आहेत, तर आई राष्ट्रसेविका समितीच्या कार्यकर्त्या आहेत. सर्व कुटुंबच संघविचाराने भारलेले आहे. जयंतरावांनी B.Sc.Tech (Eletronics) ही पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. नंतर मुंबईतील भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये (BARCमध्ये) काही काळ संशोधक म्हणून नोकरी केली. परंतु बालपणापासून राष्ट्रसेवेच्या झालेल्या संघसंस्कारांमुळे त्यांनी 1989मध्ये नोकरीचा त्याग केला आणि ते पूर्णवेळ प्रचारक झाले. नंतरच्या काळात त्यांनी गोवा विभाग प्रचारक म्हणून दायित्व स्वीकारले. 2001 ते 2009 या काळात त्यांच्याकडे कोकण प्रांत प्रचारकाचे दायित्व आले. काही काळ ते हो.वै. शेषाद्रींचे साहाय्यक सचिव होते. शेवटी 2009पासून ते विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव झाले. त्यांचा आणि माझा वैयक्तिक परिचय 2009मध्येच झाला. मुंबईच्या केशवसृष्टीत विज्ञान भारतीच्या केंद्रीय कार्यकारिणीची वार्षिक सभा आयोजित केली होती. पुण्याहून आलेले आम्ही कार्यकर्ते बसमधून उतरताच एक व्यक्ती पुढे आली आणि माझ्या हातातील सामान घेऊन त्यांनी आमच्या निवासस्थानापर्यंत नेले. नंतरच्या कार्यक्रमाच्या वेळी मला समजले की, ती व्यक्ती म्हणजे पूर्वकालिक संघप्रचारक असलेले विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव जयंतराव सहस्रबुद्धे. मी त्यांच्या नम्र वर्तनाने शरमून गेलो. त्यांच्या या नम्र व निरंहकारी स्वभावाचा अनुभव पुढच्या कार्यकाळात सातत्याने आला.
जयंतरावांची कार्यपद्धती, दूरदृष्टी, संघटनकौशल्य, कामाचा झपाटा, लोकसंग्रह अशा अनेक पैलूंचा परिचय कालौघात होत गेला. परंतु अजूनही जयंतराव पूर्णपणे समजले नाहीत, ही खंत कायम आहे. विज्ञान भारतीचे काम देशातील विख्यात वैज्ञानिक संशोधन संस्था आणि शिक्षण संस्था, त्याचप्रमाणे विज्ञान क्षेत्रात कार्य करणार्या सामाजिक संस्था यांच्यापर्यंत थेट पोहोचविण्याची त्यांची कार्यपद्धती विशेष उल्लेखनीय आहे.
भारताच्या 30 राज्यांत आणि 7 परदेशांत विज्ञान भारतीचा विस्तार करण्याचे बरेचसे श्रेय जयंतरावांकडे जाते.
विज्ञान भारतीच्या कामाला त्यांनी विविध आयाम जोडले. विद्यार्थी विज्ञान मंथन, टेक फॉर सेवा, इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल, विश्ववेद विज्ञान संमेलन, वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशन, ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट्स फोरम (GIST), नॅशनल आयुर्वेद स्टुडंट्स यूथ असोसिएशन (न्यासा), महिला वैज्ञानिकांचे ‘शाक्ती’ संघटन, पारंपरिक भारतीय कला आणि विज्ञान अशा अनेकविध उपक्रमांचे प्रभावी आयोजन जयंतरावांच्या मार्गदर्शनाने सुरू झाले. भारताच्या 30 राज्यांत आणि 7 परदेशांत विज्ञान भारतीचा विस्तार करण्याचे बरेचसे श्रेय जयंतरावांकडे जाते.
स्वातंत्र्याचा अमृतकाल या निमित्ताने विज्ञान भारतीने अनेक उपक्रम योजले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भारतीय वैज्ञानिकांचे आणि तंत्रज्ञांचे अज्ञात योगदान प्रकाशात आणण्यासाठी या उपक्रमांचा उपयोग झाला. या उपक्रमांमध्ये अनेक भारतीय वैज्ञानिकांचे राष्ट्रहितैषी योगदान या विषयावर प्रकट व्याख्याने व प्रदर्शने योजण्यात आली. जयंतरावांनी याविषयी मार्गदर्शन तर केलेच, तसेच अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. लेख लिहिले. भारतीय विज्ञानाचा प्रसार करणार्या ‘सायन्स इंडिया’ या नियतकालिकाचे ते संपादक सल्लागार मंडळाचे प्रमुख सदस्य होते. ‘विज्ञान क्षेत्रातील स्वातंत्र्यलढ्याची अज्ञात गाथा’ या विविध भाषांतील पुस्तकाचे प्रास्ताविक व एक लेख जयंतरावांनी लिहिला आहे. या विषयांवर व्याख्याने देणार्या वक्त्यांचे प्रबोधन करण्यावर त्यांचा भर होता.
जयंतरावांनी भविष्यकालीन अनेक योजनांचे आणि उपक्रमांचे सूतोवाच केले होते. भारतीयांचा विज्ञानक्षेत्रातील न्यूनगंड दूर करून आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढावे, हा त्यांचा प्रमुख दृष्टीकोन होता. विज्ञान भारतीचे हे ध्येय नजीकच्या काळात साध्य व्हावे, यासाठी ते आग्रही होते.
जयंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचे वास्तविक चित्रण करणे अत्यंत कठीण आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व ‘स्थिरचर व्यापुनि दशांगुळे उरला’ अशा प्रकारचे होते. ते पूर्णपणे शब्दांकित करणे अशक्यच आहे.
मा. जयंतरावांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विविध विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधन संस्थांचे निदेशक व संशोधक, प्राचार्य, प्राध्यापक, राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंतरावांच्या लोकसंग्रहाचे ते दर्शन होते.
मा. जयंतरावांच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवादन.