@शोभा रमेश पांडव
। 9730081662
आषाढ शुद्ध दशमी (म्हणजे या वर्षी 28 जून) हा दिवस राष्ट्र सेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशींचा जन्मदिन. वंदनीय मावशींचा जन्मदिन हा राष्ट्र सेविका समितीचा संकल्प दिन म्हणून समितीत साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात समितीची स्थापना झाली. अंधश्रद्धेचा पगडा आणि परावलंबित्व अशा बेड्यांत अडकलेल्या स्त्रीला संरक्षणक्षम करण्याचा ध्यास घेऊन वंदनीय मावशी केळकर यांनी समितीची स्थापना केली.
वंदनीय मौसी जी,
सादर प्रणाम।
अब हमे सिंध छोडना ही पडेगा, यह बात बिलकुल स्पष्ट है। क्यों की, हमारी मातृभूमी अब मुसलमानों की भोगभूमी बन रही है। हम चाहते थे की, इसी भूमि में हम निरंतर रहे, पर अब बिलकुल असंभवसा प्रतीत होता है। मौसी जी, सिंध की सब सेविकायें चाहती है, की भारत वर्ष का विभाजन होने से पहिले आप एक बार हमारे बीच आजाए। ताकी पवित्र सिंधू को साक्षी रखते हुए आपकी महान उपस्थिती में हम इस महान देश के प्रति हमारी जिम्मेदारियां निभाने के लिए प्रतिज्ञा बद्ध हो जाये। आपका यहां आना इसलिये जरुरी है कि, बिदाई के अति कठीन समय पर आप जैसी प्रेमदायी, धैर्यदायी माता की उपस्थिती मे दुख का बोझ हलका महसूस होगा। और भविष्य के कर्तव्य की ओर निर्भयता से बढने की प्रेरणा मिलेगी।
क्या आप हमारी आरजू पुरी करेगी?
आपकी
जेठी देवानी
जिवाला अत्यंत चटका लावणारे माननीय जेठी बहनजींचे हे पत्र मावशींनी वाचले, क्षणभर विचार केला आणि मनाचा निश्चय करून वेणुताई कळमकर यांना सांगितले,
“आपल्याला कराचीला जायलाच पाहिजे.”
पहिले महायुद्ध थांबले खरे, पण भारत - पाकिस्तान फाळणी अटळ असल्याचे भाकीत स्पष्ट जाणवू लागले होते. खंडित भारताचे स्वातंत्र्य जवळ येत असल्याची चाहूल सगळ्यांना लागली होती.
’‘देशाची परिस्थिती फारच बिघडलेली आहे, जरा विचार करायला पाहिजे.” वेणुताई म्हणाल्या.
क्षणाचाही विलंब न करता वंदनीय मावशी म्हणाल्या,
“विचार हाच की जायलाच पाहिजे. तुम्ही व दिना (मावशींचा मुलगा दिनकर केळकर) माझ्यासोबत चला.”
कठोर कर्तव्यनिष्ठा आणि आपल्या अनुयायांसाठी जिवाची बाजी लावणारे, कशाचीही पर्वा न करता धावून जाणारे हे नेतृत्व. अशा या आपल्या वंदनीय मावशी. कराचीला ताबडतोब जाण्याची तयारी झाली.
वं. मावशी व वेणुताई 13 ऑगस्ट 1947ला जुहू (मुंबई) विमानतळावर पोहोचल्या. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यप्राप्तीचा दिवस झाला होता. आणि काय आश्चर्य, ह्या समारंभाला भारतातून अनेक मुसलमान पाकिस्तानात चालले होते, यामुळे कराचीला जाणार्यांची तुफान गर्दी होती. अशा परिस्थितीत कराचीला जाण्याचे धाडस या दोनच महिला कसं काय करत आहेत? एक, वय वर्षं चाळीस तर दुसरी पस्तीस. म्हणजे दोघीही तरुणच! विमानात चढल्या, विमानात अन्य फक्त दोनच हिंदू - जयप्रकाश नारायण आणि पुण्याचे देव. ते दोघेही कर्णावतीला (अहमदाबादला) उतरले. संपूर्ण विमानात या दोन हिंदू महिला सोडल्या, तर सगळे मुसलमानच उरले.
संपूर्ण प्रवासात घोषणा चालू होत्या, ’‘हसके लिया पाकिस्तान, लढके लेंगे हिंदुस्तान.” पण मावशींनी तिकडे जराही लक्ष दिले नाही. स्वसंरक्षणासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्याजवळ जंबिया (धारदार चाकू) होता. मनात विचारांचे काहूर माजले होते, कराचीत काय परिस्थिती असेल? मात्र भीतीचा लवलेशही त्यांच्या मनात नव्हता. आणि ज्या कराचीत पोहोचल्या.
14 ऑगस्ट 1947. रात्री बारा वाजता कराचीत एका घराच्या प्रशस्त गच्चीवर सिंधमधील ठिकठिकाणाहून आलेल्या राष्ट्र सेविका समितीच्या सुमारे 1200 सेविका त्या ठिकाणी एकत्रित झाल्या होत्या. आपल्या हाकेला ओ देऊन आपल्या मावशी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता अशा कठीण परिस्थितीत इथे आल्या, त्याबद्दलचा आनंद आणि विश्वास सेविकांच्या मनात मावत नव्हता. मध्यरात्रीसुद्धा पाकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या घोषणांनी सगळे शहर दुमदुमून गेले होते. अत्याचाराला ऊत आला होता. पंजाब, लाहोरमध्ये राक्षसी वृत्तीने थैमान घातले होते. त्याच वेळी पवित्र भगव्या ध्वजाला साक्षी ठेवून प्रत्येक सेविका आपले रक्त ध्वजाला वाहून प्रतिज्ञा घेत होती.
मावशी धीरगंभीर आवाजात प्रतिज्ञा देत होत्या. सगळ्या सेविकांच्या प्रतिज्ञाचा कार्यक्रम संपल्यावर मावशींनी मार्गदर्शन केले, “धीर सोडू नका, भ्याडासारख्या वागू नका, आपल्या शीलाला जपा, स्वत:ला जपा व संघटनेवर विश्वास ठेवा; आता खरी संघटनेची कसोटी आहे.”
कोण होत्या या वं. मावशी?
वं. मावशी पूर्वाश्रमीच्या कुमारी कमल दाते. वडील भास्करराव दाते (नागपूर), तर आई यशोदाबाई. या दांपत्याला एकूण नऊ अपत्ये झाली. त्यातील कमलचा क्रमांक दुसरा. या कमलचा जन्म आषाढ शुद्ध 10, म्हणजे 6 जुलै 1905 या दिवशी झाला. स्वाभाविकच अन्य सर्व भावंडांची ही आक्का होती. सर्व भावंडांत मोठ्या, म्हणून सोशिकपणा स्वाभाविकच कमलमध्ये लहानपणापासूनच होता. नावाप्रमाणेच अंगकांती गोरीपान व तेजस्वी आणि शरीरयष्टी रेखीव होती. इ.स. 1911 ते 1914 असे चौथीपर्यंत नागपुरात शिक्षण झाल्यानंतर लगेच 1919 जूनमध्ये अवघ्या चौदाव्या वर्षी वर्ध्याचे प्रसिद्ध वकील असलेल्या पुरुषोत्तम केळकर यांच्याशी कमलचा विवाह होऊन लक्ष्मीबाई केळकर म्हणून गृहप्रवेश झाला. त्या काळी कमलची वरात हत्तीवरून निघाली होती, यावरून केळकरांची आर्थिक स्थिती लक्षात यावी. घरातील मोठ्या जाऊबाई म्हणजे उमाताई यांनी मावशींना अखेरपर्यंत मोठ्या बहिणीच्या मायेने साथ दिली. इ.स. 1920 ते 1932 या कालावधीत मावशींना सहा मुले झाली. मुळात लग्न होऊन केळकरांच्या घरात प्रवेश केला तोच दोन मुलींची आई म्हणून. वारलेल्या सवतीच्या या दोन मुली, शिवाय स्वत:ची सहा मुले अशा एकूण आठ अपत्यांचा सांभाळ त्यांनी उत्तम केला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 6 जुलै 1932 रोजी मावशींचे पतिछत्र हरपले. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षीच हा वैधव्याचा वज्राघात झाला.
वंदनीय मावशींची वैचारिक पृष्ठभूमी
वंदनीय मावशींचा मुलगा दिनकर याला शाळेत अब्दुल नावाचा मुलगा त्रास देई, म्हणून एकदा दिनकर व त्याच्या मित्रांनी त्याला चांगलेच ठोकले. या गुन्ह्याबद्दल मुख्याध्यापकांनी त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन रुपये दंड केला व अब्दुलची जाहीर माफी मागायला सांगितले. मावशींनी ते सर्व नीट ऐकून घेतले. खरा प्रकार काय आहे याची बारकाईने चौकशी केली, दंड भरण्याची स्वत: तयारी दाखवली. पण मुख्याध्यापकांना त्या म्हणाल्या, “मुलांनी असे मारामारी करणे चूक आहे. त्याबद्दल दंड केलात ते ठीक आहे, पण नेहमी मुलांना त्रास देणार्या त्या अब्दुलची जर माफी मागितली, तर त्याला पुन्हा हवे तसे वागण्याचा परवानाच मिळेल. तेव्हा त्यालाही समजले पाहिजे की आपली अरेरावी मुले खपवून घेणार नाहीत. म्हणून माझा मुलगा माफी मागणार नाही.” हे त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितले. त्यांच्या बोलण्यालासुद्धा अशी काही धार होती की माफीचा आग्रह मुख्याध्यापकांनी सोडून दिला.
मावशींच्या कोणा नातेवाइकांकडे धार्मिक कार्य, होमहवन होते. मावशी जाऊबाईंना म्हणाल्या, “जाईन मी, कारण मुलांच्या तर शाळा आहेत आणि कोणीतरी जायला तर पाहिजेच.” उमाकाकू त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. मावशींना कसे सांगावे हेच त्यांना समजेना. शेवटी धीर करून त्या म्हणाल्या, “अहो, आपल्यासारख्या बायकांनी अशा समारंभात जाण्याची पद्धत नाही, अपशकुन मानतात.” मावशींच्या कपाळावर किंचित आठी पडली आणि त्या चटकन म्हणाल्या, “आपल्यासारख्या म्हणजे कशा? विधवाच ना? आम्ही विधवा झालो हा आमचा गुन्हा आहे का? काही नाही, मी मुद्दाम जाणार आहे. मला काही मिरवायची हौस नाही, पण अशा अनिष्ट प्रथा कोणीतरी मोडल्याच पाहिजेत.” आणि असे फक्त बोलून थांबल्या नाहीत, तर समारंभाला स्वत: गेल्याच.
अशा प्रकारे कोणतीही गोष्ट योग्य आहे असे त्यांना वाटले की ती गोष्ट करण्यास त्या लोकांच्या टीकाटिप्पणीची मुळीच पर्वा करत नसत. अत्यंत धार्मिक वृत्तीच्या मावशींनी खोट्या, भ्रामक, दांभिकपणाला आणि कुप्रथांना कधीच थारा दिला नाही.
घरात केरवारे आणि धुणीभांडी करायला त्यांनी अनुसूचित जातीची एक स्त्री ठेवली होती. त्याबद्दल आजूबाजूला होणार्या चर्चेकडे त्यांनी अजिबात लक्ष दिले नाही, कारण कर्मचारी कोणत्या जातीचा आहे, हे पाहण्यापेक्षा त्याला स्वच्छतेची जाण आहे का, हेच त्या पाहत. त्या मुलांना नेहमी सांगत, “अस्वच्छ ब्राह्मणापेक्षा अतिशय निर्मळ असलेली ही अनुसूचित जातीची स्त्री चांगली.” अंघोळ केल्याशिवाय हे कर्मचारी लोक तोंडात पाणीसुद्धा घेत नाहीत, हे मावशींना माहीत होते. सोवळ्याओवळ्याच्या भ्रामक कल्पनांना तर त्यांनी केव्हाच फाटा दिला होता.
1935च्या सुमारास एक दिवस त्यांनी आपल्या शिकलेल्या जावेला - शांताबाई केळकर यांना एक विचार बोलून दाखवला.त्यांनी व त्यांचे पती यशवंत केळकर यांनी त्यासाठी खटपट केली. 1936च्या जुलैमध्ये वर्ध्यामध्ये मुलींची पहिली माध्यमिक शाळा सुरू झाली. पाहता पाहता मावशींच्या त्या कल्पनेला असे मूर्त स्वरूप आले. मावशी त्या शाळेच्या कार्यकारी मंडळात होत्या. नंतरही अनेक वर्षे त्या संस्थेच्या उपाध्यक्षाही होत्या. त्या काळात आपल्या मुलींना त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिकवले.
स्त्री संरक्षणक्षम व्हावी
सभोवतालच्या असाहाय्य स्त्री समाजाचे दर्शन त्यांना होई. पुराणातील महिला असोत किंवा महाभारतातील द्रौपदी असो की रामायणातील सीता, हे ऐकून स्त्रीचे संरक्षण करण्यासाठी ती स्वत:च सक्षम पाहिजे, असे त्यांना वाटे. त्यासाठी स्त्रियांसहित संपूर्ण समाजाला जागृत केले पाहिजे, या समाजाला चेतना दिली पाहिजे. रूढी, बंधन, अंधश्रद्धा यातच अडकलेल्या, संसारात गुरफटलेल्या स्त्रीला यातून जरा बाहेर काढायलाच हवे, परावलंबित्व झुगारण्याची तिच्यात ताकद कशी निर्माण होईल, अशा अनेक विचारांनी त्यांच्या डोक्यात थैमान सुरू झाले. त्यातच मावशींना ’ताराबाईची सर्कस’ म्हणजे एका महिलेने चालवलेली सर्कस पाहायला मिळाली. ती सर्कस पाहून मावशी थक्कच झाल्या. इतक्या लहान लहान मुलींनी केलेल्या शारीरिक कवायती, त्यांची चपळाई, तिथली शिस्त या सगळ्याचा मावशींच्या मनावर खूप प्रभाव पडला. मुलींना आणि स्त्रियांना असेच काहीसे शिक्षण द्यावे अशी अंधुक कल्पना त्यांच्या मनात आली. त्याच वेळी बंगालमधील ’कुसुम बाला’ अपहरण प्रकरण घडले. पती सोबत असतानाही गुंडांनी तिचे अपहरण केले, पती वकील असूनही काहीच करू शकले नाहीत याची टोचणी लागून राहिली.
मावशींची मुले तेव्हा संघशाखेत जात होती. शाखेत शिकलेल्या खड्ग, लेझीम, दंड ह्या प्रात्यक्षिकांचा सराव ही मुले घरी करत असत. ते पाहून मावशींच्या सुप्त विचारांना चालनाच मिळाली. एक दिवस त्या वत्सलाताईंना म्हणाल्या, ’‘स्त्रीलासुद्धा स्वसंरक्षणासाठी या सगळ्याची गरज आहे, नाही का? पण कोण शिकवणार?” मावशी मुलांच्या पालक म्हणून शाखेच्या कार्यक्रमाला गेल्या, तेव्हा डॉ. हेडगेवार यांची भेट झाली. चर्चेतून निष्पन्न झाले की महिलांनी स्वत:च काही पुढाकार घेऊन सुरुवात करावी.
राष्ट्र सेविका समितीची स्थापना
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तुमच्या संघटनेशी फक्त मैत्रीचा संबंध असेल; तुमच्या विचारानुसार सुरुवातीला शारीरिक शिक्षणाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला मदत करू; तुमची ही स्त्री संघटना आहे हे लक्षात ठेवून कार्यक्रम आखावेत, ही संघाची नक्कल होऊ नये; तुम्हाला फौज उभारायची नाही, पण कणखर, धीट, लढाऊ, सैनिकी मन तयार करायचे आहे” असे डॉ. हेडगेवार मावशींना म्हणाले. संघटनेच्या नावाविषयी चर्चा झाली, तेव्हा संघाची व समितीची अद्याक्षरे एक यावीत, असे डॉक्टरांचे मत होते. त्यानुसार राष्ट्र सेविका समिती (ठ.ड.ड.) हे नाव सर्वानुमते ठरले. स्थापनेचा दिवस निश्चित झाला - 25 ऑक्टोबर 1936, विजयादशमी.
बुलढाण्याचे इतिहास संशोधक, डॉ. यादव माधव काळे यांच्या हस्ते वर्ध्यात राष्ट्र सेविका समितीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. डॉ. काळे यांनी आपल्या भाषणात “समितीच्या स्थापनेमुळे हिंदू स्त्रियांसाठी आवश्यक असलेल्या एका महत्त्वाच्या गरजेची पूर्तता झाली आहे” अशा शब्दात आपला अभिप्राय व्यक्त केला व कार्यवाढीस आशीर्वाद दिला. दैनंदिन शाखेसाठी पाठक वकील यांनी आपली मोकळी जागा वर्षाला रुपये 25 भाडे याप्रमाणे दिली होती. ही रक्कम जमा कशी व्हावी, म्हणून शाखेत येणार्या मुलींना दोन आणे वर्गणी ठेवावी, असे ठरले. मात्र ते फक्त पुढील गुरुदक्षिणा जमेपर्यंत. वेणुताई कळमकर, कालिंदीताई पाटणकर, यमुनाताई काळे, वंदनीय मावशी स्वत: अशा सर्व सेविका घरोघर संपर्क करून मुलींना समिती कामाची माहिती व आवश्यकता समजावून सांगू लागल्या. समितीस्थानावर सुमारे 150 ते 300 मुली येऊ लागल्या.
शाखा नियमित सुरू झाली. शाखेचे काम सुरू झाल्यानंतर शाखावाढीच्या दृष्टीने घरोघरी जाऊन बायकांच्या भेटी घेणे आवश्यक होते. पण घरातल्या अडचणींमुळे जास्त वेळ बाहेर जाता येत नसे. कारण जाण्यायेण्यात खूप वेळ जाई. मावशींच्या मनात विचार आला, मी सायकल शिकले तर.. झाले, त्यांनी आपल्या मुलाला मनोहरला म्हटले, ‘’आम्हाला सायकल शिकवशील?”
त्याने होकार दिल्यावर, रोज वेणुताई, कालिंदीताई आणि मावशी, आणखी एक-दोघी जणींचा सायकल शिकण्याचा वर्ग सुरू झाला. मावशींना उत्तम सायकल चालवता येऊ लागली. अमुक गोष्ट कार्याला आवश्यक आहे हे त्यांना पटले की त्या ती गोष्ट आत्मसात केल्याशिवाय राहत नसत आणि स्वत:पासून त्या गोष्टीची सुरुवात करत असत. तसेच पोहणे हासुद्धा बलसंवर्धनाचा, आत्मसंरक्षणाचा व समाजाच्या उपयोगाचा एक भाग म्हणून मावशी प्रौढ वयात पोहायलाही शिकल्या.
वर्ध्याला श्रीकृष्ण रघुनंदन चव्हाण नावाचे एक प्रसिद्ध कवी होते. मावशींनी त्यांना समितीची कल्पना देऊन मराठीत तीन कडव्यांची मराठी प्रार्थनाही करून घेतली. 1947पर्यंत, म्हणजे संस्कृत प्रार्थना तयार होईपर्यंत समितीस्थानावर हीच प्रार्थना म्हटली जाई - ।हे मातृभूमी प्रिय पावना पुण्यभूमी।
समितीचा आणि घरचा प्रपंच
आता वर्ध्याला समितीच्या दोन शाखा नियमित सुरू झाल्या. मावशींची मुलगी वत्सला आणि तिच्या मैत्रिणी शाखेत नियमाने येऊन शारीरिक शिकवत असत. तरुणींच्या मनात त्यामुळे चैतन्य व आत्मविश्वास निर्माण झाला. मावशी रोज शाखेवर जात व शाखेची प्रगती जवळून पाहत. सूचना करत. मनात आलेल्या कल्पना मैत्रिणींसमोर मांडत. देशातील परिस्थिती पाहून मावशींप्रमाणेच अनेक जणींची अंत:करणे व्यथित होत आणि काहीतरी करावे ही ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नसे. 1936पासून 1938-39पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरी समितीचा विस्तार झाला होता. डॉक्टर हेडगेवारही जिथे जातील तिथे समितीचे नाव सांगून स्त्रियांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असणार्या भगिनींना मार्गदर्शन करीत होते. मावशींना अनेक पत्रे येत होती. पत्रव्यवहार वाढत होता. त्या सर्वांना मावशी न कंटाळता उत्तरे पाठवीत होत्या.
समितीचा व्याप वाढत होता, पण संसारिक जबाबदार्या सुटल्या नव्हत्या. घरात लग्नाची मुलगी होती. मुलामुलीची पसंती झाली होती. मुलगा बोटीवर काम करणारा आणि देशोदेशी फिरणारा म्हणून अशा व्यक्तीबद्दल काही लोकांचे अनेक गैरसमज असत. त्यामुळे लग्न लांबले होते. पण शेवटी मावशींनी त्यात लक्ष घालून लग्न निश्चित केले. घरातली परिस्थिती ओढाताणीची होती, म्हणून मावशींनी अगदी साधेपणाने लग्न करायचा निर्णय घेतला. देण्याघेण्याचे अवडंबर माजवायचे नाही. वरपक्षालाही ते पटले आणि वैदिक पद्धतीने विवाह पार पडला. कोण काय म्हणेल या विचारांनी खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी मावशी कधीच जात नसत. घेतलेला निर्णय विचारपूर्वक असे आणि तो त्या ठामपणे पार पाडत. या त्यांच्या गुणाचा अनुभव समिती कार्यात अनेक वेळा आला. या लग्नाला विशेष म्हणजे मावशींचे बंधू म्हणजे मुलीचे मामा या नात्याने डॉ. हेडगेवार उपस्थित होते.
इ.स. 1946च्या डिसेंबरमध्ये सिंधमध्ये कराचीला दहा दिवसांचा वर्ग घेण्यासाठी मावशींनी बकुळताई देवकुळे (मुंबई), कुसुमताई साठे (नागपूर) व विमलताई वर्तकराव (पुणे) अशा तीन सेविकांना शिक्षिका म्हणून पाठवले. वर्गाला 200 सेविका प्रशिक्षणार्थी म्हणून आल्या होत्या. वर्ग अर्थातच उत्तम झाला.
स्वातंत्र्यचळवळ आणि समिती विस्तार
1942च्या स्वातंत्र्यलढ्याने सगळा देश पेटला होता. सगळ्या देशात धरपकड चालू होती. अनेक लोक तुरुंगात जात होते आणि भूमिगतही होत होते. या भूमिगत देशभक्तांना समितीच्या सेविका मदत करीत असत. मावशींनी अत्यंत दूरदर्शीपणाने या लढ्याबाबत निर्णय घेतला होता. सेविकांच्या मनातली स्वातंत्र्याची ज्योत जागती ठेवली होती. मावशींनी सेविकांना या चळवळीपासून लांब राहा किंवा आपला या चळवळीशी काहीच संबंध नाही असे सांगितले असते, तर मावशींबद्दल, समिती कार्याविषयी विपरीत समज झाला असता. पण मावशींनी तो कौशल्याने टाळला आणि संपूर्ण सहकार्याची भूमिका ठेवली. त्यामुळे समितीच्या कार्याचा देशभर विस्तार होतच राहिला.
सिंधुताई फाटक यांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर मुंबईत नोकरी सुरू केली. पण काही काळानंतर समितीसाठी ती नोकरी सोडून त्या दिल्लीला ’सरस्वती शिशु मंदिर’ येथे काम करू लागल्या. मावशींच्या अपेक्षेप्रमाणे सिंधुताईंनी दिल्लीत समितीच्या कामाचा खूपच विस्तार केला. संघबंधूंच्या ओळखीने पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर अशा अन्य प्रांतांतसुद्धा मावशींच्या सल्ल्याने समितीचे काम सुरू केले. सेविका लग्न होऊन किंवा बदली होऊन अन्य गावी परप्रांतात गेल्या की मावशी आवर्जून त्यांचे पत्ते घेत असत. त्यांच्या वह्या सेविकांच्या पत्त्यांनी भरून गेल्या होत्या. डॉ. कुसुमताई घाणेकर या कार्यकर्त्या तामिळनाडू, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, बिहार इतक्या प्रांतातील प्रमुख शहरी जाऊन सुमारे एक एक महिना राहिल्या. तेथे शाखा तर सुरू केल्याच, तसेच तीन-तीन दिवसांची शिबिरेसुद्धा घेतली.
हळूहळू सर्व प्रांतांत मावशींचा प्रवास सुरू झाला. त्यामुळे मावशींना भाषेची अडचण जाणवू लागली. मग मावशींनी साठीच्या वयात हिंदीचा अभ्यास सुरू केला. त्यांना अस्खलित शुद्ध हिंदी बोलता येऊ लागले. त्यांनी इंग्लिशचाही थोडाफार अभ्यास केला.कोणत्याही प्रांतात जाण्यापूर्वी त्या तेथील रितीरिवाजांची आणि इतिहासाची माहिती करून घेत असत.
वयाच्या साठीनंतर काही शारीरिक तक्रारी सुरू झाल्या होत्या. त्यासाठी त्यांनी योगासनांचा अभ्यास सुरू केला होता. महर्षी जनार्दन स्वामींची भेट घेऊन योगासनांची शास्त्रशुद्ध माहिती करून घेतली. अनेकांशी याबाबत चर्चा केली व समितीच्या शाखांवर नियमित योगासने सुरू केली. स्त्रियांना योगासनांची अत्यंत जरुरी आहे, हे त्यांच्या लक्षात आले होते.
रामायण प्रवचने
1951मध्ये वर्ध्याला मावशींनी दर एकादशीला काही स्त्रियांना देवळात एकत्र करून रामायण सांगायला सुरुवात केली. त्याचे स्वरूप थोडे कीर्तनासारखे होते. 1953नंतर मात्र मावशींनी अगदी स्वतंत्रपणे रामायणावरील व्याख्यानांना सुरुवात केली. चैत्र प्रतिपदा ते रामनवमी असे पहिले प्रवचन एकटीने त्यांनी वर्ध्याला केले. 1953नंतर चार-पाच वर्षे समिती शाखा मंदावल्या होत्या. त्या काळी मावशींनी गावोगावी रामायण कथनाच्या माध्यमाने सेविकांशी संपर्क साधला. समिती कार्याला त्यामुळे चालना मिळू लागली. रामायण सांगण्यामागे समिती कार्य हाही मावशींचा प्रमुख हेतू होताच व तो ह्या रामायणामुळे बराच साध्य झाला. गावोगावच्या सेविकांना उत्साह आला. सुरुवातीला फार गर्दी नसे, पण मावशींच्या ओघवत्या शैलीमुळे त्यांच्या वाणीची कीर्ती सर्वदूर पसरू लागली, तशी प्रवचनाला गर्दी वाढू लागली. हळूहळू महाराष्ट्रभर रामायण प्रवचनांची कीर्ती पसरली व त्यांना ठिकठिकाणी बोलावणे येऊ लागले. प्रवचनाच्या शेवटी मावशींना निधी दिला जाई. मावशींनी सुरुवातीला अहिल्या मंदिराचे कर्ज फेडण्यासाठी व त्यानंतर वर्ध्याच्या देवी अष्टभुजेच्या मंदिर उभारणीसाठी तो सर्व निधी दिला. प्रवचन ऐकण्यासाठी आलेल्या जुन्या सेविका मावशींना भेटल्या, तशा काही नवीन सेविकाही समिती कार्याला जोडल्या गेल्या. बडोदा, सातारा, ग्वाल्हेर या ठिकाणी झालेल्या प्रवचनांना अनुक्रमे राजमाता शांतादेवी, सुमित्राराजे भोसले, विजयाराजे शिंदे स्वत: रोज उपस्थित असत. मावशींच्या प्रभावी वाणीने व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाने त्या इतक्या भारावून गेल्या की त्यांचे समिती कार्याला वेळोवेळी खूप सहकार्य झाले. मावशी इतर प्रांतांत हिंदीमधूनही रामायण सांगायला लागल्या. तेही श्रोत्यांना अतिशय आवडत असे. प्रतिपदा ते रामनवमी असे नऊ दिवस प्रवचने करण्याचा तेरा वर्षे संकल्प केला होता. 1972मध्ये तो पूर्ण झाला, म्हणून त्यांनी नागपूरला मोठ्या प्रमाणात त्याचा सांगता समारंभ केला. नवनवीन सेविकांनी असाच रामायणाचा अभ्यास करून ठिकठिकाणी रामायण सांगण्याचा प्रेरणादायक उपक्रम तेव्हापासून पुढे सुरू झाला. वंदनीय मावशींनी महाभारताचाही अभ्यास केला होता, पण त्यांचा श्रद्धेय राम होता, म्हणून त्यांनी रामायण प्रवचनाचा उपक्रमच शेवटपर्यंत चालू ठेवला होता.
कार्यकर्त्यांशी व्यवहार
1968चा पुण्याचा मेळावा व वर्ग आटोपून वर्ध्याला मावशींकडे येताना, काकू रानडे यांच्या पायाला फार मोठी दुखापत झाली. त्यांना फार असह्य वेदना होत आहेत हे पाहून मावशींनी त्यांना ’मातृसेवा संघाच्या’ दवाखान्यात नेले व आपल्या सख्ख्या बहिणीप्रमाणे महिनाभर त्यांची काळजी घेतली. कार्यकर्ती म्हणजे कुटुंबातील घटकच. संपूर्ण हिंदू समाजच त्यांचे कुटुंब होते ना?
सत्त्वपरीक्षा
इ.स. 1975 साली आणीबाणी जाहीर झाली आणि लगेचच धरपकडीला सुरुवात झाली. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, नेते व संघाचा अधिकारिवर्ग यांना आधी अटकेत टाकले. समितीच्या काही सेविकांनाही आत जावे लागेल, ही कल्पना होतीच. मावशी त्या काळात वर्धा व नागपूर येथे जास्त काळ होत्या. तिथल्या सेविकांच्या सत्याग्रहाची योजना मावशींनी अन्य भगिनींच्या मदतीने केली. त्या काळात काही लोक मावशींना विचारत, “मावशी, तुम्हाला भीती नाही का वाटत पकडले जाण्याची?” पण, “भीती काय म्हणून?” मावशी उलट विचारत. “नाही, या वयात जर तुम्हाला पकडले तर?” “अहो, ते मी माझे भाग्यच समजेन. ह्या देशातल्या नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी माझ्या हातून काही घडल्याचे समाधान मिळेल.” मावशी उत्तर देत असत.
आणीबाणीच्या काळात संघकार्यकर्त्यांशी मावशींच्या गुप्तपणे भेटी होत. तुरुंगातील मंडळींना वेळोवेळी भेटून त्यांना धीर देण्याचे काम समिती सेविकांनी करावे, असे मावशींनी सर्व सेविकांना आवाहन केले होते. मावशी स्वत: नागपूर जेलमध्ये लोकांना भेटायला जात असत. तसेच ज्यांच्या घरची मुले, यजमान तुरुंगात आहेत अशा सेविकांना त्या धीर देणारी पत्रे पाठवत असत.
अखेरचे पर्व
आणीबाणीच्या अग्निदिव्यातून समिती तावून सुलाखून बाहेर पडली. सगळ्या ठिकाणच्या शाखा अधिक उत्साहाने सुरू झाल्या. त्या वर्षाच्या उन्हाळी वर्गाला भेट देण्यासाठी मावशी गेल्या होत्या, पण त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांच्या शरीरावर व मनावर आणीबाणीच्या राजकीय परिस्थितीच्या ताणाचे परिणाम दिसत होतेच, पण त्याच वेळी त्यांचे जावई नानासाहेब चोळकर - वत्सलाताईंचे पती - खूपच आजारी होते. मावशी अतिशय अस्वस्थ होत्या. वत्सलाताई त्यांची केवळ मुलगी होत्या असे नाही, तर त्या त्यांची जिवाभावाची मैत्रीणही होत्या. अर्थात त्या कारणासाठी त्यांनी आपला प्रवास थांबवला नाही.
मुलांच्या बाबतीत मात्र आता सर्व जण स्थिरस्थावर झाले होते. पतिनिधनानंतर पहिली काही वर्षे त्यांना पैशांची अतिशय चणचण भासली होती, तीही आता संपली होती. प्रकृतिअस्वास्थ्य असतानाही रामायणाचे कार्यक्रम चालूच होते. 1978च्या जानेवारीत हैदराबादच्या मेळाव्यात समारोपाचा कार्यक्रम संपत असतानाच मावशींची तब्येत बिघडली. तेथे काही दिवस विश्रांती घेऊन त्या नागपूरला गेल्या. आता त्यांचा मुक्काम बहुतेक वेळा अहिल्या मंदिरात असे. त्याच सुमारास मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर ’सुंदर माझं घर’मध्ये मावशींची मुलाखत घेण्यात आली. त्या कार्यक्रमात श्रीमती जयवंतीबेन मेहता यांनीही मावशींना काही प्रश्न विचारले.
सर्व भारतभर होणार्या समिती शिक्षा वर्गातील शिक्षणात सारखेपणा असावा, म्हणून नागपूरला ऑक्टोबर 1977मध्ये अखिल भारतीय शिक्षिका वर्ग घेण्यात आला. केवळ शारीरिकच्या बाबतीतच हा सारखेपणा यावा असे नाही, तर आपल्या तत्त्वज्ञानाच्या बाबतीतही एकवाक्यता असावी, असा मावशींचा कटाक्ष होता. नागपूर आणि वर्धा येथील चैत्र प्रतिपदा ते रामनवमी या काळातील रामायणाचे कार्यक्रम मावशींनी पार पाडले. मात्र त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच बिघडली. मावशींना विशेष काळजी विभागात ठेवण्यात आले. प्रकृतीत चढ-उतार चालूच होता. मात्र 15 नोव्हेंबर 1978च्या सुमारास पुन्हा प्रकृती खूप बिघडली. 26 नोव्हेंबरला काही सेविका मावशींना भेटायला आल्या होत्या.
समितीचे तीन आदर्श - आदर्श माता राष्ट्रमाता जिजाऊसाहेब, धार्मिक स्थळांचे पुनरूज्जीवन करणार्या लढवय्या अहिल्यादेवी होळकर आणि स्वातंत्र्ययुद्धाचे रणांगणावर नेतृत्व करणार्या झाशीराणी लक्ष्मीबाई यांच्यासंबंधीचे कार्यक्रम समिती सतत घेते.
या आजारी अवस्थेतही, समिती कार्यकर्त्यांशी बोलताना, जवळ आलेल्या राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीची आठवण मावशींनी करून दिलीच. कार्तिक वद्य 11, म्हणजे 26 नोव्हेंबरच्या रात्री नेहमीप्रमाणे प्रमिलाताई मेढे यांनी मावशींना औषधपाणी दिले.
प्रमिलाताईंनी मावशींच्या मानेखाली हात घालून त्यांना बसते केले आणि वंदनीय मावशींनी एकदम चमत्कारिक मान हलवली, डोळे फिरवले. जराजर्जर शरीर थकले होतेच, पण इहलोकीचे हिंदू महिला संघटनेचे कार्य करून त्यांचे शरीर पंचतत्त्वात विलीन झाले. अमर आत्मा आम्हा सेविकांच्या आणि तमाम भारतीयांच्या अंत:करणात कायमची ध्येयज्योत लावून गेला.